Sunday, September 29, 2013

गांधार विजय/ महाभारत (शकुनि आणि गांधारीची शेवटची भेट)

 (मध्यरात्रीची वेळ, शकुनि आपल्या शिविरात एका कोपऱ्यात मंचकावर ठेवेल्या चतुरंगचा पटाकडे पाहत विचारात मग्न होता. शकुनि, या आवाजाने विचार शृंखला भग्न झाली).

शकुनि: ताई, अशी मध्यरात्री तू इथे कशी आणि तुझ्या डोळ्यांत अश्रू का? त्या आंधळ्याच्या पुत्रांसाठी तर नाही ना?

गांधारी: शकुनि, तुझी गांधारी एवढी दुर्बल नाही, गांधार सोडताना आपण घेतलेला प्रण अजूनही माझ्या लक्षात आहे. कौरव जरी माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पांची (शत्रूची) पिल्ले आहेत, हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या साठी मी अश्रू नाही ढाळनार. आज रणांगणात शल्याचा वध झालेला आहे. युद्धाचा शेवट जवळ आलेला आहे आता... (हुंदका देत) शेवटची भेटायला आली आहे रे तुला, उद्या रणभूमी वर कदाचित...

शकुनि: (तिचे वाक्य मध्ये तोडत म्हणाला), हा! हा! हा!, मी जिवंत राहणार नाही, एवढेच नां. युद्धाचा सुरुवातीपासूनच हे सत्य तुला आणि मला चांगलच ठाऊक आहे. त्यात रडायचं कशाला ताई. या भारतीय युद्धात कोणी ही जिंको, पण सत्य एवढेच, अठरा अक्षोहणी भारतीय सैन्य या युद्धात कामी आलं. भारतीय सैनिकांच्या तीन पिढ्या नष्ट झाल्या. आपल्या गांधारचे काय नुकसान झाले, तुझ्या माझ्या सहित केवळ बोटावर मोजण्या इतकेच सैनिक. असं कधी पूर्वी इतिहासात घडलं होते? आता गांधारला, पुढच्या कित्येक पिढ्यांना भारतापासून काही भीती नाही. कुणा भीष्माचे सैन्य आता गांधारात प्रवेश करणार नाही किंवा कुणा गांधारीला आपल्या आयुष्याचे बलिदान द्यावे लागणार नाही. (तिच्या खांद्यावर हात ठेवत, चतुरंगच्या पटावरचा अश्व हातात घेऊन हत्तीला चिरडत) गांधारी, हे बघ आपला नातू गांधारच्या सिंहासनावर बसला आहे. आपली अश्वसेना तैयार आहे. राजाच्या आज्ञाची वाट पाहत आहे. बघ, आपल्या अश्वसेनेनी कसे भारतीय हत्तीला पायदळी तुडवले आहे. गांधारी, आपला प्रण पूर्ण झाला आहे. आपण विजयी झालो आहे. डोळ्यांतील अश्रू पूस, आनंदाचा क्षण आहे हा.

गांधारी: डोळ्यांतील आसवेंपुसत, खरंच! असे होईल.

शकुनि: गांधारी असंच होईल. नाही झालेलं आहे. उद्याचा युद्धासाठी, मला आशीर्वाद दे.

गांधारी: गांधार विजयी भव:

दोघही, गांधारचा विजय असो.



No comments:

Post a Comment