Monday, September 1, 2025

कालिदास आणि आजचा ययाती

 

निरीक्षर आणि मूर्ख कालिदास एका झाडाच्या फांदीवर बसून त्याच झाडाला आपल्या कुल्हाडीने तोडत होता. एका ऋषीने ते दृश्य पाहिले. तो कालिदासला म्हणाला, मूर्ख ज्या क्षणी झाड तुटेल त्याच क्षणी तू ही खाली पडेल. कदाचित, झाडासोबत तू ही मरणार. कालिदासला ऋषींचे म्हणणे पटले, तो झाडावरून खाली उतरला. कालिदास पुढे मोठा विद्वान लेखक झाला. कालिदासने त्याच्या साहित्यात मानवाचे पशू पक्षी, प्राणी आणि  झाडे फुले यांच्या प्रेमाचे वर्णन केले आहे. प्रकृतीच्या सुंदरतेचे वर्णन केले आहे. 

आजच्या ययातिला पृथ्वीवरच स्वर्ग सुख भोगायचे आहे. त्याने राहण्यासाठी सीमेंट कांक्रीटचे घर बांधले. घरातील सर्व फर्निचर, कपाटे, इत्यादींसाठी लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले. त्याच्या घरातील एसी, मायक्रोवेव, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, कंप्यूटर इत्यादि सर्व विजेवर चालणारे होते. पेट्रोल वर चालणारी कार ही घरात होती. ययाति स्वतला सर्व शक्तिमान समजतो. फक्त शिकारीसाठी त्यांनी जंगलातील प्राण्यांचा शिकार केला. पृथ्वीवरून पशू-पक्षी आणि इतर प्राणी नाहीसे होऊ लागले.   

त्याने स्वतचे लाड पुरविण्यासाठी जंगल स्वच्छ करून, धरतीला खोदून, तिला जखमी करून मोठ्या प्रमाणात खनिजे बाहेर काढली. वीज निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणावर कोळसा काढला, कार चालविण्यासाठी  पेट्रोल ही पृथ्वीच्या रक्तातून काढले. त्यामुळे पृथ्वीवरील वायु प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झाले. प्रदूषणामुळे सर्वत्र रोगराई पसरली. आज ययातिला स्वर्ग सुखाएवजी नरक यातना भोगाव्या लागत आहे. ययाति ऋषींना शरण गेला. ऋषि म्हणाले, ययाति, तुला नरक यातनेतून मुक्ति पाहिजे असेल तर, पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचा, पशू पक्षी, वनस्पति, झाडे सर्वांच्या जगण्याचा अधिकार स्वीकार कर. धरतीचे रक्त पिणे आणि तिला जखमी करणे बंद कर. त्याशिवाय तुला नरक यातनेतून मुक्ति मिळणार नाही. 

प्रश्न एकच. ययाति ऋषींचे ऐकणार का? स्वर्गसुखाच्या लालसेने नरक यातना भोगत राहणार. 


* ययाति प्राचीन महाकाव्य महाभारतातील एक राजा ज्याला जिवंतपणे स्वर्ग सुख भोगायचे होते. त्याच्या इच्छा कधी न संपणार्‍या होत्या. अखेर त्याला सत्याचा साक्षात्कार झाला. त्याने सर्व संसारीक भोगांच्या त्याग करून संन्यास घेतला. 


 

 







Saturday, August 30, 2025

पाणी प्रेमाचे

नदीचे दोन्ही किनारे हसत-खेळत समुद्राला भेटण्यासाठी निघाले. दोन्ही किनारे एकत्र प्रवास करत समुद्राला सहज भेटले असते. न जाणे त्यांच्यात काय घडले. ते  श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने ग्रस्त झाले. दुराग्रहाची इंगळी ही त्यांना डसली. डाव्या किनार्‍याला वाटत होते, त्यालाच समुद्राकडे जाण्याचा मार्ग माहीत आहे. उजव्या किनार्‍याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. उजव्या किनार्‍याला वाटायचे, डावा किनारा मूर्ख आहे, त्याला काहीच कळत नाही. समुद्राकडे जाण्याचा मार्ग फक्त त्यालाच माहीत आहे, डाव्या किनार्‍याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. त्यांच्यात रोज विवाद होऊ लागले. एकदा भांडण विकोपाला गेले. डावा किनारा पूर्व दिशेकडे वळला तर उजवा किनारा पश्चिम दिशेकडे वळला. दोन्ही किनार्‍यामध्ये साठलेले नदीचे पानी वाळवंटात वाहून गेले.  

पाण्या अभावी त्यांना पुढे जाण्याचा मार्ग शोधणे अवघड झाले. दोन्ही किनारे पाण्याअभावी तडफडत-तडफडत वाळवंटात नष्ट झाले. 

