Sunday, March 16, 2014

दिल्लीची होळी -सल्तनत काळची- अमीर खुसरोच्या लेखणीतून


मुद्राराक्षस या नाटकात मदनोत्सव उल्लेख आहे.  वसंत ऋतूत सुंदर स्त्रिया [सर्व स्त्रिया स्वत:ला सुंदरच समजतात] आपल्या प्रेमी वर आम्रमंजरी फेकायच्या). कादंबरी या उपन्यास मध्ये कामदेवाच्या मंदिराचा उल्लेख आहे आणि पूजा करण्याचे वर्णन ही आहे.

१३व्या शतकातल्या होळीचे  [दिल्ली सल्तनत] अमीर खुसरोने सुन्दर वर्णन केले आहे.

आज रंग है
ऐ माँ रंग है,
मोरे महबूब के घर रंग है।
 
दैया री मोहे भिजोया री
शाह  निजाम के रंग में
कपडे रंगने से कुछ ना होत है
या रंग में मने तन को डुबाया री
दैया री मोहे भिजोया री
शाह निजाम के रंग में।
...

‘कपड्यांवर रंग टाकल्या ने काही होत नाही. मी तर शाह निजामच्या प्रेमाच्या रंगात भिजलेलो आहे.’

हिंदू असो व मुसलमान तुर्क असो वा अरब इथे सर्व वसंत ऋतूत होळीच्या मस्तीत गुलाल उधळत आहे:

हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल,
बाइस ख्वाजा मिल बन बन आयो
तामें हजरत रसूल साहब जमाल।
हजरत...

अरब यार तेरो बसंत मनायो,
सदा रखिए लाल गुलाल।
हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल।

होळी सर्व भेदभाव विसरून आनंदाने रंग उधळण्याचा पर्व आहे. त्या काळात हिंदू- मुस्लीम भेदभाव विसरून लोक होळी खेळत होते. या सणाला धर्माचे बंधन नव्हते. आज ही आपण सर्वप्रकारचे भेद विसरून प्रेमाने व आनंदाने रंग उधळीत होळी खेळू.

सर्वाना होळीच्या शुभेच्छा.

Sunday, March 9, 2014

भगवद्गीता: मुख्य देवतेला कसे ओळखावे




येsप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:I
तेsपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् I
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च l
न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते l
(भगवद्गीता  ६.२३ व २४)

अर्थ:  भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन  करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते. खरं, म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत: जाणत नाही त्यांचे पतन होते.

स्वामी त्रिकालदर्शी म्हणाले, अर्थात कुठल्या ही देवतेची पूजा करा,  ती पूजा मुख्य देवतेपाशी पोहचते आणि त्यानुसार भक्ताला त्याचे फळ ही प्राप्त होते.

भक्ताने विचारले स्वामीजी, हे कसें शक्य आहे?

स्वामी त्रिकालदर्शी: इतर देवतांची पूजा करणारे लोक जड बुद्धीचे अर्थात बुद्धिहीन असतात, त्यांचे अध्यात्मिक पातळी कमी असते आणि मुख्य देवतेला ओळखणे त्यांना शक्य नसते.

भक्त: स्वामीजी, मुख्य देवतेला कसे ओळखावे?

स्वामी त्रिकालदर्शी: ज्या देवतेच्या समोर अन्य देवता हात जोडून उभ्या असतील. तीच मुख्य देवता. जसे श्रीरामा समोर हनुमंत हात जोडून उभे असतात. श्री राम मुख्य देवता आणि हनुमंत कनिष्ठ देवता. कनिष्ठ भक्त हनुमंताची भक्ती करतात आणि त्याला नवैद्य दाखवितात. श्री रामाच्या कृपेचा प्रसाद त्यांना ही मिळतो. हे असेच आहे, जसे संकटात अडकलेला माणूस सरकारी कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्याला नेवैद्य अर्पित करतो आणि वरिष्ठांची कृपा त्यावर होते.  आपल्याला देशात हनुमंताचे मंदिरे अधिक दिसतात कारण सामान्य माणूस अर्थात कनिष्ठ भक्त मुख्य देवता ओळखण्यास समर्थ नसतो.  हरकत नाही.  मुख्य देवतेच्या सेवकावर सुद्धा वक्र दृष्टीने पाहणे कुणाला ही शक्य नसते म्हणूनच समर्थांनी म्हंटले आहे, ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे’.  

उच्च आध्यात्मिक पातळी असलेले भक्त, मुख्य देवतेला ओळखतात. विभीषण आणि सुग्रीवाने श्री रामाची भक्ती केली, दोघांना श्री रामच्या कृपेने राज्यपद लाभले. मोठे फळ मुख्य देवतेच्याच कृपेने प्राप्त होते. अर्थात कनिष्ठ देवतेची भक्ती केल्यास लहान-सहन कामे पूर्ण होतात.  मुख्य देवताच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे, त्याचाच कृपेने देशाचा कारभार चालतो. मुख्य देवतेला न ओळखणारे चुकीच्या देवतेची भक्ती भक्ती करतात आणि संकटात पडतात. अश्या मूढ भक्तांचा सर्वनाश अटळ असतो.  

भक्त: स्वामीजी, आपल्या देशात अनेक देवता आहेत. त्या आपसांत भांडतात ही. अश्या परिस्थितीत मुख्य देवता कशी ओळखायची? कुठल्या देवतेला मतरुपी नेवैद्य अर्पित करावा.

स्वामी त्रिकालदर्शी:  मुख्य देवता स्वर्गात सिंहासनारूढ असते, अन्य कनिष्ठ देवता किती ही आपसांत भांडत असल्या तरी मुख्यदेवतेचे सिंहासन आपल्या पूर्ण ताकदीने उचलून धरतात. काही देवता हात जोडून समोर उभी राहतात.  पूर्वी महाभारताच्या काळी, इंद्राने कर्णाची कवच-कुंडले मागून, त्याला शक्तीहीन केले होते. त्याच प्रमाणे मुख्य देवते जवळ ब्रम्हास्त्रापेक्षा ही घातक असे  ‘शुकास्त्र’ असते. मुख्य देवता बनण्यासाठी शुकास्त्र हे साधावेच लागते. शुकास्त्राच्या पाशात अडकून, कनिष्ठ देवता मुख्य देवते समोर हात जोडून उभ्या राहतात आणि तिचे सिंहासन उचलून धरतात.  अश्यारितीने मुख्य देवता कनिष्ठ देवतांना अर्पित केलेला नैवेद्य (मत) हरण करते. भक्त गोंधळात पडतो.  वत्सा तुला माहितच आहे रामायणात बाली ज्याच्या बरोबर युद्ध करीत असे, त्या योद्ध्याचे अर्धे बळ बालीला मिळत असे. त्यामुळे त्याला पराजित करणे कोणत्याही योद्ध्याला शक्य नव्हते. स्वयं श्री रामाला बालीवधासाठी क्षत्रियांना न शोभणारा मार्ग वापरावा लागला. असो.  मुख्य देवता ही प्रसन्न होऊन, कनिष्ठ देवतांना ‘सुवर्णास्त्र’ प्रदान करते. सुवर्णास्त्राच्या कृपेने कनिष्ठ देवता स्वर्गसुखाचा उपभोग घेतात. कनिष्ठ देवतांची भक्तांवर कृपा करण्याची क्षमता ही कमी असते,  त्यांच्या भक्तांच्या पदरी निराशाच पडते.  दुसरीकडे पराजित देवतांना स्वर्गातून हाकलून दिल्या जाते अश्या देवतांची भक्ती करणार्याचा विनाश निश्चित असतो.

स्वामी त्रिकालदर्शी म्हणतात, अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिताअन्य देवतांची उपासना करतात आणि त्यांचे पतन होते. अध्यात्मिक दृष्टीने उन्नत लोक मुख्य देवतेला ओळखतात आणि तिची पूजा करतात आणि आपल्या सर्व भौतिक कामना पूर्ण करतात. वत्सा, आध्यात्मिक पातळीच्या उच्च स्तरावर पोहचल्यावर तू हीमुख्य देवतेला ओळखण्यास समर्थ होईल.  तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. 

Sunday, March 2, 2014

वासंतिक कविता / एक गुलाबी कळी



रोज दुपारी जेवण झाल्यावर  एक चक्कर विजय चौक पर्यंत मारून येतो. आजकाळ  रस्त्याच्या काठावर भरपूर फूले लागलेली आहे. एक भुंगा एका कळी  भोवती  फिरत होता. जवळच एक कळी कोमजलेली दिसत होती. काय बरे झाले असेल, मनात विचार आला. भुंगा तर आवाराच असतो फुलां-फुलां वर फिरणारा   

(१)  
एक गुलाबी कळी  
गालात लाजली
भुंग्याच्या प्रेमात 
जाउनी ती पडली
गत वर्षीची चूक 
पुन्हा तिने केली
विरहाच्या अग्नीत 
बेचारी कोमेजली.

(२)

वासंतिक प्रेमाला
ग्रीष्माची वेदना
विरही अश्रुना
श्रावणी आसरा.


Saturday, March 1, 2014

अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा


उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील  टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल  सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार?  काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.

खरं म्हणाल तर शेरखान जंगलाचा राजा होता. त्याच्या डरकाळीने  जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप व्हायचा. भले मोठे रेडे ही त्याला घाबरायचे.  शेरखान जंगलाच्या मध्यभागी असलेल्या तलावाजवळ दबा धरून बसायचा, संध्याकाळी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या हरीण, डुक्कर आणि कधी कधी तर एखाद्या रेड्याचा ही शिकार करायचा. असं सुख-समाधानाने आयुष्य जगत होता. अचानक त्याचा सुखाला ग्रहण लागले.  महाबली नावाचा एक रेडा जंगलात आला. आधी रेड्यांच्या कळपावर त्याने कब्जा केला नंतर त्याने स्वत:ला जंगलाचा राजा घोषित केले. सर्व शाकाहारी रेड्यांना तो म्हणाला आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे. शेरखान पासून मी सर्वांचे रक्षण करेल. कुणावर शेरखान ने हल्ला केला तर मला आवाज द्या, मी  धावत मदतीला येईल. फक्त शेरखान वर लक्ष ठेवा. मी त्याला  जंगलातून हाकलून लावेल किंवा आपल्या शिंगांच्या प्रहाराने त्याला यमसदनी पाठवेल. महाबलीने रेड्यांसह जंगलातल्या मध्यवर्ती तलावावर आपला कब्जा केला. शेरखान ने पळून, टेकडी खालच्या गुहेत शरण घेतली. महाबली रेड्याने कित्येकदा रेड्यांसोबत त्याच्या वर हमला केला, नेहमीच टेकडीवर चढून शेरखान आपले प्राण वाचवत असे. तसं म्हणाल तर अधिकांश जंगलावर महाबली रेड्याचा कब्जा झालेला होता. आता शेरखान नुसता नावाचा राजा होता.

एक दिवस सकाळी, तवाकी नावाचा तरस आपल्या बायको व पोरांसह जंगलात आला. एका रेड्याने त्याला बघितले. तो तवाकीला म्हणाला, तरसा या जंगलाचा राजा महाबली रेडा आहे, त्याने तुला बघितले तर तुझे काही खरं नाही. शेरखान सुद्धा त्याला भिउन लपून बसला आहे. मांसाहारी जनावरांना या जंगलात येण्याची सख्त मनाई आहे.  त्याचे बोलणे ऐकून तवाकी जोर-जोरात हसूं लागला. तुमच्या सारखे आम रेड्यांना दोघांनी ही मूर्ख बनविले आहे. रेडा म्हणाला: कसं,   तवाकी: मूर्ख रेड्या,   महाबली कधीच शेरखानला मारणार नाही आणि शेरखान ही हरीण आणि ससे खाऊन आपला मस्त राहील. तवाकी पुढे म्हणाला आम्ही तरस रेड्याना खात नाही, माझ्या परिवार पासून रेड्यांना काहीच भीती नाही. छोटे हरीण,ससे  ही गवत खातात, त्यांना मारून आम्ही आपली गुजराण करतो, त्यात तुम्हा रेड्यांचे ही भलंच आहे तुम्हाला जास्त गावात खायला मिळेल. शिवाय तू इथे पहारा देतो आहे आणि महाबली माद्यांबरोबर मजा मारतो आहे. तवाकीचा बाण वर्मी लागला. रेडा म्हणाला खरं, महाबली आल्या पासून मादींकडे ढुंकून ही पाहणे अशक्य. तवाकी म्हणाला मित्र चिंता नको करू, मी राजा झाल्यावर सर्व रेड्यांना, मादीचे सुख मिळेल.  उद्या मी दोघांचा वध करून राजा बनणार आहे. फक्त तुम्ही तमाशा पाहत राहा, मधे पडू नका. ही आनंदाची बातमी सर्व रेड्यांना जाऊन सांग.
 
