Monday, March 16, 2020

अविद्या (भौतिक विद्या): मृत्युला दूर ठेवण्याची विद्या आणि कारोना


माझ्या एका मित्राने कर्मकांड आणि  जोतिष या विषयावर पीएचडी केली आहे अर्थात हा विद्वान ग्रहस्थ आहे. काल त्याने कारोनापासून बचाव करणारे  'कारोना कवच' एका व्हाट्सअप ग्रुप पाठविले.  या कवचाचा पाठ केल्याने कारोना होणार नाही असे त्याचे विचार. मी त्याला उत्तर दिले आपण पूजा-पाठ इत्यादी नैतिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी करतो. सांसारिक बंधनातून मुक्त होण्यासाठी करतो. पण रोगराई आपल्या भौतिक शरीराला हानी पोहचवितात. त्यांचा प्रतिकार भौतिक विद्येच्या सहाह्यानेच करता येईल. हेच शास्त्र प्रमाण आहे. ईशान उपनिषदात म्हंटले आहे.

विद्यां चाविद्यां च यस्तद् वेदोभय्ँ सह 
अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्यामृतम्श्नुते.
[ईशोपनिषद (मंत्र ११) ]

*शाब्दिक अर्थ: विद्या (अध्यात्म ज्ञान) अर्थात परमेश्वराला जाणण्याचे ज्ञान. अविद्या (भौतिक विद्या) म्हणजे मृत्यु वर विजय प्राप्तीचे ज्ञान. जो व्यक्ती दोन्ही ज्ञान एकाच वेळी जाणतो. तो जीवनाचा पूर्ण आनंद ही उपभोगतो. तो जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण आनंद उपभोगू शकतो.

मानव सहित पृथ्वीवरील सर्व जीवांचे भौतिक शरीर अग्नि, वायु, जल आणि माती या चार पदार्थांपासून बनलेले आहे. हेच चार पदार्थ पृथ्वीवरील सर्व  जीवांचे अन्न आहे. अन्न शरीराला पोषण देते आणि जीवांना जिवंत ठेवते अर्थात मृत्युपासून दूर ठेवते. जगण्यासाठी आपण शाकाहारी आणि मासाहारी सर्व प्रकारच्या अन्नाचा उपभोग करतो. रोगराई पासून आपली रक्षा करणार्या औषधीहि अन्नापासून तैयार होतात. सारांश, भौतिक शरीरला मृत्युपासून वाचायचे असेल तर अन्नाचे सेवन आवश्यक आहे.

तैत्तरीय उपनिषदात आपल्या ऋषींनी हेच सांगितले आहे. माणसाचे भौतिक शरीर हे अन्न आहे, अन्नमय शरीर अन्नाचे भक्षण करते आणि शेवटी अन्नातच विलीन होते.

अन्नाद्वै प्रजाः प्रजायन्ते । याः काश्च पृथिवीँ श्रिताः । 
अथो अन्नेनैव जीवन्ति । अथैनदपियन्त्यन्ततः । 
(तैत्तरीय उपनिषद, ब्रह्मानंद वल्ली, प्रथम अनुवाक) 

 *शाब्दिक अर्थ:  ज्या पृथिवीच्या आश्रयाने रहाणाऱ्या प्रजा आहेत त्या सर्व अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नानेच त्या जिवंत रहातात. शेवटी यामध्येंच (अन्नामध्येच) लय पावतात.

आजकाल कारोना विषाणु देशात पसरला आहे आणि आपल्या भौतिक शरीरासाठी घातक आहे. दुसर्या शब्दांत हा विषाणु मृत्युचा दूतच आहे. आता प्रश्न उद्भवतो, कारोना पासून बचावसाठी आपण काय केले पाहिजे. शरीराला  स्वस्थ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग इत्यादी. शरीराला स्वस्थ्य ठेवण्यासाठी आवश्यक असे पोषणयुक्त अन्नाचे सेवन. भौतिक पदार्थांच्यापासून बनलेल्या औषधी (वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी) आपल्याला या रोगापासून दूर ठेऊ शकतात. तथाकथित मंत्र-तंत्र, गंडा-ताबीज किंवा कवच आपल्याला कारोना सहित अन्य रोगराईपासून वाचवू शकत नाही. असो.

