Thursday, August 14, 2014
Saturday, August 2, 2014
वात्रटिका : भाजी आणि पुस्तक
पुस्तकात विवादास्पद विधाने का केली जातात?
मसाल्याच्या तड़क्या शिवाय
भाजीला स्वाद येतच नाही.
विवादाच्या तड़क्या शिवाय
पुस्तक खपतच नाही.
तड़का = फोडणी
Thursday, July 31, 2014
सोनेरी फुलं आणि म्हातारा
हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच क्यारीत सोनेरी फुलं वार्या सोबत डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान न!. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न! म्हणत मोबाइलचा आवाज वाढवायचा. कधी फुलांना बांसुरी तर कधी गाणे ऐकवायचा. कधी-कधी किस्से-कहाण्या हि सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.
एक दिवस नेहमी प्रमाणे म्हातारा, पहाटे बगीच्यात आला. पाहतो काय, क्यारीतली फुलं कुणी उपटलेली होती. म्हाताऱ्याच्या काळजात धस्स झाल. तो मटकन खाली बसला. बहुतेक क्रिकेट खेळणाऱ्या द्वाड मुलांचे काम असेल. त्यांना मनातल्या मनात असंख्य शिव्या मोजल्या. एक कोमजलेले निर्जीव सोनेरी फुल उचलून आपल्या काळजापाशी घट्ट धरले, अचानक म्हातार्याला छातीत कळ जाणवली.
आजोबा, कसं वाटतंय आता, एका सोनेरी फुलाच्या आवाजाने म्हात्याराने डोळे उघडले, समोर क्यारीत सोनेरी फुलं मस्त वाऱ्यावर डोलत होती. आपण स्वप्न तर नाही पाहत आहोत, म्हातार्याच्या मनात विचार आला. म्हाताऱ्याने, आपल्या प्रेमळ हाताने फुलांना गोंजारले आणि खात्री केली. नेहमीप्रमाणे फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो? एका फुलाने उत्तर दिले, आम्ही, मस्त आहोत आजोबा, आता कसलीच काळजी नाही, इथे कुणी आम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही थकले असाल आजोबा, फार लांबचा प्रवास झाला न! जरा निवांत पडा, तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो. नंतर आपण निवांत बोलू, भरपूर वेळ आहे, आपल्याकडे. म्हाताऱ्याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते.
Tuesday, July 29, 2014
विडंबन: देखो देखो पंछी उड़ रहा है.
बहुतांश विज्ञापन भ्रमित करणारे असतात. काही विज्ञापनात सत्य दडलेले असतात. फक्त आपल्याला समजायला हवे. दिल्लीत बहुतेक तरुण मंडली वेडी-वाकडी आणि तुफान बाइक चालवितात एखाद्या पक्ष्या प्रमाणे. परिणाम काय होतो:
किक मारुनी बाईक
तुफान त्याने फेकली .
शरीर सोडूनी तत्क्षणी
पंछी उडाला आकाशी.
लोक ही म्हणतात कसे
देखो देखो
पंछी उड़ रहा है.
Saturday, July 26, 2014
व्यंग - धोबीचा कुत्रा
बिभीषणाने दिला होता
रावणाला हो दगा.
बदल्यात त्याला मिळाली
सुवर्ण लंकेची हो गादी.
गादी साठी त्याने
पक्ष आपला सोडला.
विसरला होता तो
त्रेता नाही कलयुग आहे हो.
घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.
घर का ना घाट का
धोबिच्या कुत्र्या सारखा
भुंकत- भुंकत आता
भटकतो गल्ली बोळ्यात.
Thursday, July 24, 2014
डॉक्टर आणि समीक्षक
एकाच्या हातात कात्री
दुसऱ्याच्या हातात लेखणी
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड.
डॉक्टरची कात्री
चालते शरीरावर
बहुतेक रोग्यांचे
वाचविते प्राण.
समीक्षकाची लेखणी
चालते कवितेवर
बहुतांश कवींचे
*हरते ती प्राण.
*टीप: समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात.
Saturday, July 19, 2014
पहाटे येणारी नर्स
हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या म्हणीनुसार माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच.
बाय पास
सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी
दोन्ही पायातून नसा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्यावर जश्या वेदना
होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन
ही झोप येणे शक्य नव्हते. सकाळची वाट पाहण्या शिवाय गत्यंतर काय?
