Saturday, May 5, 2018

पर्यावरण प्रेमी साहेब


देशातील एका महानगरचे पर्यावरण सुधारण्याचे महत्वपूर्ण कार्य साहेबांच्या खांद्यावर आहे. आज पर्यावरणावर एक राष्ट्रीय संगोष्टी आहे. मुख्य वक्ता म्हणून साहेबांना बोलविले आहे. सकाळी साहेब उठले आणि संडासात गेले. संडासात पश्चिमी पद्धतीचे टायलेट चकाचक चमकत होते. त्यांची कामवाली रोज भरपूर हार्पिक टाकून भरपूर पाण्याने टायलेट स्वच्छ करते. त्याच सोबत  पर्यावरण साठी घातक असलेले रसायन युक्त पाणी अंततः नदीत पोहचतेच. नंतर साहेबांनी विदेशी कंपनीच्या केमिकल युक्त टूथपेस्टने दात स्वच्छ केले. नाही नाही म्हणता टूथपेस्टची काही मात्रा साहेबांच्या पोटात हि गेली. विदेशी महागडे केमिकल युक्त शेम्पू व साबण लाऊन साहेबांनी भरपूर पाण्याने (५० ते ६० लिटर) स्नान केले. तरीही साबण आणि शेम्पूतल्या  घातक केमिकल्सचे काही अंश त्वचेच्या माध्यमातून साहेबांच्या शरीरात गेलेच. याशिवाय केमिकल्स युक्त प्रदूषित पाणीहि नदीत पोहचलेच.  साहेबांनी विदेशी कंपनीचे महागडे तेल हि  मैदान सोडणाऱ्या  केसांवर लावले. तेलात मिनिरल ओईल व वनस्पती तेल (पामोलीन) हि होते. साहेबांचे केस काही वर्षांत गळणार हे निश्चित. साहेब हेल्थ कांशस, आज त्यांनी रिफाइंड तेलात बनलेले पोहे नाश्त्यात खाल्ले. रिफाइंड तेल आज होणार्या ५० टक्के हृद्याघातासाठी जवाबदार आहे. पुढे मागे साहेबांना, त्वचेचे व पोटाचे रोग किंवा  केंसर आणि हृदयरोग झाले तर त्यात आश्चर्य नाही. 

पूर्वी केंद्र सरकारच्या कार्यालयांत फक्त सचिवाला गाडीची सुविधा होती. बाकी वरिष्ठ अधिकार्यांना फक्त जाण्या-येण्यासाठी गाडी. तेही किमान २ अधिकार्यांना एकाच गाडीत आणले जायचे. पण आजकाल सर्वच प्रशासनिक सेवेच्या अधिकार्यांना स्वतंत्र गाडी दिली जाते. महानगरचे प्रदूषण  वाढविण्यात साहेबांच्या गाडीचा हि योगदान आहेच. असो. साहेब एकदाचे कार्यालयात पोहचले. साहेबांच्या चेंबरच्या बाहेर तीन-चार हिरवेगार गमले ठेवले होते.  गमल्यात  प्लास्टिकचे  पौधे होते.  साहेबांना हिरवळ आवडते, पण खर्या पौध्यांना पाणी द्यावे लागते. डास होण्याची भीती. साहेबांना हिरवळ पाहिजे होती, म्हणून प्लास्टिकची हिरवळ. साहेबांच्या चेंबरमध्ये व खिडकीच्या बाहेर हि काही प्लास्टिकचे पौधे असलेले गमले ठेवलेले होते. भिंतीवर हि हिरव्यागार जंगलाची रासायनिक रंगांनि सजलेली भली मोठी पेंटिंग हि लावलेली होती. हे सर्व पाहून,  साहेब किती पर्यावरण प्रेमी आहे, साहेबांना भेटायला येणार्या पाहुण्यांना वाटणे साहजिकच आहे. 

आपल्या भाषणाची प्रत घेऊन साहेब संगोष्टीसाठी भल्या मोठ्या एसी हाल मध्ये पोहचले. हाल भयंकर कूल होता. देशातल्या सर्व भागातून सरकारी अधिकारी, पर्यावरण साठी कार्य करणारे तथाकथित NGOs कोट पेंट आणि टाई परिधान करून आले होते. त्यांनी लावलेल्या केमिकलयुक्त डीओचा वास वातावरणात दरवळत होता. काहींना या केमिकल युक्त सुगंधीची एलर्जी असल्यामुळे नाकावर रुमाल ठेऊन कसेबसे स्वत:ला शिंकण्यापासून वाचवत होते.  या सुगंधित वासाने केंसर होण्याची शक्यता आहेच. एलर्जी आणि अस्थमा सारखे रोग केमिकल्स युक्त डीओ लावणार्यांना व नाईलाजाने त्यांच्या सुगंध सहन करणार्यांना हि होणारच.    

साहेबांनी, गोर्या साहेबांच्या भाषेत जोरदार भाषण ठोकले. पर्यावरणाचा शारीरिक व मानसिक स्वास्थ्यशी काय संबंध आहे, या विषयावर सविस्तरपणे माहिती दिली. जनतेने पर्यावरण अनुकूल वस्तू वापराव्या यावर हि जोर दिला. सर्वांनी टाळ्या वाजविल्या. आयोजकांनी साहेबांच्या पर्यावरणासाठी केलेल्या कामाचा गौरव करत सत्कार हि केला. असो. 


Friday, May 4, 2018

गर्भ संस्कार म्हणजे काय रे भाऊ


गर्भ संस्कार म्हणजे काय? हा प्रश्न माझ्या एका सहकर्मीने विचारला. गर्भ संस्कार म्हणजे पूजा-पाठ, उपवास इत्यादी तर निश्चित नाही. स्त्री-पुरुष लग्न करतात किंवा आजच्या भाषेत एकत्र येतात.  एकत्र येण्याचा उद्देश्य फक्त वासना पूर्ती नव्हे तर आपला वंश वाढविण्याचा  उद्देश्य हि असतो.  यासाठी आपल्या पुत्राचे लालन पोषण करण्याची त्यांची मानसिक तैयारी हि असतेच. आपली संतान  शारीरिक व मानसिक दृष्टीने स्वस्थ्य असावी हि प्रत्येक पालकांची  इच्छा हि असते. गर्भ संस्काराचा उद्देश्य पालकांची हि इच्छा पूर्ण करणे. 

आता प्रश्न येतोच गर्भ धारण करण्यासाठी काय पूर्व तैयारी आवश्यक आहे. आपण सर्व मातीचेच पुतळे असल्यामुळे आधी शेतीचा विचार आला. पेरणी आधी शेताला तैयार केले जाते. त्यात माती परीक्षण ते नागरणी, शेतात खत इत्यादी सर्व आले. पेरणी साठी उत्तम दर्जाचे बियाणे वापरल्या जातात. बियांना पेराण्याआधी  जीवाणु, विषाणु, बुरशी इत्यादी पासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपचारित केले जाते.    

तसेच गर्भ धारण करण्याची इच्छा ठेवणारी स्त्री  आणि पुरुष शारीरिक व मानसिक रूपेण स्वस्थ असायला पाहिजे. ते  निर्बल असेल किंवा  रोगराई इत्यादीने ग्रसित असेल आधी योग्य उपचार व  पोषणाहारची व्यवस्था करने गरजेचे. 

शेतात बी पेरल्या नंतर ही नियमित नियमित अंतरावर खत-पाणी द्यावे लागते. जीवाणू आणि विषाणूंंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी फवारणी इत्यादी करावी लागते. 

गर्भात स्वस्थ संतानाची वाढ होण्यासाठी गर्भवती स्त्री काय करावे हा प्रश्न आलाच. इथे रामायणातील एक किस्सा आठवला.  दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. अग्निदेवाने प्रसन्न होऊन पायसदान दिले. पायस अर्थ खीर हा होतो.  खीर हि सात्विक जेवणाचे प्रतीक. अग्नी आपल्या जठरात असते. आपण जे खातो ते पचविण्याचे कार्य करते.  जेवणाच्या माध्यमातून आईला पोषण मिळते तेच पोषण गर्भस्थ शिशुला हि मिळते 

सात्विक जेवणात गाईचे दूध, तूप, ताज्या भाज्या, फळे, अंकुरित अन्न, दुधी भोपळा, तोरई, कारल, हिरव्या भाज्या इत्यादी.  शिवाय फोडणी साठी कमी मसाल्यांचा उपयोग इत्यादी.  सात्विक भोजन सहज पचते. त्यामुळे पोटांचे विकार इत्यादी होत नाही व शरीराला पूर्ण पोषण हि मिळते.  स्वस्थ्य शरीर असेल तर मनात सात्विक विचार हि सहज उत्पन्न होतात. दुसर्यांच्याप्रती प्रेम आणि दयेची भावना उत्पन्न होते. मन शांत आणी प्रसन्न राहते. हेच विचार आई सोबत गर्भातल्या बाळाला हि मिळतात. 

राजसिक जेवणात ताजे पण अंकुरित न केलेले अन्न व डाळी, सर्वच मांसाहारी पदार्थ मांस, मासोळी, अंडे इत्यादी येतात. फोडणीत स्वाद वाढविण्यासाठी भरपूर मसाले हि टाकले जातात. इथे जिभेचा स्वाद महत्वपूर्ण असतो.राजसिक आहार वासना, लालच, कपट, क्रोध व अहंकार  इत्यादी वाढवणारा असतो. हे भोजन पचायला जड असल्यामुळे, अपचन इत्यादी त्रास होतात,  त्या मुळे एकाग्रता कमी होते, मन स्थिर राहत नाही. वासना बळावते. आई स्वत:च्या इच्छा गर्भस्थ बाळाच्या नावाने खपविते. हे आपण अनेकदा अनुभवले आहे. गर्भस्थ शिशुवर याचा परिणाम हा होतोच. वासना, अहंकार, जिद्दीपणा. हृदयरोग इत्यादी होण्याच्या संभावना त्याला गर्भातच मिळतात. 

तामसिक जेवण म्हणजे सर्व प्रकारचे शिळे अन्न भाज्या. फ्रीज मध्ये जास्त दिवस ठेवलेले अन्न, प्रकारचे प्रसंस्कृत व प्रोसेस्ड पदार्थ, पूर्वी पासून अर्धवट तैयार केलेले पदार्थ पित्जा, बर्गर इत्यादी. तळलेल्या पदार्थाने जास्त सेवन. या शिवाय मांस मदिरा, बिडी, तंबाकू, ड्रग इत्यादीचे सेवन. या जेवणाचा परिणाम, भोग व वासने वर नियंत्रण रहात नाही. जेवण पचत नाही, पोषक तत्व आईला व बाळाला मिळत नाही. मनात काही कार्य न करत पडून राहण्याची इच्छा होते, आळस वाढतो. स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे मूड सतत बदलत राहतो. आई सोबत  गर्भस्थ शिशुहि  विभिन्न रोगराईने ग्रस्त होता.  

