Wednesday, March 28, 2018

प्रदूषण (२१): मय दानवाचा बदला


अर्जुनाने सैन्याचे निरक्षण केले. मशालची मशाल प्रज्वलित करून सज्ज होते. धनुर्धारी हि धनुष्यावर  प्रत्यंचा चढवून सज्ज होते. त्यांना कठोर आदेश होता. अग्नीच्या भीतीने खांडव वनातून पलायन करणारे जनावरे हिंस्त्र पशु असो किंवा हरिणाचे पिल्लू कुणालाही जीवित सोडायचे नाही. अर्जुनाने अग्निबाण सोडला, खांडव वनातल्या वनदेवीच्या काळजात खोलवर रुतला. सर्वत्र अग्नीचे डोंब आकाशी उसळले. हीच ती निशाणी. सैनिकांनी चोहूकडून खांडव वनाला अग्नीच्या हवाली केले. सैरवैर पळत जनावरे प्राण वाचवायला वनदेवीपाशी पोहचले. आजपर्यंत वनदेवीने जंगलातल्या प्राण्याची रक्षा केली होती. पण आज अर्जुनाचा अग्निबाण वनदेवीच्या  काळजात खोल रुतला होता तिचे सर्वांग जळत होते. त्या स्थितीही प्राण्यांना उद्देश्यून म्हणाली, बाळानो आज मी तुमची रक्षा करण्यास असमर्थ आहे. तुमचे हे बलिदान व्यर्थ नाही जाणार. कलयुगाची सुरुवात झाली आहे. पाशवी मानव जातीचा अंत आता जवळ आला आहे.  

खांडव वनाची राख-रांगोळी करून अग्नी शांत झाली. त्याच राखेतून एक विशाल काळी आकृती प्रगट झाली.  पृथ्वीवरील मानवांचा समूळ नाश हेच तिचे उद्देश्य. युधिष्ठिराने विचारले, कोण तू, या अग्निकांडात कसा वाचला.  ती आकृतीने  युधिष्ठिर व पांडवांना प्रणाम केला व म्हणाली, मी मय दानव, आपला गुलाम. आपल्या सेवेसाठी सदा सज्ज. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी जिवंत राहिलो आहे. आज्ञा करा. महाराज  युधिष्ठिर ने मय दानवला आज्ञा केली,  देवराज इंद्राच्या अलकापुरीहून सुंदर  इंद्रप्रस्थ नगरीचा निर्माण करा.  

मय दानवाने पर्वतांचे हृदय फोडले, जमीन खोदून काढली नानाविध खनिजे - लोखंड, कोळसा इत्यादी. सिमेंट कांक्रीटची गुगनचुंबी इमारते उभी राहिली. मय दानवाने पाताळातून काढले हलाहल विष. धाऊ लागली त्या  विषावर  नानाविध वाहने ओकीत विषाक्त धूर. अन्न, पाणी आणि वायूतही  पसरविले दानवाने हलाहल विष. युद्धात विजय मिळवून देण्यासाठी  निर्मिती केली विनाशक ब्रम्हास्त्रांची. मानवासाठी नष्ट केले त्यानी सर्व वनप्रांतर. जीर्ण झाले धरणीचे हिरवे वस्त्र. धरणी माता विव्हळत म्हणाली, काय करतो आहे रे मय दानवा, भीषण तापाने सर्वांगाची लाही-लाही होते आहे. मय दानव म्हणाला,  धीर धर माय, थोडी कळ सोस. लवकरच होणार आहे, मानवाचा अंत.  हिमालयाचे म्हणाला, वितळते आहे, माझे पांढरे शुभ्र वस्त्र. पाण्या विना तडफडून-तडफडून मरतील जमिनीवर राहणारे मानवासहित सर्व जीव जंतू. मय दानव अट्टहास करीत म्हणाला, पर्वतराज हेच पाहिजे आहे, मला. पाण्यासाठी होतील युद्धे, अन्नासाठी बंधू घेतील बंधूंचे प्राण. युद्धात वापरले जातील ब्रह्मास्त्र विनाशक. कुरुक्षेत्रात वाचले होते, पांडव पाच. पण आज कुणीच वाचणार नाही. कैलाशवासी शंकर जागे होतील. डमरूच्या तालावर सुरु होईल सृष्टी विनाशक तांडव नृत्य. संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून जाईल. शांत होईल धरणी मातेचा दाह. पुन्हा वनप्रांतरात नवचैतन्य प्रगट होईल.  नसणार फक्त पाशवी मनुष्य जाती. 

अचानक सौ.च्या आवाजाने खडबडून जागा झालो. किती वेळ झोपणार आज ऑफिसला जायचे आहे कि नाही. म्हणतात सकाळचे स्वप्न खरे होतात.  विचार करू लागलो, आपल्या अपरमित इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वयं विनाशाच्या मार्गावर चालत आहोत. पृथ्वीवरच्या सर्व जीवांना नष्ट करून आपण जिवंत राहू शकतो का?

सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे आपल्या स्वार्थासाठी त्यांना नष्ट करण्याएवजी त्यांचे अस्तित्व  स्वीकार केले तरच मनुष्य हि या धरतीवर जीवेत शरद: शतम  अर्थात पृथ्वीवरील पूर्ण आयुष्य भोगू शकेल. १०० वर्ष जिवंत राहू शकेल.  


यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति
सर्वभूतेषु चात्मानं ततो विजुगुप्सते.
[ईशावास्य उपनिषद - (६)] 


 

बड़वानल: समुद्रातील अग्नी

No comments:

Post a Comment