Friday, April 29, 2016

सैराट झिंगतो आणि भन्नाट नाचतो



बेताल तोंडाच्या 
बात आम्ही करतो 
सैराट  झिंगतो आणि 
भन्नाट नाचतो.

अभ्यासाच्या जागी 
राजनीती खेळतो 
देशाच्या पैशांच्या 
चुराडा आम्ही करतो.

सैराट झिंगतो ........धृ

सदा विमानात फिरतो 
पंचतारांकित राहतो 
शोषणा विरुद्ध संघर्ष 
असा आम्ही करतो. 

सैराट झिंगतो .........धृ. 

 अफजल आमचा गुरु 
याकूब आमचा भाऊ 
भारत मातेची आम्ही 
सदा बरबादी चिंततो 

सैराट झिंगतो .........धृ. 

कठपुतली आम्ही 
आकाच्या इशार्यावर
सैराट झिंगतो आणि 
भन्नाट नाचतो.





Friday, April 22, 2016

चंदेरी: मियांजींच्या घरी जेवणाचा किस्सा.


   
गेल्या वर्षी चंदेरीला गेलो होतो. दुपारच्या वेळी किल्याच्या भिंतीवर पत्रावळ ठेऊन जेवत असताना, खाली दूरवर पसरलेल्या चंदेरी नगरावर नजर केली. दूर कुठून ढोल ताश्यांचा आवाज येत होता, कुठली तरी मिरवणूक निघत होती. आपल्या मेहुणीला विचारल्यास कळले, आज रामापीरची जयंती आहे. रामापीरची शोभायात्रा निघत असेल. हिंदू- मुसलमान दोन्ही धर्माचे लोक रामा पीरला मानतात.  हिंद-मुसलमान, सर्वजातीय लोक या शोभा यात्रेत  भाग घेतात.  चंदेरीची दुकाने हि आज बंद असतात. सकाळी जेवण बरोबर घेऊन अशोकनगरहून का निघालो होतो तहे हि कळले. 

(किल्याच्या भिंतीवरून दिसणारे चंदेरी शहर)  

जेवत असताना, वडिलांनी सांगितलेला एक जुना किस्सा आठवला. १९६०-६२च्या दरम्यानची गोष्ट. वडील मुंबईच्या एका रंगरसायन कंपनीचे विक्रय प्रतिनिधी म्हणून दिल्लीत कार्यरत होते. चंदेरीच्या साड्या प्रसिद्ध आहेतच. पण तिथे सद्या रंगण्याचे कारखाने  हि भरपूर आहेत. १९६०च्या दशकात जुने रंग सोडून नवीन रासायनिक रंगांचा वापर तेथे हि सुरु झाला होता. त्या बरोबर काही समस्या हि निर्माण झाल्या होत्या. कुठलीही नवीन तकनीक वापरताना सुरवातीला समस्या या येतातच. ऑफिसने मुंबई वरून एक तकनीकी व्यक्ती दिल्लीला पाठवला. त्याच्या सोबत वडील चंदेरीला पोहचले. तेथील डीलरच्या दुकानात तेथील  रंगारी जमले, त्यांच्या सोबत चर्चा झाली. दुसर्या दिवशी पहाटे एका बुजुर्ग मियांजींच्या कारखान्यात प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले. मियांजींच्या राहत्या घराच्या एक बाजुला त्यांच्या कपडे रंगण्याचा छोटेखानी  कारखाना होता. पाहुणे घरी आले, की त्यांचे यथोचित स्वागत झाले पाहिजे, हि भारतीय परंपरा आहेच.  मियांजी म्हणाले, कल आ ही रहे हो तो दुपहर का भोजन हमारे घर हो जाय.  वडिलांनी उत्तर दिले, काही हरकत नाही, पण जेवायला शाकाहारी पदार्थ ठेवा, कारण आम्ही शाकाहारी आहोत. मियांजी उद्गारले, काळजी करू नका, मी स्वत: जातीने लक्ष देईन. 

त्या दिवशी रात्री, मुंबईहून आलेल्या तकनीशियन ने विचारले, पटाईत साहेब  आपण जेवणाचे निमंत्रण स्वीकारले आहे, पण हे लोक तर मांस इत्यादी खाणारे. वडील म्हणाले, फिरतीवर असताना आपण ढाब्यावर जेवतो. अन्न कस आणि कश्यारीतीने बनविले आहे, आपल्याला माहित नसते. केवळ विश्वासावर आपण ढाब्यात जेवतो. इथे तर घर आहे, काळजी कशाला, भांडे चक्क धुऊन-पुसून स्वैपाक करतील हे लोक. कुठला हि अरुचीकर वास येणार नाही याची काळजी घेतील.

