Tuesday, January 3, 2023

वार्तालाप(२०): श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ 

(श्री समर्थ सेवा मंडळाद्वारा संचालित श्री सार्थ दासबोधाचे निरूपण कार्यक्रमात, देशभरात  श्री दासबोधाचे निरुपणाचे कार्यक्र्म सुरू आहे. जानेवारी 2023 महिन्यात दिल्ली केंद्राला पाच रविवारी हा कार्यक्र्म सादर कारण्याचा मान मिळाला. पहिल्या रविवारी मला श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण करण्याचे दायित्व मिळाले. दिल्ली केंद्राचे दायित्व निर्वाह करणार्‍या डॉक्टर मंगला कवठेकर यांच्या मार्गदर्शनाची मोलाची मदत झाली. हा कार्यक्र्म 1 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 4 ते 5 ऑन लाइन झाला. पुढील कार्यक्रम ही रविवारी याच वेळी होतील). 

श्री समर्थ व्यवस्थापन या विषयाचे आद्य गुरु होते. दोन शब्दांत व्यवस्थापन म्हणजे पूर्व निश्चित कार्याचे नियोजन करणे आणि ते कार्य यशस्वीरीत्या  कार्यान्वित करणे. व्यवस्थापनाचा उपयोग मानवी जीवनात सर्व क्ष्रेंत्रात होतो. समर्थांनी दासबोधात परमार्थ आणि प्रपंचात यशस्वी होण्याचे नियोजन आणि कार्यांवन कसे करावे याचे विस्तार पूर्वक वर्णन केले आहे. एकीकडे समर्थांनी दासबोधात शेती पासून ते राजकारण कसे करावे हे सांगितले आहे. तर दुसरी कडे  बद्ध जीवाने साधक कसे बनावे हे ही सांगितले आहे. 

सार्थ श्रीदासबोधातील श्रोताअवलक्षण समासात समर्थांनी श्रोत्यांचे अवलक्षण दूर करण्याचेय उपाय तर सांगितले आहे पण एकाग्रचित्ताने श्रवण केल्यानस त्याचे संसारात आणि आध्यात्मिक क्षेत्रात होणारे लाभ ही सांगितले आहे. आता पहिला प्रश्न सर्वांच्या मनात येतो श्रोता म्हणजे कोण. श्रोता हा श्रवण करतो. भागवत कथा असो किंवा सोसायटीची सभा, श्रोत्याचे कार्य वक्ता जे बोलतो त्याचे श्रवण करायचे. दूसरा प्रश्न? श्रवण करण्याचा लाभ काय? समर्थ दासबोधात श्रवणाची महत्ता सांगताना म्हणतात: 

ऐक परमार्थाचें साधन। जेणें होय समाधान।

तें तूं जाण गा श्रवण। निश्चयेंसीं।  

श्रवणें आशंका फिटे। श्रवणें संशयो तुटे।

श्रवण होतां पालटे। पूर्वगुण आपुला।

श्रवणें होय कार्यसिद्धी। श्रवणें लागी समाधी।

श्रवणें घडे सर्व सिद्धी।समाधानासी।

समर्थ म्हणतात श्रवण केल्याने भक्ति प्राप्त होते, आसक्ती तुटते, चित्ताची शुद्धी होते, मी पणा नष्ट होतो, आशंका फिटतात आणि  संशय दूर होतात. या सर्वांचा परिणाम- पूर्वीचे दोष पालटतात, कुसंगती तुटते, कार्य सिद्ध करण्याचा निश्चय दृढ होतो. सांसारीक आणि आध्यात्मिक कार्य सिद्ध होतात आणि मनाला समाधान ही मिळते. 

 पुन्हा एक प्रश्न मनात येतो. आज पुस्तके उपलब्ध आहेत. दासबोध वाचता येते. मग निरूपण ऐकण्याची गरज आहे का?  आहे तर श्रवण कसे केले पाहिजे?  समर्थांच्या शब्दांत: 

ऐकल्याविण कळलें। शिकविल्याविण शहाणपण आले। देखिलें न ऐकलें। भूमंडळी।

सकळ कांहीं ऐकतां कळे। कळतां कळतां वृत्ति निवळे।नेमस्त मनामधें आकळे । सारासार। 

श्रवण म्हणिजे ऐकावें। मनन म्हणिजे मनीं धरावें। येणें उपायें स्वभावें । त्रैलोक्य  चाले॥

एक उदाहरण, आपण सर्वच शाळेत गेलो आहे. पाठ्य पुस्तकात धडा असतो. तरीही आपण मुलांना शाळेत पाठवतो.  कारण फक्त धडा वाचून धडया खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे त्याला जमणार नाही, हे आपल्याला माहीत असते. विद्यार्थी शाळेत जातो. वर्गात शिक्षकाला लक्षपूर्वक ऐकतो. शाळा सुटल्यावर तो घरी येतो. घरी आल्यावर अभ्यासाला बसतो. आता हा विद्यार्थी अभ्यास कुठे करणार. बैठीकीच्या खोलीत आजोबा टीव्ही वर समाचार पाहत होते. स्वैपाक घरात आई स्वैपाक करत होती. विद्यार्थी घरातल्या ज्या खोलीत कुणीही नाही अश्या खोलीत बसून पुन्हा धडा वाचतो. शाळेत शिक्षकाने काय सांगितले होते त्यावर विचार करतो, मनन करतो आणि नंतर प्रश्नांची उत्तरे लिहतो. जर विद्यार्थी शाळेत लक्ष देऊन शिक्षकाला ऐकणार नाही तर त्याला प्रश्नांचे उत्तर देणे जमणार नाही. तसेच श्रीदासबोध समजण्यासाठी निरूपण ऐकणेही गरजेचे. 

