आपल्याला वाटते तसे लहान पोरं ही निष्पाप असतात ही भारी गैर समजूत आहे. जन्माच्या पहिली दिवसापासून ते आपला स्वार्थ सिद्ध करण्याची राजनीती शिकू लागतात. जशी निवडणूक जवळ येते मुंबईत अनेक नेत्यांची मराठी अस्मिता जागृत होते. तसेच आमच्या छकुलीची ही मराठी अस्मिता अचानक जागृत झाली. असाच एक किस्सा.
छकुलीचा लहान भाऊ तेजस ( बदलेले नाव) तिला बडी दीदी म्हणतो. त्याच्यापेक्षा सहा महिने मोठ्या चुलत बहीणीला तो छोटी दीदी म्हणतो. तिन्ही मुले मला आबा आणि सौ.ला आजी म्हणतात
छकुलीने कारोना काळातील दोन वर्ष अर्थात केजी आणि पहिलीचा ऑनलाईन अभ्यास आमच्या घरी केला. दोन वर्षांत ती मराठी उत्तम बोलू लागली होती. छकुली उन्हाळ्याच्या सुट्टीत मंडी जिल्हयातील पहाडावर असलेल्या त्यांच्या गावी जाते. गावात बडी अम्मा आणि आणि चुलत आजी फक्त मंडीयाली बोलतात, त्यामुळे ती भाषा ही तिला समजते. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर तिला घरची आठवण ही येत नाही. पंधरा-सोळा खोल्यांचे भले मोठे घर, गाईचा गोठा, दोन बकऱ्या आणि मागे एक मोठे आंगण. याशिवाय चित्र-विचित्र पक्ष्यांचा गोंगाट, दूर दिसणारी व्यास नदी, दरीतील गावांत पसरलेले धुके. घरची आठवण येणे शक्यच नाही. तेजसला मात्र उन्हाळी सुट्टीत गावी सोडत नाही. एक तर वय कमी आणि खोडकर स्वभाव असल्यामुळे गावी गेल्यावर त्याच्यावर सतत लक्ष ठेवावे लागते.
वेगळा विषय. यावर्षी जलपा मातेची अवकृपा झाली. पहाडावर भयंकर पाऊस झाला. शेकडो घरे नष्ट झाली. मृत्यूचे तांडव झाले. घराचा मागचे आंगण गायीच्या गोठ्या समोरचा भाग पूर्ण कोसळला. थोडक्यात घर बचावले. (छकुली आजीच्या कडेवर, आता हे आंगण कालातीत झाले आहे)
गेल्या वर्षी नियमित शाळा सुरू झाली. छकुली आपल्या घरी परतली. छकुली मराठी भाषा ही हळू -हळू विसरू लागली होती. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आमची लेक व्हिडिओ कॉल करते. तिन्ही पोरांशी बोलणे होते. छकुलीला मराठी समजत असली तरीही ही व्हिडिओ कॉल वर ती हिंदीत बोलू लागली होती.
आता छकुली तिसरीत आहे. छोटी दीदी आणि तेजस दोन्ही एकाच वर्गात अर्थात केजीत आहे. तिन्ही एकाच शाळेत शिकतात. सर्व छोटी मुले शाळेत खोड्या करतातच. फक्त मुलांच्या खोड्या मुलींपेक्षा वेगळ्या असतात. सुरवातीला छोटी दीदी आपल्या भावाच्या खोड्यांची तक्रार बडी मम्माला करायची. पण दोन -तीन महिन्यात तिला वर्गात भाऊ असण्याचे फायदे कळून चुकले. दोघांची युती झाली. तिने भावाची तक्रार करणे बंद केले. आता दोघांचे सिक्रेट तिसर्याला कळने अशक्य झाले होते.
दोन दिवस आधी गंमत झाली रात्री नऊ वाजता छकुलीचा व्हिडिओ कॉल आला. छकुलीने चक्क शुद्ध मराठीत विचारले, आबा कसे आहात. तुमची तब्येत कशी आहे. पुढे ती म्हणाली, आबा मला मराठी आवडते. मी तुमच्याशी नेहमी मराठीतच बोलत जाईन. छकुलीचे उतू जाणारे मराठी प्रेम पाहून, माझ्या मनात पाल चुकचुकली.
शेवटी आमच्या लेकीने खुलासा गेल्या. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी हॉस्पीटल मधून घरी परतल्या-परतल्या छकुली आईला म्हणाली, मम्मा आज ना तेजस ने.....पण लगेच छकुलीचे लक्ष शेजारी उभ्या असलेल्या तेजस कडे गेले आणि तक्षणी विषय बदलत म्हणाली, आज ना हमने स्कूल में बहुत मजे किये, इत्यादी इत्यादी. मग हळूच आईच्या कानात मराठीत तेजसच्या खोडयांची तक्रार केली. साहजिकच होते, बडी दीदी आईला काय म्हणते आहे हे तेजसला कळले नाही. पण तेजस लक्ष देऊन ऐकतो आहे, हे लक्षात आल्यावर छकुली त्याला म्हणाली, मै ना मराठी में तुम्हारी तारीफ कर रही थी की तेजस बहुत अच्छा है. बिचाऱ्या तेजस ने बडी दीदीला थॅन्क्स म्हंटले. हा प्रकार पाहून आमच्या लेकीची हसता-हसता पुरेवाट झाली. छकुलीला मराठी का आवडू लागली याचे कारण कळले. आता छकुली आई सोबत सिक्रेट गोष्टींसाठी आणि स्वतः च्याच फायद्यासाठी मराठी भाषेचा उपयोग करणार.
शेवटी छोटे बच्चे असो की राजनेता, स्वत:चा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी भाषाई अस्मिता जागृत होते, हेच सत्य. बाकी कारण काही ही असो पुढच्या पिढीत मराठी जिवंत राहणार, याचा आनंद ही झाला.