सदोबा हा सामान्य माणूस, कधीही कुणाला त्रास न देणारा. रहस्य, रोमांच विरहित- एका
रेषेत चालणारा, सरळ-साधे आयुष्य. वडील गेल्यावर संसाराचा गाडा त्याचा
खांद्यावर आला. वडिलांच्या मृत्यु प्रमाणपत्रासाठी सदोबाला पहिल्यांदा रिश्वतजुडी अर्पण
करावी लागली. हळूहळू सदोबाला प्रत्येक कार्यासाठी रिश्वत ही द्यावीच लागले हे कळले. सदोबा कसलीही
चिडचिड व कटकट न करता रिश्वत जुडी आनंदाने वाहायचे. सदोबांच प्रामाणिक मत होते-
रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न
होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध
होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले.
सदोबाची बायको प्रसूत झाली, प्रसूतिगृहातून रडण्याचा आवाज ऐकू आला. दाई बाहेर
आली- आनंदाने घोषणा केली, साहेब मुलगा झाला
आहे. सदोबानी शंभराची एक नोट तिच्या हातात ठेवली आणि मुलाला पाह्यला आत गेले.
त्याच क्षणापासून पोरासाठी त्यांनी रिश्वत देवीची आराधना सुरु झाली. मुलाचे जन्मप्रमाणपत्र असो किंवा राशन कार्ड मध्ये
नावाची नोंदणी सदोबानी आनंदानी रिश्वतजुडी, रिश्वत देवीला अर्पण केली. डोनेशनरुपी रिश्वतजुडी अर्पणकरून मुलाला चांगल्या
शाळेत आणि नंतर चांगल्या कालेजात प्रवेश मिळवून दिला. वेळ प्रसंगी स्वत:च्या सर्व
इच्छा मारून व कर्ज घेऊन सुद्धा सदोबानी रिश्वत देवीला प्रसन्न केले. शेवटी
वर्षभराच्या पगारा इतकी रिश्वतजुडी वाहून आपल्या मुलाला सरकारी नौकरीत रुजू केले.
मुलाचे लग्न करताना आतापर्यंत वाहलेल्या रिश्वतजुड्यांचा हिशेब त्यांनी केला व
व्याजासकट भरपूर हुंडा घेऊन आपल्या मुलाचे लग्न केले. त्यावेळी रिश्वत देवीच्या
चरणी वाहलेली जुडी सार्थकी लागल्याचा आनंद सादोबाना झाला. एके दिवशी सदोबांच्या
छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित
चित्रगुप्तालाही रिश्वतजुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. त्यांनी पोराला हाक
मारली व आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. मुलानेही त्यांचा इच्छेचा सम्मान करत
त्यांचा चित्तेवर शंभर-शंभरच्या अकरा नोटा ठेवल्या.
अखेर सदोबा चित्रगुप्ताच्या दरबारी पोहचले. चित्रगुप्ताने सदोबाला विचारले
तुला कुठे पाठवू- स्वर्गात की नरकात? सदोबाने चित्रगुप्ताला साक्षात दंडवत केला व बरोबर
आणलेल्या नोटांची जुडी चित्रगुप्ताच्या चरणी अर्पण केली व म्हणाला - आपण जे कराल
ते योग्यच, फक्त एकच विनंती -
पुन्हा भरतभूमीवर पाठवू नका,
रिश्वत देवीची पूजा करत करत मी थकून गेलो आहे. चित्रगुप्त मिस्कीलपणे हसत
म्हणाला - सदोबा तू पृथ्वीवर कधीही कुणाला कष्ट दिले नाही, त्यामुळे मी तुला नरकात पाठवू शकत नाही. रिश्वत देऊन
मला विकत घेऊ पाहत होता. तू विसरलाच ही भरतभूमी नाही चित्रगुप्ताचे न्यायालय आहे.
तुझ्या या अपराधामुळे तुला स्वर्गात ही पाठविता येत नाही. तुला फक्त एकच शिक्षा-
सदोबांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. अचानक एक बायकी आवाज त्यांना ऐकू आला - साहेब
मुलगा झाला आहे ! सदोबाला कळून चुकल आपल्या नशिबी पुन्हा रिश्वतजुडी वहाण आले!
नशिबाला दोष देत सदोबानी टाS
Sहो फोडला.
No comments:
Post a Comment