Sunday, March 15, 2015

मेथी उडीद वड्यांची भाजी


मेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी  हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी  निवडत होती. मी म्हणालो, चार पाच दिवसांपासून, रोज-रोज तेच-तेच गाजर-मटार, फुलगोबी, वांगे (घ्या मौसमात या भाज्या स्वस्त मिळतात) खाऊन कंटाळळो आहे. सुक्या बनविता येत असल्यामुळे, ऑफिसच्या  डब्यात ह्याच भाज्या खायला मिळतात. खंर म्हणावे तर सौने काल एक वाटी उडीद डाळ भिवून ठेवली होती, उडीद गोळ्यांची भाजी बनविण्याचा तिचा विचार होता.  ती म्हणाली मेथी टाकून उडीद वड्यांची भाजी चालेल का?  नाही,  हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे, हो म्हणावेच लागले. अश्यारीतीने ही भाजी आज सकाळी खायला मिळाली. 

साहित्य: वड्यांसाठी -रात्र भर भिजवून उडीद डाळ - एक  वाटी, मेथी धुऊन बारीक चिरलेली, एक वाटी, लसूण(५-६ पाकळ्या), आलं (अंदाजानुसार), मिरचीचे (१-२)पेस्ट, मीठ , हळद, धनिया पावडर -१ चमचा, गोडा मसाला एक चमचा. 

कृती: उडदाची डाळ मिक्सर मधून पिसून घ्यायची. शक्यतो पाणी नका टाकू. त्यात चिरलेली मेथी, आलं, लसूण मिरची पेस्ट, हळद धनिया पावडर, गोड मसाला, मीठ  मिसळून फेटून घ्या.   कुकरच्या एका भांड्यात तेलाचा हात लाऊन मिश्रण  त्यात घाला व कुकरचे झाकण बंद करून. गॅस वर कुकरची एक-दोन सिटी काढून घ्या. थंड झाल्यावर एका ताटात  वड्या कापून घ्या. 


कृती भाजी:  दोन कांदे , तीन टमाटो, आलं (१/२ इंच), लसूण (३-४ पाकळ्या), मिरची १-२. सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्या.  गॅस वर कढई ठेऊन त्यात ३-४चमचे तेल टाका, तेल गरम झाल्यावर मोहरी (१/२ चमचा) टाका . मोहरी तडतडल्या वर मिक्सर मधली पेस्ट टाका. ५-६ मिनिटे तेल सुटे पर्यंत परतवा.  मग त्यात गरम मसाला(१ चमचा), धनिया पावडर (१ चमचा), हळद (१/२ चमचे), तिखट (१-२ चमचे) टाकून परतवून घ्या. नंतर  १ गिलास पाणी घालून उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर मीठ -१/२ चमचे (आधी वड्यात मीठ घातले आहे, आता फक्त ग्रेवी साठी मीठ)  व नंतर त्यात वडे घालून, एक वाफ काढून घ्या.

जेवताना गरमा-गरम मेथी उडीद वड्यांची भाजी पोळी  आणि भाता सोबत मस्त लागेली.





No comments:

Post a Comment