Friday, August 22, 2014

कापूसकोंड्याची खरी गोष्ट


फार पूर्वी विदर्भ देशात आटपाट नगर होते, नगरच्या वेशीवर धनाजी नावाचा शेतकरी आपल्या बायको आणि एकुलत्या एक छकुल्या सोबत सुखाने नांदत होता. आपल्या शेतात तो कधी ज्वारी, तर कधी तूर, भुईमूग इत्यादी पिक घेत होता.  वरुण राजाच्या लहरीपणाचा फटका विदर्भाला नेहमीच बसतो. धनाजी सारख्या शेतकरीच्या भाग्यात लक्ष्मी नव्हती पण दुर्भिक्ष पडले तरी उपासमार व्हायची नाही. पोटाचा खड्डा अर्धा तरी भरल्या जात असे.
    
एक दिवस धनाजी शेत नागरत होता. अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो. मला मय दानवाने पाठविले आहे, तुझा उद्धार करायला. तुझ्या येण्याने माझा उद्धार कसा काय होईल,धनाजीने पुसले.  त्यावर कापूसकोंडा म्हणाला, मी कसा पांढरा  शुभ्र, रोप्या सारखा, मला तुझ्या शेतात राहायला जागा दे. माझी लागवड कर पांढरी  शुभ्र कापसी तुझ्या शेताची शोभा वाढवेल, रोप्याच्या नाण्याची बरसात होईल. धनाजीने विचारले, खरंच असं होईल का?  मी का खोटं बोलेल, एकदा बघ कि माझ्याकडे, कापूसकोंडा म्हणाला. धनाजी ने कापूसकोंड्या कडे पुन्हा एकदा टक लाऊन बघितले. रोप्यासारखा पंधरा शुभ्र लांब-लचक रेषांचा कापूस जर शेतात लावला तर नक्की रोप्याच्या नाण्यांची बरसात होईल. पण कुठली ही गोष्ट फुकट नाही मिळत हे ही धनाजीला माहित होते. त्याने कापूस कोंड्यास विचारले, माझ्या शेतात राहण्याचे तू काय घेईल. कापूस कोंडा म्हणाला मला काहीच नको, अट एकच, एकदा मी या शेतात आलो कि नेहमी साठीच  इथे राहणार. शिवाय  मला लावण्या आधी दरवर्षी मय दानवाची पूजा बांधावी लागेल, त्या साठी मोजावे लागतील १०० रोप्यांचे नाणे रोख. भरपूर पाणी, खत आणि विष ही मला पाजावे लागेल.  कबूल असेल तर मी इथे थांबतो. रोप्यांचे नाण्याचे स्वप्न बघत धनाजीने कापूसकोंड्यास शेतात राहण्याची विनंती केली. वरुण राजाची कृपा झाल्या मुळे त्या वर्षी धनाजीच्या शेतात भरपूर कपाशी लागली. खरं म्हणाल तर आटपाट नगरीच्या चहूकडे रोप्या सारखा शुभ्र कापूसच-कापूस  दिसत होता. कपाशीचे भरघोस पिक पाहून राजाचे मन चलबिचल झाले. राज्याची रिकामी तिजोरी भरण्याचा हीच वेळ. राजाने कपासिला आटपाट नगरच्या बाहेर विकण्यास प्रतिबंध लावला. स्वस्तात सर्व कापूस खरेदी केला.  कुठे धनाजी रोप्यांच्या नाण्यांचे स्वप्न पहात होता, कुठे त्याच्या नशीबी तांब्यांची नाणी आली. भरघोस पिक घेऊन ही त्याचे नुकसान झाले. आपल्या भाग्याला दोष देत, शेतात येऊन तो कापूसकोंड्यास म्हणाला, तुझ्या मुळे मला पहिल्यांदाच नुकसान झाले, तू येथून निघून जा, अन्यथा माझ्या बायको मुलावर उपाशी राहण्याची पाळी येईल.  त्या वर कापूसकोंड्याने  राक्षसा सारखा अट्टहास केला आणि म्हणाला धनाजी, अट आठव, मी आता येथून जाणार नाही. तू सावकाराकडे जा, शेत गहाण ठेव, १०० रोप्यांची नाणी आण, पुन्हा मय दानवाची पूजा बांध आणि माझी पेरणी कर. धनाजी जवळ दुसरा पर्यायच नव्हता, त्याने शेत गहाण ठेवले, १०० रोप्यांची नाणी आणली आणि मय दानवाची पूजा बांधली.

पण त्या  वर्षी वरुण राजाने विदर्भ देशावर पाउस पाडलाच नाही. पाण्या अभावी धनाजीचे शेत सुकून गेले. आता मात्र धनाजीचे डोके फिरले, तो कापूसकोंड्यास म्हणाला, तुझ्या नादी लागून माझा सत्यानास झाला. आता सावकाराचे कर्ज कसे फेडणार, बायको-मुलाला काय खाऊ घालणार? कापूसकोंडा हसत म्हणाला, मूर्ख, पाताळातले राक्षस आम्ही, माणसांचे रक्त पिणारे, आमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. रोप्याची नाणी पाहिजे होती न तुला, आता भोग आपल्या कर्मांचे फळ. जा त्या पिंपळाच्या झाडावर चढून गळफास लाव, आत्महत्या कर. हाच एक मार्ग तुझ्या साठी शिल्लक आहे. धनाजीने गळफास लाऊन आत्महत्या केली. त्या रात्री कापूस कोंड्याने राक्षसी वेश धरण करून त्याचे रक्त प्राशन केले.

अवसेची रात्र होती, घरात चूल्हा थंड पडलेला होता. छकुला अर्धपोटी अणि माय उपाशी होती. कुणाला ही झोप येत नव्हती. दोघे ही जागे होते. छकुल्याने विचारले आई, बाबा कुठे गेले? माय काय सांगणार. छकुल्याचे लक्ष दुसरीकडे  वेधण्यासाठी, ती म्हणाली, बाळ, तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू. पण ती तरी कशी सांगणार, कापूसकोंड्याच्या नादी लागून त्याच्या बापाचे प्राण गेले, शेत गेल, उपासमार नशिबी आली. काय-काय सांगणार. माय चूप झाली. कापूस कोंड्याची गोष्ट अशीच अधुरी राहिली. तेंव्हापासून विदर्भात कुणीच कापूसकोंड्याची गोष्ट सांगत नाही.

टीप: कापूसकोंडा: बीटी कॅाटन

मय दानव: अमेरिकन बीज कंपनी....

No comments:

Post a Comment