Sunday, January 25, 2015

कबूतर जा जा जा

गेल्या शनिवारी दिल्ली पब्लिक लायब्ररीत गेलो होतो. सहज म्हणून ऋग्वेदाचा एक खंड उचलला, काही पानें चाळली.  एका सुक्तावर वर नजर पडली:
वा:  कपोत  इषितो  यदिच्छन् दूतो  निऋर्त्या    इदमाजगाम I
तस्मा अर्चाम कृणवाम निष्कृतिं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे II

शिव: कपोत इषितो नो अस्त्व नागा देवा: शकुनो गृहेषु I
अग्निर्हि विप्रो जुषतां हविर्न: परि हेति: पक्षिणी नो वृणक्तु II
(ऋ. १०/१६५/१-2)

ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे.  या ऋचांचा  साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात)  कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे. 

या वरून काही  गोष्टी निश्चित कळतात, वैदिक युगात ही कबुतरांचा उपयोग संदेश देण्यासाठी होत होता. कबुतर बोलून संदेश देऊ शकत नाही. सांकेतिक रुपात का होईना, लिखित भाषेचा जन्म ही त्या काळी झाला असेलच.   शिवाय दूत हा अवघ्य असतो. 
 
मुगल काळात संदेशवाहक म्हणून हजारोंच्या संख्येने कबूतर बादशाह पाळायचे. गेल्या दोन्ही महायुद्धात कबुतरांचा उपयोग सैन्य संदेश देण्यासाठी युद्धरत देशानीं केला होता. आज ही जासूसी साठी कबुतरांचा उपयोग होतोच, विशेषकर सीमा प्रांतात. जुन्या दिल्लीत आज ही लोक कबुतरे पाळतात. कबूतरबाजीच्या प्रतियोगिता ही होतात.  या खेळात जो कबूतर जास्त वेळ आकाशात राहतो, तो विजेता ठरतो.

जुन्या हिंदी सिनेमांमध्ये प्रेयसी आपल्या प्रियकराला सन्देश पाठविण्यासाठी कबुतरांचा उपयोग करायची.  त्यांचा मीलनात कबुतरांचा मोठा वाटा असे. लग्नानंतर सौ. सोबत  मैने प्यार किया" हा सिनेमा बघितला होता.(प्रेम विवाह नसूनही). कबूतर जा जा जा, हे  त्या सिनेमातले अत्यंत लोकप्रिय गाणे.    त्या वेळी गाण्याचा खरा?  अर्थ समजला नाही. 

आज दिल्लीत कबुतरांची  संख्या भयंकर रीतीने वाढते आहे.  मांजर, कुत्रे, माकडां पासून सुरक्षित असे  २०-२० फूट उंच मेट्रोचे  पिलर  हे कबुतरांच्या राहण्यासाठी  सुरक्षित स्थान झाले आहे. या शिवाय टोलेगंज सरकारी इमारती ही दिल्लीत भरपूर आहेत. लोकांनी पक्ष्यांसाठी टाकलेला सर्व दाणा-पाणी कबुतरेच चट करून जातात.  त्या मुळे मैना (साळुंकी), चिमणी इत्यादी  लहान पक्ष्यांचे जिणे दूभर झाले आहे. त्यांची संख्या कमी होत चालली आहे. दिल्लीत जिथे पहा तिथे  केवळ कबुतरे आणि कावळेच  दिसतात.

प्रथमदर्शनी कबुतर अत्यंत निरुपद्रवी पक्षी वाटतो. पण खंर म्हणाल तर, कबुतरांच्या विष्ठे आणि पिसांमुळे अलर्जी, निमोनिया इत्यादी अनेक रोग पसरतात.  रोगराई व घाण पसरविणारी  कबुतरांना आता शहरातील लोक कंटाळली आहे. आज दिल्ली, मुंबईतल्या लोकांना खरोखरंच  अमंगलकारी कबुतरे शहरातून दूर निघून गेली पाहिजे असे वाटते.  लोक  ही कबुतरांच्या विरुद्ध आवाज  उठवू लागले आहेत. पण सध्यातरी कुठल्या ही  सरकारी यंत्रणेने  या बाबत दखल घेत नाही आहे.  जर कबुतरांना हाकलणे शक्य नसेल तर किमान सरकारी यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर कबुतरांना राहण्यायोग्य झाडे इत्यादी लावली पाहिजे. त्याना दाणा-पाणी घालण्यावर ही काही निर्बंध लावली पाहिजे. एवढे केलेतरी काही प्रमाणावर कबुतरांचा त्रास कमी होईल.



