Saturday, August 19, 2017

संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का?


शर्माजी ज्यूस स्टाल समोर उभे होते, मला येताना पाहून सहज विचारले, पटाईतजी ज्यूस पिओगे क्या? आपण हि पक्के बेशरम, हाँ हाँ क्यों नहीं. झक मारून शर्माजीने दोन गिलास संत्र्याचे ज्यूस मागविले. ज्यूस पिता पिता शर्मा म्हणाला, हा दुकानदार भेसळ करत नाही, किती गाढे स्वादिष्ट ज्यूस आहे. मी उतरलो, शर्माजी हे संत्र्याचे ज्यूस नाही, किन्नूचे आहे. समोर पहा दुकानात किन्नू सजवून ठेवलेले आहे. पैसे देताना, शर्माने दुकानदाराला सहज विचारले, आप संत्रे कि जगह किन्नू पिलाते हो, कभी- असली संत्रे का ज्यूस भी पिलाया करो. दुकानदार हसून बोलला, ग्राहक दुगनी कीमत देने को तैयार हो तो संतरा भी पिला देंगे. 

भगव्या रंगाचे आंबट गोड ज्यूस म्हणजे संत्र्याचे ज्यूस, हि सामान्य ग्राहकाची कल्पना. त्याला किन्नू, माल्टा आणि संत्र्यातील फरक कळत नाही. भारतात संत्र्याच्या नावावर किन्नूचे ज्यूस देशी विदेशी कंपन्या विकतात. कारण स्पष्ट आहे, किन्नूत संत्र्याच्या तुलनेत जास्त रस. रस हि जास्त गाढ आणि  जास्त गोड. शिवाय स्वस्त: हि. 

पण विदर्भात संत्रा होतो. ८० हजाराहून जास्त हेक्‍टरवर संत्र्याच्या बागा आहेत. दरवर्षी पाच ते सहा लक्ष टन संत्र्याचे उत्पादन होते. कमी पाऊस झाला कि कमी उत्पादन  होते आणि  शेतकर्याचे नुकसान होते. चांगला पाऊस झाला, उत्पादन जास्त झाले तरी संत्र्याला विदर्भा बाहेर पाठविण्याची व्यवस्था चांगली नसल्याने रुपयाचे २ संत्रे विकण्याची पाळी शेतकर्यावर येते.  दुसर्या शब्दांत संत्र्याची शेती हि नुकसानीची शेती. जो पर्यंत संत्र्यावर मोठ्याप्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग लागत नाही संत्र्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे भाग्योदय होणे नाही. 

विदर्भात संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक उद्योग  वेळोवेळी लागले आणि बंद हि पडले. उदा. अमरावती फ्रुट ग्रोअर इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने १९५८ मध्ये   सुरू केलेला प्रकल्प १९६३ मध्ये बंद पडला. नोगा (NOGA) ची स्थापना 1972 मध्ये झाली. या सरकारी कंपनीची वार्षिक क्षमता ४९५० टन अर्थात दिवसाची फक्त १५ टन आहे. हि कंपनी हि संत्र्याचे ज्यूस लोकप्रिय करण्यास असमर्थ ठरली. सध्या टमाटो केचप हे ह्या कंपनीचे मुख्य उत्पादन आहे.  निजी क्षेत्रात हि अनेक संयंत्र सुरु झाले आणि बंद पडले. सरकारी क्षेत्रातला काटोल संयंत्र हि तोट्यामुळे बंद पडला. मार्केटची सद्य परिस्थितीत पाहता मुफ्त जागा आणि संयंत्रासाठी ५०% टक्के अनुदान दिले तरी कुणी संत्र्याचे ज्यूस काढणारे संयंत्र लावण्याची हिम्मत करणार नाही.  सत्य हेच आहे, संत्रा किन्नू किंवा माल्टा सोबत प्रतियोगिता करू शकत नाही. असे कृषी भवन मधल्या माझ्या एका जुन्या सहकारीचे मत.  

अश्या परिस्थितीत बातमी आली, पतंजली नागपूर मध्ये मेगा फूडपार्क आणि संत्र्याचे ज्यूस काढण्याचे मोठे संयंत्र लावणार आहे.  पतंजलीचा कारभार अत्यंत पारदर्शी असल्यामुळे, काही दिवसांपूर्वी या विषयावर आस्था चेनेल वर चर्चा आणि आचार्य बाळकृष्ण यांचे विचार ऐकले. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल, नक्षलवाद संपवायचा असेल, तर ग्रामीण भागात मोठ्या संख्येत रोजगार निर्मिती झाली पाहिजे. नागपुरात  मेगा फूडपार्क  लावण्यामागचा हाच उद्देश्य. 

विदर्भात संत्रा होतो, संत्र्याचा ज्यूस काढण्याचा एक मोठा संयंत्र विदर्भातील शेतकर्यांचे भाग्य बदलू शकतो. पण एक खंत हि त्यांच्या भाषणात दिसली, महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत जिथे उद्योगांना कौड़ियों के भाव जमीन दिली जाते, तिथे फक्त विदर्भातील शेकऱ्यांच्या कल्याणासाठी २५ लाख प्रती एकर भाव बाबाजीनी मोजला.  शेती आधारित उद्योगांबाबत सरकारी उदासीनता स्पष्ट दिसून येते.  बाबांची आज्ञा, जगातल्या संत्र्या उद्योगाबाबत माहिती गोळा करणे सुरु केले. माहिती मिळाली, संत्र्याचे ज्यूस काढण्याचा संयंत्र किती हि मोठा असला तरी, फक्त ज्यूस काढून त्याला चालविणे अशक्य.  संत्र्याच्या साली आणि बियांपासून इतर उत्पादने घेतली तर संत्रा संयंत्र चालविल्या जाऊ शकते. इथे तर ग्राहकांना संत्र्याचे ज्यूस इतरांपेक्षा स्वस्त: हि विकायचे आहे.

विदर्भात ५ लक्ष टनपेक्षा जास्त संत्रा होतो. उच्च दर्जेचा संत्रा सोडल्यास बाकी संत्र्याचे अधिकाधिक ज्यूस काढल्यास शेतकर्यांना संत्र्याचा जास्त पैसा मिळू शकतो.   सर्व  बाबींचा विचार करून पतंजलीने  ८०० टन रोज अर्थात वार्षिक २,९०,००० टन क्षमतेचे विशाल संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला. पाच महिने तरी संत्र्याचा ज्यूस काढण्यासाठी हा संयंत्र वापरला गेला तरी दिडेक लाख टन संत्र्यापासून ज्यूस निश्चित काढल्या जाईल. हे वेगळे हा नवीनतम तकनीकवर आधारित संयंत्र इटालियन कंपनी पुरविणार आहे. 

२०१९च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, कि पतंजलीचे हात हि यात जळतील. या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे. 

Wednesday, August 16, 2017

प्रदूषण (२९) निघाला शिकारीला कालीयानाग



  घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला 
दहाफणांनी ओकीत विषारी आग 

निघालाआहे शिकारीला 

 कालीयानाग.


अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे  
 मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.

कारण 

दशेंद्रीयांच्या  रथावर स्वार होऊनच  
निघाला आहे शिकारीला
 कालीयानाग. 








Saturday, August 12, 2017

प्रदूषण (५) श्रावणात : अंत आणि आरंभ



जीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे... 



जीर्ण-शीर्ण  कातडी 
शेषाने टाकली. 

प्रलय अमृतात  
धरती न्हाली.

हिरव्या शालूत 
नववधू लाजली. 

प्रीतीचे गाणे 
नभी गुंजले'

  अंकुर चैतन्याचे 
पुन्हा प्रगटले. 

Saturday, July 8, 2017

आर्य हे दक्षिण भारतीय होते.


आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे. 

पुरातन इतिहासाचे लिखित प्रमाण कमीच आहे. पण त्या काळातील माणूस आज हि जिवंत आहे. आजच्या माणसांचे अध्ययन करून संस्कृत भाषी आर्य कुठले हे ठरवणे सहज शक्य आहे. 