महाभारतात तामसिक भोजनाचा एक परिणाम पाहायला मिळतो. अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहात कसे शिरायचे व त्यातून कसे बाहेर पडायचे हे सांगत असतो. अभिमन्यू गर्भात हे ऐकत असतो. चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगत असताना अर्जुन पाहतो सुभद्रा झोपून गेलेली आहे. अभिमन्यूला गर्भात चक्रव्यूहात कसे शिरायचे याचे ज्ञान होते. जन्मल्यानंतर आळसामुळे त्याला कधीच आपल्या वडिलांकडून चक्रव्यूहातून बाहेर कसे पडावे हे शिकायची इच्छा झाली नाही. परिणाम महाभारत युद्धात चक्रव्यूहातच त्याचा अंत होतो. 

सारांश स्त्री-पुरुष संतान उत्पन्न करण्यासाठी शारीरिक व मानसिक रूपेण स्वस्थ असायला पाहिजे. नसेल तर त्यांनी स्वस्थ्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गर्भावस्थेत स्त्रीला प्रसन्न व शांत ठेवण्याचा प्रयत्न घरतील पुरुष व इतर मंडळीनी केला पाहिजे. गर्भस्थ शिशूच्या विकासासाठी सकस आणि सात्विक आहार दिला पाहिजे. टीवी वर सास बहु व आपल्या विरोधकांना संपवणारे षड्यंत्र रचणार्या मालिका सोडून. सकारात्मक विचार मनात येतील अशी पुस्तके वाचली पाहिजे. टीवी मालिका बघायचीच असेल तर ती सकारात्मक व प्रेरणादायक संदेश देणारी असायला पाहिजे.  शेवटी शरीर स्वस्थ्य ठेवण्यासाठी गर्भस्थ स्त्री साठी असणारे व्यायाम इत्यादी व प्राणायाम तिने केले पाहिजेत. 

माझ्या दृष्टीने वरील उल्लेखित सर्व गोष्टी गर्भ संसारातच येतात.

Wednesday, May 2, 2018

कच्ची नाकु -पक्की नाकु



एका लग्नाला गेलो होता. अचानक एक २५ -२६ वर्षाची बहुतेक नुकतेच लग्न झालेली नववारी पैठणी घातलेली छकुली समोर येऊन उभी ठाकली. जोडप्याने नमस्कार करीत मला म्हणाली, काका, ओळखले का? कोण  असेल हि? तिच्या चेहर्याकडे पाहत ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो. तिच्या पोपटाच्या चोंची सारक्या लांब लचक नाकाकडे लक्ष गेल आणि  काळात २०-२२ वर्ष मागे गेलो.

आमची सौ. नेहमीच म्हणते रस्त्यावर चालताना जरा खाली पाहून चालतजा. पण काय करणार, चालताना हि शरीर रस्त्यावर आणि आत्मा दुसरीकडे भटकत असल्यामुळे, व्हायचे तेच झाले. एक दिवस ठोकर लागून खाली पडलो. नाक दगडावर आपटले. नाकावर पट्टी बांधावी लागली. 

घरा शेजारी एक मराठी कुटुंब भाड्याने राहायला आले होते. नवरा-बायको आणि ३-४ वर्षाची एक खोडकर छकुली. बारीक सारीक गोष्टींची चौकशी करण्यात छकुली सीबीआय पेक्षा हि वस्ताद. माझ्या नाकावर पट्टी बांधलेली पाहताच म्हणाली, काका काय झाले? मी म्हणालो, तुझ्या काकांचे नाकु तुटले? कसे? नाकु कच्चे होते म्हणून तुटले? छकुली, नाकु तुटले, डॉक्टर काका कडे गेलो. डॉक्टर काकाकडे मोठी सुई असते. डॉक्टर काकांनी त्या मोठ्या सुईने नाकु शिवले. मग काका तुम्ही जोर-जोरात रडले असाल. हो ना!, तुला सुई लागल्यावर जशी जोरजोरात रडते न. तसाच मी हि रडलो. तिच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह? स्वत;च्या नाकाला हात लावीत म्हणाली काका, माझे नाकु तर  तुटणार नाही ना. बघतो तपासून तुझ नाकु कच्चे आहे कि पक्के म्हणत मी तिचे पोपटासारखे नाक हाताने दाबून पहिले आणि म्हणालो अजून थोडे कच्चे आहे छकुली. त्यानंतर पुढे कित्येक दिवस संध्याकाळी, छकुली तिचे नाक कच्चे आहे कि पक्के झाले, तपासायला घरी यायची. नाक तपासायचा आमचा नवीन खेळच सुरु झाला. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता, तिचे वडील फोटो काढत होते. एका फोटो मी तिचे नाक तपासतो आहे, हि काढला. बहुतेक त्या फोटोमुळे नाक तपासणार्या काकांची आठवण तिच्या मनात कायम ठासली. मी या लग्नाला आलो आहे, हे तिला कळले असावे, आणि मला भेटण्याची इच्छा तिला झाली असावी.

छकुली का तू! मी ओरडलोच. सहज प्रवृतीने तिचे नाक तपासण्यासाठी हात पुढे केला,  पण लगेच हात मागे घेतला. छकुलीच्या हे लक्षात आले, काका! तपासून बघा कि, पक्के नाक आहे माझे. उल्लू बनवत होता मला. तिच्या शेजारी उभा असलेला तिचा नवरा हि म्हणाला, हो! हो! तपासून बघा कि काका, माझी परवानगी आहे. पण त्याच्या बोलण्यातली खोच मला जाणवली. मी कसातरी बळबळे हसलो आणि म्हणालो आता छकुली लहान नाही, मोठी झाली आहे. सुखी राहा म्हणत मी तिथून पाय काढता घेतला. काही पाउले पुढे गेल्यावर, मागे वळून बघितले. छकुली पदराने आपले डोळे पुसत होती. कदाचित तिला वाटले असावे, पूर्वी सारखे काका तिचे  नाक तपासून बघतील.... पण गेलेला काळ कधीच परत येत नाही

रात्री बिछान्यावर पडल्या-पडल्या तिच्या नवर्याचे खोचक बोल आठवले. आपण मनातील भावनांना आवरून, छकुलीचे नाक पकडून तपासले नाही,  उगाच तिच्या नवर्याच्या मनात  काकांबाबत काही विचित्र ग्रह निर्माण झाला असता. 


नुकताच घडलेला एक किस्सा आठवला. आजी स्वर्गवासी झाली अणि आजोबा एकटे उरले. घरात नवरा बायको नौकरी करणारे व तीन-चार वर्षाची नात. एक दिवस पोरीने संध्याकाळीआपल्या आईला सांगितले, आई आज किनई आजोबांनी माझा गालगुच्चा घेतला. आईच्या सांशक मनाची चिलबिचल झाली. तुमच्या वडिलांचा काही भरोसा नाही, त्यांच्या सोबत आपल्या लेकीला एकटे ठेवणार नाही. तिने पोरीला क्रेच मध्ये घातले. कुणी सांगितले नाही तरी हि आजोबांना यामागचे कारण समजलेच. आजकाल आजोबा दिल्लीत एकटे राहतात. 

मनात सहज विचार आला, प्रेमाने गालगुच्चा घेणे, डोक्यावरून होत फिरविणे, पाठीत धपाटे मारणे, या सर्वांत हि आजच्या पीढीला विकृती दिसते. कारण काय असावे? 

आज फेसबुक,व्हाटस्अप व टीवी समाचार, सर्वच ठिकाणी विकृतींचा प्रचार जोरदार होतो. समाजात घटणाऱ्या वाईट गोष्टींचा ढोल जोरदार बडविला जातो. पुरुषाचा स्पर्श म्हणजे वाईट स्पर्श, हे समीकरण झाले आहे. यामुळे प्रेमळ स्पर्श आणि विकृत स्पर्श दोन्हींचा भेद संपला. आजोबा हि आता प्रेमाने आपल्या नातीच्या डोक्यावर हात फिरवू शकत नाही किंवा गालगुच्चा घेऊ शकत नाही. तसे केल्यास घरचेच संशयाने म्हातार्याकडे पाहतील. या पुढे कुणी  काका हि कुणा छकुलीचे नाकु कच्चे आहे कि पक्के तपासणार नाही.असो.

Tuesday, May 1, 2018

आठवणीतून - बंदुकीची गोळी आणि ती


(काल्पनिक कथा)

तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक  जागा मिळाली.  समोरच्या सीट वर  एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थातच केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल  प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती.  कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे. तुम्ही ही बर्याच  नक्सलवाद्याना  कंठस्नान घातले असतील. त्यावर मेथ्यु  म्हणाला,  कुणाचे ही प्राण घेण्यात बहादुरी नाही, लोकांचे प्राण घेऊन आनंद ही मिळत नाही. मग तो शत्रू का असेना.  'बंदुकीची गोळी फक्त प्राण घेते आणि लोकांचे आयुष्य उध्वस्त करते'. बंदुकीची गोळी कुठल्या ही समस्येचे समाधान नाही. एका अर्धसैनिक दलाच्या अधिकारीच्या तोंडून हे ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.  माझा मनात चाललेला गोंधळ मेथ्युचा ध्यानी आला. तो म्हणाला साहेब, तीन एक वर्षांपूर्वीची घटना आहे.  १५  शिपायांची तुकडी घेऊन गस्त घालायला निघालो. जंगलातून  पायवाटेवर चालताना बलवान सिंग आणि मोहन हे दोघे सिपाही पुढे होते. मी, होशियार सिंग थोड्या अंतरावर त्यांच्या मागे. एका वळणावर  बंदुका घेतलेले सैनिकी वेशात तीन लोक बलवान सिंहला दिसले. तो थोडा गोंधळला, ते तिघे नक्षली होते. आपल्या समोर अर्धसैनिक दलाची तुकडी आहे, त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांना एक धक्का देऊन इथून पलायन करणे उचित, त्यांच्या म्होरक्याने निमिषातच निर्णय घेतला. त्यांनी समोर दिसणाऱ्या दोन्ही शिपायांवर आपल्या एके ४७ ने ब्लास्ट (सर्व गोळ्या एकाच वेळी) केला. काही समजण्या आधीच बलवान आणि मोहन जमिनीवर पडले. मी लगेच एका झाडाची आड घेतली आणि आम्ही नक्षलींच्या दिशेने गोळीबार सुरु केला. होशियार सिंगने याने  थोड रांगत पुढे जाऊन एक हेंड ग्रेनेड त्यांच्या दिशेने फेकला. तो ग्रेनेड बरोबर त्यांच्या मध्ये जाऊन पडला. नक्षली गोंधळले. त्यांनी आपली पोजिशन सोडली पण  त्याच क्षणी ग्रेनेडचा ही ब्लास्ट झाला व गोळ्यांचाही मारा. काही क्षणात सर्व काही शांत झालं.  माझे  दोन शिपाई  शहीद झाले  होते. बाकी इतर कुणाला ही कुठलीच इजा झाली नव्हती. शिपायांना नक्षली जिवंत आहे कि मेलेले याची खात्री करायला सांगितले. होशियार सिंहाने परत येऊन सांगितले, साहिब एक जिंदा है, क्या करें उसका. मी जवळ गेलो, बघितले  जेमतेम  १७-१८ मुलगी असेल.  दोन्ही पाय ब्लास्ट मुळे जखमी झाले होते. पाठीला गोळी ही लागलेली होती. शरीरातून रक्त वाहत होते. एक  शिपाई  म्हणाला, साहब इसे तो उठाकर ले जाना पड़ेगा. मी विचार केला. जंगल नक्सलीनी भरलेले आहे. कदाचित या चकमकी बाबत त्यांना कळले ही असेल. आधीच दोन शहीद  शिपाई, त्यांची आणि नक्षलींची शस्त्रे. ६-७ शिपाई तर या साठीच लागतील. उरलेल्या ५-६ शिपायांवर सर्वांच्या संरक्षणाची जवाबदारी. निर्णय घेतला. आपल्या जवळ लोक नाही. सध्यातरी हिला इथेच सोडावे लागेल, नंतर येऊन बघू, काय करायचे ते. साहेब अश्यानी ही काही वेळातच इथेच तडफडून मरेल, एक शिपाई म्हणाला. मी म्हणालो, ठीक आहे, मी तिला मुक्त करतो. मी तिच्या जवळ गेलो.एक पाय तिच्या छातीवर ठेवला आणि  तिच्या कपाळावर नेम धरला. त्या वेळी तिच्या चेहर्याकडे लक्ष गेल. मोठ्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत काहीतरी बोलण्याच्या प्रयत्न करत होती. मन घट्ट करून मी गोळी झाडली. त्या क्षणी माझ्या कानात आवाज घुमला  'साहेब मला का मारले, मला जगायंच होत.' 

