Friday, June 22, 2018

लघु कथा - पिंपळ आणि आत्महत्या करणारा


तो पुन्हा बारावीत नापास झाला. जो मुलगा बारावी पास करू शकत नाही तो आयुष्यात काय करणार? फुकटचे किती दिवस खाऊ घालायचे तुला? तू जगला काय, नि मेला काय, आम्हाला सारखेच. वडिलांचे कटु बोल राहून-राहून त्याला टोचत होते. त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. आपण एक साधी परीक्षा ही पास करू शकत नाही. व्यर्थ आहे आपले जगणे. आपण मेलो तर निदान घरात एक खाणार कमी होईल. त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला.  


गावा जवळच्या डोंगराच्या कड्यावरून कधी-काळी कैद्यांना कडेलोट केले जात होते. त्या डोंगराच्या कड्यावर पोहचल्यावर, इथून उडी मारली तर नक्की मारणार ना, याची खात्री करण्यासाठी त्याने कड्या खाली डोकावून पाहिले. पण हे काय, कड्याच्या थोड्या खाली दोन दगडांच्या भेगेतून एक पिंपळाचे झाड डोकावत होते. झाडाच्या मुळांनी दूर पर्यन्त दगडांना जखडून ठेवले होते. पिंपळाचे ते झाड गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला झुगारून मस्त वार्‍या सवे डोलत होते. च्यायला, इथून उडी मारली तर आपण कदाचित पिंपळाच्या झाडाच्या फांदीत अटकू. पण त्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, इथे न माती, न पाणी,  फक्त दगडाची एक भेग, तरीही हे झाड जिवंत आहे. झाडाला आधारासाठी मातीच्या जागी दगड मिळाले तरीही पिंपळाने तक्रार केली नाही आणि जगण्याची आशा ही सोडली नाही. दगडातच त्याने जगण्याचा मार्ग शोधला. आपल्या डोक्यावर छत आहे, घरात खायलाही मिळते. फक्त परीक्षेत नापास झालो म्हणून आत्महत्या? आपल्यालाही पिंपळाप्रमाणे जगण्याचा काही ना काही मार्ग निश्चित सापडेल. त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि तो घरी परतला. नव्या जोमाने  आयुष्याची सुरुवात करण्यासाठी.   


Thursday, June 21, 2018

लघु कविता - सत्य





वाफेला मातीचा स्पर्श
बरसला मेघ
दरवळला सुगंध .

माती आणि वाफ
पाण्याचे सत्य
गगनातील सूर्य.


सूर्यच प्रजापती आहे. सूर्यच एकमात्र ऋषी आहे. जगाचा नियंता आहे. माझ्या माझ्या अंतकरणात तोच आहे. (ईशान उपनिषद). सूर्य आहे म्हणून पाणी आहे. मातीला जगण्याचा सुगंध आहे. पळू नका आनंद घ्या जगण्याचा.
 

Wednesday, June 20, 2018

दोन क्षणिका - अजन्मा कवी व फुलपाखरू



अव्यक्त भावना कवीच्या
रेशमी कोशातच दडल्या.

प्रसवली नाही कविता 
कवी राहिला अजन्मा.


कोशात शोधले सुख 
तडफडत गेला जीव. 

फुलपाखरू उडाले गगनी
 कोश मायेचे फोडुनी.
 
 


Tuesday, June 19, 2018

दोन क्षणिका - दुधी आणि आई



दुधी 

कर्दनकाळ बीपीची 
भाजी बाजाराची राणी 
आहे आज दुधी. 

(पूर्वी दुधी भोपळ्याला बाजारात काहीच किमंत नव्हती, पण दुधीचचे औषधी महत्वामुळे आज भाव खाली पडत नाही)



आई

पोराच्या प्रेतावर हि
खात होती लोणी
आजची आई.

(पोराने आत्महत्या केली, २० लाखासाठी दुष्प्रचार करत होती एक भारतीय आई, काय म्हणावे)


Wednesday, June 13, 2018

पहिला पाऊस आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक



सन २०१८,  काल संध्याकाळी जोराच्या आंधी सोबत पाऊस हि आला. चक्क १० मिनिटे जोरदार पाऊस पडला.(दिल्लीत एवढा वेळ पाऊस क्वचितच पडतो). या वर्षीचा पहिला पाऊस, पण वातावरणात मातीचा सुगंध दरवळला नाही. दूध आणण्यासाठी घरा बाहेर पडलो. उन्हाळ्यात तापलेल्या सिमेंट कांक्रीटच्या रस्त्यावर पहिला पाऊस पडताच गरमागरम वाफा निघत होत्या व त्यासोबत घरा-घरात लागलेल्या ACतून बाहेर पडणारे उष्ण वारे हि. शरीर चांगलेच भाजून निघाले. सूर्यास्त होताच रस्त्यावरचे वीजेचे दिवे हि लागले. रात्रीचे जेवण झाल्यावर गच्चीवर शतपावली करता-करता मनात विचार आला. कित्येक वर्षांपासून रातकिड्यांची किरकिर ऐकू येत नाही. आज पहिला पाऊस पडला, पण  दिव्या भोवती फेर धरून नाचणारे पावसाळी किडे दिसत नाही. बेडूक अदृश्य होऊन कैक वर्षे झाली.  जुन्या आठवणी ताज्या झाल्या. 

१९८९ मध्यें बिंदापूर इथे स्थायी झालो. त्यावेळी गल्लीत फक्त तीन चार घरे होती.  गल्लीही विटांची होती. पाणी रोजच तीन ते चार तास मिळायचे. त्यावेळी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो.  तिथल्या स्टोर मध्ये  बियाणे खत सर्वच मिळायचे. माझ्या एका मित्राने आंगणातील २०x१० जी जागा शेती/ बागवानी साठी तैयार करून दिली. पुढे पाच ते सहा वर्ष पालक, सरसो, ग्वार, फूलगोबी, तोरी, भेंडी एवढेच काय शेंगदाणे आणि बटाटे हि घेऊन बघितले. या शिवाय गच्ची वर ठेवलेल्या गमल्यांत वांगे व टमाटर सात आठ महिने तरी राहायचेच. 

त्या काळी रात्र झाली कि रात किड्यांचे आवाज ऐकू यायचे. आपण झारी ने किती हि पाणी पौध्यांना देत असलो तरी पहिल्या पाऊसाचे काही थेंब पडताच मातीचा जो सुगंध दरवळतो त्याचे वर्णन करणे अशक्यच. पहिला पाऊस पडताच, न जाने कुठून बेडूक हि मातीतून बाहेर येऊन डरांऊ-डरांऊ बेडूक गान सुरु करायचे. दरवर्षी दोन तीन बेडूक कुणालाही न जुमानता बैठकीच्या खोलीत तळ ठोकून बसायचे. रात्री पळविले तरी सकाळी उठल्यावर महाराज खोलीतच विराजमान दिसायचे. माझ्या दोन्ही पोरांसाठी पुढील तीन महिने ह्या बेडकांचे मागे पळणे हाच मुख्य खेळ होता. सेप्टेंबर महिना संपण्याच्या पूर्वी जसे आलें होते तसे बेडूक गायब व्हायचे. 

पहिला पाऊस पडताच संध्याकाळी दिवे लागल्यावर शेकडोंच्या संख्येने पावसाळी किड्यांचे आंगणातल्या दिव्या भोवती फेर धरून मृत्यूनृत्य सुरु व्हायचे. त्यांची शिकार करायला जाड-जूड पाली हि टपलेल्या. मला नेहमीच स्त्री वर्गाची भीती वाटते पालींचीही वाटते.  कधी-कधी या पाली घरात यायच्या. मग आमची सौ. झाशीच्याराणी सारखी त्वेषाने त्या पालींना घरा बाहेर हाकलायची आणि मी एका कोपर्यात पालीन्पासून दूर लपून बसायचो. 

काळ बदलला. विकासाचें वारे वाहू लागलें. गल्लीतील घरे ३ माल्याचें झाली. गल्ली हि सिमेंट कांक्रीटची झाली. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टेंकर सुरु झाले तिथे बागवानी साठी पाणी कुठून येणार. घरा समोरचे वरांडे अदृश्य झाले. प्रत्येक प्लॉट वर १०० टक्के निर्माण. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कार आणि AC घरात आले. अदृश्य झाले ते रात किडे, पावसाळी किडे आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक. 

कधी-कधी मनात विचार येतो, बिंदापूर येथून फुल पाखरू, चिमण्या, मोर, रात किडे, बेडूक सर्वच अदृश्य झाले. असेच चालत राहिले तर एक दिवस मनुष्य हि ......


Saturday, June 9, 2018

पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा.



आज सकाळी आकाशात ढग जमलेले बघितले, बहुतेक लवकरच पाऊस येईल असे वाटते. बाकी दिल्लीत कितीही घनघोर घटा, काळेकुट्ट ढग आकाशात जमले तरी पाऊस पडेलच याची काहीच शाश्वती नाही. अधिकांश वेळी नेत्यांच्या आश्वासनाप्रमाणे जोरजोरात गर्जना करीत हे ढग न बरसतता पुढे निघून जातात. कधी-कधी विचार येतोया मेघांना बरसण्यासाठी बक्षिसी तर पाहिजे नाही ना?


सहज बालपणीच्या पावसाळी कवितेची आठवण आली "येरे येरे पावसा. तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा". त्या वेळी हि मनात विचार येत असे, पाऊस आल्याने पैसा कसा खोटा होतो. अनेक वेळा गच्चीवर पावसाच्या पाण्यात भिजताना ५-१० पैश्याचे नाणे बरसणाऱ्या पावसाच्या धारे खाली हि ठेऊन बघितले. पण पैसा काही खोटा झाला नाही. मग या म्हणी मागचे रहस्य काय? या प्रश्नाचे उत्तर त्या वेळी तरी सापडले नाही. 


दीडएक वर्षांपूर्वी नोट बंदी झाली. लोकांनी ५००-१००० च्या गड्या कचर्या ढिगार्यात फेकलेल्या बघितल्या. डोक्यात उजेड पडला.  नोट बंदी म्हणजे मोठा पाऊस आणि  हाच तो पैसा जो खोटा झाला होता. आता या खोट्या झालेल्या पैश्याचे काय बरे करायचे. हा पैसा खरा करण्यासाठी काहींनी सरकारला भारी भरकम कर दिला तर काहींनी खोटा पैसा खरा करण्यासाठी त्यांच्या गरीब नातलगांच्या आणि मित्रांच्या बँक खात्यांचा वापर भाडे  तत्वावर केला. काहींनी हे खोटे नोट बदलण्यासाठी ३०-३० टक्के कमिशन गरिब खातेधारकांना दिले. स्वत:चाच पैसा बदलण्यासाठी दुसर्यांना कमिशन का बरेदुसर्यांचे काम करण्याचे बक्षीस म्हणून मिळालेला पैसा खोटा झालेला होता तो खरा करण्यासाठी हि बक्षिसी. 'यालाच म्हणतात रिश्वत घेताना पकडलेला व्यक्ती रिश्वत देऊन सुटला'. एकदा ग्रहदशा बिघडली कि असा पैसा ठेवणार्यांना जेलमध्ये हि जावे लागते आणि तो पैसा सरकार हि जब्त करते.  त्यांच्या दृष्टीने असा पैसा खोटा झालेला असतो. 

आता या म्हणीचा अर्थ स्पष्ट झाला. मेघ बरसणे म्हणजे कार्य पूर्ण होणे. या कार्यासाठी घेतलेला पैसा मोठा पाऊस आल्यावर खोटा होणारच. 

पुन्हा मनात एक प्रश्न आला,आता दिल्लीच्या आकाशात जमलेले ढग बरसण्यासाठी किती बक्षिसी घेणार आणि आपण ती बक्षिसी  या ढगांना आपण कशी काय देणार? .....

Friday, June 8, 2018

ग्राहक हित -मध आणि मधाचे जमणे



"रुक्षा वम्यतिसारघ्नि च्छेदनी *मधुशर्करा । 
तृष्णासृक् पित्तदाहेषु प्रशस्ता: सर्वशर्करा: ।। "
(27 अध्याय “अन्नपानविधी (श्लोक 242 )

चरक संहितेत म्हंटले आहे मधापासून निर्मित साखर उल्टी आणि अतिसार  थांबवणारी, कफ रोग दूर करणारी आणि रक्त पित्त आणि दाह शमन करणारी आहे.  

*मधु शर्करा म्हणजे जमलेले मध.