सकाळचे पाच वाजले, सुहास्य करत ती रूम मध्ये
आली, गुड मार्निंग, कैसे हो अंकल (आधीच छातीत चीर पडलेली आणि त्यात “अंकल” मनात
म्हणायचो किती तुकडे होणार या नाजुक
हृदयाचे), तरीही तिला पाहून मी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करायचो.
जवळ येऊन ती सरळ हाताचे मनगट आपल्या हातात घ्यायची. तिचा नाजुक, कोमल, रेशमी,
मुलायम स्पर्श हाताला जाणवताच वेदना कुठच्या कुठे गायब व्हायचा, सर्व शरीर शांत
झाल्या सारख वाटायचं. पण दुसर्याच क्षणी, आपल्या खिश्यातून भली मोठी सुई असलेली
सिरींज बाहेर काढायची. एका हाताने सिरींज डोळ्यांसमोर नाचवत, दुसर्या हाताने टक-टक
करून सिरींज वाजवायची. मग चेहऱ्यावर हास्य आणत, अंकलजी, थोडा दर्द होगा, म्हणत सुई
हातात खुपसायची, त्या वेळी तिचा चेहरा अमेजोनच्या जंगलातल्या रक्त पिणाऱ्या
वटवाघुळणी सारखा दिसायचा. असे वाटायचे, ती जिभेने लप-लप करून रक्त पीत आहे, आणि
रक्त पिऊन तिचे ओठ लाल सुर्ख झालेले आहे. मी डोळे बंद करून घ्यायचो. काही क्षणांनी
डोळे पुन्हा उघडायचो, सिरींज मधून रक्त एका ट्यूब ती भरायची. मग पुन्हा चेहर्या वर
हास्य आणत, गुड डे, अंकल म्हणत बाहेर
जायची, त्या वेळी ही हाताना तिचा ओझरता स्पर्श व्हायचा. ती गेल्या नंतर काही काळ
तरी शरीराला वेदना जाणवायच्या नाही. मग पुन्हा त्याच असह्य वेदना सुरु व्हायच्या.
कधी-कधी मनात विचार यायच्या, वटवाघुळणी, परत ये, तुझा वेदना दूर करणारा, नाजुक,
कोमल, रेशमी स्पर्श मला दे, वाटलं तर पाहिजे जेवढे रक्त पी.
टीप: सकाळी सकाळी, टेस्टिंग साठी रक्त घेणे ही
नर्सची ड्युटी होती. बाकी सर्व मनातले विचार आहेत. नर्सेसचा सेवा भाव पाहून मला
काय वाटते ते:
नर्स
पृथ्वीवर अवतरली
अमृतघट
घेउनी
अप्सरा शापित कुणी.
रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला
Wednesday, July 2, 2014
ट्रफिक जाम
गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.
Monday, June 30, 2014
पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगती अकबर बीरबल कहाणी
पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिन मध्ये बसतो ती एका मोठ्या हाल मध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूला साडेतीन फूट उन्च पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४-२५ स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्या बरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते. हालचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो, तिथे एक ३ फुट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.
त्या दिवशी दुपारचे साडेतीन झाले असतील, नुकतच
सर्वांचा चहा झाला होता, अचानक दरवाजा उघडून एक कर्मचारी आत आला, कापऱ्या पण
सर्वाना ऐकू येईल अश्या आवाजात म्हणाला, पंतप्रधान इकडेच येत आहेत. मी चमकलोच,
गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्य करतो आहे, या आधी पंतप्रधान तर
सोडा कुणा वरिष्ठतम अधिकार्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिन मध्ये डोकावल्याचे
मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल. म्हणतात ना देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे
लागते, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो. सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करणे
सुरु गेले. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचारीच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र
मोदी आत आले. साहजिकच होते, पहिलेच केबिन असल्या मुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर
गेली. कामाबाबत जुजबी माहिती विचारली. प्रत्येक
केबिन समोर उभे राहून त्यांनी कर्मचार्यांची विचारपूस केली. सर्वात शेवटी, अर्थात
माझ्या केबिनच्या समोरच्या केबिन मध्ये बसणाऱ्या स्टाफची विचारपूस केली. त्यांची
दृष्टी अलमारीवर ठेवलेल्या ७-८ चहाच्या रिकामच्या कपांवर ही गेली. त्यांनी मिस्कीलपणे, विचारले बहुत चाय पितो हो
आप लोग. स्टाफ मधल्या एका कर्मचार्याने उत्तर दिले, सर, सारे कप हमारे नाही है और
लोग भी अपने खाली कप यहाँ रख देते है. पंतप्रधान हसले आणि म्हणाले दोस्तों, आपने अकबर बीरबल की कहानी सुनी है. आम्ही सर्व टक लाऊन त्यांच्या कडे बघू
लागलो, पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.
