Saturday, March 15, 2025

दोष व्हीआय पी सुरक्षा यंत्रणेचा: स्वर्गीय इंदिरा गांधी आणि छत्रपति संभाजी राजे

देशात छावा चित्रपट गाजला. माझ्या एका मित्राने फोन वर मला विचारले, विवेक तू तर देशातील सर्वोच्च सुरक्षा अधिकार्‍यांच्या अखत्यारीत आणि एसपीजीत काम केले आहे. या विषयावर तुझे विचार काय आहे. मराठी  इतिहासबाबत थोडे बहुत ही लिहले आणि ते जनतेला पटले नाही तर जन भावनांचा भडका उडू शकतो. बिना कुणाच्या भावना दुखविता यावर भाष्य करणे म्हणजे तारेवरची कसरत. तरी ही सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीकोणातून हा लेख लिहण्याचा प्रयत्न केला आहे. 

महाभारताच्या युद्धाच्या सुरवात होण्यापूर्वी दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देश्यून म्हणतो, पितामह भीष्मच्या नेतृत्वात आपले सैन्य अजेय आहे. सर्वांनी पितामह भीष्माची रक्षा करावी. कारण दुर्योधनाला माहीत होते, जो पर्यन्त कुरुक्षेत्रच्या युद्ध भूमीवर पितामह भीष्म आहेत, तो पर्यन्त पांडवांचा विजय होणे शक्य नाही. राजा जिवंत असेल तरच युद्ध जिंकणे किंवा शत्रूपासून राज्याची सुरक्षा करणे संभव असते.  बिना राजा राज्य सुरक्षित राहू शकत नाही. 

आज एसपीजी भारताच्या प्रधानमंत्रीची सुरक्षा करते. एसपीजीत प्रतिनियुक्ती वर सुरक्षा दलांतून अंगरक्षक भरती केले जातात. अंगरक्षक निश्चित अवधिसाठी नियुक्त केले जातात. एसपीजीचे वरिष्ठ अधिकारी प्रधानमंत्रीचे अंगरक्षकांची ड्यूटी कोण करणार हे नियमिपणे ठरवत राहतात. आज परिस्थिति पाहून एसपीजी प्रधानमंत्रीचे कार्यक्रम ही बदलू शकते. प्रधानमंत्रीला त्यांच्या सुरक्षेची चिंता करण्याची गरज नसते. ते त्यात हस्तक्षेप ही करत नाही. या शिवाय एसपीजी असो किंवा प्रधानमंत्री कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची कसून चौकशी होते. त्यांच्या परिवाराची ही चौकशी केली जाते. त्यानंतरच त्यांची नियुक्ती होते. थोडी ही शंका असेल तर त्यांची नियुक्ती केली जात नाही किंवा केली असेल तर त्यांना परत त्यांच्या मूळ विभागात पाठवून दिले जाते. 

एसपीजीच्या स्थापने पूर्वीही सुरक्षा दलांचे कर्मचारी प्रधानमंत्रीची सुरक्षा करायचे. सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी अंगरक्षकांची नियुक्ती करायचे. शंका असेल तर अंगरक्षकांना बदलण्याचा अधिकार ही त्यांना होता. पण त्याकाळी प्रधानमंत्रीच्या इच्छेनुसार अंगरक्षक कितीही वर्ष तिथे काम करू शकत होते. ही सुरक्षा यंत्रणेची सर्वात मोठी चूक होती. 