 श्रवणासाठी पहिला महत्वपूर्ण टप्पा म्हणजे श्रवणाची जागा. बहुतेक अधिकान्श भागवत कथा, भजन इत्यादि मंदिराच्या शांत परिसरात होतात.  कथा सुरू करण्यापूर्वी  माइक, दिवे इत्यादीची व्यवस्था सर्वच करतात. पण जर जागा स्वच्छ नसेल तर काय होते. समर्थ म्हणतात कथा सुरू झाली एक श्रोता   "निरूपणीं येऊन बैसला। तो विंचुवें फणकाविला। कैचें निरूपण जाला। कासाविस। साहजिकच आहे ज्या श्रोत्याला विंचू चावेल, तो असह्य वेदनेने कासावीस होईल. इतर श्रोता निरूपण ऐकणे सोडून त्याची मदत करायला धावतील. कथेचा रस भंग होईल. श्रोत्यांची एकाग्रता तुटेल. ज्या ठिकाणी श्रवणाचा कार्यक्रम असतो ती जागा स्वच्छ पाहिजे. डास, विंचू, उंदीर, पाली, झुरळ इत्यादि जंतूंचा वावर त्या परिसरात नसावा.  तुम्ही ऑनलाइन निरूपण ऐकत असाल तरी ही तुम्हाला या खबरदार्‍या घ्याव्याच लागतील. या शिवाय अड्मिनच्या अनुमति शिवाय मोबाइलचे माइक ही बंद ठेवावे लागेल. 

 बाहेरचे लोक, चोर इत्यादि येऊन ही श्रवणाच्या कार्यक्रमांत विघ्न आणतात. चोर जोडे चप्पलांची चोरी तर करतातच पण मौका साधून स्त्रियांचे दागिने ही लंपास करतता. काही लोक स्त्रियांची छेड काढण्यासाठीच अश्या कार्यक्रमांना येतात. श्रवणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भुरट्या चोरांवर आणि असामाजिक तत्वांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था करणे ही गरजेचे असते. काहीं श्रोत्यांना शारीरिक त्रासांमुळे जमिनीवर बसवत नाही, पण ते कथा, कीर्तन, निरूपण ऐकण्यासाठी येतात. अश्या श्रोत्यांच्या बसण्यासाठी खुर्च्यांची सोय करणे आवश्यक असते. याशिवाय सभागृहाच्या बाहेर पिण्याच्या पाण्याची, टॉयलेट इत्यादीची व्यवस्था करणे ही गरजेचे. 

काही श्रोता अज्ञानवश श्रवणाच्या कार्यांत विघ्न आणतात. त्यांच्या मुळे इतरांचे ध्यान ही भंग होते. उदाहरण: कथा सुरू असतानाच काही श्रोते पाणी पिण्यासाठी, काही मल-मूत्र त्याग करण्यासाठी मधेच उठून जातात, अश्या श्रोत्यांनी मागे बसणे उचित, जेणेकरून दुसर्‍यांचे ध्यान भंग होणार नाही. काही श्रोते घरून भरपूर जेवून येतात. कथा सुरू झाल्यावर ढेकरे देतात, काही चक्क घोरू लागतात. त्या झोपलेल्या श्रोत्याला निरुपणाचा लाभ मिळणे शक्यच नाही.  त्यापेक्षा त्याने घरी जाऊन झोपले तर किमान दुसर्‍या श्रोत्यांना त्रास होणारा नाही. काही श्रोते ऐकण्याचे नाटक करत हळू आवाजात आपसात गप्पा मारत राहतात. तर काही श्रोता त्या भागातील  आल इंडिया रेडियोच्या बातम्यांचे प्रसारण करण्यासाठीच अश्या कार्यक्रमांत येतात. अधिकान्श श्रोते निरुपणा एवजी त्या चटपटीत मसालेदार बातम्या कान लाऊन ऐकतात.  काही श्रोता सभागृहात आल्यावर ही मोबाइल बंद ठेवत नाही. त्यांचा मोबाइल सारखा वाजत राहतो  "हॅलो जरा जोरात बोला, इथे प्रवचन सुरू आहे, ऐकू येत नाही...".  श्रोत्यांचे लक्ष तो मोबाइल वर काय बोलतो आहे याकडे जाते. अश्या अज्ञानी श्रोत्यांच्या अश्या वागण्याचा त्रास कथा श्रवण करण्यास आलेल्या इतर श्रोत्यांना तर होतोच, पण कधी-कधी निरूपण करणारा वक्ता ही वैतागून जातो. त्याचे ही लक्ष कथेत  लागत नाही. तो ही विचार करतो, इथे हे असेच सुरू राहणार. आपण आपली कथा पूर्ण करू, ऐकायची असेल तर लोक ऐकतील. नाही ऐकली तरी आपल्याला बिदागी मिळणारच आहे. अश्या वक्त्यांसाठीच समर्थ म्हणतात "हरीदास ते रें रें करी पोटासाठी". सारांश एवढाच, श्रवण करायला जाण्याआधी श्रोत्यांनी सर्व आवश्यक  कार्य निपटून घ्यावे. ताजेतवाने होऊन शांत मनाने सभागृहात यावे. मोबाइल इत्यादि बंद ठेवावे.  तरच ते श्रवणाचा लाभ  घेऊ शकतील. 