त्यांनी अकबर बीरबलची कहाणी सांगायला सुरवात
केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत)
एकदा अकबर बादशाह, बीरबलच्या घरी गेले, पाहतात
काय, बीरबल आणि बिरबलाची बेगम एका मंचकावर बसून आंबे खात होते. आत येताच अकबर
बादशाहचे लक्ष आंबे खाऊन जमिनीवर
टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेले. अकबर बादशाहने मनात विचार केला बीरबल स्वत:ला
शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बीरबलला दाखवायला पाहिजे कि बादशाह ही किती बुद्धिमान
आहे. अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या. अकबर
बादशाह म्हणाला, बीरबल मी सांगू शकतो, माझ्या इथे येण्या अगोदर तुम्ही किती आंबे
खाल्ले आहेत ते. अकबर बादशाहने मोजलेल्या
कोयींच्या आधारावर खालेल्या आंब्यांची संख्या सांगितली. आपणास सर्वांना माहित आहे.
बीरबल हा अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे, बीरबलने सहज ओळखले. तो मिस्कीलपणे
म्हणाला, जहाँपनाह, आपण चुकत आहात, या खाली टाकलेल्या कोयी, मी खालेल्या आंब्यांच्या आहेत. माझी
बेगम तर कोयीं समेत आंबे खाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले, आणि
सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय कळला. आम्ही ही मुक्तपणे हसलो. (कहाणीचा
अर्थ मला जो अर्थ कळला- बीरबलले आपल्या
चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनविले असेल, पण मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू
नका, उगाच दुसर्यांचे नाव कशाला घेता हा सर्व चहा, तुम्हीच गटकला आहे).
पंतप्रधान
निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अश्यारितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी
सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.
Sunday, June 22, 2014
शतशब्द कथा -विषकन्या
मुंबई-पुणे महामार्गावर लाल रंगाचे भडक आणि सौंदर्य खुलवून दाखविणारे वस्त्र परिधान केलेली ती सुंदरी गाडीला टेकून पुस्तक वाचत उभी होती.
"च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी!" पुटपुटत त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि तिच्या नजरेला-नजर भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हसंत-हसंत, हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.
"च्यायला पोरगी पटली. ...अररे.रे..." समोर वळण आहे तो विसरला होता. वेगवान बाईकने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली.
किर्रर्र... माझ्याच गाडी खाली यायचं होत का, हरामखोराला? आता बोंबला -ट्रक ड्राईवर.
"आईग!" ती किंचाळली. हातातल्या पुस्तकाने तिने पटकन चेहरा झाकला. पुस्तकाच्या कवरवर मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘विषकन्या'.
Wednesday, June 18, 2014
उत्तर सापडेना आज?
(अल्पवयीन
मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक
झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे)
कुणी पायदळी
तुटवली
एक नाजूक कळी
आज?
मध्यान्हन
उन्हाळी पसरली
का
स्मशान शांतता आज?
ममतेचा
कोखात निपजली
का रक्त
पिशाचे आज?
माय
बहिण भार्या नाती
का
निरर्थक झाली आज?
वासनेच्या
डोहात तरंगती
का नव
तरुणाई आज?
काय
जाहली चूक आमची
उत्तर
सापडेना आज?
Saturday, June 7, 2014
पडद्या मागची व्यथा
रंगविले मुखवटे अनेक
स्वत:चा चेहरा मात्र
रंगविला न कधी.
तालावर नाचविल्या
मंचावर कठपुतळ्या
नाचायला मला
मिळालच नाही.
मान नटसम्राटाचा
मिळतो बाहुल्यांना
दंश पराजयाचा
मलाच का मिळावा.
पडद्या मागची व्यथा
कळेल का कुणाला
रंगमंचावर मिळेल का
कधी मान सूत्रधाराला.