इतिहासाचा सारांश: हिस्ट्री चेनेल वर माणसांचा प्रवास हा कार्यक्रम २-३ वेळा तरी पहिला असेल.  हा कार्यक्रम माणसांच्या DNA अध्ययनावर आधारित होता. आजपासून पन्नास हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून  माणूस आंध्रप्रदेशच्या व दक्षिण भारताच्या किनार्यावर पोहचला. पन्नास हजारवर्षांपूर्वी आजपेक्षा समुद्राची पातळी २०० फूटहून अधिक खोल असल्यामुळे हा प्रवास सहज शक्य होता. आफ्रिकेतून आलेल्या टोळ्यांची जनसंख्या वाढली, काही दंडकारण्यात इत्यादी जंगलात स्थिरावले व वनवासी संस्कृती विकसित झाली. काही कावेरी, कृष्णा आणि गोदावरीच्या किनार्यांवर स्थिरावले. तिथे सभ्यता आणि संस्कृत भाषेचा जन्म झाला. मानवीय आचरणाचे नियम आखल्या गेले. त्या नियमांचे पालन करणारे स्वत:ला आर्य म्हणवू लागले. पालन न करणार्यांसाठी अनार्य शब्द वापरला जाऊ लागला. जनसंख्या वाढली, काही प्रवास करत प.समुद्र तटावर पोहचले व सरस्वती नदीच्या किर्नार्यावर प्रवास करीत सप्तसिंधू प्रदेशात पोहचले. जगातील सर्वात उपजाऊ अश्या सप्तसिंधू प्रदेशात सभ्यता स्थिरावली. नगर आणि ग्राम विकसित झाले, वैदिक साहित्य निर्मिती हि सुरु झाली. संस्कृत भाषा अधिक विकसित झाली.  बदलत्या वातावरणात वावरू लागल्यामुळे  मूळ संस्कृत शब्दांचे उच्चारण करणे त्यांना जड जाऊ लागले. काही संस्कृत शब्द लुप्त हि झाले. माणूस शेती करू लागला. भूमी आणि गौ धनासाठी युद्ध होऊ लागले. ऋग्वेदातील ऋचा या घटनांच्या साक्षी आहेत. बहुतेक १२-१३ हजार वर्षांपूर्वी  एक मोठे दशराज्ञ युद्ध झाले. तृत्सु वंशातील राजा सुदास याने १० आर्य वंशातील राजांना पराजित केले. हजारो सैनिक मरण पावले. ऋग्वेदात राजा सुदासचे पुरोहित वशिष्ठ ऋषीला राक्षस म्हणून हि संबोधले आहे कारण या विनाशासाठी ते हि दोषी होतेच. याचा अर्थ सभ्य आणि सुसंकृत लोक म्हणजे आर्य आणि असंस्कृत हिंसाचारी म्हणजे राक्षस किंवा अनार्य. पुढे आर्य  सभ्यता गंगा -यमुनेच्या खोर्यात पोहचली. काही "केस्पिअन सागर पार करून मध्य आशियात, युरोपात आणि काही पुढे सैबेरिया पार करून अमेरिकेत पोहचले"(असे हिस्ट्री चेनेल वाले म्हणतात). इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो. माझा एक सहयोगी गंगाराम काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सौबत मक्सिको येथे गेला होता. मी परतल्यावर विचारले मेक्सिको कसा वाटला. तो म्हणाला 'पटाईतजी वहां ऐसा लगा जैसे भारत में है, कोई बिहारी लग रहा था कोई पंजाबी'. निश्चित ही भारत का कोई रिश्ता मेक्सिको से अवश्य है".असो. 

आता माणसाचे अध्ययन करून आर्य दक्षिण भारतीय होते हे सिद्ध करायचे आहे. माणूस म्हणजे मीच. मी ब्राम्हण कुळातील आहे अर्थातच भाकड इतिहासकारांच्या मते आर्य. माझे अध्ययन करून संस्कृत भाषिक आर्य मूळचे कुठले हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

बालपणी संध्याकाळी वडील घर परतल्यावर, देवा समोर दिवा लावल्यावर, रामरक्षा इत्यादी स्त्रोते आम्ही म्हणायचो. शाळेत गेल्यावर कळले या भाषेला संस्कृत असे म्हणतात. आम्ही जुन्या दिल्लीत राहायचो. पहाडगंज येथील नूतन मराठी मराठी शाळेत शिक्षण सुरु झाले. शाळा मराठी असली तरी ५ टक्क्याहून कमी मराठी मुले असतील. ५ टक्के आरामबाग येथील सरकारी कर्मचार्यांची मुले त्यात अधिकांश दाक्षिणात्य. शाळेत शिकणारी बहुसंख्यक मुले पाकिस्तान मधून आलेल्या शरणार्थी लोकांची. त्यात हि सर्वातजास्त मुलतानी टांडा येथील. (मुलतान म्हणजे आर्यांचे मूलस्थान असे काहींचे मत आहे). उंच पुरे घार्या डोळ्यांच्या मुलतानी मुलांमुळे नूतन मराठी शाळा कैक वर्ष बास्केटबॉल विजेता राहिली होती. त्या काळी ११वी बोर्ड होता. आठवीत संस्कृत भाषेत ९० टक्के मार्क मिळाले तरी ९वीत प्रवेश घेताना मी हिंदी हा विषय घेतला. संस्कृत शिकविणार्या शास्त्री सरांना हे कळले त्यांनी प्रेमाने मला जवळ बोलविले. (शास्त्री सर हे बनारसचे होत. चांगले संस्कृत शिकवायचे. संस्कृत घेणाऱ्या अधिकांश मुलांना ७५ टक्केहून जास्त मार्क मिळायचे.). मला समजावीत म्हणाले अरे गाढवा, संस्कृत हि भाषा तुम्हा मद्रासी-मराठी मुलांसाठीच आहे. संस्कृत घेशील तर तुला सहज ८०-८५ टक्के मार्क्स मिळतील. संस्कृतच्या भरोश्यावर प्रथम श्रेणीत हि पास होशील. हिंदीत तर बोर्डात प्रथम येणार्यालाही ७५ टक्के मार्क्स मिळत नाही. ज्यांना संस्कृत कळणे आणि बोलणे शक्य नाही अश्या पंजाबी, सिंधी आणि मुलतानी मुलांसाठी हिंदी भाषा आहे.  हे वेगळे मी निश्चय बदलला नाही. हिंदीत ५४ टक्के मार्क्स मिळाले आणि ९ मार्कांनी प्रथमश्रेणी चुकली. माझ्या  भावाने संस्कृत घेतली. त्याचे ८० टक्क्याहून जास्त मार्क्स आले व प्रथम श्रेणी हि. असो. पण एक मात्र खर देशातील उत्तर पश्चिमेच्या भागातील लोकांना संस्कृत बोलणे जड जाते. काही दिवसांपूर्वी आस्था टीवी वर संस्कृत मधील एक कार्यक्रम पहिला. दक्षिण भारतीय विद्वान सहज आणि समजणारी संस्कृत बोलत होते, पण एका उत्तर भारतीय हरियाणवी अतिप्रसिद्ध संस्कृत विद्वानाचे उच्चारण स्पष्ट नव्हते. दिल्लीतही दक्षिण भारतीय आणि मराठी ब्राह्मणांची डिमांड पूजापाठ साठी जास्त आहे. त्यांना दक्षिणाही जास्त मिळते. कारण एकच संस्कृत भाषेतील स्पष्ट उच्चारण. संस्कृत भाषेचे अधिकांश विद्वान् विन्ध्याचल पार अर्थात दक्षिणात्य आहेत. आता विचार करा मध्य आशिया किंवा युरोपात संस्कृत भाषा विकसित होणे संभव आहे का?

