Saturday, August 23, 2014

कामधेनु

 

 

जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर  मनात आलेले विचार....

हक्काची गाय आणली
पुढ्यात चारा टाकला
तिने भरपूर दूध दिले.
सखी, भार्या, माता
कर्तव्य चोख बजावली.

चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य
त्यात कसले आले प्रेम
माझा शुद्र पुरुषी विचार.

त्या दिनी हॉस्पिटल मध्ये
दोन्ही हातानी मला
बेड वर बसविले.
डोकावुनी तिच्या डोळ्यांत पाहिलं
तिथे दिसले केवळ
निखळ निरागस प्रेम.

स्वत:ची लाज वाटली
का ओळखू नाही शकलो
प्रेम तिचे?

थरथरत्या हातानी
तिचा हात घट्ट पकडला
कापऱ्या आवाजात म्हणालो
भीती वाटते मला.

खंबीर आवाजात ती म्हणाली
काही नाही होणार तुम्हास्नी
मी आहे ना.

त्या क्षणी  ती मला
यमराजाशी झुंज देणारी
सावित्री सम भासली.


प्रेमाच्या  माणसांसाठी
सर्वस्व अर्पण करणारी
संसारात सुखाचे
रंग भरणारी.
खरोखरीची
कामधेनूच ती. 


Friday, August 22, 2014

कापूसकोंड्याची खरी गोष्ट


फार पूर्वी विदर्भ देशात आटपाट नगर होते, नगरच्या वेशीवर धनाजी नावाचा शेतकरी आपल्या बायको आणि एकुलत्या एक छकुल्या सोबत सुखाने नांदत होता. आपल्या शेतात तो कधी ज्वारी, तर कधी तूर, भुईमूग इत्यादी पिक घेत होता.  वरुण राजाच्या लहरीपणाचा फटका विदर्भाला नेहमीच बसतो. धनाजी सारख्या शेतकरीच्या भाग्यात लक्ष्मी नव्हती पण दुर्भिक्ष पडले तरी उपासमार व्हायची नाही. पोटाचा खड्डा अर्धा तरी भरल्या जात असे.
    
एक दिवस धनाजी शेत नागरत होता. अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो. मला मय दानवाने पाठविले आहे, तुझा उद्धार करायला. तुझ्या येण्याने माझा उद्धार कसा काय होईल,धनाजीने पुसले.  त्यावर कापूसकोंडा म्हणाला, मी कसा पांढरा  शुभ्र, रोप्या सारखा, मला तुझ्या शेतात राहायला जागा दे. माझी लागवड कर पांढरी  शुभ्र कापसी तुझ्या शेताची शोभा वाढवेल, रोप्याच्या नाण्याची बरसात होईल. धनाजीने विचारले, खरंच असं होईल का?  मी का खोटं बोलेल, एकदा बघ कि माझ्याकडे, कापूसकोंडा म्हणाला. धनाजी ने कापूसकोंड्या कडे पुन्हा एकदा टक लाऊन बघितले. रोप्यासारखा पंधरा शुभ्र लांब-लचक रेषांचा कापूस जर शेतात लावला तर नक्की रोप्याच्या नाण्यांची बरसात होईल. पण कुठली ही गोष्ट फुकट नाही मिळत हे ही धनाजीला माहित होते. त्याने कापूस कोंड्यास विचारले, माझ्या शेतात राहण्याचे तू काय घेईल. कापूस कोंडा म्हणाला मला काहीच नको, अट एकच, एकदा मी या शेतात आलो कि नेहमी साठीच  इथे राहणार. शिवाय  मला लावण्या आधी दरवर्षी मय दानवाची पूजा बांधावी लागेल, त्या साठी मोजावे लागतील १०० रोप्यांचे नाणे रोख. भरपूर पाणी, खत आणि विष ही मला पाजावे लागेल.  कबूल असेल तर मी इथे थांबतो. रोप्यांचे नाण्याचे स्वप्न बघत धनाजीने कापूसकोंड्यास शेतात राहण्याची विनंती केली. वरुण राजाची कृपा झाल्या मुळे त्या वर्षी धनाजीच्या शेतात भरपूर कपाशी लागली. खरं म्हणाल तर आटपाट नगरीच्या चहूकडे रोप्या सारखा शुभ्र कापूसच-कापूस  दिसत होता. कपाशीचे भरघोस पिक पाहून राजाचे मन चलबिचल झाले. राज्याची रिकामी तिजोरी भरण्याचा हीच वेळ. राजाने कपासिला आटपाट नगरच्या बाहेर विकण्यास प्रतिबंध लावला. स्वस्तात सर्व कापूस खरेदी केला.  कुठे धनाजी रोप्यांच्या नाण्यांचे स्वप्न पहात होता, कुठे त्याच्या नशीबी तांब्यांची नाणी आली. भरघोस पिक घेऊन ही त्याचे नुकसान झाले. आपल्या भाग्याला दोष देत, शेतात येऊन तो कापूसकोंड्यास म्हणाला, तुझ्या मुळे मला पहिल्यांदाच नुकसान झाले, तू येथून निघून जा, अन्यथा माझ्या बायको मुलावर उपाशी राहण्याची पाळी येईल.  त्या वर कापूसकोंड्याने  राक्षसा सारखा अट्टहास केला आणि म्हणाला धनाजी, अट आठव, मी आता येथून जाणार नाही. तू सावकाराकडे जा, शेत गहाण ठेव, १०० रोप्यांची नाणी आण, पुन्हा मय दानवाची पूजा बांध आणि माझी पेरणी कर. धनाजी जवळ दुसरा पर्यायच नव्हता, त्याने शेत गहाण ठेवले, १०० रोप्यांची नाणी आणली आणि मय दानवाची पूजा बांधली.