जे अधिकारी प्रधानमंत्रीच्या सुरक्षेसाठी जवाबदार असतात. त्यांच्यात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्रीच्या इच्छेच्या विरोधात जाऊन निर्णय घेण्याची क्षमता ही असली पाहिजे. मी एसपीजीत होतो तेंव्हा  प्रधानमंत्री नेहरूजींच्या बाबतीत एक गोष्ट ऐकली होती. त्यात किती सत्य होते, हे अजूनही मला माहीत नाही. एकदा भाषण संपल्यावर  जनता  त्यांच्या भोवती गोळा झाली. कुणाला त्यांचे चरण स्पर्श करायचे होते, कुणाला हात मिळवायचे होते. कुणाला त्यांच्याशी बोलायचे होते. पण असे करताना पंडितजींना लोकांचे धक्के लागत होते. त्यांच्या सुरक्षेत असलेल्या अधिकार्‍याला वाटले, लोकांचे प्रेम जरा अति होत आहे. तो पंडित नेहरू जवळ गेला. त्यांचे हात पकडून त्यांना थोड्या दूर उभ्या असलेल्या कार जवळ ओढत घेऊन जाऊ लागला. पंडित नेहरूंनी विरोध केला, पण अधिकार्‍याने त्याकडे लक्ष दिले नाही. दुसर्‍या दिवशी पंडितजींनी त्याला आपल्या कार्यालयात बोलविले. अधिकार्‍याला वाटले, आता प्रधानमंत्री त्याला फायर करतील. पण नेहरूजींनी त्याच्या कर्तव्य परायणता आणि समय सूचकतेचे कौतुक केले. मला वाटते या गोष्टीचा एकच उद्देश्य होता, राष्ट्र प्रमुखाची सुरक्षा, ही राष्ट्र प्रमुखाच्या इच्छेपेक्षा जास्त महत्वपूर्ण असते, हे राष्ट्र प्रमुखाच्या सुरक्षेत असलेल्या सर्वांनी सदैव लक्षात ठेवले पाहिजे.  

प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या अंगरक्षक दलात दोन सिख ही होते. अनेक वर्षांपासून त्यांची ड्यूटी प्रधानमंत्रीच्या निवासस्थानी होती. त्यांचे प्रधानमंत्री इंदिरा गांधी सोबत पारिवारिक स्नेह संबंध ही स्थापित झाले होते. आपरेशन ब्लू स्टार नंतर सिखांच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या होत्या.  प्रधानमंत्रीच्या सुरक्षा व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकार्‍यांना त्या दोन्ही सिख अंगरक्षकांना प्रधानमंत्रीच्या सेवेतून मुक्त केले पाहिजे असे वाटत होते. त्यांनी आपली शंका प्रधानमंत्रीला बोलावून दाखविली आणि त्यांची बदली करण्याची अनुमति मागितली. साहजिक होते, प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी ती दिली नाही. नियमांनुसार अधिकारी त्या सिख अंगरक्षकांची बदली करू शकत होते. प्रधानमंत्रीची अनुमति घेण्याची गरज नव्हती. इथे ही  स्वामीची इच्छा स्वामी निष्ठेवर भारी पडली. अधिकार्‍यानी स्वामी हिताचा निर्णय घेतला नाही.  त्यांच्या चुकीचा परिणाम प्रधानमंत्री सहित हजारो लोकांना जीव गमवावा लागला.  

छत्रपति संभाजी राजांच्या काळी राजाला अधिकान्श निर्णय स्वत: घ्यावे लागायचे. जनतेत जाऊन न्याय निवडा ही करावा लागत असे. त्यासाठी राज्यभर फिरावे लागत असे. छत्रपति संभाजी राजांना शत्रू आपल्यावर चालून येत आहे. ही माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या सोबत अंगरक्षक, मित्र आणि सरदार ही होते. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या अधिकार्यांनी  सारासार विचार केला असता  तर त्यांना समजले असते.  मुगल फौजेला राजा कुठे आहे ही माहिती मिळाली आहे. याचा अर्थ फितुरी झाली आहे.  राजा सोबत किती सैनिक आहे, हे ही मुगल फौजेला माहीत झाले असेल. मुगलांनी राजांच्या मागावर  निवडक आणि प्रशिक्षित सैन्य पाठविले असेल.  ते वेगाने इथे पोहचण्याचा प्रयत्न करतील. जे फितूर झाले आहेत, ते मुगल फौजेचा मार्गदर्शन ही करू शकतात. अश्या बिकट परिस्थितीत बिना अधिक विचार करता छत्रपति संभाजी राजांना त्वरित तेथून हलविले पाहिजे होते. पण काय झाले. राजांचे सर्व सोबती स्वामी भक्त होते, स्वामी आज्ञेचे पालन करताना मरण पत्करू शकत होते. पण ते परिस्थितीचा सारासार विचार करून स्वामींच्या  हिताचा निर्णय घेण्यास ते असमर्थ ठरले. 