दुसऱ्या दिवशी  भल्या पाहटे, तवाकी आपल्या परिवार सह  महाबली समोर उभा ठाकला व त्याला म्हणाला, महाबली आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे, तू जंगल सोडून पळून जा अन्यथा मला तुझा वध करावा लागेल. महाबली, हसून म्हणाला, मूर्ख एका पायेच्या लाथेने तुला तुडवेल,  ‘जान प्यारी असेल’,  तर आला तिथे परत जा. तवाकी: तुझे दिवस भरले, हिम्मत असेल तर लढ. महाबली म्हणाला: रेड्यांनो, याला हाकलून लावा. पण सर्व रेडे शांत उभे राहिले, कुणीच प्रतिसाद दिला नाही. महाबली म्हणाला तुम्ही शांत का? पळवून लावा त्याला. त्या वर एक रेडा म्हणाला: महाबली, तवाकी पासून आम्हाला काहीच भीती नाही, उलट तो राजा झाला तर आमच भलंच होईल. तुझ्या जाचा पासून तरी मुक्ती मिळेल. महाबली उतरला: असं होय. आधी याला संपवतो, नंतर तुम्हाला बघतो.

उंदीर-मांजराचा खेळ सुरु झाला. महाबली तवाकी वर हल्ला करायचा, तर त्याचे पोरं मागून हल्ला करायचे. दिवसभर त्यांच्या मागे पळत-पळत महाबली दमून गेला.  उगाचच याचा नादी लागलो, असे त्याला वाटू लागले. एकट्याने तवाकीच्या परिवाराशी निपटणे शक्य नाही. बाकी रेड्यांची मदत नक्कीच लागेल. नकळत महाबली टेकडी जवळ पोहचला होता. इथे जवळच शेरखान असायला पाहिजे. संध्याकाळ ही होत आली आहे. समोर पाण्यचे डबके दिसले.  महाबलीला तहान ही लागली होती, पाणी पिऊन आपण परत फिरले पाहिजे. तवाकीचे काय करायचे, उद्या बघू. महाबलीला तहान लागली आहे, तवाकीने ओळखले उडी मारून तो  सरळ महाबली समोर येऊन उभा राहिला व म्हणाला, महाबली कालच शेरखानला मारून मी त्याच्या गुहे वर व या तलावावर अधिकार केला आहे. पाणी पिण्या आधी, माझ्याशी युद्ध करावे लागेल. आता मात्र महाबली भयंकर वैतागला म्हणाला  सकाळ पासून ऐकतो आहे, युद्ध कर युद्ध कर, पळपुटा लेकाचा.  हिम्मत असेल तर तसाच समोर उभा राहा. या वर तवाकी उतरला, काल शेरखान ही असेच म्हणत होता, शेवट काय झाले, जगातून गेला बिचारा . आज तुझी पाळी आहे, तुझे मरण मला समोर दिसत आहे, ये हल्ला कर आपल्या तीष्ण नखांनी तुला फाडले नाही तर माझे नाव तवाकी नाही. याहून अधिक ऐकणे महाबलीला शक्य नव्हते, आपली खुर आणि शिंग आपटत, तो तवाकी वर चालून गेला. तवाकी आपल्या जागेवरून तिळमात्र ही हलला नाही.  महाबली आपल्या शिंगात उचलून तवाकीला फेकणारच, पण आपल्या पाठीवर कुणीतरी झेप घेतली आहे, असे त्याला वाटले, पण क्षणातच त्याची मान शेरखानच्या जबड्यात होती. तवाकी बरोबर वादावादी होत असताना शेरखान हळू हळू सरकत महाबलीच्या मागे पोचला होता आणि त्याने महाब्लीच्या  मानेवर सटीक हमला केला. त्याच क्षणी तवाकीने ही आपल्या परिवारासह महाबली वर हल्ला चढविला. त्याचा बायको ने महाबलीची शेपटी पकडली, पोरांनी त्याचे पाय पकडले. तवाकीने दोन्ही पंज्यानी त्याचे शिंग पकडले.  बेचारा महाबली काहीही करू शकला नाही.

कित्येक महिन्यानंतर, शेरखान ने रेड्यावर यथेच्छ ताव मारला. तवाकीच्या परिवाराला ही त्यात हिस्सा मिळाला. आनंदाने तवाकीने ही शेरखान महाराजांचा विजय असो अशी घोषणा दिली.  शेरखान ने पूर्वी प्रमाणेच डरकाळी फोडली. जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप झाला. रेड्यांना आपण मूर्ख बनलो हे जाणविले. पण आता काही उपयोग नव्हता. शेरखानने आपल्या बुद्धीने हे युद्ध जिंकले होते.

सूतजी म्हणाले हे राजन, कलयुगात जो कुणी या कथेचे मनपूर्वक श्रवण करेल, विपरीत परिस्थितीत ही शेरखानप्रमाणे आपल्या गादीचे रक्षण करण्यास समर्थ ठरेल. 

चालत राहणार


चालणे प्रवाह जीवनाचा
थांबणे मरण यातना
पर्याय नाही दुसरा
शिवाय चालण्याचा.

चालता चालता भेटले 
वाटेत जे सगे-सोयरे
अनोखळी वाटसरू निघाले.
क्षणभराची साथ तयांची
देऊन गेली अनेक जखमा
कवटाळूनी त्या जखमांना
एकटाच मी चालत राहणार.  

दमलेल्या शरीरानी
थकलेल्या मनानी
निरुदेश्य मी 
भटकत राहणार.
चालत राहणार, चालत राहणार.


Tuesday, February 11, 2014

ऐसेच जीवन जगते



राख नदीत अर्पिली
वाहत शेतात गेली
तेथे बीज अंकुरले
ऐसेच जीवन जगते.


रेशमी कोशात शोधले
मधाचे मोहोळ त्याने
श्वास त्याचा कोंडला
गुदमरून जीव गेला.



Friday, February 7, 2014

काही व्हेलेंटाईनी चारोळ्या

(१)

कट्यावरच्या मुलांसाठी (कालेज तरुणासाठी) धोक्याची सूचना - पाहून कुणी हसली तर दोस्ती दुष्मनीत बदलण्याची शक्यता.

तिरछी नजर फेकुनी
ती मंदमंद हासली
जन्माची दोस्ती आमुची
तत्क्षणी खलास झाली.

(२)

माझ्या बरोबर कित्येकदा असेच घडले आहे. गेले ते दिन गेले ...

मी तिला गुलाब दिले
तिने काटे परत केले
तिच्या डोळ्यांत हंसू
माझ्या डोळ्यांत आंसू.

(३)

एकांती भेटण्यापूर्वी विचार करा, जमाना खराब आला आहे.

व्हेलेंटाईन दिनी
ती एकांती भेटली
रात्री आनंदी झोपलो
सकाळी कस्टडीत उठलो.

(४)

प्रेमाची फलश्रुती बहुतेक अशीच असते...

आधी प्रेम केले
नंतर लग्न केले
आयुष्याचे असे
पूर्ण वाटोळे केले.

Wednesday, January 29, 2014

द्विभाषिक क्षणिका/ चश्मा /उम्मीद

() चश्मा

डोळे झाले माझे अधू
दिखती नहीं है दिल्ली.

मिळेल कुठे तो जादूचा चश्मा
दिखाए मुझे जो लालकिला.

() उम्मीद

झाले शरीर जरी म्हातारे
दिल अभी जवान है.
वरेल का मला ती षोडसी
उम्मीद अभी कायम है

Tuesday, January 28, 2014

पांढर धुकं काळ धुकं

आज नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजताची ७४० घेतली. रस्त्यावर धुकं पसरलेलं होत. दिल्ली केंटचा भागात वस्ती विरळ असते, त्या मुळे रस्त्यावर धुकं ही जास्ती दाट होत. धुक्याचा रंग जवळपास काळाच होता त्या मुळे २०-२५ मीटर पुढचे दिसत नव्हते. एक प्रकारची उदासी वातावरणात पसरलेली होती. एसी बसच्या खिडकीतून धुकं बघता-बघता बालपणाचे दृश्य डोळ्यांसमोर तरंगले. धुकं तेंव्हा ही पडायचं पण रंग मात्र पांढरा शुभ्र असायचा. धुक्याच्या परद्याला भेदून सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडायची तेंव्हा मन प्रसन्न व्हायचं. कधी-कधी धुक्यात सप्तरंगी इन्द्रधनु ही दिसायचे. पण आज सूर्याची सोनेरी किरणे ही काळपट वाटत होती. आज डोक्यावरचे सर्व केसं पांढरे झाले, अस्थमा, हृदयरोग इत्यादी ही. कदाचित धुक्याच आणि सुख-सुविधा (भोग) याचं ही नात आहे. मुफ्त मिळणार पांढर धुकं सोडून आपण भरपूर किंमत मोजून काळ धुकं विकत घेतो आहे. पण हे कितपत चालणार.???

शुभ्र पांढर धुकं,
मागासपणाचे लक्षण
आदिम समाजाच,
कष्टप्रद जगण.

काळकुट्ट धुकं,
प्रगतीचे लक्षण.
सुखासीन लोकांच,
रोगग्रस्त जगण.

काळ्या धुक्यात विरला
प्राणी माणूस नावाचा
इतिहास नियतीचा
घडणार का असा?

Sunday, January 19, 2014

कांजी / काळ्या गाजरापासून बनविलेले पेय


कांजी काळ्या गाजरांपासून, पूर्वी हिवाळ्यात अर्थात जनवरी सुरूझाल्या बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते. त्या मुळे सौ. घरीच कांजी तैयार करते. सौ.चे माहेर दिल्लीतल्या शिवनगर (सिख आणि पंजाबी बहुल वस्तीतच आहे). कांजी लौह तत्वाने भरपूर स्वादिष्ट कांजी एक पाचक पेय आहे. कांजी मातीच्या, चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच बनविल्या जाते. बनविण्याची रीत अत्यंत सौपी आहे.

साहित्य: पावभर काळे गाजर, हिंग (१छोटा चमचा), काळे मीठ (१ चमचा), मोहरीची डाळ (१ १/२ चमचे) व पाणी ३ लिटर (स्वच्छ) बस एवढेच.

कृती: गाजर धुऊन, साल काढून, गाजराचे लहान लहान तुकडे करा. एका काचेच्या भांड्यात पाणी घालून त्यात गाजरांचेचे तुकडे टाका, हिंग,मोहरी आणि काळे मीठ टाकून भांडे झाकण लाऊन बंद करा. तीन ते चार दिवसात कांजी तैयार होईल. मुंबई सारख्या ठिकाणी २-३ दिवसातच. कांजी ७-८ दिवस व्यवस्थित राहते. जास्ती कडक वाटल्यास आणखीन पाणी घालता येते.





सर्व करण्याची विधी: गाजरांच्या तुकड्यांसहित  कांजी  एका ग्लासात टाका. स्वाद वाढविण्यासाठी  लिंबू आणि चाट मसाला  ही घालता येते. गाजराचे तुकडे खात कांजी पिण्याच्या आनंद काही औरच येतो.  

Saturday, January 18, 2014

संक्रांति ऋतू परिवर्तन


दिनांक: १८.१.२०१४. 

संक्रांति दरवर्षी जनवरीच्या १४ किंवा १५ तारखेला येते. त्या पूर्वी दिल्लीच्या कुडकुडत्या हिवाळ्यात माणूस काय, लेखणी ही जमून जाते. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होतो. संक्रांति पासून  मोठा होणारा दिवस जाणवू लागतो. सकाळी थंड  कोरडे वारे  आणि दुपारी सूर्याच्या उन्हात थोडी उष्णता जाणवते. पर्वतांवर बर्फ वितळू लागते. उत्तरेकडून येणारे वारे सुरु होतात ते शिवरात्री पर्यंत ४० दिवस राहतात याला ‘चिल्ला जाडा’ असे म्हणतात.  धुक्याचा परदा दूर होतो. शेतांत सरसोंला(मोहरी) फुले येतात. दूरपर्यंत पिवळा गालीचा पसरलेला सहज दिसतो. जुनी पाने गळून पडतात, झाडांना नवे कोंब फुटतात जणू धरती वसंताच्या स्वागतास सज्ज होते आहे. कालपासून  ढगाळ वातावरण  असल्यामुळे बाहेर थंडी आहे, तरी ही एक उत्साह मनात निर्माण झाला. आज सकाळी लवकर अंघोळ केली आणि सकाळी मनात आलेले विचार (क्षणिका) टंकित करू लागलो.


(१)
रात्रीची विराणी
धुक्यात विरली
प्रेमाची गाणी
ओठांवर आली.

(२)
धुक्यातुनी डोकावली
गुलाबाची कळी
प्रेमाची लाली
गालावर पसरली.

 (३)
हळद  लाउनी
धरती नटली
लेक लाडकी
निघाली सासरी.

Tuesday, December 31, 2013

चोरी झाल्याचा आनंद

घरी चोरी झाली तर आपल्याला दु:ख होते. चोरी का झाली? चोरी टाळता आली असती का? आपल्या लापरवाहीचे खापर घरातल्या कुणाच्या तरी डोक्यावर आपण फोडतोच. घरच्या सर्वाना चोरीपेक्षा चोरीमुळे पोलीस, शेजारी, मित्र-मंडळी इत्यादीचा ही त्रास होतोच. शेजार-पाजार्यांना फालतू चर्चे साठी एक विषय मिळतो.