पण त्या  वर्षी वरुण राजाने विदर्भ देशावर पाउस पाडलाच नाही. पाण्या अभावी धनाजीचे शेत सुकून गेले. आता मात्र धनाजीचे डोके फिरले, तो कापूसकोंड्यास म्हणाला, तुझ्या नादी लागून माझा सत्यानास झाला. आता सावकाराचे कर्ज कसे फेडणार, बायको-मुलाला काय खाऊ घालणार? कापूसकोंडा हसत म्हणाला, मूर्ख, पाताळातले राक्षस आम्ही, माणसांचे रक्त पिणारे, आमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. रोप्याची नाणी पाहिजे होती न तुला, आता भोग आपल्या कर्मांचे फळ. जा त्या पिंपळाच्या झाडावर चढून गळफास लाव, आत्महत्या कर. हाच एक मार्ग तुझ्या साठी शिल्लक आहे. धनाजीने गळफास लाऊन आत्महत्या केली. त्या रात्री कापूस कोंड्याने राक्षसी वेश धरण करून त्याचे रक्त प्राशन केले.

अवसेची रात्र होती, घरात चूल्हा थंड पडलेला होता. छकुला अर्धपोटी अणि माय उपाशी होती. कुणाला ही झोप येत नव्हती. दोघे ही जागे होते. छकुल्याने विचारले आई, बाबा कुठे गेले? माय काय सांगणार. छकुल्याचे लक्ष दुसरीकडे  वेधण्यासाठी, ती म्हणाली, बाळ, तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू. पण ती तरी कशी सांगणार, कापूसकोंड्याच्या नादी लागून त्याच्या बापाचे प्राण गेले, शेत गेल, उपासमार नशिबी आली. काय-काय सांगणार. माय चूप झाली. कापूस कोंड्याची गोष्ट अशीच अधुरी राहिली. तेंव्हापासून विदर्भात कुणीच कापूसकोंड्याची गोष्ट सांगत नाही.

टीप: कापूसकोंडा: बीटी कॅाटन

मय दानव: अमेरिकन बीज कंपनी....

Wednesday, August 20, 2014

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?