Sunday, June 1, 2014
मी केलेली पोहे-मुरमुरे भेळ
शनिवारी संध्याकाळी आमचे
चिरंजीव घरात आले, त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते. आल्या बरोबरच, आई
भूक लागली आहे, भेळ करून देत का? शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळ (हिंदीत–
आंधी, या पूर्वी कधी न बघितलेली, १५-१६ तास वीज नव्हती, नुकतीच वीज आल्या मुळे सौ.
आराम करायला पलंगावर पहडुली होती). घरात
मुरमुरे संपत आले आहे, शिवाय काल भाजी
बाजार ही लागला नव्हता, कोथिंबीर, लिंबू ही घरात नाहीत- सौ. मी म्हणालो, मग दडपे पोहे कर. पोहे ही संपत आले
आहे- सौ. सौ.चा मूड काही ठीक दिसत नाही. मी चिरंजीवाना म्हणालो, तुझ्या आईची
तब्येत काही बरी दिसत नाही आहे. मीच करतो
काही तरी. स्वैपाक घरात गेलो. दीड एक वाटी मुरमुरे होते, शिवाय एका पकेट मध्ये
दोन-एक वाटी पोहे ही होते. पोहे आणि मुरमुर्यांची भेळ करायची कल्पना मनात
आली. फ्रीज उघडून बघितले. टमाटर, खीरा(काकडी) आणि मिरच्या होत्या, विनेगरची (सिरका) बाटली ही होती. विचार केल्या लिंबू एवजी विनेगर
वापरले तर काय फरक पडेल. तीन टमाटर,एक
काकडी, तीन कांदे, दोन मिरच्या मोठ्या घेतल्या. दोन चेमचे विनेगर एका वाटीत ओतले आणि
मिरच्या कापून त्यात टाकल्या. मिरच्या
विनेगर मध्ये काही वेळ ठेवल्याने त्यांचा तिखट पणा थोडा कमी होत. एका वाटीत दोन चमचे
तेल घेऊन त्यात २ छोटे चमचे तिखट टाकले. तेलात तिखट टाकल्याने भेल मध्ये मिसळताना
तिखट व्यवस्थित रीतीने सर्वत्र मिसळता येते, शिवाय तिखटाचा जळजळ पणा ही थोडा कमी
होतो. कांदे, टमाटर आणि खीरा, जमेल तेवढे छोटे चिरण्याचा प्रयत्न केला. गॅस वर कढई
ठेवली. आधी मुरमुरे आणि नंतर पोहे त्यात थोड्या वेळ परतले. (भेळ किंवा दडपे पोहे
बनविण्या आधी मुरमुरे आणि पोहे ५-७ मिनिटे कढईत परतून घेते. असे केल्याने पोहे/
मुरमुरे कुरकुरीत होतात. खाताना विशेषकर लहान मुलांना मजा येते. ओली चटणी किंवा
चिंचेचे पाणी मिसळले तरी भेळ मिळमिळीत लागत नाही. शिवाय मुंबईत दमट वातावरण असल्यामुळे मुरमुरे किंवा पोहे पुष्कळदा
आधीच नरम असतात, असे मुरमुरे वापरल्यामुळे भेळ जास्तीस मिळमिळीत होते, मुबईकरच्या घरी
हा अनुभव आलेला आहे). थोडी बुंदी (रायात्यासाठी वापरतात ती) घरात होती अर्धा वाटी ती ही घेतली. आता एक परात
घेतली. त्यात पोहे, मुरमुरे, बुंदी, आलू भुजिया मिसळी. नंतर चिरलेले कांदे, काकडी,
टमाटर मिसळले. शेवटी विनेगर सहित मिरच्या मिसळून, अंदाजे मीठ ही मिसळले. सर्वात
शेवटी तिखट तेल व्यवस्थित हाताने मिसळले.
आणि त्वरित साबणाने हात धुतले. अश्या रीतीने झणझणीत पोहे आणि मुरमुर्यांची भेळ
तैयार केली. भेळ खाल्यावर एक कडक चहा सौ.
तर्फे अस्मादिकास मिळाला-उपकार केले [अर्थात ती हे काही वाचणार नाही याची खात्री,
नाहीतर चहाला ही मुकावे लागेल). भेळ चांगली झाल्याची पावती होती. शिवाय सुट्टीच्या
दिवशी असले प्रकार तुम्हीच करत जा, तेवढाच मला आराम मिळेल-सौ. आता काय बोलणार...
