Thursday, July 16, 2020

प्रदूषण : वेताळ आणि विक्रम


विक्रमा, मी तुला सोडून देईन पण त्याआधी तुला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विक्रमा  पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या प्रदूषणासाठी उत्तरदायी कोण? तुला माहित असूनहि खरे उत्तर दिले नाही तर तुझ्या डोक्याचे हजार तुकडे होतील. विक्रम म्हणाला, वेताळ, मानव निर्मित कचरा, प्लास्टिक, पेट्रोलचा धूर इत्यादीमुळे प्रदूषण पसरते. यांचा निर्माता मनुष्य प्राणी असल्यामुळे मानवच उत्तरदायी आहे. वेताळ खदाखदा हसला, विक्रमा, तुझे उत्तर खरे आहे, हा मी चाललो म्हणत वेताळ आकाशी उडाला, पण त्याला दूर-दूर कुठेही झाड दिसले नाही. शेवटी थकून-भागून वेताळ एका विजेच्या खांबावर लटकला. ४४० वाॅटचा जोरदार करंट त्याला लागला. वेताळ धाडकन जमिनीवर आपटला. त्याला मुक्ती मिळाली आणि विक्रम प्रदूषणच्या नरकात तडफडत मरण्यासाठी जिवंत राहिला. 

(श्री सुभाष पी. नाईक यांच्या धरा धरोहर कविता संग्रहापासून पासून प्रेरणा  घेऊन)


Tuesday, July 14, 2020

करोना आणि मॅकालेचे मानसिक गुलाम


मॅकाले शिक्षणाचा एक  हेतू भारतीयांना मानसिक गुलाम बनविण्यासाठी त्यांच्यात हीन भावना भरणे होते.  एकदा माणूस आत्मग्लानी आणि हीन भावनेने ग्रस्त झाला कि त्याचे  विचार काहीशे असे होतोत "आपण अडाणी होतो, जे काही ज्ञान आहे ते ब्रिटीशांनी दिलेले आहे." आणि अश्या परिस्थितीत आपल्या परंपरागत ज्ञानाच्या आधारावर कुणी गौरवास्पद  कार्य केले तरी त्याला ते पचणार नाही.  या करोना काळात  पतंजलि निर्मित आयुर्वेदिक औषधी चाचणीत १०० टक्के  खरी उतरली आणि आंग्ल शिक्षित मानसिक गुलामांना हे पचणे कठीण झाले, याचे कारण काय. यावर विचार मांडण्या आधी पार्श्वभूमी समजणे हि आवश्यक. 

दहाव्या शताब्दी पर्यंत आयुर्वेद हे जगातील सर्वात उन्नत आरोग्य शास्त्र होते. शल्यक्रिया पासून ते शिक्षणासाठी शवांचे विच्छेदनचे कार्यहि देशातील मोठ्या गुरुकुलांमध्ये होत होते. विदेशी आक्रांतानी आपल्या ज्ञानाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यात ते सफलहि झाले. आपले दुर्भाग्य स्वतंत्रता प्राप्ती नंतरहि काळ्या मानसिक गुलामांचेच राज्य आले. आयुर्वेदाला दुर्लक्षित केल्या गेले. जिथे  एलोपथी  शिक्षणावर अब्जावधीचे अनुदान दिले जाते तिथे आयुर्वेद शिक्षणाच्या  फी वरहि निर्बंध घातले जाते. त्यामुळे कुठलेही नवीन अनुसंधान करणे आयुर्वेदीक शिक्षण संस्थांना  शक्य नाही. या मूर्खपणामुळे देशाचे अब्जावधी कोटींचे नुकसान होते, हेहि  त्यांना कळत नाही. आज जगात हर्बल मेडिसिन क्षेत्रात  चीनी औषधींना मान्यता प्राप्त आहे. लाखो कोटींचा त्यांचा व्यापार आहे. तिथल्या लाखो शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधरली आणि महागड्या औषधांचा खर्च हि वाचला. या शिवाय चीनला लाखो कोटींचे परकीय चलन हि मिळते. पण आयुर्वेदाला औषधी शास्त्र म्हणून जगात मान्यता  नाही कारण आयुर्वेदिक औषधीत प्रयुक्त होणार्या ११००च्या जवळपास वनस्पतींवर शोध कार्य अत्यंत कमी प्रमाणात  झाले आहे. सरकारने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असे म्हटले तरी गैर नाही. तसे झाले असते तर आज शेतकर्यांना काही लाख कोटी दरवर्षी भेटले असते. असो.

सन २०१६ मध्ये आयुर्वेदिक औषधींवर अनुसंधान करण्यासाठी पतंजलिने अब्जावधी खर्च करून देशातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक उन्नत यंत्रांनी सज्ज प्रयोगशाळा स्थापित केली. स्वयं प्रधानमंत्री नरेंद्र मोदिजीनी या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. आज इथे ३०० हून जास्त शास्त्राज्ञ कार्य करतात.  औषधींचे सुष्म स्तरापासून ते प्राणी आणि मानवावर प्रयोग करण्याची सुविधा इथे आहे. पतंजलि उद्योग समूहाच्या लाभांशचा अधिकांश हिस्सा या प्रयोगशाळेवर खर्च होतो. गेल्या तीन वर्षांत आयुर्वेदिक औषधींवर अनेक रिसर्च पेपर नेचर सहित अनेक मेडिकल जर्नल मध्ये प्रकशित झाले आहे. एवढेच नव्हे तर संस्कृत भाषेतहि एका रिसर्च पेपरचा सारांश प्रकाशित झाला आहे. अर्थात संस्कृत भाषेला अंतराष्ट्रीय स्तराच्या मेडिकल जर्नल मध्ये मान्यता मिळाली. हे वेगळे याबाबत मिडीयाने कधी चर्चा हि केली नाही. याचे उत्तर मिडीयाच देऊ शकते. (https://www.acharyabalkrishna.com/research/) पतंजलिचे अश्वगंधावर रिसर्च पेपर प्रकाशित होताच, अनेक आयुर्वेदिक कंपन्यांनी अश्वगंधाचे जोमाने  विज्ञापन सुरु केले. असो.