काही म्हणतात, आर्य गोर्या रंगाचे व उंच पुरे होते. रंगाचा आणि उंचीचा संबंध जातींनुसार नव्हे तर वातावरणाशी आहे. माझे वडील दिल्लीत स्थायी झाले.  दिल्लीत लालनपालन झाल्यामुळे माझ्या चुलत भावांपेक्षा आम्हा दिल्लीकर भावंडांची उंची जास्त आहे व रंग ही उजळ. पुढील पिढी अर्थात माझे पुतणे, भाचा आणि माझा मुलगा यांची उंची आमच्या पिढी पेक्षा जास्त आहे. हि काही माझ्या घरची परिस्थिती नाही. आता मी जनकपुरी जवळ बिंदापूर या शहरी गावात राहतो. जनकपुरीत बरेच मराठी ३०-४० वर्षांपासून राहतात. एखाद अपवाद सोडता सर्वांच्याच घरी आजची पिढी पूर्वीपेक्षा जास्त उंच आहे. दोन-तीन पिढीत एवढा फरक पडतो. शेकडो पिढ्यात रंग आणि उंची यात किती फरक पडेल. निश्चितच दक्षिणेतून उत्तरेकडे गेलेल्या आर्यांचे रंग आणि रूप बदलले. तरीही मूळ रंगाची आठवण नेहमीच स्मृतीत राहिली. आपल्या सर्व देवता काळ्या रंगाच्या आहेत. क्षीर सागर मध्ये निवास करणारे आर्य देवता विष्णू, काळ्या रंगाचे, राम आणि कृष्ण काळ्या रंगाचे, परशुराम हि काळेच होते. नीलकंठ शंकर हि काळेच. रावण मात्र गोरा आणि सुंदर होता. कालिका देवी काळीच होती. सीता ते शकुंतला सर्वच सुंदर कन्या सावळ्या होत्या. जिच्यामुळे महाभारत घडले ती अग्नीवर्णी द्रौपदी सावळी होती. संस्कृत साहित्यात विदर्भ कन्या सुंदर (सावळ्या) असतात. आमची सौ. हि वैदर्भी आहे. अर्थात सुंदर आहे. देवी -देवतांच्या मूर्त्या काळ्या दगडातच तैयार करण्याची परंपरा आज हि आहे. मुगल देशात आल्यानंतरच संगमरमरच्या पांढर्या मूर्त्या बनू लागल्या. 

सारस्वत ब्राह्मण केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान ते पंजाब पर्यंत पसरलेले आहे. ते आर्यांचा दक्षिण ते उत्तर भारताच्या प्रवासाचे जिवंत साक्षीदार आहेत. सारस्वत ब्राह्मण गंगा-यमुनेच्या मैदानापासून ते बंगाल पर्यंत हि  पसरले आहेत. अर्थात संपूर्ण भारतात मानवी प्रवासाचे (आर्यांच्या प्रवासाचे) जिवंत प्रमाण हि आहेत. या शिवाय मी आणि सर्व दक्षिण भारतीय हि आर्य दक्षिण भारतीय असण्याचे जिवंत पुरावे आहोत.  

निष्कर्ष एकच जर स्वत: आर्य  म्हणवणारी  कुठली जाती असेल तर निश्चित ती दक्षिण भारतीयच आहे. संस्कृत भाषी आर्य हे दक्षिण भारतीय होते हेच सत्य.  बाकी सर्व भाकड कथा. 

Sunday, June 25, 2017

योग: कर्मसु कौशलम्- सौपा अर्थ.



बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते .
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् .
(भगवद्गीता. २/५०)


(सामान्य अर्थ:  बुद्धी वापरून कर्म करणारा व्यक्ती  चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होऊ शकतो. म्हणून योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म केल्यास मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो.)   

योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म केल्यास मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होऊ शकतो. योगयुक्त होणे म्हणजे काय? हा प्रश्न मनात आलाच. 

योग माणसाला पर्मार्थाशी जोडतो. म्हणून इशोपनिषदात काही मिळते का म्हणून ग्रंथ उघडून बघितला. ईशोपनिषदात भगवंत म्हणतात "पूर्णातून कितीही पूर्ण निघत गेले तरी शेवटी पूर्णच उरते. त्या साठी त्याग सहित उपभोग करावा लागतो". अर्थात जे घेतले आहे, ते परत करावेच  लागते. असे केल्याने पूर्ण पूर्णच राहते. (१-१=०). या पद्धतीने कर्म करणे म्हणजे योगयुक्त कर्म करणे. दुसर्या शब्दात कर्माचे चक्र पूर्ण करणे म्हणजे योगयुक्त कर्म. 

आपण सर्वांनाच माहित आहे, वाईट कर्मांचे वाईट फळ भोगावेच लागतात. त्या शिवाय मुक्ती नाही. कधी-कधी बुद्धी वापरून चांगले कर्म केले तरी माणूस कर्म बंधनातून मुक्त होत नाही. कसे काय? हा प्रश्न मनात आला. उदा:  एक कारपेंटर लाकडापासून आपले सर्व ज्ञान आणि अनुभव वापरून अतिशय सुंदर फर्निचर बनवितो. चांगले कर्म केले तरी तो कर्मबंधनातून मुक्त  होत नाही. कारण फर्निचरसाठी लाकूड लागते. लाकडासाठी झाड तोडावे लागते. असेच झाडतोड सुरु राहिली तर एक दिवस फर्निचर बनविण्यासाठी लाकूडच मिळणारच  नाही. अर्थातच त्याच्या कर्मावर बंधन आले. पुन्हा त्याला फर्निचर तैयार करता येणार नाही.  तोडलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नव्याने झाडांची लागवड केल्याशिवाय कारपेंटरचे कर्म पूर्ण होणार नाही.  पूर्णापासून पूर्ण वेगळे केले तरी पूर्ण पूर्णच राहते.(झाडापासून फर्निचर बनले तरी झाड पूर्णच राहिले पाहिजे).    

एक प्रश्न पुन्हा मनात येतो, योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म  कसे करता येईल?  

उदा: एक शेतकरी शेतात  गहू किंवा धान पिकवितो. काही स्वत: साठी ठेवतो, काही विकतो आणि काही पुढच्या वर्षी बियाण्यांसाठी ठेवतो. बियाणांसाठी धान्य वेगळे ठेवले नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा पिक घेता येणार नाही, हे त्याला लक्षात ठेवावे लागते. (या साठी बुद्धी लागतेच). 

जनावर आणि माणसांनी खालेल्या अन्नाचा त्याग मल-मूत्र आणि शेण या मार्गाने होतो. अर्थात  शेतीतून मिळालेल्या अन्नाच्या अवशेषांचा त्याग मनुष्य आणि जनावरे करतात.  मल मूत्र आणि शेण पुन्हा खताचा माध्यमाने जमिनीला परत करणे म्हणजे "तेन त्यक्तेन भुञ्जीथा". जेवण रुपी कर्माचे चक्र पूर्ण करणे. शेतातील सर्व कचरा-कडबा जाळण्याजागी तो जमिनीला परत करायला पाहिजे तो माणसांच्या किंवा जनावरांचा उपयोगाचा नाही पण तो जमिनीतून मिळाला आहे, तो जमीनीला परत केलाच पाहिजेच.  त्या शिवाय शेतकर्याचे  कर्मचक्र पूर्ण होणार नाही. 
शेती जगविण्यासाठी पाणी पाहिजेच. ऋग्वेद काळात इंद्राने वज्राच्या सहाय्याने पर्वतांचे हृदय फोडून नद्यांना मुक्त केले. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली.  कृष्णाने हि द्वापर युगात, ब्रज (जिथे दहा हजार गायी पाळल्या जातात) ९९ तीर्थांची स्थापना केली आणि इंद्राच्या लहरी (अतिवृष्टी आणि कमीवृष्टी) पासून गायींची आणि  ग्वालांची  रक्षा केली. आज हि सरकार पाणी अडवून, बंधारे बांधून आणि कालवे काढून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करते. शेतकरी हि शेतात विहीर आणि तलाव बांधून पाण्याची व्यवस्था करतो. जेवढे पाणी आपल्याला कालव्यातून मिळते, जेवढे पावसाचे पाणी विहिरीत आणि तलावात साठविल्या जाते, तेवढ्याच पाण्याचा उपयोग शेतकर्याने केला पाहिजे. जास्त केला तर पुढे शेतीसाठी पाणीच मिळणार नाही तो शेती करू शकणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. कर्माचे चक्र तुटेल आणि शेतकरी कर्मबंधनात अटकेल. त्याचे फळ त्याला भोगावे लागेल. गेल्या दुष्काळात कर्मबंधनाची झळ मराठवाड्याने सोसली आहे, शेती तर सोडा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आगगाडीने करावी लागली. उपलब्ध पाण्याच्या कौशल्याने शेतीसाठी उपयोग करणे व पुन्हा तेवढेच पाणी साठविणे म्हणजे योगयुक्त रीतीने पाण्याचा उपयोग करणे.