आपल्या देशात स्थानीय विक्रेता सुरुवातीपासून नकली मध ग्राहकांना विकत आलेले आहे. स्वाभाविकच आहे त्यामुळे
ग्राहक शुद्ध मधाला मिलावटी मध समजू लागले आहे. नुकतीच घटना घ्या १०च्या  शिक्या बाबत  आवई उठविल्या गेल्या. लोकांनी खरे सिक्के घेणे बंद केले. आपण अफवाह वर विश्वास ठेवणारे ग्राहक. देशातील सर्व ब्रांडेड कंपन्यांचे मध हे शुद्धच असते. वेल्यू एडिशन साठी काही मिसळले असेल तर ते बाटलीवर लिहिलेले असेल. कधी काही मानवीय लापरवाही चूक झाली तर त्या निर्मात्याला भुर्दंड हि भोगावा लागतो. बाजारातून वस्तू परत हि मागवावी लागते. प्रत्येक निर्माताचा उत्पादन खर्च व नफा घेण्याचे प्रमाण, पकेजिंग (प्लास्टिक किंवा काचेची बाटली) वेग-वेगळे असते. त्या मुळे २५० ग्राम मधाची किंमत ७० ते १५० रुपये राहू शकते.  वेल्यू एडिशन केलेले मध आणखीन महाग राहू शकते.

गेल्यावर्षी पासून प्रचार माध्यमात एका स्वदेशी कंपनीचे जमलेले मध दाखवून ते नकली आहे हा दुष्प्रचार जोरदार सुरु आहे. अनेक शिकलेल्या लोकांना हि जमणारे मध म्हणजे नकली असे वाटू लागले आहे.
 
त्या स्वदेशी कंपनीचा उत्पादन खर्च अन्य कंपन्यांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या स्वस्तात मध विकण्याचा उद्देश्य जास्तीसजास्त लोकांनी मधाचा उपयोग करावा. पण अचानक युट्युब वर त्या कंपनीच्या मधाच्या बाटलीत जमलेले मध दाखवून ते नकली आहे असे विडीयो मोठ्या प्रमाणात येऊ लागले. या मागे कुणाचे षडयंत्र आहे, हा वेगळा विषय आहे. पण आपल्यातील अधिकांश ग्राहक हि अफवाह वर विश्वास ठेवणारे. शुद्ध मध त्यांना मिलावटी वाटू लागणे स्वाभाविक आहे. यामुळे सर्वच निर्मात्यांच्या ब्रांडेड मधाला ग्राहक अविश्वासाने पाहू लागले.
  
मध जमण्याचे मुख्य कारण आहे, मधामध्ये असलेली ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर. मधमाश्यांनी ज्या फुलांपासून मध निर्मिती केली आहे त्यांत ग्लुकोज जास्त असेल तर ते मध जमणारच. आपल्या देशात अधिकांश मध तेलबियांच्या फुलांपासून निर्मित होते. ह्या मधामध्ये गुल्कोज जास्त असल्यामुळे हे मध जमणारच. शिवाय मोठे कृषी फार्म नसल्याने विभिन्न फुलांचा रस प्रत्येक मधात असतोच. 

मधात एन्टी ओक्सिडेंट, एन्जाइम ,विटामिन ,एन्टी एजिंग गुणधर्म इत्यादी गुणकारी पदार्थ असतात. जे शरीराला रोगांपासून वाचविण्याचे कार्य करतात. मध जमू नये म्हणून काही कंपन्या मधला प्रोस्सेस करताना ४५ सेल्सिअस वर मध गरम करून थंड करतात (pasteurization). ४५ सेल्सिअस वर मध गरम केल्यावर त्यातली सर्व औषधी  तत्व हि नष्ट होतात आणि मधाचा जमण्याचा गुण हि नष्ट होतो.  म्हणून उन्हाळ्यात मधाला गरम जागी ठेऊ नये. बाकी ह्या न जमणार्या मधात आणि साखरीच्या  शरबतात काहीच फरक नाही.

मधाचे जमणे हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. जमलेल्या अवस्थेत मधाचे सर्व औषधीय गुण सुरक्षित राहतात. जमलेल्या मधाला पोळी सोबत किंवा ब्रेड मध्ये जाम सारखे लाऊन खा आणि स्वस्थ रहा. 

  

Tuesday, June 5, 2018

उन्हाळा-रस्त्याच्या बाजूला ठेवलेले पाण्याचे माठ व चिवताई


तीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट. दुपारची वेळ होती, एका मित्रासोबत दक्षिण दिल्लीच्या एका वसाहत नसलेल्या सुनसान रस्त्यावर स्कूटरवर बसून जात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे होती. ऐन उन्हाळ्यात हि दुरून येणारा कोकिळेचा मंजुळ आवाज व चिमण्यांची चिवचिव सूर्याचे ताप सहन करण्यास मदत करीत होती. अचानक स्कूटर घरघर करत थांबली.  ठीक करायला पंधरा एक मिनिटे लागली असतील. घामाने शरीर चिंब झाले होते आणि तहान हि लागली होती. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला  एका जागी रेतीत गाडून ठेवलेले ५-६ पाण्याचे माठ दिसले. दिल्लीत त्याकाळी सुनसान रस्त्यांवरहि कोस-दोन कोस अंतरावर  परोपकारी लोक  पाण्याने भरलेले माठ रेतीत गाडून ठेवायचे. एक तर त्यामुळे माठातले पाणी थंड राहायचे, माठ तुटण्याची भीती नाही आणि चोराला हि सहजपणे माठ चोरणे शक्य नव्हते. एक अलुमिनियमचा जग हि ठेवलेला होता. स्कूटर थांबवून अलुमिनियमच्या जगाने एका माठातले पाणी काढले आणि थोडे दूर उभे राहून ओंजळीने पाणी पिऊन तहान भागवली. थोडे पाण्याचे शिंतोडे तोंडावर हि मारले. ओंजळीने पाणी पिताना काही पाणी जमिनीवर सांडलेच. येणाऱ्या-जाणार्यांच्या पाणी पिण्याने त्या ठिकाणी एक छोटासा गड्डा झालेला होता. आम्ही तिथून थोडे दूर होताच. दहा-बारा चिवताई, काही साळुंक्या आणि एक खारूताई आपल्या पिल्ला सोबत तिथे पोहचली. स्कूटर जवळ उभा राहून मी हे दृश्य पाहत होतो. एक तर इवलासा गड्डा व थोडेसे  पाणी. त्या पाण्याने खरोखरच त्यांनीच तहान भागली का? हा प्रश्न मनात आला. मित्राने स्कूटर स्टार्ट केली. मी त्याला म्हंटले, दोन मिनिटे थांबतो का? मी त्या गड्ड्या जवळ गेलो. आपल्या हाताने तो थोडा मोठा केला.  माठातले एक जग पाणी त्या गड्ड्यात टाकले. पुन्हा स्कूटर जवळ पोहचलो. या वेळी खारूताई पुन्हा आपल्या पिल्लासोबत तिथे आली आणि पाणी पिऊ लागली. काही चिमण्याही तिथे पोहचल्या. स्कूटर स्टार्ट करत मित्र म्हणाला, विवेक इथे दर काही मिनिटांनी कुणी न कुणी पाणी पिणारच. पक्ष्यांनाही पाणी मिळेल. उगाच हात खराब केले. मी फक्त हसलो.  

गेल्या रविवारी पुन्हा त्याच रस्त्यावरून पुन्हा जाण्याचा योग आला. रस्त्यावर भरपूर गाड्या धावत होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तशीच पूर्वी सारखी झाडे होती. कारच्या खिडकीतून बाहेर बघत होतो. कित्येक कोस  निघून गेले, पण या वेळी रस्त्याच्या काठावर  कुठेच पिण्याच्या पाण्याचे माठ भरून ठेवलेले दिसले नाही. 

माणसाने उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी बोतलबंद पाण्याची सोय केली आहे. पायी चालणारा हि पाणी सोबत घेऊन घरून निघतो. आता कुणीही  स्कूटर व कार थांबवून माठातले पाणी पिणार नाही. माणसाला आता माठांची गरज नाही म्हणून माठ ठेवणे हि बंद झाले. माणसांची सोय झाली. पण चिवताई, खारूताईचे काय होणार. न जाणे काय वाटले, ड्राईवरला गाडी थांबविण्याचा इशारा केला. गाडीतून बाहेर आलो. कोकिळेचा मंजूळ आवाज आणि चिमण्याची चिव-चिव ऐकण्यासाठी कान टवकारले. पण ऐकू येत होता फक्त  रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांचा आवाज.....

Sunday, June 3, 2018

अंधविश्वास .- डॉ. दाभोलकर -स्वामी रामदेव



काल फेसबुक वर एक पोस्ट वाचली त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि हमीद दलवई यांना अंधविश्वास दूर करण्यासाठी भारत रत्न दिले पाहिजे. वाचून मला पोस्ट लिहिणार्याची कीव आली. ज्या लोकांनी अंधविश्वास विरुद्ध मोहिमेला भारी नुकसान पोहचविण्याचे कार्य मात्र जोमाने केले त्यांना पुरस्कार. विचित्रच आहे. आता तुम्ही मला विचाराल पटाईत तुमच्या विधानामागचे कारण काय. कुठलीही मोहीम हाती घ्या, दोन पक्ष असतात एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. उदाहरण  नकारात्मक पक्ष - दारू बंदी केली कि लोक पिणे सोडून देतील का? उत्तर नाही. सकारात्मक पक्ष - लोकांनी दारू पिणे स्वत: सोडले  तर दारूची दुकाने आपसूक बंद होतील. लोकांनी दारू स्वत: पिणे सोडणे त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सकारात्मक पक्ष.

डॉ. दाभोलकर अणि अनिस यांचा दृष्टिकोण सुरुवातीपासून नकारात्मक होता. एक तर अन्धविश्वास आणि जन्म ते मृत्यू पर्यंतचे धार्मिक संस्कार यांच्यातला फर्क त्याना माहित नसावा की जाणूनबुजून दोन्हींना अंधविश्वासाच्या श्रेणीत टाकले. धार्मिक आणि सामाजिक संस्कार कुठल्याही धर्माचे असो, तिथे एकच समस्या असते, ऐपतीपेक्षा जास्त खर्च करणे. त्या मुळे लोक कर्जबाजारी होतात.  धार्मिक परंपरांचा विरोध करणे म्हणजे समस्त धार्मिक लोकांना विरोधी बनविणे. त्यात त्यांनी अधिकांशत: हिंदू धर्मातील धार्मिक परंपरांचा विरोध केला त्या मागचे कारण न जाणता. उदा. सत्यनारायण कथा. हि कथा नवीन संसार सुरु करणार्यांना सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. राजासाठी - समाजातील वनात राहणार्या वनवासी बंधुसोबत हि समानतेचा व्यवहार करावा हे शिकवते. पण दाभोळकर सारख्यांना हे दिसत नाही. सत्यनारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा (https://vivekpatait.blogspot.com/2016/04/blog-post_2.html)

त्यांचे दुसरे कार्य -चमत्कार करणार्या बाबांविरोधी मोहीम. या मोहिमेची काय फलश्रुती होते? एक बाबा आत गेला कि दुसरा त्याची जागा घेईलच. देशात बेरोजगारी भरपूर आहे आणि सर्वांना बिना मेहनतीचा पैसा पाहिजे. त्यामुळे काही लोकांना आतमध्ये टाकून काही जास्त फायदा होणार नाही. मुख्य समस्या- लोक या बाबांकडे का जातात हि आहे? त्या बाबत दाभोळकर आणि अनिसचे कार्य शून्य आहे. मजेदार बाब सर्वात जास्त चमत्कार जिथे  दाखविले जातात. त्या जागांविषयी  दाभोलकरांनी व अनिस यांनी तक्रारी दाखील केल्या असतील असे तरी मला वाटत नाही.  तिथे तर आत्म्याने चमत्कार केले म्हणून संत पद मिळते. 

डॉ. दाभोळकर आणि अनिसचे ९०टक्के कार्य हिंदू धर्मातील परंपरांचा विरोधातच आहे. कुठलीही संस्था जर आत्मनिर्भर नसेल पैसे देणार्याचा तालावर नाचणे हि मजबुरी असतेच. त्या मुळे त्यांनी आपली छवि हिंदू विरोधी करून घेतली. या मुळे त्यांच्या प्रचाराचा लोकांवर प्रभाव पडत नाही. पण विरोधी मात्र भरपूर तैयार होतात. 
 
दुसरी कडे स्वामी रामदेव. स्वामी दयानंदच्या परंपरेतील. आर्य समाज सुरवातीपासून अंधविश्वास विरोधी आहे. त्यांना अंधविश्वासाचे मूळ कारण  हि माहित आहे. अशिक्षा, गरिबी आणि पुरुषार्थ न करण्याची इच्छा. शिक्षणाचा प्रसार अंधविश्वास दूर करू शकतो. देशात मोठ्या प्रमाणात DAV शाळा उघडल्या गेल्या. आज हि अनेक आर्यसमाजाचे संन्यासी गावो-गावी फिरून सामाजिक जागृती करून अंधविश्वास दूर करण्याचा प्रयत्न करतात.  कुठलीही अपेक्षा व स्वत:चा प्रचार न करता. आर्यसमाज मंदिरात सर्व धार्मिक संस्कार अत्यंत स्वस्तात  होतात.  

स्वामी रामदेव यांना अंधविश्वास मागचे मुख्य कारण माहित आहे. ते कुणा बाबा विरुद्ध बोलत नाही. पण सरळ सौप्या शब्दांत अंधविश्वासाविरुध्द लोकांना आपले विचार सांगतात. उदा:  एवढा मोठा शनिग्रह तुमच्या डोक्यावर बसला तर काय होईल? उत्तर जनताच देते. लोकांना त्यांची  सौपी भाषा समजते. आपल्या भाषणात नेहमीच ते सफलतेचा छोटा मार्ग सोडून जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा आणि कठोर पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देतात. आजगायत कोट्यावधी लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून तंबाकू, गुटका, दारू सोडली आहे. जिथे अनिसचा प्रभाव देशातील १ कोटी लोकांपर्यंत हि पोहचला नसेल तिथे स्वामी रामदेव वर्षातून 3०० दिवस तरी अंधविश्वासाविरुद्ध प्रचार करतात.  त्यांच्या प्रत्येक शिविरात कमीत-कमी वीस एक हजार लोक तर असतातच यास शिवाय टीवी वर कितीतरी कोटी.  ज्या भागात शिविर असतो, त्याच भागात महिलांसाठी आणि विध्यार्थांसाठी ते वेगळे शिविर हि घेतात. त्यात अंधविश्वास हा प्रमुख विषय असतोच.  या साठी ते सकाळी चार वाजतापासून ते रात्री १० तर कधी १२ वाजेपर्यंत कार्य करतात. एका वर्षांत किती तरी लाख किमी ते प्रवास करतात. आस्था वाहिनीच्या माध्यमाने देश नव्हे तर विदेशात हि रोज कोट्यावधी लोकांपर्यंत आपले विचार पोहचवितात. (रोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आस्था वाहिनी वर जाऊन आपण शहानिशा करू शकतात). सफलतेसाठी कठोर परिश्रम करणारा कधीच अंधविश्वासाच्या आहारी जाणार नाही

जिथे गरिबी तिथे अंधविश्वास आणि चमत्कार हे असतातच. ग्रामीण भागात अंधविश्वास जास्त कारण तिथे संपन्नता नाही.  ग्रामीण भागात संपन्नता कशी येईल या बाबत  डॉ.दाभोलकरांनी आणि अनिस ने काहीच केलेले नाही.  स्वामी रामदेव यांच्या  नेतृत्वाखाली पतंजलीने ग्रामीण भारतातील गरिबी कशी दूर होईल या बाबात कार्य सुरु केले आहे. पारंपारिक शेती व्यतिरिक्त शेतीचा नवीन मार्ग हि त्यांनी शेतकर्यांना दाखविले.  उदा. गेल्यावर्षी १ लाख टन आवळा आणि १ लाख टन अलोविरा त्यांनी विकत घेतला. दहावर्षांपूर्वी लोक आवळा आणि एलोविरा ज्यूस पिणार यावर कुणाचा विश्वास हि नव्हता. गौधनाचा सर्वोत्तम उपयोग, कमी खर्चात नैसर्गिक शेती यावर त्यांचे कार्य सुरु आहे. शेतकरी आत्मनिर्भर व शिक्षित झालातर अंधविश्वास आपसूक कमी होईल. हि अवधारणा.

स्वत: आत्मनिर्भर असल्यामुळे त्यांना दुसर्यांच्या तालावर नाचण्याची गरज नाही. सुरुवातीपासूनच  विदेशी FMGC कंपन्यांच्या इशार्यावर त्यांच्या विरुद्ध अनेक षडयंत्र रचल्या गेले आज हि रचले जातात.  तरीही ते सर्वांना पुरून उरले. कारण एकच  स्वामीजी आपले कार्य ते इमानदारीने करतात. 

सारांश   कुठल्याही धर्म आणि बाबांचा प्रत्यक्ष विरोध न करता सकारात्मक दृष्टीने अंधविश्वास नष्ट करण्याचे त्यांचे कार्य दाभोळकरांपेक्षा लाखपट जास्त आहे.  

आता प्रश्न आहे भारत रत्न द्यायचे झाले तर कुणाला द्यायचे.   स्वत:च ठरवा. 


Monday, May 28, 2018

शेतकरी आत्महत्येचे हे हि एक कारण


काल आमच्या घरी विदर्भातून पाहुणे आले होते. त्यांची विदर्भात ३० एक एकर शेती आहे.  सहज शेतीचा विषय निघाला. स्वत:च्या शेतीबाबत ते सांगू लागले. काही वर्षांपासून ते जैविक शेती करतात. शेतात विषाक्त खाद किंवा किटाणू नाशकांचा प्रयोग करत नाही. १०० टक्के नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक उत्पाद.  ते शेतीत नित नवीन प्रयोग हि करतात.  बोलताना  त्यांचा उत्साह जाणवत होता. एकदाही शेतमालाचे कमी भाव, कर्जमाफी, ईत्यादी शब्द त्यांच्या मुखातून ऐकले नाही. 

शेतकरी आत्महत्या हा विषय निघाला. आपल्या देशात शेतकरी हजारो वर्षांपासून शेती करत आहे. वरूण राजाने दगा दिला तर अनेक वर्ष दुष्काळ हि पडत होता. त्या वेळी आजच्या सारखे दळणवळणाचे साधन नव्हते. जनतेची चिंता करणारे शासक हि नव्हते.  मोठे राज्य असेल तर, आपल्या राज्यातील एका भागात दुष्काळ पडला आहे, हि बातमी राजा पर्यंत पोहचत हि नव्हती. पोहचली तरी फार उशीर झालेला रहायचा. त्या वेळी दुष्काळी भागात मदत पोहचविणे हि दुष्कर कार्य होते. अश्या बिकट परिस्थितीत गाई बैल तर सोडा बायका मुलांना हि विकायची पाळी हि बळीराजावर यायची. एक वेळच्या जेवणासाठी परदेसी गुलामगिरी हि सहन करावी लागायची. तरीही आत्महत्येचा विचार बळीराजाच्या मनातही यायचा नाही. एक मात्र खरं, त्या काळी  बळीराजा विषाक्त रसायनांचा उपयोग हि शेतीत करायचा नाही. 

आज म्हणाल तर कुठे दुष्काळ पडला तर त्याचा ढोल मिडीयात जोरात वाजतो. सरकारी मशिनरी किती हि भ्रष्ट असली किमान ९० टक्के लोकांपर्यंत अन्न-धान्याची मदत पोहचतेच. कर्ज माफी इत्यादी हि होत राहतात. तरीही आज बळीराजा आत्महत्या करतो. का? शेवटी आत्महत्येचा विचार त्याच्या मनात का येतो?  

गीतेत भगवंतानी म्हंटले आहे, कर्मांची फळे कुणालाच चुकत नाही. आज बळीराजा अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक उर्वरक आणि कीट नाशक टाकतो. ७० टक्के विषाक्त रसायने जमिनीच्या पाण्यात व व वातावरणात मिसळतात. हेच पाणी पशु, पक्षी, मनुष्यसहित  सर्व जीवित प्राणी पितात, विषाक्त हवेत स्वास घेतात, विषाक्त अन्न, भाजी-पाला खातात आणि विभिन्न रोगांनी ग्रस्त होऊन मरतात.   


नुकतीच एक बातमी वाचली नोएडातील अच्छेजा गावातील लोकांसोबत  कुणी हि रोटी बेटीचा व्यवहार  करत नाही.  कारण तिथेले अनेक रहिवासी कैन्सरग्रस्त होऊन मेले. कारण तिथले पाणी दूषित झालेले आहे. हीच परिस्थिती संपूर्ण पंजाब, हरियाणा व पश्चिमी उत्तर प्रदेशातल्या ग्रामीण भागात आहे. ह्या सर्वांचा दोषी कोण. बळीराजाच. मग कर्मांचे फळें त्याला हि भोगावे लागतात.  आपण बातम्या ऐकतोच, विषाक्त किट नाशक शेतात फवारताना तीच विषाक्त वायू बळीराजाचा हि प्राण घेते. निराशाच्या एका क्षणी तेच विषाक्त रसायन पिऊन बळीराजा स्वत:चा आणि परिवाराचा प्राण घेतो. जे विष शेतात पेरले, तेच विष त्याचे प्राण घेणारच. हेच प्राक्तन.