गिलोय, तुळशी, अश्वगंधा, अणु तेल आणि श्वासरी रस या औषधांचा प्रयोग पतंजलिने कोरोनाच्या रोगींवर केला. रोगी पूर्णपणे ठीक झाले. निम्स, जयपूरने या औषधींच्या आधुनिक पद्धतीने क्लिनिकल ट्रायल करण्यात रुचि दाखविली. सर्व सरकारी औपचारिकता पूर्ण करून नियमानुसार  'third party;  परीक्षण सुरु झाले. लक्षण नसलेले रोगी, कमी आणि मध्यम लक्षण असलेल्या रोगींवर हे परीक्षण झाले. इथे नमूद करणे गरजेचे उपचारासाठी येणार्या ९९ टक्के रोगींना हीच लक्षणे असतात. बाकी रोगीची प्रतिकार शक्ती कमी असेल किंवा आधुनिक औषधींचे दुष्परिणाम, रोगी दगावण्याची टक्केवारी जास्त आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या शब्दांत परीक्षणाचा प्रचार केला नाही कारण तसे केले असते तर बहुतेक ड्रग माफियाने या परीक्षणात अडथळे आणले असते.  या परीक्षणात सर्व रोगी बरे झाले. चुकीने एखादहि दगावला असता तर बहुतेक मानव वधाचा आरोप पतंजलिवर लावण्यात ड्रग माफिया आणि त्यांच्या गुलामांनी कसर सोडली नसती.  

साहजिकच मानसिक गुलामांना परीक्षणाचे निष्कर्ष पटले नाही. बहुधा त्यांना वाटत असेल आजहि आयुर्वेदिक औषधी खरल मध्ये खरडून बनतात.  अनेक अतिविद्वानाच्या मते आयुर्वेदिक औषधी म्हणजे 'आजीबाईच्या बटव्यातील औषधी', आयुर्वेदिक औषधींचा परिणाम अत्यंत हळू होतो. एवढे परिणाम कारक औषध आयुर्वेदात निर्मित होणे शक्यच नाही, इत्यादी. आमच्या औषधांच्या एक-एक गोळीची किमत हजारो रुपये आणि बाबा एवढ्या स्वस्तात औषध बाजारात आणतात आहे, काही तरी गोम आहे. आंग्लशिक्षित शहाणे बिना कुठले प्रमाण देता, बाबा फेक दावा करतात इत्यादी टंकून मोकळे झाले. हा त्यांच्या दोष नाही त्यांच्या मनात हीन भावना निर्माण करणाऱ्या  शिक्षणाचा दोष आहे. लोकांना लुटण्याच्या धंद्यावर गदा आल्यावर फेक आणि भ्रमित प्रचार पेड मिडिया करणारच. तसेही जेवढा मोठा मिडिया तेवढा जास्त खर्च आणि त्यासाठी विज्ञापनहि जास्त लागते. मध्यान्ही सूर्य दिसत असूनही त्याला रात्र म्हणणे त्यांचीहि विवशता. औषधींना बाजारात येऊ न देण्यासाठी राजकीय मदतहि घेण्यात आली. पण औषध बाजारात आलेच. या औषधी मुळे हजारो करोना रोगी रोगमुक्त होतील. अन्य औषधींच्या सेवनाने शरीरावर जे दुष्परिणाम  होतात तेहि होणार नाही.

आपण आपल्याच गौरवपूर्ण कार्याला स्वीकार करत नाही, हाच मॅकाले शिक्षणाचा परिणाम.आपल्या जवळहि ज्ञान-विज्ञान आहे, आधुनिक तंत्रांचा उपयोग करून आपणहि आपल्या  प्राचीन ज्ञानाला समृद्ध करून   जगात पुढे जाऊ शकतो ही भावना आज निर्मित करण्याची गरज आहे. बाकी सूर्याला उदित होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही.

Monday, July 6, 2020

स्वामी त्रिकालदर्शी: करोना वर चर्चा

आज  बर्याच  महिन्यांनी स्वामी त्रिकालदर्शी यांचे दर्शन घ्यायला त्यांच्या कुटीत गेलो. नेहमीप्रमाणे ते ध्यानमग्न अवस्थेत होते. कुटीत एका कोपर्यात जाऊन बसलो आणि त्यांच्या समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. एकदाचे त्यांनी डोळे उघडले आणि समाधीतून बाहेर आले. मी त्यांना साष्टांग प्रणाम केला. माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत स्वामीजी म्हणाले, बच्चा काय समस्या आहे. 

मी: स्वामीजी, सध्या करोनाची साथ जगात पसरलेली आहे. लाखो लोग मृत्यमुखी पडले आहे.  करोना मीटर पाहिल्यावर असे दिसते. जगात ज्या ठिकाणी स्वास्थ्य सुविधा कमी, तिथे मृत्यू दर कमी आणि जिथे जास्त तिथे मृत्यू दर जास्त. आपल्या देशातहि मुंबई, दिल्ली, अहमेदाबाद, चेन्नई सारख्या मोठ्या महानगरात मृत्यू दर जास्त आणि झारखंड, बिहार, ओडिशा, आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात कमी. काय कारण असावे?

स्वामीजी: बच्चा, करोनाच्या रोगींचा उपचार ज्या औषधींनी होतो आहे. त्या औषधींचा विपरीत परिणाम श्वसनतंत्र, हृदय, लिवर आणि किडनी वर होतो. पण बच्चा, एक लक्षात ठेव ९५ ते ९६  टक्के रोगी या औषधींमुळे बरे होतात. 

मी: स्वामीजी पण...

स्वामीजी: (पानदाणीतून विडा काढत), बच्चा पान खाणार का?

मी: स्वामीजी, मी पान खात नाही.

स्वामीजी: हा सोन्याचा वर्ख लागलेला विडा आहे, खाऊन बघ. डोक्यात फालतू विचार येणार नाही, डोक शांत होईल. म्हणतात न, "खाली दिमाग शैतान का घर".

मी: स्वामीजी, तुम्हाला माहित आहे, मी पान विडी तंबाकू काहीच घेत नाही. 

स्वामीजी: बच्चा, म्हणूनच तुझे चंचल मन एकाग्र होत नाही. ऐक, वेद भगवान म्हणतात, "एकत्र राहा, एकत्र खा, एकत्र प्या, एकत्र पुरुषार्थ करा". अशाने देशाची अर्थव्यवस्था सुधरते. बाकी जीवन-मरण भगवंताच्या हाती आहे. तू उगाच व्यर्थ काळजी करतो. मित्रांसोबत खा पी आणि मौज कर.

मी: स्वामीजी,  अखेरची शंका, चाचणीत यशस्वी झालेल्या औषधाचा विरोध का? त्या औषधाचे दुष्परीणाम हि नाही. 

स्वामीजी: वेद विरोधी कार्य करणार्याचा विरोध होतो. ज्या ग्राहकांकडून लाखो वसूल केल्या जाऊ शकतात. त्यांचे समाधान हजारहून कमी रुपयांत करून आपल्याच बंधूंच्या पोटावर लाथ मारणार्याचा विरोध हा होणारच. पोट आहे म्हणून हे मायावी जग आहे. जगण्यासाठी प्रथम स्वत:च्या पोटाचा विचार केला पाहिजे.  समाजाच्या विपरीत जाऊन कार्य करणे म्हणजेच अज्ञान. अज्ञान सोडून ज्ञानाचा मार्ग धर बच्चा तुझे कल्याण होईल म्हणत स्वामीजी पुन्हा ध्यानमग्न झाले.  