*
सत्संगधारा या वेबसाईट वरून अर्थ घेतला आहे.


Thursday, March 12, 2020

कविता: दिल्लीची पहाट


आज सकाळी आमचे मैफिलकर पहाटेचे सुंदर वर्णन करणारी कविता पोस्ट करीत आहे. मनात विचार आला मी जिथे राहतो त्या दिल्लीत काय दिसते. पंखा रोड वर जागो जागी कचर्याचे ढिगारे, डुक्कर, गायी. सकाळी ८ वाजता कबुतरांच्या घाणीने भरलेले मेट्रो प्लेटफॉर्म....

धुर्याला सारून एकदाचा
सूर्यदेव  दिसला गगनी
खोकत-खोकत उठली 
केजरी नी सगरी दिल्ली.

कपोत पुत्रांनी उकरली 
प्रात:विधी मेट्रो स्थानकी.

कचर्याच्या ढिगार्यांचा
सुगंध किती स्वादिष्टी.
भूख शमवायला जमली 
तिथे गायी आणि डुक्करी.

नाही  उषेच्या गाली  लाली 
नाही पक्ष्यांची किलबिल 
फक्त कर्कश कावळ्यांची 
काव-काव घुमे गगनी. 



Monday, March 9, 2020

होळी आणि यज्ञ


होळी हा उत्सव वैदिक काळापासून आपल्या देशात साजरा होतो. होळी साजरी करताना काही शब्दांचे अर्थ आपल्याला कळणे गरजेचे.

ऋतु सन्धिषु रोगा जायन्ते: अर्थात ऋतु परिवर्तन होताना कफ वात आणि पित्त दोष बळावतात. 

तृणाग्निं भ्रष्टार्थ पक्वशमी धान्य होलक: अर्धवट भाजलेले अन्न्नाला होलक असे म्हणतात.

होलकोऽल्पानिलो मेद: कफ दोष श्रमापह: होलक हे त्रिदोष अर्थात कफ, पित्त आणि वात निवारक असते.  थकलेल्या शरीरात नवीन चैतन्य उत्पन्न करते.

अग्निवै देवानाम मुखं: अग्नी हे देवतांचे मुख आहे. नवीन धान्य आल्यावर सर्वप्रथम आपण ते देवतांना आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी नवीन अन्नाची अग्नीत आहुती देतो. या यज्ञाला नव सस्येष्टी यज्ञ म्हणतात. होळीच्या दिवशी यज्ञ करून नवीन धान्य अग्नीला अर्पित केले जाते व प्रसाद ग्रहण केला जातो. वसंत ऋतुत अश्या अन्नाचे सेवनकरून आपण रोगराई पासून दूर राहतो. 

प्रल्हाद: सालीच्या आतल्या धान्याला प्रल्हाद म्हणतात. 

अग्नीत धान्य अर्पित केल्यावर वरचे साल जाळून जाते व भाजलेले धान्य उरते. अर्थात होलिका नष्ट होते पण प्रल्हाद वाचतो. 

याच आधारावर पुराण काळात होलिका आणि प्रल्हाद हि कथा निर्माण झाली.  

होळीत सडलेला कचरा जाळण्याएवजी अन्न धान्य अर्पित करून घरात आणि सार्वजनिक स्थानावर  वरील यज्ञ इत्यादी करावे.


   

Friday, February 28, 2020

मी फ्युजन गायक झालो

मला गाणे रिकॉर्ड करायचे आहे?
 

तुम्हाला गाणे गाता येतो?
 

नाही, मला संगीतातले काहीही कळत नाही.
 

अरे ! वा! उत्तम! आम्ही तुझ्या आवाजात फ्युजन रिकॉर्ड करू. तेही फ्री मध्ये, तुला रॉयल्टी ही मिळेल.
 

तेवढ्यात त्या प्रसिद्ध गायकाचा आवाज कानावर पडला, मला साक्षात्कार झाला. फ्युजन... मीही गाऊ शकतो. ता त त टा, र रा ररा ता त त टा..

Friday, February 21, 2020

रिकामटेकडा मी

आधी ऑफिस जात होतो 
हाताखाली शिपाई होता
हुकुमाचा ताबेदार होता
वेळेवर चहा मिळत होता
एसी केबिनचा राजा
मीच एकटा होता.

निवृत्त झालो
रिकामटेकडा झालो.

उठोनी सकाळी चहा करतो
सौला पण चहा पाजतो 
भाजीपाला किराण्यासाठी 
उन्हातान्हात मी फिरतो 
एसी गेला, शिपाई गेला 
हुकुमाचा ताबेदार झालो.

रिकामटेकडा मी आता 
घरकाम्या झालो.

Tuesday, February 18, 2020

क्षणिका: कविता १८.२.२०२०


(१)

डोक्यात आली 
टंकलीच नाही 
अवेळी मेली 
एक कविता.

(२)

जन्मलीच नाही
गर्भातच गेली 
यमाच्या भावला 
मिळाली दक्षिणा.


Friday, February 14, 2020

महाराष्ट्र समाज जुनी दिल्ली: दिल्लीत खेळांच्या क्षेत्रात योगदान.

(महारष्ट्र समाज जुनी दिल्ली गेल्या जानेवारीत १०० वर्ष पूर्ण झाले) 
 
जुन्या दिल्लीत तसे २५ ते ३० मराठी परिवार राहत असले तरी त्यांच्यात घट्ट असे नाते होते. समाज म्हणजे त्यांचा जीव. समाजात बाहेरून येणारऱ्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था होती. पण समाजात कॅरम, टेबल टेनिस इत्यादी खेळांची सुविधाहि होती. रोज संध्याकाळी खेळणाऱ्यांची मैफिल समाजात रंगत होती. समाजात चांगले ग्रंथालयहि होते. दोन ते तीन हजार पुस्तके व १०० च्या जवळ दिवाळी अंक यायचे. रविवारी ग्रंथालयहि उघडायचे.

रविवारचा दिवस म्हणजे शाळेची सुट्टी. नाश्ता-पाणी  करून  सकाळी ९ वाजता,१० वर्षापासून ते ५० वर्षापर्यंतचे तरुण समाजात हजेरी लावायचे. एका खोलीत दोन कॅरम बोर्ड तर नेहमीच रेडी राहायचे. समाजातील सर्व  कॅरम बोर्ड चांगल्या दर्जाचे होते या शिवाय हस्ती दंताचे स्ट्राईकरहि. इथे टाईमपास नव्हे तर खेळाडू खेळाची प्रेक्टीस करायचे. महादाणी (P&T), येन्नुरकर (दिल्ली) सारखे धुरंधर खेळाडू तर होतेच. या शिवाय मला आठवते मन्या आप्टे व दुरून जनकपुरी व दिल्लीच्या इतर भागातून येणारे पेंढारकर, वेंगुर्लेकर ब्रदरस्, वाघमारे इत्यादी अनेक न  आठवणारी नावे, सर्वच एकापेक्षा एक होते.  कॅरम मध्ये पांढरी व काळी सेन्चुरी (एकाच वेळी सर्व गोट्या) नेहमीच बघायाला मिळायची. दिल्लीत होणाऱ्या कॅरम प्रतीयोगीतांमध्ये मराठी नावे नेहमीच दिसायची. असो. 

दुसर्या माल्यावर टेबल टेनिसचा टेबल होता. तोहि उत्तम दर्जेचा. महादाणी आणि विलास कानतुटे चांगले खेळाडू होतेच. पण आमच्या सारख्या मुलांना प्रोत्साहित करण्यात ते नेहमीच पुढे राहायचे. तुम्ही १० वर्षाचे असाल कि ५० वर्षाचे, सर्वांशी एक सारखा व्यवहार. रविवारी तर आमचा पूर्ण दिवस समाजातच जायचा. या शिवाय बुद्धिबळ खेळण्याची सुविधाही होती. बुद्धी कमी असल्यामुळे मी काही त्या वाटेला जात नव्हतो. तरीही काही धुरंधर खेळाडू होते. आप्टे नावाचा एक मुलगा दिल्लीकडून खेळल्याचे आठवते.

