Friday, February 14, 2020

महाराष्ट्र समाज जुनी दिल्ली: दिल्लीत खेळांच्या क्षेत्रात योगदान.

(महारष्ट्र समाज जुनी दिल्ली गेल्या जानेवारीत १०० वर्ष पूर्ण झाले) 
 
जुन्या दिल्लीत तसे २५ ते ३० मराठी परिवार राहत असले तरी त्यांच्यात घट्ट असे नाते होते. समाज म्हणजे त्यांचा जीव. समाजात बाहेरून येणारऱ्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था होती. पण समाजात कॅरम, टेबल टेनिस इत्यादी खेळांची सुविधाहि होती. रोज संध्याकाळी खेळणाऱ्यांची मैफिल समाजात रंगत होती. समाजात चांगले ग्रंथालयहि होते. दोन ते तीन हजार पुस्तके व १०० च्या जवळ दिवाळी अंक यायचे. रविवारी ग्रंथालयहि उघडायचे.

रविवारचा दिवस म्हणजे शाळेची सुट्टी. नाश्ता-पाणी  करून  सकाळी ९ वाजता,१० वर्षापासून ते ५० वर्षापर्यंतचे तरुण समाजात हजेरी लावायचे. एका खोलीत दोन कॅरम बोर्ड तर नेहमीच रेडी राहायचे. समाजातील सर्व  कॅरम बोर्ड चांगल्या दर्जाचे होते या शिवाय हस्ती दंताचे स्ट्राईकरहि. इथे टाईमपास नव्हे तर खेळाडू खेळाची प्रेक्टीस करायचे. महादाणी (P&T), येन्नुरकर (दिल्ली) सारखे धुरंधर खेळाडू तर होतेच. या शिवाय मला आठवते मन्या आप्टे व दुरून जनकपुरी व दिल्लीच्या इतर भागातून येणारे पेंढारकर, वेंगुर्लेकर ब्रदरस्, वाघमारे इत्यादी अनेक न  आठवणारी नावे, सर्वच एकापेक्षा एक होते.  कॅरम मध्ये पांढरी व काळी सेन्चुरी (एकाच वेळी सर्व गोट्या) नेहमीच बघायाला मिळायची. दिल्लीत होणाऱ्या कॅरम प्रतीयोगीतांमध्ये मराठी नावे नेहमीच दिसायची. असो. 

दुसर्या माल्यावर टेबल टेनिसचा टेबल होता. तोहि उत्तम दर्जेचा. महादाणी आणि विलास कानतुटे चांगले खेळाडू होतेच. पण आमच्या सारख्या मुलांना प्रोत्साहित करण्यात ते नेहमीच पुढे राहायचे. तुम्ही १० वर्षाचे असाल कि ५० वर्षाचे, सर्वांशी एक सारखा व्यवहार. रविवारी तर आमचा पूर्ण दिवस समाजातच जायचा. या शिवाय बुद्धिबळ खेळण्याची सुविधाही होती. बुद्धी कमी असल्यामुळे मी काही त्या वाटेला जात नव्हतो. तरीही काही धुरंधर खेळाडू होते. आप्टे नावाचा एक मुलगा दिल्लीकडून खेळल्याचे आठवते.