वसंत पंचमी - एक आनंदोत्सव


काल वसंत पंचमी होती, सकाळी  गल्लीत एके ठिकाणी सरस्वती पूजा होत होती. बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली, गाडीतून दिल्लीला परतत होतो. सकाळची वेळ होती. खिडकीतून बाहेर बघत होतो, सर्वत्र दूर दूर पर्यंत शेंतात पिवळ्या फुलांनी नटलेली  सरसों दिसत होती. अचानक धुक्याचा परदा चिरत सूर्य नारायणाने दर्शन दिले. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, धरती न्हाऊन निघाली. असे वाटले जणू धरतीमातेने सुर्वर्ण गालिचाच पांघरलेला आहे. ते अद्भुतरम्य, अस्मरणीय दृश्य पाहून रात्रभर  थंडीने कुडकुडनार्या प्रवासींचे चेहरे ही आनंदाने उजळून निघाले. एक प्रवासी बहुधा शेतकरी असावा, दृश्य पाहून म्हणाला, भाऊ, यालाच म्हणतात स्वर्ग, अशी जमीन कसायला मिळाली पाहिजे...घरी आल्यावर कळले, त्या दिवशी वसंत पंचमी होती. आज रविवार, बर्याच दिवसांनी  प्रात:स्मरणीय श्लोक गुणगुणला:
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती ।
करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥
  
श्वेत कमळावर विराजमान शुभ्रवेशधारी ज्ञान देवता, सरस्वतीची कृपा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी,शेतांत ही सोन पिकवितो, लक्ष्मी हातात येते. सरस्वतीच्या कृपेने माया-मोहाचे पाश तुटतात आणि ज्ञानाचा आनंद ही प्राप्त होतो. 

अशीच एक कथा आहे, १२व्या शतकांत दिल्लीत हजरत निजामुद्दीन औलीयांचे वास्तव्य होते. हजरत निजामुद्दीन औलिया यांचे त्यांच्या बहिणीच्या मुलावर अत्यंत स्नेह होता. पण युवावस्थेत पदार्पण करण्या आधीच त्या मुलाचे  निधन झाले. हजरत निजामुद्दीन यांना मुलाच्या  मृत्यचा अत्यंत आघात लागला. ते उदास राहू लागले, दिवसभर त्याचा मजारवर बसून राहायचे.  अमीर खुसरोला आपल्या गुरूची ही अवस्था पाहवेना.  एक दिवस सकाळी आपल्या मित्रांसोबत फिरायला जाता असताना त्यांना काही हिंदू पुरुष आणि स्त्रिया दिसल्या. सर्वांनी पीत वस्त्र आणि पिवळ्या रंगाच्या फुलांची आभूषणे धारण केली होती. नाचत गाजत वासंतिक गीत गात ते रस्त्यावरून जात होते. अमीर खुसरोने त्यांना या बाबत विचारले. त्यांनी सांगितले, आज वसंत पंचमी आहे, सरसोंची पिवळी फुले ज्ञानदेवता सरस्वतीच्या चरणी अर्पण करून तिला प्रसन्न करणार आहोत.  

