शून्य म्हणजे एक भला मोठा भोपळा अशी अधिकांश लोकांची समजूत आहे. शून्यात किती हि जोडा किंवा वजा करा उत्तर नेहमी शून्यच येणारच. पण या शून्यात एका रुपयाला हि अब्जावधी रुपये बनविण्याची शक्ती आहे. फक्त रुपयाला कळले पाहिजे त्याला शून्याच्या कुठल्या बाजूला उभे राहायचे आहे ते.
ज्याला शून्याचे हे गणित कळते तो आयुष्यात कधीच मार खात नाही. या वरून मला सदूची आठवण आली. सदू आणि मी एकाच वर्गात होतो. सदूला नेहमी पैकीच्या-पैकी मार्क्स मिळायचे. तो स्वत:ला अत्यंत हुशार समजायचा आमच्याशी नेहमीच कोड्यात बोलायचा. आमच्या अज्ञानावर हसायचाहि. पण त्याचे शून्याचे गणित कच्चे होते. वार्षिक परीक्षेचा निकाल लागला होता. त्याच्या वडिलांनी त्याला विचारले, सदू गणितात किती मार्क्स मिळाले. सदू नेहमीप्रमाणे कोड्यात म्हणाला, बाबा शंभरातून एक कमी. त्याच्या वडिलांनी लगेच कोपर्यातली छडी उचलली आणि सदूच्या पाठीवर चक्क ९९ व्रण उमटले. सदूला शून्याच्या गणिताचे ज्ञान असते तर त्याला चांगले मार्क्स मिळवून हि त्याला मार पडली नसती. असो.
शून्याचा शोध जरी आपल्या पूर्वजांनी लावला असला तरी आज आपण शून्याचे महत्व विसरलो आहे. आता शून्याचे ज्ञान म्हणजे काय. सामान्य लोकांना वाटते शून्यातून काही निर्माण होणे शक्य नाही. पण काही विद्वान लोकांच्या मते आपल्या सृष्टीचा निर्माण शून्यातून झाला आहे. जगाचा सर्व कारभार शून्याच्या गणितावरच आधारित आहे.
आता प्रश्न उठतो, शून्याचे गणित म्हणजे काय? आपण कुणाकडून १०० रुपयांचे कर्ज घेतले. ते चुकते केल्या शिवाय हिशोब पूर्ण होणार नाही. अर्थात १००-१०० = ००. उत्तर शून्य आल्याशिवाय शून्याचे गणित पूर्ण होत नाही. ज्यांचे शून्याचे गणित चुकेल ते कर्जबाजारी होतात. मग ते साहूकाराचे कर्ज असो किंवा धरित्री मातेचे कर्ज. धरित्री मातेचे कर्ज चुकवायला आपण नेहमीच ना नुकर करतो. कर्जाची परतफेड न करण्या मुळेच शून्याचे गणित चुकते.
आता प्रश्न उठतो, शून्याचे गणित म्हणजे काय? आपण कुणाकडून १०० रुपयांचे कर्ज घेतले. ते चुकते केल्या शिवाय हिशोब पूर्ण होणार नाही. अर्थात १००-१०० = ००. उत्तर शून्य आल्याशिवाय शून्याचे गणित पूर्ण होत नाही. ज्यांचे शून्याचे गणित चुकेल ते कर्जबाजारी होतात. मग ते साहूकाराचे कर्ज असो किंवा धरित्री मातेचे कर्ज. धरित्री मातेचे कर्ज चुकवायला आपण नेहमीच ना नुकर करतो. कर्जाची परतफेड न करण्या मुळेच शून्याचे गणित चुकते.