मेथ्यु काही क्षणासाठी थांबला. तो पुढे म्हणाला, बलवान सिंहच्या बायकोचे वय फक्त तीस वर्ष होते त्यात तीन मुली. तिला पुढील सर्व आयुष्य तीन मुलींना वाढवत वैधव्यात काढावे लागणार. मोहन तर फक्त २२ वर्षांचा होता. आपल्या आई-बापांचा एकुलता एक. ती मुलगी, दोन वर्षांपूर्वी तिने दहावीचा पेपर दिला होता. तिला डॉक्टर बनायचे होते.  तिचा मोठा भाऊ कालेजात शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत  घरी आला होता. त्याच वेळी जवळच्या गावात पोलीस पोस्टवर नक्षली हमला झाला. जवळपासच्या गावातल्या तरुणांना पोलिसांनी उचलले. त्यात तिचा भाऊ ही होता. असे गावकर्यांचे म्हणणे. नंतर कळले पोलीस एन्काऊंटर मध्ये काही नक्षली मारल्या गेले त्यात तिचा भाऊ होता. भावाचा बदला घेण्यासाठी तिने जंगलाचा रस्ता धरला आणि चकमकीत मी तिला मारले. तिच्या वडिलांनाही या घटने नंतर पोलीस उचलून घेऊन गेले. कदाचित अद्यापही ते जेल मध्ये असतील. काही क्षणांच्या चकमकीत अनेकांचे  स्वप्न भंगले, काही परिवार उध्वस्त झाले. 

बाकी माझे म्हणाल, तर मी झोपेच्या गोळ्या घेतो  तरी ही मला झोप  लागत  नाही. जरा डोळे मिटले कि  तिचा चेहरा समोर येतो, एकच  आवाज कानात घुमत राहतो. 'साहेब मला का मारले, मला जगायचं होत.'  काय उत्तर देणार मी तिला. मला नेहमीच वाटते, ती सतत माझ्या अवती-भोवती असते, कदाचित या क्षणी ही इथेच असेल. जो पर्यंत तिला तिच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही ती जाणार नाही. जन्म भर ती मला अशीच छळत राहणार. मेथ्युची कथा ऐकून मी सुन्न झालो. काहीच बोलू शकलो नाही. 


Monday, April 30, 2018

लेखक बनण्याचे फंडे - चौर्यकला


म्या लेखन चौर्यकला शिकलो 
कवी म्हणूनी प्रसिद्ध जाहलो.

आपले नाव जगात झाले पाहिजे अशी इच्छा सर्वांचीच असते.आपल्या छोट्याशा चौकटीत आयुष्य जगणार्या सामान्य माणसाला हे जमत नाही. मग प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा पूर्ण  करण्याचा सौपा उपाय तो शोधतो. सर्वात सौपा उपाय म्हणजे कवी आणि लेखक होणे. पण त्यासाठी लागणारी कल्पना व वेगळा विचार करण्याची क्षमता हि नसली तरीही चालेल.  ज्या प्रमाणे दुकानदार नकली माल प्रसिद्ध कंपनीचे लेबल लाऊन विकतो. त्याच प्रमाणे कवी बनण्यासाठी प्रसिद्ध कवींच्या कविता, थोडा फेर-फार करून स्वत:च्या नावाने बेधडक खपविल्या म्हणजे कवी म्हणून मान्यता मिळालीच समजा. 

एका कार्यक्रमात गेलो होतो. २०-२५ लोक जमले होते त्यात काही माझे मित्र हि होते. एकाने आपली स्वरचित हिंदी कविता ऐकविली. नंतर ३-४ कवींनी हि त्यांच्या स्वरचित हिंदी कविता ऐकविल्या. मला हि विचारणा केली तू ब्लॉगवर एवढ्या कविता लिहितो, एखादी ऐकव. मी म्हणालो, आजकाल मला स्वत:च्या कविता लक्षात राहत नाही. असा कसा कवी तू ज्याला स्वत:च्याच कविता लक्षात रहात नाही- एक कवियत्री. मी उत्तर दिले नाही, शांत राहिलो. कार्यक्रम संपल्यावर माझ्या एका मित्राने विचारले, तुझी बेइज्जती केली तरीही तू तिला उत्तर का दिले नाही. मी म्हणालो, काय म्हणू, तिने ऐकविली कविता कुठल्या प्रसिद्ध कवीची आहे ते. इथे सर्वांनीच हिंदीच्या प्रसिद्ध कवींच्या कविता स्वत:च्या नावाने खपविल्या आहेत. मला त्यांच्यातला एक व्हायचे नव्हते, म्हणून मी चूप राहिलो. मी त्या कवितांच्या मूळ कवींची नावे हि आपल्या मित्राला सांगितली. नकल करताना डोक वापरण्याचे कष्ट सुद्धा या तथाकथित कवींनी घेतले नव्हते. माझ्याजागी दुसरा असता तर निश्चित त्यांची सर्वांसमोरअब्रू घालविली असती. दुसर्याची कविता स्वत:च्या नावाने खपवायची असेल तर किमान प्रसिद्ध कवींना तरी टाळले पाहिजे. शब्दांना थोडे फिरविले तर अति उत्तम. सरकारी कार्यालयात हिंदी पखवाड्यात अश्या कवींच्या भरपूर कविता ऐकायला मिळतात. थोडीफार प्रसिद्धी त्यांना मिळतेच. शिवाय आजकाल कुणी वाचन करत नाही त्यामुळे अश्या कवींची चलती झाली आहे. 

तीस एक एक वर्ष आधीची गोष्ट, एक प्रसिद्ध हिंदी मासिक वाचत होतो. वाचता-वाचता ध्यानात आले, आपण हि गोष्ट वाचली आहे. सहज लेखकाच्या नावाकडे लक्ष गेले. लेखक आपला मराठी माणूस होता. त्याने चक्क मराठी गोष्ट हिंदीत अनुवाद करून स्वत:च्या नावाने खपविली होती आणि त्याला मानधन हि मूळ मराठी लेखकापेक्षा जास्त मिळाले असेल. हिंदीच्या प्रसिद्ध मासिकात चोरीची गोष्ट टाकणाऱ्या लेखकाला सलाम करण्याची इच्छा झाली.  पूर्वी प्रसिद्ध हिंदी सिनेमाचे मराठीत रिमेक होत होते, तसेच एका भाषेची कहाणी अनुवाद करून दुसर्या भाषेत स्वत:च्या नावाने सहज खपविता येतात. ९९ टक्के कुणालाही कळणार नाही याची शाश्वती. एखाद्याला कळले तरी तो तक्रार करणार नाही. आजकाल तर लोक पुस्तके आणि मासिक वाचत नाही. मराठी भाषेचे सोडा हिंदीचे अनेक मासिक केंव्हाच बंद झाले आहेत. अनुवाद आणि थोडा फेरफार करून दुसर्याचे लेखन स्वत:च्या नावाने सहज खपविता येते. यात रिस्क हि कमी. 

काही वर्ष आधी ब्लॉग लेखनाला चालना मिळाली. अनेक संकेतस्थळांवर हि लोक लिहू लागले. गेल्या तीन -चार वर्षांपासून इथे हि मंदी आली आहे, हे वेगळे. मराठीचे अनेक संकेतस्थळ बंद झाले. तरी हि जिथे पुस्तकाच्या ३०० प्रतीही खपण्याची संभावना नसते, तिथे ब्लॉग किंवा संकेतस्थळांवर लिहिले तर तुमचे लेखन जास्त वाचकांनी वाचण्याची शक्यता आहे. 

मीही मराठीसृष्टी या संकेतस्थळावर पहिल्यांदा आपल्या मोडक्या-तोडक्या मराठीत लिहायला सुरवात केली. लिहिताना भाषा किती हि अशुद्ध असली तरीही संकेतस्थळांवर लेखन प्रसिद्ध होतेच. नंतर स्वत:च्या नावाने ब्लॉग हि बनविला. पूर्वी मराठीसृष्टी या संकेतस्थळावर लिहिलेले लेख हि आपल्या ब्लॉग वर टाकले. माहितीच्या या युगात ब्लॉगवर टाकलेले लेखन कुणी चोरणार नाही, त्यात शिक्षित नेटकर  मराठी माणूस असे कदापि करणार नाही असे वाटले होते. आपले लेख अधिक लोकांनी वाचावे हि इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच. एक दिवस नेट वर सर्च करताना ऐसी अक्षरे नावाच्या संकेतस्थळा बाबत माहिती मिळाली. 