श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर  ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेळाडू ने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता. त्या दिवशी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे सदू झोपायला बिस्तारावर पडला. तेवढ्यात त्याचा मोबईल वाजला. ‘च्यायला रात्रीच का लोकांना फोन करायची आठवण येते, मनातल्या मनात दोन शिव्या हाणत त्याने फोन उचलला’, दुसरी कडून आवाज आला, मी भारतीय क्रिकेट बोर्डाचा सचिव बोलतो आहे, अभिनंदन सुखात्मे, भारतीय क्रिकेट टीम मध्ये प्रारंभिक फलंदाज म्हणून पहिल्या वन डे मॅच साठी तुमचे सिलेक्शन झाले आहे.  ‘रात्री-अपरात्री थट्टा-मस्करी करायला आणिक कोणी सापडलं नाही का’? सदू ओरडला. ‘शांत व्हा, थट्टा-मस्करी करायला मला वेड नाही लागले आहे आणि मजजवळ तेवढा वेळ ही नाही. विश्वास नसेल तर टीवी उघडून बघा, तो पर्यंत मी होल्ड करतो. सदूने टीवी उघडला, ब्रेकिंग न्यूज सुरु होती. भारतीय क्रिकेट बोर्डचा नवा अभिनव  प्रयोग. देशातील लोकांचे मोबईल कम्प्युटर मध्ये फीड करून, एक नंबर काढला, तो मुंबईचा सदानंद सुखात्मे यांचा आहे, त्यांची निवड इंग्लंड विरुद्ध पहिल्या मॅच साठी झाली आहे. त्यांना या एका मॅच साठी १ कोटी रुपये पारिश्रमिक ही मिळेल. पाहू या ते भोपळा फोडण्यात यशस्वी होतात कि नाही. बातमी पाहताच सदूची बोबडीच वळली, बेंबीच्या देठाने सर्व बळ एकत्र करून एका दमात ओरडला, 'अहो, मला क्रिकेट खेळता येत नाही. चेंडूची ही भीती वाटते, उगाच हात-पाय तुटले माझ जे होईल ते होईल पण जग तुमच्यावर हसेल, एक कोटी ही पाण्यात जातील.  शिवाय माझ्या जवळ पासपोर्ट वैगरे ही नाही. त्या साठी सरकारी परमिशन घ्यावी लागते'. (च्यायला, सदूची मराठी मानसिकता बाहेर पडलीच, एखादा पंजाबी माणूस असता, तर १ कोटी साठी मंगळावर ही जायला तैयार झाला असता, ते ही कुठला प्रश्न न विचारता). दुसरी कडून आवाज आला, ‘तुमची भीती व्यर्थ आहे सुखात्मे साहेब, चेंडू लागला तरी तुम्हाला इजा होणार नाही याची खात्री देतो. कोट्यावधी रुपये घेऊन स्टार खेडाळूना भोपळा फोडता आला नाही ही सद्य परिस्थिती आहे, तुम्ही निश्चित त्यांच्यापेक्षा चांगले खेळाल, पासपोर्ट विजा सर्वांचा बंदोबस्त आम्ही बघून घेऊ. उद्या संध्याकाळची फ्लाईट आहे. तुम्ही फक्त तैयार राहा’ आणि त्याने फोन खाली ठेवला. अश्यारितीने सदू इंग्लंड विरुद्ध पहिली मॅच खेळण्यासाठी सज्ज झाला.

भारताने नाणेफेक (टॅास) जिंकली. धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन सोबत आपला सदू मैदानात उतरला. पहिला ओवर त्याला खेळायचा होता तो ही एन्डरसनचा. खरं म्हणाल तर, सदूचे सर्वांग थरथर कापत होते, मनोमन रामरक्षा म्हणत सदू एन्डरसनचा पहिला चेंडू खेळण्यास तैयार झाला. एन्डरसनने पहिला चेंडू फेकला. सदूने डोळे बंद केले आणि बॅट हवेत फिरवला. चेंडू बॅटचा कार्नर वर लागला आणि स्लीपच्या वरून बाउन्डरीच्या बाहेर गेला. दुसर्या चेंडू वर ही असेच झाले.  एन्डरसनने रागाने एक बाउन्सर टाकला. चेंडू सरळ येताना पाहून सदूने डोळे बंद करून संगकारा जसा बॅट वर करून खेळतो जवळपास तशीच  बॅट सदूने वर केली. चेंडू बॅट वर लागला आणि विकेटकीपरच्या डोक्या वरून ६ रन साठी बाउन्डरीच्या बाहेर गेला. पहिला ओवर संपला. तीन चौकार आणि एक षटकार असे १८ रन सदूच्या खात्यात जमा झाले. एन्डरसनला एवढा मार कधीच पडला नसेल. दैवाला दोष देण्या व्यतिरिक्त तो काही ही करू शकत नव्हता.  दुसर्या ओवर मध्ये शिखर धवन ने ही जोश मध्ये येऊन दोन चौकार हाणले. तिसरा ओवर सुरु झाला, पुन्हा एन्डरसन समोर होता. पहिला चेंडू नेहमीप्रमाणे ऑफ स्टंप वरून बाहेर उसळला, बाहेर जाणारा चेंडू बॅट लागला आणि दोन स्लीपच्या मधून मैदानाबाहेर गेला. कप्तान कुकने एन्डरसनला काही निर्देश दिले. दुसरा चेंडू त्याने इनस्वींगर टाकला, चेंडू आपल्या दिशेने यातना पाहून भीतीने सदूने बॅट समोर केली, एक जोरदार झटका त्याला लागला, चेंडू बॅटला लागून पुढच्या पायाच्या चाटून  फाईनलेगच्या दिशेने मैदानाच्या बाहेर गेला. तिसरा चेंडू  एन्डरसनने ऑफ स्टम्पच्या दिशेने सरळ फेकला, साहजिक सदू लेग साईडला मागे सरकला पण त्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला, चेंडू हवेत उडाला पण विकेटकीपरच्या मागे एक टप्पा पडून चेंडू पुन्हा मैदाना बाहेर गेला. सदूच्या खात्यात आतापर्यंत ३० रन जमा झाले. हा प्रकार बघून एन्डरसन भयंकर वैतागला होता. म्हणतातना ‘बकरे कि माँ कब तक खैर मनाएगी’. आता त्याने सरळ स्टंपच्या दिशेने यार्कर फेकला. चेंडूने सदूचा त्रिफळा उडविला. एन्डरसन आणि सदू दोघांनी सुटकेच्या निश्वास टाकला. सदू पेवेलीअन मध्ये परतला. सर्वांनी टाळ्या वाजवत त्याचे स्वागत गेले. इंग्लंड मध्ये पहिल्यांदाच भारतीय टीमला एक चांगली सुरुवात मिळाली होती. पेवेलीअन मध्ये बसून मॅच पाहणारा भारतीय संघाचा एक अधिकारी दुसर्याला म्हणाला, हा प्रयोग तर यशस्वी झाला. आता सिलेक्शन क्राईटेरीयात थोड बदल करू या. लोकांकडून मोबाइलवर मेसेज मागवू, जे मेसेज पाठवतील त्यांचे नाव सिलेक्शन करता कन्सिडर करू. रेट १० रु. प्रती मेसेज ठेऊ या. सहज २०-२५ कोटी रुपये एकत्र होतील. चांगला आईडिया आहे, दुसरा अधिकारी उतरला.

 नेहमीप्रमणे  भारतीय स्टार क्रिकेटपटू, मैदानात उतरण्याची रस्म अदायगी करून भोपळा न फोडताच पेवेलीअन मध्ये परतले. १०० रनांच्या टीम ऑल ऑउट झाली. सदू सर्वात जास्त रन बनविणारा क्रिकेटवीर ठरला. आता इंग्लंडची टीम मैदानात उतरली. सदू विकेट कीपर धोनी जवळ पहिल्या स्लीप वर उभा होता. भुवनेश्वर कुमारने टाकलेला पहिलाच चेंडू इंग्लंडच्या खेडाळूच्या बॅटच्या बाह्य किनार्याला लागून सरळ सदूच्या दिशेने उसळला. चेंडूला आपल्या दिशेने येताना पाहून सदू भीतीने किंचाळला.  अहो, केवढ्या जोरात ओरडता, दोन थेंब पाणीच तर अंगावर टाकले, काही स्वप्न वैगरेह पाहत होता काय? सौ.चा आवाज ऐकून, सदू ताडकन बिछान्यावरून उठला. डोळे चोळून समोर पहिले, सौ. समोर उभी होती. सदूचे स्वप्न भंग झाले होते. तो चिडून म्हणाला, सकाळी-सकाळी तुझ्या मुळे किती नुकसान झाले आहे, माहित आहे का? तब्बल एक कोटी रुपयांचे. सौ. आ! वासून सदू कडे पाहतच राहिली.












Sunday, August 17, 2014

बाबूंचे अच्छे दिन आले

  

(बाह्य दिल्लीत  राहणारे  काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत)


दोन तास जायला
दोन तास  यायला
वर दहा तास काम
बाबूंचे असे
अच्छे दिन आले.

न घेताच सुट्ट्या
कश्या काय संपल्या
मिनिटाच्या उशिराने
पाण्यात त्या बुडाल्या.
बाबूंच्या सुट्ट्यांचे असे
अच्छे दिन आले.