अध्यात्म्याच्या मार्गात प्रगति करण्यासाठी मुमुक्षू साधकाला समस्त श्रोता अवलक्षणाचा त्याग केला पाहिजे. यासाठी समर्थांनी साधकांना मार्गदर्शन करताना म्हणतात:  

श्रवणामध्यें सार श्रवण। तें हें अध्यात्मनिरूपण।
सुचित करून अंतःकर्ण ग्रन्थामधें विवरावें॥

येकांतीं नाजुक कारबार। तेथें असावें अति तत्पर।
त्याच्या कोटिगुणें विचार। अध्यात्मग्रन्थीं ॥

श्रवणमननाचा विचार। निजध्यासें साक्षात्कार।
रोकडा मोक्षाचा उधार। बोलोंचि नये॥  

 समर्थ म्हणतात अध्यात्मनिरूपणाचे श्रवण हे सारामध्येही सार आहे. म्हणून अंत:करण एकाग्र करून अध्यात्म ग्रंथाचे नीट विवरण करावे. एकांतात गुप्तपणे चर्चा आपण अति सावध राहून करतो. त्याच्यापेक्षा  कोटिगुणाने सावध  राहून अध्यात्म ग्रंथांचे निरूपण ऐकले पाहिजे. समर्थ म्हणतात अश्यारीतीने ग्रंथांचे श्रवण केल्यास आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो अर्थात तत्काळ मोक्ष मिळतो.

सामाजिक संस्थांच्या सभा, कंपन्यांच्या, सरकारी अधिकर्‍यांच्या मीटिंग्स असो किंवा विद्वानांच्या सभा, जिथे धार्मिक विषयांवर शास्त्रार्थ किंवा वाद-विवाद होतात, अश्या सभांमध्ये प्रत्येक व्यक्ति वक्ता आणि श्रोता दोन्ही असतो. वक्ता त्यांचे मते मांडतात. त्यावर श्रोत्यांसोबत चर्चा करतात अधिकान्श चर्चांचा  मुख्य हेतु समस्यांवर तोडगा काढणे किंवा नियोजित कार्य कसे संपादित करावे इत्यादि असते. पण होते काय, समर्थ म्हणतात  

येक येंकापुढे बोले। श्रोते अवघे वक्ते जाले।

जैसा जंबूक मिळाले। कोळहाळ करिती।

आणि ही कोल्हेकुई  आरडा-ओरड कश्यासाठी असते:   

माझें होये तुझें नव्हे। ऐसी अखंड जयास सवे।

आपल्या थोरपणासाठीं। अच्यावाच्या तोंड पिटी ।

येकेकडे अभिमान उठे।

दूसरेकडे उदंड पेटे।

ऐसे श्रोते खरे खोटे। कोण जाणे।

 गर्व आणि अहंकाराने ग्रस्त वक्त्यांना वाटते, त्यांचेच मत खरे आणि दुसर्‍यांचे खोटे. काही वक्ता तर  दुसर्‍यांना बोलूच देत नाही. काही रागाने  वाटेल ते बोलत सुटतात. अश्या सभांमध्ये भांडे-तंटे होतात. कधी-कधी मारामारी ही होते. कोण काय बोलतो आहे, कुणाला काहीच कळत नाही. अश्या वातावरणात निर्णय घेणे अशक्य असते. अश्या वेळी जाणत्या श्रोत्यांने काय करावे.  

 समर्थ म्हणतात, दुर्जन आणि मूर्खांशी विवाद करणारा हा विवेकी श्रोता नसतो. अश्या लोकांची वटवट शांतपणे ऐकली पाहिजे. त्यांच्याशी वाद घालणे, हे विवेकी पुरुषाचे लक्षण नाही. शहाणे सज्जन पुरुष, दुसर्‍यांचे अंत:करण जाणतात. मान, प्रसंग, काळवेळ याचे त्यांना अचूक ज्ञान असते. दुखी आणि त्रासलेल्या  लोकांना कसे शांत करावे हे ही ते जाणतात.  विवेकी पुरुष नेहमीच विचाराने वागतो. विवेकाच्या बळावर दीर्घकाळ अखंड प्रचंड पुरुषार्थ करण्याची क्षमता त्याच्यात असते. तो स्वतः त्रास सोसून परत सर्व कार्य सुरळितपणे करतो आणि लोकांकडूनही करवून घेतो. समर्थ म्हणतात अश्या जाणत्या श्रोत्यांची  थोरवी लोकांना कळणे कठीण असते.  

