Sunday, March 4, 2018

क्षणिका : कविता चोरी गेली




रद्दीत जाणारी कविता
अखेर चोरीस गेली
त्या राती मित्रांना
ओली पार्टी दिली

कवितेला काहीतरी मूल्य होते म्हणून कुणी तरी चोरली अन्यथा 5 रु किलोच्या भावाने गेली असती।

Thursday, March 1, 2018

प्रदूषण (२८) होळी खेळा नैसर्गिक रंगानी



होळी म्हणजे रंगांचा उत्सव. वसंताचे आगमन झाले आहे. धरती माता विविध रंगांच्या फुलांनी नटली आहे. साहजिकच आहे, आपल्याला हि रंगात बुडून जाण्याची इच्छा होईल. बहुतेक होळीचा उत्सव रंगात बुडण्याचा आनंद आपल्याला देतो. पण आजकाल बाजारात फुलांच्या,पानांच्या रंगांएवजी कृत्रिम रासायनिक रंग व गुलाल बाजारात मिळतात.  खादीग्राम उद्योग, पतंजलीच्या दुकानात व अनेक कुटीर उद्योगांच्या माध्यमांनी  नैसर्गिक गुलाल  हि  काही ठिकाणी  मिळतात. नैसर्गिक रीत्या तैयार केलेले रंग थोड्या मात्रेत बाजारात मिळतात.  पण अधिकांश दुकानांत रासायनिक गुलाल व रंगच मिळतो. आपल्या सर्वांच्या प्रकृतीसाठी हे रंग उचित नाही. मग काय करायचे. 

सौपा उपाय घरातच रंग तैयार करणे. यासाठी स्वैपाकघरात उपलब्ध पदार्थांचा वापर करून रंग तैयार करता येतो.  
 
चुकुंदर (beat route): गहर्या लाल रंगाचे चुकुंदर पासून बैंगनी रंग (व्हायलेट) सहज बनविता येते. एक चुकुन्दर  व् थोड़े पाणी घालून मिक्सर मधून ज्यूस तैयार करा व तैयार केलेला हा ज्यूस बादलीभर पाण्यात मिसळा .  व्हायलेट रंग तैयार झाला.  माझी मुले लहान असताना बीटरूट पासून नेहमीच रंग तैयार करीत होतो. 

पालकाची एक जुडी घेऊन, मिक्सर मध्ये ज्यूस तैयार करून घ्या व एक बादलीत पाण्यात मिसळा, काही वेळात  हिरव्या  रंगाचे पाणी मिळेल.

हळदी पासून पिवळा रंग, सहज तैयार होतो. दोन चमचे हळदी आणि अर्धी वाटी बेसन पाण्यात टाकून पिवळा रंग मिळतो.  पण हा रंग कपड्यांवर लागला तर सहज सहजी निघत नाही.  हळदीत लिंबाचा रस टाकून लाल रंग हि तैयार करता येतो. 

बाजारातून जर नैसर्गिक मेहंदी पावडर मिळाली तर उत्तम  किंवा  मेहंदीचे पाने मिळाली तर त्यांच्या  हि ज्यूस काढून एका बादली भर पाण्यात रात्रभर ठेवला तर सकाळी मेहंदी रंगाचे पाणी मिळेल. 

सुकलेला आवळा किंवा आवळा चूर्ण  लोखंडी कढईत पाण्यात उकळून रात्र भर  ठेवल्यास सकाळ पर्यंत काळा रंग तैयार मिळेल. 

चहा व काफी पासून हि रंग तैयार केला जाऊ शकतो. जर चाकलेटी रंग मुलांना आवडत असेल तर.

या शिवाय झेंडूंच्या फुलांपासून पिवळा रंग, टेसु फुलांपासून नारंगी रंग  तैयार  करता येतो. पण हे रंग तैयार करायला मेहनत आणी वेळ लागतो. 
 