कचर्याचे ढिगारे
आता स्वच्छ झाले.
पान-तंबाकू थुंकणे
आता बंद झाले.
कारीडोर भिंतींचे असे
अच्छे दिन आले

कागजी घोडे पुन्हा
दौडू लागले.
फाईलींना नवे
जीवन मिळाले.
सरकारी कामांचे असे
 अच्छे दिन आले. 

Friday, August 15, 2014

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा


(दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे).

मनीं लोचनी श्री हरी तोची पाहें.
जनी जाणता भक्त होऊनी राहें.
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा.

समर्थ रामदास म्हणतात ज्याच्या मनांत व लोचनांत म्हणजे आंत व बाहेर श्रीराम. तोच त्याला सर्वत्र दिसत असतो. अंतर्बाह्य रामरूप भरून गेल्यामुळें त्याला ज्ञानीही म्हणावें व भक्तही म्हणावें किंवा जाणता भक्तम्हणावे त्याची बैठक बसलेली असते. त्याचा ठिकाणीं ज्ञान व भक्ती एकरूप झालेली असतात. तो पूर्ण ज्ञानी असून  सगुणांचे प्रेम व साधनाचा क्रम दोन्ही राखून असतो. तो सर्वोत्तम भक्त धन्य होय. ((मनोबोध: ४७)


समर्थ स्वत:ला श्रीरामाचे दास  म्हणायचे. पण दास कसा जाणताअसायला पाहिजे. पण श्रीरामाचा जाणता दास म्हणजे कोण? हा प्रश्न समोर येतो. उदाहरण. मी सकाळी उठून श्रीरामाचे नाव घेतो, सतत रामनामी माळा हातात  घेऊन राम नाम जपत राहतो, श्रीरामाचे स्वरूप सतत डोळ्यांसमोर असते, शिवाय रोज श्रीरामाच्या देवळात जातो व रामनवमीचा व्रत आणि भंडारा ही करतो. मी श्रीरामाचा दास आहे का? उत्तर नाही. केवळ प्रभूचे ध्यान करणे म्हणजे प्रभू भक्ती नाही’.  समर्थांनी म्हंटले आहे  गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचाजाणता भक्त केवळ श्री रामाची पूजा अर्चना करून थांबत नाही अपितु  प्रभू रामचंद्राने दाखविलेल्या मार्गावर चालतो. अर्थात त्यांचे मनसा वाचा कर्मणा अनुकरण करतो. समर्थ रामदास श्रीरामाने दाखविलेल्या मार्गावर आयुष्य भर चालले आणि मनाचा श्लोकाच्या माध्यमातून तोच मार्ग आपल्या शिष्यांना दाखविला

आता प्रभू रामचंद्र कसे होते. समर्थ म्हणतात नसे अंतरीं कामकरी विकारी उदासीन तो तापसी ब्रह्मचारीश्री राम सर्व प्रकारच्या कामवासने पासून मुक्त, परस्त्रीला माते समान मानणारे, शिवाय सदा प्रिय बोलणारा, सदा सर्वदा सत्यवादी विवेकीन बोले कदा मिथ्य वाचात्रिवाचा सदा बोलणें नम्र वाचा सुवाचाश्री राम सत्यवादी होते पण कसे नम्र आणि रुचकर बोलणारे होते. आपल्या मधुर बोलण्याने त्यांनी परशुरामाचा क्रोध शांत केला होता.  आपल्या माता-पिताच्या आज्ञापालन हेतू त्यांनी आनंदाने वनवास स्वीकारला. दृढ निश्चयी श्रीरामाने तारुण्यात अरण्यवास स्वीकारला. 

श्रीरामांच्या काळी जवळपास गंगेच्या दक्षिणेपासून तर समुद्रापर्यंत भरतभूमी वर लंकेच्या राजा रावणाचे राज्य होते. अरण्यात राहणाऱ्या दीन-दुबळ्या लोकांच्या शोषणावर सोन्याची लंका उभारली होती. जाणून-बुजून जनतेला अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारात ठेवले होते. अज्ञान आणि अशिक्षेचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे हेच रावणाचे धोरण होते. स्त्रियांचे अपहरण बलात्कार रोजच्या बाबी होत्या. विरोध करणार्यांचा नायनाट करणे हेच राक्षसी धोरण होते. जंगलात राहणारे वनवासी, भिल्ल, शबर, वानर इत्यादी रोज मरण पाहत जगत होते. दंडकारण्यात आल्यावर श्रीरामाने ही परिस्थिती पहिली. सगुणांची सेवा हीच ईश्वरी सेवा. दीन-दुबळ्या लोकांचे दुख दूर करण्याचा बीडा त्यांनी उचलला.  शबरीचे उष्टे बोर खाणे याचा अर्थ  वनवासी समाजाला श्री रामचंद्राने आपले मानले असा असा होतो. वानर राज सुग्रीवला आपले बंधू मानले. तेथील राक्षसांचा संहार करून वनवासी जनतेला राक्षसी अत्याचारापासून मुक्त केले. साहजिक रावणा बरोबर संघर्ष अनिवार्य होता.  यात श्रीरामाची कुठलीही स्वार्थ बुद्धी नव्हती म्हणून रावणाचा वध करून बिभीषणाला धर्मानुसार राज्य करण्यासाठीलंकेचे राज्य  सौपविले.