 श्रोता अवलक्षण समासात समर्थांनी श्रोत्यांचे दोष आणि गुण तर सांगितले आहे. पण ज्यांना समाजाच्या भल्यासाठी भव्यदिव्य कार्य करायचे असेल  किंवा लोकांकडून करवून घ्यायचे असेल तर त्यांना विवेकपूर्ण रीतीने मोठे- मोठे निर्णय घ्यावे लागतात.  विवेक कसा करावा यासाठी समर्थ म्हणतात: 

 विवेक एकांती करावा।  येकांतीं येत्‍न सांपडे। येकांती स्मरण करावें ।  

आपले नियोजित निश्चय आणि हेतु सिद्ध करण्यासाठी, अंतरात्म्याशी चर्चा केल्याशिवाय विवेकपूर्ण निर्णय घेणे अशक्य असते. एकांतातच चिंतन मनन  योग्य प्रकारे करता येते. एकांतातच अंत:फूर्ती मिळते. योग्य दिशेने प्रयत्न करण्यासंबंधी प्रेरणा मिळते. भविष्य घडविण्याची क्षमता प्राप्त होते. स्वत: समर्थ याचे जागते उदाहरण होते. ते स्वत: बाबत म्हणतात "दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो". समर्थांनी 12 वर्ष भारत भ्रमण केले. मार्गात त्यांची भेट अनेक संत महातम्यांशी झाली असेल. समर्थांनी त्यांना श्रवण केले असेल, त्यांच्या सोबत देश आणि धर्माच्या बिकट परिस्थिति वर चर्चा केली असेल. एकांतात राहून समर्थांनी आपल्या अंतरात्म्याशी देश आणि धर्माच्या बिकट परिस्थिति वर चिंतन आणि मनन केले असेल. समर्थांनी देश आणि धर्माची रक्षा करून स्वराज्याची निर्मिती कशी करता येईल यावर फक्त उपाय सुचविला नाही अपितु समर्थांनी त्याकाळच्या विपरीत परिस्थितितही देशभरात धर्माच्या पुन: स्थापनेसाठी अनेक मठांची स्थापना केली.  त्या मठांमध्ये  प्रभू श्रीराम आणि हनुमंताच्या मूर्तींची स्थापना केली. समर्थांच्या मठांत  हनुमंतासारखी शूर वीर आणि धर्मनिष्ठ तरुण घडविल्या गेले जे देश आणि धर्माची रक्षा करण्यास समर्थ होते. स्वत: समर्थांच्या शब्दांत "समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे". समर्थांच्या या कार्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेस मोलाची मदत झाली.  कालांतरात मराठा साम्राज्य अटक ते कटक पर्यन्त पसरले.  आजचे उदाहरण म्हणाल तर स्वामी रामदेव यांनी आर्ष गुरुकुलांत वेद, उपनिषद, दर्शन आणि योग शास्त्राचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर, हिमालयात गंगोत्रीच्या परिसरातील बर्फाच्छादित गुफेत तीन वर्ष एकांतवासात साधना केली होती. तिथून मिळालेल्या अंत:प्रेरणेने योग प्रसारासाठी देशात लाखो किमी प्रवास करून हजारो  योग शिविर घेऊन कोट्यावधी लोकांना स्वस्थ आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला. गेल्या 22 वर्षांपासून त्यांचे पहाटेचे योग प्रशिक्षण शिविर अखंडित सुरू आहे.  त्यांनी योग आणि आयुर्वेदाला भारतात आणि जगात प्रतिष्ठा मिळवून दिली.  एका रीतीने ते आज समर्थ विचारांना सार्थक करीत आहेत. 

पूर्वजांचा इतिहास हा ही श्रवणाचा विषय आहे.  छत्रपती शिवरायांच्या इतिहास वाचून जर त्यांच्या तथाकथित अनुयायांना “गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो” ही घोषणा द्यायला लाज  वाटत असेल, तर हे श्रवण नव्हे. अश्या मूर्ख लोकांसाठीच समर्थ म्हणतात: सांगे वडिलांची कीर्ती तो येक मूर्ख? आपल्या महान पूर्वजांचा आदर्श समोर ठेऊन आज आपण देशासाठी काही करू शकतो का? हा विचार करून स्वराज्य घडविण्याचे कार्य करणे म्हणजे श्रवण. आज आपल्या महाराष्ट्राचे पुत्र गडकरी ही देशाला जोडणार्‍या महामार्गांचे अतिशय वेगाने निर्मिती करून एका रीतीने समर्थांचे स्वप्न साकारतात आहे. असो.     

 श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण ऐकून श्रोत्यांनी आपले दुर्गुण सोडून उत्तम श्रोता बनावे हा फक्त एक हेतु होता. पण या समासाचा मुख्य उद्देश्य जे जे उत्तम ऐकले   ते ते आचरणात आणावे हा आहे. मी आपल्या अल्प बुद्धीने या समासाचे  निरूपण करण्याचा प्रयास केला. यात अनेक उणिवा असतील. त्यासाठी जाणकार श्रोत्यांनी मोठ्या मनाने मला क्षमा करावे, ही विनंती. आजच्या निरुपणाची सांगता, समर्थांच्या शब्दांत"

 ऐसा तो जाणता लोक। समर्थ तयाचा विवेक। त्याचे करणे कांहिं येक। जनास कळेना। बहुत जनास चालवी। नाना मंडळें हालवी। ऐसी हे समर्थपदवी। विवेकें होते। श्री राम। जय जय रघुवीर समर्थ.