खुसरोने ही विचार केला, त्यांचे गुरु उदास आहे, त्यांना ही प्रसन्न केले पहिजे. त्यांनी सरसोंची फुले आपल्या पगडीत लावली,  हिदू पुरुषांप्रमाणे पीत वस्त्र धारण केले, फुलांचा शृंगार केला. आपल्या काही सुफी मित्रांना आणि कव्वालाना सोबत घेतले, औलीयाला देण्या साठी, सरसो आणि टेसूच्या गुलदस्ता तैयार केला.  वासंतिक गीत गात, नाचत गाजत ते हजरत निजामुद्दीन औलिया समोर आले.  त्यांची विचित्र वेशभूषा आणि नाचगाणे पाहून औलीयाला हसू आले, त्यांची उदासी दूर झाली. आपले गुरु आनंदित झाले, हे पाहून देवीचे आभार मानण्यासाठी अमीर खुसरो यांनी आपल्या मित्रांसमवेत देवीच्या चरणी सरसोची फुले अर्पण केली.   त्या दिवसापासून निजामुद्दीन  औलीयाच्या दर्गाहावर  वसंत पंचमीचा उत्सव सुरु झाला.  आज ही  मुस्लीम   बांधव  पीतवस्त्र  धारण करून, नाचत गाजत  अमीर खुसरो  यांनी लिहलेली  वासंतिक गीत गात निजामुद्दीन  औलीयाच्या दरगाह वर जाऊन श्रद्धेने  पिवळी फुले त्यांच्या चरणी अर्पण करतात.  खरंच ज्ञानाच्या उजेडात मोह-पाश नष्ट होतात आणि  भक्ताला आनंदाची प्राप्ति होते.  

शेवटी आमिर ख़ुसरो यांचे एक वासन्तिक गीत:


सगन बिन फूल रही सरसों।
अम्बवा फूटे, टेसू फूले, कोयल बोले डार-डार,
और गोरी करत सिंगार,
मलनियाँ गेंदवा ले आईं कर सों,
सगन बिन फूल रही सरसों।

तरह तरह के फूल खिलाए,
ले गेंदवा हाथन में आए।
निजामुदीन के दरवज़्ज़े पर,
आवन कह गए आशिक रंग,
और बीत गए बरसों।
सगन बिन फूल रही सरसों।


Saturday, January 10, 2015

अभिव्यक्ती


आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे.नास्तिक चार्वकला सुद्धा ऋषी म्हणून संबोधित केले आहे. भांड, तमाशा इत्यादी लोकनाट्यात  देवी देवतांवर टिप्पण्या केल्याच जातात आणि लोक ही ते सहजतेने घेतात. कुणालाही वाईट वाटत नाही. संत कबीर सारख्यांनी तर निंदकाचे स्वागतच केले आहे. त्यांनी म्हंटले आहे, 
निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय।
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।।



हिंदू- मुसलमान दोन्ही धर्मांत पसरलेल्या अंधविश्वासांवर कबीर ने चौफेर हल्ला चढविला होता, काही उदाहरणे: 

पाहन पुजे तो हरि मिले, तो मैं पूजूँ पहाड़।
ताते या चाकी भली, पीस खाए संसार।।
कॉंकर पाथर जोरि कै, मस्जिद लई बनाय।
ता चढ़ मुल्‍ला बॉंग दे, बहिरा हुआ खुदाए।।

एवढे असूनही, त्या वेळी हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांच्या लोकांनी, कबीरला संत म्हणून स्वीकारले. आज तेवढी ही सहनशीलता आपल्यात नाही.  आज  दुष्ट प्रकृतीचे लोक स्वत:ला  'धर्मगुरू' म्हणवितात आहेजर सैतानांनी, धर्मगुरुंचे रूप धारण केले तर त्यांना आपल्या विरुद्ध कोणी काही म्हंटलेले कसे आवडेल. दुष्ट प्रकृतीच्या लोकांना   निंदा सहन होत नाही. त्यांच्या  विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला ते दाबण्याचा प्रयत्न करतात.  पण त्यांना कळले पाहिजे व्यक्तीची हत्या केल्याने त्याचे विचार नष्ट होत नाही.  प्रभू येशू क्रिस्त यांना सूळीवर चढविले. पण त्यांचे विचार नष्ट झाले नाही. अपितु ते जगभर पोहचले. धर्म जात आणि पंथ नावाच्या खाली आज अभिव्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न होतो, आपण त्याचा निषेध केला पाहिजे. काही  महिन्यांपूर्वी अभिव्यक्ती या विषय वर  कविता लिहिली होती. पुन्हा ती कविता,  थोडी बदलून


अभिव्यक्ती 
कानात बोलली
छाटून टाकली 
जीभ तिची.

अभिव्यक्ती 
शब्दात वाचली 
जाळून टाकली 
पुस्तके ती.

अभिव्यक्ती
रेषांत दिसली 
छाटून टाकले 
हात ते. 

नराधम राक्षसाना
वाटते सदा भीती 
सत्याची.
अभिव्यक्तीची