समर्थांच्या वेळी ही महाराष्ट्रात हीच परिस्थिती होती. मोगली आणि आदिलशाही अत्याचाराने प्रजा त्रस्त होती. लोकांना आपापल्या धर्मानुसार वागून कर्म करणे कठीण झाले होते. श्रीरामाच्या भक्तीत रंगलेल्या समर्थांनी रामराज्याचे स्वप्न महाराष्ट्राच्या भूमीवर पाहिले. रामभक्त हनुमाला आपला आदर्श मानले. श्री हनुमंताचे वर्णन करताना तुलसीदास म्हणतात:   

बिद्यावान गुनी अति चातुर.
राम काज करिबे को आतुर.
भीम रूप धरि असुर सँहारे.
रामचंद्र के काज सँवारे.

समस्त शास्त्रांचे ज्ञान, गुणी चतुर आणि श्रीरामाचे कार्य दुष्ट असुरांच्या संहारास सदैव तत्पर राहणारे’ असे रामभक्त हनुमान होते. समर्थांनी हनुमानाचे अनुकरण केले. लहानपणीच सन्यास घेतला. १२ वर्ष तप केले अर्थात समस्त शास्त्रांचा गहन अभ्यास केला आणि रोज १००८ सूर्य नमस्कार करून शरीर ही बलवान केले. समर्थ मृदभाषी, बोलण्या सारखे चालणारे होते. लोकांना ओळखून त्यांच्या करून योग्य कार्य संपादित करवून घेण्याचा गुण होता. आपल्या सारखे असेच लाखों शिष्य त्यांनी महाराष्ट्रात घडविले. समर्थांनी आपल्याच मुखाने म्हंटले आहे समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे. सारांश, समर्थांनी  जनतेला जागृत करून रामाचे कार्य पूर्ण करण्यास प्रेरणा दिली.  या निष्ठावंत समर्थ शिष्यांच्या सहयोगाने, ज्या वेळी देशांत अन्य भागात मंदिरांचा विध्वंस होत होता. समर्थांनी महाराष्ट्रात समर्थ संप्रदायच्या मठांची स्थापना केली, जाती-पातीचा कुठलाच भेदभाव न ठेवता मठांवर योग्य शिष्यांची नेमणूक केली. देशाच्या उन्नतीत स्त्रियांचा ही बरोबरीचा वाटा असतो असा त्यांचा विश्वास होता म्हणून अत्यंत विश्वासाने त्यांनी स्त्रियांना ही मठांचे दायित्व सौपविले. समर्थ काळाच्या मानाने पुष्कळ पुढे होते. त्या काळचा एक पोर्तगीज लेखक कॉस्मे डी गार्डा लिहितो समर्थांच्या मठांमध्ये  कुठला ही भेद-भाव नाही. युद्धात घायाळ मुस्लीम सैनिकाला ही इथे आसरा मिळतो’.  समर्थांच्या मनात कुठल्या ही धर्म संप्रदाय विषयी द्वेषभाव न्हवता. समर्थांच्या कार्यामुळेच प्रजा गुणसंपन्न आणि बलवान झाली. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना करण्यास परोक्षरूपेण मदत झाली. हे सांगण्याची गरज नाही.

समर्थांनी आपल्या बोलण्या आणि वागण्याने समर्थांचा दास कसा असतो दाखविले. गुलामीच्या अंधारात खितपत पडलेल्या दीन-दुर्बल जनतेला स्वराज्याचा सूर्य दाखविला आणि श्रीरामाचे कार्य पूर्ण केले. समर्थांनी म्हंटले आहे: स्वप्नी जे देखिले रात्री  ते ते तैसेची होतसे. बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छसंहार झाला.

