दिल्लीचा मराठी समाजाशी संबंध पेशव्यांच्या काळापासून आहे. दिल्लीतील प्रसिद्ध गौरी शंकर मंदिर अप्पा गंगाधर नावाच्या मराठा सरदाराने बांधले होते. या शिवाय एका मराठा सरदार राजा हिंदुरावचा वाडा आज हिंदुराव हॉस्पिटल नावाने ओळखला जातो. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मुंबईतील रेल्वेचे एक कार्यालय दिल्लीत आले आणि त्यासोबत अनेक मराठी कुटुंबेही दिल्लीला आली. त्यातील पंचवीस-तीस कुटुंबे जुनी दिल्लीतील नया बाजार, नई बस्ती परिसरात भाड्याच्या घरांमध्ये राहू लागली. आमचे आजोबा जर्मन कंपनीत नोकरीच्या निमित्ताने दिल्लीत आले आणि नया बाजारात फाटकीण बाई चालवत असलेल्या खानावळीच्या इमारतीत भाड्याने राहू लागले. दिल्लीतील काही मराठी कुटुंबे चित्रपट सृष्टीशी संबंधित होती. काही सिनेमागृह - नोव्हेल्टी, न्यू अमर, एक्सेलसिअर, वेस्टएंड, रिट्झ इत्यादी मराठी लोकांचे होते. दिल्लीत येणार्या मराठी लोकांची सोय करण्यासाठी 1919 नव्या बाजारातील एका इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजला भाड्याने घेऊन "महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज" ची स्थापना झाली. येथे महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना नाममात्र भाड्याने राहता येत असे. पुढे दिल्लीतील मराठी कुटुंबातील मुले मोठी होऊ लागली. आमच्या आजोबा आणि समाजातील सदस्यांनी मुलांना मराठीत प्राथमिक शिक्षण देण्यासाठी केली "नूतन मराठी विद्यालय" ची स्थापना केली. माझ्या वडिलांचे आणि काका, आत्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत झाले आणि पुढचे शिक्षण काबुली गेट शाळेत झाले. स्वातंत्र्यानंतर काका साहेब गाडगीळ यांच्या प्रयत्नाने शाळा पहाडगंजला हलवली गेली आणि बृहन्महाराष्ट्र भवनची स्थापना झाली, जिथे ५० हून अधिक लोकांच्या निवासाची व्यवस्था होती. आजही महाराष्ट्रातून आलेले लोक इथे थांबतात.
द्वितीय महायुद्ध सुरू झाले आणि जर्मन कंपन्यांना भारत सोडून गेल्या. आमचे आजोबा केमिकल मार्केटमध्ये उतरले. त्यांचा मुख्य व्यवसाय पंजाबमध्ये होता. पण १९४७ च्या फाळणी आणि दंगलीमुळे त्यांच्या व्यवसाय बुडाला. ते नागपूरला परत गेले. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आमचे वडील नोकरीच्या निमित्ताने पुन्हा दिल्लीला आले आणि नई बस्तीतील काबुली गेट शाळेच्या मागे असलेल्या स्वातंत्र्य सैनिक सुशीला मोहन यांच्या घरात भाड्याने राहू लागले. जुनी दिल्लीतील मराठी कुटुंबे कमी होती. पण सर्व जवळ जवळ राहत होते. आम्ही सर्व मुले पहाडगंजच्या नूतन मराठी शाळेतच शिकत होतो. एकत्र शाळेत जाणे आणि परत येत असल्यामुळे आमच्यात घट्ट मैत्री होती.
महाराष्ट्र समाजाच्या पहिल्या मजल्यावर नेहमी पाहुण्यांची वर्दळ असे. दूसरा मजला बहुतेक वेळा रिकामा असे. तिथे मराठी ग्रंथालय, टेबल टेनिस आणि कॅरम बोर्ड होते. त्या काळात गृहपाठाचा फारसा ताण नसे. त्यामुळे आम्ही मुलांचा रविवार समाजात खेळण्यात जात असे. समाजात दोन्ही खेळांच्या स्पर्धा होत आणि त्यातून राज्यस्तरीय खेळाडूही तयार झाले. एकदा महाराष्ट्र समाजाची टीम ने दिल्ली टेबल टेनिस लीग मध्ये भाग घेतला आणि 3र्या क्रमांकावर राहिली होती. समाजाच्या प्रोत्साहन मुळे नरेंद्र दिल्ली यूनिवर्सिटी, दिल्लीच्या टीम आणि नंतर एमटीएनएल तर्फे खेळू शकला. आजकाल कोचिंग करतो. समाजात सर्व मराठी सण संक्रांती, रामदास नवमी, चैत्राचे हळदीकुंकू , गणपती उत्सव, कोजागिरी, दत्त जयंती इत्यादि उत्साहाने साजरे होत असे.
पण काळ कधी एकसारखा राहत नाही. भाड्याने राहणारर्या मराठी लोकांना दिल्लीत स्वतःचे घर असावे असे वाटू लागले. अनेकांच्या मुलांना बाहेर नौकर्या लागल्या. १९७७ नंतर अनेक कुटुंबे जुनी दिल्ली सोडून जाऊ लागली. वाढत्या ट्रॅफिकमुळे महाराष्ट्रातून येणारे पाहुणेही समाजात राहण्याचे टाळू लागले. त्यामुळे महाराष्ट्र समाजाची भाड्याची जागा सोडून पहाडगंजच्या बृहन्महाराष्ट्र समाजाच्या इमारतीत स्थलांतर झाले. मुबईतील संपांचा फटका आमच्या वडिलांच्या कंपनीलाही बसला होता. फक्त क्षुल्लक रकम घेऊन आम्ही जुनी दिल्ली सोडली आणि जनकपुरी परिसरात राहायला गेलो. फक्त सत्तर वर्षांत जुन्या दिल्लीतून मराठी माणूस नाहीसा झाला. नोकरीच्या मागे धावणे ज्या समाजाची नियती असते ते कुठेही स्थायिक राहू शकत नाही. त्यांना नौकरीच्या शोधत भटकावे लागते. आता फक्त आठवणी उरल्या आहेत.