वरच्या उदाहरणाने योगयुक्त कर्म म्हणजे काय. हे समजले असेलच. पुन्हा एक प्रश्न मनात आला.  श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करून अर्जुनाला युद्धासाठी का तैयार केले? एक सुदर्शन चक्र युद्धासाठी पुरेसे होते. पण श्रीकृष्णाने तसे केले नाही. कारण तसे केल्याने कुरुक्षेत्राच्या रणमैदानात सर्व योध्यांचे कर्मचक्र पूर्ण झाले नसते. कुणालाहि मुक्ती मिळाली नसती. 

Thursday, December 22, 2016

शर्यत : ससा आणि कासव



मोगलीचे जंगल होते. एक काळाकुट्ट ससा आणि एक पांढरे शुभ्र कासव एका  रिंगणात धावत होते. शर्यत होती जंगी. अचानक शिट्टी वाजली. शर्यत संपली. ससा आणि कासव होते तिथे थांबले. गोल-गोल होते रिंगण, कोण जिंकले, कोण हरले, प्रश्न होता बिकट.  हत्ती म्हणाला ससा धावतो वेगात, तोच आहे विजेता. तवाकी म्हणाला, मला वाटते बहुतेक पांढरे कासव जिंकले असावे. निर्णयासाठी सर्वांनी, महाराज शेरखानकडे बघितले. शेरखान हि बुचकळ्यात पडला, त्याने शर्यतीची नियमावली बघितली. शेरखान म्हणाला, काळा ससा धावतो, जोरात पण कासव आणि सस्याच्या शर्यतीत नेहमीच जिंकतो कासव, असेच लिहिले आहे यात.  आजच्या शर्यतीचा विजेता आहे पांढरा कासव.

अचानक माझे स्वप्न भंगले, अर्थ काही कळेना. शेरखान म्हणतो, बहुधा तेच सत्य असावे.  आपले काय म्हणणे आहे. 

Sunday, December 18, 2016

अग्रपूजेचा मान - भाई भतीजावादाची पहिली कथा


कालचीच गोष्ट, गल्लीतली एक मुलगी घरी आली, पेढे घेऊनच. मी विचारले पढे कसले? ती म्हणाली, काका मला नौकरी लागली.  खरंच ती मुलगी अत्यंत हुशार आहे. या आधी हि तिने  दोन-तीन वेळा लिखित परीक्षा पास केली होती. पण दरवेळी साक्षात्कार मध्ये बाद झाली.  या वेळी साक्षात्कार नव्हता. (केंद्र सरकारच्या श्रेणी ग आणि ड साक्षात्कार घेणे बंद झाले आहे, नमो कृपा आणखीन काय) लिखित परीक्षा पास होताच तिला नौकरी लागली. असो. 

नौकरी मिळविण्यासाठी, त्या नौकरीसाठी अपेक्षित असलेल्या गुणांची परीक्षा हि द्यावीच लागते.  पण या शिवाय साक्षात्कार नावाचा एक प्रकार हि असतो.  परीक्षेत पहिला क्रमांक आला तरी साक्षात्कार मध्ये कमी मार्क्स देऊन परीक्षक उम्मेद्वाराला बाद करू शकतात अर्थात करतातच. मग ती नौकरी शिक्षकाची असो, पोलीस मधली भर्ती असो किंवा इस्पितळात नर्सची नौकरी. आपल्या माणसांना अर्थात भाई आणि भतीज्यांना नौकरी देण्यासाठीच बहुधा साक्षात्कार नावाचा प्रकार आपल्या देशात रूढ झाला असावा. 

रात्रीच्या वेळी पलंगावर पडल्या-पडल्या, भाई भतीजावादाची प्रथा आपल्या देशात केंव्हा सुरु झाली असेल, हा विचार करत होतो. अचानक ती पुराणकथा डोळ्यांसमोर चमकली. 

कोणत्या देवताला अग्रपूजेचा मान मिळायला पाहिजे, या साठी परीक्षा ठेवली होती. देवाधिदेव भगवान शंकर हे परीक्षक होते. जो सर्वात कमी वेळात पृथ्वी प्रदिक्षणा करेल त्या देवताला अग्रपूजेचा मान मिळणार होता. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून पृथ्वी  प्रदिक्षणेसाठी निघाले.  पण गणेश मात्र तिथेच होता. शंकराने विचारले, गणेश, सर्व निघाले तू अजून इथेच का? तुला अग्रपूजेचा मान नको का? गणेश म्हणाला, पिताश्री, उंदिरावर बसून मी गरुडावर स्वार भगवान विष्णू  यांच्याशी स्पर्धा करू शकतो का? कदापि शक्य नाही.  हि तर वाहनांची स्पर्धा आहे,  ज्याचे वाहन जोरात धावणार ती देवता जिंकेल. यात देवांची हुशारी काय? गणेशचे म्हणणे ऐकून शंकराची विकेटच उडाली. शंकर म्हणाले, च्यायला हे माझ्या ध्यानातच नाही आले. पण आता काही उपयोग नाही. त्यावर गणेश म्हणाला, बाबा तुम्ही मनात आणले तर मला अग्रपूजेचा मान सहज मिळू शकतो. मी इतरांसारखा मूर्ख नाही, हे आत्ताच सिद्ध केले आहे. मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कि नाही, या बाबत काही शंका असेल तर आईला विचारा. शंकराच्या नेमक्या त्या दुखात्या जखमेवर गणेशनी  बोट ठेवले होते.  चांगली गंगा डोक्यात बस्तान बांधून बसली होती आणि वामांगावर पार्वती देवी विराजमान. मस्त चालले होते. कसे काय पार्वतीला गंगेबाबत कळले. गणेशाची मदत घेऊन तिने, गंगेला दूर दक्षिणेत जायला बाध्य केले. खरे म्हणाल, शंकराला गणेशवर भारी राग होता, पण करणार काय, बायकोचा प्रिय पुत्र तो. त्याच्यावर राग काढणे शक्यच नव्हते. 

आपल्या पुत्राचे ते उपकार विसरणे पार्वतीला कदापि शक्य नव्हते. तिला राहवले नाही.  पार्वती शंकराला म्हणाली, एवढे म्हणतो आहे, तर गणेशला द्या अग्रपूजेचा मान. तुम्ही दिलेला निर्णय अमान्य करण्याची हिम्मत त्रिलोकात कुणाला हि नाही.  भगवान शंकर म्हणाले, पार्वती तुला कळत का नाही, इच्छा असूनही हि परीक्षा मी रद्द करू शकत नाही. तसे केले तर माझ्यावर भाई-भतीजावादचा आरोप लागेल. माझी इज्जत धुळीत मिळेल. 

