Tuesday, September 15, 2015

पाऊस - वेगवेगळे रंग



संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलो. राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागलो.  भुरका-भुरका पाऊस पडत होता.   भुरक्या  पाऊसाचे एक चांगले आहे, आपल्याला पाऊसात भिजण्याचा आनंद हि मिळतो आणि आपण जास्त ओले चिंब हि होत नाही. नजरे समोर एक अंधुक आकृती दिसू लागली.  असेच एकदा तिच्या सोबत एका संध्याकाळी भुरका-भुरका  पाऊसाचा आनंद घेत नेहरू पार्कच्या हिरवळीवर फिरत होतो.... पण तो  पाऊस.... केंव्हाच हवेत विरून गेला..  किर्रर्र बाईक थांबण्याचा आवाज, मी हादरलोच.. अंकलजी कहाँ खोये हो, कम से कम रास्ता तो देख कर पार किया करो. सॉरी, मी पुटपुटलो.  हायसं वाटल.  पांढऱ्या डोक्यावरून हात फिरविला, एवढ्या वर्षानंतर हि तो ओलावा अजून हि जाणवत होता


मेट्रोत भीड होती. उभा राहून खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहत होतो. मेट्रोच्या वाढत्या वेगाप्रमाणे, पाऊसाचा जोर हि वाढला होता.  एका गच्चीवर  काही उघडबंब लहान मुले पाऊसात खिदळत होती. एकमेकांवर पाणी उडवीत होती.  अचानक  लहानपण आठवले. जुन्या दिल्लीच्या ज्या वाड्यात  आम्ही भाड्यानी राहत होतो, त्या वाड्याच्या मध्यभागी मोठे आंगण होते. फरशी ही सिमेंटची होती. पाऊसात आम्ही लहान मूले असेच खेळायचो.  भिजण्याचा आनंद घ्यायचो. चिंब भिजून घरी आल्यावर,   आईच्या हातचा गरमागरम आले टाकून केलेला कडक चहा प्यायला मिळायचा. कधी कधी चहा सोबत कांद्याची  भजी हि.  अग, आले टाकून कडक चहा करते का? सोबत कांद्याची भजी हि, बोलता बोलता...मी जीभ चावली.  काही नजऱ्या वळल्या , काहींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.  काही  कटाक्ष - ऐसी बरसात में कड़क चाय और कांद्याची भजी खाने दिल तो करेगा ही.  उम्र पचपन कि दिल बचपन का.   काही हि म्हणा बॉलीवूड मुळे मराठी भाषेतले अनेक शब्द सर्वश्रुत झालेले आहेत. 

घरी पोहचल्या वर, चहा पिता पिता मला टीवी बघायची सवय आहे.  आज पाऊसामुळे डिश टीवीचे सिग्नल येत नव्हते. टॅब उघडला,  व्हाट्स अॅप  जावई बापूनी काही फोटो पाठविले होते. हिमाचल येथील त्यांच्या गावाजवळ वादळ फाटले होते. अनेक लोक मृत्युमुखी पडले. घरदार नष्ट झाले, शेंकडो जनावरे पाण्यात वाहून गेली. विदारक दृश्य  होते ते.  धरणी मातेचे  लचके तोडणारा... नराधम...पाऊस.  कधी कधी  रौद्र रूप घेऊन प्रलयंकारी तांडव नृत्य हि करतो हा पाऊस. 


अखेर डिश टीवीवर सिग्नल यायला सुरु झाले. मराठी बातम्या पाहू लागलो.  भयंकर दुष्काळ, आत्महत्या आणि खिरापत हि......वरुणराजाची महाराष्ट्रावरच अवकृपा  का?   पण वरुणराजा तरी काय करणार  तो तर  देवराज इंद्राच्या हुकुमाचा ताबेदार. या इंद्राला  धडा शिकविला  पाहिजे.  वृन्दावनातल्या माखन चोराची आठवण आली.  इन्द्राएवजी त्याने गोवर्धनची पूजा मांडली. ब्रजमंडळात  ९९  तीर्थांची (सरोवरांची)  स्थापना केली.  इंद्राचा पराभव झाला. लहरी वरुणराजा हि सुतासारखा सरळ झाला.  मनात विचार आला, महाराष्ट्रातले कलयुगी कृष्ण काय करतात आहेत.  त्यांनी तर तीर्थांसाठी  ठेवलेला पैका, इंद्र दरबारात, सोमरस पीत अप्सरांवरच  लुटविला...... वरुणराजाला दोष देण्यात काय अर्थ आहे.  

विचार करता करता केंव्हा डोळा लागला कळलेच नाही,  बाहेर मात्र   पाऊसाची संतत धार  सुरूच होती, एक माणूस काय विचार करतो आहे, हे त्याला तरी कुठे कळणार होते.

दिल्लीचा पावसाळा



 

2 comments: