Saturday, June 13, 2015

शतशब्द कथा -दोन किनारे


एका दुसर्याच्या हातात-हात गुंफून, हसत-खेळत, पाण्यात भिजत, दोन किनारे पाण्यासहित समुद्राला जाऊन सहज भेटले असते. पण दोन्ही किनारे श्रेष्ठत्वाच्या वाळवीने ग्रसित होते. डाव्या किनाऱ्याला वाटायचे, त्यालाच  समुद्राकडे जाणारा रस्ता माहित आहे. उजव्या किनाऱ्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. उजव्याला वाटायचेसोपा सरळ मार्ग त्यालाच माहित आहे.  त्यांच्या आपसातला वाद-विवाद आणि कलह शिगेला पोहचला. एक किनारा पूर्वीकडे वळला तर दुसरा किनारा पश्चिमेकडे. पाणी वाळवंटात हरवले. 


एखाद्या प्रेताप्रमाणे ते वेगवेगळ्या दिशेला अंतहीन वाळवंटात पाण्याच्या शोधात भटकू लागले.  पाण्याअभावी ते तडफडू लागले.  देवा! सुटका कर या मरण यातनेतून. पाणी....पाsणी... मिळेल का कुठे एक थेंब पाssणी....  त्यांचे करुण क्रंदन वाळवंटातच विरून गेले. दोन्ही किनारे अखेर अस्तित्वहीन झाले.

Thursday, June 11, 2015

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच - इमानदार सत्यवादी

स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात ध्यानमग्न अवस्थेत होते. त्यांच्या डोळे उघडण्याची वाट पाहत त्यांच्या पुढ्यात बसलो होतो. अचानक स्वामीजींनी डोळे उघडले. क्षण ही न गमावता मी लगेच प्रश्न विचारला, स्वामीजी एक शंका आहे. आजकाल इंद्रप्रस्थि जे काही चालले आहे, ते बघून सत्यवादी इमानदार या शब्दांबाबत  शंका उपस्थित झाली आहे.    स्वामीजींच्या चेहऱ्यावर हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, इमानदार व्यक्ती हा सत्यवादी असतो, सत्यवादी हा इमानदार असतो.   इमानदार सत्यवादी कधीच खोटे बोलत नाही.  संभ्रमात पडलेल्या अज्ञानी मानवांना हे कळणे कठीणच आहे. त्या साठी दिव्य दृष्टीची आवश्यकता असते.

मी म्हणालो, स्वामीजी मला काहीच समजले नाही, माझ्या सारख्या अज्ञ बालकाला समजेल अश्या भाषेत स्पष्ट करा.  स्वामीजी म्हणाले, रस्त्यावर भटकणारा रेडा, मानवी भाषेत बोलू शकतो, असे जरी मी म्हंटले तरी तुझा या वर विश्वास बसेल का? स्वामीजी क्षणभर थांबले. माझ्या चेहऱ्यावर उमटणारे भाव निखरत म्हणाले, अर्थातच नाही. पण 'ज्ञानिया वेद बोले, रेडा भी वेद बोले' असे म्हंटले तर तुझा विश्वास त्यावर बसेल. ज्ञानेश्वर माउलीचे वचन असत्य ठरू शकत नाही.  तसेच राजा हरिश्चंद्राने म्हंटले उद्या सूर्य पश्चिमेस  उगवणार आहे, तर ब्रह्मदेवाला ही सूर्याला मार्ग बदलण्याची आज्ञा द्यावी लागेल. सूर्य पश्चिमेला उगवेल.   


इमानदार सत्यवादी माणसाच्या मुखातून कधीच असत्य बाहेर पडू शकत नाही. जर इमानदार सत्यवादी म्हणतो, माझे अनुयायी इमानदार आहे, त्यांनी काहीही चुकीचे केले नाही आहे. तर ते दुसर्यांना कितीही खोटे वाटत असले तरी ते सत्यच असते. त्यांच्या अनुयायांनी केलेले प्रत्येक कृत्य हे सत्यावर आधारित असते फक्त डोळ्यांवर पसलेल्या अज्ञानाच्या परद्यामुळे सत्य अज्ञानी लोकांना दिसत नाही. असे म्हणत स्वामीजींनी डोळे बंद केले, ते पुन्हा ध्यानावस्थेत गेले.   

  


Tuesday, June 2, 2015

तपश्चर्येचे फळ



मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते.  गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते. माझा नाईलाज आहे, असे म्हणत त्याने धूम ठोकली. लोकांपासून दूर तो घनघोर अरण्यात पोहचला. स्वर्ग प्राप्ती साठी त्याने कठोर तपश्चर्या सुरु केली.  वल्कल परिधान केले. झोपायला धरती आणि पांघरायला आकाश. कंद मूळ, फळे हाच त्याचा आहार. कधी ही संसारिक भोगांचा विचार त्याचा मनात आला नाही. सतत नामस्मरणात तो दंग राहायचा. काळ लोटला. तो म्हातारा झाला आणि मरण पावला. 


चित्रगुप्ताने त्याच्या  पाप-पुण्याचा हिशोब केला. एक दिवस स्वर्गात राहण्याचे पुण्य त्याचा पदरी पडले. त्याला आनंद झाला. एक दिवस का होईना, त्याला स्वर्गीय देवतांचे दर्शन घेता येईल. जन्माची तपस्या सफल होईल. देवदूत त्याला स्वर्गात घेऊन आले. अनेक सुगंधित उबटने अंगाला लाऊन, त्याला स्नान घातले. उंच भरजरी रेशमी वस्त्र त्याला नेसायला दिले.  इंद्राच्या सभेत त्याला घेऊन पोहचले. सभेत इंद्र आणि इतर देवता,  रम्भा, उर्वशीचे नृत्य पाहण्यात दंग होते. त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून उठला, त्याचे स्वागत केले. त्याला आपल्या जवळच्या मंचकावर बसवले. एक अप्सरा सोमरसाचे पात्र घेऊन त्याच्या  जवळ आली. इंद्र त्याला म्हणाला, स्वर्गीय अप्सरांचा नृत्याचा आनंद घेत सोमरसाचे प्राशन कर. आज आपल्या आवडत्या अप्सरे बरोबर तू मनसोक्त रमण करू शकतो. वेळ घालवू नको. हा एका दिवसाचा स्वर्गीय आनंद तुझ्या कठोर तपस्येचे फळ आहे. उचल ते सोमरसाचे पात्र. त्याने समोर पहिले, रम्भा-उर्वशी सोमरसाच्या धुंदीत देहभान विसरून नाचत होत्या. दोघींचे  वस्त्र अस्तव्यस्त झाले होते, दिसू नये ते सर्व दिसत होते. पण त्यांना त्याची लाज नव्हती. सर्व देवता ही मद्याच्या धुंदीत होते.   चिरयौवना सुंदर अप्सरांच्या ओठांचे स्पर्श झालेले सोमरस देवगण आनंदाने प्राशन करीत होते. आजच्या सिने तारकांना लाज वाटेल असे वस्त्र अप्सरांनी परिधान केले होते.  अप्सरांच्या गळ्यात गळे घालून देवगण कामोत्सव साजरा करण्यात मग्न होते.  हे सर्व पाहून, त्याला आठवले, काही वर्षांपूर्वी त्याचा मित्र त्याला फार्म हाऊस वर नवीन वर्षाच्या पार्टीत घेऊन गेला होता. तिथे तोडक्या वस्त्रातल्या बारबाला लोकांना ड्रिंक्स सर्व करीत होत्या. तिथे सर्व स्त्री-पुरुष लोक-लाज विसरून मद्याच्या धुंदीत नाचत होते. खुलेआम भोगविलास सुरु होता.  त्या पार्टीहून परतल्यावर त्याला संसारापासून विरक्ती झाली.  इथे येऊन पाहतो तर स्वर्गात ही तोच प्रकार. त्याला सवाल पडला, त्याच्या कठोर तपस्येचे फळ हेच का? असा आनंद तर काही पैका खर्च करून पृथ्वीवर सहज प्राप्त होतो.  संपूर्ण आयुष्य अश्या स्वर्ग सुखा  साठी मोजले. त्याला त्याचीच लाज वाटली. परित्यक्ता पत्नीची आठवण आली. आपण तिची प्रतारणा केली, एवढ्या शुल्लक गोष्टी साठी. तिची माफी मागितली पाहिजे. इंद्रसभा सोडून तो निघाला, पण तिला शोधणार  कुठे?   कुठे असेल ती आज. अचानक त्याला एक अंधुक आकृती दिसली, तीच ती त्याची पत्नी. तो जोरात ओरडला, माफ कर मला. अहो, काय झाले तुम्हाला, कसली माफी, काही स्वप्न पहिले का?  तो दचकला, आपण बिछान्यावर झोपलेलो आहे, हे त्याच्या लक्ष्यात आले. त्याने लगेच स्वत:ला सावरले.  तिच्या हातातला केशरमिश्रित दुधाचा गिलास आपल्या हातात घेत तो म्हणाला, मधुमिलनाची रात्र जागून काढायची असते, डोळा लागला, गुनाह घडला आहे हातून. अपराधीला दंड हा मिळालाच पाहिजे. तिला त्याचे ऐकून हसू आले, ती म्हणाली अजून भरपूर रात्र बाकी आहे, तुम्ही म्हणाल तिथे तुम्हाला शिक्षा करीन. त्या नंतर काय झाले कुणी-कुणाला शिक्षा केली, कशी केली, अंधार असल्या मुळे काहीच कळले नाही.