Wednesday, February 28, 2018

चोरी कृष्णाने केली दंड हि कृष्णाला मिळाला


न्यायाधीश, पेंद्या तुला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. तू चोरी केली हे तू कबूल करतो का? न्यायाधीश महोदय, मी चोरी केली नाही. 'करता करविता स्वयं भगवान कृष्ण आहेत'.  जे घडले ते भगवंताच्या इच्छेने.  शिवाय मी रोज सकाळी भगवंताची पूजा करताना आपल्या सर्व कर्मांची फळे भगवंताला अर्पित करतो. ॐ श्री कृष्णार्पणमस्तु मी चोरी केली हे जरी सिद्ध होत असेल तरीही त्या चोरीची शिक्षा भगवंताला मिळाली पाहिजे मला नाही. 

न्यायाधीश म्हणाले, पेंद्या मग बोलव तुझ्या कृष्णाला. विचार तुझ्या कृत्याची शिक्षा भोगायला तो तैयार आहे का? पेंद्या उतरला, साहेब मी चोरी  केली नाही. भगवंताने केली आहे. भगवंत  नेहमीच आपल्या भक्तांच्या मदतीला येतात, ते गजेंद्रच्या मदतीला आले होते, माझ्या मदतीला का नाही येणार. न्यायाधीश म्हणाले पेंद्या एक वेळ तू म्हणतो म्हणून मान्य करतो, पण कृष्णाला   इथे बोलावणार कसे, तो तर स्वर्गात राहतो, तिथे समन पाठविता येत नाही. 

पेंद्या त्यावर म्हणाला, साहेब भगवंताच्या नावानी पुकारा करा बघ कसा धावत येईल आपल्या भक्ताच्या मदतीला. कोर्टाने भगवंताच्या नावानी पुकारा केला, भगवंत हाजीर हो. काय आश्चर्य, भगवंत साक्षात न्यायाधीश महोदया समोर उठे ठाकले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही भगवंत आहात, सर्वज्ञाती आहात. पेंद्या म्हणतो, चोरी तुम्ही केली, चोरीच्या गुन्ह्याची सजा हि  तुम्हाला मिळाली पाहिजे. पेंद्याचा आरोप  तुम्हाला मान्य आहे का? भगवंत हसत म्हणाले, मला गुन्हा स्वीकार आहे. न्यायाधीश म्हणाले, चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा  पाठीवर ५० कोडे  मारण्याची आहे. नाईलाजाने मला ती शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल.  भगवंत म्हणाले, मी निराकार अविनाशी आहे, माझे हे जे रूप तुम्ही बघत आहात, आभासी आहे. माझ्या,आभासी शरीरावर कुणी कोडे मारले तर तो कोडा  माझ्या शरीरातून आरपार होऊन मारणार्यालाच लागण्याची शक्यता आहे.  सत्य हेच मला कुठला हि दंड देणे शक्य नाही. न्यायधीश महोदय म्हणाले, कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी चोराला दंड देणे गरजेचे, अन्यथा राज्यात अराजकता माजेल. आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला दंड कसा देऊ. भगवंत हसत म्हणाले, मी सर्वव्यापी आहे. प्रत्येकाच्या देहात माझे वास्तव्य आहे. जे भक्त मला आपले चांगले कर्मफळ मला समर्पित करतात. त्या चांगल्या कर्मांचे फळ मी भक्तांच्या देहाच्या माध्यमाने भोगतो. माझ्या इच्छेने पेंद्याने चोरी केली. चोरीचे कर्मफळ हि मला अर्पित केले. चोरीच्या कर्माचे फळ मी पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगणार आहे.  तुम्ही पेंद्याच्या शरीराला कोडे मारण्याचे आदेश द्या, कोडे त्याला लागतील, कष्ट मला होईल.  भगवंताचे म्हणणे ऐकताच हातवारे करत पेंद्या जोरात ओरडला, भगवंता हि तर चक्क फसवणूक आहे. तुला कर्मफळ अर्पित करण्याचा फायदा काय. पण भगवंत केंव्हाच अदृश्य झाले होते. 

न्यायाधीश महोदयाने शिक्षा सुनावली. भगवंतानी चोरीचा गुन्हा कबूल केला. ते हि शिक्षा पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगतील. पेंद्याला ५० कोडे मारले जावे.  

बेचारा पेंद्या त्याची चतुराई, काही कामी आली नाही. गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली.