दुसर्या दिवशी काम संपल्यावर दुपारी एक दीड वाजता. मियांजींच्या घरी पोहचले. त्या काळच्या हिशोबाने घर कौलारू आणि मातीचे होते. स्वैपाकघरात ताटे मांडली होती. स्वैपाकघर हि व्यवस्थित शेणाने सारवलेले दिसत होते. चंदेरी, शिंद्यांच्या अधिकारात असल्यामुळे मराठी जेवण संस्कृतीचा प्रभाव या भागावर अजूनही आहे. अशोक नगरहून चंदेरी कडे जाताना सकाळच्या वेळी रस्त्यात ठेल्यांवर बटाटा पोहे विकताना दुकानदार दिसले होते.  मियांजींच्या घरी हि वडिलांना हा प्रभाव जाणविला.  वरण-भात, पापड, लोणचे, बटाट्याची सूखी भाजी आणि सेंवैया खीर हा मेनू होता.  चुल्हयावर कढई, ठेवलेली होती, गर्मागर्म पुर्या तळून म्हातारी अम्मी वाढणार होती.

ताटावर बसल्यावर वडिलांना एक जाणवले. पितळेचे ताट, वाटी, पेला, चुल्ह्यावर ठेवलेली पितळी कढई सर्व भांडे नवीन होते. वडिलांनी सहज विचारले, मियांजी, भांडे नवीन विकत घेतलली आहेत का. हां, आप लोक आने वाले थे, इसलिए  अम्मीजीने कहा, नए बर्तन ले आओ. मियांजीचे उत्तर ऐकून, वडिलांना कसे-कसे वाटले, काहीवेळ त्याना काय बोलावे काही सुचले नाही.  थोड्यावेळ विचार करून ते म्हणाले, अम्मीजी इसकी क्या जरुरत थी. म्हातारी अम्मीने लगेच उत्तर दिले, कैसे जरुरत नहीं थी. बामन आदमी को घर पर खाने को बुलाया है. बर्तन कितना भी मांजो कहीं न कहीं बास रही जाती है. ऐसे बर्तन में खाना खिलाकर आपका धर्मभ्रष्ट थोड़े ना करना है. फिर मुझे भी तो अल्लाताला को जवाब देना है.  त्या भोळ्या अशिक्षित म्हातारी अम्मीचे उत्तर ऐकून, वडिलांनी डोळ्यातून ओघळणार्या अश्रुना बामुश्कील थांबविले. दुसर्यांच्या धार्मिक विचारांबाबत किती काळजी होती तिला.  त्या दिवशीच्या जेवणाची गोडी काही औरच होती. 

२००७ मध्ये, वृद्धावस्था आणि आजारी असताना, वडिलांनी हा किस्सा सांगितला होता. जवळपास पन्नास वर्षानंतर हि त्यांच्या जिभेवर अम्मीच्या हातच्या जेवणाची चव  होती.  त्या दिवशी रात्री घरी सेंवैया खीर केली हे सांगणे नकोच.

वडील नेहमी म्हणायचे, तो काळ वेगळा होता. लोक ढोंगी नव्हते. त्या काळी लोक, अलग-अलग थाळीत जेवत होते, पिण्याचे पेले हि वेगळे होते. पण एका दुसर्याच्या प्रती प्रेम होत. दुसर्याच्या भावनांचा सम्मान कसा करायचा, हे अडाणी लोकांना हि कळायचे. सांगायचे नको, त्या नंतर २-३ वेळा  चंदेरी जाण्याचा वडिलांना योग आला. प्रत्येक वेळी अम्मीच्या हातचे जेवायला, ते हक्काने जात होते.

Tuesday, April 19, 2016

दारावर भाजी महाग का?- स्पष्टीकरण भाजीवाल्याचे



हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे.

तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही. आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर  भाजी विकत घेते. भाजीवाला जवळपास  राहणारा आहे.  हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी मांडून संध्याकाळी ५ ते रात्री ९-१० पर्यंत  विकण्यासाठी उत्तम नगरच्या गल्ली बोळ्यात फिरतो. साधारणत: हा हिवाळ्याच्या दिवसांत २०० किलो आणि उन्हाळ्यात १५० किलो भाजी विकतो. पावसाळ्यात याहून कमी. गेल्या आठवड्यात ४ दिवसांच्या सुट्ट्या होत्या, घरीच होतो. सौ. भाजी घेत होती. मी भाजीवाल्याला सहज विचारले मंडीचे भाव आणि तुमच्या भावात एवढा जास्त  फरक का असतो? आश्चर्य वाटेल, पण भाजीवाल्याने  मंडईतून भाजी आणण्यापासून ते दारावर ग्राहकाला विके पर्यंत भाव का आणि कसा वाढतो याचे सविस्तार वर्णन केले  आणि  फोटू हि काढू दिला.