साहजिकच होते खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी समाजात कॅरम, टेबल टेनिस व बुद्धिबळाच्या प्रतियोगिता व्हायच्या. दिल्लीतल्या सर्व भागातून आलेले मराठी खेळाडू यात भाग घ्यायचे. करोल बाग, जनकपुरी व समाजाच्या टीम्समध्ये प्रतियोगिता व्हायच्या. मला आठवते बहुतेक १९७५ साली समाजात झालेल्या खेळांचे पुरस्कार देण्यासाठी  टेबल टेनिस स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे श्री सुधीर फडके आले होते. त्यावेळी ते म्हणाले कुणाला टेबल टेनिस मध्ये नाव कमवायचे असेल तर त्याला नेशनल स्टेडियम मध्ये प्रवेश देण्यास ते मदत करतील. माझा लहान भाऊ नरेंद्रला जो त्यावेळी १२ वर्षाचा होता त्याला सुधीर फडकेंनी नेशनल स्टेडियम प्रवेश मिळवून दिला. नेशनल स्टेडियम घरापासून दूर होते. टेबल टेनिस म्हंटले कि बॅट, रबर (त्या वेळी हि एका बाजूच्या रबराची किमत ३०० ते ४००रु  होती) व दररोज दोन ते तीन तास प्रक्टिससाठी जागेची गरजहि. अश्यावेळी समाज मदतीसाठी धाऊन आला. वेळोवेळी टेबल टेनिसचे चेंडू, रबर इत्यादी घेण्यासाठी समाजानी अर्थ सहाय्यहि केले. माझा भाऊ नरेंद्र व जुन्या दिल्लीत राहणारे गुरदीप सिंह आणि अरोरा रोज रात्री उशिरा पर्यंत समाजात प्रेक्टीस करायचे. जिथे महादाणी आणि विलास कानतुटे सारखे प्रत्साहित करणारे होते तर काही विघ्नसंतोषीहि होतेच. गैर मराठी मुले इथे का खेळतात? वीज, चेंडू इत्यादीचा खर्चहि. अनेक प्रश्न.  पण अश्या वेळी विशेषकर विलासनी सर्वांना स्पष्ट केले हा समाज मराठी माणसांसाठी असला तरी समाजाचे दरवाजे  इथल्या सर्व खेळाडूंसाठी खुले आहेत. याचाच परिणाम नरेंद्र आणि गुरदीप दोघांना दिल्ली विश्वविद्यालय आणि दिल्लीच्या टीम मध्ये खेळण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.  नरेंद्राला स्पोर्टस कोट्यात MTNL मध्ये नौकरीहि मिळाली. पुढे वयाच्या ५० पन्नासीपर्यंत MTNL तर्फे खेळत राहिला. असो. समाजाच्या अमृत  महोत्सवच्या ( ७५ वर्ष) वेळी बुद्धिबळ, टेबल टेनिस व कॅरम मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेतल्या होत्या. १००च्यावर दिल्लीकर मराठी खेळाडूंनी त्यात भाग घेतला होता. पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीचे मुख्यमंत्री स्वर्गीय मदनलाल खुराना हस्ते झाला होता.

इथे सांगावयाचे वाटते, महादाणी साहेबांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली. ते नेहमी म्हणायचे चांगले खेळणे वेगळे आणि जिंकणे वेगळे. जिंकायचे असेल तर प्रतिस्पर्धीला त्याचा खेळ खेळू देऊ नका.  यावरून टेबल टेनिसची एक आठवण ताजी झाली. बहुतेक १९८१ किंवा १९८२ साली  समाजाच्या टीमने दिल्ली टेबल टेनिस लीग मध्ये भाग घेतला. नरेंद्र व गुरदीप हे चांगले खेळाडू होतेच. या शिवाय  हेमंत रेवणकर आणि स्वर्गीय विकास महाजन व माझ्या सारखे अर्धवट खेळाडूहि. प्रत्येक मॅच मध्ये किमान तीन खेळाडू खेळणे गरजेचे होते. अर्थात आमच्या तिघांपैकी एकाला खेळणे गरजेचे. तरीही लीग मध्ये फक्त एका टीम कडून समाजाची टीम पराजित झाली. प्री क्वार्टर, क्वार्टर जिंकत सेमी फाईनल पर्यंत पोहचली होती. एका लीग मेच मध्ये मला जिंकणे गरजेचे होते. आपल्यापेक्षा कितीतरी पट चांगल्या खेळाडूला मी पराजित केले. त्यावेळी मला चांगले आठवते, एक वयस्क खेळाडू बहुतेक P&Tचा असावा म्हणाला, समाज की टीम का खेल देख कर लगता है सबने  महादाणीजी से "खेल कि कमीनेपन्ती अच्छी तरह सीखी है. असो.