Sunday, June 28, 2020

प्राचीन ज्ञानाचे पुनरुत्थान (डिजिटलीकरण) आणि प्रकाशन - पतंजलिचे महत्वपूर्ण योगदान



भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. या हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली.  तरीही कालप्रवाहात लाखो  ताडपत्री पाण्डूलिपी निश्चित जिवंत राहल्या असतील.  देशाला स्वतंत्रता मिळाली. पण दुर्भाग्य असेकि गुलामी मानसिकता असलेल्या काळ्या साहेबांचे राज्य भारतात आले. आपल्या प्राचीन ज्ञानाविषयी त्यांच्या मनात आदर कमीच.  विदेशी आक्रांतान्पासून आपले ज्ञान काही प्रमाणात वाचले पण काळ तर सर्वच नष्ट करणारा असतो. जीर्णशीर्ण पाण्डूलिपी किती काळ जिवंत राहणार. आपल्या सरकारी तंत्राने हि भारताचे प्राचीन ज्ञान सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले आहे. पण सरकारी तंत्राचीहि  'दिनभर चलेअढाई कोस' वाली  गत असते.


आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात डिजिटल स्वरूपात प्राचीन ज्ञान सुरक्षित केले जाऊ शकते. पण ते करणे अचाट मेहनतीचे कार्य आहे.  पाण्डूलिपी कुणापाशी आहेत त्याची माहिती मिळविणे. त्यांच्या पर्यंत कसे पोहचायचे. त्यांची परवानगी घेऊन, त्या जीर्णशीर्ण ताडपत्री पुस्तकांना दुरुस्त करणे. त्यासाठी भाषा विशेषज्ञ आणि दुरुस्ती कार्य करणाऱ्या तकनिकी लोकांची गरज.  त्यानंतर पांडूलिपींचे डिजिटलीकरण करणे आणि शेवटी त्यांना सुरक्षित ठेवणे.  ज्यांनी परत मागितली त्यांना परत करणे.  दुर्लभ आणि मूल्यवान ग्रंथांचे प्रकाशत करून प्राचीन ज्ञान जनतेसमोर आणणे, इत्यादी. ह्या सर्व कार्यांत   हजारो लोकांच्या अचाट मेहनत शिवाय,  वेळ आणि धनाचीहि गरज लागते. शिवाय गुलाम मानसिकता असलेले सरकारी तंत्र किंवा जनताहि तुमच्या कार्याचा गौरव करणार नाही. मीडियाही तुमच्या कार्याची माहिती जनतेला  देणार नाही. तरीही एका व्यक्तीने हे कार्य करण्याचा विडा उचलला.


त्रेता युगात महर्षी विश्वामित्र यांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. इंद्राचे सिंहासनहि  गदागदा हालविलें होते. या कलयुगातहि बहुतेक त्यांचाच अवतार स्वामी रामदेवच्या रूपाने भारतात प्रगट झाला असावा हें मला नेहमीच वाटते.  गुरुकुलात वेद शास्त्र संपन्न होऊन, हिमालयात तपस्या करून, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने भारताला पुन्हा उन्नतीच्या शिखरावर पोहचविणे हे त्यांचे स्वप्न. फूडपार्क पासून होणार २ टक्के नफा फक्त देशसेवेसाठी वापरायचा हा त्यांचा संकल्प.त्यात हि ७० टक्के फक्त रिसर्च आणि अनुसंधानावर. 
स्वामी रामदेवांनी कार्य हातात घेतले आणि मोठ्या प्रमाणावर हे कार्य करण्याचा निश्चय केला. आचार्य बाळकृष्णच्या नेतृत्वाखाली पतंजली युनिव्हर्सिटी आणि त्यांना मदत करणारे हजारो सहयोगी या कार्यात गुंतले. कुणालाही आश्चर्य वाटेल एवढे अचाट कार्य  ६० हजारच्यावर पाण्डूलिपी ज्यात ५० हजारांच्यार ताडपत्री स्वरूपात.  तब्बल १९ विषय - अलंकार शास्त्र, आयुर्वेद, ब्राम्हण ग्रंथ, दर्शन, धार्मिक ग्रंथ, ज्योतिष, काव्य, कोश, मंत्र, नीती ग्रंथ, पाकशास्त्र, पुराण, संस्कृत-साहीत्य, स्त्रोत्र, तंत्र, उपनिषद, वेद, व्रत, व्याकरण इत्यादी.  १४ भाषा- देवनागरी, शारदा, श्री, गुरुमुखी, फारसी, संस्कृत, उर्दू, बंगाली, मल्याळी, मराठी, नेपाली, ओडीया,तमिळ तेलगु. २६ लाखांहून जास्त पाने.

आता विचार करा  या अफाट कार्यासाठी हजारो  लोकांशी/ संस्थांशी  संपर्क करावा लागला असेल. अनेक भाषाविदांची मदत घ्यावी लागली. या पवित्र कार्यासाठी अधिकांशी विद्वानांनी कसले हि मानधन घेतले नाही. पण त्यांच्या येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च तर होताच.  शिवाय  पगारी कर्मचार्यांची फौजहि.  या कार्यातहि सरकारी तंत्र नेहमीप्रमाणे  उदासीन होता.  आमच्या जवळ असलेले प्राचीन  साहित्य तुम्हाला डीजीटलीकारण साठी काही काळासाठीहि देणार नाही आणि  हे वेगळे आम्ही केंव्हा करू, आमचे आम्हालाच माहित नसते. असो. 


डिजिटलीकरण नंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पुस्तकांचे प्रकाशन. इथेहि समस्या होती.  एक-एक पुस्तकाच्या अनेक पाण्डूलिपी आणि पाठभेद.  विद्वानांच्या मदतीने प्रामाणिक प्रती तैयार करून एव्हढ्या कमी कालावधीत अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित केले. त्यांची नावे- सिद्धसार - संहिता (रविगुप्त- विरचित), योगशत्तम (अमितप्रभ्यम् - विरचित), योगशास्त्र-वैद्यवल्लभ (रुपनयन - विरचित), आयुर्वेद-महोदधी/ सुषेण-निघन्टु (सुषेण वैद्य- विरचित), भोजनकह्तुलम् (रघुनाथ सुरी -विरचित), अजीर्णमर्त मंजरी (काशिनाथ-विरचित), रुचिवधु- गल्- रत्नमाला (परप्रणव - विरचित), हरमेखला (मधुक-विरचित), योगरत्न समुच्चय (चंद्रात- विरचित), वैद्यशतश्लोकी (अवधान सरस्वती- विरचित), चंद्र निघन्टु/ मदनादी-निघन्टु (चंद्रनंदन-विरचित), हृद्यदीपक-निघन्टु (भोपदेव विरचित), राज- निघन्टु/ सोढलनिघन्टु (सोढल विरचित), मदनपाल -निघन्टु (नृप मदनपाल-विरचित), वैद्य प्रसारकम् (वैद्य गदाधर-विरचित ).