ऐसी अक्षरेवर "प्रेम म्हणजे काय" हा लेख टाकला. [http://aisiakshare.com/node/2406]. लगेच अड्मीन ने विचारले हा लेख तुमचा आहे का? मला विजेचा शॉकच बसला. मी उत्तर दिले आपल्या ब्लॉग वरून हा लेख इथे टाकला आहे. अड्मीन ने तीन-चार लिंक पाठविल्या त्या वरून कळले नितीन ठाकूर, युवराज मोहिते, पवारजी इत्यादी लोकांनी हा लेख चोरून स्वत:च्या नावाने खपविला होता. एक चांगले होते, मराठीसृष्टी साईट बंद झाली नव्हती. त्यामुळे  लेखाची लिंक पाठवून मूळ लेखक मीच आहे, हे मला सिद्ध करावे लागले. आपल्या चिरंजीवाची मदत घेऊन चोरांचे इमेल शोधले व जाब विचारला. त्या पैकी मोहिते आणि पवार यांनी माफी मागितली. नंतर कळले हा लेख आणिक ३-४ लोकांनी स्वत:च्या नावानी खपविला आहे. नेटवर अधिक तपासल्यावर कळले माझ्या अनेक कविता आणि लेख दुसर्यांनी त्यांच्या नावावर खपविले आहेत. काय करणार. मराठी ब्लॉग लेखनात पैसे मिळत नाहीत. पण चोरांविरुद्ध कार्रवाई करण्यासाठी पैसे लागतात. यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते, बिना कष्ट करता, दुसर्यांचे लेखन ब्लॉग, फेसबुक व व्हाट्सअप वर स्वत:च्या नावाने खपवा, मूळ लेखक काही ही करू शकणार  नाही.  

तर मित्रांनो वाट कसली पाहता,दुसर्याचे लेखन चोरी करा आणि स्वत:च्या नावाने खपवा. लेखक म्हणून तुम्हाला प्रसिद्धी नक्कीच मिळेल. कुणी जाब विचारला तर बेशरम बना. चोरांच्या उलट्या बोंबा हि मारा. असो. 

Wednesday, April 25, 2018

आठवणीतून -चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट


एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते?  हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या  बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग! खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात का तोडले? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली. 

आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. 'चिवताई ये दाणा खा', म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.   

आजीने डोळे उघडले. एसीवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली. 

एक होती चिव, एक होता काऊ.  चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते).  एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट .... 

Sunday, April 22, 2018

तीन क्षणिका : कवी



(१) 

कवी दरबारात गेला 
चारण-भाट तो झाला 
खोटी प्रशस्ती गायली 
कवी कोट्याधीश झाला

(२) 

कवी अरण्यात गेला 
प्रकृती सवे रमला 
स्वान्त:सुखाय रचना केली 
महाकवी तो झाला

(३)

कवी बाजारात गेला 
शून्य भाव मिळाला 
शून्याने केली निर्मिती 
कवी सृष्टा झाला 

सृष्टा: जगाची निर्मिती करणारा 


Thursday, April 19, 2018

आठवणीतून - तपश्चर्येचे फळ



मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते.  गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते. माझा नाईलाज आहे, असे म्हणत त्याने धूम ठोकली. लोकांपासून दूर तो घनघोर अरण्यात पोहचला. स्वर्ग प्राप्ती साठी त्याने कठोर तपश्चर्या सुरु केली. वल्कल परिधान केले. झोपायला धरती आणि पांघरायला आकाश. कंद मूळ, फळे हाच त्याचा आहार. कधी ही संसारिक भोगांचा विचार त्याचा मनात आला नाही. सतत नामस्मरणात तो दंग राहायचा. काळ लोटला. तो म्हातारा झाला आणि मरण पावला. 

चित्रगुप्ताने त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब केला. एक दिवस स्वर्गात राहण्याचे पुण्य त्याचा पदरी पडले. त्याला आनंद झाला. एक दिवस का होईना, त्याला स्वर्गीय देवतांचे दर्शन घेता येईल. जन्माची तपस्या सफल होईल. देवदूत त्याला स्वर्गात घेऊन आले. अनेक सुगंधित उबटने अंगाला लाऊन, त्याला स्नान घातले. उंच भरजरी रेशमी वस्त्र त्याला नेसायला दिले. इंद्राच्या सभेत त्याला घेऊन पोहचले. सभेत इंद्र आणि इतर देवता, रम्भा, उर्वशीचे इत्यादी अप्सरांचे नृत्य पाहण्यात दंग होते. त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून उठला, त्याचे स्वागत केले. त्याला आपल्या जवळच्या मंचकावर बसवले. एक अप्सरा सोमरसाचे पात्र घेऊन त्याच्या  जवळ आली. इंद्र त्याला म्हणाला, स्वर्गीय अप्सरांचा नृत्याचा आनंद घेत सोमरसाचे प्राशन कर. आज आपल्या आवडत्या अप्सरे बरोबर तू मनसोक्त रमण करू शकतो. वेळ घालवू नको. हा एका दिवसाचा स्वर्गीय आनंद तुझ्या कठोर तपस्येचे फळ आहे. उचल ते सोमरसाचे पात्र. त्याने समोर पहिले, रम्भा-उर्वशी सोमरसाच्या धुंदीत देहभान विसरून नाचत होत्या. दोघींचे वस्त्र अस्तव्यस्त झाले होते, दिसू नये ते सर्व दिसत होते. पण त्यांना त्याची लाज नव्हती. सर्व देवता ही मद्याच्या धुंदीत होते. चिरयौवना सुंदर अप्सरांच्या ओठांचे स्पर्श झालेले सोमरस देवगण आनंदाने प्राशन करीत होते. आजच्या सिने तारकांना लाज वाटेल असे वस्त्र अप्सरांनी परिधान केले होते. अप्सरांच्या गळ्यात गळे घालून देवगण कामोत्सव साजरा करण्यात मग्न होते. हे सर्व पाहून, त्याला आठवले, काही वर्षांपूर्वी त्याचा मित्र त्याला फार्म हाऊस वर नवीन वर्षाच्या पार्टीत घेऊन गेला होता. तिथे तोडक्या वस्त्रातल्या बारबाला लोकांना ड्रिंक्स सर्व करीत होत्या. तिथे सर्व स्त्री-पुरुष लोक-लाज विसरून मद्याच्या धुंदीत नाचत होते. खुलेआम भोगविलास सुरु होता. त्या पार्टीहून परतल्यावर त्याला संसारापासून विरक्ती झाली.  इथे येऊन पाहतो तर स्वर्गात ही तोच प्रकार. त्याला प्रश्न पडला, त्याच्या कठोर तपस्येचे फळ हेच का? असा आनंद तर काही पैका खर्च करून पृथ्वीवर सहज प्राप्त होतो. संपूर्ण आयुष्य अश्या स्वर्ग सुखासाठी मोजले. त्याला त्याचीच लाज वाटली. परित्यक्ता पत्नीची आठवण आली. आपण तिची प्रतारणा केली, एवढ्या शुल्लक गोष्टी साठी. तिची माफी मागितली पाहिजे. इंद्रसभा सोडून तो निघाला, पण तिला शोधणार कुठे?  कुठे असेल ती आज. अचानक त्याला एक अंधुक आकृती दिसली, तीच ती त्याची पत्नी. तो जोरात ओरडला, माफ कर मला. अहो, काय झाले तुम्हाला, कसली माफी, काही स्वप्न पहिले का?  तो दचकला, आपण बिछान्यावर झोपलेलो आहे, हे त्याच्या लक्ष्यात आले. त्याने लगेच स्वत:ला सावरले. तिच्या हातातला केशरमिश्रित दुधाचा गिलास आपल्या हातात घेत तो म्हणाला, मधुमिलनाची रात्र जागून काढायची असते, डोळा लागला, गुनाह घडला आहे हातून. अपराधीला दंड हा मिळालाच पाहिजे. तिला त्याचे ऐकून हसू आले, ती म्हणाली अजून भरपूर रात्र उरली आहे, तुम्ही म्हणाल तिथे तुम्हाला शिक्षा करीन. त्या नंतर काय झाले कुणी-कुणाला शिक्षा केली, कशी केली, अंधार असल्या मुळे काहीच कळले नाही.

 

Wednesday, April 18, 2018

प्रदूषण (२7)- एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत


अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ  हवेत मिसळतात. प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते. डोळे लाल होणे, खोकला सुरु होणे, एलर्जी व अस्थमाचा त्रास वाढणे हे सर्व सामान्य झाले आहे. आठवड्यात किमान एकदा तरी प्रदूषित धुळीची आंधी येतेच. इतर ठिकाणी प्रचंड उन्हामुळे लू लागते पण दिल्लीत लू सोबत प्रदूषित धुळीचा त्रास ही सहन करावा लागतो.

संध्याकाळचे पाच एक वाजले असतील. जोरात आंधी सुरु झाली. खिडक्या वाजू लागल्या. धावत जाऊन खिडक्या बंद केल्या. दरवाजा बंद करताना एक स्त्री आवाज आला, गाढवा किती हि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला तरी तू मला रोखू शकत नाही. मी चमकून इकडे-तिकडे पहिले कुणीच दिसले नाही, वाटले मनाचा भ्रम असावा. पुन्हा आवाज आला, मूर्खा, मी धुळीची आंधी बोलते आहे, कुणी मानवी स्त्री नाही, जी तुला डोळ्यांनी दिसेल. मला हि राग आला म्हणालो, तसे हि मला सध्या डोळ्यांनी काहीच  दिसत नाही. तू धुळीची आंधी आहे, मान्य करतो. माझेच घर सापडले का तुला, त्रास द्यायला. जोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. मी म्हणालो, हसतेच कशाला, मी काही चूक म्हंटले का, कुणालाच आवडणार नाही, तुझे घरात शिरणे. त्या वर धुळीच आंधी म्हणाली, पूर्वी मी रस्त्याच्या काठी असलेल्या झाडांवर किंवा आंगणातल्या झाडांवर विसावा घ्यायचे. तुझ्या घराच्या आंगणात एखादे पेरूचे झाड असते तरी त्यावर आपली हाडे टाकून मस्त झोपले असते. हो आलं लक्ष्यात, तुझ्या घरात आंगणच नाही, तर झाड कुठून येणार. शोभे साठी ठेवलेली प्लास्टिकची झाडे दिसत आहेत बैठकीत.  चालेल, फूल न फुलाची पाकळी इथेच विसावा घेते.  

मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही.  थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी. 

थोड्या वेळात आंधी संपली. झाडू-पोंछा घेऊन घरभर पसरलेली धूळ स्वच्छ केली. डोळ्यांत जळजळ होऊ लागली होती, खोकलता-खोकलता हालत खराब झाली होती. शेवटी नाईलाज होऊन डॉक्टर कडून औषध आणावे लागले. 
 

Tuesday, April 17, 2018

बिहारच्या चिमुरडीची व्यथा




कॅन्डल मार्च नाही काढला
कुणी नेत्याने माझ्यासाठी.

शर्मसार नाही झाला 
धर्म कुणाचा माझ्या साठी.

रान नाही उठविले जगभर
पेड मिडीयाने माझ्यासाठी 

मोर्चे नाही निघाले मला 
न्याय मिळवून देण्यासाठी .

माझा  काहीच उपयोग नव्हता 
वोट बँक राजनीती साठी.


(प्रत्येक बलात्कार घृणित असतो. बलात्कारीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण आपल्या देश्यात बलात्कारचा उपयोग घृणित राजनीती साठी होतो.  पीडिता आणि बलात्कारीच्या धर्माच्या आधारावर ठरविल्या जाते कि शांत राहायचे कि हल्ला करायचा.  घृणित वोट बँक राजनीती).

