Tuesday, November 25, 2014

मला बी बाबा व्हायचं.


पन्नासी उलटली तरी  अनेक संसारिक इच्छा अपूर्णच आहेत. विदेशी गाडी, बंगला इत्यादी सोडा, एक सादी नोनो घेण्याची ऐपत सुद्धा नाही, असे सौ. चे मत आहे. स्वर्ग सुख भोगण्याची इच्छा तर प्रत्येकाचा मनात असतेच, माझ्या ही मनात आहे.  सध्या तरी स्वर्गीय सुख आणि  स्वर्गातील अप्सरा स्वप्नातच भेटतात. दुसऱ्या शब्दात 'दुधाची तहान ताकावर भागवितो'. कालच टीवी वर एका बाबांच्या आश्रमाच दर्शन झाले. काय काय नव्हत, त्या आश्रमात. विदेशी गाड्या, उंची सिंहासन, उंची कपडे, बंदुका, स्वीमिंग पूल, अर्थात स्वर्गातील सर्व सुख सोयी तिथे होत्या.   अश्या बाबांचा हेवा हा वाटणारच. 

सकाळी उठल्यावर टीवी वर कुठले ही चेनेल लावा. समोर एक बाबा प्रवचन करताना दिसतो. अश्या बाबांच्या डोक्यावर पांढरे केस असतात. मस्त पैकी सिंहासनावर बसून लोकांना माया मोहापासून दूर राहण्याचा उपदेश देत असतात.  भक्तांनी मायेचा त्याग केला की माया  भक्तांच्या खिश्यातून, बाबांच्या झोळीत येऊन पडणार, हे आलंच.  माया जवळ असेल तर सर्व स्वर्ग सुख आपसूकच पायावर लोटांगण घालतात. अश्या या बाबा लोकांना तर  स्वर्गातील अप्सरा ही  पृथ्वीवर सहज उपलब्ध होतात. 

एक दिवस मनात विचार आला, आपण ही बाबा बनाव, बाबा बनण्यासाठी काय लागते याचा विचार करू लागलो.  आरश्यात पहिले  डोक्यावरचे केसं ही पांढरे झाले आहेत, डोक्यावरचे पांढरे केसं ही विद्वान् माणसाची निशाणी.  या शिवाय    संत रामदास, ज्ञानेश्वर आणि  तुकोबांचे  काही अभंग ही तोंडपाठ आहेत. रामायण महाभारतातल्या काही कथा ही अवगत आहे. इतकेच नव्हे तर कबीर आणि तुलसी यांचे ही काही दोहे ही तोंडपाठ आहेत. आपला आवाज ही चांगला बुलंद आहे. घरात भांडण झाले की संपूर्ण मोहल्याला कळते.  कधी कधी चार चौघांसमोर भाषण देण्याचा ही योग आला आहे. मला तरी वाटते बाबा बनण्याची संपूर्ण योग्यता आपल्यात आहे. फक्त  कोणत्या ही  टीवी  चेनेल वर , प्रवचन देण्याचा मौका  मिळाला पाहिजे. काही दिवसांच्या प्रवचनानंतर  माणूस आपोआप प्रसिद्ध होतो, एकदा  टीवी वर प्रसिद्धी मिळाली की भक्तांची कमी नाही.  भक्त मिळाले की त्यांची माया आपसूक आपल्या खिश्यात येईल. माया असेल तर स्वर्गसुख ही पायाशी लोटांगण घालतील. आयुष्यातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.  आजच संध्याकाळी एका ज्योतिष मित्राला आपला हात दाखविला, त्याला ही विचारले बाबा बनण्याचा काही योग आहे का. तो म्हणाला योग तर आहे, पण पुढे धोका ही आहे,. स्वर्गसुख भोगल्यावर, काही वर्षानंतर बाबांना नरक यातना (जेलची कोठरी) ही भोगाव्या लागतात. तुझी तैयारी असेल तर, तू निश्चित बाबा बनू शकेल.....  





No comments:

Post a Comment