हे कार्य सतत चालणारे कार्य आहे. काळात विस्मृत झालेले ज्ञान विज्ञानाची पुस्तक रुपी रत्ने एका महाऋषीच्या प्रयत्नाने पुन्हा प्रगट होणार आहेत.  आपण त्यांच्या कार्याचा गौरव तर करीत नाही. पण इथल्या आसुरी प्रवृत्ती  मात्र पूर्ण शक्तीने त्यांच्यावर प्रहार करीत आहे.  या काळात आपले काय कर्तव्य आहे, हे आपल्याला कळले पाहिजे. असो.  खालील लिंकच्या  आणि आस्थावर या संबंधात पाहिलेल्या कार्यक्रमाच्या आधारावर हा लेख आहे.

https://www.patanjaliresearchinstitute.com/ayurvedic_manuscripts.php#










Saturday, June 27, 2020

काही गूढ क्षणिका


लांडग्याची मैत्री केली
शेतकऱ्याला मारले
कुंपणाने असे
शेतच खाल्ले.

अमृताचे कुंभ
सागरात फेकले
देवांना चषकात
हलाहल पाजले.

 "मायेच्या" पोटी
प्रजेशी फितुरी
मढयांवर त्याने
लोणी खाल्ले.

नागाने मणी
बेडुकाला दिली
बदल्यात त्याची
पिल्ले खाल्ली.

Monday, June 22, 2020

काही क्षणिका: मुखौटे


सत्याचा मुखौटा
चेहऱ्यावर लावला
असत्याचा प्रचार
जोमाने केला.

मुखौटाच्या मागे
अर्जुन लपला
विजय धर्माचा
रणी जाहला.

मुखौट्यांचा स्टॉक 
सदा जवळ बाळगा
कोठी, गाडी आणि पैका 
मुखौट्यांची सारी कृपा.

मुखौटा देवा
कलयुगाचा त्राता
वाहुनी तुळस - दूर्वा 
पूजा तयाची करा.

Saturday, June 20, 2020

सूर्यग्रहण: सावल्या - सावल्यातील अंतर


हिमाचलच्या लोकांशी घरोबा झाल्यामुळे हिमाचलच्या वारी होतच राहतात. असेच एका लग्नाला गेलो होतो.  मंडी जिल्ह्यात लोकांची घरे मोठी अर्थात १० ते २० खोल्यांची असतातच. लग्नकार्य घरातच होतात. लग्नकार्याच्या विधी दिवसभर चालणारे असल्यामुळे गप्पांच्या मैफिलसाठी भरपूर वेळ मिळतो. सहज सूर्यग्रहण हा विषय निघाला. एका सज्जन धार्मिक इंजिनिअर महोदयांनी सूर्यग्रहणाचा एक किस्सा सांगितला. हिवाळ्याचे दिवस होते. त्यांचे एक मराठी मित्र घरी आले होते.  शिक्षित आणि विज्ञानवादी विचारधारेचे मराठी सज्जन अंधश्रद्धा मूर्खमिलन समितीचे चाहतेही होते. बाहेर भयंकर थंडी असल्यामुळे बैठीकीच्या खोलीत फायर बॉक्समध्ये लाकडे जळत होती समोर १२ फूट दूर सोफ्यावर बसून  गप्पा मारताना सूर्यग्रहण हा विषय निघाला. विज्ञानवादी मित्र म्हणाले चंद्राची सावली आणि वादळाची सावली काहीच फरक नसतो. चंद्राच्या सावलीचा काहीही दुष्प्रभाव पडत नाही. इंजिनिअर सज्जन म्हणाले फरक असतो आत्ताच सिद्धकरून दाखवतो. त्यांनीं  एक ताट आणि एक छोटी वाटी मागवली. ताट फायरबॉक्सच्या समोर अश्यारितीने धरले की ताटाची सावली मित्राच्या अंगावर पडली. मित्राला विचारले काही फरक पडला का? मित्र म्हणाला हो, ताटाने उष्मा रोखल्यामुळे थोडी थंडी जाणवते आहे.  इंजिनीयर महोदयाने  छोटी वाटी मित्राला देत म्हंटले वादळाची पण सावली असते. वादळ जास्तीतजास्त पृथ्वीपासून दहा-बारा किलोमीटर उंचीवर असते. चंद्राच्या मानेने फारच जवळ. ही वाटी म्हणजे वादळ. आता वाटीला पोटाशी धरून ठेव आणि सांग काय फरक पडतो. मित्र म्हणाला काहीही फरक पडणार नाही.  इंजिनीयर महोदय विजयी मुद्रेने म्हणाले हा फरक सूर्यग्रहण आणि वादळाच्या सावलीतला आहे. एका मराठी माणसाची कशी जिरवली हा भाव ही त्यांच्या मुद्रेत दिसत होता. 

दोन वर्षांपूर्वी मला पँक्रियाचा टीबी  झाला. गंगाराम हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आशिष  कडून ट्रीटमेंट घेत होतो. एक दिवस त्यांना विचारले माझ्या घरी आणि कार्यालयातील ही स्वच्छता आहे. मी बाहेरचेही जास्त खात नाही तरीही मला टीबी का झाली? ते म्हणाले वातावरणात लाखो वायरस नेहमीच असतात. भारतासारख्या देशात तर टीबीसहित अनेक रोगांचे जीवाणू ही वातावरणमध्ये असतात. शरीराची प्रतिकारशक्ती त्यांच्याशी सदैव युद्ध करत राहते. काही क्षणांसाठी ही एखाद्या रोगणुप्रति ती कमी झाली की लगेच तो रोगाणु शरीरात वाढू लागतो. हे असेच आहे, जसे क्षणभराच्या नजरचुकीने एखादा आतंकवादी देशात घुसतो. सर्च ऑपरेशन करून त्याचा नायनाट करावा लागतो.  तसे न केल्यास देशात बॉम्बस्फोट इत्यादी होतात आणि लोकांचा जीव जातो.  तुम्हाला ही दहा बारा दिवस आणखीन उशीर झाला असता तर...असो.

वादळ वातावरणात आपल्या जवळ असतात. सूर्याच्या जीवनदायी किरणांना रोखण्याची क्षमता त्यात नसते. पण अंतरीक्षात विचरण करणाऱ्या पृथ्वीपासून लाखो किमी दूर असलेल्या चंद्रमामध्ये निश्चित असते त्यामुळे वादळांच्या आणि चंद्रमाच्या सावली फरक असतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर न जाणे योग्य. हे असेच आहे, जसे कारोनाच्या बचावासाठी गर्भवती स्त्री, वृद्ध आणि रोगी माणसांना घरात बसण्याचा सल्ला दिला गेला आहे. बाकी अंधश्रद्धा मूर्खमिलन बाबत काही न बोलणे योग्य.