गणेश म्हणाला, बाबा परीक्षा रद्द करायची गरज नाही.  हे बघा तुम्ही कुठे उभे आहात, पृथ्वीवरच ना.  भगवान शंकर म्हणाले, होय. मग मी तुमची प्रदिक्षणा केली म्हणजे, पृथ्वी प्रदिक्षणा हि झालीच समजा. पार्वती मैया लगेच म्हणाली, बघा  किती हुशार आहे, माझा गणेश.  आता तरी झाले ना तुमचे समाधान. गणेश, यांचा विचार बदलण्याआधी पटकन प्रदिक्षणा करून टाक.  गणेशने तत्काळ आपल्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार केला आणि उंदिरावर बसून  त्यांच्या  भोवती एक चक्कर मारला आणि हात जोडून म्हणाला.  हे भगवान शंकर, मी सर्वात आधी पृथ्वी प्रदिक्षणा पूर्ण केली, मला अग्रपूजेचा मान मिळालाच पाहिजे.  बेचारे शंकर भगवान, काय करणार त्यांनी गणपतीला अग्रपूजेचा मान दिला.  सर्व देवता पृथ्वी प्रदिक्षणाकरून दमून भागून  परत आले. त्यांना कळले, भगवान शंकरांनी त्यांच्या पुत्राला अर्थात गणेशला सर्वप्रथम पृथ्वी परिक्रमा केली म्हणोन अग्रपूजेचा मान देऊन टाकला आहे. ज्या प्रमाणे विरोधीपक्ष संसदेत गोंधळ घालतात, तसेच देवतांनी हि या विरुद्ध भारी हल्लागुल्ला केला. पण त्याच्या काही उपयोग झाला नाही. त्या दिवसापासून  भारतात भाई- भतीजावादाची सुरुवात झाली.   

Wednesday, December 14, 2016

अमिट लक्ष्मणरेखा




वासनामयी डोळ्यांनी 
पाहिले तिच्याकडे मी. 
नवयौवना कोमलांगी 
मीलनोत्सुक रमणी  
नोट नवी कोरी ती
दोन हजाराची.


विरहात जळूनी
कासावीस झाले प्राण 
तरीही 
विवश होतो मी 
अलंघनीय होती 
सुट्ट्या पैश्यांची ती 
अमिट  लक्ष्मणरेखा.  




Tuesday, December 13, 2016

क्षणिका : ओढ वसंताची



गोठल्या श्वासांना
गळत्या पानांना 
ओढ वसंताची 



स्वप्न रात्रीचे 
क्षणात विरले. 
प्रवास पुढचा 
वाटसरूचा. 









Friday, December 9, 2016

स्वार्थाच्या बाजारी मैत्री अशी रंगली



सावळ्याच्या प्रेमात 
 पडली  राधा  बावरी 
काळ्या रंगात रंगुनी 
यमुनाही झाली काळी.

द्वारकेचा राजा आला 
सुदामच्या द्वारी 
काळी लक्ष्मी झाली 
जनखात्यात पांढरी.


यमुनेच्या काठी 
अवसेच्या  राती 
स्वार्थाच्या बाजारी 
मैत्री अशी रंगली. 



द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम =  गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या  काठावर आहे.



Tuesday, December 6, 2016

दिल्ली कथा : अल्पावधीचा कुटीर उद्योग


(लोकांच्या अनुभवावर)

दहा नोव्हेंबरची गोष्ट कार्यालयात आपल्या रूम मध्ये बसलो होतो अचानक सुब्बु रूम मध्ये शिरला, जवळपास ओरडतच म्हणाला, पटाईतजी क्या आपको मालूम है,  RBI के सामने तो कुटीर उद्योग शुरू हो गया है, कुटीर उद्योग???. प्रथम सुब्बुला काय म्हणायचे आहे मला काहीच उमजले नाही. हा कुटीर उद्योग आहे तरी काय पाहण्यासाठी मी स्वत: लंच मध्ये कार्यालयातून बाहेर पडलो. आरबीआयच्या समोर भली मोठी रांग पैसे बदलण्यासाठी लागलेली होती. तीच परिस्थिती जनपथ वर असलेल्या सर्व बँकांची होती. पण एक जाणवले, लाईनीत लागणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक या पूर्वी कधीच  बँकांच्या लाईनीत लागले नसतील. घूँघट काढलेल्या बाया (बहुतेक राजस्थानी), पर्दानशीं स्त्रिया, आपल्या सोबत चिल्ल्या-पिल्ल्याना घेऊन लाईनीत उभ्या होत्या. बहुतेक लोक जुन्या दिल्लीतले दिसत होते.  सुब्बुच्या म्हणण्याप्रमाणे ह्या लोकांनी कुटीर उद्योग सुरु केला आहे.  स्वत:च्या आधारकार्डच्या उपयोग करून लोकांचे ४००० रुपये बदलून काही दिहाडी कमविण्यासाठी हे गरीब लोक बँकांच्या लाईनीत उभे होते.  एका  मोटारबाईक जवळ दोन चार लोकांचा घोळका दिसला. बहुतेक लाईनीत लागलेल्या स्त्रियांसोबत ते आले असावे. हिम्मत करून मी विचारले "क्या रेट चाल रिया है, मियां." त्याने लगेच उत्तर दिले, ५०० रुपैया, चाहे हजार बदलो चाहे ४००० हजार.  "रेट कुछ जियादा लग रिया है". तो: एक माणसाची पूर्ण दिवसाची दिहाड़ी, शिवाय चाय-पानी आणि जास्त वेळ लागल्यास नाश्ता हि द्यावा लागणार. त्या हिशोबाने काही जास्त घेत नाही आहे, सर्वत्र हाच रेट आहे.  "पैसा बदलून मिळेल याचा काय भरोसा?" तो: माझा मोबाईल न. आणि आधार कार्डची फोटो कापी मी तुम्हाला देणार, आता तर झाले. ऐसे कामों में भरोसा करना हि पड़ता है. "किती बदलून देऊ शकता?"  तो: पाच दहा लाख, त्याहून जास्ती काम आपल्या बसचे नाही. असो. असाच प्रकार दिल्लीत अधिकांश ठिकाणी दिसला.  

रेडक्रॉसच्या इमारती  समोर एक वयस्कर अपंग भिकारी बसलेला दिसतो.  घरी जाताना बहुतेक त्याच्या हातावर एक दोन रुपयांचे नाणे मी ठेवतो. तेवढेच पुण्य. पण आज काही तो दिसला नाही. बहुतेक तो हि या कुटीर उद्योगात उतरला असावा.  १७ तारखेला तो भिकारी पुन्हा रेडक्रासच्या इमारती समोर बसलेला दिसला. बहुतेक १६ तारखेला बोटांना स्याही लावल्यामुळे आता त्याला नोट बदलणे  शक्य नव्हते. मी सहज त्याला विचारले, "कुठे होता एवढे दिवस." तो म्हणाला साब, लाईनीत लागलो होतो.  "कितने नोट छापे." दात दाखवत तो म्हणाला, सब मोदीजी कृपा है. नेहमीप्रमाणे त्याच्या हातावर २ रुपयांचे नाणे ठेवत मी पुढे निघालो. (खरे म्हणाल तर देण्याची इच्छा नव्हती. पण विचार केला हा कुटीर उद्योग अल्पकालीन आहे, ह्याचा मूळ धंधा तर भिक मागण्याचाच). ७-८ दिवसात लाईनीत उभे राहून गरिबांनी श्रीमंतांचे तीस एक हजार कोटी नक्कीच बदलून दिले असतील आणि सहा-सात हजार कोटी कमविले हि असतील. काही विरोधीपक्ष नेता लोक RBI समोर धरना द्यायला आले होते. लोकांनी त्यांना पळवून लावले, कारण त्यांच्या येण्यामुळे लाईन तुटली. गरिबांची दिहाडी मारल्या गेली. त्यांना राग येणार साहजिकच होत. पुढे नेत्यांनी लाईनीत लागलेल्यांना भडकवायचे सोडून दिले. 