 वह क्या समझता है, चुन्नी  मियां के पैसे डुबायेगा,  मेहनत की कमाई है.  पैसे नहीं चुकाए तो देखना एक दिन उसकी मोटी गर्दन पकड़कर कोई बकरा ही उसे हलाल करेगा.

Sunday, May 31, 2015

नदीचे भविष्य


 पूर्वी पाणी असलेल्या नद्या आज कोरड्या झालेल्या आहेत. एवढेच काय अनेक महाकवी कालिदास यांना आवडणारी क्षिप्रा नदीचे पात्र ही कोरडे पडले आहे. नर्मदेच्या पाण्यामुळे ती कशीतरी श्वास तरी घेते आहे.  पण गावाकडच्या  अनेक लहान लहान नद्या केंव्हाच दिवंगत झाल्या आहेत  किंवा नाल्याच्या स्वरूपात वाहतात आहे. उदा: नागपूरची नाग नदी (लोक या नदीला नालाच म्हणतात).


हिमाच्छादित मुकुट माझा 
वितळून गेला केंव्हाच

हिरवे वस्त्र जरतारी
जीर्णशीर्ण झाले आज. 

गोड पाण्याचा भंडार
उदरात नाही आज.  

हे समुद्राकांशी नदी 
नाही मजजवळ जीवन प्रवाह.
विरून जावे लागेल तुला 
मनुष्यकृत वाळवंटात



गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
पुढे वाचण्यासाठी ....

वरुण राजाला साकडं





 




Saturday, May 30, 2015

जंगल पूर्वीचे आज महानगर झाले

जंगल  पूर्वीचे 
आज महानगर झाले 
पहिल्या पेक्षा जास्त 
खतरनाक झाले. 


भरल्या पोटी वाघ 
करत नव्हता शिकार. 
बेधुंध कार आज 
कधीही घेते प्राण. 

तेंव्हा दरवळत होता 
सुगंध मलयज गिरीचा.
पेट्रोलच्या वासाने आज 
कासावीस होतो प्राण.

कांव कांव कावळ्यांचे
घरटे उंच मीनारांवर
अंगणातली चिवताई 
कुठे हरवली आज.

***
रेशमी कोशात शोधले
मधाचे मोहोळ त्याने ......
पुढे वाचण्या साठी 

ऐसेच जीवन जगते

 



Thursday, May 28, 2015

गूढ कथा: अक्कल दाढ

 
(काल्पनिक कथा)

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट  फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले.दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. 

सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच  निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल. मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का? डॉक्टर मिस्कील पणे हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीव घेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील. काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळा ठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. मुले ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. कार्यालयात पोहचल्यावर ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमिरात ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आल्यावर मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो.  आरश्यात मला माझा चेहरा काळा ठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही. 
 

Saturday, May 23, 2015

विरहणी आणि वीज


उन्हाळ्यात सर्वांच्या अंगांची लाही लाही होऊ लागते, त्यात  विरहाने व्याकूळ विरहणीची दशा काय झाली, कल्पनाच करणे अशक्य.  १०० डिग्री सेंटीग्रेड तापलेल्या या विरहणीच्या शरीराचा काय बरा उपयोग  होऊ शकतो, अशी खट्याळ कल्पना मनात आली.


विरहणीच्या डोक्स्यावरी 
मी पाण्याची धार धरली 
वाफेचा उसळत्या डोंबावरी 
चालविला जनरेटर  भारी
अशी म्या वीज वाचविली.

ज्ञानियाचा पाठीवर 
भाजली होती पोळी 
विरहणीच्या पाठीवर 
मी *पिज्जा बेक केला. 
अशी म्या वीज वाचवली.

(* युग बदलले आता पोळीच्या जागी पिज्जा)

पण कधी कधी असे ही होऊ शकते 

विरहणीच्या अंगाला 
मजनूने हात लावला 
करंट ४४० लागला 
मजनू  खलास  झाला. 

सरडा आणि इतर क्षणिका

 

Sunday, May 17, 2015

एक उनाड उन्हाळी दिवस - सीपीचा सेन्ट्रल पार्क आणि अमलतास



मे आणि जून  ह्या दोन महिन्यात सूर्य क्रोधाने लाल होऊन आग ओकीत असतो. या आगीत जिथे धरणी माताच होरपळून जाते, तिथे पृथ्वीवरील प्राण्याची काय बिसात.  दिल्लीत रस्त्यावर फिरणार्या आवारा गायी व कुत्रे  दिवसभर सूर्याच्या क्रोधापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सावली आणि पाण्याच्या शोधात भटकत राहतात. दुपारच्या वेळी तर झाडावर पक्षी ही झाडाच्या कोटरात दुबकून राहतात. 

दुपारचे तीन वाजले होते, सीपीच्या मेट्रो स्टेशनहून  बाहेर पडलो.  सीपीच्या सेन्ट्रल पार्कमध्ये भरपूर हिरवळ आहे.  झाडे- झुडपे ही पुष्कळ आहेत.  पार्कच्या जवळून जाताना नेहमीच झाडावर असलेल्या  पक्ष्यांची किलबिल ऐकू येथे. तर दुसरीकडे त्यांच्या खाली भारी संख्येने बसलेल्या  प्रेमी जोड्यांची गुटरगूं ही ऐकू येते. पण आज पार्कमध्ये स्मशान शांतता पसरलेली होती. सिनेमातला खलनायक जास्तीसजास्त तीन एक तास नायक- नायिकेला एका दुसर्यापासून दूर ठेवतो. पण क्रोधाने भडकलेला सूर्यदेव तर तब्बल दोन महिन्यांसाठी प्रेमी-प्रेमिकांना विरहव्यथा भोगण्यास विवश करतो. मनात विचार आला, दोन महिन्याचा विरह आजच्या इनस्टेन्ट जमान्यातल्या प्रेमी-प्रेमिकांवर भारीच पडणार. या अवधीत कदाचित् कित्येकांना आपल्या प्रियकराचा विसरही ही पडत असेल. अचानक  डोक्यावर एक पिवळे धम्म फुल पडले. वर बघितले, ऐन उन्हाळ्यात ही अमलतास बहरलेले होते. असे पिवळ्या धम्म फुलांनी नटलेले अमलतास पाहून 'फिर छिड़ी रात बात फूलों की रात है या बरात फूलों की' हे गाणे आठवले. पण  इथे तर 'जेठ कि दुपहरिया में बात फूलों की,  प्यार की बात, बात फूलों की'.  मी सहजच  अमलतासला विचारले,  सूर्याच्या  तेजाने समस्त धरती होरपळून गेली आहे. वेली आणि झाडे सुकून कांतिहीन झालेली आहे. तू मात्र प्रफुल्लित आणि आनंदी दिसत आहे. या प्रचंड उन्हाळ्यात ही वसंताचा आनंद उधळीत आहे. क्या बात है. अमलतास खळखळून हसला. फुलांचा वर्षाव माझ्या अंगावर झाला, तो म्हणाला वासंतिक प्रेमाला अजूनही मी आपल्या हृदयात जपून ठेवले आहे. विरह माझ्या जवळ फटकत ही नाही.  पहा कोकिळा आज ही माझ्या फांदीवर बसून प्रेमाचे गाणे म्हणते आहे

खरंच, ज्याचे हृदय प्रेमानी भरलेले आहे. तो विरहात  ही प्रफुल्लित आणि आनंदी राहतो.  मनात विचार आला, या सेन्ट्रल पार्कमध्ये प्रेमाच्या हितगुज करण्यार्या प्रेमी जोडप्यांनी  दोन महिने आपले प्रेम जपून ठेवले तर  वर्षा ऋतूत  त्यांच्या प्रेमाला  पुन्हा नवे अंकुर फुटतील. अमलतास प्रमाणे त्यांचे प्रेम ही बहरेल. आपल्या मनात चाललेल्या या विचारांचे माझे मलाच हसू आले. सहज आकाशाकडे बघितले, क्रोधाने आग ओकणारा सूर्यदेव आता निस्तेज आणि तेजहीन दिसत होता. सूर्य तोच होता, तीच प्रचंड विरहाची आग, पण पाहण्याचा दृष्टीकोन बदलला किती फरक पडतो.   

सिनेमाचे गाणे आठवण्याचा प्रयत्न करत पुढे चालू लागलो.


Thursday, May 14, 2015

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू


तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल.   अर्थात थोडा मोठा झालो होतो.   खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे.  मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते.  मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता.  म्हणून त्या मैदानाला लोक  स्टीफन ग्राउंड म्हणून  ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत   २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भा मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची  कल्पना करणे ही शक्य नव्हते.  आम्ही ५-६  मराठी मुले, काही मोहल्यातली आणि  दोन-चार मुस्लीम मुले ही येऊन जाऊन आमच्या टीम मध्ये मध्ये खेळत असे. सर्वच गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय असल्यामुळे प्रत्येकी १०-२० पैशे गोळा करून खेळण्यासाठी २-३ रुपये जमवून काॅर्कचा  चेंडू विकत घ्यायचो.   त्या वेळी क्रिकेटचा चेंडू १-१४ रुपयांना मिळत असे.    श्रीमंत मुलांचे पांढरे शुभ्र वस्त्र, चांगल्या दर्जाच्या बेट्स आणि त्याहून वेगळे म्हणजे ते क्रिकेटच्या चेंडूने क्रिकेट खेळायचे. त्यांना  पाहून आम्हाला इर्षा होणे साहजिकच होते. क्रिकेटच्या चेंडूने खेळण्याची आपली इच्छा कधी पूर्ण होईल हे वाटत नव्हते.  

एक दिवस असाच मैदानात गोटू भेटला.  माझ्याच वयाच्या असेल.  त्याच्या जवळ क्रिकेटचे २-३ चेंडू होते. त्याने आणलेल्या  चेंडूंचा दर्जा पहून आम्हाला ही राहवले नाही. त्याला सहज विचारले, कितीला देतो.  १ रूपये से ५ रूपये तक की गेंद अपने पास है. लेना है तो बोलो.  माझ्या मित्राला शंका आली त्याने विचारले, कहाँ से लाते हो इतनी सस्ती  गेंदे. तो ऐटीत म्हणाला, अपनी जानपहचान है, DDCA में(Delhi District Criket Association).  DDCAवाले मेच संपल्यावर जुने चेंडू  ओळखीच्या लोकांना स्वस्तात विकतात. काही चेंडू तर एक-दोन ओवर जुने सुध्दा असतात. असे चेंडू तो डझनच्या भावाने  विकत घेतो.  २-४ ओवर जुना, अर्थात नवीन चेंडू  3-4 रुपयांना विकतो. थोडे जुने चेंडू असेल तर मिळेल त्या किमतीला अर्थात १-२ रुपयांना.  अर्थातच आम्ही ही कधी १ रुपया तर कधी दीड आणि अगदी नवा कोरा चेंडू असेल तर ३ रुपये देऊन ही  त्याच्या कडून क्रिकेटचे चेंडू विकत घेऊ लागलो. गोटू क्रिकेट ही चांगला खेळायचा, कधी-कधी सकाळच्या वेळी तो आमच्या सोबत ही खेळत असे. २-३ दिवसांनी कळले गोटू हे त्याचे टोपण नाव होते. खरे नाव असलम  होते. तो   बल्लीमारान या भागात राहायचा.