Friday, June 12, 2020

साने गुरुजी आणि मी

आज साने गुरुजींची पुण्यतिथि. आजच्या दिवशी अर्थात 11 जून 1950 रोजी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती. बहुतेक गणपती उत्सवात श्यामची आई हा सिनेमा पाहिला होता आणि सिनेमा पाहताना ढसाढसा रडलोही होतो. साने गुरुजी कोण त्याबाबत प्रथम माहिती आईकडून मिळाली. पण एक प्रश्न मनात सतत घोंगावत होता एवढ्या मोठ्या माणसाने आत्महत्या का केली? त्याचे कारण काय असावे? दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही  नागपूरला जायचो. काका एका वृत्तपत्रात संपादक होते. नागपूर आणि विदर्भात प्रकाशित होणाऱ्या अधिकांश हिंदी पुस्तकांचे संपादनही ते करायचे. त्यासाठी राष्ट्रपती कलामच्या हातून राष्ट्रपती भवनात त्यांचा गौरवही झाला होता. नागपूरला काकांच्या घरी एक मोठी लायब्ररी होती. किमान दोन-तीन हजार पुस्तके तरी होती. बहुतेक त्यावेळी मी तेरा-चौदा वर्षांचा होतो. वाचण्याची आवडही होती. साने गुरुजींचे जीवन चरित्र वाचले. लहानपणीच वडिल गेले नंतर आई. अनेक कष्ट सहत सानेे गुरुजींनी शिक्षण पूर्ण केले. ते एमए झाले. शाळेत शिक्षकाची नोकरी केली. १९३० मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले. त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता विरोधात लढा दिला. राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. साधना साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. खडतर मार्गाने आयुष्याचा प्रवास करणारा व्यक्ती आत्महत्या करतो हे कधीच मनाला पटले नव्हते. एक दिवस काकांना हाच प्रश्न विचारला. ते म्हणाले साने गुरुजी कवी होते. भावनाप्रधान होते. देशाला स्वात्यंत्र मिळतात देश बदलेल असे त्यांना वाटत असावे. माणसाचे आयुष्य १०० वर्ष असेल तर राष्ट्राचे हजारो वर्ष असते. जे बदल माणसाच्या आयुष्यात एका वर्षात होतात त्या बदलांसाठी राष्ट्राला १०० वर्ष ही अपुरे पडतील. एकच उद्दीष्ट मनात ठेऊन अनेक पिढ्यांना खपावे लागते. देश स्वतंत्र झाला. भारतीय नेते सत्ताधीश झाले. सत्ता टिकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्वांचा उपयोग करावा लागतो. या सदा  चालत आलेल्या मार्गावर आजचे सत्ताधीश ही चालणारच. स्वतंत्रता मिळाली. देशात लाखो लोक दंगलीत मारल्या गेले.  महात्मा गांधींची हत्या झाली,. महाराष्ट्रात जतिगत घृणेचे राजकारण फोफावले. बहुतेक कवी हृदयाने पाहिलेले स्वप्न धुळीत मिळाले.  सत्याचा मार्ग काटेरी असतो त्यावर विपरीत परिस्थितीतही सतत चालणे प्रत्येकाला जमत नाही. काही सत्य मार्गाचा त्याग करतात. काही परिस्थितीशी समाझौता करत नाही अर्ध्यावरच प्राण सोडतात. काही विरलेच संघर्षाची ज्योत सतत तेवित ठेवतात.  निराश होऊन साने गुरुजींनी अर्ध्या रस्त्यावरच प्राण ठेवलेेेे. शेवटी काका म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत निराश व्हायचं नाही हे त्यांचे चरित्र वाचून शिकले पाहिजे.

Wednesday, June 10, 2020

मुखवटे


रंगमंचावर नाचती 
मुखवटे तालावर
सरड्याच्या.

मुखवट्या विना
न चाले व्यवहार
जगाचा.

हरवला मुखवटा
आरशात दिसला
चेहरा राक्षसाचा.







Saturday, May 30, 2020

ब्रम्हांडाचे टोक

ब्रम्हांडाचे टोक
शोधायला निघालो
ब्लॅकहोलच्या जाळ्यात
अलगद अटकलो.

सकाळी उठणे
रात्री झोपणे
दिवसभर सारे
पोटासाठी खटने.

ब्रम्हांडाचे टोक
शोधायचे कसे
टाईम मशीन फिरते
गोल गोल गोल.

वर्तुळाचे टोक
सापडले ज्याला
त्यालाच सापडेल
ब्रम्हांडाचे टोक.

Saturday, May 23, 2020

पंतप्रधानांच्या विजयाची मुख्य कारणे


गेल्यावर्षी आजच्या दिवशी अर्थात 23 मई २०19 ला लोकसभा निवडणुकीचे परिणाम आले. अनेक मराठी आणि भारतीय प्रसार माध्यमातील दिग्गजांनी त्यांच्या विजयाचे विश्लेषण केले. गेली काही दिवस त्यांचे अध्ययन केले. अधिकांश दिग्गजांच्यामते गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था बुडाली, शेतकरी त्रस्त होते, तरीही फक्त बालाकोट आणि आणि मतांच्या ध्रुवीकरणमुळे पंतप्रधान पुन्हा निवडून आले. असे विश्लेषण ऐकून/ वाचून हसावे की रडावे काहीच कळत नव्हते. बहुतेक दावणीला बांधले असल्यामुळे विचारशक्ती हरवलेल्या दिग्गजांना लोकांनी जातीपातीचे बंधन झुगारून  पंतप्रधान मोदींना पुन्हा निवडून दिले हे समजले नसावे. 

जनतेने पंतप्रधानांना पुन्हा निवडून दिले त्याचे खरी कारणे:
१. जनधन खाते आणि नोट बंदी: देशात बॅंकांचे सरकारी करण १९६९ झाले असले तरी देशातील बहुसंख्य गरीब आणि निम्न वर्गीय जनते जवळ बँक खाते नव्हते. बहुतेक बँकेत पाय ठेवणे ही त्यांना जमत नव्हते. घरात पैसा साठवणे कधीच कुणाला जमत नाही. त्यामुळे अडचणीच्या वेळी सावकारांकडून शंभर रुपयांवर पाच रुपये महिना व्याजाने कर्ज घ्यावे लागायचे. दिल्लीत हाच रेट होता. अश्या पस्तीस कोटीहून जास्त गरिबांना बँक खाते मिळाले. त्यांनाही बचतीची सवय लागली. त्यानंतर नोट बंदी आली. गरिबांच्या दृष्टीने नोट बंदी म्हणजे बिना मेहनतीची कमाई. दुसऱ्यांचे नोट बदलून, खात्यात ४९००० ते २.५० लाख दुसऱ्यांचे ठेऊन कोट्यावधी गरिबांनी  लाख  कोटींची कमाई  कमीतकमी केली असावी. त्यांच्या मनात आपले पंतप्रधान इमानदार आहेत आणि चोरांवर कडक कारवाई करीत आहे ही धारणा पक्की झाली आणि एक मोठा व्होट बँक ही पक्का झाला.

