Monday, October 2, 2023

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

 (काल्पनिक कथा)

वंचित समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सरकारी नौकरीत आरक्षण दिले गेले. आरक्षित वर्गाला पात्रता मार्क्स कमी असेल तरी सरकारी नौकरी मिळू शकते. वय मर्यादा ही वाढवून दिली आहे. पण या विशेष सुविधांचा विपरीत परिणाम ही होतो. अशाच एका तरुणाची कथा...

आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी  कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो. काही म्हंटले की अंगावर येतो. मी कारण विचारले.  त्याने पूर्ण कथा सांगितली

सुनीलचे वडील सरकारी नौकरीत होते. साहजिकच होते मुलांना सरकारी नौकरी मिळावी अशी त्यांची ईच्छा होती. सुनील कसा बसा बीए पास झाला. त्याने स्टनोग्राफी शिकली. त्याला सरकारी नौकरी मिळाली. त्याचा लहान भाऊ हुशार होता, तो प्रथम श्रेणीत तो एम.ए. झाला. त्याच वेळी त्याचे वडील ही हार्ट अटॅक ने गेले. आईला सरकारी पेन्शन मिळू लागली. त्याने ही सुनील सारखे सरकारी नौकरीसाठी परीक्षा देणे सुरू केले. आता सरकारी परीक्षा कोणत्याही पदासाठी असली प्राथमिक परीक्षेत अंग्रेजी सोबत गणित, सामान्य ज्ञान आणि रिजनींगचे पेपरस् असतात. अर्ध्या तासात ५० प्रश्न सोडविणे आर्ट्सचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी जरा जडच. या शिवाय आरक्षण असेल तरी एका पोस्ट साठी 25 ते 100 तरुण परीक्षा देणारे असतात. असेच चार पाच वर्ष निघून गेले घरात खटके उडू लागले. तुझे वय वाढत चालले आहे, आधी नौकरी शोध आणि नौकरी करता करता परीक्षा दे. जास्त वय झाल्यावर नौकरी मिळणे कठीण होईल. अनेकांना वयाच्या तिशी पर्यंत सरकारी नौकरी मिळाल्याची अनेक उदाहरणे त्याच्या बिरादरीत होती. शिवाय आईची शह ही त्याला होती. खरे म्हणाल तर एक दोन परीक्षा दिल्यानंतर आपली पात्रता आपल्याला कळून चुकते.  तरीही फक्त आशेच्या जोरावर तरुण मुले परीक्षा देत राहतात. किंवा घरच्यांना मूर्ख बनवित राहतात (हे सर्वांनाच लागू). पण सतत अपशायामुळे मानसिक तणाव वाढू लागतो. अखेर एकदाची त्याची तिशी ही उलटली. आता सरकारी नौकरीचा मार्ग खुंटला. 

आर्ट्स विषय घेऊन एम.ए. करणाऱ्याला चांगल्या पगाराची निजी क्षेत्रात नौकरी मिळणे कठीण आणि त्यातच तिशी उलटलेल्या माणसाला कोण नौकरी देणार. नौकरीच्या शोधात एक वर्ष निघून गेले. आता आईही टोमणे मारू लागली. एक दिवस त्याने त्याच्या घरा जवळच जनकपुरीत नवीन उघडलेल्या शोरूमच्या बाहेर  सेल्समनच्या नौकरीचे विज्ञापन बघितले. त्या दिवशी इंटरव्यू साठी दोनच उमेदवार आले होते. त्यातला एक बारावी पास 20 वर्षाचा तरुण मुलगा होता. मालकाने दोघांचा एकत्रच इंटरव्ह्यू घेतला. त्या मुलाला साधी अंग्रेजी ही येत नव्हती. सुनीलच्या भावाला वाटले किमान इथे तरी त्याला नौकरी मिळेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी शोरुम मध्ये गेला तर पाहतो काय तिथे तो 20 वर्षाचा तरुण काम करत होता. त्याला राग आला, त्याने मालकाला जाब विचारला.  मालकाने त्याला उत्तर दिले, या मुलाला आम्ही सर्व कामे सांगू शकतो. पण तू जास्त शिक्षित असल्यामुळे तुला सांगता येणार नाही. बाकी अंग्रेजी भाषेचे विशेष काय, कामचलाऊ अंग्रेजी तो काही दिवसांत शिकून जाईल. सुनीलच्या भावाला वाटले असावे बहुतेक त्याला कधीच नौकरी मिळणार नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याच दिवसापासून त्याने बोलणे सोडले. घरात शून्यात पहात बसून राहू लागला. 

ग्रुप सी आणि डी सरकारी नौकरीसाठी जिथे जास्तीसजास्त शैक्षणिक पात्रता स्नातक असते. तिथे वय मर्यादा २५-२६ पेक्षा जास्त नसली पाहिजे. कारण निजी क्षेत्रात अश्या पदांसाठी मोठ्या वयाच्या तरुणांना नौकरी मिळण्याची संभावना फारच कमी असते. परिणामाचा विचार न करता व्होट बँक राजनीती साठी सरकार नौकरीची वय मर्यादा सतत वाढवत जात आहे. परीक्षा देणाऱ्यांपैकी  फक्त एक -दोन टक्यांना सरकारी नौकरी मिळणार आणि बाकीचे वय परिक्षा देण्यातच निघून जाणार. त्यांचे काय होणार हा विचार कुणीच करत नाही. वय जास्ती झाल्याने शारीरिक त्यांच्यात मेहनतीचं काम करून धनार्जन करण्याची क्षमता ही राहत नाही. इतर कौशल्य  शिकणे ही तिशी नंतर अवघड जाते.

सुनीलचा भाऊ मानसिक उपचारानंतर ठीक झाला. मोठ्या भावाच्या प्रयत्नाने त्याला नौकरी ही मिळाली आणि नौकरी करणारी छोकरी ही. आज त्या दोघांना मिळून ३०-३५ हजार मिळतात. पाठीमागे खंबीर मोठा भाऊ असल्यामुळे साठा उत्तराची कहाणी सफल झाली. पण सर्वांचे असे नशीब नसते. अधिकांश तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. 

या विषयावर सहकर्मीं सोबत अनेकदा चर्चा केली असेल. सरकारी नोकरीत बिगर तकनीकी ग्रुप डी, सी आणि बी पदांसाठी वय मर्यादा २५ च्या वर नको या बाबतीत सर्वच एकमत होते. आयएएस, राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी ही, तकनीकी पद, सोडून वय मर्यादा ३० पेक्षा कमी पाहिजे. याशिवाय २५ नंतर पार्ट टाईम का असेना, रोजगार सुरू केला पाहिजे.  



No comments:

Post a Comment