Sunday, March 29, 2015

रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष

     

(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल.  बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत.  त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. कथेतील मूळ सत्य लोकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न मी आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे- त्या साठी आपल्या कल्पनेचा ही वापर केला आहे).

तदागच्छ महातेज आश्रमं पुण्यकर्मणः ।
तारयैनां महाभागां अहल्यां देवरूपिणीम् ॥ ११ ॥

(महातेजस्वी श्रीरामा! आता तू पुण्यकर्मी महर्षि गौतमाच्या या आश्रमात चल आणि त्या देवरूपिणी महाभागा अहल्येचा उद्धार कर). 

 विश्वामित्रवचः श्रुत्वा राघवः सहलक्ष्मणः।
 विश्वामित्रं पुरस्कृत्य आश्रमं प्रविवेश ह॥ १२॥

(विश्वामित्रांचे हे वचन ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामांनी महर्षिंच्या मागोमाग त्या आश्रमात प्रवेश केला.) 

                                 दर्श च महाभागां तपसा द्योतितप्रभान् ।
                                लोकैरपि समागम्य दुर्निरीक्ष्यां सुरासुरैः ॥ १३ ॥

(तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले- महासौभाग्यशालिनी अहल्या आपल्या तपस्येने दैदीप्यभान होत आहे. या लोकातील मनुष्य तसेच संपूर्ण देवता आणि असुरही तेथे येऊन तिला पाहू शकत नव्हते). 

देवी अहल्येचे तेजस्वी स्वरूप पाहून श्रीरामाचे डोळे दिपून गेले. काल महर्षि विश्वामित्राने सांगितलेली देवी अहल्येची कथा डोळ्यांसमोर तरळली. श्रीरामाला आठवले, महर्षि विश्वामित्र म्हणाले होते, राम, उद्या आपण मिथिला राज्यात प्रवेश करू. त्या आधी उद्या पहाटे, माझा देवरूपिणी महातेजस्वी अहल्येच्या आश्रमात जाण्याचा विचार आहे. श्रीरामला आतापर्यंत हे चांगलेच कळले होते, महर्षि विश्वामित्रांच्या बोलण्यामागे काही हेतू निश्चित असतो. त्यांना काहीतरी कार्य साध्य करायचे असते. श्रीरामाने  विचारले महर्षि, देवी अहल्या कोण आहेत, आपण तिथे जाण्याचे प्रयोजन काय? महर्षि म्हणाले, राम, लक्ष्मण आज तुम्हाला महासाध्वी अहल्येची कथा सांगतो. महर्षि विश्वामित्र कथा सांगू लागले

अयोध्या आणि मिथिला दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्थित एका रान नदीच्या काठी, एका वृद्ध तपस्वीचे आश्रम होते. न्यायशास्त्राचे अध्ययन करून, गौतम ऋषी, गौतम ऋषी वृद्ध तपस्वीच्या आश्रमात न्यायशास्त्र  शिकवू लागले. त्या वृद्ध तपस्वीची एक कन्या होती. तिचे नाव अहल्या. प्राण सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या प्रिय पुत्री अहल्येचे लग्न गौतम सोबत लावले. आश्रमाच्या जवळच एका पर्णकुटीत दोघे पती-पत्नी गृहस्थ धर्माचे पालन करत आनंदाने आयुष्य जगू लागले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
     
सकाळची वेळ होती, नेहमीप्रमाणे गौतम ऋषी आश्रमात शिकवायला गेले होते. कुटीत एकटी अहल्या होती. अचानक तिला अश्वांच्या टापांचा आवाज ऐकू आला. अहल्या कुटी बाहेर आली. एक धिप्पाड पुरुष घोड्यावरून उतरला आणि त्याच्या सोबत अनेक हत्यारबंद सैनिक ही होते. तो पुरुष म्हणजे देवांचा राजा इंद्र. या इंद्राला, इंद्रपद स्वत:च्या कर्तृतावर नव्हे तर वंशपरंपरेने मिळाले होते. त्या काळी इंद्रपदाचे स्थान आजच्या युनायटेड नेशन्स सारखे होते. इंद्राचे स्थान आर्यावर्तातल्या राज्यांच्या वाद-विवादात एक मध्यस्था व्यतिरिक्त अधिक नव्हते. आर्यावर्तातले अधिकांश राजा-महाराजा प्रजेकडून वसूल केलेल्या करांच्या एक भाग इंद्राला देत असे. राज्य चालवण्याची कसली ही चिंता नसल्यामुळे इंद्र स्वर्गात, एशोआरमात, गंधर्व-अप्सरांच्या सोबत राहायचा. स्वर्गातले नियम कायदे वेगळे होते. एवढेच नव्हे, आर्यावर्तात ही इंद्र अदंडनीय होता अर्थात आर्यावर्तात केलेल्या अपराधासाठी इंद्राला दंड देण्याचा अधिकार कुणाला ही नव्हता.

इंद्र घोड्यावरून उतरला. गळ्यात फुलांची माळ आणि वल्कल वस्त्र परिधान केलेली साक्षात रतिपेक्षा सुंदर स्त्रीला पर्णकुटीतून बाहेर येताना पाहून इंद्राला खात्री पटली, हीच ती अहल्या आहे, जिच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तो आला होता. तिला पाहून इंद्राची कामवासना पेटली, त्याची कामुक नजर तिच्या अंग प्रत्यांगावर फिरू लागली. एक पुरुष आपल्याकडे कामुक नजरेने पाहत आहे, हे पाहून अहल्या मनात चाचपली, तरी ही सर्व धैर्य एकत्र करून म्हणाली, अतिथी आपण कोण आहात, कोणाला भेटायला आले आहात. माझे पती गौतम सध्या घरी नाही. ते आश्रमशाळेत  शिकवायला गेले आहेत. मी त्यांना बोलवते.  इंद्र जोरात हसत म्हणाला,  हे सुंदरी, मी तुझ्यासाठी इथे आलो आहेत. तुझे विलोभनीय सौंदर्य अरण्यात नष्ट होण्यासाठी नाही आहे, तुझी जागा स्वर्गात आहे. स्वर्ण अलंकारांनी नटलेले तुझे सौंदर्य पाहून स्वर्गातील देवता थक्क होतील. हे सुंदरी, मला प्रसन्न कर. मी तुला आपल्या सोबत स्वर्गात घेऊन जाईल. अप्सरांमध्ये तुला  सर्वोच्च स्थान मिळेल. इंद्राचे असे असभ्य बोलणे ऐकून, अहल्या रागाने आणि त्वेषाने ओरडली, कामांध, नराधम, माझ्या पतीला कळले तर... 