Monday, April 16, 2018

प्रदूषण (२६) गोवर्धन गिरधारी



हिरव्यागार वस्त्रांनी नटलेली अरावलीची पर्वतराजी, आकाशात उंच मान डोकावून उभा गौवर्धन पर्वत. दूर यमुने पर्यंत पसरलेले हिरवेगार कुरण. पर्वतांच्या पायथ्याशी असलेली कमळदलांनी सजलेली सुंदर-सरोवरे. सारस, हंस सारखे सहित अनेक चित्र-विचित्र पक्षी, हत्ती, व्याघ्र,हरीणे इत्यादी जनावरे त्या रम्य परिसरात बागडत होती. कदंब, पिंपळ, कडूलिंब, वटवृक्ष, आंबा,पेरू नानाविध वनस्पती ने हा हिरवागार वन्य प्रदेश नटलेला होता.  हेच ते नयनाभिराम -गोकुळ-वृंदावन. 


एक दिवस माणसाची दृष्ट त्या रम्य परिसराला नजर लागली. दूर-दूर पसरलेली हिरवीगार कुरणे पाहून काही ग्वालपाल आपल्या  गुरांसहित इथे स्थिरावले. मथुरेच्या बाजारात दूध, दही, तूप विकून आपला उदर-निर्वाह करू लागले. जसे-जसे मथुरेचे वैभव वाढले, तसे-तसे वृंदावनात ही गवळ्यांची व गुरांचीही संख्या वाढली. कुरणांवरून त्यांचात आपसात भांडणे होऊ लागली. साहजिकच त्यांनी आपला राजा निवडला. कुरणे वाटण्यात आली. परिणाम वृन्दावानातले वन्य जीवन नष्ट झाले. नंतर मथुरेतल्या महाल व इमारतीत साठी, मोठ्याप्रमाणात झाडे तोडण्यात आले. अरावलीच्या टेकड्या ओसाड झाल्या. नग्न पर्वत पावसाळ्यात ढासळू लागले. पर्वत पायथ्याशी असलेली सरोवरे बुजुन गेली. व्हायचा तोच परिणाम झाला. पावसाचे पाणी आपल्यात सामावणारी सरोवरे आता नव्हती. एकदा श्रावणात अतिवृष्टी झाली. वृक्षविहीन पर्वतराजी पाण्यास थांबू शकली नाही. पर्वतावरून वाहत येणार्या पाण्यास कोणताच अडथळा नसल्यामुळे भयंकर पूर आला. शिवाय नदीच्या काठी वनराई नसल्याने  हजारोंच्या संख्येत गुर-ढोर व माणसे हि पाण्यात वाहून गेली. त्यानंतर पाऊस दगा देऊ लागला. त्या वर्षी एक थेंब ही पाऊस झाला नव्हता. हिरवीगार कुरणे सुकून गेली. आता यमुनेचा काठच ग्वालपाल आणि त्यांच्या हजारों गायींचे एकमात्र आश्रयस्थान उरले होते.  

प्रात:विधी पासून ते पिण्याचे पाणी- 'सर्वकाही यमुनेचा काठीच' आणि त्यात यमुनेचा कमी प्रवाह. माणसांच्या व गुरांच्या घाणी मुळे पाणी प्रदूषित झाले होते. पाण्याला घाण वास येऊ लागला होता. मग व्हायचा तोच परिणाम झाला. दूषित पाण्यामुळे माणसे व गुर-ढोर आजारी पडू लागले. काही दगावले सुद्धा. यमुनेच्या पाण्यात कालसर्प आहे अशी अफवा उडू लागली. मथुरेच्या शिपायांनी यमुनेच्याकाठी काही विषाक्त सर्प ही मारले.  पण काहीही फरक पडला नाही.  रोगराई काही कमी झाली नाही. 

ग्वालांचा राजा नंद चिंतित होता. दुष्काळामुळे गायींना खायला पर्याप्त चारा नव्हता. परिणामी गायी कमी दूध देत होत्या. पण मथुरेला दूध पाठवलं नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही हे ही नंदाला चांगले माहित होत. त्यामुळे ग्वाल-बाल दूध-दह्याला मुकले. दुष्काळ दूर करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक होत. यादवांचे गुरु गर्ग ऋषींनी देवराज इंद्राला प्रसन्न करण्यासाठी इंद्रयज्ञ करण्याचा सल्ला दिला. वृंदावनात यज्ञाची तैयारी सुरु झाली. 

गोकुळापासून काही कोस दूर एका टेकडीच्या पायथ्याशी नंदाच्या मालकीचे कुरण होते. नंदाचा जारूक नावाचा एक वृद्ध सेवक आपल्या परिवारासहित या कुरणाची व्यवस्था पाह्यचा.  तिथे नंदाच्या शेकडो गाई होत्या. दहा-बारा वर्षाचा कृष्ण इथे पहिल्यांदाच आला होता. जिथे गोवर्धन समवेत समस्त पर्वतराजी व कुरणे वृक्षविहीन व वा सुकलेली दिसत  होती. पण इथे चहूकडे हिरवळ होती. कुरण विभिन्न फुल-फळांच्या झाडांनी नटलेल होत. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सरोवरात भरपूर पाणी दिसत होत. त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. कृष्णाने या बाबतीत सेवकास विचारले. तो म्हणाला: कृष्ण कधी पाऊस जास्ती पडतो कधी कमी. पर्वतावर व जंगलातली वृक्षे पावसाच्या पाण्यला जमिनीत मुरवितात, तेच पाणी हळू हळू पायथ्याशी असलेल्या तळ्यांत साचते.  पहिले इथे लहानसे तळे होते. दररोज काही वेळ देऊन या तळ्याला मोठ्या सरोवराचे स्वरूप दिले. गुरांची वाढती संख्या पाहून आणिक दोन तीन ठिकाणी या कुरणात स्व:परिश्रमाने सरोवरे बांधली. माझे सम्पूर्ण आयुष्य यात खर्ची गेले. दर श्रावणात समोरच्या टेकडी वर व आपल्या कुरणात ठीक-ठिकाणी  फळ-फुलांची झाडे नेमाने लावतो. कृष्ण जसे आपण सर्दी व गर्मी पासून वाचण्या साठी वस्त्र परिधान करतो व स्वत:ला सुरक्षित ठेवतो तसेच हिरवी वनस्पती पर्वतांचे व धरणीचे वस्त्र होय. या हिरव्या वस्त्रांशिवाय पर्वत व धरणी उध्वस्त होईल. त्याच बरोबर त्यांचा कुशीत वावरणारे आपल्या सारखे जीव ही. दूर असलेल्या गोवर्धन पर्वताकडे बोट दाखवीत तो म्हणाला हे पहा कृष्णा गौवर्धन वृन्दावानातला सर्वोच पर्वत पण काय त्याची दशा, वृक्षांविना कसा अनाथ दिसतो. गौवर्धन पर्वताच्या पायथ्याशी असलेली सरोवरे कधीच नष्ट झालेली आहे. वृंदावनात जिथे-पहा तिथे हीच परिस्थिती आहे. पाण्याच्या अभावी कुरणे सुकून  गेली आहे. गायी तहानलेल्या व उपाशी आहे. दुध-लोणी कुठून मिळणार. मथुरेला दूध, दही व लोणी पाठविणे सक्तीचे असल्याने ग्वालबालाचींं उपासमार होत आहे. आपल्याच कर्मांचीच फळे. देवराज इंद्राला दोष देण्यात अर्थ नाही. जारूक पुढे म्हणाला, कुठलाही व्यापार एक-पक्षीय नसतो. आपण दूध-दही मथुरेt विकतो त्या एवजी आपण अन्न-धान्य, वस्त्र इत्यादी घेतो. तसेच आपल्यालाही गोवर्धनाला त्याचे वैभव पुन्हा परत करावे लागेल. तरच इंद्राच्या क्रोधापासून तो आपली रक्षा करेल. अग्नीत तुपाची आहुती देऊन इंद्र प्रसन्न होणार नाही. गौवर्धन पर्वताचे जुने वैभव परत केल्यास, अकाल आणि अतिवृष्टी पासून गवळ्यांचे व गुरांचे रक्षण होईल. कृष्णाने विचारले, जारूक हे सर्व तुम्ही बाबांना का नाही सांगत? जारूक उतरला, मी एक सेवक आहे, माझे कोण ऐकणार. शिवाय लोक स्वार्थी असतात. स्वस्त:चाच विचार करता. मला काय फायदा हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. सर्वांच्या उन्नतीत स्वत:ची उन्नती आहे, हे कुणालाच कळत नाही. तू ग्वालांचा राजकुमार आहे, तू मानत आणले तर सर्वांना एकत्र करून, उद्दिष्ट साध्य करू शकतो. 

कृष्ण गोकुळात परतला. नंदबाबा, यादवांचे कुलगुरूआचार्य गर्ग व काही प्रतिष्ठित गवळ्यांसोबत इंद्रयज्ञा बाबत चर्चा करीत होते. यज्ञासाठी लागणारी सामग्रीची बद्दल गर्ग ऋषी बोलत होते. किती पोती धान, किती हंडे दूध, दही, लोणी लागणार होते याचा हिशोब होत होता. कृष्ण -विचार करू लागला. इथे गवळ्यांच्या पोरांना दूध-लोणी मिळत नाही आहे. तिकडे अग्नीत अनेक हंडे दूध-लोणी व्यर्थ जाणारआणि देवराज इंद्र प्रसन्न ही होणार नाही. कृष्णाला राहवले नाही. तो म्हणाला आचार्य क्षमा असावी, लहान तोंडी मोठा घास घेतो आहे. देवराज इंद्र आपल्या वर कधीही रुष्ट नव्हते, आपण आपल्याच कर्मांची फळे भोगत आहोत. वरुणदेव आकाशातून अमृताचा वर्षाव करतो पण पाणी साठवणारी तळी आहेत कुठे? आपल्या स्वार्थापायी आपण पर्वतांना नग्न केले, झाडे तोडली. गौवर्धन पर्वत पावसाचे पाणी आपल्या कुशीत सामावून घेण्यास असमर्थ झाला आहे. परिणाम आपल्याला पाऊस आला कि काही वेळातच गोकुळात पाणी भरते. कृष्ण म्हणाला, बाबा आपले कुरण आज ही हिरवेगार आहे. कुरणात भरपूर झाडे आहेत. सरोवरांत पाणी आहे. जारूकने त्या साठी मेहनत घेतली आहे. धरणीचे वैभव अक्षत ठेवले आहे. आज इंद्र यज्ञाची नव्हे तर गौवर्धन पर्वताला प्रसन्न करणे गरजेचे आहे. गौवर्धन पर्वताची  पूजा करून,  हिरव्या वस्त्रांनी त्याचा श्रुंगार केला तर तो निश्चित  प्रसन्न  होईल. बुजलेली सरोवरे पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे. शिवाय अनेक नवीन सरोवरांच्या निर्मितीची. प्रसन्न झालेला गौवर्धन पर्वत अग्नी,वायु आणि वरुण या तिन्ही शक्तींचा नियंत्रक देवराज इंद्रच्या क्रोधापासून ग्वालपालांचे निश्चित रक्षण करेल. आज वृन्दावानाच्या धरतीला तिचे वैभव परत करण्याची गरज आहे. त्याकरता आपण सर्वाना  कठोर परिश्रम करावे लागेल. चमत्कार कधी होत नसतो. तो आपल्या पुरुषार्थाने घडवायचा असतो. 

