(लोकांच्या अनुभवावर)
दहा नोव्हेंबरची गोष्ट कार्यालयात आपल्या रूम मध्ये बसलो होतो अचानक सुब्बु रूम मध्ये शिरला, जवळपास ओरडतच म्हणाला, पटाईतजी क्या आपको मालूम है, RBI के सामने तो कुटीर उद्योग शुरू हो गया है, कुटीर उद्योग???. प्रथम सुब्बुला काय म्हणायचे आहे मला काहीच उमजले नाही. हा कुटीर उद्योग आहे तरी काय पाहण्यासाठी मी स्वत: लंच मध्ये कार्यालयातून बाहेर पडलो. आरबीआयच्या समोर भली मोठी रांग पैसे बदलण्यासाठी लागलेली होती. तीच परिस्थिती जनपथ वर असलेल्या सर्व बँकांची होती. पण एक जाणवले, लाईनीत लागणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक या पूर्वी कधीच बँकांच्या लाईनीत लागले नसतील. घूँघट काढलेल्या बाया (बहुतेक राजस्थानी), पर्दानशीं स्त्रिया, आपल्या सोबत चिल्ल्या-पिल्ल्याना घेऊन लाईनीत उभ्या होत्या. बहुतेक लोक जुन्या दिल्लीतले दिसत होते. सुब्बुच्या म्हणण्याप्रमाणे ह्या लोकांनी कुटीर उद्योग सुरु केला आहे. स्वत:च्या आधारकार्डच्या उपयोग करून लोकांचे ४००० रुपये बदलून काही दिहाडी कमविण्यासाठी हे गरीब लोक बँकांच्या लाईनीत उभे होते. एका मोटारबाईक जवळ दोन चार लोकांचा घोळका दिसला. बहुतेक लाईनीत लागलेल्या स्त्रियांसोबत ते आले असावे. हिम्मत करून मी विचारले "क्या रेट चाल रिया है, मियां." त्याने लगेच उत्तर दिले, ५०० रुपैया, चाहे हजार बदलो चाहे ४००० हजार. "रेट कुछ जियादा लग रिया है". तो: एक माणसाची पूर्ण दिवसाची दिहाड़ी, शिवाय चाय-पानी आणि जास्त वेळ लागल्यास नाश्ता हि द्यावा लागणार. त्या हिशोबाने काही जास्त घेत नाही आहे, सर्वत्र हाच रेट आहे. "पैसा बदलून मिळेल याचा काय भरोसा?" तो: माझा मोबाईल न. आणि आधार कार्डची फोटो कापी मी तुम्हाला देणार, आता तर झाले. ऐसे कामों में भरोसा करना हि पड़ता है. "किती बदलून देऊ शकता?" तो: पाच दहा लाख, त्याहून जास्ती काम आपल्या बसचे नाही. असो. असाच प्रकार दिल्लीत अधिकांश ठिकाणी दिसला.
रेडक्रॉसच्या इमारती समोर एक वयस्कर अपंग भिकारी बसलेला दिसतो. घरी जाताना बहुतेक त्याच्या हातावर एक दोन रुपयांचे नाणे मी ठेवतो. तेवढेच पुण्य. पण आज काही तो दिसला नाही. बहुतेक तो हि या कुटीर उद्योगात उतरला असावा. १७ तारखेला तो भिकारी पुन्हा रेडक्रासच्या इमारती समोर बसलेला दिसला. बहुतेक १६ तारखेला बोटांना स्याही लावल्यामुळे आता त्याला नोट बदलणे शक्य नव्हते. मी सहज त्याला विचारले, "कुठे होता एवढे दिवस." तो म्हणाला साब, लाईनीत लागलो होतो. "कितने नोट छापे." दात दाखवत तो म्हणाला, सब मोदीजी कृपा है. नेहमीप्रमाणे त्याच्या हातावर २ रुपयांचे नाणे ठेवत मी पुढे निघालो. (खरे म्हणाल तर देण्याची इच्छा नव्हती. पण विचार केला हा कुटीर उद्योग अल्पकालीन आहे, ह्याचा मूळ धंधा तर भिक मागण्याचाच). ७-८ दिवसात लाईनीत उभे राहून गरिबांनी श्रीमंतांचे तीस एक हजार कोटी नक्कीच बदलून दिले असतील आणि सहा-सात हजार कोटी कमविले हि असतील. काही विरोधीपक्ष नेता लोक RBI समोर धरना द्यायला आले होते. लोकांनी त्यांना पळवून लावले, कारण त्यांच्या येण्यामुळे लाईन तुटली. गरिबांची दिहाडी मारल्या गेली. त्यांना राग येणार साहजिकच होत. पुढे नेत्यांनी लाईनीत लागलेल्यांना भडकवायचे सोडून दिले.
दुसरा कुटीर उद्योग म्हणजे जनधन योजनेचा दुरुपयोग. अंदाजे किमान ४० ते ५० लक्ष लोकांनी श्रीमंतांचे काळे धन स्वत:च्या खात्यात टाकून उजळ केले असावे. कारण या अवधीत पंचवीस हजार कोटींच्या अधिक रक्कम या खात्यांत जमा झाली. २० ते २५ टक्के कमिशन या कुटीर उद्योगात हि गरिबांना मिळाले असेल. असो. दोन एक दिवसांपूर्वी पंतप्रधान म्हणले गरिबांनी हा पैसा परत करायची गरज नाही. त्यांनी हा पैसा स्वत: जवळच ठेवला पाहिजे आणि काळा पैश्येवाल्यांना अद्दल घडवली पाहिजे.
काहीही म्हणा, काही दिवस तरी, गरीब लोकांना एक नवीन कुटीर उद्योग मिळाला. मोठ्या प्रमाणात लोकांनी या बहती गंगेत हात धुऊन घेतले.
No comments:
Post a Comment