सकाळी दहा वाजता हा भाजीवाला केशोपूर स्थित सब्जीमंडी येथे भाजी विकत घ्यायला जातो. मंडईतले भाव पाहून, किती आणी कोणती भाजी विकत घ्यायचे ठरवितो. अधिकांश भाज्यांचा मंडईत कमीतकमी ५ किलोचा भाव असतो. ५-१० किलोच्या हिशोबाने अधिकांश भाज्या विकत घ्याव्या लागतात. त्या दिवशी त्याने  अंदाजन १५० किलो भाजी विकत घेतली होती.  २००  रुपये ऑटो भाडे हि  दिले.  

दारावर भाजी विकत घेणारे ग्राहक भाजीसाठी जास्ती भाव देतात. त्यांना चांगली भाजी अपेक्षित असते.  ठेल्यावर भाजी ताजी आणि सुंदर दिसत असेल तरच  ती विकली जाते. त्या साठी भाजी घरी आणल्यावर भाजीवाला उदा: फूलगोभीवर(फ्लावर) लागलेले जास्ती डंठल तोडावे लागतात. बंड गोभी (कॅबज), वरची  खराब पाने काढावे लागते. काही भाज्या स्वच्छ करण्यासाठी उदा: लागलेली माती काढण्यासाठी  त्या पाण्यातून काढाव्या लागतात. बहुतेक वेळा बटाटे, कांदे आणि टमाटर आणि इतर भाज्या दर्जाच्या हिशोबाने वेगळ्या करून विकाव्या लागतात.  शिवाय ग्राहक स्वत: भाजी निवडतात त्यामुळे हि काही भाजी वेगळी होतेच. शेवटी उरलेली भाजी रात्री ९.३०  नंतर मिळेल त्या भावात विकावी लागते.  ग्राहकांना मिरची आणि कोथिंबीर हि मुफ्त मध्ये द्यावी लागते. या शिवाय पाव, अर्धा किलोच्या हिशोबाने भाजी विकत घेणाऱ्या ग्राहकांना २५-५० ग्राम भाजी जास्त द्यावी लागते. बहुतेक घरी भाजी विकत घेणारे ग्राहक बांधलेले असतात. जर ग्राहकाला वजनाच्या बाबतीत यत्किंचित शंका  आली तो तुटण्याची शक्यता असतेच.  

भाजी स्वच्छ करणे आणि ग्राहकाला २५-५० ग्रम जास्त देण्यामुळे जवळपास १०% भाजी ग्राहकांपर्यंत पोचता-पोचता कमी होते. किती हि झाले तरी, आठवड्यातून एखाद्याच   दिवशी १००% भाजी विकल्या जाते.  उरलेली १०% ते २०% टक्के भाजी कमी भावात अर्थात घेतलेल्या भावात आणि कधी कधी तर त्याहून कमी किमतीत विकावी लागते.   कधी कधी तर, उरलेली भाजी शेजार-पाजारच्या लोकांना मुफ्त मध्ये हि वाटावी लागते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दुसर्या दिवशी पर्यंत भाजी खराब होण्याची शक्यता असते.

आता आपण हिशोब करू. समजा भाजीवाल्याने मंडईतून १० रुपये किलोच्या हिशोबाने १५० किलो भाजी विकत घेतली, झाले १५०० रुपये. शिवाय १०० रुपयांची कोथिंबीर आणि मिरची मुफ्त मध्ये देण्यासाठी. २०० रुपये ऑटोचे. किमान ५००-७००  रुपये  भाजीवाल्याची कमाई, १०० रुपये दान-दक्षिणा (मुंबईत  दान दक्षिणा जास्त असू शकते ), ५० रुपये किरकोळ खर्च. असे झाले २५०० रुपये. आपण गृहीत करू १५ %  उरलेली भाजी (२२.५ किलो) रेट टू रेट विकली. अर्थात २५००-२२५ = २२७५ रुपये.

आता उरलेली ११२.५ किलो भाजी किमान २० रुपये किलोच्या (सरासरी भाव) हिशोबाने भाजीवाल्याने विकली तरच त्याला २२५० रुपये मिळतील.  अर्थात कमीत कमी दुप्पट  भावात  भाजी  विकावीच लागेल  तरच भाजीवाल्याला ५०० रुपये स्वत:साठी वाचविता येईल.  

