Monday, December 16, 2024

दुर्योधन: बेलेट पेपर वर निवडणूक झालीच पाहिजे.

शकुनी मामा (दुर्योधनाचा रडका चेहरा पाहून): दुर्योधन, पुन्हा पडला का निवडणूकीत. 

दुर्योधन: होय मामा, यंदा ही जनतेने मला मत दिले नाही. या वेळी तर भीमाने तब्बल 50 हजार मतांनी पराजित केले. त्या हलकट अर्जुनाने तर तब्बल लाख मतांनी कर्णा वर विजय मिळविला. धर्मराज पुन्हा राजा झाला आहे. मामा, एक ही निवडणूक मी जिंकू शकलो नाही. पण  मामा, मला एक कळत नाही, तुम्ही दहा वेळा निवडणूका कश्या काय जिंकल्या. तुमच्या सारख्या नीss.. म्हणता-म्हणता दुर्योधन मध्येच थांबला. शकुनी म्हणाला, दुर्योधना, तुला काय म्हणायचे आहे, मला कळले आहे. फक्त तूच माझे खरे स्वरूप ओळखतो याचा मला आनंदच आहे. म्हणूनच मी तुला वारसा हक्क दिला आहे. जनता मला मत देत होती, हा तुझा भ्रम आहे. भांजे, मी साम दाम दंड भेद वापरुन निवडणूका जिंकल्या आहेत. म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते. मी जनतेची कधीच पर्वा केली नाही. मी फक्त जनतेला मूर्ख बनविले आहे. पन्नास वर्षांपूर्वी पहिली निवडणूक तुझा मामाने गुंडांच्या मदतीने बूथ लुटून जिंकली होती. पण काळ एक सारखा रहात नाही. जेंव्हा बूथ लुटणे अशक्य झाले तर मामा नकली बेलेट पेपर छापून निवडणूक जिंकायचा. अश्या रीतीने वेगवेगळे मार्ग वापरुन तुझ्या मामाने दहा निवडणूका जिंकल्या आहेत आणि अब्जावधी संपत्तिचे मोठे साम्राज्य स्थापित केले आहे.  

दुर्योधन: मामा तो काळ गेला, आता ईव्हीएम आली आहे. त्या बदलणे शक्य नाही. त्यात हेराफेरी ही करता येत नाही. तसे असते तर तुमच्या या भाच्याने कधीच हेराफेरी करून निवडणूक जिंकली असती. आता तर मला वाटते, माझ्या भाग्यात फक्त वनवास आहे. 

शकुनी: एवढ्यात निराश होऊ नको, तुझा मामा जिवंत आहे. आपल्या जवळ भरपूर पैसा आहे. आपण मीडिया विकत घेऊ, एनजीओ  विकत घेऊ, सामाजिक संस्थांना विकत घेऊ. ईव्हीएम विरुद्ध जोमाने प्रचार करू. जनतेच्या मनात ईव्हीएम बाबत शंका उत्पन्न करु. मग जनताच म्हणेल बेलेट पेपर वर मतदान घ्या. एकदा की बेलेट पेपर वर मतदान घेतले की तुझा विजय निश्चित समज.

दुर्योधन: मामा,  खरोखर असे होईल? तो मायावी कृष्ण असे होऊ देईल का. 

शकुनी मामा: का नाही होणार. आपण प्रचार करू मायावी कृष्ण ईव्हीएम हेक करतो आणि पांडव निवडणूक जिंकतात. मायावी कृष्ण संविधान विरोधी आहे, प्रजातंत्र विरोधी आहे, तांनाशाह आहे. हस्तिनापूरची संपत्ति लुटून तो द्वारकेत नेतो आहे. जो पर्यन्त शकुनी जीवंत आहे, कृष्णाला असे करू देणार नाही. .. दुर्योधना कसे वाटले माझे उद्याचे भाषण?

दुर्योधन: मामा. आता माझ्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली आहे. तुम्ही आदेश द्या, मी ईव्हीएम विरोधात उद्या पासूनच देशभराचा दौरा सुरू करतो. 

असे म्हणत दुर्योधनाने जोरात घोषणा केली, ईव्हीएम मुर्दाबाद, बेलेट पेपर झिंदाबाद. पुढची निवडणूक, बेलेट पेपर वर. त्याच बरोबर कावळ्यांनी ही कांव-कांव करत प्रतिसाद दिला. 