२. मोठे होणारे रस्ते आणि रेल्वे स्टेशन: आपल्या देशात कोट्यवधी लोक रोज प्रवास करतात. वेगात होणारे रस्त्यांचे रुंदीकरण डोळ्यांनी जनतेला स्पष्ट दिसले. आधुनिक झालेले रेल्वे स्टेशन, स्वचलीत पायऱ्या, नवीन डब्बे, हे सर्व लोकांच्या नजरेत भरणारच आणि व्होट बँक वर ही परिणाम होणारच.

३. घरोघरी संडास:. ही मोहीम जोरदार रीतीने राबवून संडास बांधल्या गेले. याचा परिणाम ग्रामीण जनतेवर विशेषकरून महिलांवर झालाच.

४. उज्ज्वला योजनेमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात घरोघरी वीज पोहचली. विजेच्या उत्पादनात अभूतपूर्व वृध्दी झाल्याने खेड्यापाड्यात ही दिवसभर वीस दिसू लागली. २०14 च्या पूर्वी मेरठ जवळच्या गावात एका मित्राकडे गेलो होतो. गावात प्रत्येकाच्या घरी डिझेल जनरेटर होते. कारण दिवसातून चार तास ही वीज रहायची नाही. पण पाच वर्षांत परिस्थिती बदलली. त्याचाही मोठा परिणाम व्होट बँक वर झाला.

५.  या शिवाय गरिबांसाठी घरे, मुद्रा योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान, आयुष्मान योजना, स्वस्त औषधांची दुकाने, इत्यादी योजनांचा परिणाम ही व्होट बँक वर बऱ्यापैकी परिणाम झालाच.

स्वतंत्रता प्राप्तीनंतर प्रथमच सामान्य गरीब जनतेला त्यांच्या गरजेनुसार सरकारी योजनांचा लाभ मिळाला. हेच पंतप्रधान मोदींच्या विजयाचे खरी कारण होते.

Tuesday, May 19, 2020


रायसीना पर्वतावर स्थित सचिवालयाची ईमारत. एका हॉलमध्ये सहा अधिकाऱ्यांच्या स्टाफची बसण्याची व्यवस्था. एक उंचपुरा तडफदार व्यक्तित्वाचा धनी अत्यंत मृदुभाषी, माधुरी दीक्षित सारखे मोठे-मोठे डोळे गोल-गोल फिरवण्याची कला अवगत असलेला, अनेकांना  आपल्या विशाल ह्रुदयात समावून घेणारा. सहाजिकच होते माझ्या बिरादर पीए बंधूंनी त्याचे नाव किशन कन्हैया ठेवले होते. स्टाफ मध्ये  मी  पीए, एक स्टेनो, एक नुकताच सरकारी नोकरीत जॉईन झालेला सिंगल हड्डी क्लार्क आणि सरकारी नोकरीत मुरलेला डेव्हिड नावाचा शिपाई होतो. अधिकांश आईएएस अधिकाऱ्यांमध्ये नसलेला दुर्मिळ गुण म्हणजे सकाळी ९च्या आधी कार्यालयात उपस्थित होणे त्याचा अंगी होता. त्याकाळी कम्प्युटर आले असले तरी कटिंग आणि पेस्टिंगचा जमाना आला नव्हता. भरपूर डिक्टेशन आणि टंकनचे कार्य करावे लागायचे. साहेबांची एक सवय होती, मला आणि स्टेनोला ते गुरु, गुरुओं  म्हणून संबोधित करायचे आणि नेहमी कोड्यात बोलायचे. अधिकांश वेळी ते तारीफ करत आहे की समज देत आहे, हे कळायचे नाही. 

त्या दिवशी सकाळी येताच साहेबांनी टेलिफोनचा बजर दिला. "पटाईत, स्टेनो आणि शिपाई सोबत आत ये. आम्ही साहेबाच्या रूममध्ये आत शिरताच साहेब  म्हणाले " गुरुओं, माझा एक म्हातारा हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला रक्ताची तहान लागली आहे. आज सकाळीच मी आणि माझ्या बायकोने त्याच्या चरणी रक्त अर्पित केले आहे. प्रसंगावधान असलेला डेव्हिड लगेच उतरला, सर, मुझे बीपी की प्रॉब्लेम हैं.  साहेब आमच्याकडे पहात करड्या आवाजात म्हणाले, तुम्हालाही काही समस्या असेल तर बोला. आम्ही "नाही" असे उत्तर दिले. मग ठीक आहे खाली कार उभी आहे, लगेच निघावे लागेल.  स्टेनो लगेच म्हणाला, सर मैने पहले कभी खून नहीं दिया. साहेब उतरले, ठीक आहे, तू हॉस्पिटल मधून सरळ घरी जाऊ शकतो. पटाईत, तुला परत यावे लागेल. आज भरपूर काम आहे. काही चारा नव्हता, रक्तदान केल्या शिवाय.

हॉस्पिटलमध्ये रक्तदान केल्यानंतर स्टेनो बाहेर पडला. बाहेर पडताच त्याने एक मोठा गिलास ज्यूस आणि सहा केळे  पोटात जिरवले. घरी गेल्यावर रक्तदान केल्याची माहिती त्याच्या माऊलीला दिली.  माऊलीचे प्रेम उतू गेले. काजू, बादाम घालून देसी तुपात केलेला शिरा त्याला खाऊ घातला. रात्री झोपण्यापूर्वी त्याने किलोभर दूध ही पोटात जिरवले. परिणाम पुढे दोन तीन दिवस तो सुट्टीवर राहिला.

