Friday, April 3, 2015

कथा जीनच्या पेंटची



पुष्कळ दिवसांपासून लेक आणि चिरंजीव दोन्ही मागे लागले होते. बाबा आजकाल तुम्ही वयापेक्षा जास्त म्हातारे दिसू लागला आहात. गेल्यावर्षी झालेल्या बायपास सर्जरी नंतर, आपण म्हातारे दिसू लागले आहोत, ही जाणीव मला ही होऊ लागली होती.  चिरंजीवांचे म्हणणे होते, बाबा   येत्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही जीनची पेंट आणि टी-शर्ट घाला. जीनच्या  पेंटमध्ये तुम्ही जवान दिसाल. तीन एप्रिल माझा वाढदिवस, वयाचे ५४ वर्ष पूर्ण होतील.

मुलांचा आग्रह पूर्ण करण्याचा निश्चय केला. खरं म्हणाल तर माझ्या मनात ही कैक वर्षांपासून  जीनची पेंट घालायची इच्छा  होतीच. पूर्वी मी जीनची पेंट घालीत असे पण गेल्या १६-१७ वर्षांपासून जीनची पेंट घातली नव्हती.  आजकाल बाजारात कमरेपेक्षा पुष्कळ खाली बांधणारी जीनची पेंट मिळते. ती आपल्याला शोभणार नाही. पेंट शिवून घेण्याचा निश्चय केला. सीपीत मोहनसिंग पेलेस जीनच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे, तिथले शिंपी २ तासात जीनची पेंट शिवून देतात.  तसे ही मी दिल्लीत असून ही गेल्या १५-१६ वर्षांत सीपीचा सेन्ट्रल पार्क  पहिला नव्हता. 

काल दुपारी १ वाजता उत्तम नगरहून मेट्रो घेतली, बसायला जागा मिळाली. सीट वर बसून डोळेबंद केले. काळातमागे गेलो. स्टेनो म्हणून सरकारी नौकरीवर रुजू झालो होतो. त्या वेळी अभिताभ स्टाईल रस्त्यावर झाडू लावणारी बेलबाट्म, जीनची पेंट, टी-शर्ट चा क्रेज होता. मला तो दिवस चांगलाच आठवतो, अभिताभ सारखे कानापर्यंत वाढलेले केस, टी-शर्ट आणि जीनची पेंट, या अवतारात आमची स्वारीने त्या वरिष्ठ आईएएस अधिकार्याच्या केबिनमध्ये प्रवेश केला. अधिकाऱ्या समोर उभा राहिलो. (अधिकार्याने आदेश दिल्या शिवाय समोरच्या खुर्ची वर बसायचे नसते, ही सरकारी परंपरा आहे).  त्याने सिगारेट पेटवली आणि झुरके घेत माझ्या कडे निरखून बघू लागला.  समोरचा अधिकारी आपल्याकडे निरखून पाहत आहे, हे लक्ष्यात येताच माझी तर ‘सिट्टी पिट्टी गुम’ झाली. अखेर त्याने माझे नाव विचारले. पुन्हा दोन मिनिटे शांत राहून, त्याने आदेश दिला, मिस्टर पटाईत, कधी आरश्यात स्वत:कड़े बघितले आहे का? हे कार्यालय आहे, माहित आहे का? आता आपले काय होणार या भीतीने मी घाबरलो, घामाघूम झालो. तो पुढे म्हणाला, असे करा, उद्या तुम्ही सुट्टी करा, सकाळी उठून न्हाव्या कड़े जा आणि बच्चन स्टाईल केस भादरून घ्या.  सरकारी कर्मचार्याला शोभेल असे कपडे घालून कार्यालयात येत जा. पैशे नसेल तर मी देतो. (तात्पर्य: पटाईत, तुम्ही एक नम्बरी लोफर दिसत आहत, जरा सभ्य माणसा सारखे दिसा, कार्यालयात सभ्य माणसासारखे कपडे घालोन या, कुठला ही बहाणा चालणार नाही). अजून नौकरीत परमानेंट व्हायची होती, त्या मुळे  अधिकार्याचा आदेश पाळन्या व्यतिरिक्त दूसरा मार्ग नव्हता.  दुखी मनाने आपल्या प्रिय केसांना तिलांजली दिली. टी-शर्ट, जीनच्या जागी, फार्मल पेंट शर्ट घालून कार्यालयात जाऊ लागलो. तरी ही इतर वेळी जीनची पेंट घालायचो.

१९९७मध्ये रायसीना हिल वर स्थित महत्वपूर्ण कार्यालयात बदली झाली. पहिल्याच दिवशी, डोज मिळाला, या कार्यालयात काम करायला मिळणे म्हणजे सौभाग्य.  इथे सभ्यमाणसासारखे बोलावे आणि वागावे लागते. त्या साठी सभ्य दिसणे ही आवश्यक आहे. अर्थातच जीनची पेंट, टी शर्ट वैगरे  इत्यादी घालणे म्हणजे असभ्य आणि लोफर माणसाचे लक्षण. संस्कृती रक्षकांच्या प्रमाणे बुजुर्ग सरकारी अधिकारी ही मागासलेल्या विचारांचे असतात, हेच खर. (क्षणिका - संस्कृति रक्षक, पेंट जीनची व कटू सत्य).