दुसरा कुटीर उद्योग म्हणजे जनधन योजनेचा दुरुपयोग. अंदाजे किमान ४० ते ५० लक्ष लोकांनी श्रीमंतांचे काळे धन स्वत:च्या खात्यात टाकून उजळ केले असावे. कारण या अवधीत पंचवीस हजार कोटींच्या अधिक रक्कम या खात्यांत जमा झाली. २० ते २५ टक्के कमिशन  या कुटीर उद्योगात हि गरिबांना मिळाले असेल. असो.  दोन एक दिवसांपूर्वी पंतप्रधान म्हणले गरिबांनी हा पैसा परत करायची गरज नाही. त्यांनी हा पैसा स्वत: जवळच ठेवला पाहिजे आणि काळा पैश्येवाल्यांना अद्दल घडवली पाहिजे.  

काहीही म्हणा, काही दिवस तरी, गरीब लोकांना एक नवीन कुटीर उद्योग मिळाला.  मोठ्या प्रमाणात लोकांनी या बहती गंगेत हात धुऊन घेतले.  

Sunday, December 4, 2016

लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी


सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ  आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या काळी वडिलांचा पगार बहुतेक २०० रुपयांचा जवळपास होता.  दुकानात राशन नसले तरी राशन येण्याची वाट पाहत दोन-दोन, तीन-तीन दिवस लाईनीत आपली जागा रोखून उभे राहावे लागायचे. अर्थातच आम्ही सर्व भावंडे  आळीपाळीने लाईनीत उभे रहायचो. राशन आल्यावर नेहमीच भांडणे इत्यादी व्हायचची.  शेवटी महाभारताचे युद्ध जिंकून निकृष्ट दर्जेचा भरपूर कचरा असलेला गहू किंवा मिलो मिळायचा.  पण काहीही म्हणा पोटाची खळगी मात्र भरायची. हे वेगळे नवी पिढीच्या लोकांना हे किस्से कपोल कल्पना वाटत असतील. तरीही त्यांचे भरपूर मनोरंजन तर झालेच असेल आणि लाईनीत उभे राहण्याचा काही तणाव  काही अंशी कमी झाला असेल. 

अखेर काही तासांनी २००० रुपयांची नवी कोरी नोट घेऊन गल्लीतल्या वाण्याच्या दुकानात गेलो. तिथे चक्की फ्रेश आटा होता, मिलचा आटा होता, विदेशी आटा होता, पांढरा शुभ्र आटा होता, भुरे रंग का  स्वदेशी आटा होता, विटामिन वाला आटा होता, नौ अनाज वाला बाबाजींचा पोष्टिक आटा हि होता.  नव्हते  फक्त सुट्टे.  अखेर आटा न घेता रिकाम्या हाताने घरी परतलो.

घरी येऊन कधी नव्या कोर्या २००० हजारच्या नोट कडे बघितल तर कधी बँकेच्या पासबुक कडे.  कधी नव्हे ते, महिन्या अखेर खात्यात भरपूर रक्कम दिसत होती.  श्रीमंत होण्याची जाणीव झाली.  आजीने सांगितलेली एक कहाणी  आठवली. एकदा एका दरिद्री माणसाने नदी काठावर लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरु केली.  अखेर लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती सोन्याची होईल, असा वर त्याला दिला.  त्या माणसाने डोळे उघडून एका दगडाला स्पर्श केला. तो दगड तत्क्षणी सोन्याचा झाला. युरेका युरेका म्हणत तो आनंदाने उड्या मारत घरी पोहचला आणि बायकोला समोर पाहताच जवळ जवळ ओरडलाच  अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण  श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे. वेड्या सारखा तो सर्वत्र हात लावत सुटला. त्याचे जग सोन्याचे झाले होते. एक भयाण सत्य समोर आले. अन्न पाण्याविना तो तडफडत मरणार होता. असो. 

रात्री फ्रीज उघडून थंडगार पाणी प्यालो. बेडरूम मध्ये जाऊन AC सुरु केला. मखमली बिछान्यावर झोपण्याचा प्रयत्न करत गुणगुणू लागलो: 

स्वामी तिन्ही जगाचा 
आट्या बिना उपाशी. 


Monday, November 21, 2016

दिल्लीकरांची व्यथा








चिमण्यांची चिव चिव नाही
कावळ्यांची कावं कावं आहे .


पहाटेच्या वाऱ्यालाही


पेट्रोलचा दुर्गंध आहे. 



सुकलेल्या नळांना 
पाण्याची तहान* आहे.
विजेचा झटका बघा 
 घामाने कासाविस आहे. 

कचऱ्याच्या ढिग्यार्यांवर   


डुकरांचा वाद आहे.


डॉक्टरांच्या मदतीला आज

डेंगू आणि मलेरिया आहे. 

क्षयग्रस्त  फुप्फुसाना  आता  
यमराजाचीच वाट आहे. 

 दारूचा सुकाळ आहे
नित नवे परवाने आहे
नशा विरुद्ध लढ्याचा 
झिंगणारा आगाज* आहे. 







टीप: 
तहान = वर्षभर आधी रस्त्यावरची नळाची पाईपलाईन तुटली अजूनही ठीक झाली नाही. हि परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. 
आगाज =   एका वर्षात थोक भावात  दारूचे परवाने  व बारचे परमिट दिले दिले.  यालाच म्हणतात नशा विरुद्ध युद्ध. 








Sunday, November 20, 2016

काहीच्या काही कविता - चंचला लक्ष्मी




सोन्याची तिजोरी 
चोरांनी लुटली. 

नोट कागदी 
कचर्यात गेले. 

मुद्रा आभासी 
होणार आभासी.

चंचला लक्ष्मी 
नाही कुणाची.  

चंचला लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे.  तिचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करा. सात दरवाज्यात बंद केले तरी ती हातातून निसटणारच. 

   



Sunday, November 13, 2016

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव


आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख  होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक  आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार. लाखोंची रोज उलाढाल करणारे चांदनी चौक सदर बाजारातले अधिकांश व्यापारी आयकर इत्यादी भरत नाहित. (चांदनी चौक आणि सदर बाजार देशातील सर्वात मोठे थोक व्यापारचे केंद्र आहेत). बाकी देशात हि हीच परिस्थिती आहे, ९९ टक्के थोक आणि फुटकर व्यापारी आयकर भरत नाही किंवा अत्यंत कमी भरतात (मोठे मोठे शोरूम जिथे ई-मनी स्वीकारल्या जाते, मजबूरी में काही प्रमाणात कदाचित आयकर भरत असतील). आजच्या digital युगात इमानदार व्यापारीला रोख मध्ये आर्थिक व्यवहार करण्याची गरज नाही. हजार रुपयांच्या वरची खरीदारी ई-मनी द्वारा सहज होऊ शकते. यात चोरी आणि डकैतीची भीती हि नाही. तरीही आयकर इत्यादी सरकारी कर चुकविण्यासाठीच देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोखमध्ये होतात. याचा अर्थ एकच निघतो, आपल्या देशात अधिकांश लोक कर चोरी करतात.  

देशात १४.६ लक्ष कोटी १००० आणि ५००च्या नोटा आहेत. त्यातले किमान ७-८ लक्ष कोटी रूपये  आयकर इत्यादी सरकारी कर चुकवून जमा केलेला आहे.  गेल्या ८ नोव्हेंबरला प्रधानमंत्री मोदीनी १०० अणि ५००च्या नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली.   त्या क्षणापासून बातम्या ऐकतो, आहे, जुन्या नोटांचा वापर लोक संपती कर, विजेचे आणि इतर पाणीपट्टी, संपती कर इत्यादी थकित बिले भरण्यासाठी करत आहेत.    सूरत असो वा ठाणे सर्व नगरपालिकांची तिजोरी भरत आहे. 