पण कधी-कधी असे ही होते, घरी चोरी झाल्याचा त्रास होण्याऐवजी, त्याचा आनंद होतो. असाच, चोरीचा एक किस्सा आहे. गुप्ताजी आणि शर्माजी दोघांचे घर लागून होते. तो महिन्याचा शेवटचा दिवस होता, नेहमीप्रमाणे सकाळी गुप्ताजी आपल्या दुकानात आणि शर्माजी आपल्या ऑफिसात.  त्यांची मुले शाळेत गेलेली होती.  वर्माजींच्या घरी पूजा-पाठ होता, दोन्ही घरच्या स्त्रियातिथे गेल्या होत्या. दिल्लीत कुठे ही पूजा-पाठ असेल लाउडस्पीकर हा जोरात वाजविला जातो. पूजेपेक्षा, घरात पूजा-पाठ आहे, हे सर्वांना कळणे महत्वाचे. (दिल्लीकरांची दिखाऊ प्रवृत्ती). भुरट्या चोरांना ही याचा फायदा मिळतो. अशीच संधी-साधून एक भुरटा चोर गुप्ताजींच्या घरी शिरला. हा चोर फक्त नगदी चोरायचा. त्यास गुप्ताजींच्या घरी वीस-पंचवीस हजार रुपये भेटले. तिथून तो गच्ची वर गेला. शर्माजींचा गच्चीवरचा दरवाजा उघडा होता. चोर उडी मारून शर्माजींचा घरात शिरला. आता आपले शर्माजी सरकारी कारकून त्यात ही केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणारे (दुसर्या शब्दात मजबूरीने इमानदार असलेले). त्यांचा एक तृतीयांश पगार (१/३) पोरांच्या शिक्षणात खर्च होता. (दिल्लीत अधिकांश शाळा निजी मालीकीच्या आहे, पहिलीची फी ही दोन हजारापेक्षा कमी नसते. 
उरलेल्या पगारात कसे-बसे घरचा खर्च चालविणारे सरकारी बाबू. महिना अखेरी “ठणठण गोपाल” ही परिस्थिती त्यांच्या घरी नेहमीचीच. चोराला घरात काही चिल्लर नोटां शिवाय काहीच सापडले नाही. उगाच वेळ व्यर्थ गेला म्हणून त्यांने वैतागून एका कागदावर खरडले ‘ओय कंगले, इमरजेंसी वास्ते हजार- दो हजार तो घर में  रख्खा कर’ (भिकारडया, घरात कमीत-कमी इमरजेंसी साठी हजार-दोन हजार तर ठेवत जा) आणि एक हजाराची नोट त्या सोबत ठेउन तो निघून गेला अर्थातच गुप्ताजींच्या घरून चोरलेली. 


चोरानी एका रीतीने शर्माजींच्या थोबडातच मारली होती. साहजिकच आहे, ही चोरी गल्लीत चर्चेचा विषय झाली. शर्माजी सरकारी बाबू आहेत, ते इमानदार आहेत. कदाचित शर्माजींची बायको खर्चिक असावी. तसे शर्माजी सीधे-साधे  सरळमार्गी दिसतात पण कदाचित त्यांना कसलंतरी व्यसन असावं. त्यातच त्यांचा पगार खर्च होत असेल अन्यथा हजार-दोन हजार घरात असतातच. लोक शंकेच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघू लागले. काही ही म्हणा,  लोक व्यवहारी असतात. असल्या कंगल्या माणसाकडून आपल्याला काहीच फायदा नाही. उलटपक्षी काही मागण्याची भीती. शर्माजींचा दुआ-सलाम ही कमी झाला. दुसऱ्या शब्दांत त्यांची इज्जत कमी झाली.

दुसरी कडे, गुप्ताजींची इज्जत वाढली. वेळी-अवेळी हा माणूस आपल्या कामी येऊ शकतो, आपल्याला मदत करू शकतो, असे शेजारी-पाजार्याना वाटणे साहजिकच होते. त्याची दुआ-सलाम ही वाढली, मोहल्यातील सर्व लोक गुप्ताजींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले. ते ही चोरीची घटना गर्वाने छाती फुलवून रंगवून-रंगवून सांगू लागले. “अरे, उस दिन घर में लाख-डेढ़ लाख पड़ा था, भला हो उस मूर्ख चोर का, जिसे पडौसी शर्मा के घर जाने की जल्दी थी. अरे, उसका पूरा का पुरा घर खोद डालता तब भी उस कंगले के यहाँ कुछ नहीं मिलता.  भगवान जो करता है, अच्छा ही करता है. हा! हा! हा!”

