Friday, August 15, 2014

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा


(दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे).

मनीं लोचनी श्री हरी तोची पाहें.
जनी जाणता भक्त होऊनी राहें.
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा.

समर्थ रामदास म्हणतात ज्याच्या मनांत व लोचनांत म्हणजे आंत व बाहेर श्रीराम. तोच त्याला सर्वत्र दिसत असतो. अंतर्बाह्य रामरूप भरून गेल्यामुळें त्याला ज्ञानीही म्हणावें व भक्तही म्हणावें किंवा जाणता भक्तम्हणावे त्याची बैठक बसलेली असते. त्याचा ठिकाणीं ज्ञान व भक्ती एकरूप झालेली असतात. तो पूर्ण ज्ञानी असून  सगुणांचे प्रेम व साधनाचा क्रम दोन्ही राखून असतो. तो सर्वोत्तम भक्त धन्य होय. ((मनोबोध: ४७)


समर्थ स्वत:ला श्रीरामाचे दास  म्हणायचे. पण दास कसा जाणताअसायला पाहिजे. पण श्रीरामाचा जाणता दास म्हणजे कोण? हा प्रश्न समोर येतो. उदाहरण. मी सकाळी उठून श्रीरामाचे नाव घेतो, सतत रामनामी माळा हातात  घेऊन राम नाम जपत राहतो, श्रीरामाचे स्वरूप सतत डोळ्यांसमोर असते, शिवाय रोज श्रीरामाच्या देवळात जातो व रामनवमीचा व्रत आणि भंडारा ही करतो. मी श्रीरामाचा दास आहे का? उत्तर नाही. केवळ प्रभूचे ध्यान करणे म्हणजे प्रभू भक्ती नाही’.  समर्थांनी म्हंटले आहे  गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचाजाणता भक्त केवळ श्री रामाची पूजा अर्चना करून थांबत नाही अपितु  प्रभू रामचंद्राने दाखविलेल्या मार्गावर चालतो. अर्थात त्यांचे मनसा वाचा कर्मणा अनुकरण करतो. समर्थ रामदास श्रीरामाने दाखविलेल्या मार्गावर आयुष्य भर चालले आणि मनाचा श्लोकाच्या माध्यमातून तोच मार्ग आपल्या शिष्यांना दाखविला

आता प्रभू रामचंद्र कसे होते. समर्थ म्हणतात नसे अंतरीं कामकरी विकारी उदासीन तो तापसी ब्रह्मचारीश्री राम सर्व प्रकारच्या कामवासने पासून मुक्त, परस्त्रीला माते समान मानणारे, शिवाय सदा प्रिय बोलणारा, सदा सर्वदा सत्यवादी विवेकीन बोले कदा मिथ्य वाचात्रिवाचा सदा बोलणें नम्र वाचा सुवाचाश्री राम सत्यवादी होते पण कसे नम्र आणि रुचकर बोलणारे होते. आपल्या मधुर बोलण्याने त्यांनी परशुरामाचा क्रोध शांत केला होता.  आपल्या माता-पिताच्या आज्ञापालन हेतू त्यांनी आनंदाने वनवास स्वीकारला. दृढ निश्चयी श्रीरामाने तारुण्यात अरण्यवास स्वीकारला. 

श्रीरामांच्या काळी जवळपास गंगेच्या दक्षिणेपासून तर समुद्रापर्यंत भरतभूमी वर लंकेच्या राजा रावणाचे राज्य होते. अरण्यात राहणाऱ्या दीन-दुबळ्या लोकांच्या शोषणावर सोन्याची लंका उभारली होती. जाणून-बुजून जनतेला अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारात ठेवले होते. अज्ञान आणि अशिक्षेचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे हेच रावणाचे धोरण होते. स्त्रियांचे अपहरण बलात्कार रोजच्या बाबी होत्या. विरोध करणार्यांचा नायनाट करणे हेच राक्षसी धोरण होते. जंगलात राहणारे वनवासी, भिल्ल, शबर, वानर इत्यादी रोज मरण पाहत जगत होते. दंडकारण्यात आल्यावर श्रीरामाने ही परिस्थिती पहिली. सगुणांची सेवा हीच ईश्वरी सेवा. दीन-दुबळ्या लोकांचे दुख दूर करण्याचा बीडा त्यांनी उचलला.  शबरीचे उष्टे बोर खाणे याचा अर्थ  वनवासी समाजाला श्री रामचंद्राने आपले मानले असा असा होतो. वानर राज सुग्रीवला आपले बंधू मानले. तेथील राक्षसांचा संहार करून वनवासी जनतेला राक्षसी अत्याचारापासून मुक्त केले. साहजिक रावणा बरोबर संघर्ष अनिवार्य होता.  यात श्रीरामाची कुठलीही स्वार्थ बुद्धी नव्हती म्हणून रावणाचा वध करून बिभीषणाला धर्मानुसार राज्य करण्यासाठीलंकेचे राज्य  सौपविले.