मनात एक प्रश्न आला, आधी या लोकांनी बिले का नाही भरली. कारण स्पष्ट आहे, सरकारी बिले भरायची नसतात. सरकारी कर कधी द्यायचा नसतो. कधी न कधी राजनेता बिल माफी देतातच (दिल्लीत आमच्या इमानदार सरकारने ४-५ हजार कोटींची वीज आणि पाणीपट्टी माफ केली). आमच्या सारखे नियमित बिले भरणारे  इमानदार मूर्ख बनले. आता नोटा रद्द झाल्या, रद्दी  कागज सरकारच्या माथी मारून बिले भरणे म्हणजे एक प्रकारची कर माफीच. काल पर्यंत ३ लक्ष कोटी रुपयांचे चलन बँकांनी बदलून दिले तरीही हि मोठ्या मोठ्या रांगा संपत नाही आहे, कारण स्पष्ट आहे. बहुतेक गरीब जनतेचे निष्क्रिय जनधन खाते मोठ्या प्रमाणात जागे झाले आहेत. कमिशन घेऊन पैसा जमा करण्याचा खेळ सुरु झाला आहे. आधार कार्डचा उपयोग गरीब जनता,  करबुडव्यांचे  दररोज  ४००० काळे रुपये (५०० रुपये कमिशन घेऊन) स्वच्छ करून देत आहेत. काही हि म्हणा गरिबांची काही कमाई तरी होत आहे. हि गोष्ट वेगळी ते अश्याप्रकारे या कर बुडव्यांना मदत करीत आहेत. छोटे- मध्यम व्यापारी आपला काळा पैसा कमिशन देऊन किंवा परिचितांना लाईनीत उभे करून पांढरा करून घेतील.  बाकी ज्यांचा तिजोरीत भरगच्च काळा पैसा आहे. त्यांना सर्व पैसा काळ्याचा पांढरा करणे संभव नाही अशेच लोक अणि कंगाल झालेले नेता आरडाओरडा करीत आहे आणि नित नव्या अफवा पसरवितआहेत. (सध्या गादीवर नाहीत, पुन्हा भरगच्च पैसा मोठ्या प्रमाणात नवीन नोटांत गोळा करणे शक्य नाही). किमान २-३ लक्ष कोटी रुपय्या अग्नीत जाळणार किंवा गंगेत बुडणार हे निश्चितच. 

आज सकाळीच एक ओळखीचा एक मित्र   भेटला, तो म्हणाला पटाईतजी कुछ भी कहो मोदीजीने देश के लोगोंको अहसास करा ही दिया की वे सब चोर हैं आणि जोरात हसला. मला ही हसू आले.   किती हि कटू असले तरी हेच आजचे सत्य आहे. 

Sunday, October 30, 2016

काहीच्या काही - मधु आणि मधुमाशी


मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल. दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते.  कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन बोल्टचा रिकार्ड सुद्धा मोडला असेल. ओलम्पिक असते तर नक्कीच सुवर्णपदक मिळाले असते. तरीही शरीरावर कित्येक ठिकाणी मधुमाश्यांच्या चुंबनांचे वेदानामयी काटे उमटलेच.  या घटनेनंतर एखाद दुसरी मधुमाशी दिसली तरी अंगावर काटे येतातच. 

कालचीच गोष्ट सकाळी-सकाळी अंगणातल्या झेंडूंच्या फुलांना पाहत होतो. एक मधुमाशी चेहऱ्याजवळ घोंघावत आली चक्क मानवी आवाजात म्हणाली, 'ए थेरड्या' बघतोस काय, समोरची बादली उचल आणि फुलांवर पाणी घाल. क्षणभर मी गोंधळलोच, काय करावे सुचेनासे झाले. ती पुन्हा ओरडली 'मुकाट्याने पाणी फुलांवर टाकतो, कि दाखवू इंगा'. बालपणीची आठवण जागी झाली. दचकून म्हणालो, घालतो बाबा, पण एक सांग फुलांवर पाणी कशाला घालायचे. मुर्खा एवढे कळत नाही, फुल पाण्यात भिजले कि त्यातले परागकण हि भिजतील. भिजलेले पराग पियुन मला 'पातळ आणि भरपूर मधु' बनविता येईल.  स्वस्त असे पातळ मधु विकून आमचा मालक हि चांगली कमाई करेल. 

काही इलाज नव्हता, मुकाट्याने फुलांवर पाणी घालू लागलो. अचानक दुसर्या दिशेने दुसरी मधुमाशी वेगाने येताना दिसली. जवळ येऊन तीही ओरडली, पांढरेकेस वाल्या, ते पाणी घालणे थांबव आधी. मला काही समजेनासे झाले, पहिल्या मधुमाशी कडे बघितले, दुसरी जोरात ओरडली, 'कळत नाही का, फेक ती बादली. मी चुपचाप पाण्याची बादली खाली ठेवली. हिम्मत करून तिला विचरले,  ती फुलांवर  पाणी घालायला सांगते आणि तू पाणी घालू नको म्हणते, का? हा काय प्रकार आहे.  दुसरी मधुमाशी म्हणाली, वाळक्या फुलांच्या पराग पिऊन मी चांगले घट्ट असे मध बनविते. हिच्या सारखे, मधात पाण्याची भेसळ नाही करीत. आमचा मलिक दर्जेदार घट्ट मध विकतो. मी फुलांना पाणी घालणे थांबविले आहे, हे पाहून पहिल्या मधुमाशीला राग आला, ती माझ्यावर जोरात डाफरली, फुलांच्या वर पाणी घालतो कि नाही थेरड्या कि तुला शिकवू धडा? दुसरी तेवढ्याच त्वेषाने ओरडली, तिचे ऐकू नको, माझ्या दंश तिच्यापेक्षा जालीम आहे. काय करावे मला सुचले नाही, शेवटचा मार्ग पाण्याची बादली खाली ठेऊन खोलीच्या दिशेने धूम ठोकली. कानावर फक्त ऐकू आले, पळतो आहे हरामखोर, सोडणार नाही तुला. 

आई...ई, करत जोरात ओरडलो. डोळे चोळीत उठलो. सौ. पण  दचकून जागी झाली. काय झाले?  मी म्हणालो, बहुतेक मधुमाशी डसली वाटते. सौ.ने काही नाराजगीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, इथे बंद खोलीत कुठून मधुमाशी येणार, डास चावले असतील. काहीच्याबाही विचार करत राहतात आणि असले भुक्कड स्वप्न तुम्हाला पडतात. माझी हि झोपमोड होते. बाय द वे चावली कुठे? मी म्हणालो, चावली नाही ग. गालाचे चुंबन घेतले. सौ. पुढे काही बोलली, नाही चुपचाप अंगावर पांघरून घेऊन, पाठ फिरवून झोपून गेली. स्वत:ला मनोमन दाद दिली, बायकांची बोलती बंद करायचा चांगलाच अनुभव आहे, अस्मादिकांना. 

सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे फिरायला गेलो. येताना ओळखीच्या किरणाच्या दुकानासमोर थांबलो. समोर रेकवर मधाच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत होत्या, चाचपत-चाचपत हळूच त्याला विचारले, हे मध पातळ वाले आहे, कि घट्टवाले?  त्याने विचित्र नजरेने मजकडे पाहिले आणि तेवढ्याच हळू आवाजात विचारले, अंकल, आज सुबह सुबह ही.... डोक्यावर हात मारला..च्यायला मधुमाशींच्या चक्करमध्ये येऊन मद्य.ssपी ठरलो (काका, मद्याला शिवत सुद्धा नाही, हे आता कुणाला खरे वाटेल). 

डिस्क्लेमर: या कथेचा विज्ञापनांशी काही एक संबंध नाही. 

अवध कुमार (आजचा राम) आणि क्षत्रिय धर्म



अवधी भाषा म्हणजे, आदर, आतिथ्य आणि विनम्रतेची लखनवी तहजीब. 'पहले आप म्हणत' गाडी निघून गेली तरी चालेल. पण दुसर्याला महत्व देण्यात लखनवी माणूस कधीच कमी पडणार नाही. ज्या अवधमध्ये पराया लोकांना एवढा मान दिला जातो, तिथे वडिलधार्यांची विनंती म्हणजे जणू देवाचीच आज्ञा.  संत तुलसीदासांनी श्रीरामाचे चरित्र याच अवधी भाषेतच लिहिले. वडीलधार्यांची आज्ञा 'प्राण जाये पर वचन न जाये' या परंपरेला अनुसरून श्रीरामांनी आनंदाने वनवास स्वीकारला. पण तो काळ त्रेता युगातला होता. 