पण इथे हि एक घोळ आहे. प्रत्येक दिवशी दुसरे  भाजीवाले कुठल्या भावाने भाजी विकत आहे, हे हि ध्यानात ठेवावे लागते. (मंडईत भाजीवाले वेगवेगळ्या भावाने भाजी विकत घेतात). बहुतेक वेळा कांदे, बटाटा, फुलगोभी किंवा अन्य मौसमी भाज्या दुप्पट भावाने विकता येत नाही. या शिवाय नेहमीच्या ग्राहकांना थोडी सवलत हि द्यावीच लागते. त्या मुळे अन्य भाज्यांवर किलोवर १५-२० रुपये जास्ती आकारावे लागतात.  

भाजीवाल्याचे स्पष्टीकरण ऐकल्या वर  लक्ष्यात आले,  मंडईतल्या भावात आणि घर पोच भाजी विकणार्या फेरीवाल्याच्या भावात फरक का असतो. मला तर त्याचे म्हणणे पटले, तुम्हाला?

टीप: आपली प्रतिक्रिया अपेक्षित


Monday, April 18, 2016

सत्यनारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा


काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे.  मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते. समाजातील सर्व वर्गांना हि कथा एक सूत्रात बांधते. 

हिंदू धर्मात सदैव दोन प्रवाह राहिले आहे. एक प्रवाह स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यासाठी समाजात दुही माजविण्याचे कार्य करतो, ज्याला आपण आसुरी शक्ती म्हणू शकतो तर दुसरा प्रवाह समाजात सौख्य निर्माण करणारा अर्थात दैवीय शक्ती म्हणू शकतो.  सत्यनारायण कथा सामान्य लोकांसाठी आहे. सत्यनारायणाची कथा लोकांना सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते व  समाजात सौख्य हि निर्माण करते.  नवीन कामाची सुरुवात लोक सत्यनारायणाची कथा करून सुरु करतात. नवीन विवाहित जोडपे या कथेचे श्रवण करून आपला संसार सुरु करतात.  सत्य आणि परस्पर विश्वास हे सुखी जीवनाचे सार आहे.     

सत्यनारायण कथेतील पहिले पात्र एक दरिद्री ब्राम्हण आहे. हा ब्राम्हण दरिद्री का बरे असेल हा विचार मनात आलाच. जर ब्राम्हण जास्ती दक्षिणेच्या लालचाने पूर्व निश्चित यजमान सोडून दुसरी कडे जाईल तर काय होईल. त्याला पहिल्या यजमानाशी खोटे बोलावे लागेल. काही काळ ब्राम्हणाला  जास्त दक्षिणा मिळेल. पण नंतर अधिकांश यजमान त्याला बोलावणे सोडून देतील. ब्राह्मण दरिद्री होईल. अश्याच  एका  दरिद्री ब्राम्हणाला नारद मुनींनी सत्याचरणाचा उपदेश केला. ब्राम्हणाची परिस्थिती बदलली.  तो श्रीमंत आणि समृद्ध झाला.  

दुसरे पात्र एक मोळीविक्या आहे अर्थात आजच्या पुरोगामी भाषेत म्हणायचे तर बहुजन  समाजातला. तो ब्राम्हणाचा घरी येतो, कथा ऐकतो आणि प्रसाद हि भक्षण करतो. याचा अर्थ त्या काळी  ब्राम्हणाच्या घरी हि बहुजानाचे स्वागत होत होते.  दुसर्या शब्दांत  सत्यनारायण कथेत अस्पृश्यतेचा निषेध केला आहे. 

या कथेत अंगध्वज नावाचा राजा हि एक पात्र आहे. राजा म्हणजे क्षत्रिय.  जंगलात गवळी  समाजाचे लोक (वनवासी)  सत्यनारायणाची कथा करीत आहे. राजा अंगध्वज त्यांच्या हातून प्रसाद स्वीकार करीत नाही. जातीपातीच्या भेदभावावर विश्वास ठेवणारा राजाच्या हातून प्रजेचे कल्याण संभव नाही. राजा प्रजेचा विश्वास गमावतो.  परिणाम, राजाचे राज्य नष्ट होते.  राजा अंगध्वजाला त्याची चूक उमगते. तो वनात राहणार्या गवळी लोकांसोबत सत्यनारायणाची पूजा करतो आणि त्यांच्या सोबत प्रसादाचे भक्षण करतो. अर्थात राजा अंगध्वज सामाजिक भेदभावाच्या नीतीचा त्याग करतो व जनतेचा विश्वास पुन: संपादित करतो. राजाने सामाजिक भेदभाव सोडून समस्त  प्रजेशी भातृभाव ठेवला पाहिचे  याचा बोध या कथेतून मिळतो.
 