मी कार्यालयात परतलो. बहुतेक पंधरा-वीस पाने त्या दिवशी टंकावे लागले. साहेब लवकर निघाले तरीही कार्य पूर्ण करता-करता रात्रीचे आठ वाजले. घरी निघायची तैयारी करत असताना,  सुनील म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, कुणाशी तरी बोलत होता मला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात. "आजकाल आपल्या सारख्यांना नौकरी करणे मुश्कील झाले आहे. बहुधा नौकरी सोडावी लागेल ...  अरे, इथे मोठे-मोठे तेलू आहेत. आपल्या जवळ तर पामोलिन ही नाही. ... अरे, अमूल मक्खन नाही रे.  त्यावर पाय घसरून पडलेल्या साहेबाला उचलणे शक्य नाही. तुझ्या बुध्दीच्या पलीकडचे आहे.. .. मीच सांगतो, वीआयपी येतात ना! त्यांच्या स्वागतार्थ  जमिनीवर लाल गालिचा अंथरला जातो. तू पटाईतला ओळखतो, अरे, तोच किशन कन्हैयाचा पीए. त्यानी साहेबाच्या चरणी स्वतःच्या रक्ताचा गालिचा अंथरला. .. काय म्हणाला, फेकतो आहे. विश्वास नसेल तर त्या हरामखोराला विचारून खात्री करून घे. उद्या जगाला कळले तर बाकी साहेबही त्यांच्या स्टाफला हलाल करून त्यांच्या शरीरातील रक्त काढून घेतील. .. काय म्हणतो, या नालायकांना  जांभळाच्या झाडांवर उलटे टांगले पाहिजे. अरे, तो पटाईत माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत आहे, ठेवतो फोन." माझ्याकडे पाहत सुनील म्हणाला "एैसे  क्यों देख रहा है, कुछ ग़लत कहा क्या मैंने". मी उतरलो, निघण्यापूर्वी तुला गुड नाईट करण्यासाठी थांबलो होतो. मी निघतो, तू बैस तुझ्या साहेबाच्या खिश्यात रात्री दहा वाजे पर्यंत. 
त्याकाळी मेट्रो नव्हती. उत्तम नगरची बस घेण्यासाठी रकाबगंज गुरुद्वारा पर्यंत पायी चालत जावे लागे. १५ मिनिटे लागायचे. चालताना मनात विचार आला पुढील दोन-तीन दिवसांत रायसीना पर्वतापासून ते इंडियागेट पर्यंत पसरलेल्या इमारंती स्थित सर्व बिरादर बंधूपर्यंत ही बातमी पोचणार. येणाऱ्या दिवसांत अनेक अवघड प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतील. एकदाचा बस स्टँड वर पोहचलो. नेहमीप्रमाणेच बस ही खच्च भरलेली होती. दीड तासाचा प्रवास उभे राहून करावा लागला. प्रवासा दरम्यान डोक्यात चक्कर येऊ लागली आणि डोळ्यांसमोर अंधारी.  कसाबसा बस स्टैंड वर उतरलो आणि रिक्षा घेतली. घराच्या गल्लीच्या कोपऱ्यात रिक्षातून उतरलो. जर रिक्षा घरापर्यंत नेली असता तर  सौ.च्या  प्रश्नांना उत्तर देणे अवघड झाले असते. कारण बस स्टँड पासून मी  नेहमी पायीच घरी येत असे. रात्रीचे दहा वाजले होते. दोन्ही पोरे नुकतीच  झोपली होती. बाबांची  घरी येण्याची वेळ निश्चित नसल्याने माझी वाट पहाणे त्यांनी सोडून दिले होते. हातपाय धुऊन जेवायला बसलो. डोक्यात चक्कर येत असताना ही चेहऱ्यावर ते दिसू दिले नाही. जेवून सरळ बिछान्यावर पडलो. रात्री सौ.ने लाडात येऊन अंगावर हात टाकला. तिचा हात दूर सारून, तिच्याकडे पाठ  केली. पुढे अनेक दिवस ती कोप भवनात होती. शेवटी तिला सत्य सांगावे लागले. बाकी काहीही असो, त्या वर्षी सीआर मात्र सर्वोत्तम मिळाली होती. सुनीलच्या मते,  सर्वोत्तम शब्द लिहिण्यासाठी साहेबांनी शाईच्या जागी रक्त वापरले होते. पुढे अनेक वर्ष ही कथा रायसीना पर्वतावर गाजत वाजत राहिली.



Sunday, May 17, 2020

बाबूनामा: पीएची नौकरी


साहेबांच्या आदेश म्हणजे 
काळया दगडावरची रेख.
साहेबांना जे जमत नाही 
पीएला  ते सहज जमते.
पीएच्या शब्दकोशात
असंभव हा शब्दच नसतो.

वीज पाण्याची बिले 
घरचा सगरा किराणा 
साहेबांच्या कुत्र्याचा 
रोजचा मोर्निंग वाक.
पीएच्या सरकारी
नोकरीचाच एक भाग.

साहेबांच्या म्हातारीने
मागितले रक्ताचे दान
पीएने स्वखुशीने केले रक्त
माऊलीच्या चरणी अर्पित.

साहेबांच्या लेकीचे
लफडे होते भारी
परीक्षेला सोबत तिच्या
बॉडीगार्ड पीए गेला.

मॅडम होती एकटी
रात्र पाळीची ड्युटी केली
बायको सोबत तलाकची
पाळी पीएवर आली.

विवेक पटाईत

टीप:. पीएच्या नोकरीची थोडी कल्पना आली असेल. रक्ताने लिहलेल्या सीआरची कथा पुढे.


Friday, May 15, 2020

प्रतिबिंब


जन्मोजन्मीची प्रेयसी आहे तू माझी. तुझ्याशिवाय मी जगू शकतच नाही. एवढे प्रेम आहे माझे तुझ्यावर. लव यू म्हणत त्याने फोन ठेवला.
 "हा! हा! हा!  आरस्यातील प्रतिबिंब खदाखदा हसले. किती खोट बोलतोस रे,  नीच राक्षसा.  किती पोरींचे आयुष्य  उध्वस्त करणार?" 
तुला मध्ये नाक खुपसायला कुणी सांगितले, गप्प बैस.
"नराधमा,तुझे खरे स्वरूप  दाखविणे माझा स्वभावच आहे."  
सत्यवादी हरिश्चंद्रा, तुझी बडबड माझ्या सहनशक्तीच्या बाहेर झाली आहे. आता तुझा इलाज करावाच लागेल. खट्टाक! क्षणार्धात तुकडे-तुकडे झाले प्रतिबिंब. त्याने खाली पाहिले.  रक्ताच्या थारोळ्यात पहुडलेला होता त्याच्यातील  माणूस.


Wednesday, April 15, 2020

लघुकथा: चांद सा चेहरा


 
बबल्या:  चांद सी महबूबा हो मेरी ऐसा मैंने सोचा था... ए बबली, लॉकडाऊन संपले. आता तरी तुझ्या चेहऱ्यावरचा मास्क काढ. पाहू दे मला एकदाचा, तुझा चंद्रासारखा चेहरा.

बबली: तोंडावरचा मास्क काढत, बघ बबल्या एकदम सेम टु सेम आहे, अगदी चंद्रासारखा.

बबल्याने तिच्या ओबड-धोबड चेहऱ्याकडे बघितले आणि नंतर पूनवेच्या चंद्रमाकडे. खरंच सेम टु सेम चंद्रमा सारखाच, बबल्या मनातल्या  मनात पुटपुटला. 

आता तो एकांतात गातो - चांद सी महबूबा हो मेरी ऐसा मैंने कायको सोचा था.  