आज कलयुग आहे, आजचा राम वडिलधार्यांच्या आदेशाचे पालन करेल का?  श्रीराम काही विरोध न करता गुपचूप  वनात  का निघून गेले? कुणी त्यांना अन्यायचा विरोध करण्यासाठी प्रवृत्त का नाही केले? इत्यादी अनेक प्रश्न मनात आले. रामायण उघडून बघितले, त्या वेळीही श्रीरामांचे हितचिंतक सल्लागार होते. त्यांनी श्रीरामाला अन्यायाचा विरोध करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. या सल्लागारांचे म्हणणे होते,  वृद्धावस्था प्राप्त झाल्यावार राजाने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा राज्याभिषेक करून वनात निघून जावे हाच क्षत्रिय धर्म आहे.  ज्येष्ठ पुत्र जर क्षत्रिय धर्मानुसार वागत नसेल तरच कनिष्ठ पुत्राचा सिंहासनासाठी विचार केला पाहिजे. श्रीरामाने असला कुठलाही अपराध केला नाही, सदैव क्षत्रिय धर्माचे पालन केले.  केवळ कनिष्ठ पत्नी कैकयी मध्ये आसक्त होऊन, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ पुत्र श्रीरामांना वनात धाडणे म्हणजे अधर्मच. क्षत्रिय धर्म म्हणतो, अधर्माने वागणाऱ्या म्हातार्या बापाला कारावासात बंदिस्त करणे किंवा त्याचा वध करण्यात काहीच गैर  नाही. श्रीरामांनी क्षत्रियधर्म काय सांगतो, याचा यत्किंचित हि विचार केला नाही. सहर्ष  वनवास स्वीकारला.   

आज पुन्हा अवधचा राजकुमार धर्मसंकटात पडलेला आहे. म्हातारा झालेला बाप आणि वडीलधारी मंडळी ज्येष्ठ पुत्राला त्याच्या इच्छेनुसार राज्य करू देत नाही आहे. राजाच्या राजकारभारात ढळवा-ढळवी करणे, क्षत्रिय धर्मानुसार अधर्मच. प्रश्न एकच आजचा राजकुमार श्रीरामांप्रमाणे वडीलधार्यांच्या आदेशाचे पालन करेल कि अन्यायाविरुद्ध विद्रोह करेल. 

त्रेता युगानंतर, द्वापर युग झाले. द्वापरयुगात कृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश करताना म्हंटले, क्षत्रिय धर्म रक्षणासाठी, अधर्मी स्वकीयांचा वध करणे म्हजे धर्म. श्रीकृष्णाचा उपदेशाला अनुसरून अर्जुनाने तीक्ष्ण बाणांनी स्वकीयांचा वध केला. क्षत्रियधर्माचे रक्षण केले अर्थात राजपद प्राप्त केले. 

आज अवधकुमारच्या एका हातात रामायण आहे आणि दुसर्या हातात महाभारत. एक मार्ग गादीपासून दूर करणारा, काही वर्षांसाठी वनवासात जाण्याचा आणि  दुसरा मार्ग  राजपद प्राप्ती साठी रस्त्यात येणाऱ्या समस्त कंटकांना दूर करण्याचा, त्यात स्वकीय हि आलेच. 

अवधकुमार पुढे काय करणार यावर सर्वांची नजरे आहेत. रामायणाचा आदर्श कि महाभारतातल्या अर्जुनाचा आदर्श. वडीलधार्यांची आज्ञा पालन करणे अथवा क्षत्रिय धर्माचे पालन.   किंवा ते असे काहीतरी करतील ज्याने कवींना कलयुगात नवीन ग्रंथाची रचना करण्याची प्रेरणा मिळेल. 

Thursday, October 20, 2016

हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)



भटुरे नाव ऐकल्यावर  मैद्याचे  छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी  मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात.  या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे  हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात.  (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते). मैद्याच्या भटुरर्या सारखे हे भटुरे पण फुलतात. आपल्या मराठमोळ्या पोळी एवढे मोठे पण दुप्पट जाड नक्कीच असतात. आपण आपल्या पद्धतीने भटुर्यांचा आकार निश्चित करू शकतो. चित्रावरून भटुरे कसे बनतात याचा अंदाज घेता येईल. 



साहित्य: एक पेला कणिक, अर्धी वाटी उडीत डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, आले १/२ इंच, लसूण १०-१२ पाकळ्या, मिरची २-३, अर्धा चमचा काळी मिरी, १/२ चमचा जीरा पावडर. स्वादासाठी *कोथिंबीर आणि मीठ. गोडे तेल आवश्यकतानुसार. हिमाचल मध्ये सरसोंचेच तेल वापरतात (*या भागात भाबरी नावाची झुडूपा सारखी वनस्पती असते. भाबरीला कढीपत्या सारखे छोटी-छोटी पाने असतात. भाबरीच्या पानांना एक प्रकारचा सुगंध असतो. भाबरीचा प्रयोग चटणी सारखा किंवा पकौडे इत्यादींचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. भाबरीच्या काळ्या रंगांच्या बियांचा हि वापर स्वादासाठी केला जातो. गावात खालेल्या भटूर्यात भाबरीच्या पानांचा आणि बियांचा वापर केला  होता. शहरात भाबरी बाजारात मिळणार नाही.  त्या जागी कोथिंबीर वापरता येईल). 

कृती:   उडीत डाळ आणि  चणा डाळ, रात्रीच भिजवून ठेवायची.  सकाळी कणिकत खमीर मिसळून कणकीला भरपूर मळावे किमान दहा एक मिनिटे. नंतर मळलेल्या कणकीला खमीर उठण्यासाठी एक ते दीड तास झाकून ठेवा.  


सारण बनविण्यासाठी मिक्सरमध्ये, रात्र भर  भिजलेली  उडीत डाळ, चणा डाळ आले, लसूण, मिरची, काळी मिरी, जीरा पावडर टाकून जाडसर पिसून घ्या. स्वादानुसार मीठ. (पाटा-वरवांट्यावर जाडसर पिसल्या जाते). खाताना आल आणि लसणाच्या तुकड्यांचा स्वाद जिभेला आला होता. 

कढईत तेल गरम झाल्यावर. कणकीच्या गोळ्यांची पारी करून त्यात सारण टाकून हाताने, किंवा पोळी सारखे लाटून भटुरा तैयार करून, मध्यम आचेवर तेलात तळून घ्या. ज्यांना तळलेले चालत नाही. एका तव्यावर थोडे तेल लाऊन मध्यम आचेवर वर भटूरे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. हे भटुरे छोल्या सोबत खायला चांगले लागतात.  (हे भटुरे डाळींएवजी पनीर इत्यादी टाकून हि आपण करू शकतो. सारणात काय टाकायचे हे सर्वस्व आपल्यावर आहे.  कृतीत परंपरागत पद्धत दिली आहे).

(भाबरी)

हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल



सक्रेणादेवीचा फोटो 


Monday, October 17, 2016

चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट


एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते?  हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या  बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली. 

आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. चिवताई ये दाणा खा, म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.   

आजीने डोळे उघडले. ACवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली. 

एक होती चिव, एक होता काऊ.  चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते).  एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट .... 

Thursday, October 6, 2016

डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण




नुकताच गेलेल्या  पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव.  नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा  मरगळलेला होता.  मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे  नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या  मुलाची तंगडी तोडणार आहे.  मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग.  चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे. 

आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला. 


टीप: ब्राम्हण  ???