नदीचे पाणी म्हणजे नवर्‍या-बायकोचे प्रेम. सुखी संसारासाठी हे प्रेम नेहमी जपून ठेवले पाहिजे. त्यासाठी सर्वस्व त्याग करावा लागला तरी केला पाहिजे. 




Tuesday, August 26, 2025

लघु कथा: म्हातारा आणि सोनेरी फुलांचा सुगंध

एक म्हातारा रोज  सकाळी  फिरायला बगीच्यात येत असे. बगीच्यात आल्यावर तो सोनेरी फुलांसोबत अनेक तास बोलायचा. आज सकाळी ही तो आला, पाहतो काय, बगीच्यातील सोनेरी फुलांचे रोपटे कुणीतरी उपटलेले होते. म्हातार्‍याच्या काळजात धस्स झाले, तो मटकण खाली बसला. हे बहुतेक क्रिकेट खेळणार्‍या द्वाड  मुलांचे काम आहे. त्याने मनातल्या मनात त्या मुलांना शिव्या मोजल्या. एक सोनेरी निर्जीव फूल उचलून आपल्या काळजाशी घट्ट धरले. त्याच क्षणी म्हातार्‍याला काळजात कळ जाणवली. 

आजोबा, कसे वाटते आता. म्हातार्‍याने डोळे उघडले. समोर क्यारीत सोनेरी फुले वार्‍यासवे मस्त डोलत होती. त्यांच्या सुगंध चहुओर पसरलेला होता. म्हातार्‍याने प्रेमाने सोनेरी फुलांना गोंजारले. आजोबांनी नेहमीच्या सवयीने फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो. आजोबा, आम्ही मस्त आहोत, इथे कसलीच काळजी नाही. इथे कुणीही आम्हाला त्रास देऊ शकत नाही. आजोबा, तुम्ही थकला असाल, थोडा निवांत पडा. तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो.  भरपूर वेळ आहे, आता आपल्याकडे. म्हातार्‍याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते. 



Saturday, August 23, 2025

लघु कथा: बंदूकीची गोळी ती

 

कॉंस्टेबलबलवान सिंह जोरात ओरडला, साहेब, आपल्या वर हल्ला करणारी,  आपल्या अनेक जवानांना मारणारी नक्सली कमांडर इथेच पडली आहे.  काय करायचे हिचे?  कमांडेंट तिच्या जवळ गेला, तिच्या कडे पाहिले, ती वेदनेने तडफडत रक्ताच्या थोरोळ्यात जमिनीवर पडलेली होती.  कमांडेंट ने  विचार केला, या घनदाट जंगलात मदत याला काही तास लागतील. तो पर्यन्त हिचे जीवंत राहणे शक्य नाही. हीची मरण यातनेतून मुक्ति करणेच योग्य. त्याच्या बंदूकीने तिच्या छातीचा वेध घेतला. कमांडेंटचे लक्ष क्षणभरासाठी तिच्या चेहर्‍याकडे गेले, त्याला वाटले तिचे डोळे म्हणत आहे, "साहेब, मला मारू नका, मला जगायचे आहे". कमांडेंट ने डोळे बंद केले आणि बंदूकीचे ट्रीगर दाबले. 

धाँय-धाँय गोळीचा आवाज आसमंतात घुमला. एक पक्षी आकाशी उडाला. 

आजच्या चकमकीत बंदूकीतून सुटणार्‍या गोळ्यांनी अनेक परिवारांचे आयुष्य उध्वस्त केले होते. अनेकांचे स्वप्न भंगले होते. त्या घटनेला अनेक वर्ष झाली. आता कमांडेंट निवृत होऊन गेला होता. कमांडेंट रोज रात्री झोपेची गोळी घेतो तरीही कमांडेंटला झोप येत नाही.  रात्रभर त्याच्या  कानात तिचा आवाज गुंजत राहतो -   "साहेब मला मारू नका, मला जगायचे आहे".  

युद्धाच्या कथा कधीच रम्य नसतात. त्या अतिशय वेदनादायक असतात. 

  


 

Thursday, August 21, 2025

ब्रेकिंग न्यूज आणि जीडीपी

 

पूर्व दिशेला सूर्य उगवला 
पश्चिमेला अस्त ही झाला.
कुठेच  काही घडले नाही 
चोरी डकैती झाली नाही 
रेप- दंगा काहीच नाही. 
 
चर्चेसाठी  मसाला नाही
तज्ञांची आता चर्चा नाही  
   ओरड-आरोप चिथावणी नाही।
  'ब्रेकिंग'चा न्यूजचा आत्माच मेला.

न्यूज एंकर, ब्रेकिंग वाले,
सारेच झाले बेरोजगार.
 स्टुडिओत उरली आता, 
फक्त स्मशान शांतता.   

टीव्ही विक्री थांबली,
लाचार झाली जीडीपी.
 शांततेच्या काळात,
देशाचा बाजारच झोपून गेला.