या घटनांपासून एकच धडा मिळतो. शत्रूला तुमच्या राजाला नष्ट करायचे असते. त्यासाठी समोरा-समोर युद्धा एवजी तो साम, दाम, दंड, भेद हे सर्व हत्यार ही वापरू शकतो. तो फितुरांची मदत ही घेऊ शकतो. राजाच्या सुरक्षेत असलेल्या सर्व अधिकार्‍यांना, सरदारांना हे माहीत असले पाहिजे. त्यांच्यात राजाच्या सुरक्षेसाठी, राजाच्या इच्छे विरुद्ध ही जाण्याचे धाडस असले पाहिजे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी असो किंवा छत्रपति सभाजी राजे दोघांचे प्राण वाचले असते जर त्यांच्या सुरक्षेत असलेल्या जवाबदार अधिकार्यांनी स्वामीची सुरक्षा प्रथम ह्या सिद्धांतंनुसार निर्णय घेतला असता.

व्हीआयपी सुरक्षा ही सामूहिक जिम्मेवारी असल्याने कुणा एकाला दोष देण्यात अर्थ नाही. आपण फक्त इतिहासातून धडा घेऊ शकतो. प्रत्येक राजकर्त्यांने समर्थांचे बोल  "अखंड सावधान असावे... नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. 


Wednesday, March 5, 2025

राजकुमार, बुटका आणि राक्षस : युक्रेन आणि अमेरिका


एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली.  

आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.   

रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेनने रशियाची मैत्रीपूर्ण संबंध ठेवले असती तरी समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला आणि रशियाच्या मित्र देशांविरोधात अर्थात भारत विरोधी भूमिका ही घेत राहिला. युक्रेनमध्ये रशियन लोकांवर आत्याचार सुरू झाले. नंतर मीडिया आणि पैश्यांच्या मदतीने एका मूर्ख व्यक्तीला युक्रेनच्या सिंहासनावर बसविले. परिणाम रशियाला संपूर्ण रशियन भाषिक प्रदेश युक्रेनपासून तोडण्यासाठी युद्ध करण्यास भाग पाडले. अमेरिकाने 300 बिलियनहून जास्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला दिले. (अर्थात तो पैसा अमेरिकन शस्त्र उत्पादकांना मिळाला). तसेच युरोप ने ही केले. शस्त्र माफिया खुश झाला.  रशियावर अनेक प्रतिबंध लावले. तीन वर्ष झाले युद्धाचा काही परिणाम निघलेला नाही. युक्रेनचे काही लक्ष सैनिक युद्धात शहीद झाले. अमेरिकेला अपेक्षित होते तेवढे रशियाचे नुकसान झाले नाही. रशिया ही आपल्या रशियन मूळच्या जनतेला वार्‍यावर सोडून परत जाणार नाही. जो पर्यन्त आर्थिक क्षमता आहे, नुकसान सोसेल. चीनला या युद्धाचा जास्त फायदा झाला. आफ्रिका आणि दक्षिणी अमेरिकेत त्याचे आर्थिक हस्तक्षेप वाढले. युक्रेन युद्धात जास्त पैसा ओतणे हे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे नाही. हे अमेरिकेला कळून चुकले आहे. आता अमेरिकेला  युक्रेन मध्ये खर्च केलेल्या 300 बिलियन डालरच्या मोबदल्यात त्याला युक्रेनची खनिज संपत्ति पाहिजे. युरोप ही त्याच उद्देश्याने युक्रेनला शस्त्र पुरवठा करता आहे. झेलेंस्की आता युरोपला या युद्धात भाग पाडण्याचा विचार करतो आहे. युरोप प्रत्यक्ष युद्धात उतरणार नाही.  युरोप फक्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला पुरवीत राहणार. तबाही मात्र युक्रेनची होणार.