अद्याप त्याला कळले ही असेल, पण तो काही ही करू शकणार नाही, इंद्राला जी वस्तू आवडते, तिचा उपभोग घेतल्या खेरीज तो राहत नाही, मुकाट्याने माझ्याशी समागम करून मला प्रसन्न कर, अन्यथा बळजबरी करावी लागेल, असे म्हणत इंद्राने तिचा हात पकडला आणि फरफटत तिला कुटीत नेले.

अश्वांच्या टापांच्या आवाज आश्रमात ही ऐकू आला होता. आपल्या कुटी बाहेर काही शस्त्रधारी व्यक्ती आहे, हे गौतम ऋषींना कळले, त्यांच्या मनात पाल चुकचुकली, काही ब्रह्मचार्यांना सोबत घेऊन गौतम ऋषी कुटी कडे निघाले, जवळ पोहचतच आपल्या प्रिय पत्नी अहल्येच्या किंकाळ्या ऐकू आल्या. काही लोकांना येताना पाहून अश्वरोही सैनिकानी आपले घोडे त्यांच्यावर सोडले. तरी ही गौतम कसे बसे कुटी जवळ पोहचले. सैनिकांनी त्यांना पकडले. गौतम म्हणाले, दुष्टानों, हे काय चालले आहे.   

तुझी भार्या, देवराज इंद्राला प्रसन्न करीत आहे, कुत्सित पणे असे म्हणत एका सैनिकाने त्याच्या डोक्यावर गदेने वार केला. गौतम ऋषी चक्कर येऊन खाली पडले. दुसर्या सैनिकाने त्यांचे हात मागून बांधले. थोड्यावेळाने गौतम ऋषी शुद्धीवर आले, पाहतो काय समोर इंद्र उभा होता. त्याच्या शरीरावर  नखाने ओरबाडण्याच्या आणि दाताने चावण्याच्या अनेक जखमा होत्या. काहीतून रक्त ही  वाहत होते. तरी ही गौतमकडे पाहत, राक्षसी हास्य करत इंद्र म्हणाला. गौतम तुझ्या भार्याने आज मला प्रसन्न केले आहे. एका वाघाला हरिणीचा शिकार करताना जो आनंद मिळतो, तसा आनंद तिने मला दिला आहे. काही थांबत, गौतमा, तुझ्या प्रिया भार्याने  परपुरुषाशीं समागम केला आहे. तू तर न्यायशास्त्राचा ज्ञाता.  तुला माहितच असेलच, न्यायानुसार, अश्या भ्रष्ट स्त्रियांच्या हातून अन्न जल घेणे तर दूर त्यांना स्पर्श करणे ही पाप आहे.  तुला तिचा त्याग करावा लागेल.  तरी ही मला तिची कीव येते. तिच्या सारख्या सौंदर्यवतीने पृथ्वीवर तिरस्कृत जगणे किंवा वारांगना सारखे जीवन व्यतीत करणे मला आवडणार नाही. तिला समजावून स्वर्गात पाठव, त्यातच तिचे हित आहे. आपल्या रूप सौंदर्याने देवतांना प्रसन्न करून एशोआरमात आयुष्य जगेल. स्वर्गीय अप्सरांमध्ये तिला मनाचे स्थान मिळेल. राहिले तुझे, एखाद्या कुरूप स्त्रीशी लग्न करून तू ही मजेत आणि चिंतामुक्त राहशील, हा! हा! हा!, असे म्हणत इंद्राने तेथून प्रयाण केले.

आश्रमात स्मशान शांतता पसरली. कुटी बाहेर गौतम ऋषी डोक्यावर हात ठेऊन मौन बसले होते. पुढे काय करायचे कुणाला ही काही कळत नव्हते, सर्वच मौन होते. सूर्यदेव अस्ताचला कडे जाऊ लागले. कुटीतून अहल्या बाहेर पडली, गौतमला उदेश्यून म्हणाली, प्रिय, इंद्राने मला भ्रष्ट केले आहे, आता माझ्या जगण्यात काहीच अर्थ नाही. ह्या अपवित्र शरीराला नष्ट करण्याची मला अनुमती द्या. गौतम ऋषी तिच्या कडे पाहत म्हणाले, अहल्या, आत्महत्या करणे पाप आहे, मी त्याची अनुमती देऊ शकत नाही. शिवाय ह्यात तुझा काहीच दोष नाही. मी जाणतो तू, निर्दोष आहे. तुला दोषी मानून, समाजाने आपल्याला वाळीत टाकले तरी चालेल. आपण अरण्यात जाऊन कुटी बांधून राहू, अरण्यातल्या वृक्ष, लता, पक्षी, सत्य जाणतात, ते आपला त्याग करणार नाही.  

तुम्ही म्हणतात म्हणून, मी आत्महत्या करणार नाही. मी जर दोषी नाही, तर समाजाने मला वाळीत का टाकावे? जो पर्यंत लोक माझ्या हातचे अन्नजल स्वीकार करणार नाही, तो पर्यंत मी ही अन्नजल स्पर्श करणार नाही.

गौतम ऋषी म्हणाले, अहल्या, हे उचित नाही अन्नजल ग्रहण न करणे म्हणजे एकप्रकारे आत्महत्या करणेच आहे.  

अहल्या म्हणाली, हा केवळ माझ्या एकटीच प्रश्न नाही. अनेक स्त्रियांना अश्या प्रसंगातून जावे लागते, निर्दोष असताना ही त्यांना तिरस्कार सहन करावा लागतो, त्यांना जगणे त्यांना असह्य होते. जो पर्यंत मला न्याय मिळत नाही अन्न-जल ग्रहण करणार नाही, केवळ वायू आणि यज्ञीय अग्नि भक्षण करून मी जिवंत राहिल.

यज्ञवेदी समोर असलेल्या एका शिलेवर अहल्या ध्यानिस्थ होऊन बसत सूर्यदेवाला उद्येशून म्हणाली, हे सूर्यदेव, तुम्ही सर्वज्ञ आहात, मला न्याय द्या. जो पर्यंत मला न्याय मिळणार नाही, मी इथून उठणार नाही.

गौतम ऋषींच्या आश्रमात घडलेली घटना पंचक्रोशीत पसरली. जवळपासच्या आश्रमातील काही ऋषी-मुनी गौतमाचे सांत्वन करायला तिथे पोहचले. एक वृद्ध मुनी गौतमला म्हणाला, गौतम, अहल्येने उचित मार्ग निवडला आहे. अश्यारीतीने प्राणत्याग केल्यास, ती पवित्र होईल, तिला स्वर्गात स्थान मिळेल. गौतम म्हणाले, मुनिवर, आज एक महिना होऊन गेला आहे. इतके दिवस बिना अन्न-जल ग्रहण केल्या कुणी ही जिवंत राहू शकत नाही. पण अहल्या जिवंत आहे.  तिला न्याय पाहिजे. कोण देणार न्याय. वृद्ध मुनी म्हणाले, तू महाराज दशरथ यांच्या सभेत न्याय मागण्यासाठी जा, कारण न्यायिक नियमांत परिवर्तन करण्याचा अधिकार फक्त राजाचा असतो. गौतम म्हणाले, मला माहित आहे, मी येथून बाहेर गेलो तर यज्ञीय अग्नि कोण प्रज्वलित ठेवणार? वृद्ध मुनी म्हणाले, ते आम्ही बघून घेऊ, तू काळजी करू नकोस.

गौतम ऋषी, महाराज दशरथाच्या राज्यसभेत पोहचले, आपली व्यथा-कथा त्यांच्या समोर मांडली.  महाराज दशरथाने, राजपुरोहित महर्षि वशिष्ठ यांचे मत विचारले. महर्षि वशिष्ठ म्हणाले, राजन, कुठल्या ही निर्दोष व्यक्तीला दंड देणे न्यायसंगत नाही, हे जरी खरे असेल तरी, न्याय हा व्यक्तीनिष्ठ नसून, संपूर्ण समजासाठी असतो. कोणी पुरुष, परस्त्री बरोबर समागम करेल किंवा बळजबरी करेल तर त्याला  मृत्यू दंड देण्याची व्यवस्था आहे. देवराज स्वर्गाचे अधिपती असल्यामुळे, ते अदंडनीय आहेत. त्या मुळे त्यांना दंड देणे शक्य नाही.

पर-पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला पुरुषाप्रमाणे मृत्युदंड देण्याची व्यवस्था नाही. कारण, स्त्रीवर बळजबरी झाली, किंवा तिने स्वतच्या इच्छेने संबंध केले, हे सिद्ध करणे अतिशय कठीण असते.  स्वत:च्या बचावासाठी तिची पुरुषावर आळ घेण्याची संभावना नाकारता येणार नाही. दोन्ही बाबींवर विचार करून, व स्त्री वर अन्याय न होऊ देणे, यासाठी न्यायविदानीं स्त्रीला फक्त वाळीत टाकण्याची व्यवस्था केली आहे. केवळ एका स्त्री साठी न्यायिक व्यवस्थेत परिवर्तन करणे उचित नाही.  तसे केले तर, स्वेच्छाचारी स्त्रिया याचा गैरवापर करतील. गौतम कडे पाहत वशिष्ठ ऋषी म्हणाले,  अन्नजल ग्रहण न करता कुणी ही जिवंत राहू शकत नाही. मला तर असे वाटते, स्त्री सौंदर्याला भुलून गौतमनेच हा प्रपंच रचला असावा.  वशिष्ठ ऋषींचे वचन गौतमला सहन झाले नाही. क्षणभर ही विचार न करता, सभात्याग केली. मोठ्या आशेने गौतम  अयोध्येत आला होता. इथे ही त्याला न्याय नाही मिळाला. आता काय करायचे त्याला समजेनासे झाले. कुठल्या तोंडाने आश्रमात परत जाणार. अयोध्येत काय घडले असे कुणी विचारले तर त्यांना काय सांगणार. राहून-राहून वशिष्ठ ऋषींचे बोल, गौतमच्या कानावर आदळत होते. वशिष्ठ ऋषीने संपूर्ण सभेसमोर गौतमला स्त्री लंपट ठरविले होते. हा अपमान गौतमला सहन होत  नव्हता. आपण अगतिक आहोत, आपण काहीच करू शकत नाही. आपल्या पत्नीला न्याय ही मिळवून देऊ शकत नाही. गौतम निराश झाला. आता जिवंत राहण्यात काहीच अर्थ नाही, गौतमाने प्राण त्यागण्याचा निश्चय केला आणि  सरयू नदीत उडी टाकली.

गौतमचे डोळे उघडले, तो  एका पर्ण कुटीत होता. गौतमला आठवले, मी तर  नदीत उडी टाकली होती, तरी जिवंत का. कुणी आपल्याला इथे आणले.  हा प्रश्न त्याला पडला. गौतमने चहूकडे डोळे फिरवले, एक प्रौढ वयाचे मुनी गौतमकडेच पाहत होते. गौतमने डोळे उघडले हे पाहून, ते म्हणाले पुत्र, या तरुण वयात जगण्याचे सोडून, मरणाची वाट का धरली? मी जर तिथे नसतो तर नाहक प्राण गेला असता तुझा. गौतम उठून म्हणाला. मुनिश्रेष्ठ, आपण माझे प्राण का वाचविले? मला जगायची इच्छा नाही.  असे म्हणत, गौतमाने आपली कहाणी त्या मुनिना ऐकवली. ते मुनी म्हणले, गौतम, मी कुशिक पुत्र विश्वामित्र आहे. मी वचन देतो, मी देवी अहल्येला न्याय मिळवून देईल. तुला एकच विनंती आहे, पुन्हा आत्महत्येचा विचार मनात आणू नको.  तू निश्चिंत होऊन आपल्या आश्रमात परत जा.

विश्वामित्र कथा सांगता सांगता थांबले, रामाला उद्येशून म्हणाले, राम, तू अयोध्येचा युवराज आहे, आता तूच ठरव, उद्या आपण गौतम ऋषींच्या आश्रमात गेले पाहिजे कि नाही. राम उद्गारला, गुरुदेव, मी उद्या अन्न-जल महातपस्वी अहल्येच्या हातानेच ग्रहण करेल. विश्वामित्र म्हणाले, राम मला तुझ्यापासून हीच अपेक्षा होती.

महर्षि विश्वामित्र, अयोध्येचे युवराज राम आणि त्यांचे अनुज लक्ष्मणासोबत गौतम ऋषींच्या आश्रमात येणार ही वार्ता पंचक्रोशीत पसरली. जवळपासच्या आश्रमातले ऋषी मुनी, ब्रह्मचारी आणि ग्रामस्थ त्यांच्या स्वागतासाठी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ जमले. आज काय होणार याची उत्सुकता सर्वाना होती.  श्री रामाने आश्रमात प्रवेश केला

प्रयत्‍नान् निर्मितां धात्रा दिव्यां मायामयीमिव ।
धूमेनाभिपरीतांगीं दीप्तां अग्निशिखां इव ॥ १४ ॥
सतुषारावृतां साभ्रां पूर्णचंद्रप्रभामिव ।
मध्येऽम्भसो दुराधर्षां दीप्तां सूर्यप्रभामिव ॥ १५ ॥

(तिचे स्वरूप दिव्य होते विधात्याने फार प्रयत्‍नाने तिच्या अंगांची निर्मिति केली होती. ती मायामयी असल्याप्रमाणे प्रतीत होत होती. धूमाने घेरलेल्या प्रज्वलित अग्निशिखेप्रमाणे ती वाटत होती. आणि ढगांनी झाकल्या गेलेल्या पूर्ण चंद्राच्या प्रभेसारखी दिसत होती. तसेच जलामध्ये उद्‍भासित होणार्‍या सूर्याच्या दुर्धर्ष प्रभेसमान दृष्टिगोचर होत होती.  )

सूर्यदेवा सारखे प्रखर तेज तिच्या चेहऱ्यावर असेल्यामुळे कुणाला ही तिला पाहणे शक्य नव्हते. एवढ्या कालखंडानंतर श्री राम आणि लक्ष्मणाने तिच्या चरणांना स्पर्श केला. श्री रामाने चरणस्पर्श करताच अहल्येने डोळे उघडले. श्री राम म्हणाले, माता मी अयोध्या नरेश दशरथ यांच्या पुत्र राम आहे आणि हा माझा अनुज लक्ष्मण आहे. तुझे दर्शन घेऊन आज मी कृतार्थ झालो आहे. अहल्येच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती उठली आणि रामाला मिठी मारत म्हणाली, राम किती वाट पहिली तुझी, का लावला एवढा वेळ?  तू कौसल्येच्या गर्भात होता, तेंव्हा पासून तुझ्या आयुष्यातला एक एक दिवस मी ही जगला आहे. रामाने आपल्या हाताने तिचे ओघळणारे अश्रू पुसले आणि म्हणाला, माता, मला भयंकर भूक लागली आहे, तू आपल्या हाताने मला ग्रास भरवणार नाही तो पर्यंत माझी भूक शांत होणार नाही.

ते दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले नसेल तर नवलच.  महर्षि विश्वामित्र गौतमास म्हणाले, गौतम, मी तुला दिलेले वचन पूर्ण केले आहे. आता महाभोजाची तैयारी करा, आज साध्वी अहल्या, सर्वांनाच आपल्या हातानी भरवणार आहे.  सर्व आश्रमवासी, ग्रामस्थ महाभोजाच्या तैयारीला लागले. महासती अहल्येने राम लक्ष्मणांना आपल्या हाताने भरविले ते   

पुष्पवृष्टिर्महत्यासीद् देवदुंदुभि निःस्वनैः ।
गंधर्वाप्सरसां चैव महानासीत् समुत्सवः ॥ १९ ॥

(देवतांच्या दुन्दुभि वाजू लागल्या. त्याबरोबरच आकाशांतून फुलांची भारी वृष्टि होऊ लागली. गंधर्व आणि अप्सरांच्या द्वारा महान उत्सव साजरा केला जाऊ लागला).

  साधु साध्विति देवाः तां अहल्यां समपूजयन् ।
  तपोबलविशुद्धाङ्‍गीं गौतमस्य वशानुगाम् ॥ २० ॥

(महर्षि गौतमांच्या अधीन राहणारी अहल्या आपल्या तपःशक्तिने विशुद्ध स्वरूपास प्राप्त झाली हे पाहून सर्व देवता तिला साधुवाद देऊन तिची भारी प्रशंसा करू लागल्या.)

  गौतमोऽपि महातेजा अहल्यासहितः सुखी ।
  रामं संपूज्य विधिवत् तपस्तेपे महातपाः ॥ २१ ॥

(महातेजस्वी महातपस्वी गौतमही अहल्येला आपल्याबरोबर पाहून सुखी झाले. त्यांनी श्रीरामांची विधिवत् पूजा करून तपस्येस आरंभ केला.) इति.

अखेर अहल्येच्या संघर्षाला यश मिळाले. समाजाने तिचा स्वीकार केला. आज ही स्त्रियांवर बलात्कार होतात. पण तिला समाजात मनाचे स्थान मिळवून देण्यात आज समाज आणि राज्यव्यवस्था सबळ आहे का? त्या वेळी श्री राम होते, पण आज...

टीप: अन्न-जल ग्रहण केल्या बिना ही मनुष्य जिवंत राहू शकतो.  गुजरात येथील अंबाजी मंदिराचे ९० वर्षाच्या अधिक वयाचे पुजारी गेल्या ६० वर्षाहून अधिक अन्न-जल ग्रहण करता जीवित आहे. भारताच्या सरकारी संस्थांनी सत्यता पारखण्यासाठी त्यांच्यावर प्रयोग ही केले आहे. NGO वर ही त्यांच्या वर कार्यक्रम बघितला होता.

Sunday, March 15, 2015

मेथी उडीद वड्यांची भाजी


मेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी  हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी  निवडत होती. मी म्हणालो, चार पाच दिवसांपासून, रोज-रोज तेच-तेच गाजर-मटार, फुलगोबी, वांगे (घ्या मौसमात या भाज्या स्वस्त मिळतात) खाऊन कंटाळळो आहे. सुक्या बनविता येत असल्यामुळे, ऑफिसच्या  डब्यात ह्याच भाज्या खायला मिळतात. खंर म्हणावे तर सौने काल एक वाटी उडीद डाळ भिवून ठेवली होती, उडीद गोळ्यांची भाजी बनविण्याचा तिचा विचार होता.  ती म्हणाली मेथी टाकून उडीद वड्यांची भाजी चालेल का?  नाही,  हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे, हो म्हणावेच लागले. अश्यारीतीने ही भाजी आज सकाळी खायला मिळाली. 

साहित्य: वड्यांसाठी -रात्र भर भिजवून उडीद डाळ - एक  वाटी, मेथी धुऊन बारीक चिरलेली, एक वाटी, लसूण(५-६ पाकळ्या), आलं (अंदाजानुसार), मिरचीचे (१-२)पेस्ट, मीठ , हळद, धनिया पावडर -१ चमचा, गोडा मसाला एक चमचा. 

कृती: उडदाची डाळ मिक्सर मधून पिसून घ्यायची. शक्यतो पाणी नका टाकू. त्यात चिरलेली मेथी, आलं, लसूण मिरची पेस्ट, हळद धनिया पावडर, गोड मसाला, मीठ  मिसळून फेटून घ्या.   कुकरच्या एका भांड्यात तेलाचा हात लाऊन मिश्रण  त्यात घाला व कुकरचे झाकण बंद करून. गॅस वर कुकरची एक-दोन सिटी काढून घ्या. थंड झाल्यावर एका ताटात  वड्या कापून घ्या. 


कृती भाजी:  दोन कांदे , तीन टमाटो, आलं (१/२ इंच), लसूण (३-४ पाकळ्या), मिरची १-२. सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्या.  गॅस वर कढई ठेऊन त्यात ३-४चमचे तेल टाका, तेल गरम झाल्यावर मोहरी (१/२ चमचा) टाका . मोहरी तडतडल्या वर मिक्सर मधली पेस्ट टाका. ५-६ मिनिटे तेल सुटे पर्यंत परतवा.  मग त्यात गरम मसाला(१ चमचा), धनिया पावडर (१ चमचा), हळद (१/२ चमचे), तिखट (१-२ चमचे) टाकून परतवून घ्या. नंतर  १ गिलास पाणी घालून उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर मीठ -१/२ चमचे (आधी वड्यात मीठ घातले आहे, आता फक्त ग्रेवी साठी मीठ)  व नंतर त्यात वडे घालून, एक वाफ काढून घ्या.

जेवताना गरमा-गरम मेथी उडीद वड्यांची भाजी पोळी  आणि भाता सोबत मस्त लागेली.





Sunday, March 8, 2015

दोन वात्रटिका - 8.3.15




झाडूने स्वच्छ केला 
कचरा कमळ फुलांचा 
स्वच्छता अभियानाचा 
राजा तोच ठरला.


( मी जिथे राहतो त्या  गल्लीत पाणी येत नाही, पुढील ५ वर्षे पाणी येण्याची संभावना ही नाही- कारण पाणी देण्याचा वादा केलेला नाही -२.५० कोटीच्या दिल्लीत १ कोटी लोकांच्या घरी पाणी येत नाही )

फ्रीची वीज 
फ्रीचे पाणी.
रात्र अंधारी
घाघर रिकामी.





Saturday, March 7, 2015

क्षमा परमो धर्म: - राजा कुशनाभच्या मुलींची कथा

क्षमा दानं क्षमा सत्यं क्षमा यज्ञाश्च पुत्रिकाः I
क्षमा यशः क्षमा धर्मः क्षमया विष्ठितं जगत्II
(वाल्मीकि रामायण बाल कांड ३३/८) 
क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे. क्षमेवरच हे सर्व जगत् टिकून आहे." 

रामधारी सिंह यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे:

क्षमा शोभती उस भुजंग को
जिसके पास गरल हो
उसको क्या जो दंतहीन
विषरहित, विनीत, सरल हो। 

क्षमा हे माणसाचे भूषण आहे. दुर्बल माणूस अन्याय सहन करतो, तो क्षमा करू शकत नाही. किंवा त्यांनी केलेल्या क्षमेला कोणी महत्व ही देत नाही. शक्तिशाली माणसाने दुर्बलांना क्षमा करावी हीच अपेक्षा. कारण क्रोधाग्नित कधी-कधी सर्वच नष्ट होते. जगाच्या कल्याणासाठी क्षमा करणे आवश्यक असते. म्हणूनच क्षमा धर्माच्या १० लक्षणां पैकी एक लक्षण आहे. 

धर्मात्मा राजा कुशनाभच्या कन्या धर्मानुसार आचरण करणाऱ्या आणि तपोबलानी युक्त होत्या. तरी ही त्यांनी आपल्यावर अन्याय करणाऱ्या वायुदेवाला क्षमा केली. कारण त्यांनी वायुदेवाला श्राप दिला असता तर जगाचे संतुलन बिघडले असते. धर्मात्मा मुलींचे क्षमाशील आचरण पाहून महर्षि वाल्मीकिनी रामायणात राजा कुशनाभच्या मुलींचे गुणगान केले आहे.

सोन नदीच्या तीरावर असलेल्या महोदय या नगरात धर्मात्मा राजर्षि कुशनाभ राज्य करत होता. घृताची अप्सरे पासून त्याला १०० कन्यारत्न प्राप्त झाले. त्या मुली आपल्या पिता प्रमाणेच धर्म आणि सत्य मार्गावर चालणार्या होत्या. वयात आल्यावर त्या अप्सरे समान सुंदर दिसू लागल्या.  
एकदा वायुदेवाने त्यांना पहिले. कामांध झालेल्या वायुदेवाने त्यांना म्हंटले, मुलीनो तुम्ही सर्व माझ्यासंगे स्वर्गात चला, माझ्या भार्या बना. स्वर्गात स्वर्गीय सुख भोगायला मिळेल. शिवाय तुमचे यौवन ही अक्षत राहिलं. त्या मुलींनी वायुदेवाला नम्रतापूर्वक म्हंटले, आम्ही राजा कुशनाभच्या कन्या आहोत. आमचे पिता जिवंत आहेत आणि आम्ही त्यांच्या आज्ञेत आहोत. अत: उचित हेच आहे, तुम्ही आमच्या पित्या जवळ जाऊन आमचा हात मागा, जर आमच्या पित्याने आमचा हात तुमच्या हातात दिला तर आम्ही तुमच्या होऊ. 

कामांध माणसाची विवेक बुद्धी नष्ट झालेली असते. त्याला धर्म-अधर्म, उचित-अनुचित काहीच कळत नाही. या तुच्छ मानवीय मुलींची माझ्या इच्छेचा अनादर करण्याची हिम्मत झाली कशी झाली? वायुदेवाला वाटले त्यांच्या इच्छेचा अनादर करून मुलींनी त्यांचा अपमान केला आहे. वायुदेव क्रोधीत झाले. त्यांनी  सर्व मुलीनां कुब्जा होण्याचा श्राप दिला. 

त्या मुली तपोनिष्ठ होत्या, मनात आणले असते तर त्यांनी वायुदेवाला श्राप दिला असता. पण त्यांना वायुदेवावर क्रोध आला नाही. त्यांनी वायुदेवाला क्षमा केले. घरी जाऊन त्यांनी घडलेले सर्व प्रकार आपल्या पित्याला सांगितला. कुब्ज्या झालेल्या आपल्या मुलींना पाहून धर्मात्मा राजा कुशनाभला अत्यंत दुख झाले. तरी तो आपल्या मुलींना म्हणाला, क्षमाच मानवाचे आभूषण आहे, देवतांना ही दुष्कर अशी क्षमा तुम्ही, वायुदेवाला केली. असे करून तुम्ही कुळाच्या मर्यादेची रक्षा केली  आहे.  

पुढे त्या सर्व मुलींचे लग्न काम्पिल्या नगरीच्या महातेजस्वी राजा राजर्षि ब्रह्मदत्त सोबत झाले. लग्नाच्या वेळी राजाचा हात हातात घेताच त्या मुलीं पहिल्या सारख्या निरोगी आणि सुंदर झाल्या. इति.

Sunday, March 1, 2015

प्रेमाचे हायकू (?)


गुलाबी कळ्यांची
कत्तल झाली
प्रेमाच्या दिनी.
कमलिनीच्या प्रेमात
बंदिवान भृंग*
नाहक प्राण गेला.
(*भृंग = भ्रमर.  ......मिटता कमलदल होई बंदी हा भृंग. श्वास कोंडून प्राण गेला)
 

तिची शॉपिंग
त्याचा बटवा 
आता उधार मागणार.

Sunday, February 22, 2015

दिल्लीचा पुस्तक मेळावा


दिल्लीत आजकाल प्रगती मैदानात पुस्तक मेळावा लागला आहे. काल शनिवारी प पुस्तक मेळा पाहायला गेलो.  जाताना कॅमेरा  घेऊन गेलो. पण कॅमेऱ्याची बेट्री चार्ज आहे कि नाही हे पाहायला विसरलो. काही फोटो काढताच लक्षात आले, बेट्री  संपली आहे. तरी ही १५-१६ फोटो काढता आले होते. एक गोष्ट चांगली झाली पहिल्यांदा ज्या हाल मध्ये गेलो इतर पुस्तक  विक्रेतांबरोबर, धार्मिक पुस्तक विक्रेत्यांचे ही स्टाल होते. एक  सर्वात जास्त भीड ही गीराप्रेसच्या स्टाल वर होती. गीता प्रेस फार कमी किमतीत धार्मिक पुस्तकांची विक्री करतो. मी ही तेथून वाल्मिकी रामायण खरेदी केली.


२. आशाराम बापूंचे शिष्य 'गर्व से कहो, हम बापू के शिष्य है', बापूंचे साहित्य विकत होते. एक शिष्य लोकांना आशाराम बापूंवर लावलेल्या  आरोपां संबंधित पुस्तक वाटत होती...




३. हिंदू संकृती रक्षक म्हणविणारे 'सनातनचे' पुस्तके ही विक्रीला होती.





४. स्वस्तात मिळणाऱ्या पुस्तकांवर लोक तुटून पडले होते. अर्थातच पुस्तके आंग्ल भाषेत होती.






५. एका शाळेची लहान मुलेही पुस्तक मेळावा पाहायला आली होती.







 


६.  डाव्या विचारधारेचे पुस्तक विक्रेता ही होते,दुनिया के मजदूरों एक हों, अजूनही आशा आहे.




७.   जिथे शिक्षित लोक पुस्तक मेळावा पाहायला येतात, तिथे या पुस्तकांची भारी विक्री होत होती...




८.  प्रतीयोगीतांची तैयारी- किती तरी स्टाल होते, प्रतियोगिता दर्पण पासून ....


९.  श्री नरेंद्र  मोदी,  स्वर्गीय श्री खुशवंत सिंह आणि भगवान बुद्ध







११. पुस्तके पाहताना


१२.  विश्रांती






मिक्स परांठा- गाजर+ वाटाणे+ चुकुंदर (बीट)


हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते.  पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर,मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली. 

साहित्य: गाजर  २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी,   चुकुंदर(बीट) १ मोठे, हळद, हिरवी मिरची २, लसूण, अदरक,  तिखट २ चमचे (चवीनुसार), गरम मसाला (१ चमचा), कसूरी मेथी (२ चमचे)  शिवाय कणिक (किती परांठे बनवायचे, याचा अंदाज घेऊन (आम्ही दिल्लीकर परांठ्यात भरपूर मिश्रण भरतो, मुंबईकर बहुतेक कमी भरतात) मळून घ्यावी. शुद्ध गायीचे तूप किंवा लोणी  पराठ्यांवर लावण्या साठी. अदरक, लसूण, हिरवी मिरचीचे पेस्ट करून घ्यावे.  मीठ चवीनुसार.

कृती:  गाजर आणि बीट  किसून घेणे, मटार मिक्सर मधून वाटून घेणे. मिश्रण एका ताटात काढून त्यात  हळद , तिखट, गरम मसाला, कसूरीमेथी, गरम मसाला मिसळावे.  कसूरी मेथीचा ही  एक वेगळा स्वाद येतो. (घरात कोथिंबीर नसेल तरी ही त्या एवजी कसूरी मेथी वापरता येते).  मीठ सर्वात शेवटी अर्थात परांठे बनविण्याच्या वेळी टाकावे. कणकीची परी लाटून त्यात मिश्रण भरून परांठा गोल आकारात लाटून घ्या.  तव्यावर पराठा भाजून घ्या (बिना तेल आणि तूप  वापरता). गरमागरम परांठा सर्व करताना त्यावर लोणी किंवा तूप घाला. अत्यंत स्वादिष्ट  लागेल. ज्यांना तेल आणि तूप टाकून परांठा खरपूस भाजायचा असेल ते तसे करू शकतात. (अस्मादिकांना तेल/ तूप कमी खाण्यास सांगितले आहे, काय करणार)

गरमागरम परांठा त्यावर गायीचे तूप, हिरवी चटणी, टमाटो साॅस व काळी मिरी टाकलेल्या दही सोबत  परांठा खायला मिळाला.  हा मिश्र परांठ खाताना खरंच  मजा आली. 









  पौष्टिक पदार्थ (१) बीटच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी.


Wednesday, February 18, 2015

अथ: केस कथा


कालच बसमध्ये एका टकल्याची डोक्यावर लावलेली विग खाली पडली. त्याच्या डोक्यावरचे टक्कल पाहून काहीना हसू आले अर्थात त्यात मी ही होतो.  तो माणूस रागाने पाहत, पुढच्याच  बस स्थानकावर खाली उतरला.  साहजिकच आहे, कुणालाही टकल्या म्हंटलेले  आवडत नाही.  एका लग्नात, लग्न लावणारे गुरुजी टकले होते, लहान पोरांनी अक्षता त्यांच्या टकल्या डोक्याला नेम मारून फेकल्या. मुलांवर खेसकण्या शिवाय ते काही ही करू शकले नाही. बहुधा प्रत्येक लग्नात त्यांना हे भोगावेच लागत असेल. मुलांच्या खोड्या थांबविणे कुणालाच शक्य नसते आणि लोकांचे तोंड ही बंद करता येत नाही. काही पुरुष विग घालतात, पण  विग डोक्यावरून पडली तर, फजिती होते.  आजकाल केसांचे रोपण ही होते, पण त्यासाठी कमीत कमी एक लक्ष रोकडा तरी खिश्यात पाहिजे. शिवाय ते केंस खर्या सारखे चमकदार वाटत नाही.  शेवटी एकच उपाय उरतो, डोक्यावर केसांचे जंगल उगवा.  

मजबूत, लांबसडक केस  तर स्त्रियांच्या सौंदर्याची निशाणी. नाजुक सुंदर राजकुमारी पण तिचे केस मात्र लांबसडक व दोरखंडा सारखे मजबूत. परीकथेतील राजकुमार तिचे  मजबूत   केस  पकडून  किल्यात  चढायचा. कुणाला कळायचे ही नाही. दुसर्या राजकुमारीना निश्चितच तिच्या केसांचा हेवा वाटत असेल. एकदा एका सन्यासिनीचा फोटो बघितला होतो. तिच्या लांब केसानीच तिचे संपूर्ण शरीर झाकलेले होते, तिला अन्य वस्त्र परिधान करण्याची गरज वाटत नव्हती. 

स्त्री असो व पुरुष केसांसाठी लोक काहीही करायला  तैयार असतात.  शिकाकाई, अंड्याची जर्दी, आणि अधिकांश लोक 'मजबूत और घने बालोंका राज' चे विज्ञापने पाहून  शेम्पू आणि तेल वापरतात. बाजारात विदेशी कंपन्यापासून ते बाबा रामदेवांचे नैसर्गिक स्वदेशी शेम्पू  ही बाजारात  आहे. कुठे सुपर स्टार 'अभिताभ बच्चन' थंडा थंडा कूल कूल नवरत्न तेल विकतो. तर कुठे  हिरोईन  आल क्लिअर विकते.


दिल्लीच्या संग्रहालयात, मुगल आणि राजपूत कालीन चित्रे पाहत असताना, एक बाब लक्षात आली.चित्रातल्या अधिकांश स्त्रियांचे केस लांबसडक आणि मजबूत होते. स्त्रियांच्या पुरातन मूर्तींचे केस ही लांबसडक होते. मनात एक प्रश्न घोळू लागला, आज केसांसाठी स्त्रिया तेल, शेम्पू इत्यादी वापरतात, जुन्या काळी काय वापरत वापरात असतील, सहज वाचता वाचता अथर्ववेदात एक कथा सापडली. 

वीतहव्य नावाचे एक महर्षि होते. त्यांची एक मुलगी होती. ती त्यांना अत्यंत प्रिय होती. आपली मुलगी सुंदर दिसावी असे सर्व माता-पितांना वाटते. पण तिच्या केसांची वाढ कमी होती. काळजी पोटी महर्षि वीतहव्य, मुनी कृष्णकेश यांच्या निवासस्थानी गेले. आपली समस्या त्यांच्या पुढे ठेवली.  मुनी कृष्णकेश यांनी नितत्नी नावाची औषधी गुणांनी युक्त वनस्पती महर्षि वीतहव्य यांना दिली.  ह्या वनस्पतीच्या उपयोगाने केस शीघ्र वाढतात असा शोध महर्षि जमदग्नी यांनी लावला होता.  निश्चितच या औषधी गुणांनी युक्त वनस्पतीच्या उपयोगाने महर्षि वीतहव्य यांच्या मुलीचे केस लांबसडक आणि सदृढ झाले असतील. म्हणूनच त्यांनी आभार व्यक्त करण्या साठी  नितत्नी वनस्पतीला देवता मानून तिची स्तुती केली. (आजच्या भाषेत म्हणाल तर तिचे विज्ञापन केले)  या केसवर्धक वनस्पतीला  वेदांमध्ये स्थान मिळाले.  (अथर्ववेद ८/१३७/१-३)


दृंह मूलमाग्रं यच्छ वि मध्यं यामयौषधे I
केश नडाइववर्धन्तां शीर्ष्णस्ते असिता: पर II
(अथर्ववेद ८/१३७/३)

हे औषधे तो केसांच्या अग्र भाग लांब, मध्यभाग  सुस्थिर  आणि  केसांच्या  जडानां मजबूत कर.  नदी काठच्या  नड  वनस्पती प्रमाणे केस ही  शीघ्र  वाढो .

नड: (नदी काठी वाढणारी वनस्पती (बहुतेक एक प्रकारचे तृण/वेत) - उपयोग नाव टोकरी बनविण्यात किंवा लहान नौका बनविण्यासाठी वापर होत असे)

 

Monday, February 16, 2015

१४ फरवरी (प्रेम दिन) - दोन क्षणिका


प्रेमाच्या दिवशी अर्थात (आंग्ल भाषेतील वेलेन्टाईन डे) कार्यालायातून सांयकाळी ५च्या सुमारास बाहेर पडलो, राजपथावर अक्षरश: प्रेमी जोडपे हातात हात घालून फिरत होते.  या प्रकरणांचा अंत काय होईल,   विचार करताना सुचलेल्या दोन क्षणिका

तिच्या साठी सर्व सोडले, पण तिने ....

गुलाबी काटा 
ह्रदयी डसला.
जीव भौंऱ्याचा 
नाहक गेला. 

बहुतेक मुलींच्या नशिबी ....

रस पिउनी 
भौंरा उडाला.
कळीच्या नशिबी 
विरह वेदना.

Wednesday, February 11, 2015

भाज्यांचे लोणचे


दिल्लीत फेब्रुवारी महिना सुरु होताच वादळ आणि धुक्याचे राज्य संपते. सूर्याचे तेज जाणवू लागते. या मौसमात बाजारात भाज्याही  भरपूर असतात. भाज्यांचे लोणचे घालण्यासाठी हा मौसम आदर्शाच. दरवर्षी सौ. या मौसमात भाज्याचे लोणचे एक-दोनदा तरी घालतेच. गेल्या रविवारी भाज्यांचे लोणचे घातले होते. त्याचीच कृती.

साहित्य:

भाज्या: फुलगोबी १किलो ,गाजर१/२किलो ,शलजम १/२किलो, अदरक १०० ग्रम, लहसून १०० ग्रम

मसाले:  सौंप (बडीशेप) ( २ चमचे) , मेथी दाणे (१ चमचा),  हिंग १/४ चमचे, मोहरीची डाळ १ वाटी, तिखट १/२ वाटी, हळद १/४ वाटी, काळी मिरी ५-६ दाणे,  तेल १ वाटी, सिरका १ वाटी, गुड १/2 वाटी. मीठ  आवश्यकतेनुसार.



कृती:

प्रथम गोबी,गाजर आणि शलजम या तिन्ही भाज्यांचे एकसारखे तुकडे करून घ्या.एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. एक उकळी आल्यावर पाण्यात १ चमचा हळद टाकून त्यात चिरलेल्या भाज्या टाकाव्यात. तीन ते चार मिनिटांनी  गॅस बंद करून सर्व  भाज्या एका मलमलच्या कपड्यावर किंवा साडीवर पसरून वाळायला घाला. तीन चार तासात भाज्या वाळतील (अर्थात ओलसरपणा निघून जाईल).  अदरक किसून घ्या आणि लहसून बारीक वाटून घ्या. 

आता कढई गॅस वर ठेवा. 1 चमचा तेलात सौंप आणि मेथी दाने परतून घ्या. मग पुन्हा २ चमचे तेल टाकून अदरक आणि लहसून परतून घ्या.  त्या नंतर वाचलेले तेल   कढईत टाकून तेल गरम झाल्यावर  काळी मिरी टाका  (तेल गरम झाले कि नाही कळण्यासाठी). नंतर  गॅस बंद करा. एका भांड्यात सिरका व गुड घालून उकळायला ठेवा. गुड  विरघळल्या वर गॅसबंद करा.

एका परातीत किंवा भांड्यात  सर्व मसाला अर्थात - परतलेले अदरक, लहसून, सौंप (बडीशेप), मेथी दाणे व तिखट, हळद, मेथी दाणे, मीठ   व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर गरम तेल मसाल्यावर टाका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात गुड आणि सिरक्याचे मिश्रण मिसला. मसाला थंड झाल्यावर सर्व  वाळलेल्या  भाज्या मिसळा.








हे लोणचे १०-१२  दिवस आरामात टिकते.

कांजी / काळ्या गाजरापासून बनविलेले पेय
http://vivekpatait.blogspot.in/2014/01/blog-post_19.html

 

Sunday, February 8, 2015

वैदिक काळातील वीरांगना


ऋग्वेद वाचीत असताना, एका अनाम वीरांगनेने गाजवलेल्या  पराक्रमाची गाथा सापडली. या अनाम वीरांगनाचे नाव कुणाला ही  ठाऊक नाही.  तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच.

वैदिक काळात गायी  हेच धन.  गौधन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौधन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्‌गल याने शत्रूवर आक्रमण करण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली.  तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले.  जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला. सैन्य ही युद्धघोष तिच्या मागे निघाले.  वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिथे लक्ष न देता केवळ शत्रूचा पराभव, हाच उद्देश्य ध्यानात ठेऊन तिने  रणांगणावर वर रथ चौफेर उधळला. एका रथी प्रमाणे युद्ध करून तिने हजारो शत्रू सैनिकांचा पडाव केला. युद्धात जय मिळवून दिला.  गौधन ही पुन्हा परत मिळाले.  मुद्‌गलानीच्या नेतृत्व आणि पराक्रमा मुळे विजय मिळाला, सर्वांनी तिचे कौतुक केले. त्या वेळच्या इतिहासकार अर्थात मंत्रदृष्टा ऋषीनीं  वीरांगना मुद्‌गलानीच्या पराक्रमाची नोंद घेतली.  तिच्या पराक्रमाची गाथा ऋग्वेदात ऋचाच्यां रुपात आज ही जिवंत आहे.

उत् स्म॒ वातो वहति वासो अस्या अधिरथं यदजयत् सहस्रम् ।
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ भरे॑कृतं व्यचेदिन्द्रसेना ॥ २ ॥ 
 (ऋग्वेद १०/१०२)

प्रख्यात योद्धा  मुद्‍गल याची  पत्नी मुद्‌गलानी ही त्याच्या जवळच रथांत बसली.  वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिने तिथे लक्ष दिले नाही. इंद्रसेनेत रथी हो‍ऊन तिने  हजारो शत्रू सैनिकांचा पराभव केला आणि गायींना प्राप्त केले.






Saturday, February 7, 2015

इलेक्शनी- चारोळ्या


आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो.  थोडा-फार  फेर-फटका  ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत  आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं....... 

(१)
प्रसाद घ्या 
तीर्थ प्या 
आटोत बसा
वोट आपला
असा विका.

(२)
नेता नोट  
मोजतात 
नोट मते 
मोजते.


(३)
गांधींच्या डोळ्यांत 
एकच सवाल?
गुलाबी नोटेवर 
फोटू का?