Monday, September 23, 2013

गोत्र आणि त्याची मर्यादा


दोघे  एकाच गोत्राचे असल्या मुळे त्यांना ठार मारण्यात आले. दरवर्षी विशेषतः पश्चिम  भारतात अश्या ५-६ घटना तरी घटतात. पिढ्यांपासून एका दुसऱ्याशी नात नसणारे, एकाच गोत्राचे असल्या मुळे त्यांच्या विवाहाला समाज किंवा जात पंचायती कडून विरोध होतो. विरोधाला न जुमानता जर मुलगा आणि मुलगी घरातून पळले, तर ९९% त्यांची हत्या ही होतेच. किंबहुना प्रतिष्ठेपायी घरच्यांना करावीच लागते. हे या भागातील कटू सत्य आहे. ‘गोत्र’ या बाबतीत समाजात पसरलेली अज्ञानता, या हत्यांना कारणीभूत आहे.

हे तर स्पष्ट आहे, गोत्राचा संबंध स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या नात्याशी आहे. आता गोत्र म्हणजे काय, याचा उगम कसा झाला आणि गोत्राची मर्यादा काय आणि नवीन गोत्र निर्माण होतात का? असे कित्येक प्रश्न मनात येतात. वेद, उपनिषद, पुराण इत्यादी केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे तर त्यात आपल्या भारतीय सभ्यतेच्या विकासाचा इतिहास ही दडलेला आहे. यात डोकवून मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

ऋग्वेदात एक आख्यान आहे, यौवनात आलेली ‘यमी’ आपल्या सहोदर भावास अर्थात ‘यमास’ शरीर संबंधाची याचना करते. त्या वेळीस यम तिला म्हणतो: आपल्या दोघांचा जन्म एकाच आईच्या उदरातून झाल्या असल्या मुळे, तुझी याचना मी स्वीकार करू शकत नाही. तू दुसरा अन्य पुरुष शोध आणि त्याच्याशी शरीर संबंध जोड. त्या वेळच्या विद्वान मनीषिंचे लक्ष विकृत संतीती का पैदा होतात या कडे गेले असेलच आणि त्यावर उपाय शोधण्याच प्रयत्न ही सुरु केला असेल. त्यांना ‘जीन संबंधित विकृती’ काय असतात हे माहीत नसेल. पण त्यांच्या हे लक्षात आले असेल, अरण्यात कळपात राहणारे जनावरे ही किशोर/ युवावस्थेतल्या पिल्लांना कळपातून हाकलून देतात आणि त्यांच्या संतती स्वस्थ राहतात. एकाच गर्भातून उत्पन्न झालेल्या संतीतीने शारीरिक संबंध ठेऊ नये म्हणून या आख्यानाची रचना ऋषींनी केली असेल.

काळ पुढे गेला मानव जीवनात स्थिरता येऊ लागली होती. लोक शेतीला सुरुवात झाली होती, लोक एका ठिकाणी राहू लागले होते. त्या वेळी एक स्त्री अनेक पुरुषांशी संबंध ठेवत असे आणि पुरुष ही अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवत असतीलच. जन्म घेणाऱ्या संतानांमध्ये विकृती आणि जनावरांप्रमाणे स्त्रियांसाठी होणारे विवादांकडे ही मनिषिंचे लक्ष गेले असेलच. वेदांमध्ये एक आख्यान आहे, श्वेतकेतू ऋषी आपल्या आईस, दुसऱ्या पुरुषांसी संबंध ठेवण्यास मनाई करतो. अश्या रीतीने समाजात ‘विवाह संस्था’ उदयास आली. भावी पिढीला आई किंवा वडिलांच्या नावाची/ वंशाची ओळख मिळावी म्हणून ‘गोत्र’ संस्था ही उदयास आली. दुसर्या शब्दात आपल्या पूर्वजांची आणि वंशाची ओळख ही गोत्र या विरुदावली मुळे आपल्याला कळते.

काळ आणखीन पुढे गेला, सभ्यतेचा विकास आणि जगण्यासाठी अधिक ज्ञानाची गरज भासू लागली. भावी पिढीला ज्ञान देण्यासाठी ‘गुरुकुलांची’ स्थापना होऊ लागली. ज्या प्रमाणे स्त्री आपल्या गर्भात वाढणाऱ्या बालकाचे मायेने रक्षण करते त्याच प्रमाणे गुरु ही शिष्याला सांभाळेल याचे प्रतीक म्हणून ‘आश्रमात आलेल्या मुलांचा यज्ञोपवीत विधी केला जात होता. अर्थात गुरूच्या रूपाने शिष्यांना दुसरी आईच मिळत होती. महाभारतात एक आख्यान आहे, देवयानी ही गुरु शुक्राचार्य, यांची कन्या होती, तिचे देवगुरु ब्रह्स्पती यांचे पुत्र कच या वर प्रेम जडले. तिने आपले प्रेम व्यक्त केले आणि विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण दोघ एकाच पित्याची संतान आहोत (विवाह संबंधातून जन्मास आलेली देवयानी आणि यज्ञोपवीत विधी द्वारा पुत्र झालेला कच) आपला विवाह संभव नाही, असे म्हणत तिच्या प्रेमाचा अस्वीकार केला. .. एकाच गुरूच्या आश्रमात शिकणारे स्त्री आणि पुरुष बंधू आणि भगिनी असतात, हा निर्णय त्या वेळच्या न्यायाचार्यानी घेतला असावा त्याचेच प्रतीक म्हणून ही कथा. आश्रमातून शिकलेले शिष्य आपल्या गुरुचे नाव ही विरूद म्हणून आपल्या नाव पुढे लाऊ लागले असतील तर नवल नाही. (आपल्या समाजातील अधिकांश गोत्रे ऋषी मुनींच्या नावाची आहेत).