शाळेला हिवाळ्याच्या सुट्या लागल्या, गोटूने   वादा करून ही चेंडू आणून दिला नाही.  नंतर कळले आमच्या साठी आणलेला  चेंडू त्याने २ रुपयांना दुसर्या टीमला  विकला होता.  या वर माझ्या मित्राने त्याला जोरदार झाडले.  अखेर त्याने सांगितले आज सकाळी ११ वाजता तो फिरोजशाह कोटला येथे  जाणार आहे.  चेंडू भेटले तर उद्या सकाळी चेंडू आणून देईल.  आमचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. मी आणि माझ्या मित्राने ठरविले आपण ही तिचे जाऊ, पाहू कुणा कडून हा चेंडू विकत घेतो. एकदा कळले कि आपल्याला ही त्या माणसाकडून थेट थोक मध्ये चेंडू विकत घेता येतील. आपण ही चेंडू विकून पैसा कमवू.  सकाळी ११च्या सुमारास मी आणि माझा मित्र पायी-पायी चालत दिल्लीगेट वर पोहचलो. पूर्वी फिरोजशाह कोटला स्टेडियम आज सारखे मोठे नव्हते. एक रस्ता दिल्लीगेट हून राजघाट कडे जातो. एका बाजूला जुन्या दिल्लीची भिंत. भिंतीच्या मागे दरियागंज आणि  समोर बगीचा.  रस्त्याच्या दुसर्या बाजूला फुटबाल स्टेडियम, बस स्थानक आणि एक गल्ली सरळ  फिरोजशाह कोटला स्टेडियम कडे जाते. गल्ली आणि स्टेडियमच्या भिंती यांच्या मधल्या भागात एक लहानसे मैदान होते.   मैदानाच्या एका भागात अभ्यासासाठी काही नेट्स आणि मध्ये एक क्रिकेटची पिच होती. तिथे बहुतेक DDCAच्या लीग मचेस  व्हायच्या.  आम्ही तिथे पोहचलो तर बघितले, राजघाट कडे जाणारा रस्ता आणि स्टेडियम कडे जाणार्या गल्लीच्या टोकावर  गोटू बसलेला होता.  मैदानात क्रिकेटची मेच सुरु होती. आम्हाला पाहताच तो चाचपला. म्हणाला, धन्धेका राज जानने आये हो क्या? भरोसा नहीं है मुझपे.  मी म्हणालो, भरोसा असता तर इथे कशाला आलो असतो. बाकी तुझ्या धंद्यात आम्ही टांग नाही अडविणार. आम्हाला फक्त चेंडू पाहिजे. तो म्हणाला सध्या मच सुरु आहे, काही काळ इथे उन्हात बसावे लागेल. मी म्हणालो, इतक्या दुरून मच पाहाण्यापेक्षा  थोड पुढे झाडाखाली हिरवळीवर बसू. खेळ व्यवस्थित बघता येइल.  तो फक्त हसला आणि म्हणाला, अब आ ही गये हो तो चुपचाप यहाँ बैठो और तमाशा देखो.  आम्ही ही त्याच्या सोबत चुपचाप बसलो. थोड्याच वेळाने, फलंदाजाने एक जोरदार फटका मारला आमच्या दिशेने चेंडू वेगात उसळी मारून रस्त्यावर  आला. गोटू जणू काही याच क्षणाची वाट पाहत होता. त्याने धावत जाऊन चेंडू उचलला आणि जोरात ओरडला, भागो, भागो. काही क्षण आम्हाला काहीच समजले नाही, पण त्याला रोड  पार करून पळताना बघितले  आणि आम्ही ही त्याच्या मागोमाग धूम ठोकली.  भिंती समोर असलेल्या बगीच्यात ही बरीच मुले क्रिकेट खेळत होती.  त्यांची परवा न करता पळत-पळत आम्ही भिंतीत असलेल्या लहानश्या भेगेतून  आत  शिरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. गोटू आम्हाला पाहत हसत म्हणाला, क्यों मजा आया ना. अबे बेवकूफों की तरह क्यों बैठे रहे. थोड़ी और देर हो जाती तो,पकडे जाते. बहुत मार पड़ती है. कभी कभी तो पुलिस को  भी सौंप देते हैं. जान हथेली पर रख कर गेंद जुटता हूँ तुम्हारे लिए. फिर भी भरोसा नहीं करते हो. मनात विचार आला, पकडल्या गेलो असतो तर....  आपली काही  चुकी नसताना ही भरपूर मार खावा लागला  असता.   घरी जर हा प्रकार कळला असता तर.  त्याची कल्पनाच करणेच अशक्य होते. क्रिकेट खेळणे तर बंद झाले असते, हे निश्चित.  थोड्या वेळाने,  मी गोटूला विचारले एवढा धोका पत्करून तू चेंडू चोरून आणून विकतो. मिळालेल्या पैश्याचे तू काय करतो. काही क्षण तो माझ्या कडे बघत राहिला, त्याचे डोळे पाणावले, तो म्हणाला घर पर   मुझसे छोटे दो भाई और एक बहन भी है. दो साल पहिले  मेरी माँ गुजर गयी, बाप ने दूसरी शादी की है.  त्याचा बाप संध्याकाळी साप्ताहिक बाजारांमध्ये भाजीची रेडी लावतो.  तो बापाला त्याच्या कामात मदत करतो.  पण बापाची नजर भारी. तो  त्याला  एक छदाम ही कधी देत नाही.   घरी सावत्र आई त्याच्या लहान  भावंडानां धड खायला ही देत नाही.  बापाला काही म्हंटले तर तो त्यांच्या वरच ओरडतो. कधी-कधी हात ही उगारतो.   या जान जोखिम मध्ये टाकून मिळवलेल्या  पैश्यानी तो लहान भावंडाना सावत्र आईच्या न कळत  खायला आणून देतो.  पुढे काय बोलावे, हे त्या वयात मला कळणे शक्य नव्हते. मुकाट्याने मी आपल्या घराकडे निघालो. जाताना त्याला आजची  घटना कुणाला ही सांगणार नाही याचे वचन दिले.  त्या  हिवाळी   सुट्ट्यात  आम्ही त्याला दिलेले वचन पाळले ही. पुढे  उन्हाळी  सुट्ट्यात तो आम्हाला मोरीगेटच्या मैदानात चेंडू विकताना दिसला नाही.  

या वर्षीचे  आय पी एलचा मेच पाहत असताना, कुणास ठाऊक,  तब्बल ४२ वर्षांनतर त्याची  आठवण आली.   काय करत असेल तो. ...


आजचा कवी

Friday, May 8, 2015

एक दिवसाची गोष्ट - सोनेरी किरणे

  नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत.  अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील.  काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता.  अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात.  संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर  बस  क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या  बाजूला एक  वाळलेले, पोखरलेले  झाडाचे खोड पडलेले होते.  बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून  पडले असावे.  गेल एकदाच हे  ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी  हे झाड हिरवेगार होते. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, लाल बत्ती वर चार्टर बस थांबली कि कित्येक बाबू खिडकीतून हात लांब करून, झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्याचा प्रयत्न करायचे.  काही चक्क बस वर चढून, फांद्या तोडायला कमी करायचे नाही.  अर्थातच, दातून साठी.  बस थांबली असताना पक्ष्यांची किलबिल ही ऐकू यायची.  पण वेळ सदा एक सारखा राहत नाही, काही वर्षांपूर्वी झाडाला वाळवी लागली. वाळवीने झाड पोखरून टाकले. एक-एक करून फांद्या गळून पडल्या.  संसारापासून अलिप्त तपस्वी सारखे दिसायचे ते सुकलेले झाडाचे खोड.   आज ते ही गेल. अचानक लक्ष्य त्याच जागेवर दीड-दोन फुट उंच एक कडू  लिंबाच्या लहानश्या रोपट्याकडे गेले.  अरेच्या हे कुठून आले, एका दिवसात रोपटे एवढे वाढत नाही.  काही महिन्याचे हे निश्चित असेल.  झाडाच्या सावलीत वाढणाऱ्या या रोपट्या कडे आपले लक्ष कसे  गेले नाही.  झाड गेल्याचे दुख कुठच्या कुठे पळाले.    काही वर्षात ह्या रोपट्याचे ही मोठे झाड होईल.  एक मोठ्या बहरलेल्या झाडाचे चित्र डोळ्यांसमोर तरळले.   आनंदाने युरेका-युरेका म्हणत जोरात ओरडायचे  वाटले.  पण काय करणार, सभ्यतेच्या बुरख्यात राहणार्यांना, आनंद ही मोठ्याने ओरडून व्यक्त करता येत नाही.


जीवन पार्कच्या स्थानकावर बस थांबली,  बस मधून उतरून घराकडे पायी चालत जाऊ लागलो.  एका गल्लीत घराबाहेर खाटेवर एक म्हातारी झोपलेली दिसायची. आजकाल तिच्या सोबत दीड-दोन वर्षाची एक चुणचुणीत पिटुकली, बहुतेक तिची नात असावी  सोबत खेळताना दिसायची.  कालचीच गोष्ट,  त्या गल्लीतून जाताना, ती पिटुकली आपल्या हातातले बिस्कीट  म्हातारीला दाखवत म्हणत होती,  दादी, आप भी लों ना चीजी (खाऊ).  तिची दादी प्रेमाने तिच्या डोक्यावर फिरवीत म्हणाली, आपने खा लिया न, समझो मेरा पेट भर गया.  अचानक पिटुकलीचे   लक्ष्य माझ्या कडे गेले,  हातानी बिस्कीट उंचावत आनंदाने ती म्हणाली, चीजी (खाऊ) आणि  दुडदुड धावत धावत घरात गेली.  मला हसूच आले, म्हातारीकडे पहिले. अस्ताचलच्या सूर्याचे सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर  पसरली होती.  तिचे डोळे बंद  होते.   तिचा चेहरा संतुष्ट, शांत आणि आनंदी दिसत होता.  काही क्षण मी तिला पाहतच राहिलो.  अचानक एका आवाजाने तंद्रा भंग झाली. अंकल क्या हुआ, एका दहा एक वर्षाच्या मुलाने विचारले. कुछ नहीं,  म्हणत मी तिथून पाय काढला.  आज त्या गल्लीतून जाताना  सदानकदा  घरा बाहेर असलेली खाट दिसत नव्हती. त्या जागी  घरा बाहेर  एका सतरंजीवर  पांढऱ्या  वस्त्रात आणि पडलेले चेहरे करून लोक बसलेले दिसले.  काय झाले असावे मला याची कल्पना आली.   पण घरात काय घडले  याची कल्पना इवल्याश्या पिटुकलीला कशी असणार. ती नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट घेऊन इकडे तिकडे दुडदुड धावत होती.  तिचे लक्ष्य माझ्याकडे गेले, हातातले बिस्कीट दाखवत म्हणाली, अंकल, चीजी लोगे,  मला राहवले नाही, तिच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणालो, आप के लिये है चीजी, आप ही खाओ.  तेवढ्यात तिची आई बाहेर आली,  तिने तिला उचलले आणि   घरात नेले. मी पुढे निघालो.  न जाणे का,  डोळे  पाण्याने डबडबले. डोळ्यावरून चष्मा काढला आणि रुमालाने  डोळे पुसले. सहज वर आकाशात बघितले, अस्ताचालच्या सूर्याचे सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती.  मनात म्हंटले, उद्या उगविणाऱ्या सूर्याची किरणे ही सोनेरीच असणार.  संहार आणि सृजनाची दोन्हीची साक्षी ही सोनेरी किरणे.    