या कथेत साधूवाणी (वैश्य समाजातला) हि एक पात्र आहे. हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे.  हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. कैद हि भोगावी लागते आणि  व्यापारात नुकसान हि होते. शेवटी साधुवाणीला सत्य मार्गावर चालण्याचे महत्व कळते.  वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो. 
सारांश सत्यनारायणाच्या कथेत समाजातील सर्व वर्णांचे पात्र- ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, दलित आणि वनवासी आहेत. सामान्य माणसाला कळावे म्हणून कथेत अनेक चमत्कार हि आहेत. पण या चमत्कारांच्या मागचे कारण समजून सत्यनारायण कथेकडे बघितले तर कळेल हि कथा सर्वांनी सत्य धर्माचे आचरण करावे आणि जातिगत भेदभावाचा मार्ग सोडून बंधुभावाने  राहण्याचा संदेश देते. त्या गृहस्थाना सत्यनारायण कथे कडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. बिना वाचता, समजता पुरातन कथांचा विरोध करणे हि एक प्रकारचे अज्ञान आहे.   

Saturday, April 16, 2016

पनीर पुरी



रविवारचा दिवस होता. सौ ने सकाळच्या नाश्त्या साठी छोले आणि पुरीचा बेत ठरविला होता.  छोल्यांना  फोडणी टाकली आणि पुरीची कणिक मळून ठेवली होती.  तेवढ्यात पहाटे फिरायला गेलेले चिरंजीव पनीर घेऊन घरी परतले. येताच म्हणाले आई, सकाळी नाश्त्यासाठी पनीरचे काहीतरी कर. सौने उत्तर दिले राजा, पुरीची कणिक आधीच मळलेली आहे. तो म्हणाला आई मग पनीर टाकून पुरी कर. चिरंजीवांची सूचना आमच्या सौ.ला पटली. पण या आधी सौ. ने कधी पनीरची पुरी केली नव्हती आणि मी हि कुठे खाल्ली आहे, हे आठवत नव्हते. तसे बटाटा आणि पनीरचे  परांठे  पुष्कळदा खाल्ले आहेत. सौ. ने पनीर किसले त्यात तिखट मीठ आणि चाट मसाला घातले. नंतर लक्ष्यात आले घरात कोथिंबीर नाही. कोथिंबीर एवजी १ चमचा कसुरी मेथी टाकली. नंतर मिश्रण एकजीव केले. मिश्रणाचे लहान लहान गोळे करून ठेवले.



साहित्य:  पनीर: 200 ग्राम, कसुरी मेथी १ चमचा, १ चमचा तिखट, १ चमचा चाट मसाला आणि चिमूटभर मीठ (मिश्रणात जास्ती मीठ टाकायची गरज नाही, कारण पुरी आपण छोल्यांसोबत खाणार आहोत).

कणिक ३ वाटी पुरी साठी आणि तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार (२ वाटी).









कणकिच्या पारीत पनीरचा गोळा भरून सौ.  पुरी लाटत होती आणि मी त्या तेलात तळत होतो.  पुरी तळणे मला नेहमीच आवडते. सौ. चे हि म्हणणे आहे, तुमच्या हाताला तेल कमी लागते. यात किती तथ्य आहे, अजून तरी मला कळलेले नाही. पण एक मात्र खरं, मेहनत का फळ मीठा होता ही है.   छोल्या सोबत सौ. ने माझ्या आवडीची  सेवईची  खीर हि केली होती. 



Monday, April 11, 2016

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?






उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः

समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.

पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच

प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे.

आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो.  पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते.  आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता.  उदा:  

गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती.
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु.

महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:.
ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा.

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका.
 पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका.

रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच.  घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच.  

 
भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो:   

 अहल्या द्रोपदी सीता तारा  मंदोदरी तथा.
  पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्.

तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन  ऋषींनी  आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला.  आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला  ‘भारत माँ’  संबोधून तिची हि पूजा  करतो.

जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित)  ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत.  

देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून  ओळखत होते.  भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता.    
     
इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही.  एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच  वध होतो.  लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर  आपण पाहताच आहोत..

ज्या  देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे.  इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम,  सोहराब यांचे तराणे गातात. तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत.  

१९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच.  पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात.  देशात शांती प्रतिस्थापित होते.

आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे.  एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी  देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे.  या विद्वानांना  एवढे हि कळत नाही, एकदा   भारत माते  विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.  मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस  वेळ लागेल.

हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. किमान आपल्या देश्याबाबत अर्थात नद्या, पर्वत, तीर्थ, पुरातन ऋषी, राजे बाबत माहिती तरी द्या. एवढे केले तरी पुरेसे. 

Thursday, April 7, 2016

शून्याचे गणित आणि बळीराजा


शून्य म्हणजे एक भला मोठा भोपळा अशी अधिकांश लोकांची समजूत आहे. शून्यात किती हि जोडा किंवा वजा करा उत्तर नेहमी शून्यच येणारच. पण या शून्या एका रुपयाला हि अब्जावधी रुपये बनविण्याची शक्ती आहे. फक्त रुपयाला कळले पाहिजे त्याला शून्याच्या कुठल्या बाजूला उभे राहायचे आहे ते. 

ज्याला शून्याचे हे गणित कळते तो आयुष्यात कधीच मार खात नाही. या वरून मला सदूची आठवण आली. सदू आणि मी एकाच वर्गात होतो. सदूला नेहमी पैकीच्या-पैकी मार्क्स मिळायचे. तो स्वत:ला अत्यंत हुशार समजायचा आमच्याशी नेहमीच कोड्यात बोलायचा. आमच्या अज्ञानावर हसायचाहि.  पण त्याचे शून्याचे गणित कच्चे होते. वार्षिक परीक्षेचा निकाल लागला होता. त्याच्या वडिलांनी त्याला विचारले, सदू गणितात किती मार्क्स मिळाले. सदू नेहमीप्रमाणे कोड्यात म्हणाला, बाबा शंभरातून एक कमी. त्याच्या वडिलांनी लगेच कोपर्यातली छडी उचलली आणि सदूच्या पाठीवर  चक्क ९९ व्रण उमटले.  सदूला शून्याच्या गणिताचे  ज्ञान असते तर त्याला चांगले मार्क्स मिळवून हि त्याला मार पडली नसती. असो. 

शून्याचा शोध जरी आपल्या पूर्वजांनी लावला असला तरी आज आपण शून्याचे महत्व विसरलो आहे. आता शून्याचे ज्ञान म्हणजे काय. सामान्य लोकांना वाटते शून्यातून काही निर्माण होणे शक्य  नाही. पण काही विद्वान लोकांच्या मते आपल्या सृष्टीचा निर्माण शून्यातून झाला आहे.  जगाचा सर्व कारभार शून्याच्या गणितावरच  आधारित आहे. 

आता प्रश्न उठतो, शून्याचे गणित म्हणजे काय?  आपण कुणाकडून १०० रुपयांचे कर्ज घेतले. ते चुकते केल्या शिवाय हिशोब पूर्ण होणार नाही. अर्थात १००-१०० = ००.  उत्तर शून्य आल्याशिवाय शून्याचे गणित पूर्ण होत नाही. ज्यांचे शून्याचे गणित चुकेल ते कर्जबाजारी होतात. मग ते साहूकाराचे कर्ज असो किंवा धरित्री मातेचे कर्ज.  धरित्री मातेचे कर्ज चुकवायला आपण नेहमीच ना नुकर करतो. कर्जाची परतफेड न  करण्या मुळेच  शून्याचे गणित चुकते.   

आता आपल्या बळीराजाचे घ्या. आज पाण्याविना बळीराजा उपाशी मरतो आहे. बळीराजावर हि वेळ का आली? बळीराजा शेतात अन्नधान्य पिकवितो अर्थात जमिनीचे कर्ज घेतो. पण त्या कर्जाची परतफेड  तो करीत नाही. धरती काही जास्त व्याज मागत नाही. शेतकर्याने शेतात उरलेला कचरा-पाचोळा, जेवणाचे अवशिष्ट अर्थात जनावर आणि माणसांचे मल-मूत्र  परत केले तरी हे कर्ज मोठ्याप्रमाणात फिटू शकते.  पण एवढे करायला हि तो तैयार नाही, काही माया वाचविण्यासाठी तो शेतातला कचरा-पाचोळा जाळून टाकतो.  आपले अवशिष्ट तो धरती मातेला परत करत नाही. सेंद्रिय खतांचा हि तो वापर करीत नाही.  या शिवाय शेतीसाठी पाणी हि लागतेच. पावसाचे पाणी शेतीला पुरत नाही म्हणून जमिनीत बोरवेल लाऊन शेतकरी पिकाला पाणी देतो.  पण शेतकरी या पाणी कर्जाची परतफेड करायला तैयार नाही.  परिणाम आपण पाहतोच आहे. राज्यातल्या सर्व विहीर, बोरवेल सुकून गेल्या आहेत. हरियाणाचा काही भाग आज वाळवंट बनण्याचा मार्गावर आहे. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती बर्याच ठिकाणी असेल. आता शेतीला सोडाच प्यायला सुद्धा पाणी नाही हि वेळ आली आहे. बळीराजाला पाणी रुपी धरती मातेचे कर्ज न चुकविण्याचे परिणाम भोगावेच लागणार त्या शिवाय गत्यंतर नाही. 

