Sunday, March 9, 2014

भगवद्गीता: मुख्य देवतेला कसे ओळखावे




येsप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:I
तेsपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् I
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च l
न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते l
(भगवद्गीता  ६.२३ व २४)

अर्थ:  भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन  करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते. खरं, म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत: जाणत नाही त्यांचे पतन होते.

स्वामी त्रिकालदर्शी म्हणाले, अर्थात कुठल्या ही देवतेची पूजा करा,  ती पूजा मुख्य देवतेपाशी पोहचते आणि त्यानुसार भक्ताला त्याचे फळ ही प्राप्त होते.

भक्ताने विचारले स्वामीजी, हे कसें शक्य आहे?

स्वामी त्रिकालदर्शी: इतर देवतांची पूजा करणारे लोक जड बुद्धीचे अर्थात बुद्धिहीन असतात, त्यांचे अध्यात्मिक पातळी कमी असते आणि मुख्य देवतेला ओळखणे त्यांना शक्य नसते.

भक्त: स्वामीजी, मुख्य देवतेला कसे ओळखावे?

स्वामी त्रिकालदर्शी: ज्या देवतेच्या समोर अन्य देवता हात जोडून उभ्या असतील. तीच मुख्य देवता. जसे श्रीरामा समोर हनुमंत हात जोडून उभे असतात. श्री राम मुख्य देवता आणि हनुमंत कनिष्ठ देवता. कनिष्ठ भक्त हनुमंताची भक्ती करतात आणि त्याला नवैद्य दाखवितात. श्री रामाच्या कृपेचा प्रसाद त्यांना ही मिळतो. हे असेच आहे, जसे संकटात अडकलेला माणूस सरकारी कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्याला नेवैद्य अर्पित करतो आणि वरिष्ठांची कृपा त्यावर होते.  आपल्याला देशात हनुमंताचे मंदिरे अधिक दिसतात कारण सामान्य माणूस अर्थात कनिष्ठ भक्त मुख्य देवता ओळखण्यास समर्थ नसतो.  हरकत नाही.  मुख्य देवतेच्या सेवकावर सुद्धा वक्र दृष्टीने पाहणे कुणाला ही शक्य नसते म्हणूनच समर्थांनी म्हंटले आहे, ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे’.  

उच्च आध्यात्मिक पातळी असलेले भक्त, मुख्य देवतेला ओळखतात. विभीषण आणि सुग्रीवाने श्री रामाची भक्ती केली, दोघांना श्री रामच्या कृपेने राज्यपद लाभले. मोठे फळ मुख्य देवतेच्याच कृपेने प्राप्त होते. अर्थात कनिष्ठ देवतेची भक्ती केल्यास लहान-सहन कामे पूर्ण होतात.  मुख्य देवताच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे, त्याचाच कृपेने देशाचा कारभार चालतो. मुख्य देवतेला न ओळखणारे चुकीच्या देवतेची भक्ती भक्ती करतात आणि संकटात पडतात. अश्या मूढ भक्तांचा सर्वनाश अटळ असतो.  

भक्त: स्वामीजी, आपल्या देशात अनेक देवता आहेत. त्या आपसांत भांडतात ही. अश्या परिस्थितीत मुख्य देवता कशी ओळखायची? कुठल्या देवतेला मतरुपी नेवैद्य अर्पित करावा.

स्वामी त्रिकालदर्शी:  मुख्य देवता स्वर्गात सिंहासनारूढ असते, अन्य कनिष्ठ देवता किती ही आपसांत भांडत असल्या तरी मुख्यदेवतेचे सिंहासन आपल्या पूर्ण ताकदीने उचलून धरतात. काही देवता हात जोडून समोर उभी राहतात.  पूर्वी महाभारताच्या काळी, इंद्राने कर्णाची कवच-कुंडले मागून, त्याला शक्तीहीन केले होते. त्याच प्रमाणे मुख्य देवते जवळ ब्रम्हास्त्रापेक्षा ही घातक असे  ‘शुकास्त्र’ असते. मुख्य देवता बनण्यासाठी शुकास्त्र हे साधावेच लागते. शुकास्त्राच्या पाशात अडकून, कनिष्ठ देवता मुख्य देवते समोर हात जोडून उभ्या राहतात आणि तिचे सिंहासन उचलून धरतात.  अश्यारितीने मुख्य देवता कनिष्ठ देवतांना अर्पित केलेला नैवेद्य (मत) हरण करते. भक्त गोंधळात पडतो.  वत्सा तुला माहितच आहे रामायणात बाली ज्याच्या बरोबर युद्ध करीत असे, त्या योद्ध्याचे अर्धे बळ बालीला मिळत असे. त्यामुळे त्याला पराजित करणे कोणत्याही योद्ध्याला शक्य नव्हते. स्वयं श्री रामाला बालीवधासाठी क्षत्रियांना न शोभणारा मार्ग वापरावा लागला. असो.  मुख्य देवता ही प्रसन्न होऊन, कनिष्ठ देवतांना ‘सुवर्णास्त्र’ प्रदान करते. सुवर्णास्त्राच्या कृपेने कनिष्ठ देवता स्वर्गसुखाचा उपभोग घेतात. कनिष्ठ देवतांची भक्तांवर कृपा करण्याची क्षमता ही कमी असते,  त्यांच्या भक्तांच्या पदरी निराशाच पडते.  दुसरीकडे पराजित देवतांना स्वर्गातून हाकलून दिल्या जाते अश्या देवतांची भक्ती करणार्याचा विनाश निश्चित असतो.

स्वामी त्रिकालदर्शी म्हणतात, अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिताअन्य देवतांची उपासना करतात आणि त्यांचे पतन होते. अध्यात्मिक दृष्टीने उन्नत लोक मुख्य देवतेला ओळखतात आणि तिची पूजा करतात आणि आपल्या सर्व भौतिक कामना पूर्ण करतात. वत्सा, आध्यात्मिक पातळीच्या उच्च स्तरावर पोहचल्यावर तू हीमुख्य देवतेला ओळखण्यास समर्थ होईल.  तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. 

No comments:

Post a Comment