Sunday, May 22, 2011

विक्रमादित्य आणि न्याय देवता/ ऐकलेली कहाणी

आज आपल्या देशात भ्रष्टाचार माजलेला आहे. राज्यकर्ते पैश्यामागे धावताना दिसत आहे. प्रजेला न्याय मिळत नाही. त्या मुळे देशात अराजकता माजते आहे. प्रजा संभ्रमात आहे की कुणास वोट द्यावे, प्रत्येक झाडावर कावळाच बसलेला आहे. पण आजही न्यायपथावर चालणारे लोक आहेत. न्यायाचा बाजूनी लढनार्यास समर्थन देण ही काळाची गरज आहे. लहानपणी ऐकलेली विक्रमादित्याची कहाणी आठवली. आज आपल्याला विक्रमादित्या सारखा राजा पाहिजे. एके काळी विक्रमादित्य नावाचा राजा अवंती नगरीवर राज्य करीत होता.आपल्या न्यायसाठी तो तिन्ही लोकात प्रसिद्ध होता. एके दिवशी रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे वेश पालटून, राजा विक्रमादित्य आपल्या प्रजेचा हालचाल पाह्यला राजमहालातून बाहेर पडला. मध्यरात्रीच्या वेळी अवंती नगरीच्या वेशीवर त्याला तीन सुंदर स्त्रिया नगरी बाहेर जाताना दिसल्या. नगरी कडे पाहत त्या सारख्या रडत होत्या. विक्रमादियाला प्रश्न पडला - मध्यरात्रीची वेळ तीन सुंदर स्त्रिया नगराच्या वेशीवर अश्या का रडतात आहे? विक्रमाने त्या स्त्रियांना विचारले - बायानो तुम्ही कोण आहात? तुम्हाला भीती नाही वाटत का? अशा मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही कुठे निघाला आणि तुम्ही अश्या रडतात का? त्यातली एक स्त्री म्हणाली - विक्रमा- पुष्कळवर्षापर्यंत आम्ही या नगरीत निवास केला. पण नियतीच्या नियमांमुळे आम्हाला ही नगरी सोडावी लागते आहे. नगरी सोडताना होणार्या दु:खा मुळे आम्हाला रडू येत आहे. मी या नगरीची श्रीलक्ष्मी आहे, दुसरी विद्येची देवता आहे आणि तिसरी न्याय देवता आहे. विक्रमादित्याने विचारले - महाकाल साक्षी आहे मी प्रजेच्या भल्या शिवाय कधी दुसरा कुठलाही विचार चुकुनही केला नाही. माझ्या हातून असा काय गुन्हा घडला की तुम्ही  ही नगरी सोडून जात आहात. श्रीलक्ष्मी म्हणाली राजा- नियती पुढे आम्ही विवश आहोत. पण तू आम्हाला बाहेर जाताना बघितले आहे. तू विनंती केली तर आमच्या पैकी कुणी एक इथेच वास्तव्य करेल. अन्य दोन्ही नगरी सोडून जातील.

राजा विक्रमाने विचार केला. श्रीलक्ष्मी गेली तरी चालेल. गरिबीतही लोक आनंदाने राहतात. विद्या विना ही प्रजा जगू शकते. पण न्यायाविना राज्यात अराजकता माजेल. अवंती नगरी उद्वस्त होईल. राजा विनम्रतेने श्रीलक्ष्मीस म्हणाला - न्याय देवता नगरीत राहावी ही विनंती आहे. बाकी तुम्ही दोघी जाऊ शकतात. श्रीलक्ष्मी म्हणाली - राजा आम्ही तुझी परीक्षा घेत होतो. तू त्यात उतीर्ण झाला. ज्या राज्यात न्याय असेल तिथे लक्ष्मी आणि सरस्वतीला निवास हा करावाच लागतो. जो पर्यंत तू अवंतीचा राजा आहे आम्ही तिघीही या नगरीतच निवास करणार. तुझे कल्याण असो -असे म्हणत त्या तिघी अदृश्य झाल्या. राजा विक्रमादित्याचा न्यायपूर्ण शासनामुळे अवंतीनगरी त्या काळी तिन्ही लोकात प्रसिद्ध झाली.