गेल्या वर्षी सरकार बदलली. शिवाय अधिकांश बुजुर्ग कर्मचार्यांपैकी काहींचे प्रमोशन झाले, काही निवृत्त झाले.  कार्यालयात अनुभवाच्या जागी तरुणांना प्राथमिकता दिली जात आहे.  नवीन रुजू झालेल्या २५-३०च्या या तरुणांपैकी अधिकांश टी-शर्ट आणि जीनची पेंट घालणारे. त्या बरोबर नवीन विचार ही आले. अजून तरी कुणाला ही वस्त्रांवरून ताकीद दिली गेली नाही आहे.  अर्थातच काळ बदलतो आहे.

मेट्रो सीपीला पोहचली, त्याच बरोबर विचारांचे शृंखला ही तुटली. सरळ मोहनसिंग पेलेस वर पोहोचलो. पूर्वी सारखीच तिथे जीनची भरपूर  दुकाने होती. दुपारी २ वाजता पेंट शिवायला टाकली. पेंट ४ वाजता शिवून मिळणार होती. आता दोन तास काय करायचे हा प्रश्न होता. सेन्ट्रल पार्क मध्ये जाऊन एखाद्या झुडुपाच्या सावली थोडे पडावे, असा विचार केला.  पूर्वी ही सेन्ट्रल पार्क तरुण- तरुणीचे भेटण्याची जागा होती. आज ही आहे. फरक एवढाच पूर्वी काही तरुण  जोडे दिसायचे, तेही सायंकाळच्या वेळी.  जास्तीसजास्त एका दुसर्यांचे हातात हात घेऊन बसलेले. पण काळ किती बदलला याची जाणीव झाली,  भर दुपारी एप्रिल महिन्याच्या उन्हात, जिथे थोडी सावली होती, केवळ तरुण-तरुणी मोठ्या संख्येने  दो बदन एक जान सारखे बसलेले होते.  लोकलाज मर्यादा विसरून आकंठ प्रेम लीलेत मग्न होते.  लोक आपल्याकडे बघत आहे , फोटो काढत आहेत. कसलीच चिंता त्यांना नव्हती. माझ्या सारखे कित्येक बघे, त्यांना पाहून डोळे तृप्त करत होते. मनात विचार आला, आजची युवा पिढी फाs रच पुढे गेली आहे, सेन्सर बोर्डची गरज आहे का? एप्रिल महिन्याच्या भर दुपारच्या उन्हात, जवळपास अर्धा तास पार्क मध्ये भटकलो, कुठेही बसायला जागा सापडली नाही,   शेवटी कंटाळून ‘मऱ्हाटी’च्या (महाराष्ट्र हस्तकला दालन) समोर असलेल्या काफी हाउस मध्ये जाऊन बसलो. १ कप काफी (२५ रुपये) वर अर्धा-पाउण तास घालविला. एक मनात विचार आला, आपण स्वत: साठी जीनची पेंट घेतो आहे, सौ. साठी काही घेतले पाहिजे.  आज पर्यंत मी कधी एकट्याने सौ. साठी  साडी विकत घेतली नव्हती. आपण घेतलेली साडी सौला पसंद पडेल कि नाही हा ही विचार मनात आला. घड्याळात बघितले साडे तीन वाजले होते, अजून अर्धा तास होता.  वेळ घालवायला ‘मऱ्हाटी’ गेलो. (मराठी स्वाभिमान जागृत झाला, म्हणावे लागेल) अर्धा तास साड्या बघण्याचे नाटक केले, शेवटी एक हिरव्या रंगाची साडी विकत घेतली.  (अर्थातच साडी थोडी महाग वाटली).  ४ वाजता शिंप्याच्या दुकानात गेलो. तिथे पेंट तैयार होती.

आज लेक-जावई आणि चिरंजीवाने मिळून वाढदिवसा निमित्त दुपारचा लंच जनकपुरीतल्या  एका हॉटेल मध्ये दिला. आयष्यात प्रथमच वाढदिवसाचा दिवशी हॉटेल मध्ये गेलो असेल. या पूर्वी घरीच वाढदिवस साजरा करत असे, ते ही कार्यालयाला सुट्टी असेल तर. आपल्या पिताश्रीना टी-शर्ट आणि जीनच्या पेंटमध्ये पाहून मुलांना झालेला आनंद मला त्यांच्या डोळ्यांत दिसत होता.  सौ. ही खूष होती,मी घेतलेली साडी तिला आवडली होती.  या घटकेला, मी ही  स्वत:ला थोड तरुण समजू लागलो आहे. येत्या सोमवारी कार्यालयात ही जीनची पेंट घालून जायचा विचार करतो आहे, बघू.

 

1 comment:

  1. kaka mastch jamalay..... mi kahi lekh vachale , mala ha sarvat jast avadala

    ReplyDelete