Sunday, May 25, 2014
स्वादिष्ट मिर्ची (तोंडी लावायला)
दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ
लागलेली ही मिरची छोले
भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही
वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो.
काल अखेर तिने ही मिरची बनविली.
साहित्य:
हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार,
मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची
डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ.
कृती:
प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या. एका काचेच्या भांड्यात मिरच्या ,लिंबाचा
रस, मोहरीची डाळ आणि मीठ कालवून मिरच्याना
१ दिवस मुरु द्या. या मिरच्या फ्रीज मध्ये
ठेवल्यास ८-१० दिवस टिकतात. फ्रीज नसल्यास ६-७ दिवस टिकतात.
Saturday, May 24, 2014
जेल मधी जाऊ या, दिल्लीची बिल्ली
जेल मधी जाऊ या
जेल मधी जाऊ या
राजनीती खेळ खेळू या.
जेल मधी गेला नेहरू
गादी मिळाली देशाची.
जेल मधी गेला लालू
गादी मिळाली बिहारची
जेल मधी गेला केजरी
मिळेल का गादी दिल्लीची?
दिल्लीची बिल्ली
काशी मधी गेली
दिल्लीची बिल्ली.
वाघाला म्हणाली
मी तुझी मावशी
पड माझ्या पाया.
वाघाने दिला मिशी वर ताव
जोरात फोडली डरकाळी एक.
मावशी उडाली हवेत तशी
जाऊन बुडाली दिल्ली तळी.
Wednesday, May 14, 2014
Sunday, May 11, 2014
एका पुतळ्याची व्यथा कथा
एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकता-ऐकता मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, उद्घाटनाच्या, दुसऱ्याच दिवसांपासून, पुतळ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. कुणीही साफ-सफाई, स्वछता करायला फिरकत नव्हते. त्याचा अंगावर धूळ-माती घाण जमा होऊ लागली. कर्कश ओरडणाऱ्या कावळ्यांनी प्रात:विधी साठी उपयुक्त जागा म्हणून पुतळ्याचा वापर सुरु केला. भटक्या कुत्र्यांना, त्या सोयी साठी उपयुक्त खांब वाटला. स्वत:ला शहाणे मानणारे लोक ही कचरा फेकण्याची सोयीस्कर जागा समजून, घरातल्या कचरा तिथे फेकत होते. शेवटी घाणीला कंटाळून पुतळ्यानी डोळे बंद केले आणि तो समाधी अवस्थेत केला. काही वर्षांनी पुतळ्याला चांगल्या रीतीने कळले, वर्षाकाठी एक दिवस साफ-सफाई होणार, हार-तुरे घालण्यात येईल, भाषणे होईल आणि पुन्हा हरिदासाची गाडी मूळ पदावर येणार. तरी ही त्याने विचार केला वर्षाकाठी एक दिवस का होईना, डोळे उघडून जगाला बघता येईल म्हणतात ना, एक दिवस पुरे प्रेमाचा.
पण काही दिवसांपूर्वी, अचानक पुतळा
खडबडून जागा झाला. अजून वर्ष पूर्ण झालं नाही कुणी झोप मोड केली बरें, पुतळ्याने डोळे उघडले, त्याची साफ-सफाई सुरु होती.
नवीन रंग-रोगन त्याच्या संपूर्ण शरीरावर होत होता. आजू-बाजूचा परिसर ही चकाचक
चमकविण्याचे काम सुरु होते. त्याचे संपूर्ण शरीर सजविले जात होते.
