आज सकाळी दिल्लीत भयंकर धुक पसरलेले होते. कार्यालयात जाण्यासाठी उत्तम नगर मेट्रो स्टेशन वर पोहचलो. मेट्रो प्लेटफॉर्म वरून चौफेर नजर फिरवली काहीच दिसत नव्हते. सर्वत्र गडद राखाडी रंगाचे धुके पसरलेले होते. रस्त्यावर वाहनांच्या लाईट शिवाय काहीच दिसत नव्हते. आजच्या भाषेत म्हणाल तर सर्वत्र स्माग पसरलेला होता. मेट्रो आली. बसायला जागाहि मिळाली. सीपी पर्यंतचा अर्ध्या तासाचा प्रवास. जागेवर बसतातच डोळे बंद केले.
शाळेतील दिवस आठवले. सकाळी साडे सहा वाजता नया बाजारहून आमचा सात-आठ मराठी पोरांचा ग्रुप पायी-पायी चालत तीन किलोमीटर दूर पहाडगंज येथे असलेल्या नूतन मराठी शाळेपर्यंत जायचा. हिवाळ्यात पसरलेल्या पांढर्या शुभ्र धुक्यात सोमोरचे काही दिसायचे नाही. पण तोंडाने धूर सोडत पायी चालण्यातहि मजा यायची. प्रार्थनेच्या वेळी, सूर्यनारायण धुक्याचा परदा सारत सोनेरी रंगांची उधळण करत प्रगट व्हायचे. असे वाटायचे जणू सम्पूर्ण सृष्टी सोनेरी नदीत स्नान करत आहे. थोड्या वेळात सोनेरी धुक सोनेरी उजेडात विरून जायचे. आजहि हे स्वर्गीय दृश्य आपल्या डोळ्यांत साठवून ठेवले आहे. काळ बदलला. सोनेरी धुक कुठेतरी हरवून गेले. आता उरले आहे फक्त काळेकुट्ट स्माग.