Sunday, December 4, 2016

लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी


सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ  आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या काळी वडिलांचा पगार बहुतेक २०० रुपयांचा जवळपास होता.  दुकानात राशन नसले तरी राशन येण्याची वाट पाहत दोन-दोन, तीन-तीन दिवस लाईनीत आपली जागा रोखून उभे राहावे लागायचे. अर्थातच आम्ही सर्व भावंडे  आळीपाळीने लाईनीत उभे रहायचो. राशन आल्यावर नेहमीच भांडणे इत्यादी व्हायचची.  शेवटी महाभारताचे युद्ध जिंकून निकृष्ट दर्जेचा भरपूर कचरा असलेला गहू किंवा मिलो मिळायचा.  पण काहीही म्हणा पोटाची खळगी मात्र भरायची. हे वेगळे नवी पिढीच्या लोकांना हे किस्से कपोल कल्पना वाटत असतील. तरीही त्यांचे भरपूर मनोरंजन तर झालेच असेल आणि लाईनीत उभे राहण्याचा काही तणाव  काही अंशी कमी झाला असेल. 

अखेर काही तासांनी २००० रुपयांची नवी कोरी नोट घेऊन गल्लीतल्या वाण्याच्या दुकानात गेलो. तिथे चक्की फ्रेश आटा होता, मिलचा आटा होता, विदेशी आटा होता, पांढरा शुभ्र आटा होता, भुरे रंग का  स्वदेशी आटा होता, विटामिन वाला आटा होता, नौ अनाज वाला बाबाजींचा पोष्टिक आटा हि होता.  नव्हते  फक्त सुट्टे.  अखेर आटा न घेता रिकाम्या हाताने घरी परतलो.

घरी येऊन कधी नव्या कोर्या २००० हजारच्या नोट कडे बघितल तर कधी बँकेच्या पासबुक कडे.  कधी नव्हे ते, महिन्या अखेर खात्यात भरपूर रक्कम दिसत होती.  श्रीमंत होण्याची जाणीव झाली.  आजीने सांगितलेली एक कहाणी  आठवली. एकदा एका दरिद्री माणसाने नदी काठावर लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरु केली.  अखेर लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती सोन्याची होईल, असा वर त्याला दिला.  त्या माणसाने डोळे उघडून एका दगडाला स्पर्श केला. तो दगड तत्क्षणी सोन्याचा झाला. युरेका युरेका म्हणत तो आनंदाने उड्या मारत घरी पोहचला आणि बायकोला समोर पाहताच जवळ जवळ ओरडलाच  अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण  श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे. वेड्या सारखा तो सर्वत्र हात लावत सुटला. त्याचे जग सोन्याचे झाले होते. एक भयाण सत्य समोर आले. अन्न पाण्याविना तो तडफडत मरणार होता. असो. 

रात्री फ्रीज उघडून थंडगार पाणी प्यालो. बेडरूम मध्ये जाऊन AC सुरु केला. मखमली बिछान्यावर झोपण्याचा प्रयत्न करत गुणगुणू लागलो: 

स्वामी तिन्ही जगाचा 
आट्या बिना उपाशी. 


No comments:

Post a Comment