Tuesday, February 6, 2018

प्रदूषण (१७)- श्री कृष्ण आणि कृष्णा बिल्डर


द्वापर युगात कृष्ण झाला.  कृष्णाने  इंद्राच्या कोपापासून  वृंदावनला वाचविण्यासाठी गोवर्धन पर्वताची पूजा केली. हिरव्या वनस्पतीच्या वस्त्रांनी गोवर्धन पर्वताचा शृंगार केला. त्याच्या पायथ्याशी ९९ तीर्थ बांधले. नानाविध पक्ष्यांचा गुंजारव. फळे-फुलांचा सुगंध. साक्षात स्वर्गच वृंदावनात उतरला. ब्रज वासी सुखी आणि संपन्न झाले. इंद्र पराजित झाला. 


कलयुगात बिल्डर कृष्णाने, पर्वतांना फोडून गिट्टी तैयार केली. तीर्थांना(तलाव) बुजवून तिथे मोठ्या-मोठ्या इमारती बांधल्या. इमारतींपर्यंत पोहचण्यासाठी भव्य रस्ते बांधले. त्या साठी मार्गात येणारे पर्वत, वन-उपवन पशु-पक्षी सर्वांचा विनाश केला. भव्य इमारती तैयार झाल्या. पण पाणीच नव्हते. पाण्यासाठी भांडणे झाली, युद्ध झाले, संपूर्ण मानवजातीचा विनाश झाला. इमारती ओसाड पडल्या. साक्षात नर्क पृथ्वीवर अवतरला. आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीवरच्या जीवांचा संहार करणारा मानव नावाचा दैत्य हि नष्ट झाला. विशेष म्हणजे मानव नावाच्या दैत्याला मारण्यासाठी इंद्राला युद्ध करावे लागले नाही, वज्र हि चालविण्याची गरज पडली नाही. 


टीप: भागवतात कृष्णाने ९९ तीर्थ बांधले असे वर्णन आहे. 

Monday, February 5, 2018

प्रदूषण (१६) - कालिदासाला कोण वाचविणार ???



निरक्षर मूर्ख कालिदास, ज्या झाडाच्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता. काही शहाण्या माणसांनी समजवून त्याला खाली उतरविले. झाड व झाडाची फांदी वाचली आणि कालिदास हि वाचला.   

आजचा शिक्षित विद्वान कालिदास श्रेष्ठत्वाच्या दंभात चूर, अपरिमित इच्छांचा गुलाम. लागली आहे त्याला तहान रक्ताची. धरती मातेचे रक्त रोज पाहिजे त्याला. धरती मेली तरी चालेल पर्वा नाही त्याला. भोगायचे आहे स्वर्गीय सुख धरतीवरच, ययाति सारखे. धरती मरणार आणि त्या सोबत कालिदास हि. कोण वाचविणार आजच्या कालिदासाला. आजचे सर्वच शहाणे कालिदासा सारखेच रोज पितात धरती मातेचे रक्त आणि स्वत:ला शिक्षित म्हणवितात. 

Sunday, February 4, 2018

प्रदूषण (15)- नवी त्रिमूर्ती


ब्रह्माने केली
सृष्टी निर्मिती.

विष्णूने केले
पालन सृष्टीचे.

मानवाने केला
संहार सृष्टीचा.


टीप: महादेवाला तांडव नृत्य करायची गरज नाही. पृथ्वीवरील माणूस त्याची गरज भासू देणार नाही. महादेवाचे नेत्र उघडण्यापूर्वीच सृष्टी नष्ट झालेली असेल. 

Friday, February 2, 2018

प्रदूषण १४ - एक अल्हड भोळी नदी




एक अल्हड  भोळी  नदी 
भटकून  शहरात आली  
मिळाली तिला ओळख नवी  
गंदा नाला नंबर अकरा 




टीप: अंबाझरी तलावातून निघणारी नाग नदी आता नाग नाला म्हणून ओळखली जाते. असी नदी असी नाला इत्यादी. बहुतेक शहरांच्या जवळून वाहणाऱ्या  सर्व नद्यांना नाला म्हणून नवी ओळख मिळालेली आहे. 

Tuesday, January 23, 2018

पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा



     
प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला कठोर तपस्या करावी लागली  अमीर खुसरो यांनी म्हंटले आहे:


खुसरो  रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए  इक रंग.

संसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे.  प्रेम म्हणजे आत्म्याचे  परमात्म्याशी  मिलन.  पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे. पद्मावत महाकाव्याची कथा संक्षेप मध्ये सांगताना  महाकवी जायसी म्हणतात 

तन चितउरमन राजा कीन्हा हिय सिंघलबुधि पदमिनि चीन्हा।
गुरू *सुआ जेई पन्थ देखावा बिनु गुरू जगत को निरगुन पावा?
नागमती यह दुनियाधंधा।बाँचा सोइ  एहि चित बंधा।।
राघव दूत सोई सैतानूमाया अलाउदीं सुलतानू।।

चित्तोडगढ हे माणसाचे शरीर आहे. रत्नसेन नावाचा आत्मा या शरीरात विराजमान आहे. त्याच्या मनात परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा आहे. गुरु बिना परमेश्वराची प्राप्ती संभव नाही.  हिरामन नावाचा पोपट हा गुरु आहे. तो रत्नसेनला मार्ग दाखवितो. सिंहल द्वीप हे प्रेमाने भरलेले हृदय आहे.  या सिंहल द्वीपात वाघ आणि बकरी एकाच घाटावर पाणी पितात.  अर्थात हे हृदय प्रेमाने भरलेले आहे. सात्विक बुद्धी रुपी पद्मावती तिथे निवास करते. शरीररुपी चित्तोड मध्ये तांत्रिक राघव चेतन नावाचा शैतान हि राहतो. त्याच्या पाशी मायावी शक्ती होत्या. तो चंद्र्माच्या कला हि आपल्या शैतानी मायेच्या शक्तीने बदलू शकत होता. पद्मावती चित्तोडला येते. राघव चेतन नावाच्या शैतानाला देश निकाला दिला जातो. अर्थात ज्या हृदयात सात्विक बुद्धी आहे तिथे शैतान निवास करू शकत नाही. अलाउद्दीन खिलजी हा भोग आणी विलासात बुडालेला संसारिक मायेने ग्रस्त मर्त्य मानव आहे. तो आरश्यात पद्मिनीला बघतो. आरसा हा आभासी आहे. मायावी जगाचे प्रतिक. आरश्यातील पद्मिनी हि आभासी. मोह आणि मायेने ग्रस्त अलाउद्दीन खिलजी आभासी पद्मिनीच्या प्राप्तीसाठी चित्तोडवर आक्रमण करतो. 

महाकाव्याच्या अंती गुरुचे मार्ग दर्शन, प्रेमपूर्ण हृदय आणि सात्विक बुद्धी (पद्मावती)च्या सहाय्याने शरीराचा त्याग केल्यावर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होते. अलौकिक प्रेमाचा विजय होतो. 

राजपूत स्त्रिया हवन कुंडात सर्वस्व अर्पण करतात, सती होतात. राजपूत योद्धा संपूर्ण चित्तोड गढाला अग्नीत अर्पण करतात व युद्धात प्राणांची आहुती देतात. सर्वस्व अर्पण केल्यावर त्यांना हि अलौकिक प्रेमाची प्राप्ती.  

संसारिक मोह मायेला सत्य समजणाऱ्या अलाउद्दीन खिलजी काय प्राप्त होते.  शरीर नष्ट झाल्या वर बाकी राहते फक्त शरीराची धूळ किंवा  चितेची राख. खिलजीच्या हाती राख आणि धूळी शिवाय काहीही येत नाही.  

सारांश भोग आणि विलासितेत बुडालेल्या संसारिक जीवाला मुक्ती नाही. अलौकिक प्रेमाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. पद्मावतच्या माध्यमाने महाकाव्याची   महाकवी जायसी यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  



सुआ : हिरामन पोपट 

Monday, January 22, 2018

प्रदूषण (13)- विषारी पुतळा



वाघीण म्हणाली 
छाव्याला 
माणूस म्हणजे 
विषारी पुतळा 
खाणारा त्याला 
नाहक मरणार.




टीप : हवा पाणी आणि अन्न सर्वच विषाक्त खाणार्या माणसाला खाणार्या आदमखोर प्राण्यांचे काय हाल होतील? वाघीण आई आपल्या छाव्याला तेच शिकविते आहे. 