निळे फुलपाखरू - घरात घडलेली सत्य घटना





Monday, May 4, 2015

एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते.  

त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता.  काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला. बाहेर प्रचंड तापलेले होते, जोराचे गरम वारे ही चालत होते. तेवढ्यात विजयला अतुल पायी-पायी येताना दिसला. अतुल, विजयचा लंगोटी यार होता.  दोघांचे बालपण जुन्या दिल्लीत गेले होते. दोघांचे शिक्षण ही एकाच शाळेत झालेले. पुढे विजय सरकारी नौकरीत लागला आणि अतुल एका कंपनीत सेल्समन. त्याला कामानिम्मित बाहेर हिंडावे-फिरावे लागायचे. तरी महिन्याकाठी ते एक दोनदा तरी ते भेटायचेच. कुठले ही काम एका दुसर्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते करायचे नहीं. सात-आठ महिन्यापूर्वी अतुलचे लग्न झाले होते. बायको मुंबईकर होती. लग्नानंतर घरी पटले नाही, म्हणून बायको सोबत जनकपुरी येथे भाड्याच्या फ्लेट घेऊन वेगळा राहू लागला होता. त्याला पाहताच विजयने विचारले, कुठून  येतो आहे. अतुल म्हणाला, सेक्टर १२ पासून येतो आहे, इथे भिकाजी कामात काही काम आहे.  विजय ने विचारले, अतुल, बस का नाही घेतली. अतुल, एक-दीड किलोमीटर अंतर साठी बस काय घ्यायची. जेवढा वेळ बसची वाट पहावी लागणार, तेवढ्या वेळात तर आपण पायी पोहोचतो सुद्धा. विजय, अरे ते ठीक आहे, पण उघड्या डोक्स्यानी का फिरतो आहे,  डोक्स्यावर काहीतरी घालायला पाहिजे होते, उगाच लू लागेल. अतुल हसत म्हणाला, यार, माझ्या कामात उन्हातान्हात फिरावेच लागते. आता उन्हाची सवय झाली आहे. लू काय बिगाडेल आपल्या सारख्यांचे.  विजयला त्याच्या बोलण्याचा रागच आला, दिवसाचे दीड वाजले आहे,  बाहेर भयंकर तापलेले आहे, प्रचंड गरम वारे चालत आहे आणि या गाढवाला त्याची काही फिक्र नाही, कमीत-कमी रुमाल तरी त्याने डोक्यावर बांधायचा होता. तो रागातच म्हणाला, लेका गाढवा तुझ्या लग्नाला वर्ष  ही झाले नाही आहे, कशाला वर जाण्याचा खटाटोप करतो आहे. वहिनीचा तरी जरा विचार कर. असाच नंग्या डोक्स्याने उन्हातान्हात फिरेल तर, गाढवा तू लू लागून वर जाशील, तिथे वर गेल्या वर विचार यमराजाला, लू क्या बिगाडेगी. अतुल जोरात हसत म्हणाला, जिसके लंगोटिया यार मरने की दुआ देते हों, उसे दुश्मनों की क्या जरुरत. काळजी करू नको, तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. तेवढ्यात उत्तम नगरची बस येताना दिसली, दोघांचे बोलणे तुटले,  अतुलला टाटा करून विजय घरी परतला.


 दुसर्या दिवशी अर्थात रविवारी सकाळचे सातचा वाजले असेल, फोनची घंटी वाजली. सकाळी-सकाळी कुणाचा फोन आला, हा विचार करत विजयने फोन उचलला. फोनवर दिनेश होता, तो म्हणाला, विजय, एक वाईट बातमी, काल रात्री अतुल गेला. विजय सुन्न झाला रिसीवर त्याच्या हातून खाली पडले, काही क्षण काय करावे त्याला सुचेनासे झाले, सर्वांग घामाने डबडबले. कालची भेट आठवली,  अतुलला आपण म्हटलेल डायलॉग गाढवा तू लू लागून वर जाशील  ही आठवला.


झाले असे होते, कामावरून अतुल चार वाजेच्या सुमारास घरी पोहचला. थोड्या तापासारखे वाटले म्हणून, चहा सोबत, PCMची गोळी घेतली आणि पलंगावर जाऊन झोपला. नवरा इतक्या उन्हात थकून भागून आला आहे. त्याल शांत झोपू द्या, हा विचार तिने केला. उन्हाळ्यात अचानक ताप येण्याचा अर्थ काय आणि ताप आल्यावर काय केले पाहिजे, त्या बिचार्या मुंबईकर नववधूला कळणे शक्य नव्हते. संध्याकाळी जनकपुरीतल्या शनी बाजारातून भाजी-पाला आणला. स्वैपाक केला. होता-होता रात्रीचे ९ वाजले, तरी ही नवरा का उठत नाही. तिच्या मनात पाल चुकचुकली. नवर्याला उठवायला ती बेडरूम मध्ये आली.  अतुल तापाने फणफणत होता. त्याची शुद्ध हरपली होती, ताप डोक्यात पोहचला होता.  ती घाबरली, रात्री अतुलला हॉस्पिटलमध्ये भर्ती केले.  पण तो वाचला नाही.


उन्हाळ्यात लू ने मरणार्यांच्या बातम्या वाचताना, विजयला नेहमीच अतुलची आठवण येते. अतुलची आठवण येताच, तोंडातून न कळत निघालेले, पण खरे ठरलेले शब्द गाढवा तू लू लागून वर जाशील, सतत कानांत वाजतात. अपराधीपणाची भावना त्याला जाणवते. त्या दिवशी जर त्याने तोंडावर ताबा ठेवला असता तर कदाचित्, अतुल आज ही जिवंत असता.....

Saturday, May 2, 2015

भाजणी आणि भाजणीचे थालीपीठ

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले घरीच असतात.  वाढत्या मुलांना सतत काही न काही चरायला  आवडते.   उन्हाळ्यात आधीच भाज्या महाग. खायला काय करावे हा ही यक्षप्रश्न मध्यम वर्गीय परीवारांसमोर असतो.   भाजणी  ही पोष्टिक असते आणि तिच्या पासून स्वादिष्ट थालीपीठे ही तैयार करता येतात. वेळ ही कमी लागतो. त्या मुळे केंव्हा ही करता येतात. सकाळच्या नाश्त्याला ही भाजणीचे थालीपीठ हा एक उत्तम पर्याय आहे. स्वादिष्ट  थालीपीठे  मुले ही अत्यंत आवडीने खातात.  मला ही थालीपीठ अत्यंत आवडते.  (माझी सौ. नेहमीच म्हणत असते, या वयात ही तुम्ही लहान मुलांसारखे वागतात, केंव्हा अक्कल येणार आहे).  या भाजणीच्या पिठात मुलांना न आवडणाऱ्या भाज्या - दुधी, लाल भोपळा, पालक, बीट  इत्यादी  बारीक किसून किंवा चिरून मिसळता येतात. शिवाय नुसते कांदे -टमाटो बारीक चिरून घातले तरी चालतात.. 