 

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रोताअवलक्षणनिरूपणनाम समास दहावा।

जय जय रघुवीर समर्थ 

 


Friday, November 18, 2022

कणाद, प्रमाण आणि विज्ञान

ज्ञात ज्ञानाच्या आधारावर कुठलीही गोष्ट सिद्ध करणे म्हणजे विज्ञान. पण ज्ञात ज्ञान माणसाची जशी-जशी प्रगति होते तसे-तसे बदलत राहते. प्राचीन काळी कणादला कळले होते प्रत्येक पदार्थ हा अणु पासून बनतो. पण अणुचा आकार त्याकाळी सिद्ध करणे संभव होते का? पहा विद्वानांच्या सभेत काय झाले असेल, 

सभापति विज्ञानवादी विद्वान म्हणाले, कणाद, सर्व जड पदार्थ अणु पासून बनतात हा तुझ्या सिद्धांत सर्वांनाच मान्य आहे. पण तू म्हणतो अणुचा आकार अत्यंत सूक्ष्म असल्याने तो डोळ्यांनी दिसणे शक्य नाही, त्यामुळे त्याचे वर्णन करणे अशक्य. कणाद, जड पदार्थाचा अणु जर डोळ्याने दिसत नसेल  तर तो पदार्थ ही दिसणार नाही. धुळीचे कण अत्यंत सूक्ष्म असले तरी सूर्याच्या प्रकाशात दिसतात. अणुचा आकार आणि तो का दिसत नाही हे स्पष्ट करणे गरजेचे, असे आम्हाला वाटते. कणाद ने काही वेळ विचार केला आणि म्हणाला, सभापति, बहुतेक एक अणु धुळी कणांपेक्षा किमान सहा पट सूक्ष्म असू शकतो त्यामुळे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. सभापती कणादला म्हणाले, कणाद, तू एका धुळी कणाचे सहा तर सोड, किमान दोन तुकडे करून दाखवू शकतो का?  कणाद ने उत्तर दिले, क्षमा करा हे संभव नाही. सभापति म्हणाले, जे संभव नाही त्याच्या स्वीकार विद्वान करत नाही. कणाद, विज्ञानाला प्रमाण हवे असते. अनुमानाच्या आधारावर विज्ञान चालत नाही. बिना प्रमाण लोक सत्याचा ही स्वीकार करत नाही. तूर्त अणु हा धूलि कणा एवढाच म्हणता येईल. त्या काळच्या ज्ञात ज्ञानानुसार धुळीचा कण हा सूक्ष्म  पदार्थ होता. आजच्या मोजमाप करणार्‍या यंत्रांनी आपण अणुपेक्षा ही सूक्ष्म पदार्थांना सहज मोजू शकतो. आज जर कणाद असते तर त्यांचे उत्तर  वेगळे असते.  त्याचे प्रमाण ही ते देऊ शकले असते. असो.  

असाच एक किस्सा स्वामी रामदेव यांनी सांगितला होता. गंगोत्रीच्या वर हिमालयात साधना करीत असताना, अनेक जिज्ञासु योग प्राणायामच्या माध्यमाने कुंडलिनी जागृत करण्यासाठी काय करावे असे प्रश्न विचारीत. स्वामी रामदेव त्यांना योग प्राणायाम कसे करतात इत्यादि शिकवायचे. जेवढा जास्ती अभ्यास तेवढी कुंडलिनी जागृत करण्याची संभावना जास्त. यासाठी जिज्ञासु घरी गेल्यावर रोज अनेक तास प्राणायाम करू लागले. पुढे ते म्हणाले कुंडलिनी कुणाची जागृत झाली कि नाही हे मला माहीत नाही, पण अनेकांनी परत येऊन सांगितले प्राणायाम केल्याने त्यांना असाध्य रोगांपासून मुक्ति मिळाली. असे अनेक दृष्टान्त पाहून मी योग प्राणायामच्या प्रसारासाठी आपले आयुष्य वाहून देण्याचा निश्चय केला. असाच एक जिज्ञासु दिल्लीच्या एका प्रख्यात हॉस्पिटल मध्ये एका असाध्य रोगाचा उपचार घेत होता. प्राणायाम करून काही महिन्यातच तो रोगमुक्त झाला. हे पाहून, त्याच्या उपचार घेणार्‍या डॉक्टरने स्वामीजींना विचारले तुम्ही कोणते औषध दिले जेणे करून हा रोगमुक्त झाला. स्वामीजींनी त्याला कोणते ही औषध दिले नाही हे सांगितले. डॉक्टर विज्ञानवादी होता, त्याच्या मते स्वामीजींनी औषधीचे नाव आणि मात्रा इत्यादींची माहिती दिली तर त्यावर अनुसंधान करून हजारो रुग्णांचे भले करता येईल. फक्त योग आणि प्राणायाम करून रुग्ण रोग मुक्त होऊ शकत नाही यावर डॉक्टर ठाम होते. अखेर डॉक्टरने विचारले, स्वामीजी विज्ञानाच्या भाषेत समजावून सांगा प्राणायाम करुन हा कसा ठीक झाला. स्वामीजींना त्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण होते. शेवटी स्वामीजी उदाहरण देत म्हणाले डॉक्टर साहेब मोहरीचे बी शेतात  पेरले, मोहरीचे रोप वाढले आणि त्यातून तेल मिळाले. मोहरीने सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या मदतीने मातीतून तेल सोशून घेतले, असे ही म्हणता येईल पण ते सिद्ध करता येईल का. आता जर मी माती तेलाच्या घाणीतून काढेल तर मला तेल मिळेल का? नाही. या घटकेला प्राणायाम करून माणूस रोगमुक्त कसा होतो, हे मोजण्याचे साधन माझ्याजवळ नाही. त्यामुळे ज्ञात ज्ञानाच्या मदतीने हे मी सिद्ध करू शकत नाही. पण प्राणायाम करून रुग्णांना असाध्य रोगांपासून ही मुक्ति मिळते याचे जीवंत प्रमाण हजारो आहेत. आज पतंजलि रिसर्च फाऊंडेशन ही संस्था योगावर अनुसंधान करते आणि रिसर्च पेपर्स ही प्रकाशित करते. आज ते विज्ञानच्या आधारावर योग आणि प्राणायामाचे परिणाम सिद्ध करू शकतात. असो