आता आपल्या बळीराजाचे घ्या. आज पाण्याविना बळीराजा उपाशी मरतो आहे. बळीराजावर हि वेळ का आली? बळीराजा शेतात अन्नधान्य पिकवितो अर्थात जमिनीचे कर्ज घेतो. पण त्या कर्जाची परतफेड तो करीत नाही. धरती काही जास्त व्याज मागत नाही. शेतकर्याने शेतात उरलेला कचरा-पाचोळा, जेवणाचे अवशिष्ट अर्थात जनावर आणि माणसांचे मल-मूत्र परत केले तरी हे कर्ज मोठ्याप्रमाणात फिटू शकते. पण एवढे करायला हि तो तैयार नाही, काही माया वाचविण्यासाठी तो शेतातला कचरा-पाचोळा जाळून टाकतो. आपले अवशिष्ट तो धरती मातेला परत करत नाही. सेंद्रिय खतांचा हि तो वापर करीत नाही. या शिवाय शेतीसाठी पाणी हि लागतेच. पावसाचे पाणी शेतीला पुरत नाही म्हणून जमिनीत बोरवेल लाऊन शेतकरी पिकाला पाणी देतो. पण शेतकरी या पाणी कर्जाची परतफेड करायला तैयार नाही. परिणाम आपण पाहतोच आहे. राज्यातल्या सर्व विहीर, बोरवेल सुकून गेल्या आहेत. हरियाणाचा काही भाग आज वाळवंट बनण्याचा मार्गावर आहे. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती बर्याच ठिकाणी असेल. आता शेतीला सोडाच प्यायला सुद्धा पाणी नाही हि वेळ आली आहे. बळीराजाला पाणी रुपी धरती मातेचे कर्ज न चुकविण्याचे परिणाम भोगावेच लागणार त्या शिवाय गत्यंतर नाही.
आता जमिनीला पाणी कसे परत करणार. द्वापर युगात कृष्णाने मार्ग दाखविला होता. एका दिशेला यमुना तर दुसर्या दिशेला अरावली पर्वतमाला. ब्रज मंडळात ९९ सरोवरांचा निर्माण तेथील ग्वाल बालांच्या मदतीने केला. या सरोवरांनी पावसाचे पाणी आपल्या उदरात एकत्र केले आणि जमिनीला परत केले. सरोवरांचे महत्व जनतेला पटावे म्हणून आपल्या मनीषींनी सरोवरांच्या किनार्यावर तीर्थांची निर्मिती केली. सरोवरांना धार्मिक महत्व दिले. पूर्वी गाव वसविताना तलाव हा बांधलाच जात होता. दिल्लीतही १९४७च्या पूर्वी ४ लाख जनसंख्येसाठी ५००च्या वर तलाव होते. भंडारा जिल्ह्यात गोंड राजांनी १०,०००च्या वर तलाव बांधले होते,असे ऐकिवात आहे. दुसर्या शब्दात पाण्याचे कर्ज जमिनीला चुकविण्याची पूर्ण व्यवस्था होती. पूर्वीच्या लोकांना शून्याचे गणित कळत होते. आज दिल्ली शहराची आबादी २ कोटींच्या वर आहे, पण तलाव बोटावर मोजण्या एवढेच उरले आहेत. अधिकांशी ठिकाणी पाण्याची पातळी १५० फुटाहून खोल गेली आहे. शिवाय हरियाणाचे लोक, लहर आली कि दिल्लीकरांची बिन पाण्याने हजामत करतच राहतात. काही वर्ष असेच चालले तर दिल्लीचे लातूर व्हायला जास्ती काळ लागणार नाही. कारण शून्याचे गणित सोडविण्याचा प्रयत्न इथे कुणीच करीत नाही आहे.
शून्याचे गणित सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजदंडाचा वापर करून शेतातला कचरा-पाचोळा जाळण्यावर बंदी आणता येते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देता येते. शहरातल्या कचर्याचा उपयोग खाद बनविण्यासाठी करून, परतफेड करता येऊ शकते. त्या साठी सबसिडीची व्यवस्था करणे हि सरकारला सहज शक्य आहे. या शिवाय सबसिडी रासायनिक खतांएवजी सेंद्रिय खतांवर देऊन शेतकर्यांना प्रोत्साहन देऊ शकते.
एका वाहिनी वर बुलढाणा जिल्हातल्या एका गावाची बातमी पहिली होती. गावकर्यांनी ४०च्यावर शेततळ्यांच्या निर्माण करून, दुष्काळावर मात केली. महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्याप्रमाणावर पाणी जमिनीत पुन्हा जिरविणारे प्रकल्प राबवून धरतीमातेच्या पाणी कर्जाची परतफेड सहज शक्य आहे. कमी पाण्याची शेतीचे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्नांना प्रोत्साहन दिले पाहिजे. खोलातून पाणी काढून ऊस/ धान सदृश्य पिकांवर तत्काळ प्रतिबंध लावला पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी शून्याचे गणित जुळविता आले पाहिजे. एकदा शून्याच्या गणिताचे उत्तर बरोबर आले कि परिस्थिती बदलेल. बळीराजा हि सुखी आणि समृद्ध होईल.
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
(शांतीपाठ)
No comments:
Post a Comment