तिथे असलेल्या अनेक ग्वालांनी कृष्णाचे समर्थन केले.  आचार्य गर्ग म्हणाले कृष्णा मला हि तुझे म्हणणे पटते. नंदबाबाला हि कृष्णाचे म्हणणे पटले. सभेत सर्वांनी ब्रज मंडळात सरोवरांचा निर्माण, नदी काठी व गोवर्धन सहित सर्व उजाड टेकड्यांवर वृक्ष  लावण्याचा संकल्प घेतला.  

दवंडी पिटली. सर्व गवळी एकत्र झाले. जुन्या सरोवरांचा पुन:उद्धार, नवीन  कुठे सरोवर बांधायचे, यावर चर्चा झाली व सर्वानुमतीने स्थळे निश्चित झाली.  जाणकार गवळ्यांनी कुठे कोणत्या वनस्पती आणि झाडे लावायची हे ठरविले. सर्व गवळी उत्साहाने कामाला लागले. पावसाळ्याच्या आधी काही सरोवरांना पुन:जीवित केले. पावसाळ्यात त्यांत पाणी साचले. गवळ्याचां उत्साह वाढला. 

अशीच १० दहा एक वर्षे निघून गेली.  हिरवे वस्त्रांनी नटलेला गौवर्धन पर्वत नववधू सारखा शोभून दिसत होता. कृष्णाने गौवर्धन पर्वताच्या शिखरावर उभे राहून  दूर यमुने पर्यंत पसरलेला ब्रजमंडळा कडे बघितले. एक, दोन, दहा-वीस नव्हे तर तब्बल ९९ सरोवरे ब्रजच्या गवळ्यानींं बांधून काढली होती. सर्वत्र हिरवळ दिसत होती. दूर यमुनेकाठी लावलेले कुंजवन हि दिसत होते. गायी भरपूर दूध देत होत्या. ग्वाल बाळांना भरपूर दूध व लोणी मिळत होते.  उपासमार संपली अणि समृद्धि आली.

या वर्षी अतिवृष्टी झाली, इद्राला क्रोध आला असे ब्रजच्या ग्वालांना वाटले. पण पावसाचे पाणी गौवर्धन पर्वताने आपल्या हिरव्या वस्त्रांत साठवले तर उरलेले सरोवरांनी आपल्या उदरात सामावून घेतले. नदी काठच्या कुंजवनांनी जनावरांना पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापासून थांबविले.  इंद्राचा पराजय झाला व गौवर्धन पर्वताचा विजय.

यमुनेकाठचा कालसर्प वृंदावन सोडून केंव्हाच निघून गेला. आता पुनवेचा राती, यमुनेच्या काठावर, कुंज वनात कृष्णाच्या बंशीच्या तालावर गोप-गोपिकांच्या नृत्य आणि गाण्याचे बोल गुंजू लागले. 

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गावकरी मिळून अमृत तुल्य पावसाचे पाणी पुन्हा सरोवरांचा निर्माण करून साठविण्याचे कार्य करत आहे, हे पाहून आणि ऐकून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. 

टीप:

ब्रज : जिथे १० हजार गायी पाळल्या जातात. 

ब्रजमंडळात ९९ सरोवर बांधण्याची कथा, स्वर्गीय स्वामी हरीचैतन्य पुरी यांच्या मुखातून ऐकली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य  पर्वतांना नष्ट करणाऱ्या दगड व रेत माफिया विरुद्ध लढ्यात घालविले. 

माझ्या मते ब्रजचा कृष्ण हा महाभारतातल्या कृष्णापेक्षा वेगळा होता. 

Friday, April 13, 2018

दोन क्षणिका -गिधाडी चोचांं व आत्महत्या




 (१)

सुकलेल्या झाडावर
दुष्काळी छाया
लटकलेल्या प्रेतावर
गिधाडी चोचांं.

(२) 

शेतांत टाकले विष 
शेतांत उगवले विष 
विष पिउनी आत्महत्या 
करतो आज बळीराजा. 


१. शेतकर्याचे भल्याचे कार्य करण्याची फुरसत कुठल्या हि तथाकथित शेतकरी नेत्यांची नाही. त्या साठी पुरुषार्थ करावा लागतो. ते त्यांना जमणार नाही. प्रेतांवर लोणी  खाणे अधिक सौपे कार्य. दुर्भाग्य अधिकांश शेतकरी अश्याच नेत्यांच्या मागे धावतात. 

२. विषाक्त शेतीचा परिणाम बळीराजाला हि भोगावा लागतो. पहिले विषाक्त शेती नव्हती,बळीराजा आत्महत्या हि करत नव्हता. विषाक्त शेती महागात पडते, खाणार्यांच्या शरीरात विष जाते हे वेगळे. शेवटी कर्जबाजारी होऊन शेतकरी हि आत्महत्या करतो. 

Thursday, April 12, 2018

प्रदूषण (२५): महानगर - एक प्रदूषित कारागृह


शेरखान जंगलाचा राजा. राजा असला तरी पोट-पाण्यासाठी त्याला शिकार करावीच लागायची. किमान दहा-बारा वेळी प्रयत्न केल्या वर त्याला शिकार  गवसायची. कधी सांभर सारखे मोठे जानवर गवसले तर काही दिवस मेजवानी. तर कधी-कधी सस्या सारख्या छोट्या जनावरा वर ही गुजाराण करावी लागे. कधी-कधी कित्येक दिवस उपासमार ही व्हायची. तरी ही शेरखान खुश होता. कुठल्या जनावराचा शिकार करायची हे ठरविण्याचे स्वतंत्रता त्याच्या पाशी होती. आपल्या मर्जीचा तो राजा होता. तो जंगलात कुठेही फिरू शकत होता. पण म्हणतात न, काळ कधीच एकसारखा नसतो. एक दिवस शेरखान शिकारीला निघाला होता. त्याला एका पिंजर्यात लटकलेले जनावराचे मांस दिसले. आयते भोजन समोर दिसल्यामुळे तो पिंजर्यात घुसला आणि कैद झाला.  

शेरखान शहरातल्या एका प्राणी संग्रहालयात पोहचला. आता चार बाय सहाचा एक  पिंजरा त्याचे घर झाले. शेरखानने अनेकदा पिंजरा तोडण्याचा आपल्या संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केला पण पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या तोडण्यास तो असमर्थ ठरला. शेवटी नियती समोर त्याने हात टेकले. संग्रहालयात वाघाला पाहण्यासाठी तिकीट विकत घेऊन लोक यायचे. लहान पोरे शेरखानला चिडवायचे, कधी-कधी कुणी पोट्टा दगड हि मारायचा.  हे सर्व सहन करण्याशिवाय  शेरखानला गत्यंतर नव्हते.

तसे म्हणाल तर इथे शेरखानला कसलीच काळजी नव्हती. दररोज दुपारी म्हशीचे किंवा कधी-कधी बकर्याचे शिळे मांस जेवणात मिळत होते. अर्थात निर्धारित खुराकपेक्षा अर्धीच खुराक त्याला मिळत असे. नेहमीच त्याला अर्धपोटी राहावे लागायचे. माणसाच्या संसर्गात आल्यामुळे त्याला रोगराई होऊ नये म्हणून विटामिन, विषाणू नाशक आणि जीवाणू नाशक औषधी  त्याच्या खुराक मध्ये मिसळून दिली जायची.  शेवटी तो प्राणिसंग्रहालयाचा कमाऊ पूत जो होता. शेरखानला जंगलातल्या दिवसांची आठवण यायची, कुठे प्राण्यांचे स्वादिष्ट ताजे मांस खायला मिळायचे, तर कुठे इथे बेस्वाद शिळे मांस. कधी-कधी तर कित्येक दिवसांचे शिळे. पण नाईलाज होता, भूक भागविण्यासाठी खाणे हि मजबुरी होती.  पिंजरा तोडून बाहेर जाणे अशक्यच होते.  असेच तीन चार वर्ष निघून गेले

एक दिवस मध्य रात्री शेरखानची झोप उघडली, त्याने पाहिले पिंजर्याचे दार उघडे होते. हीच सुवर्ण संधी आहे, इथून निसटायची. शेरखान पिंजर्यातून बाहेर पडला थेट जंगलाच्या दिशेने. अर्धा एक मैल पुढे गेला असेल कि त्याला धाप लागू लागली, तो थांबला. त्याच्या मनात विचार आला, एवढे वर्ष पिंजर्यात काढले,  चालताना हि धाप लागत आहे. जंगलात शिकार करण्यासाठी तर कैक मैल चालावे लागते. आता पुन्हा शिकारीसाठी कैक मैल चालणे व धावणे आपल्याला जमेल का? कदाचित नाही. बाकी पिंजरा काय वाईट. बेस्वाद असले तरी  जिवंत राहण्यालायक जेवण तर रोज मिळतेच.  काही वेळ विचार करून, तो मागे फिरला आणि पुन्हा पिंजर्यात येऊन झोपला.  पिंजरा म्हणजे जग हे कटु सत्य शेरखानने स्वीकारले. 

दिल्ली सारखे महानगर- लाखोंच्या संख्येने धूर फेकणारे वाहन, फेक्ट्रीज इत्यादी, सर्वत्र पसरलेला कचरा त्यात प्राणघातक रासायनिक कचरा हि. पिण्यासाठी सरकारी पाणी पूरवठा  एजेन्सीचे घाण पाणी.  या सर्वांमुळे  पसरणारे रोग. कधी डेंगू, कधी मलेरिया तर कधी चिकनगुनिया. दिल्ली सारख्या महानगरात सर्दी पडसे, एलर्जी, अस्थमा, टीबी, केंसर आणि मानसिक तणावामुळे हृदयरोग होणे तर सामान्य बाब झाली आहे. (माझे हि नाकाचे ऑपरेशन झालेले आहे, हृदयाचे हि बायपास झालेले आहे, रोज अलर्जीची गोळी आणि हृदयरोगचे औषध घ्यावे लागते. शिवाय वातावरणात झालेल्या बदलाने होणारे आजार हि). मला तरी दिल्लीत एक हि माणूस ज्याला इथे राहता दहा एक वर्ष झाली असेल, औषधी न घेणारा अद्याप सापडलेला नाही. तरीही इथे अर्धेपोट का होईना जेवण मिळते. अधिकांश लोक दहा बाई दहाच्या खोलीत कसेबसे संसार थाटतात आणि त्यासाठी १२-१२ तास  काम करतात. खरे म्हणाल तर महानगरात कुणीही आपल्या मर्जीने येत नाही, पोटाची भूक त्याला इथे आणते. पण एकदा महानगरात आलेला माणूसाला परतणे शक्य नसते. शेवटी इथेच रोगराई इत्यादींनी खंगत-खंगत तो इहलोकी जातो.  महानगरीय प्रदूषणच्या कैदैत माणूस आणि पिंजर्यात कैद शेरखान, दोघांचे जगणे सारखेच.