काळचक्र कधीच स्थिर राहत नाही. जुन्या दिल्लीत भाड्यावर राहणाऱ्या मराठी लोकांनी पै-पै जमा करून दिल्लीत राहण्यासाठी घरे बांधली.  जुनी दिल्ली मराठी माणसाने सोडली. समाज हि पहाडगंज येथे ब्रहन् महाराष्ट्र भवनात शिफ्ट झाला.  एक पर्व संपले तरीही जुन्या समाजाने दिल्लीतील खेळांच्या क्षेत्रात हि आपले अमिट योगदान दिले होते.

(हा लेख मला आज जे काही आठवते आहे त्यावर आधारित आहे. यात काही चुका झाल्या असतील किंवा कुणाचा उल्लेख झाला नसेल तर त्या बाबत माफी असावी).





Thursday, November 28, 2019

सूर्य आणि चंद्र


सूर्य स्वत:च्या प्रकाशात चमकतो. त्यामुळे  दिवस उजाडतो. सर्वत्र चैतन्य पसरते. सकारात्मक उर्जेचा प्रसार होतो. देवत्वच्या शक्त्या प्रबळ होतात. सर्व जन सुखी आणि समाधानी होतात.

चंद्रमा जवळ स्वत:चा प्रकाश नसतो. त्यामुळे रात्र होते.  नकारात्मक उर्जेचा संचार होतो. कट-कपट कारस्थान सुरु होतात. राक्षसी शक्त्या प्रबळ होतात. असंतोष आणि अराजकतेचे साम्राज्य सर्वत्र पसरते. लोक दुखी होतात. 

Tuesday, November 26, 2019

टॅामी ने घेतला बदला


बिन्दापुरच्या श्मशानात कुजबुज सुरु होती, "कुत्र्याने चावले हे त्याला कळलेच नाही. पण आता काय उपयोग. एकुलता एक होता तरणाताठा जास्तीसजास्त २० वर्षाचा असेल". हे ऐकून टॅामी कुत्रा आनंदाने उड्या मारत एका कोपर्यात पहुडलेल्या दादोजी  जवळ पोहचला. भू! भू! दादोजी, अखेर मेला तो. मेला तो. हां! हां! म्हणता हि बातमी दूर-दूरच्या कुत्र्यांपर्यंत पोहचली. याच तरुणाने जनकपुरीत टॅामीच्या आईला कारने उडविले होते. अनाथ टॅामीला दादोजी आपल्या सोबत बिन्दापुरच्या स्मशानात घेऊन आला. कुत्र्यांजवळ रेबीज नावाचे शस्त्र आहे त्याच्या उपयोग माणसांच्या विरुद्ध कसा कारायचा हे दादोजीने टॅामीला शिकविले.

जनकपुरीचा शनी बाजार. भयंकर भीड होती. टॅामीला चाटच्या ठेल्यावर तो दिसला. हातात प्लेट घेऊन तो चमच्याने चाट खात होता. हीच ती योग्यवेळ. टॅामीने हळूच त्याच्या पायाचा चावा घेतला आणि पटकन त्याच ठेल्याच्या खाली लपला. काहीतरी पायाला टोचले हे त्या तरुणाला जाणवले. त्यांनी मागे वळून पाहिले काहीच दिसले नाही.  फक्त पायातून थोडे रक्त निघत होते त्या तरुणाने ते रुमालाने पुसून टाकले. आपल्याला कुत्र्याने चावले आहे अशी पुसटची शंकाहि त्याला आली नाही.  रेबीज नावाच्या शस्त्राने त्या तरुणाला यमसदनी पाठविले.

रात्री धगधगणार्या चितेच्या उजेडात टॅामीचे विजेत्या सारखे स्वागत झाले. सर्व कुत्र्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. कुत्र्यांचा सरदार बॉबीने  मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मधून लंपास करून आणलेली अमेरिकन चिकनची तंगडी त्याला उपहार स्वरूप दिली. भू! भू! टॅामी जिंदाबाद एकच नारा आसमंतात घुमला.