Friday, December 13, 2024

शिक्षित मध्यमवर्ग मोक्षाच्या वाटेवर

दोन महीने पूर्वीची गोष्ट राजीव चौक जवळ असलेल्या हनुमान मंदिरात मारूतीचे  दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो, अचानक पटाईssत, अशी जोराची हाक ऐकू आली. मागे वळून बघितले, एक सत्तरीचा वयस्कर माणूस माझ्याच कडे येत होता. तो जवळ आला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला तो प्रदीप* (टोपण नाव)  होता. मला पाहताच तो म्हणाला, पटाईत, तुझ्या चेहर्‍यात काहीच बदल झालेला नाही. अजूनही तसाच दिसतो. तुला पाहताच ओळखले. प्रदीपची माझी पहिली ओळख कृषि भवन मध्ये कार्यरत असताना झाली होती. 1995 मध्ये त्याची बदली झाली. त्यानंतर काही आमची भेट झाली नाही. तब्बल 29 वर्षांनंतर आज आम्ही भेटलो होतो. त्याला जवळच्या कॉफी हाऊस मध्ये घेऊन गेलो. आम्ही कॉफी हाऊस मध्ये दोन तास बसून एका दुसर्‍याच्या राम कहाण्या ऐकल्या.    


त्याच्या मुलाने आयटीतील डिग्री घेतली आणि त्याला पुण्यात नौकरी लागली. प्रदीप ने ही निवृत झाल्यानंतर पुण्यात घर विकत घेतले. त्याच वर्षी मुलाचे लग्न ही केले. त्यानंतर मुलाने नौकरी बदलली आणि तो अमेरिकेत गेला. मुलाने अमेरिकेत घर विकत घेतले होते. त्याचा भारतात परतण्याचा विचार नाही. प्रदीप ने विचारले, पटाईत, तुझ्या मुलाचे लग्न झाले का? मी उत्तर दिले, गेल्या वर्षी झाले. तो म्हणाला तीसी उलटल्यावर झाले असेल. मी म्हणालो, काय करणार, मुली होकार देत नव्हत्या.  विषय बदलण्यासाठी  मी त्याला गमतीने विचारले, तू दोन-चार नातवांचा आजा झाला असेल? त्याच्या चेहरा गंभीर झाला, तो म्हणाला नाही रे.  मी विचारले "मुलाने लग्न केले नाही का"? तो म्हणाला, केले आहे. गेल्या दहावर्षांपासून अमेरिकेत आहे. पण त्या दोघांची मूल पैदा करण्याची इच्छा नाही. आता तर त्याची चाळीसी ही उलटली आहे. बहुतेक माझा वंश इथेच संपणार.  याचा दोष आपलाच.  आपल्या पिढीतील अधिकांश नौकरीपेशा  मध्यमवर्गीय लोकांनी एकच मूल पैदा केले.  त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. त्याने त्याचाच नातेवाईकांचे अनेक उदाहरणे दिली. नव्या पिढीतील अधिकान्श मुलांचे लग्न 30- 35 उलटल्यावर होत आहे. एकाच्या वर अपत्य नाही. काहींना मूल पैदा करण्याची इच्छा ही नाही. तो पुढे म्हणाला असेच सुरू राहिले तर आपल्या पैकी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांचे  वंश पुढील 100 वर्षांत संपुष्टात येतील. मी वातावरण हलके करण्यासाठी म्हणालो, याला  मोक्ष  म्हणतात.  प्रदीप ने पुण्यात एक वृद्धाश्रम पाहून ठेवले होते. त्याच संदर्भात तो म्हणाला, आमचे दुर्दैव, आमचा शेवट वृद्धाश्रमात होणार. बहुतेक अग्नि देण्यासाठी कुणी नातेवाईक ही जवळ नसणार. जाता-जाता प्रदीप मला  म्हणाला, तुझ्या मुलाला म्हणा, दोन किंवा तीन पोर पैदा कर.  मी ही हसत- हसत उत्तर दिले ते माझ्या हातात नाही.  आमची कितीही इच्छा असली तरी ही मुलगा आणि सून दोन्ही नौकरी करणारे असल्याने, पुढची पिढीत एकच्या वर वृद्धी होण्याची संभावना कमीच.  


त्याची कहाणी ऐकून मला रात्रभर झोप आली नाही. पण त्याचे म्हणणे खरेच होते. माझ्या आजोबांच्या वंशात आम्हा दोन तृतीयांश भाऊ आणि बहीणींचे एकच अपत्य आहे. दोनच्या वर कुणाचेही नाही. पुढची पिढी म्हणाल, तर एकच्या वर कुणाचे ही नाही. हीच परिस्थिति अधिकान्श मध्यमवर्गीय नातेवाईकांच्या घरची आहे.  पुढच्या पिढीचा जन्मदर पाहता,  पुढील 100 वर्षानी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांच्या वंशजांना मोक्षाची प्राप्ती झालेली असेल. 