आपले ज्ञात ज्ञान जर अपूर्ण असेल तर सत्य ही आजच्या विज्ञानाच्या तराजूवर तोलणे अशक्य. खरा विज्ञानवादी सत्याचा स्वीकार करतो आणि सत्य तपासण्याचा मार्ग शोधतो. पण दुराग्राही सत्याचाच स्वीकार करत नाही. इथेच समस्या निर्माण होते. व्यर्थचे वादविवाद होतात. ज्ञानाचा प्रकाश सामान्य लोकांपर्यंत लवकर पोहचत नाही. 


Friday, November 11, 2022

मनुवाद्यांपासून दूर तिला करा


गढ किल्ल्यांची मोहीम आखतात
सूफी संतावर गरळ ओकतात
धर्माची अफू तरुणांना पाजतात
मनुवादाचा हो प्रचार करतात.
 
शिकली सवरलेली नार ती 
उत्तम लेखिका, विदुषी ती 
नाकी नथ, कपाळी टिकली 
गुरुजींच्या पाया ती हो पडली. 

लिंब्रांडुंच्या अंगाची लाही-लाही झाली 
महाराष्ट्राची इज्जत जगी बुडाली
काळ्या जादूला बहुतेक ती भुलली
उतारा आणा, नजर तिची काढा
मनुवाद्यांपासून दूर तिला करा . 
 




Monday, August 22, 2022

समर्थ रामदास: वाद विवाद सोडा सुख संवाद करा

 
जनी वाद-वेवाद सोडूनि द्यावाl
जनी सुख-संवाद सुखें करावाll
 जगी तोचि तो शोक संतापहारीl
तुटे वाद संवाद तो हीतकारी ll
(मनाचे श्लोक 109)

समर्थ म्हणतात हे मना, लोकांशी सुख संवाद आनंदाने करावा. वाद विवाद  कदापि करू नये. जो संवाद, वाद दूर करतो, सुखी आणि समाधानी करतो. जो आपले दुख हरतो. तोच संवाद करणे योग्य.

घर असो, कार्यालय असो किंवा सामाजिक आणि राजनीतिक संस्था असो. प्रत्येक ठिकाणी काही समस्या असतात किंवा कार्यक्रम असतात. कार्यक्रम  ठरविण्यासाठी आणि समस्येंवर तोडगा काढण्यासाठी संवाद हा करावाच लागतो. साहजिकच आहे जिथे दहा लोक असतील, तिथे प्रत्येकाचे विचार आणि कार्य करण्याची पद्धत ही वेगळी असणारच. सर्वांची मते ऐकून सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी संवाद हा करावाच लागतो. पण संवादाचे रूपांतरण वादात झाले तर कार्याचा नाश हा होतोच. लोकही तुटून दूर होतात. संवादातून समाधान शोधाचे असेल तर आपल्याला निम्न बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे. 

1. आपला अहंकार हा बाजूला ठेवणे.
2. मी म्हणेल ती पूर्व दिशा हा हेका सोडणे.  
3. कुणालाही हीन लेखू नये.
4. अडाणी व्यक्तीच्या मतांचा ही सम्मान करणे.  
5. कुणी काहीही बोलले तरी क्रोध न करणे. 
6. बोलताना सदैव वाणी वर संयम ठेवणे. 
7. व्यर्थचे प्रश्न न विचारणे. 
8. दुसर्‍यांचे दोष न दाखविणे.
9. फक्त विषयवस्तु वरच चर्चा करणे. 

संवाद करताना वरील बाबी लक्षात ठेवल्या तर, समस्यांचे समाधान शोधता येतात. अश्या प्रकारचा संवाद सर्वांना संवाद सुखदायी आणि समाधानी करतो. शेवटी जे काही आपण सुचवितो त्याचे पालन आपल्यालाही करता आले पाहिजे. अन्यथा आपल्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. 


Friday, August 19, 2022

समर्थ रामदास: पाण्याचे नियोजन आणि शेती



नदीचे उदक वहात गेले. तो ते निरर्थक चालले.
जरी बोंधोनी काढले. नाना तीरी कालवे.
उदक निगेने वर्तविले. 
नाना जीनसी पीक काढले.
पुढे उदकाचे झाले. पीक सुवर्ण. 
नाना उंच आम्र फळे. अंजीर,ऊस, द्राक्ष, केले; 
नाना पिके यत्नजळे. निर्माण झाली.  