आता जमिनीला पाणी कसे परत करणार. द्वापर युगात कृष्णाने मार्ग दाखविला होता. एका दिशेला यमुना तर दुसर्या दिशेला अरावली पर्वतमाला. ब्रज मंडळात ९९ सरोवरांचा निर्माण तेथील ग्वाल बालांच्या मदतीने केला. या सरोवरांनी पावसाचे पाणी आपल्या उदरात एकत्र केले आणि जमिनीला परत केले. सरोवरांचे महत्व जनतेला पटावे म्हणून आपल्या मनीषींनी सरोवरांच्या किनार्यावर तीर्थांची निर्मिती केली. सरोवरांना धार्मिक महत्व दिले. पूर्वी गाव वसविताना तलाव हा बांधलाच जात होता. दिल्लीतही १९४७च्या पूर्वी ४ लाख जनसंख्येसाठी ५००च्या वर तलाव होते. भंडारा जिल्ह्यात गोंड राजांनी १०,०००च्या वर  तलाव बांधले होते,असे ऐकिवात आहे. दुसर्या शब्दात पाण्याचे कर्ज जमिनीला चुकविण्याची पूर्ण व्यवस्था होती. पूर्वीच्या लोकांना शून्याचे गणित कळत होते. आज दिल्ली शहराची आबादी २ कोटींच्या वर आहे, पण तलाव बोटावर मोजण्या एवढेच उरले आहेत. अधिकांशी ठिकाणी पाण्याची पातळी १५० फुटाहून खोल गेली आहे. शिवाय हरियाणाचे लोक, लहर आली कि दिल्लीकरांची बिन पाण्याने हजामत करतच राहतात.  काही वर्ष असेच चालले तर दिल्लीचे लातूर व्हायला जास्ती काळ लागणार नाही. कारण शून्याचे गणित सोडविण्याचा प्रयत्न इथे कुणीच करीत नाही आहे.   

शून्याचे गणित सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजदंडाचा वापर करून शेतातला कचरा-पाचोळा जाळण्यावर बंदी आणता येते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देता येते. शहरातल्या कचर्याचा उपयोग खाद बनविण्यासाठी करून, परतफेड करता येऊ शकते. त्या साठी सबसिडीची व्यवस्था करणे हि सरकारला सहज शक्य आहे. या शिवाय सबसिडी रासायनिक खतांएवजी सेंद्रिय खतांवर देऊन शेतकर्यांना प्रोत्साहन देऊ शकते. 

  एका वाहिनी वर बुलढाणा जिल्हातल्या एका गावाची बातमी पहिली होती. गावकर्यांनी ४०च्यावर शेततळ्यांच्या निर्माण करून, दुष्काळावर मात केली. महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्याप्रमाणावर पाणी जमिनीत पुन्हा जिरविणारे प्रकल्प राबवून धरतीमातेच्या पाणी कर्जाची परतफेड सहज शक्य आहे. कमी पाण्याची शेतीचे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्नांना प्रोत्साहन दिले पाहिजे.  खोलातून पाणी काढून ऊस/ धान सदृश्य पिकांवर  तत्काळ प्रतिबंध लावला पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी शून्याचे गणित जुळविता आले पाहिजे. एकदा शून्याच्या गणिताचे उत्तर बरोबर आले कि परिस्थिती बदलेल. बळीराजा हि सुखी आणि समृद्ध होईल. 


 

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. 
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. 

(शांतीपाठ)

Friday, April 1, 2016

चिंकीचे ना (आवडते सूप)