Saturday, December 7, 2024

सासर्‍याचा सैपाक: पित्झा

 

गेल्या शनिवारी सकाळी सौ. माहेरी गेली. आता घरात  मुलगा, सून आणि मी. सौ. नसताना अस्मादिकांना खाण्याचे नवीन प्रयोग करायला स्वैपाकघर मोकळे होते. माझी सून  म्हणाली बाबा आपण रविवारी ब्रेकफास्ट साठी डोमिनो मधून पित्झा मागवू. मी उत्तर दिले, बाजारातून महागडा पित्झा मागविण्यापेक्षा स्वैपाक घरात ओवन आहे घरीच पित्झा बनवू. ओवनचा काही उपयोग तरी होईल. या शिवाय विदेशी कंपनीचा पित्झा मागवून आपल्या देशाचे नुकसान कशाला करायचे. आमच्या लेकाने माझ्या मताशी सहमति दाखविली. बाजारात जाऊन चार पित्झा बेस (त्यावर दोन फुकट मिळाले), अमूलचे ग्रेटेड चीज आणि पनीर, शिमला मिरची, बेबी कॉर्न आणले. घरात स्वदेशी कंपनीचा  चिली सौस आणि टमाटो सौस  आणि पित्झा वर टाकण्यासाठी हर्ब ही होते (फोटू टाकला आहे). पित्झावर भपुर सौस पसरवावे लागते म्हणून तो ही तैयार करण्याचा विचार केला. एक किलो लाल भडक हायब्रिड टमाटो शनि बाजारातून विकत आणले. रविवारी सकाळी चहा पिताना  चार टमाटो, दोन  हिरव्या मिरच्या, सहा सात काळी मिरी, एक  छोटा अदरकचा तुकडा इत्यादि साहित्य एका भांड्यात घालून अर्धा वाटी पाणी टाकून उकळून घेतले. थंड झाल्यावर टमाटोचे साल काढून सर्व साहित्य त्यात थोडे लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्सित ग्राइंड करून टमाटो प्यूरी बनवून घेतली. प्यूरी थोडी पातळ वाटली म्हणून गॅस वर थोडी गाढी करून घेतली.  


पित्झा बाजार सारखा बनविण्याची एक ट्रिक आहे. माइक्रो ओवन खालून जास्त हिट देत नाही. त्या मुळे पित्जा बाजार सारखा करारा बनत नाही. आधी ओवन 200 डिग्री वर प्री हिट करून घ्यावे. नंतर पित्झा घेऊन खालच्या बाजूने तीन मिनिटे कन्वेंशन मोड वर शेकून घ्यावे. यामुळे पित्झाची खालची बाजू थोडी करारी होते. आता तो पित्झा घेऊन वरच्या बाजूला घरात बनविलेला भरपूर टमाटो पसरवून घेतला.  त्या नंतर पनीर, कांदे, टमाटो, बारीक कापलेले बींस, बेबी कॉर्न, पनीर आणि  शेवटी ग्रेटेड चीज  पित्झा वर पसरविले. नंतर चिली सौस आणि बाजारातील विकत घेतलेले टमाटो सौस पित्झा वर शिंपडले. आता पित्झा ओवन मध्ये स्टँड वर ठेऊन 20 मिनिट कन्वेंशन मोड वर शेकून घेतला. अश्यारीतीने बाजार सारखा करारा पित्जा तैयार झाला. त्यावर हर्ब टाकून गर्मा-गर्म पित्झाचे तीन हिस्से करुन लगेच खायला घेतले. चार पित्झे आम्ही तिघांनी तासाभरात फस्त केले. पित्झाचे फोटू काढून सौ.ला व्हाट्सअप वर पाठविले. तिची प्रतिक्रिया इथे देणे उचित नाही. पण मजा आली. दोन पित्झा उरले  होते.  दुसर्‍या दिवशी पनीर आणि शिमला मिरी नव्हती. पण भरपूर चीज आणि टमाटो कांदा स्वीट कॉर्न टाकून पुन्हा पित्झा नाश्ता केला. पहिला फोटो दुसर्‍या दिवशीचा आहे. 

Monday, December 2, 2024

आज मी साबणाने आंघोळ केली


या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ. सकाळी उठून ब्रेकफास्टची तैयारी करते, मा की दाल, राजमा, छोले किंवा भाजी इत्यादिला फोडणी देते आणि कणीक मळून ठेवते. त्या नंतर सौ. चहा करते. सून ही सहाच्या आधी उठते. चहा पिऊन, पराठे, पोळ्या इत्यादि करते. नंतर आंघोळ करून, तैयार होऊन, नाश्ता करून, धावत-पळत आठच्या आधी घरातून निघते. संध्याकाळी सून साडे सात पर्यन्त घरी परतते. त्या आधी सौ. स्वैपाकाची कच्ची तैयारी करून ठेवते. सौ.च्या हातचा चहा पिऊन, सून स्वैपाकाचे काम बघते. त्यामुळे न मागता, मला ही संध्याकाळचा दुसरा चहा मिळतोच. ऑफिस मधून घरी यायला मुलाला ही रात्रीचे 9 वाजतात. रात्री साडे नऊ नंतर जेवण. मग सर्व आटोपता-आटोपता रात्रीचे साडे दहा-अकरा रोजच होतात. दुसर्‍या शब्दांत म्हणा, लेक आणि सून दोघांचे एका रीतीने यंत्रवत जगणे सुरू झाले आहे. महानगरात जगण्याचा संघर्ष हा यंत्रासारखाच असतो. 