Sunday, January 21, 2018

प्रदूषण (१२) माणूस


विषाची निर्मिती करतो 
विष आनंदाने पितो
सृष्टीच्या विनाशाची 
रोज इच्छा धरतो
माणूस.  



टीप: टूथपेस्ट पासून ते अन्न, वारा, पाणी सर्वच माणसाने प्रदूषित करून ठेवले. तो स्वत: विष पितो आहे आणि स्व:निर्मित विषाने पृथ्वीवरील प्राण्यांचा  विनाश करतो आहे. 

Tuesday, January 16, 2018

प्रदूषण (11)- जंगलात प्रलय





माणसाच्या पाऊल खुणा
जंगलात दिसल्या कावळ्याला
कांव कांव कांव
शेवटची  घटका मोजा
प्रलय आला प्रलय आला ।



टीप: एकदा माणसाचा प्रवेश जंगलात झाला, कि काही काळात ते जंगल नष्ट होते.  

Monday, January 15, 2018

प्रदूषण (३०) - कलयुगात मानवाचा अंत


गेल्या युगात मानव नावाचा अत्यंत बुद्धिमान असा प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होता. कठोर तप करून त्याने अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्या सिद्धींचा जोरावर तो आकंठ भौतिक सुखात बुडालेला होता. पृथ्वीवरच्या इतर जीवांची त्याला यत्किंचित हि पर्वा नव्हती. पण या वरही त्याचे समाधान झाले नाही. अजर-अमर होण्यासाठी त्याने पुन्हा कठोर तप सुरु केले. अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मनुजपुत्र तुझ्या कठोर तपस्येने मी प्रसन्न झालो आहे, काय पाहिजे तुला मागून घे, अमरतेचे वरदान सोडून. पण वर मागण्याआधी विचार कर. अहंकारने ग्रस्त मनुजपुत्र म्हणाला, मी काही राक्षसांच्या सारखा मूर्ख नाही. तुम्ही निर्मित केलेले भूचर, जलचर, नभचर, देव आणि दानव यांपैकी कोणताही जीव माझा वध करू शकणार नाही. पण मी ज्याच्यावर हात ठेवेल तो तक्षणी मरणार, असा वर द्या. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हंटले, आणि ते अदृश्य झाले.   

आता मी सर्व शक्तिमान, माझ्या शक्ती समोर देव, दानव सर्व  तुच्छ. म्हणतात नाविनाशकाले विपरीत बुद्धी. अहंकाराने ग्रस्त मनुजपुत्राची बुद्धी विपरीत झाली. त्याने सर्वप्रथम, प्राण्यांवर हात ठेवला. पृथ्वीवरील सर्व जीव-जंतू विलुप्त झाले. मग मानवाने झाडांवर हात ठेवला. सर्व वनस्पती नष्ट झाली. तहान लागली म्हणून मानवाने पाण्यात हात घातले, पाणी  मृत आणी विषाक्त झाले. वायूचा स्पर्श मानवालाच्या हाताला जाणविला. माणसाचा हाताचा स्पर्श होताच, वायुतून प्राणवायू निघून गेलीभूक, तहान आणि प्राणवायूच्या अभावाने, तडफडून-तडफडून कलयुगात मानवाचा दारूण अंत झाला. 


Saturday, January 13, 2018

प्रदूषण (१०)- शंकर



रोज कचरा  उचलतो 
त्याची  विल्हेवाट करतो 
धरतीला वाचविण्यासाठी 
रोज हलाहल पितो
शंकर .




टीप: तो कचर्याच्या ढिगाऱ्यातून, रिसायकल करण्यासाठी कचरा वेगवेगळा करतो.  कचर्यात वावरल्याने अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. दुसर्या शब्दांत तो रोज हलाहल पितो. पृथ्वी वरील मानव जीवन काही काळ आणखीन वाचविण्यासाठी. 

Friday, January 12, 2018

प्रदूषण (९)- कैन्सर ट्रेन




शेतात टाकले 
विषाक्त रसायने 
तिकीट कैंसर ट्रेनचे 
एडवान्स काढले. 


टीप:रोज बठिंडा पंजाब  येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला  जाते.  त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये  कैंसरग्रस्त शेतकरीच असतात.बीकानेर येथे कैंसरचे मोठे  हॉस्पिटल आहे. आता बठिंडायेथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.