Saturday, May 14, 2011

रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या.

सदोबा हा सामान्य माणूस, कधीही कुणाला त्रास न देणारा. रहस्य, रोमांच विरहित- एका रेषेत चालणारा, सरळ-साधे  आयुष्य. वडील गेल्यावर संसाराचा गाडा त्याचा खांद्यावर आला. वडिलांच्या मृत्यु प्रमाणपत्रासाठी सदोबाला पहिल्यांदा रिश्वतजुडी अर्पण करावी लागली. हळूहळू सदोबाला प्रत्येक कार्यासाठी रिश्वत ही द्यावीच लागले हे कळले. सदोबा कसलीही चिडचिड व कटकट न करता रिश्वत जुडी आनंदाने वाहायचे. सदोबांच प्रामाणिक मत होते- रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले.



सदोबाची  बायको प्रसूत झाली, प्रसूतिगृहातून रडण्याचा आवाज ऐकू आला. दाई बाहेर आली- आनंदाने घोषणा केली, साहेब मुलगा झाला आहे. सदोबानी शंभराची एक नोट तिच्या हातात ठेवली आणि मुलाला पाह्यला आत गेले. त्याच क्षणापासून पोरासाठी त्यांनी रिश्वत देवीची आराधना सुरु झाली. मुलाचे  जन्मप्रमाणपत्र असो किंवा राशन कार्ड मध्ये नावाची नोंदणी सदोबानी आनंदानी रिश्वतजुडी, रिश्वत देवीला अर्पण केली. डोनेशनरुपी रिश्वतजुडी अर्पणकरून मुलाला चांगल्या शाळेत आणि नंतर चांगल्या कालेजात प्रवेश मिळवून दिला. वेळ प्रसंगी स्वत:च्या सर्व इच्छा मारून व कर्ज घेऊन सुद्धा सदोबानी रिश्वत देवीला प्रसन्न केले. शेवटी वर्षभराच्या पगारा इतकी रिश्वतजुडी वाहून आपल्या मुलाला सरकारी नौकरीत रुजू केले.



मुलाचे लग्न करताना आतापर्यंत वाहलेल्या रिश्वतजुड्यांचा हिशेब त्यांनी केला व व्याजासकट भरपूर हुंडा घेऊन आपल्या मुलाचे लग्न केले. त्यावेळी रिश्वत देवीच्या चरणी वाहलेली जुडी सार्थकी लागल्याचा आनंद सादोबाना झाला. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वतजुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. त्यांनी पोराला हाक मारली व आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. मुलानेही त्यांचा इच्छेचा सम्मान करत त्यांचा चित्तेवर शंभर-शंभरच्या अकरा नोटा ठेवल्या.



अखेर सदोबा चित्रगुप्ताच्या दरबारी पोहचले. चित्रगुप्ताने सदोबाला विचारले तुला कुठे पाठवू- स्वर्गात की नरकात? सदोबाने चित्रगुप्ताला साक्षात दंडवत केला व बरोबर आणलेल्या नोटांची जुडी चित्रगुप्ताच्या चरणी अर्पण केली व म्हणाला - आपण जे कराल ते योग्यच, फक्त एकच विनंती - पुन्हा भरतभूमीवर पाठवू नका, रिश्वत देवीची पूजा करत करत मी थकून गेलो आहे. चित्रगुप्त मिस्कीलपणे हसत म्हणाला - सदोबा तू पृथ्वीवर कधीही कुणाला कष्ट दिले नाही, त्यामुळे मी तुला नरकात पाठवू शकत नाही. रिश्वत देऊन मला विकत घेऊ पाहत होता. तू विसरलाच ही भरतभूमी नाही चित्रगुप्ताचे न्यायालय आहे. तुझ्या या अपराधामुळे तुला स्वर्गात ही पाठविता येत नाही. तुला फक्त एकच शिक्षा- सदोबांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. अचानक एक बायकी आवाज त्यांना ऐकू आला - साहेब मुलगा झाला आहे ! सदोबाला कळून चुकल आपल्या नशिबी पुन्हा रिश्वतजुडी वहाण आले! नशिबाला दोष देत सदोबानी टाS Sहो फोडला.