भाजणीत तैयार करताना अनेक धान्यांचा वापर होते, या मुळे आपण केलेली भाजणी कशी होईल या बाबतीत ही अनेकांच्या मनात संशय असतो.     तसे म्हणाल तर भाजणीच्या पीठ तैयार करण्यासाठी घरात जे काही पदार्थ स्वैपाकघरात आहे, ते वापरून भाजणी तैयार करता येते.   आमची सौ. गहू, तांदूळ आणि बाजरी (भरपूर लोह तत्व असल्यामुळे)  सोबत, त्या वेळी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारचे धान्य आणि डाळी करून भाजणी तैयार करते. भाजणी चक्की वर जाऊन दळून आणावी लागते, म्हणून कमीत कमी ३-४ किलो तरी भाजणीचे साहित्य असायला पाहिजे. शिवाय भाजणी, चक्कीवर  जाऊन प्रत्यक्ष समोर दळून घेतली पाहिजे. सौ. ने भाजणी तैयार केली होती, त्यात घातलेले पदार्थ:

मुख्य पदार्थ गहू,  - १किलो, तांदूळ १/२ किलो, बाजरी १/२ किलो.

चण्याची डाळ,  मुगाची  डाळ (साली सकट आणि धुतलेली ), उडदाची डाळ(साली सकट), तुरीची डाळ, मोठ,  मसूर, मक्का  -   प्रत्येकी २ वाटी. पोहे जाड २ वाटी. धने -२ वाटी.  या शिवाय तुमच्या घरी असतील तेवढ्या प्रकारचे कडधान्य भाजणीत वापरता येतात.    सर्व पदार्थ मध्यम गॅस वर   वेगळे वेगळे भाजून घ्या.  प्रत्येक पदार्थाला ४-५ मिनिटे लागतात, घाई करू नका. रात्रीच्या निवांत वेळी हे कार्य केले कि उत्तम. (दरवर्षी असल्या प्रकरचे,  कार्य मलाच करावे लागते).  नंतर चक्की वर पीठ दळून घ्या.  हे पीठ वर्षभर खराब होत नाही. पावसाळ्यात ही टिकते.


शनिवारी संध्याकाळी भाजी बाजारातून सौ. परत आली. भाजीत लाल भोपळा ही होता. घरी पाहुणे म्हणून आलेली १२-१३ वर्षाच्या चिमुरडीने लगेच आपले मत व्यक्त केले, मावशी, मला लाल भोपळा आवडत नाही. आजकालच्या मुलाचं एक चांगल,  आपलली मते व्यक्त करायला ते मुळीच घाबरत नाही. पण त्या चिमुरडीला ठाऊक नव्हते तिची मावशी किती बिलंदर आहे ते.  रविवारी सकाळी सकाळीच चिमुरडीच्या उठण्या आधी सौ. ने लाल भोपळा बारीक किसून भाजणीच्या पिठात  मिसळला, सोबत भरपूर कोथिंबीर , आलं, लसून आणि मिरचीची पेस्ट त्यात घातली, शिवाय जिरे-मिर्याची पूड (स्वादानुसार), थोडा चाट मसाला  व मीठ घालून पीठ व्यवस्थित मळून घेतले.


पाण्याच्या हात लाऊन, हातानी थापून बनविलेले थालीपीठ, तव्यावर टाकून चारी बाजूला थोड तेल सोडून,  मध्यम गॅस  वर खरपूस भाजून घ्या.

कैरी, कोथिंबीर, पुदिनाच्या चटणी  व उन्हाळा असल्या मुळे  दह्याची लस्सी सोबत गरमागरम लाल भोपळ्याचे स्वादिष्ट थालीपीठ चिमुरडीने आनंदाने खाल्ले. अर्थात तिला  २-३ तासांनी  तिच्या मावशीने यात लाल भोपळा घातला होता हे सांगितले, त्या वेळी चिमुरडीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.



भाज्यांचे लोणचे


Wednesday, April 29, 2015

सावधान! मगरमच्छी अश्रू



सावधान मत्स्य पुत्रानों  आयुष्यभर   मासे मारणारा बगळा आता  मगरीचे रूप घेऊन अश्रू   ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही.



आयुष्यभर बगळ्याने 
मासे  सारे फस्त केले .
 घेऊनी वेश मगराचा.
ढाळतो अश्रू आता.

एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला:


भुलूनी मगर अश्रुना 
जीव गेला मत्स्याचा.

अर्पिली गांधी "चित्रफुले"
ढाळूनी अश्रू मगरीने.

सावधान! मत्स्य पुत्रानों

घेउनी वेश साधूचा 
रावण  हरतो सीतेला.
जाणीव ठेवा इतिहासाची 
भुलू नका मगर अश्रुना.






  






Sunday, April 26, 2015

एका नाटकाचा दुर्दैवी अंत

जवळपास ३० एक वर्षांपूर्वीची गोष्ट.  हौशी कलाकार मंडळीचे नाटक मंचावर सुरु होते. बैठीकीच्या खोलीचे दृश्य होते. मंचावर सोफासेट, सेंटर टेबल इत्यादी वस्तू होत्या.   अभिनयात दंग असलेला नायकाचा पाय कुठल्या तरी वस्तुत अटकला  आणि तो  धाडकन  सेंटर टेबल वर आपटला.  कपाळावर  चार टाके आले, अर्थातच नाटक अर्ध्यावरच संपले.  मंडळी हौशी होती,  तालिमी करताना मंचावर ठेवलेल्या वस्तूंचा विचार केला नव्हता.  जर तो विचार केला असता, तर नाटक अर्ध्यावर संपले नसते.

सिनेमात आपण पहिले आहे, दुष्ट खलनायक, नायकांच्या आप्तांना अधिकांश वेळी नायिकेला फासावर  लटकवतो, नायिका तडफडू लागते. नायक येतो, खलनायकाला यमसदनी पाठवितो, आणि फासावर लटकलेल्या नायिकेला सोडवितो. सिनेमात कित्येक मिनिटे फासावर लटकलेली नायिका जिवंत राहते. 

आपले राजनैतिक हित साधण्यासाठी, दिल्लीच्या नौटंकी बाज पार्टीला शेतकर्यांचा पुळका आला.   नौटंकी सुरु झाली. राजनीतिक महत्वाकांशा असलेल्या एक व्यक्ती झाडू घेऊन झाडावर चढला त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसत नव्हता. त्या आधी त्यांनी घरच्यांना ही फोन केला होता. बहुतेक नौटंकी सुरु झाली हेच सांगितले असेल.  आपल्याला काही होणार नाही याची त्याला खात्री होती. जोरदार नारे बाजी करत  त्याने गळफास लावला,  कार्यकर्ता टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत होते.  सावधानी म्हणून त्याने,  दोन्ही हातानी झाडाच्या फांदीला पकडून ठेवले, होते. ब्रेकिंग न्यूज मिडीयाने या दृश्याचे चित्रीकरण सुरु केले.  मंचावर बसलेल्या नौटंकीचे सूत्रधार ही यावर  बारीक लक्ष ठेवून होते. आता हा मनुष्य फासावर लटकेल.  आपण शेतकरी (?) फासावर लटकला याचा दोष सत्ताधारी पार्टीवर लाऊ, आपल्या कार्यकर्तानां  त्याला वाचविण्याची विनंती करू. नंतर त्या माणसाला जिवंत शहीदचा दर्जा देऊ. राजस्थान मध्ये त्याच्या मार्फत आपल्या पार्टीला पुढे वाढवू. बहुतेक त्याला ही तिकिटाचे आश्वासन दिले असेल.