एकदा नावाच्या मागे लागलेलं गोत्र हे विरूद नेहमीसाठी असते किंवा कालांतराने गोत्र हे बदलता येते. माझ्या वडिलांचे श्राद्ध होते. भाताचे तीन पिंड बनविले होते. एक आजोबांच्या नावाचे, दुसरे पणजोबांच्या नावाचे आणि तिसरे खापर पणजोबांच्या नावाचे. पुढे ब्राह्मण म्हणाला या पुढे श्राद्धाच्या वेळी खापर पंजोबानासाठी वेगळ्या पिंडाची  गरज नाही त्यांची जागा तुमच्या वडिलाने घेतली आहे. अर्थात खापर पणजोबा पूर्वजांच्या यादीतून वगळल्या गेले होते. खरेच आहे, खापर पणजोबांच्या वडिलांचे नाव आमच्या वडिलाना ही माहीत नव्हते. असो.

घरी येऊन विचार केला. मुलांमध्ये आई वडिलांचे ५०% टक्के जीन मुलांना वारसा म्हणून मिळतात. आता, खापर पणजोबांचे ५०% ‘जीन’ पणजोबांकडे, २५% आजोबांकडे, १२ १/२% वडिलांकडे आणि ६१/४% माझ्याकडे आले. ६ १/४% टक्के ची मालकी असलेला कंपनीचा मालिक बनू शकत नाही, त्या प्रमाणे मी ही खापर पणजोबांना आपला पूर्वज का म्हणावे व त्यांचे गोत्र का लावावे हा विचार मनात आला. निश्चितच जो विचार माझ्या मनात आला तो पूर्वीच्या लोकांच्या मनात आला असेलच.

राजा ययातीला देवयानी पासून यदू आणि तुर्वसू हे दोन पुत्र प्रत्येकांनी आपल्या नावानी नवीन वंश सुरु केला. यदुच्या वंशात पुढे सात्वत नावाचा राजा झाला त्याला वृष्णी, अंधक, महाभोज इत्यादी सहित सात पुत्र होते. या पुत्रांनी ही आपल्या नावाचा वंश(गोत्र) सुरु केले. वृष्णी वंशात पुढे भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला. ययातीला शर्मिष्ठे पासून पुरू. पुरू वंशात – कुरु- दुष्यंत भरत - युधिष्ठिर आणि दुर्योधन इत्यादी झाले. भागवतात विभिन्न वंशांचा इतिहास दिला आहे, ते वाचल्यावर जाणवले प्रत्येक तीन चार पिढी नंतरच्या वंशजांनी आपल्या नावाने गोत्राची सुरुवात केली होती.

नवीन वंश आणि गोत्रांच्या रचनेची प्रक्रिया आपल्या देशात सतत होत राहिली आहे. दोन तीन पिढ्यानंतर जनसंख्या वाढत असे, आपसात भांडणे ही. कुणी घर सोडून दूर निघून जात असे, नव्या ठिकाणी, जंगल स्वच्छ करून शेती सुरु करत असेल एक दोन पिढ्यांनी नवीन गाव आणि नवीन वंश तिथे तैयार होत असे आणि हे असेच चालत राहत असेल. (मी रहात असेलेल्या बिंदापूर एक्स ही कॉलोनी बिंदापूर गावाजवळ आहे, या गावात जाट समाजातल्या सर्वांची नाव ‘अहलावत’ हीच आहे). गेल्या काही एक-दोन शतकांपासून नवीन गोत्र निर्माण होण्याची प्रक्रिया थांबून गेली आहे. सहा-सात पिढ्या होऊन गेल्या तरी लोक एकच गोत्र लावीत आहे. त्या मुळे एक गाव नव्हे तर आजू-बाजूच्या १०-२० गावांपर्यंत एकाच गोत्राचे लोक राहतात. त्या मुळे प्रेमात पडलेल्या स्त्री आणि पुरुषांचे एक गोत्र असण्याची शक्यता ही वाढते आणि त्या मुळे होणारे निर्दोष स्त्री पुरुषांचे वध ही.

लग्नाच्या वेळी गोत्र हा विषय येतोच. आपण नवीन गोत्राची सुरुवात नाही केली यात आपल्या पूर्वजांचा दोष नाही. लग्नासाठी तीन-चार पिढ्यांपेक्षा जास्त गोत्राची मर्यादा नसावी. समान गोत्र असले तरी तो आपल्या वंशाचा नाही, हे स्वीकार करणे जास्त रास्त. गोत्रांची ही मर्यादा आपण मानली तर अनेक तुटणार लग्ने या मुळे जुळतील आणि समाजात व्याप्त गोत्र विषयक अज्ञानता मुळे खोट्या प्रतिष्ठेसाठी होणारे ‘प्रेमिकांचे वध’ ही टळतील.

No comments:

Post a Comment