Tuesday, May 10, 2011

प्रेम म्हणजे काय ? /प्रेम करण्या पूर्वी किंवा प्रेमात पडलेल्यानी, हा लेख अवश्य वाचावा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.



(माझा हा लेख प्रथम मराठीसृष्टी वर दिनांक  १३.७.२०१० ला प्रकाशित केला होता. कित्येक लोकांनी हा लेख सरळ चोरला होता)
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=10434


खुसरो  रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए  इक रंग.

लैला मजनूच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणार्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने अलग-अलग असले तरी त्यांचे ह्रदय एक होते. लैला मजनूच प्रेम हे खरं  प्रेम होत. आजच्या तरुण पीढ़ीच्या प्रेमाच्या कल्पना काय

तो स्मार्ट- ती सुन्दर, त्याला ती आवडली आणि तिलाही तो आवडला. त्यानी एकत्र सिनेमा पाहिला, एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरले आणि बहरलेल्या यौवनाचा आनंद घेतला. त्याना वाटले ते प्रेमात पडले. त्यानी प्रेम विवाह केला. एकत्र एकाच घरात राहण सुरु झाल. एकमेकांच्याआवडी-निवडी वादाचे विषय होऊ लागले.शुल्लक गोष्टींवरून भांडणे सुरु झाले. दोघांचाही अहंकार मोठा होता. परिणाम-

"देहाचा आकर्षणाने दोघ जवळ आले 
प्रेमा अभावी ते शीघ्र डायवोर्सि झाले"

'ती'- मी प्रेमात आंधळी झाली होती, 'तो'- मी मूर्ख होतो म्हणून हिच्या प्रेमात पडलो. पडनारच! कारण याना प्रेमाचा अर्थ कळलेला नव्हता.

काहींची प्रेमाची गाड़ी विवाहा पर्यंत ही पोहचत नाही. कारण  देहाचे आकर्षण क्षणभंगुर असते व ते संपल्यावर प्रेम ही संपते. तो किंवा ती कोणी तरी एक प्रेमभंगाला  कारणीभूत ठरतो. आपण वर्तमानपत्रांत रोज वाचतो प्रेमभंग झाल्याने कोणी आत्महत्या करतो तर कोणी खून सुद्धा. कारण यानाही प्रेमाचा अर्थ  कळलेला नसतो.

काही आपापला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी  प्रेमाचा देखावा करतात. मी ही डॉक्टर- ती ही डॉक्टर, आपण एकत्र आलो तर चैनित आयुष्य जाईल.  किंवा दोघही नौकरी करणारे- स्वार्थ मनात ठेउन प्रेम करतात. याला काय म्हणायच -

प्रेमाचा देखावा आज  फायद्याचा सौदा आहे 
विवाह सुध्दा आज देह भोगण्याचा करार आहे.

स्वार्थापोटी केलेल प्रेम भंग पावणारच. मग घटस्फोट हा होणारच यात आश्चर्य नाही. कारण यानाही  प्रेमाचा अर्थ कळलेला नाही.     

मग प्रेम म्हणजे काय?  