पुतळ्याने विचार केला, काय बरे झाले असावे, कदाचित निवडणूक आली असेल, त्याचा अंदाज खरा ठरला. एका
दाढीवाल्या माणसाने त्याला एक मोठा हार घातला. आणि ‘विकास विकास' असे ओरडत एक जोरदार
भाषण दिले आणि जमलेल्या जनतेपाशी मते
मागितली. पुतळ्याने मनात म्हंटले, खरंच, या
माणसाने अल्पावधीत स्वत:चा भरपूर विकास
केला आहे,
दाढीवाला गेला, थोड्याच
वेळानी पुतळ्याने बघितले, काही लोक मोठ्या-मोठ्या हंड्यांमध्ये
गंगाजल आणि दूध घेऊन येत आहेत. जवळ येताच, त्राहीमाम,
त्राहीमाम, शांतम पापं, शांतम
पापं च्या घोषणा देत, त्यांचा नेता म्हणाला, हे पुतळे देवा आम्हाला क्षमा करा, त्या नीच
माणसाच्या जाणून बुजून स्पर्श करून आणि तुम्हाला
अपवित्र केले आहे. पण चिंता करायची गरज नाही,
गौ-ब्राह्मणांच्या साक्षीने गंगाजल आणि दुग्ध अभिषेक करून, तुम्हाला पुन्हा पवित्र करू. पुतळ्याने मनात म्हंटले,
च्यायला, देश स्वतंत्र होऊन कित्येक दशक झाले,
तरी अस्पृश्यता ही आहेच. आपल्याला काय करायंच दुग्ध आणि गंगा
स्नानाचा आनंद घेऊ, पुन्हा असा मौका कधी मिळेल काही सांगता
येणार नाही.
दररोज न चुकता परिसराची आणि
पुतळ्याची स्वच्छता होत होती. पुतळ्यापाशी ही जागा कडे बघायला भरपूर वेळ होता. पुतळा
असला म्हणून काय झाले त्याला ही भावना या होत्याच, सुंदर, अल्पवस्त्र
धारी शकुंतले
सारख्या आधुनिक सुंदर ललनांना बघून त्याचे डोळे ही तृप्ती मिळत
होती. दुसऱ्या दिवशी एक बहनजी
आली, तिने ही पुतळ्याला हार घातला. ती जोर जोरात म्हणत होती,
त्या शुद्धीकरण वाल्यांचे आणि नीच माणसाची आपसांत ‘मिली भगत’ आहे. त्यांचा बहिष्कार करा. वोट मलाच द्या, पण असे भाषण देत असताना तिच्या पायाखालची जमीन का ‘खिसकते’ आहे हे पुतळ्याला कळले नाही.
पुन्हा एक-दोन दिवसांनी, एका बाबा समान वाटणाऱ्या माणसाने पुतळ्यावर
हार घातला, तो जोर जोरात म्हणत होता, गेल्या ६० वर्षांपासून
आंम्ही गरीबी दूर करीत आहोत. गरीबी दूर करण्यासाठी आमच्या कडे पुष्कळ योजना आहेत.
आम्हालाच मते द्या, आम्ही गरिबी दूर करण्याचा सतत प्रयत्न करत
राहू. लोक हो, गरिबी दूर करण्यासाठी, गरीब
हे हवेच. तुम्हीच सांगा गरिबांचे अस्तित्व संपले तर आम्ही कुणाची गरिबी दूर करणार.
पुन्हा एक-दोन दिवसांनी, एक छोट्या कद-काठीचा, टोपीवाल्या माणसाने, पुतळ्याला हार घातला. तो म्हणाला, सर्व चोर आहे,
मीच एक इमानदार आहे. माझ्यापाशी इमानदारीचे
सर्टिफिकेट वाटण्याचा ठेका आहे. जोर-जोरात अम्बानी अडाणी म्हणत असताना
त्याला जोरदार खोकला आला. खंक खंक करत तो थांबला. इमानदार माणूस भाषण देऊन निघून गेला. तेवढ्यात
गर्दीतून सीआईए, फोर्ड फोन्डेषण,
असे काही शब्द पुतळ्याला ऐकू आले.
पुतळ्याने विचार केला ज्या
प्रमाणे पूर्वी टाटा, बिरला,बजाज असायचे, त्याच
प्रमाणे आज अंबानी-अडाणी असतील. सीआईए, फोर्ड फोन्डेषण
म्हणजे काय पूर्वी जसे नाजी पक्ष आणि जर्मनी होती तसें तर नाही ना. पुतळ्याला त्या
कालच्या माताहारीची पण आठवण आली.
एकदाचा निवडणुकीचा प्रचार
थांबला. पुन्हा पूर्वीची परिस्थिती निर्माण झाली, तोच कचरा, तेच कावळे आणि कुत्रे. पुन्हा घाण असह्य झाली. पुतळ्याने पुन्हा डोळे
मिटले आणि तो समाधी अवस्थेत गेला.
Subscribe to:
Posts (Atom)
-
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्य...
-
आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठी “ हम दो , हमारे दो ” योजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते...
-
रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत रा...