एका टीव्ही वाहिनीवर एक छोट्या शेतकर्‍याची गोष्ट दाखविली होती. त्याच्या छोट्या शेतात नाना पिके, भाज्या, फळे घेऊन तो चांगली कमाई करत होता. तो कार्यक्र्म बघताना मला समर्थांच्या वरील ओळी आठवल्या. पुराणात म्हण आहे, जे कृषि करतात ते ऋषि. आपले सर्व ऋषि मुनि हे शेती ही करायचे. वैदिक काळात त्यांच्या आश्रमात शेतीवर अनुसंधान ही होत होते. बहुतेक त्यामुळेच आपल्या देशात शेतीत विविधता आली असेल. समर्थ ही एक ऋषि होत. समर्थांनी 12 वर्ष देशाचे भ्रमण केले होते. समर्थांनी भ्रमण करताना देशातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणल्या. पाणी आणि पिकांचे नियोजन केल्या शिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. हे त्यांनी जाणले. समर्थांनी शेतकर्‍यांच्या समस्यांवर उपायही सुचविले. समर्थ म्हणतात, व्यर्थ वाहणारे नदीचे पाणी अडवून बंधारे बांधले पाहिजे. कालवे बांधून पाणी शेतात पोहचविले पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पाण्याची जेवढी उपलब्धता आहे त्यानुसार पिके घेतली पाहिजे. पिकाला जेवढे पाहिजे, तेवढेच पाणी दिले पाहिजे. एकाच वेळी शेतात नाना प्रकारची पिके घेतली पाहिजे. अनेकदा शेतकरी लोभाला बळी पडून संपूर्ण शेतात एकच पीक घेतात. वादळ, वारे, कमी-जास्त पाऊस, पिकाला लागणारी कीड इत्यादि कारणांमुळे पीक हातात येत नाही. शेतकर्‍याचे नुकसान होते.  कधी कधी नगदीच्या लालची ने एखाद्या भागात अनेक शेतकरी एकच पीक घेतात. मग बाजारात भाव मिळत नाही. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. बाजारात टमाटो, कांदे इत्यादींचे भाव अचानक गडगडण्याचे हेच मुख्य कारण.  नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. अधिकान्श आत्महत्या करणारे शेतकरी एकच पीक घेणारे असतात. शेतात एकापेक्षा जास्त पीक घेतले असेल तर, शेतकर्‍यावर अशी विपरीत परिस्थिति येणार नाही. समर्थ म्हणतात, शेतात  निश्चित जागी विविध प्रकारची फळ देणारी झाडे ही लावली पाहिजे. झाडे वार्‍यापासून पिकांची सुरक्षा तर करतातच पण फळे देऊन शेतकर्‍याची आर्थिक मदत ही करतात. समर्थांनी सुचविलेल्या वरील उपायानुसार जर शेतकर्‍यांनी शेती केली तर आज ही ते सुवर्ण पीक घेऊ शकतात. 

Wednesday, August 17, 2022

भारतीय शिक्षा बोर्ड

 

1835 पूर्वी देशात 6 लाख गुरुकुल होते. विद्यार्थी गुरुकुलांत सुरवातीच्या पाच-सहा वर्ष स्थानिक भाषा, गणित इत्यादीचे जीवनावश्यक ज्ञान अर्जित करायचे। सामान्य शिक्षण पूर्ण झाल्यावर अधिकान्श विद्यार्थी गुरूंकडून पारंपरिक पेशेवर ज्ञान प्राप्तकरून आत्मनिर्भर होत असे.  उरलेले हुशार विद्यार्थी गणित, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, तलाव निर्मितीचे शास्त्र, वैद्यक शास्त्र, विज्ञान, संस्कृत भाषा, व्याकरण, दर्शन, वेद उपनिषद  इत्यादि विषय शिकायचे. परिणामी शिक्षित बेरोजगारी हा शब्द अस्तित्वात नव्हता. या शिवाय 1850च्या पूर्वी जगात सर्वात जास्त साक्षर लोक आपल्या देशात होते.  

ब्रिटीशांनी गुरुकुलांना नष्ट करून मैकाले शिक्षण भारतात आणले. शिक्षणाचे मुख्य उद्देश्य होता, भारतीयांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, त्यांच्यात हीन भावना भरणे आणि ब्रिटीशांसाठी चाकर निर्मिती करणे. या व्यवस्थेत 11/12 वर्ष शालेय शिक्षण घेऊन ही, पारंपरिक ज्ञानापासूनही वंचित झालेले, अधिकान्श विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नव्हते. भारत स्वतंत्र झाला. पण शालेय शिक्षणात बदल झाला नाही. आपल्या इतिहास, परंपरा आणि मुळांशी विद्यार्थ्यांची नाळ जोडण्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. आजची भारतीय शिक्षा म्हणजे 'बिना नींव की  इमारत'. आज देशातील सीबीएससी समेत अधिकान्श शैक्षणिक बोर्डांचा  उद्देश्य,  '"इधर से आलू डालो, उधर से सोना निकलो"  अर्थात सर्वांना पास करून 12वी पास प्रमाणपत्र देण्या इतका राहिला आहे.  12 वर्ष शिकूनही अर्जित ज्ञांनाच्या मदतीने  विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नाही, हे कटू सत्य आहे. आपल्याच मुळांशी नाते तुटल्यामुळे तो आत्म सम्मानरहित हीनभावनेने ग्रस्त ही असतो. परिणाम आज देशात डिग्रीधारिच सर्वात जास्त बेरोजगार आहेत. कारण त्यांच्यापाशी अर्थार्जन करण्याचे ज्ञान नाही आणि सर्वांना सरकारी नौकरी मिळणे शक्य नाही. 