आपल्या सोंदार्याचा अभिमान बाळगून पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती कामदेवाच्या मदतीने  शंकराचे प्रेम जिंकायला निघाली. परिणाम काय झाला- शंकराने आपले तीसरे नेत्र उघडले व कामदेव भस्म झाला. पार्वतीला आपली चूक कळली. तिने तपस्येचा मार्ग धरला. आपला अहंकार, अभिमान इत्यादि तपस्येच्या अग्नित भस्म केले. अखेर शंकर प्रसन्न झाले. पार्वतीलाही  प्रेमाचा अर्थ कळला. आपण पहातोचवसंतात बहरलेल्या कच्च्या  कैरीला  ही ग्रीष्माच्या उन्हात तपावे लागते, मगच रसाळ-मधुर असा आम्बा आपल्याला खायला मिळतो. आपल्या मनातिल विकाराना अग्नित भस्म केल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळणे अशक्य म्हणूनच  एका उर्दू शायरने प्रेमाबद्धल  म्हंटले आहे  "इक आग का दरिया है तैर के जाना है" आणि आगीचा दरिया पार करण्यासाठी डोळे उघडे असायला पाहिजे. आंधळ्या माणसाचे हे काम नव्हे. 
एकदा शेजारच्या एका आजीला विचारले- तुम्ही कधी प्रेम केले आहे का? प्रेमाचा अर्थ काय? आजी म्हणाली प्रेमाच तर सोडा त्या काळी  लग्ना आधी मुलाला मुलगी दाखविण्याची पद्धत ही नव्हती. बायको म्हणजे- आईच्या मदतीला घरकामासाठी आणलेली हक्काची बाई. ती आपल्याला देह सुख ही देते व घराला वारस ही. त्या काळी  बायकाना कष्ट हे करावे लगायचेच. कधी- कधी मार ही खायला मिळायचा. आपले माहेरचे अस्तित्व विसरून नवर्या साठीच आपल आयुष्य आहे हे मनात ठरवून सासरी संसार सुरु केला. काही वर्षात चित्र बदलले. एका दुसर्याची सवय लागली. त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. माझ्यासाठी त्यानी आपला स्वभाव ही बदलला. माझ्या आवडी- निवडीकड़े ते जातीने लक्ष देऊ लागले. मला काय हवे त्याना न सांगताच समजू लागले होते. आज एका दुसर्याच्या मनात काय आहे हे न बोलताच आम्ही समजू शकतो. आता ही त्यांच्या मनात काय विचार चालला आहे, हे मी सांगू शकते. त्यागाशिवाय प्रेम सम्पादित करता येत नाही हेच खरं. संसाराचे चटके बसल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळने अशक्यच. आजीचे बोलणे मला पटले. आजीने खरोखरच तपस्या केली होती म्हणून तिला प्रेमाचा अर्थ कळला होता. असे प्रेम पाहूनच अमीर खुसरो ने म्हंटले आहे-   

खुसरो  रैन सुहाग की जागी पी के संग, 
तन मेरो मन पिऊ को दोउ भए  इक रंग.

शरीराने अलग- अलग असले तरी प्रेम रंगात भिजुन दोघांचे ह्रदय एक झाले होते. कारण प्रेमात द्वैत नाही. सूफी संतांच्या मते लौकिक प्रेम ही अलौकिक प्रेमाची पायरी आहे. कारण ज्याच्या हृदयात प्रेम आहे तोच ईश्वराला प्राप्त करू शकतो.  

याचा अर्थ लग्ना आधी प्रेम नाही केले पाहिजे असा नाही. प्रेम अवश्य करा, पण आपण प्रेमात पड़त आहो असे वाटत असेल तर आपले डोळे उघडा- स्वत:लाच प्रश्न विचारा- हे देहाचे आकर्षण तर नाही ना? यात आपला स्वार्थ तर नाही ना? कुठल्याही परिस्थितीत आपण त्याचा/ तिचा साथ देऊ शकतो का? त्याच्या/ तिच्या साठी आपण आपल्या सर्वस्वाचा अर्थात आपला अहंकार, अभिमान इत्यादींचा त्याग करू शकतो का? याचे उत्तर होय असेल तरच पुढे पाऊल उचला. अन्यथा प्रेमात पड़नारच. खर्या प्रेमाच्या प्राप्ति साठी तपस्या ही करावीच लागते. दोघाना शरीराने आणि मनानी एक व्हावे लागते. तेंव्हाच प्रेमाची प्राप्तिहोते, म्हणूनच कबीरदासानी म्हंटले आहे-

जब मै था तब हरि  नाही, जब हरि  है मैं नाही,
प्रेम गली अति सांकरी, ज्यामे दो न समाई.  

******* 

(प्रेम करण्या पूर्वी किंवा प्रेमात पडलेल्यानी, हा लेख अवश्य वाचावा. आपली प्रतिक्रिया अवश्य  कळवा).



Saturday, May 7, 2011

दोन क्षणिका / कागदी घोडे /शहर हिरवे गार



कागदी घोडे 
सरपट दौडले. 

लालफितीत जखडलेले 
फाईली भोवतीच फिरले. 

शहर हिरवे गार 

रस्त्यांवरच्या झाडांची 
इथे कत्तल होते रोज. 

तरीही म्हणती राजे 
शहर अमुचे हिरवेगार