Friday, April 10, 2020

कारल्याची भाजी

कारल्याची भाजी माझी अत्यंत आवडती भाजी. कोवळे कारले दिसले की मला भाजी करण्याचा हुरूप येतो. कारल्याची भाजी म्हणजे कडू, गोड, तिखट आणि आंबट स्वादाचा अप्रतिम अनुभव. 

काल सौ.ने एक पाव कारले विकत घेतले. कारले मस्त व कोवळे होते. मी आधी कारले गोल-गोल पातळ चिरले बटाटे चिप्स सारखे. कापताना कारल्याच्या बिया वेगळ्या होतात त्या मी फेकत नाही.  भाजीत या बिया खाताना मस्त करकर असा आवाज येतो. मजा येते. 

गॅस वर कढई ठेवून त्यात दोन मोठे चमचे तेल टाकले. ही भाजी तेलातच जास्त स्वादिष्ट बनते. तेल गरम झाल्यावर एक चमचा मोहरी टाकली. मोहरी फुटल्यावर गॅस हळू करून त्यात स्वादानुसार तिखट आणि हळद टाकून लगेच कारले त्यात घातले. अशाने हळद आणि तिखट जळत नाही. कढईवर झाकण ठेवले. दर दोन मिनिटांनी झाकण काढून, कारले परतून घेतले. अशाने कारले जळणार नाही. सात-आठ मिनिटांनी भाजी तेल सोडू लागेल. मग भाजीत स्वादानुसार आंबट, गूळ, धने पावडर आणि मीठ टाकून भाजी परतून घेतली. पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेऊन वाफ काढली. नेहमी प्रमाणे भाजी मस्त झाली होती.

Monday, March 30, 2020

राजा बळी आणि वामनाची नवीन कथा



त्रिलोक विजयी बळीराजाने नर्मदा तटावर स्थित महिष्मती नगरीत राजसूय यज्ञ करण्याचे ठरविले. महिष्मती नगरीला कुंभ मेळ्याचे स्वरूप आले होते. देवराज इंद्र सहित सर्व अधीनस्थ राजे-महाराजे यज्ञाला उपस्थित होते. हजारो व्यापारी, कलाकार, ब्राम्हण आणि हजारो प्रजाजन ही तिथे उपस्थित होते. लाखो लोकांसाठी नगरीत राहण्याची, खाण्या पिण्याची आणि मनोरंजनाची सोय करण्यासाठी मोठ्याप्रमाणात जंगल तोडले गेले. राजे- महाराजांसाठी आखेटची व्यवस्थाही केली होती. मनोरंजन आणि भोजनासाठी हजारो वन्य प्राण्यांची शिकार सुरू होती. यज्ञात ही मोठ्याप्रमाणात निरीह जनावरांची बळी दिली जात होती.

एक दिवस रात्री शयनकक्षात झोपण्याची तयारी करत असताना राजा बळीला एक आवाज ऐकू आला. महाराज, मला अभय द्या, माझी रक्षा करा. राजा बळीने इकडे-तिकडे बघितले कक्षात कुणीच दिसले नाही. राजा बळी म्हणाला हे अदृश्य आत्मा प्रगट हो, भिऊ नको, तुला अभय आहे. पुन्हा आवाज आला महाराज मी प्रगट आहे. मी वामन आहे. तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही एवढा सुष्म आहे. मी नर्मदेच्या वन्य प्रदेशात जनावरांच्या शरीरात राहणारा. पण तुमच्या सैनिकांनी आणि इथे जमलेल्या अतिथींनी हजारो जनावरांची शिकार केली. आता मला राहायला जागा उरली नाही. मानवी शरीरात मला जागा मिळाली तर मी सुरक्षित राहील. मानवी शरीरात हजारो जिवाणू राहतात. मीही त्यापैकी एक बनून राहील. बळीराजाने तथास्तु म्हटले. 

वामनाने महिष्मती नगरात त्यावेळी उपस्थित हजारो लोकांच्या शरीरात प्रवेश केला. काही दिवसांतच राजे- महाराजे सहित हजारो लोक ज्वरग्रस्त  झाले.  हजारो मृत्यूमुखी पडले. यज्ञ अर्धवट राहिला. लोक आपापल्या देशी परतले त्यांच्या सोबत वामन ही. महिष्मती नगरी ओसाड पडली त्रिलोक विजयी बळीराजाला एका सुष्म वामनाने पराजित केले होते. जीवाच्या भीतीने बळीराजा ही महिष्मती नगरी सोडून दूर दक्षिणेत पाताळात जाऊन लपला. 

Thursday, March 26, 2020

नूतन वर्ष: बटाट्याची भाजी ( नवी स्टाईल)


आज आज गुढीपाडवा नव्या वर्षाचा पहिला दिवस.  घरीच असल्यामुळे सौ. ला  मदत करण्याचा निश्‍चय केला. सौने बटाट्याची भाजी बनविण्याचे कार्य दिले. अर्धा किलो बटाटे आधी कुकर मध्ये उकडून घेतले. बटाटे सोलून बटाट्याचे चार ते सहा तुकडे केले. कढई गॅसवर ठेवली. दोन चमचे साजूक तूप त्यात घातले. तूप गरम झाल्यावर गॅस स्लो केला. नंतर अर्धा चमचा जिरे, एक चमचा तीळ,अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचे तिखट टाकले. नंतर त्यात बटाटे परतून घेतले. त्यानंतर स्वादानुसार मीठ आणि आमसूल टाकले व पुन्हा बटाटे परतले. नंतर झाकण ठेऊन दोन मिनिट वाफ काढून घेतली. स्वादिष्ट भाजी,श्रीखंड पुरी सोबत खाताना मजा आली.

Tuesday, March 24, 2020

केरम क्रिकेट

केरम क्रिकेट
ह्या खेळाचा आविष्कार मी आहे. खेळ सौपा आहे. 
 नियम:
केरम बोर्ड वर गोट्या केरम खेळ्या सारख्या लावाव्या.
ह्या खेळात प्रत्येक खेळाडू  ११ वेळा गोट्या घेण्याचा प्रयत्न करेल.  
पांढऱ्या गोट्या घ्यायच्या आहेत. 
साहजिकच काळया गोट्या क्षेत्र रक्षणाचे कार्य करतील. प्रत्येक पांढरी गोटी साठी ५० रन आणि लाल गोटी अर्थात राणी साठी शंभर रन. 
पण जर स्ट्रायकर पहिले काळया गोटीला लागला तर २० रन कमी होतील. 
जर काळी गोटी आत गेली तर ५० रन कमी होतील. 
११ प्रयत्नात जो जास्त रन बनवेल तो विजयी.

Tuesday, March 17, 2020

क्षणिका: कारोना आणि दारु


दारू लावली हाताला 
जिभेला लागली स्वादाला.
दारूने मारला कारोना 
नी स्वर्गात गेला  बेवडा.