देशात अनेक सरकारी बोर्ड आहेत. मग भारतीय शिक्षा बोर्डाची आवश्यकता कशाला. देशाच्या लोकांशी  नाळ मुळांशी जोडून त्यांच्यात आत्मसम्मांनाची भावना भरण्याचे शिक्षण आजच्या व्यवस्थेत दिले जात नाही. सरकारी नौकरशाही आणि राजनीति मुळे शिक्षणात बदल काळानुसार होणे शक्य नाही. त्यासाठी गैर सरकारी बोर्डाची आवश्यकता आहे. या शिवाय सरकारचा शिक्षणावर होणारा खर्च ही कमी होईल. 

भारतीय शिक्षा बोर्डाचे गठन झाले आहेत. भारत सरकारने ही या बोर्डाला मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांची नाळ आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाशी जोडण्यासाठी संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. प्रत्येक भाषा शिकताना त्या भाषिक साहित्याकारांसोबत अनुवादित दुसर्‍या भारतीय भाषांचे साहित्य ही राहील. आंग्ल भाषेत शेक्सपियर सोबत वैदिक साहित्य ही असू शकते. विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबत दुसरी भारतीय भाषा ही शिकावी लागेल. इतिहासाच्या पाठ्यक्रमात उपेक्षित दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर भारताला ही उचित स्थान दिले जाईल. गणित, विज्ञान ,इत्यादि विषयांत उपेक्षित प्राचीन भारतीय विद्वानांना ही स्थान दिले जाईल. ज्ञान विज्ञानात होणारे बदल वेळोवेळी समाविष्ट केले जातील. सर्व धर्मांच्या सकारात्मक मूल्यांना ही स्थान दिले जाईल. रोजगार उन्मुख कौशल विकासावर पाठ्यक्रमात अधिक भर दिला जाईल. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य जवळपास पूर्ण केले आहे. बहुधा पुढच्यावर्षी पासून शिक्षण कार्य सुरू होईल. आशा आहे, हा बोर्ड शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांति घडवून आणेल. 

Monday, August 8, 2022

आज मी पेढे केले

आज सकाळी  फोन वर यूट्यूबवर पेढ्यांची रेसिपी बघत होतो. सौ. मागे येऊन केंव्हा उभी राहिली मला कळले नाही. रेसिपी पाहून झाल्यावर मी मोबाइल बंद केला. सौ. समोर येऊन म्हणाली, "काय हुकूम आहे,  महाराज". मी म्हणालो, हुकूम कसला. फक्त रेसिपी बघत होतो. त्यावर सौ, उद्गारली, "मला तुमची सवय माहीत आहे, थोड्या वेळानेच म्हणाल, "आज हा पदार्थ बनवशिल का?  उद्या तो पदार्थ बनविणार का? बाकी आजकाल हुकूम देण्याशिवाय तुम्हाला दुसरे काम काय". तिचे खोचक बोलणे मला कळले, म्हणजे मी रिकामटेकडा आहे आणि रोज तिला कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देतो. आपण पण काही कमी नाही, मी उत्तर दिले, ही रेसिपी मी बनविणार, बघच तू. सौ. "मी मुळीच मदत करणार नाही, लक्षात ठेवा". आता चॅलेंज स्वीकार करणे भाग होते. या आधी पेढा सोडा, कधी साधा शिरा ही बनविला नव्हता.

पण म्हणतात ना, "जहाँ चाह, वहाँ राह". दोनशे ग्राम दुधाचे पावडर, 100 एमएल दूध, चार चमचे गायीचे तूप, अर्धी वाटी साखर घेतली. अर्धा चमचा वेलची पूड तैयार करून ठेवली. स्टीलची कढई  गॅस वर ठेवली. गॅस सुरू करण्यापूर्वी, दोन चमचे तूप, साखर आणि दूध कढई टाकून व्यवस्थित ढळवून घेतले. त्यानंतर 200 ग्राम गायीच्या दूधाचे पावडर त्यात मिसळले.  ते चार ते पाच मिनिटे

व्यवस्थित ढळवून मिश्रण एकजीव करून घेतले. नंतर गॅस सुरू केला. गॅस स्लो ठेवला. किमान पाच ते सात मिनिटे  मिश्रण सतत ढळवत राहिलो. सौ.ची मागून कामेन्ट्री सुरू होती, व्यवस्थित ढळवत रहा, नाही तर खालून जळून  जाईल. मला काम  करताना पाहून, निश्चित तिला आनंद होत होता. एकदाचे न जळता मिश्रण घट्ट झाले. आता त्यात वेलची पूड टाकली आणि मिश्रण एका ताटात काढून ठेवले. 

मिश्रण थोडे थंड झाल्यावर दोन चमचे तूप त्यावर घातले आणि हाताला ही लावले. पण या कामासाठी सौ.ची मदत घ्यावीच लागली. सौ, मी आणि चिरंजीवाने पेढे टेस्ट करून बघितले. चिरंजीवने आंगठा वर करून पेढे स्वादिष्ट झाल्याची ग्वाही दिली. मनातल्या मनात विचार केला,  काहीही म्हणा आज, सौ.ची चांगली जिरवली. मनात असा विचार करत होतो, तेवढ्यात सौ. म्हणाली, रक्षाबंधनसाठी किलो भर बेसनाचे लाडू करायचे म्हणते. लाडू मी वळून देईल, बाकी काम  तुम्ही करू शकता. आता डोक्याची फ्यूज लाइट पेटली. सौ.ने टाकलेल्या जाळ्यात मी अलगद अटकलो होतो. शेवटी तिने रिकामटेकड्या माणसाला कामावर लावले.