मला ही आत्ता असाच अनुभव आला. दोन-तीन दिवसांपूर्वी मला कळले माझ्या ब्लाग वर लेख छापण्या पूर्वीच दोन महाभागांनी तो लेख आपापल्या ब्लागांवर त्यांचा नावाने प्रकाशित केला. मला आश्चर्य वाटले. सौभाग्याने तो लेख आधी  मराठीसृष्टी या वेबसाईट मी टाकलेला होता. त्याची लिंक सापडली. पण मानसिक त्रास हा झालाच. काल ऑफिसात गेलो होतो. आमच्या कार्यालयात सर्वाना इंटरनेट उपलब्ध नाही आहे. भविष्यात त्रास होऊ नये म्हणून त्या वेबसाईट वर ‘माझे लेख’ या जागेवर जाऊन आपल्या सर्व लेखनाची डिटेल (पाच-सहा पाने) कापी करून घेण्याचे ठरविले.

माझ्या मित्र सुनीलच्या  सेक्शन मध्ये इंटरनेट सुविधा होती. लंच टाईमला त्याचा कडे गेलो. तसा सुनील ही ऐक वेगळाच औलिया आहे. मुक्ताफळे तर त्याच्या तोंडावर खेळत असतातच. सुनील, काही प्रिंट घ्यायचे आहे. तो  म्हणाला ‘भाई कविता हो तो चुपचाप लेके पिछली गली से खिसक जा. आज कान में रखने के लिए रुई नहीं है, सुनाएगा तो खूप मारूंगा’(कवितेचे प्रिंट घेउन चुपचाप खिसक, ऐकविण्याचा प्रयत्न केला तर खूप मारीन). मी त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्या वर तो उद्गारला ‘तेरे जैसे टुच्चों को कोई छापने वाला मिलता नहीं है, बस वेबसाइट लिखकर अपनी खुरक मिटाकर खुद को लेखक समझ रहे हैं(तुझ्यासारखे फालतू लोक, वेबसाइट वर लिहून, आपली खाज मिटवितात आणि स्वत:ला लेखकु समजतात). अरे, पण आता तुला खुश व्हायला पाहिजे. मी म्हणालो, यात खुश होण्यासारखे काय आहे.  सुनील म्हणाला, अरे ज्या वस्तूला काही किंमत असते त्याची चोरी होऊ शकते. भले ही किंमत चार आणा-आठाना का असेना. सॅारी, या पेक्षा छोटा सिक्का आजकाल मिळत नाही, तशी कविता इत्यादींची  किंमत त्या पेक्षा निश्चित कमी असेल.

माझ्या डोक्यात प्रकाश पडला, गुप्ताजींची आठवण झाली. गर्वाने छाती फुलवून रंगवून-रंगवून चोरीची कहाणी ऐकवितात. आपली नसलेली छाती फुलते आहे, असा भास मला झाला.  सुनीलने  माझ्या चेहऱ्यावरचे भाव पटकन ओळखले. पक्का बाबू असल्यामुळे मुर्गा पटकन कसा कापला पाहिजे ह्या कलेत तो पारंगत होताच, लगेच म्हणाला, तो इस ख़ुशी के मौके पर एक-एक कप काफी हो जाय. अश्या रीतीने साउथ ब्लॉकच्या काफी हाउस मध्ये कॉफी पीत-पीत चोरी झाल्याचा आनंद आम्ही साजरा केला.   

Sunday, December 29, 2013

शतशब्द कथा - मोबाईल वाली ती



रस्त्याच्या काठावर मित्रांसोबत झाडाखाली एका बेंच वर बसलो होतो. येणारी-जाणारी *हरियाली निहारीत डोळ्यांना तृप्त करत होतो.  तेव्हड्यात तिच्याकडे लक्ष गेलं. कानात हेडफोन, हातवारे करीत कुणाशी गुलगुल बोलत होती. निरखून बघितले, प्रेमाचा रंग तिच्या गालावर खुलून दिसत होता. रस्त्याच्या पलीकडे बहुधा तिचा प्रियकर असावा. कदाचित त्याचाच स्वप्नात दंग, ट्रफिकची चिंता करता, बेपर्वा ती, तिच्याच धुंदीत रस्ता पार करू लागली.
 
'
अरररे...' अचानक मी किंचाळलों. डोळे बंद केले. क्षणभर शांतता! मग एकच गदारोळ. एक गुलाबाची कळी पायाखाली  चुरगळली होती. 

*
हरियाली निहारना: एका जागेबर बसून एका तरुण मुलींना बघण्याचा छंद (टिपिकल दिल्लीची भाषा).