एक दिवस संध्याकाळी सात वाजता मित्रांसोबत पार्क पे चर्चा करून घरी परतलो. पाहतो काय सौ.ने भाजीला फोडणी टाकलेली होती आणि पोळ्या करत होती. मी आश्चर्याने तिच्या कडे पाहिले. सौ. म्हणाली सून थकून घरी येते, म्हंटले आज संध्याकाळचा स्वैपाक करून टाकते. मला आपल्या कानांवर विश्वास झाला नाही. मी म्हंटले, खरे सांग, तुला सुनेचा एवढा पुळका काहून आला. सौ. माझ्या कडे पाहत हसत म्हणाली, तुमचा लेकरू आज सकाळी ऑफिस जाताना सुनेला म्हणत होता, आज त्याने साबण लाऊन आंघोळ केली आहे. सौ.चे शब्द कानात पडले आणि मी भूतकाळात पोहचलो. 

मुले शाळेत जाऊ लागली होती. मुलांची शाळा सकाळची होती. मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्शा सकाळी पाउणे सातला यायचा. मला ही सकाळी सातला घरातून निघावे लागायचे. त्याचे कारण बसस्टॉप घरापासून एक किमी दूर होता. या शिवाय त्यावेळी दिल्लीत मेट्रो सुरू झाली नव्हती. बस ने कमीत-कमी दीड तास कार्यालयात पोहचायला लागत असे. आम्ही दोघ सकाळी पाचला उठायचो. चहा पिऊन सौ. सर्वांसाठी सकाळचा नाश्ता आणि तिघांचे डब्बे तैयार करायची. मुलांसाठी सौ.ला दुपारी ही स्वैपाक करावेच लागायचा. या शिवाय घराची साफ-सफाई, कपडे धुणे, भांडे घासणे सर्वच सौ.ला करावे लागायचे. आता किमान झाडू-पोंछा आणि भांडे घासण्यासाठी बाई आहे. मला रोज संध्याकाळी घरी यायला रात्रीचे नऊ किंवा साडे नऊ होत असे. मुले ही रात्री दहा-साडेदहा पर्यन्त अभ्यास करायाची. रोजचे रुटीन आटोपता-आटोपता रात्रीचे 11 व्हायचेच. दिवसभराच्या कामाने सौ. थकून जायची. भारत सरकारात पीएसची नौकरी, त्यात मोठ्या कार्यालयात मोठ्या अधिकार्‍यांसोबत, असल्याने शनिवार आणि रविवारची सुट्टी क्वचित मिळायची. अश्या बिकट परिसस्थितीत रात्रीच्या नाटकाचा चौथा अंक सुरू करणे जमत नव्हते. शेवटी यावर उपाय काढला. ज्या दिवशी इच्छा अनावर होत असे, सकाळीच आंघोळ झाल्यावर सौ.ला म्हणायचो, आज साबणाने आंघोळ केली आहे. सौ. दिवसाचे काम त्या हिशोबने आटपायची. त्या दिवशी संध्याकाळी बहुधा वरण भात किंवा खिचडी इत्यादि करायची. त्यात वेळ आणि मेहनत कमी लागते. रात्री साडे नऊ होताच, सौ. मुलांवर तोफ डागायची, तुम्हाला दिवसभर अभ्यास करायचा नसतो. रात्री पुस्तके उघडून बसता आणि  सकाळी उठताना नखरे करतात. मी दिवा बंद करते आहे, निमूट पणे जाऊन झोपा आणि सकाळी वेळेवर उठा. मुले झोपली तरच आमचा नाटकाचा चौथा अंक सुरू व्हायचा

काही क्षणात मी भानावर आलो, च्यायला, आपला परवलीचा शब्द मुलांना माहीत आहे. आज तोच शब्द लेकराने वापरला. याचा अर्थ आपले गुपित सुनेला ही माहीत झाले असेल. मी हसत सौ.ला म्हणालो, अब पोल तो खुल चुकी है, आज अपुन भी सोने से पहले साबण लगाकर आंघोळ करेगा. तुमच्या जिभेला काही हाड...... काहीही म्हणा, सौ. लाजल्यावर या वयात ही सुंदरच दिसते.