Tuesday, April 10, 2018

प्रदूषण (२४)- नदीचा अंत


हिमाच्छादित मुकुट हिचा 
वितळून गेला केंव्हाच . 

गोड पाण्याचा भंडार
नाही उदरात हिच्या 

  समुद्राकांशी नदी जवळ
 नाही 
आज जीवन प्रवाह. 

विरून जावे लागेल  हिला
मनुष्यकृत वाळवंटात

Sunday, April 8, 2018

प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे?


आज एप्रिल ५, २०१८ दुपारी जेवणानंतर सहज एक चक्कर लावायला बाहेर पडलो.  बाहेर भयंकर तापलेले होते, उन मी -मी म्हणत होते. जसा बाहेर पडलो होतो, तसाच २ मिनिटात पुन्हा परतलो. आज तापमान ४१ डिग्रीच्या वर होते. आताच तर उन्हाळ्याची सुरुवात झाली, पुढें काय होणार, कल्पना करताच अंगावर शहारे आले. नागपूरचा उन्हाळा आता दिल्लीत पोहचला,असे वाटले. शाळेतले दिवस आठवले. एप्रिल महिन्यातले पहिले पंधरा दिवस वार्षिक परीक्षेचे. मी जुन्या दिल्लीत राहायचो, शाळा पहाडगंज येथे घरापासून ३ किमी दूर. आम्ही जुन्या दिल्लीतली सर्व विद्यार्थी पाईच चालत शाळेत जात असू. सकाळी साडे सहाला घरातून निघाल्यावर सव्वा सात पर्यंत शाळेत पोहचत असू. सकाळी थंडी राहायची. अर्धे  स्वेटर घालावे लागे. आज कुणाला हे सांगेल तर विश्वास होणार नाही. आजोबा खोटे बोलतात हेच वाटेल. त्या वेळी घरात पंखे नसायचे. वाड्यातील सर्व लोक गच्चीवर झोपायचे. मे महिन्यात हि पहिल्या दोन आठवड्यात, रात्री १२ वाजता नंतर अंगावर पांघरूण घेण्याची गरज भासायची. सकाळी मस्त वातावरण राहायचे, सूर्य मध्यावर येताच गर्मी वाढायची. दुपारचे तापमान ४० डिग्री वर पोहचले कि समजायचे आता धुळीची आंधी येणार आणि ५-७ मिनिटे पाऊस हि. त्या नंतर संध्याकाळ पुन्हा वातावरण मस्त व्हायचें. संध्याकाळी कंपनी बागेत फिरण्यात मस्त मजा यायची.  विकासासाठी ब्रिटीश काळात बांधलेली हि सुंदर बाग रस्ते, कार पार्किंग व मेट्रो साठी नष्ट झाली.

अजून एप्रिलची नुकतीच सुरुवात झाली आणि सूर्यदेव आग ओकतो आहे. असेच राहिले तर पाण्या अभावी पक्षी तडफडून मारतील. हरीयाणातून येणार्या कालव्याच्या पाण्याची वाटेतच वाफ होईल. दोन्ही राज्यात पाण्यासाठी भांडणे व पाणी कपात सुरु होईल. पाण्याच्या टेंकर समोर रांगा लागतील. पाण्यासाठी माऱ्यामाऱ्या होतील. काहींचा जीव हि जाईल. एप्रिल मध्ये हि परिस्थिती आहे तर मे जून मध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, कल्पना करवत नाही. असे चालणार नाही, मनात येईल तसे वागणार्या सूर्यदेवाला  जाब विचारायलाच  पाहिजे.  

अरे तू देव आहेस ना? मग माणसासारखे वाटेल तसा का वागतो आहे. जूनचा उन्हाळा एप्रिल मध्ये का? काही तरी दया कर आम्हा दिल्लीकरांवर.  सूर्यदेवाने आकाशातूनच उत्तर दिले, विपक्षी दलान्सारखा काहीचाबाही आरोप लाऊ नको. मी कधीच आपल्या कामात चूक करत नाही.  जेवढी आग ५० वर्ष आधी ओकत होतो, तेवढीच आज हि. मी उत्तर दिले, आत्ताच गुगल केले आहे, गेल्या ५० वर्षांत दिल्लीचे सरासरी तापमान २ डिग्री सेल्सिअसच्या हि वर वाढले आहे.  एवढे जास्त तापमान का?

सूर्यदेवाने मलाच प्रतिप्रश्न केला, आधी तू सांग ५० वर्ष आधी दिल्लीत पाण्याचे तलाव किती होते, तू जिथे राहतो त्या बिंदापूरच्या तलावाचे काय झाले, पाणी आहे का आज त्यात? खरंच दिल्लीत ५00च्या वर तलाव होते आणि ५ लाख जनसंख्या.  मी १९८८ मध्ये जनकपुरीच्या जवळ बिंदापूर येथे राहायला आलो. गावापासून १ किमी दूर मोठा तलाव होता. छोटे से शिवमंदिर, स्त्रियांच्या आंघोळीसाठी एक घाट, भरपूर झाडे असलेले जंगल व तलावच्या दक्षिण दिशेला एक स्मशानघाट. नेहमी पोहणारी बदके, पाण्यावर फिरक्या मारणारे अनेक पक्षी,  तलावात मासे पकडणारे हौशी लोक, हिवाळ्यात येणारे विदेशी पक्षी. हिवाळ्यात तर सकाळी व संध्याकाळी शेकडोंच्या संख्येने आकाशात विहार करणारी विदेशी बदके बघून मन प्रसन्न व्हायचे. मोर तर भरपूर होते कधी-कधी घराच्या अंगणात हि यायचे. २० एक वर्षांपूर्वी विकास आला. मंदिर आणि स्मशानघाट भोवती भिंती बांधल्या. तलावाला हि चौहू बाजूनी बांधून काढले. एक प्राथमिक शाळा, एक वृद्धाश्रम, प्रसूतीगृह, औषधालय आणि उरलेल्या जागी एक छोटासा पार्क. जंगल संपले आणि तलावाचा पाणी पुरवठा हि. वाढत्या जनसंख्येमुळे पाण्याची पातळी हि खाली गेली. आता १५० फुटावर पाणी लागते ते हि खारे. दोन चार वर्षांत तलाव वाळून गेला आणि पक्षी हि अदृश्य झाले. असेच दिल्लीच्या ५०० तलावांच्या बाबतीत झाले.  

मला मौन पाहून, सूर्यदेवाने पुन्हा विचारले, दिल्लीतल्या झाडांचे काय झाले. तुझ्या आंगणातलली झाडे कुठे गेली. घरात समोर आंगण होते, सदाफुलीचे  आणि एक पेरूचे झाड हि होते अलाहाबादी मोठे व गोड पेरू झाडाला लागायचे. पण इतरांनी पूर्ण प्लॉट कवर करून घर वाढवले, मीही तोच कित्ता गिरविला. दोन्ही झाडे शहीद झाली. पूर्ण प्लॉट कवर केला. दिल्लीतल्या ९० टक्के लोकांनी हेच केले. कोठीवाल्यांनी झाडांचा कचरा कारवर  पडतो म्हणून झाडे कापून टाकली.  पूर्वी चांदणी चौक व करोल बाग मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिंपळाची भली मोठी  झाडे होती. दुकानदारांनी दुकाने वाढविली, झाडे अदृश्य झाली. मोठे-मोठे बगीचे  मेट्रोसाठी, रस्त्यांच्या रुंदीकरण व कार पार्किंगसाठी अदृश्य झाले. कुदसिया बाग, यमुना काठावरचे बगीचे, कंपनी बागांचे फक्त अवशेष उरले. अधिकांश छोट्या-छोट्या बगीच्यांचे रूपांतरण कार पार्क मध्ये झाले. अदृश्य झाले मोर,कोकिळा, चिमण्या, फुलपाखरू. उरले फक्त कबूतर आणि कावळे.

मला मौन पाहून सूर्यदेव म्हणाले, तुम्ही झाडे तोडली, हिरवळ नष्ट केली, तेवढ्यावर हि थांबले नाही. लाखो गाड्या व फेक्ट्रीज आकाशात गरमागरम धूर फेकतात.  घरातले एसी ही उष्णता  वाढवितात. आत्ता तूच उत्तर दे, या उन्हाळ्यासाठी मी जवाबदार कि तुम्ही दिल्लीकर जवाबदार आहात. माझ्या जवळ उत्तर नव्हते, मुकाट्याने मान खाली घालून पुन्हा आपल्या कशात परतलो. एसी सुरु केला. एसीने खोली थंड झाली, पण एसी मात्र बाहेर गरम वारे सोडत होता. मनात चिलबिचल सुरु झाली. अशीच उष्णता वाढत राहिली तर  देशांतर्गत पाण्यासाठी युद्ध हि होतील. देशाचे तुकडे -तुकडे होण्याची संभावना नाकारता येणार नाही.  मनात विचारांचे काहूर माजले. शेवटी राहता आले नाही. उठून एसी बंद केला



टीप: दिल्ल्लीचें सरासरी तापमान गेल्या ५० वर्षांत २ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढले आहे.  

Thursday, April 5, 2018

वात्रटिका - म्या कवी जाहलो



आले नाही काही करता
म्हणून म्या कवी जाहलो 
शुद्ध लेखन तपासायला 
इथे परीक्षक नसतो.

Friday, March 30, 2018

प्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे



आषाढच्या मेघाने खाली वाकून जमिनीवर बघितले धुळीच्या आवरणा खाली दिसत होत्या गगनचुंबी ईमारती. आकाशात तेजाबी धूर ओकणाऱ्या असंख्य फैक्ट्ररीज व लाखोंच्या संख्येने रस्त्यावर धावणारी वाहने विषाक्त धूर सोडणारी. एक काळी रेखा हि त्याला दिसली, बहुतेक हीच यमुना असावी. मेघाला यक्षाने भरतखंडाच्या  राजधानीचे केलेले वर्णन आठवले. मेघाला प्रश्न पडला इथे खालचे काहीच व्यवस्थित दिसत नाही. अश्या परिस्थितीत यक्षप्रियाला शोधणार तरी कसे? आषाढच्या मेघाने जोरदार वर्षाव करून वातावरण स्वच्छ करण्याचा निश्चय केला. 