 कित्येक वर्षांनी चिंकी घरी आली होती. आता ती मोठी झाली होती. वाटलं होत तिचे बालपणाचे नखरे संपले असतील. पण कुठचे काय, सौ.ने मटार आणि गाजराची सुखी भाजी केली होती.  ताट वाढल्यावर भाजीतले गाजर वेचून तिने अलग केले आणि म्हणाली मावशी मला गाजर आवडत नाही. न जाणे का मला दुर्बुद्धी सुचली आणि म्हणालो. चिंकी गाजर डोक्याकरता चांगले असतात. करमचंद नेहमी गाजर खात-खात मोठ्या-मोठ्या  अपराध्यांना हुडकून काठायचा.  "टीवीवर सर्व खोट दाखवितात. माझे किनई १०वीत ९५ टक्के मार्क्स आले होते, ए मावशी तुझे किती आले होते ग! विचारत तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले." तिच्या गुगलीवर माझी विकेटच उडाली.  आता काय उत्तर देणार तिच्या मावशी आणि काकांचे मार्क्स मिळून हि तेवढे आले नसतील. मला धर्म संकटात पाहून सौ. लगेच माझ्या मदतीला देवाप्रमाणे धावून आली. तिने चिंकीला विचारले,  चिंकी तुला कुठकुठल्या भाज्या आवडतात, एकदाचे सांगून दे, म्हणजे मला तुला आवडणार्या भाज्या बनविता येईल. चिंकी सुरु झाली, मला किनई, गाजर, दुधी, लाल भोपळा, वांग....... . तात्पर्य तिला बटाटा, गोभी, शिमला मिरची, भेंडी सोडून कुठल्याच भाज्या आवडत नव्हत्या. शेवटी, माझ्या कडे बघत म्हणाली, काका, मला मला माहित आहे, तुम्हाला भाज्या चांगल्या करता येतात, शक्कल लढवून  नावडत्या भाज्या मुलांच्या गळ्यात मारतात.  पण लक्ष्यात ठेवा मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, अस्सल मुंबईकर आहे मी. मुंबईकराने आव्हान दिल्यावर दिल्लीकर मागे का राहणार? च्यायला तिच्या नावडत्या भाज्या तिच्या गळ्यात मारण्याची तैयारी सुरु केली. तसे म्हणाल तर दिल्लीकर  दरवर्षीच्या बजेटमध्ये  नेहमीच  मुंबईकरांना मूर्ख बनवितातच

संध्याकाळी सौ. दारावर भाजी विकत  घेत होती. ठेल्यावर मस्त लाल टमाटर होते. हिवाळ्यात दिल्लीत लालसुर्ख मस्त टमाटर मिळतात. मला मौका मिळाला. मी विचारले, चिंकी तुला टमाटर सूप आवडते का? हो, ती म्हणाली. माझ्या डोक्यात त्या क्षणी चिंकीला कसे  मूर्ख बनविता येईल याची  आयडिया आली.

दुसर्या दिवशी रविवार होता. सर्व ताणून झोपले होते. मी नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठलो. स्वैपाक घरात गेलो.  थोडे  भोपळा, दोन गाजर, २-३ टमाटर, आल्याचा एक छोटा तुकडा, ४-५ लसुणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि हुकमाचा इक्का म्हणून बीट्सचा एक तुकडा. सर्व साहित्य कापून थोड पाणी टाकून कुकर मध्ये  टाकले. कुकर गॅस वर ठेऊन एक शिट्टी दिली. सर्व सबूत नष्ट करण्यासाठी भाज्यांचा कचरा एका कागदात गुंडाळून  कचरा पेटीत टाकला. 

कुकर थोडा थंड झाल्यावर, थोडे पाणी टाकून सर्व शिजलेल्या मिक्सितून पातळ करून सूप एका भांड्यात काढून घेतले.  एक दुसरे भांडे गॅस वर ठेवले. दोन चमचे देसी तूप टाकून, त्यात जिरे घातले. नंतर पातळ झालेले सूप त्यात टाकले. थोडी काळी मिरीची  पूड आणि स्वादानुसार मीठ त्यात घातले. 

सकाळी सौ.ने नाश्त्या साठी उपमा केला. अर्थातच चिंकीला उपम्यात टाकलेले गाजराचे तुकडे काढून  उपमा वाढला.  पण टमाटरचे लालसुर्ख सूप, बीट्स टाकल्यामुळे सूपचा लाल रंग काही जास्तीस उठून आलेला. होता चिंकीने मिटक्या मारत  त्या स्वादिष्ट टोमाटो सूपाचा आस्वाद घेतला.   दुसर्या दिवशीतर चक्क दुधीभोपळाचे सूप फक्त २-३ टमाटर अणि बीट्सचा एक तुकडा टाकून बनविले आणि तिच्या गळ्यात मारले.   अश्या रीतीने अस्मादिकांनी  चिंकीच्या  सर्व नावडत्या भाज्या तिच्या घश्यात ओतल्या.

मुंबईला परतल्यावर चिंकीच्या आईने एकेदिवशी दुधीची भाजी केली. नेहमीप्रमाणे चिंकीने नाक मुरडले. तिची आई तिच्यावर डाफरली, च्यायला, काकांनी बनविलेले दुधीचे सूप तर तू मिटक्या मारीत पीत होती, आता काय झाले, गुपचूप  ताटात वाढलेली दुधीची भाजी  संपव मुकाट्याने. बेचारी चिंकी.