नौटंकीची तैयारी व्यवस्थित होती. सर्व मना प्रमाणे घडत होत. पण एक तकनिकी चूक राहून गेली, हे कुणाच्याच लक्ष्यात आले नाही.    गळफास  या विषयावर   तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतला नव्हता. जर घेतला असता तर नाटकाचा योग्य परिणाम साधला असता.  या घोड्चुकी मुळे  एका अति आत्मविश्वासी आणि महत्वाकांशी व्यक्तीचा  दुर्दैवी अंत झाला.

आता या  फसलेल्या नौटंकीच्या सूत्रधारांच्या विरुद्ध काही कार्रवाई  होईल का? हाच यक्ष प्रश्न आहे.

Sunday, April 12, 2015

गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )





एतत्मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः॥

ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल.  (मनुस्मृति- 5:55)



वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ हत्येचे फळे आज  मानव समाज भोगत आहे.

महाराष्ट्रात गौ हत्या बंदी लागू झाली. तथाकथित अतिशहाण्यांनी स्वाभाविकरित्या गौ बंदीचा विरोध केला. त्या शिवाय त्यांना पुरोगामी कोण म्हणणार. (सध्या १५०-२०० रु किलो ने मिळणारे गौमांस गरिबांचे अन्न आहे, असा दुजोरा ही त्यांनी दिला). सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ बंदी असल्यामुळे गौमांस १५०-२०० रु किलोच्या हिशोबाने मिळते. दूध न देणाऱ्या भाकड गायी आणि शेती साठी अनुपयुक्त बैल विकल्या जातात. पण संपूर्ण देशात गौहत्या बंदी उठल्यावर काय होईल, याची कल्पना देतो. अर्थातच  धार्मिक भावनांना महत्व न देता शुद्ध व्यवसायिक आधारावर विवेचन.

गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु होईल. देशी गायींची जागा अधिक मांस असणार्या विदेशी गायी घेतील  ज्या प्रमाणे जर्सी गायींच्या आयातीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देतात तसेच, मांस निर्यातीच्या धन्ध्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिक मांस देणाऱ्या गाईंचा आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देईल. सध्या ही गौमांस निर्यातीसाठी अनुदान दिले जाते.  या  गायी  गावात मिळणारे शिळे अन्न, भाजीचा व अन्य कचर्या वर जगणार  नाही. त्यांना अन्न ही भरपूर लागेल.

परिणाम भारतीय गौवंश पूर्णपणे समाप्त होईल. कृषी कार्यासाठी बैल मिळणार नाही. (विदेशी बैलांना भारतीय बैलांसारखे कुबड  नसतात व भारतीय बैलांसारखे  काटक ही नसतात, त्यांचा मांसा शिवाय अन्य उपयोग नाही).  गौमांस खाणे वाढेल. मध्यम वर्ग  आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौमांस आधारित व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसेल. ४-५ वर्षातच  २० लाख टन पेक्षा गौमांस देशात खपू लागेल. शिवाय ३०-४० लाख  टन गौमांसाचे निर्यात ही होऊ लागेल.

आता जगात सर्वात जास्त गौमांस खाणार्या देश्यात अर्थात युएस मध्ये सर्वात जास्त गाई गौमांसासाठी व्यवसायिक रीतीने पाळल्या जातात. तिथल्याच आंकड्यानुसार  एक गाय ३०० किलो होण्यासाठी ३ वर्ष लागतात.  ३०० किलोच्या गाई पासून ७० किलो मांस मिळते.  एक किलो मांसासाठी  ७-१३ किलो मक्का आणि ३०-४५ किलो चारा लागतो. १५०००  चार्यासाठी लागणारे पाणी (१ किलो मक्या(corn)  साठी १५०० लिटर पाणी लागते), स्वच्छता आणि पिण्यासाठी  ३० हजार लिटर लिटर पाणी. हे सर्व केवळ  १ किलो मांस साठी लागेल. (तेवढ्या पाण्यात  २5  किलो तांदुळाचे, ६० किलो बटाटा,  ३० गहू ).  महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब आणि हरियाणा या  राज्यांत ही जलस्तर २०० फूट खोल गेलेले आहे. दुर्मिळ पाण्याचा उपयोग केवळ  माणसांसाठी खाद्यान्न उत्पन्न करण्यासाठी झाला पाहिजे कि निर्याती साठी मांस उत्पन्न करण्यासाठी.

दुसर्या शब्दात गौमांस निर्यात म्हणजे पाण्याचा व अन्नाचा निर्यात. पाणी कृषीच्या जागी मांस निर्मितीसाठी वापरल्या जाईल. ५० लक्ष टन मांसासाठी  किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल. लोक शेतात मक्का आणि चारा लावतील.(नगदी फसल म्हणून). जीवनावश्यक पदार्थ गहू, तांदूळ, डाळी गरीब सोडा तुमच्या आमच्या मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर जातील. अमेरिकेत ही हेच झाले आहे. गरिबांना दोन वेळचे खाणे अशक्य होईल. शिवाय देशात दुष्काळी वातावरण निर्माण होईल.

अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग  मांस उत्पादनासाठी वापरला  जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल. शिवाय यूएसला $८० बिलीयन विदेशी मुद्रा ही मिळेल. जगाचा विचार केल्यास केवळ गायीचे मांस खाणे बंद झाले तर जगात कुणी ही उपाशी राहणार नाही.

या  भारतीय गायीं विदेशी गायींपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीय गायी इथल्या वातावरणाच्या बदल्याचा सामना करू शकतात. त्यांना अन्न ही कमी लागते. ऊन पाणी, अकाल, इथल्या रोग राई इत्यादींचा सामना त्या करू शकतात. वर्षाकाठी एक वासरू ही त्या देतात. भारतीय गाई बहुउपयोगी  आहे.   त्यांना खाद्य ही कमी लागते, पाणी ही कमी लागते. (रोज अंघोळ घालावी लागणार नाही, कूलर किंवा एसी  लागणार नाही, विजेचा खर्च वाचेल). शिवाय दुग्ध आणि मांस व्यतिरिक्त विदेशी गायी अन्य उपयोगाच्या नाही.

सध्या पतंजली योग संस्थानात भारतीय गायींवर अनुसंधान सुरु आहे. गौ आधारित कृषी क्रांती त्यांचे लक्ष्य आहे. पुढच्या १० वर्षात किमान १० लाख गायींची दुग्ध उत्पादन क्षमता १० लिटरच्यावर वाढविण्याचे लक्ष्य आहे. भारतीय गायींच्या गौमूत्रापासून औषधी आणि  कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौमूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते). 

आपल्या देश्याच्या वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्यासाठी आणि पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी गौहत्या बंदी सर्व भारतात झाली पाहिजे. या शिवाय लोकांनी मांस खाणे ही सोडले पाहिजे. केवळ मांसासाठी  जनावरे पाळणे ही बंद झाले पाहिजे. लोक शाकाहारी झाल्या शिवाय वाढत्या जनतेचे पोट भरणे अशक्य आहे. लोकांची भूक शमविण्यासाठी तरी गौ. हत्या बंदीला समर्थन केले पाहिजे.

अधिक माहिती साठी दोन विदेशी लिंक ही देतो आहे.  अंतर्जालावर या विषयावर भरपूर माहिती आहे.


http://ajcn.nutrition.org/content/78/3/660S.full

http://amor.cms.hu-berlin.de/~h1981d0z/pdf/2010-10-viedma/water-footprt.pdf




Monday, April 6, 2015

रामायण कथा : सीता ???


(लेखाचा उद्देश्य कुणाची ही भावना दुखविण्याचा नाही.   माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच. बाकी ‘हरी अनंत हरी कथा अनंता’.)