आकाशात विजेचा कडकडाट झाला. जोरात पाऊस सुरु झाला. आषाढचा पहिला पाऊस. धुळीने माघलेल्या वृक्ष-वल्लरी अमृताच्या नव्हे तर तेजाबी पावसात भिजल्या. हिरवी पाने काळी पडली. चातकाने चोंच उघडली. मृगाचे दोन थेंब, अमृताचे नव्हे तेजाबी पाणी, त्याच्या पोटात गेले. तो जमिनीवर येऊन पडला. काही क्षणात तडफडत-तडफडत तो कालवश झाला. तहान भागविण्यासाठी रस्त्यावर साचलेले पाणी पिऊन अनेक पक्षी, कोकिळा, साळुंकी, चिमण्या तडफडत-तडफडत मेल्या. 

आकाशात विजेचा कडकडाट ऐकून यक्षप्रियेचा आनंद गगनात मावेना. आषाढचा मेघ घेऊन येणार होता तिच्या प्रियकराचा संदेश. ती धावत पळत इमारतीच्या गच्ची वर पोहचली. तिने वर आकाशात बघितले, भला मोठा काळाकुट्ट मेघ  दिसला. आकाशात चमकणाऱ्या विजेला पाहून तिला वाटले, बहुतेक मला शोधण्यासाठीच या विजा चमकतात आहे. तिला प्रियकराचे बोलणे आठवले, प्रिये तू अंधारात हि विद्युतलते समान सुंदर दिसते. साक्षात रंभाच जणू. दिव्याची काय गरज. प्रियकराची आठवण येताच स्त्री सुलभ लज्जा तिच्या गालावर पसरली. ती अधिकच सुंदर दिसू लागली. काही क्षणात जोरात पाऊस सुरु झाला. ती आज पहिल्यांदाच आषाढच्या पावसात मनसोक्त भिजली. पण हे काय अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. असहनीय पीडा, आपला चेहरा जळतो आहे, असे तिला वाटले. ती कसेबसे आपल्या कक्षात आली. दर्पणात बघितले. तेजाबी पाण्याने तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जागो-जागी अनेक घाव केले होते. तिचा चेहरा तेजाबी पाण्यामुळे जळाळा होता. दर्पणात स्वतचा चेहरा बघून ती किंचाळली. अनेक चित्र-विचित्र विचारांचे वादळ तिच्या मनात उठले. आपला कुरूप चेहरा पाहून प्रियकराच्या मनात काय विचार येतील. त्याचे माझ्यावर पूर्ववत प्रेम राहील का? त्याने मला सोडून दिले तर. अखेर तिने कठोर निर्णय घेतला. 

पाऊस थांबला. वातावरण स्वच्छ झाले. पण खालील जमिनीवरचे दृश्य बघून आषाढच्या मेघाने धसकाच घेतला. वृक्ष-लता  तेजाबी पाण्याने जळून काळ्या पडलेल्या होत्या. अनेक पक्षी मृत झालेले दिसले. अरेSरे! माझ्या उदारातले अमृत समान पाणी वातावरणात पसरलेल्या तेजाबी धुळीत मिसळून विष समान झाले. अचानक त्याला यक्षप्रियेची आठवण आली, तीही प्रियकराच्या संदेशासाठी गच्चीवर आली असेल. मेघाने खाली चहूकडे पहिले.  एका इमारती कडे मेघाचे लक्ष गेले, बहुतेक यक्षाने वर्णन केलेली हीच ती इमारत. पण ईमारती खाली एवढी भीड का?  एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे कुरूप झालेला होता. लोक कुजबुज करत होते, हिचा नवरा परदेशी गेलेला आणि हिला पावसात भिजायला हौस. माहित नव्हते का हिला, सरकारने आधीच पावसापासून सावधान राहण्याचा अलर्ट दिला होता. एवढ्या टीवी, रेडियो वर घोषणा होतात. ऐकल्या नव्हत्या का हिने. एक म्हणाला सौंदर्य नष्ट झाल्यावर जगणार तरी कशी? आणिक कुणी म्हणाला आपण सर्वच या विषाक्त वातावरणात हळू-हळू रोज मरतो आहे. कुणालाच चिंता नाही. राजाच जवाबदार आहे, हिच्या मृत्यूला. जमलेले लोक सरकार विरोधात घोषणा देऊ लागले.  

आषाढच्या मेघ वरून सर्व काही बघत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला अतीव दुख झाले. या सर्वाला आपणच जवाबदार आहोत, असे त्याला वाटले. आता परतताना रामगिरी वर यक्षप्रियेचा संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार. काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला उदरातील पाणी घेऊन परत फिरावे व समुद्रात रिकामे करावे.  पण त्याला वरूण राजाचा आदेश आठवला. जमिनीवर काय घडत आहे, याची चिंता न करत दिलेले पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळुन पुढच्या प्रवासाला निघाला. 





Wednesday, March 28, 2018

प्रदूषण (२१): मय दानवाचा बदला


अर्जुनाने सैन्याचे निरक्षण केले. मशालची मशाल प्रज्वलित करून सज्ज होते. धनुर्धारी हि धनुष्यावर  प्रत्यंचा चढवून सज्ज होते. त्यांना कठोर आदेश होता. अग्नीच्या भीतीने खांडव वनातून पलायन करणारे जनावरे हिंस्त्र पशु असो किंवा हरिणाचे पिल्लू कुणालाही जीवित सोडायचे नाही. अर्जुनाने अग्निबाण सोडला, खांडव वनातल्या वनदेवीच्या काळजात खोलवर रुतला. सर्वत्र अग्नीचे डोंब आकाशी उसळले. हीच ती निशाणी. सैनिकांनी चोहूकडून खांडव वनाला अग्नीच्या हवाली केले. सैरवैर पळत जनावरे प्राण वाचवायला वनदेवीपाशी पोहचले. आजपर्यंत वनदेवीने जंगलातल्या प्राण्याची रक्षा केली होती. पण आज अर्जुनाचा अग्निबाण वनदेवीच्या  काळजात खोल रुतला होता तिचे सर्वांग जळत होते. त्या स्थितीही प्राण्यांना उद्देश्यून म्हणाली, बाळानो आज मी तुमची रक्षा करण्यास असमर्थ आहे. तुमचे हे बलिदान व्यर्थ नाही जाणार. कलयुगाची सुरुवात झाली आहे. पाशवी मानव जातीचा अंत आता जवळ आला आहे.  

खांडव वनाची राख-रांगोळी करून अग्नी शांत झाली. त्याच राखेतून एक विशाल काळी आकृती प्रगट झाली.  पृथ्वीवरील मानवांचा समूळ नाश हेच तिचे उद्देश्य. युधिष्ठिराने विचारले, कोण तू, या अग्निकांडात कसा वाचला.  ती आकृतीने  युधिष्ठिर व पांडवांना प्रणाम केला व म्हणाली, मी मय दानव, आपला गुलाम. आपल्या सेवेसाठी सदा सज्ज. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी जिवंत राहिलो आहे. आज्ञा करा. महाराज  युधिष्ठिर ने मय दानवला आज्ञा केली,  देवराज इंद्राच्या अलकापुरीहून सुंदर  इंद्रप्रस्थ नगरीचा निर्माण करा.  

मय दानवाने पर्वतांचे हृदय फोडले, जमीन खोदून काढली नानाविध खनिजे - लोखंड, कोळसा इत्यादी. सिमेंट कांक्रीटची गुगनचुंबी इमारते उभी राहिली. मय दानवाने पाताळातून काढले हलाहल विष. धाऊ लागली त्या  विषावर  नानाविध वाहने ओकीत विषाक्त धूर. अन्न, पाणी आणि वायूतही  पसरविले दानवाने हलाहल विष. युद्धात विजय मिळवून देण्यासाठी  निर्मिती केली विनाशक ब्रम्हास्त्रांची. मानवासाठी नष्ट केले त्यानी सर्व वनप्रांतर. जीर्ण झाले धरणीचे हिरवे वस्त्र. धरणी माता विव्हळत म्हणाली, काय करतो आहे रे मय दानवा, भीषण तापाने सर्वांगाची लाही-लाही होते आहे. मय दानव म्हणाला,  धीर धर माय, थोडी कळ सोस. लवकरच होणार आहे, मानवाचा अंत.  हिमालयाचे म्हणाला, वितळते आहे, माझे पांढरे शुभ्र वस्त्र. पाण्या विना तडफडून-तडफडून मरतील जमिनीवर राहणारे मानवासहित सर्व जीव जंतू. मय दानव अट्टहास करीत म्हणाला, पर्वतराज हेच पाहिजे आहे, मला. पाण्यासाठी होतील युद्धे, अन्नासाठी बंधू घेतील बंधूंचे प्राण. युद्धात वापरले जातील ब्रह्मास्त्र विनाशक. कुरुक्षेत्रात वाचले होते, पांडव पाच. पण आज कुणीच वाचणार नाही. कैलाशवासी शंकर जागे होतील. डमरूच्या तालावर सुरु होईल सृष्टी विनाशक तांडव नृत्य. संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून जाईल. शांत होईल धरणी मातेचा दाह. पुन्हा वनप्रांतरात नवचैतन्य प्रगट होईल.  नसणार फक्त पाशवी मनुष्य जाती. 

अचानक सौ.च्या आवाजाने खडबडून जागा झालो. किती वेळ झोपणार आज ऑफिसला जायचे आहे कि नाही. म्हणतात सकाळचे स्वप्न खरे होतात.  विचार करू लागलो, आपल्या अपरमित इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वयं विनाशाच्या मार्गावर चालत आहोत. पृथ्वीवरच्या सर्व जीवांना नष्ट करून आपण जिवंत राहू शकतो का?

सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे आपल्या स्वार्थासाठी त्यांना नष्ट करण्याएवजी त्यांचे अस्तित्व  स्वीकार केले तरच मनुष्य हि या धरतीवर जीवेत शरद: शतम  अर्थात पृथ्वीवरील पूर्ण आयुष्य भोगू शकेल. १०० वर्ष जिवंत राहू शकेल.  


यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति
सर्वभूतेषु चात्मानं ततो विजुगुप्सते.
[ईशावास्य उपनिषद - (६)] 


 

बड़वानल: समुद्रातील अग्नी

Monday, March 26, 2018

प्रदूषण (२०)- हळू-हळू रोज मरतो मी



शेतात टाकले विष 
जेवणात घेतो विष
हळू हळू रोज मरतो मी.

पाण्यात टाकले विष  
पितो पाणी बोतलबंद
हळू हळू रोज मरतो मी

हवेत उडविले विष 
भिनले श्वासाश्वासांत   
हळू हळू रोज मरतो मी.


टीप: ५0 लाख वाहने दिल्लीत रोज हवेत विष ओकतात. जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक विष पाण्यात / थंड पेयांत टाकले जाते, जेणे करून ते कधी खराब होऊ नये. जेवणात हि आपण अन्नाच्या माध्यमातून किटनाशक, जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक रसायने घेतोच. रोज रोज विष पिण्याचा परिणाम भोगावाच लागेल, त्यातून कुणाचीही सुटका नाही.