समर्थांच्या वेळी ही महाराष्ट्रात हीच परिस्थिती होती. मोगली आणि आदिलशाही अत्याचाराने प्रजा त्रस्त होती. लोकांना आपापल्या धर्मानुसार वागून कर्म करणे कठीण झाले होते. श्रीरामाच्या भक्तीत रंगलेल्या समर्थांनी रामराज्याचे स्वप्न महाराष्ट्राच्या भूमीवर पाहिले. रामभक्त हनुमाला आपला आदर्श मानले. श्री हनुमंताचे वर्णन करताना तुलसीदास म्हणतात:   

बिद्यावान गुनी अति चातुर.
राम काज करिबे को आतुर.
भीम रूप धरि असुर सँहारे.
रामचंद्र के काज सँवारे.

समस्त शास्त्रांचे ज्ञान, गुणी चतुर आणि श्रीरामाचे कार्य दुष्ट असुरांच्या संहारास सदैव तत्पर राहणारे’ असे रामभक्त हनुमान होते. समर्थांनी हनुमानाचे अनुकरण केले. लहानपणीच सन्यास घेतला. १२ वर्ष तप केले अर्थात समस्त शास्त्रांचा गहन अभ्यास केला आणि रोज १००८ सूर्य नमस्कार करून शरीर ही बलवान केले. समर्थ मृदभाषी, बोलण्या सारखे चालणारे होते. लोकांना ओळखून त्यांच्या करून योग्य कार्य संपादित करवून घेण्याचा गुण होता. आपल्या सारखे असेच लाखों शिष्य त्यांनी महाराष्ट्रात घडविले. समर्थांनी आपल्याच मुखाने म्हंटले आहे समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे. सारांश, समर्थांनी  जनतेला जागृत करून रामाचे कार्य पूर्ण करण्यास प्रेरणा दिली.  या निष्ठावंत समर्थ शिष्यांच्या सहयोगाने, ज्या वेळी देशांत अन्य भागात मंदिरांचा विध्वंस होत होता. समर्थांनी महाराष्ट्रात समर्थ संप्रदायच्या मठांची स्थापना केली, जाती-पातीचा कुठलाच भेदभाव न ठेवता मठांवर योग्य शिष्यांची नेमणूक केली. देशाच्या उन्नतीत स्त्रियांचा ही बरोबरीचा वाटा असतो असा त्यांचा विश्वास होता म्हणून अत्यंत विश्वासाने त्यांनी स्त्रियांना ही मठांचे दायित्व सौपविले. समर्थ काळाच्या मानाने पुष्कळ पुढे होते. त्या काळचा एक पोर्तगीज लेखक कॉस्मे डी गार्डा लिहितो समर्थांच्या मठांमध्ये  कुठला ही भेद-भाव नाही. युद्धात घायाळ मुस्लीम सैनिकाला ही इथे आसरा मिळतो’.  समर्थांच्या मनात कुठल्या ही धर्म संप्रदाय विषयी द्वेषभाव न्हवता. समर्थांच्या कार्यामुळेच प्रजा गुणसंपन्न आणि बलवान झाली. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना करण्यास परोक्षरूपेण मदत झाली. हे सांगण्याची गरज नाही.

समर्थांनी आपल्या बोलण्या आणि वागण्याने समर्थांचा दास कसा असतो दाखविले. गुलामीच्या अंधारात खितपत पडलेल्या दीन-दुर्बल जनतेला स्वराज्याचा सूर्य दाखविला आणि श्रीरामाचे कार्य पूर्ण केले. समर्थांनी म्हंटले आहे: स्वप्नी जे देखिले रात्री  ते ते तैसेची होतसे. बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छसंहार झाला.

श्रीरामाची भक्ती म्हणजे केवळ श्रीरामाचे स्मरण करणेच नाही. अपितु श्रीरामाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून जो योग्य मार्गाने समस्त सगुणाचे दुख दूर करतो तोच खरा जाणता भक्त होय. असा भक्तच भगवंताचा सर्वोत्तम दास असतो. आज स्वतंत्रता दिवस आहे, आपण ही श्री रामाने दाखविलेल्या मार्गावर चलण्याचा प्रयत्न करून, देशात रामराज्य स्थापनेचा प्रयत्न करू जेथे कुणी ही दुखी नसेल.  



1 comment: