Sunday, January 25, 2015

कबूतर जा जा जा

गेल्या शनिवारी दिल्ली पब्लिक लायब्ररीत गेलो होतो. सहज म्हणून ऋग्वेदाचा एक खंड उचलला, काही पानें चाळली.  एका सुक्तावर वर नजर पडली:
वा:  कपोत  इषितो  यदिच्छन् दूतो  निऋर्त्या    इदमाजगाम I
तस्मा अर्चाम कृणवाम निष्कृतिं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे II

शिव: कपोत इषितो नो अस्त्व नागा देवा: शकुनो गृहेषु I
अग्निर्हि विप्रो जुषतां हविर्न: परि हेति: पक्षिणी नो वृणक्तु II
(ऋ. १०/१६५/१-2)

ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे.  या ऋचांचा  साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात)  कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे. 

या वरून काही  गोष्टी निश्चित कळतात, वैदिक युगात ही कबुतरांचा उपयोग संदेश देण्यासाठी होत होता. कबुतर बोलून संदेश देऊ शकत नाही. सांकेतिक रुपात का होईना, लिखित भाषेचा जन्म ही त्या काळी झाला असेलच.   शिवाय दूत हा अवघ्य असतो. 
 
मुगल काळात संदेशवाहक म्हणून हजारोंच्या संख्येने कबूतर बादशाह पाळायचे. गेल्या दोन्ही महायुद्धात कबुतरांचा उपयोग सैन्य संदेश देण्यासाठी युद्धरत देशानीं केला होता. आज ही जासूसी साठी कबुतरांचा उपयोग होतोच, विशेषकर सीमा प्रांतात. जुन्या दिल्लीत आज ही लोक कबुतरे पाळतात. कबूतरबाजीच्या प्रतियोगिता ही होतात.  या खेळात जो कबूतर जास्त वेळ आकाशात राहतो, तो विजेता ठरतो.

जुन्या हिंदी सिनेमांमध्ये प्रेयसी आपल्या प्रियकराला सन्देश पाठविण्यासाठी कबुतरांचा उपयोग करायची.  त्यांचा मीलनात कबुतरांचा मोठा वाटा असे. लग्नानंतर सौ. सोबत  मैने प्यार किया" हा सिनेमा बघितला होता.(प्रेम विवाह नसूनही). कबूतर जा जा जा, हे  त्या सिनेमातले अत्यंत लोकप्रिय गाणे.    त्या वेळी गाण्याचा खरा?  अर्थ समजला नाही. 

आज दिल्लीत कबुतरांची  संख्या भयंकर रीतीने वाढते आहे.  मांजर, कुत्रे, माकडां पासून सुरक्षित असे  २०-२० फूट उंच मेट्रोचे  पिलर  हे कबुतरांच्या राहण्यासाठी  सुरक्षित स्थान झाले आहे. या शिवाय टोलेगंज सरकारी इमारती ही दिल्लीत भरपूर आहेत. लोकांनी पक्ष्यांसाठी टाकलेला सर्व दाणा-पाणी कबुतरेच चट करून जातात.  त्या मुळे मैना (साळुंकी), चिमणी इत्यादी  लहान पक्ष्यांचे जिणे दूभर झाले आहे. त्यांची संख्या कमी होत चालली आहे. दिल्लीत जिथे पहा तिथे  केवळ कबुतरे आणि कावळेच  दिसतात.

प्रथमदर्शनी कबुतर अत्यंत निरुपद्रवी पक्षी वाटतो. पण खंर म्हणाल तर, कबुतरांच्या विष्ठे आणि पिसांमुळे अलर्जी, निमोनिया इत्यादी अनेक रोग पसरतात.  रोगराई व घाण पसरविणारी  कबुतरांना आता शहरातील लोक कंटाळली आहे. आज दिल्ली, मुंबईतल्या लोकांना खरोखरंच  अमंगलकारी कबुतरे शहरातून दूर निघून गेली पाहिजे असे वाटते.  लोक  ही कबुतरांच्या विरुद्ध आवाज  उठवू लागले आहेत. पण सध्यातरी कुठल्या ही  सरकारी यंत्रणेने  या बाबत दखल घेत नाही आहे.  जर कबुतरांना हाकलणे शक्य नसेल तर किमान सरकारी यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर कबुतरांना राहण्यायोग्य झाडे इत्यादी लावली पाहिजे. त्याना दाणा-पाणी घालण्यावर ही काही निर्बंध लावली पाहिजे. एवढे केलेतरी काही प्रमाणावर कबुतरांचा त्रास कमी होईल.



1 comment:

  1. Nice Blog...
    submit this blog in our blog directory for more visitors..
    www.blogdhamal.com

    ReplyDelete