साहजिकच होते खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी समाजात कॅरम, टेबल टेनिस व बुद्धिबळाच्या प्रतियोगिता व्हायच्या. दिल्लीतल्या सर्व भागातून आलेले मराठी खेळाडू यात भाग घ्यायचे. करोल बाग, जनकपुरी व समाजाच्या टीम्समध्ये प्रतियोगिता व्हायच्या. मला आठवते बहुतेक १९७५ साली समाजात झालेल्या खेळांचे पुरस्कार देण्यासाठी  टेबल टेनिस स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे श्री सुधीर फडके आले होते. त्यावेळी ते म्हणाले कुणाला टेबल टेनिस मध्ये नाव कमवायचे असेल तर त्याला नेशनल स्टेडियम मध्ये प्रवेश देण्यास ते मदत करतील. माझा लहान भाऊ नरेंद्रला जो त्यावेळी १२ वर्षाचा होता त्याला सुधीर फडकेंनी नेशनल स्टेडियम प्रवेश मिळवून दिला. नेशनल स्टेडियम घरापासून दूर होते. टेबल टेनिस म्हंटले कि बॅट, रबर (त्या वेळी हि एका बाजूच्या रबराची किमत ३०० ते ४००रु  होती) व दररोज दोन ते तीन तास प्रक्टिससाठी जागेची गरजहि. अश्यावेळी समाज मदतीसाठी धाऊन आला. वेळोवेळी टेबल टेनिसचे चेंडू, रबर इत्यादी घेण्यासाठी समाजानी अर्थ सहाय्यहि केले. माझा भाऊ नरेंद्र व जुन्या दिल्लीत राहणारे गुरदीप सिंह आणि अरोरा रोज रात्री उशिरा पर्यंत समाजात प्रेक्टीस करायचे. जिथे महादाणी आणि विलास कानतुटे सारखे प्रत्साहित करणारे होते तर काही विघ्नसंतोषीहि होतेच. गैर मराठी मुले इथे का खेळतात? वीज, चेंडू इत्यादीचा खर्चहि. अनेक प्रश्न.  पण अश्या वेळी विशेषकर विलासनी सर्वांना स्पष्ट केले हा समाज मराठी माणसांसाठी असला तरी समाजाचे दरवाजे  इथल्या सर्व खेळाडूंसाठी खुले आहेत. याचाच परिणाम नरेंद्र आणि गुरदीप दोघांना दिल्ली विश्वविद्यालय आणि दिल्लीच्या टीम मध्ये खेळण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.  नरेंद्राला स्पोर्टस कोट्यात MTNL मध्ये नौकरीहि मिळाली. पुढे वयाच्या ५० पन्नासीपर्यंत MTNL तर्फे खेळत राहिला. असो. समाजाच्या अमृत  महोत्सवच्या ( ७५ वर्ष) वेळी बुद्धिबळ, टेबल टेनिस व कॅरम मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेतल्या होत्या. १००च्यावर दिल्लीकर मराठी खेळाडूंनी त्यात भाग घेतला होता. पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीचे मुख्यमंत्री स्वर्गीय मदनलाल खुराना हस्ते झाला होता.

इथे सांगावयाचे वाटते, महादाणी साहेबांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली. ते नेहमी म्हणायचे चांगले खेळणे वेगळे आणि जिंकणे वेगळे. जिंकायचे असेल तर प्रतिस्पर्धीला त्याचा खेळ खेळू देऊ नका.  यावरून टेबल टेनिसची एक आठवण ताजी झाली. बहुतेक १९८१ किंवा १९८२ साली  समाजाच्या टीमने दिल्ली टेबल टेनिस लीग मध्ये भाग घेतला. नरेंद्र व गुरदीप हे चांगले खेळाडू होतेच. या शिवाय  हेमंत रेवणकर आणि स्वर्गीय विकास महाजन व माझ्या सारखे अर्धवट खेळाडूहि. प्रत्येक मॅच मध्ये किमान तीन खेळाडू खेळणे गरजेचे होते. अर्थात आमच्या तिघांपैकी एकाला खेळणे गरजेचे. तरीही लीग मध्ये फक्त एका टीम कडून समाजाची टीम पराजित झाली. प्री क्वार्टर, क्वार्टर जिंकत सेमी फाईनल पर्यंत पोहचली होती. एका लीग मेच मध्ये मला जिंकणे गरजेचे होते. आपल्यापेक्षा कितीतरी पट चांगल्या खेळाडूला मी पराजित केले. त्यावेळी मला चांगले आठवते, एक वयस्क खेळाडू बहुतेक P&Tचा असावा म्हणाला, समाज की टीम का खेल देख कर लगता है सबने  महादाणीजी से "खेल कि कमीनेपन्ती अच्छी तरह सीखी है. असो.

काळचक्र कधीच स्थिर राहत नाही. जुन्या दिल्लीत भाड्यावर राहणाऱ्या मराठी लोकांनी पै-पै जमा करून दिल्लीत राहण्यासाठी घरे बांधली.  जुनी दिल्ली मराठी माणसाने सोडली. समाज हि पहाडगंज येथे ब्रहन् महाराष्ट्र भवनात शिफ्ट झाला.  एक पर्व संपले तरीही जुन्या समाजाने दिल्लीतील खेळांच्या क्षेत्रात हि आपले अमिट योगदान दिले होते.

(हा लेख मला आज जे काही आठवते आहे त्यावर आधारित आहे. यात काही चुका झाल्या असतील किंवा कुणाचा उल्लेख झाला नसेल तर त्या बाबत माफी असावी).

No comments:

Post a Comment