रामायणात सीते भोवती एक गूढ वलय आहे. सीता पृथ्वीतून प्रगट झाली आणि पुन्हा पृथ्वीच्या कुशीत  समावली. आता ही सीता आहे तरी कोण? वाल्मिकी रामायणानुसार -

                  सीता अथ मे कृषतः क्षेत्रं लाङ्‍गलादुत्थिता ततः ॥ १३ ॥ 

                      क्षेत्रं शोधयता लब्धा नाम्ना सीतेति विश्रुता । 


(वाल्मिकीनी रामायणातल्या बालकांडातल्या ६६व्या सर्गात म्हंटले आहे, एकदा मिथिला नरेश राजा सीरध्वज (जनक) यज्ञासाठी भूमि शोधन करते समयी शेतात नांगर चालविताना नांगराच्या अग्रभागाने नांगरलेला भूमितून एक कन्या प्रकट झाली. सीता, नांगराच्या द्वारा ओढली गेलेली रेषा, हिच्यापासून उत्पन्न झाल्याकारणाने तिचे नाव सीता ठेवले गेले.  भूतलांतून प्रकट होऊन दिवसेंदिवस वाढणार्‍या राजा जनकच्या  कन्येला  अर्थात  सीतेला, कित्येक राजांनी येथे येऊन मागणी घातली.  जनकाने, जो व्यक्ती  परशुरामाने दिलेले शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवेल, त्याला आपली कन्या देण्याचा निश्चय केला. श्रीरामाने  ते शिवधनुष्य भंग केले आणि सीतेला प्राप्त केले.)

शेत नांगरताना सीता जमिनीतून प्रगट झाली. आता शेतातून प्रगट झालेली ही सीता कोण, हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला. ऋग्वेदात सीता ह्या शब्दाचा उल्लेख आहे.  

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५७ (कृषि सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम: देवता - सीता छन्द - त्रिष्टुप्


                            अर्वाची सुऽभगे भव सीते वंदामहे त्वा । 

                      यथा नः सुऽभगा अससि यथा नः सुऽफला अससि


भाग्यशालिनी सीते, इकडे आगमन कर, तुला आम्ही वंदन करतो. कारण तेणेंकरून तूं आम्हाला भाग्यधात्री होतेस; आम्हाला सफलार्थ करणारी होतेस. ॥ ६ ॥


इंद्रः सीतां नि गृह्णातु तां पूषा अनु यच्छतु ।
 सा नः पयस्वती दुहां उत्तरांऽउत्तरां समां ॥


सीतेचा स्वीकार इंद्र करो; तो आमच्याकरितां वर्षानुवर्षे दुग्धानें परिप्लुत होऊन आम्हांस  धनधान्यरूप दुग्ध देवो. ॥ ७ ॥


सीतेचे आगमन झाल्याने शेतकरी समृद्ध होतो. वैदिक काळात लोक देवराज इंद्राला बलिभाग अर्पित करायचे आणि इंद्र त्यांचे रक्षण करायचा. हा अन्नरुपी कर म्हणजे सीता. राज्याची सर्व भूमी राजाचीच असते. प्राचीन काळात राजा अन्नाच्या रूपानेच कर घ्यायचा. सीताध्यज नावाचा राजकीय अधिकारी अन्नाच्या रूपाने हा कर शेतकऱ्यांकडून वसूल करायचा.  


दक्षिण समुद्रापासून गंगेच्या तटा पर्यंत लंकेच्या राजा रावणाचे साम्राज्य पसरले होते. रावणाचे अधिकारी  ग्रामस्थ, वनवासी सर्व जाती आणि समुदायांकडून ‘सीता’ वसूल करायचे. न्यायानुसार प्रजेकडून वसूल केलेल्या करांचा अधिकांश भाग प्रजेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. पण रावण भारतीय लोकांना गुलाम समजत होता. लंकेची तिजोरी भरणारे गुलाम. गुलामांचा छळ केला पाहिजे. त्यांना अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारातच ठेवले पाहिजे. हीच रावणाची नीती होती. आपल्या वर अन्याय होतो आहे, हे अशिक्षित आणि अज्ञानी माणसाला बहुधा कळत नाही आणि कळले तरी अन्याय आणि अत्याचाराचा विरोध करण्याची क्षमता ही त्याच्यात  नसते. दुसर्या शब्दात म्हणायचे झाले तर रावणाने भरतभूमीच्या सीतेचे हरण केले होते. लंका सोन्याची झाली, तिथले लोक समृद्ध झाले. आपल्या दहा ही इंद्रियाने भौतिक सुखाचा उपभोग करू लागले (आजच्या अमेरिकेच्या प्रमाणे). कदाचित या साठीच रावणाला दशानन म्हंटले असावे.   

ऋषी-मुनी आश्रम स्थापित करून, दंडकारण्यात शिक्षा आणि ज्ञानाचा प्रचार करत होते. साहजिकच त्यांचे हे कार्य रावणाला आवडणारे नव्हते. ऋषी-मुनीचे आश्रम  नष्ट करणे, त्यांची हत्या करणे हे रावणाच्या सैनिकांचे रोजचे कार्य. लंकेचे राज्य अयोध्येच्या सीमेपर्यंत पोहचले होते, तरी ही महाराज दशरथ यांची हिम्मत, रावणा विरुद्ध युद्ध पुकारण्याची नव्हती. वाल्मिकी रामायणात ही याचा उल्लेख आहे.

                       स हि वीर्यवतां वीर्यं आदत्ते युधि रावणः । 

                     तेन चाहं न शक्नोमि संयोद्धुं तस्य वा बलैः ॥
                      सबलो वा मुनिश्रेष्ठ सहितो वा ममात्मजैः ।


(मुनिश्रेष्ठ! तो रावण युद्धामध्ये सामर्थ्यवानांच्या वीर्याचे (बलाचे) ही अपहरण करतो, म्हणून मी आपली सेना आणि पुत्रांसहितही त्याच्याशी आणि त्याच्या सैनिकांशी युद्ध करण्यास समर्थ नाही. ॥ बालकांड २३ १/२ ॥)


पूर्वी परशुरामाने अन्यायी क्षत्रियांचा पराभव केला होता. परशुरामाने जनकाच्या पूर्वज देवरात यांना शिवधनुष्य दिले होते. अश्या वेळी महर्षि विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामाने हेच धनुष्य उचलले आणि भरतभूमीला राक्षसी अत्याचारांपासून मुक्त करण्याचा निश्चय केला. राजा जनकाने ही प्रसन्नता पूर्वक  श्रीरामाला ‘सीता’ अर्पण केली. भरतभूमीला रावणाच्या गुलामीतून मुक्त केल्या शिवाय. सीता श्रीरामाला प्राप्त होणे अशक्य होते. त्या साठी रावणाचे राज्य नष्ट करणे आवश्यक होते. रामाने दंडकारण्यात राहणाऱ्या ग्रामस्थ, निषाद, शबर, भिल्ल, वानर, आश्रमवासी आणि समस्त वनवासी समुदायाला एकत्र केले आणि लंकेवर हल्ला केला.

आता सीता वसूल करण्याचा अधिकार अयोध्येचा राजा अर्थात श्रीरामांचा जवळ आला.  ‘सीता’ अयोध्येत आली. अयोध्या ही सोन्याची झाली. पण प्रजेची समस्या तीच राहिली. शेवटी एका सामान्य प्रजाजानाने राजाला अर्थात श्रीरामचंद्रांना याची जाणीव करून दिली. ‘सीतेचा’ उपयोग पुन्हा प्रजेच्या, शेतकर्यांच्या आणि वनवासी जनतेच्या कल्याणासाठी होऊ लागला. कवीच्या शब्दांत ‘सीता’ पुन्हा वनवासी झाली व जमिनीच्या कुशीत समावली. शिक्षा आणि ज्ञानाचा प्रसार संपूर्ण भरतभूमी वर पसरला.  अश्या रीतीने रामराज्यात चारी वर्णाचे लोक आणि अरण्यवासी प्रजाजन सुखी झाले.