श्रीरामाची भक्ती म्हणजे केवळ श्रीरामाचे स्मरण करणेच नाही. अपितु श्रीरामाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून जो योग्य मार्गाने समस्त सगुणाचे दुख दूर करतो तोच खरा जाणता भक्त होय. असा भक्तच भगवंताचा सर्वोत्तम दास असतो. आज स्वतंत्रता दिवस आहे, आपण ही श्री रामाने दाखविलेल्या मार्गावर चलण्याचा प्रयत्न करून, देशात रामराज्य स्थापनेचा प्रयत्न करू जेथे कुणी ही दुखी नसेल.  



Thursday, August 14, 2014

चाटवाला आणि कावळा


उत्तम नगर येथील भोलू चाटवाल्याची आलूची टिक्की फार प्रसिद्ध आहे. बाजारात मिळणाऱ्या आलू टिक्कीपेक्षा दुप्पट आकाराची, आत मध्ये भरपूर पनीर, काजू, किसमिस, वाटणे आणि चण्याच्या मोकळी डाळ भरलेली. शिवाय सजावटी साठी वर चिंच खजूरची चटणी, हिरवी चटणी, गोड दही, अदरकचे लांब काप, डाळींबाचे दाणे व चाट मसाला. स्वाद ही अप्रतिम. आलू टिक्कीचा रेट ८०रु प्लेट असला तरी ही रोज सायंकाळी टिक्की खाण्यासाठी ग्राहकांची लाईन लागायची.  


Crow, Raven, Raven Bird, Black, Bill

काही दिवसांपासून एका कावळ्याने भोलू चाटवाल्याला हैराण-परेशान करून सोडले होते. हा कावळा दुकानात शिरून थेट ग्राहकांच्या प्लेट मधून टिक्की पळवायचा. भोलूच्या आरडा ओरड करून कावळ्याला दूर पळविण्याचा प्रयत्नाला कावळा  काही दाद देत नव्हता. जालीम उपाय म्हणून भोलूने गुलेल विकत घेतली. दररोज प्रमाणे कावळा जसा टिक्की पळविण्याच्या उद्देश्याने दुकानाजवळ आला, गुलेल मध्ये दगड टाकून भोलूने त्यावर नेम धरला.  निरीह कावळ्याला मारून तुला मुक्ती मिळणार नाही, तुझ्या समस्येचे समाधान होणार नाही, या आवाजाने  भोलूचे ध्यान भंग झाले. त्याने समोर पहिले हातात एक कमंडल घेतलेला एक म्हातारा साधू उभा होता.  त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. साधूला पाहताच भोलू म्हणाला, महाराज या कावळ्याने मला हैराण परेशान करून सोडले आहे. कावळ्याला भिऊन ग्राहक येऊनासे झाले आहेत. तुम्हीच सांगा मी काय करू. साधू हसून म्हणाला, बेटा, कावळ्याला मारून ही समस्या दूर होणार नाही, अतृप्त प्रेतात्मा दुसरे रूप धरून तुला त्रास देईलच. भोलू म्हणाला, महाराज माझ्या असल्या भाकड कथांवर विश्वास नाही. साधू म्हणाला, स्वत:च्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितल्या वर विश्वास होईल न, म्हणत साधूने कमंडलातले पाणी हातात घेऊन एक वर्तुळ जमिनीवर काढले. त्या अतृप्त आत्म्याला आव्हान केले. कावळा गुपचूप येऊन वर्तुळात बसला.  तो पर्यंत काही बघे ही एकत्र झाले होते, तमाशा पाहण्यासाठी. साधूने कावळ्यास विचारले, तू या दुकानदाराला का त्रास देतो आहे, कावळ्याने काव-काव करत कावळ्याच्या भाषेत उत्तर दिले. साधूने  पुन्हा विचारले, अरे पण अश्यारितीने टिक्की पळविणे म्हणजे पाप नाही का? त्याचे फळ तुलाच भोगावे लागणार ना. कावळ्याने पुन्हा काव-काव म्हणत उत्तर दिले. साधूला हसू आले, भोलूने विचारले महाराज हसताय का? साधू म्हणाला, कावळा म्हणतोय त्याच्या चोरून टिक्की खाण्यामुळे तुझ्या दुकानाला ही प्रसिद्धी मिळते आहे. भलतीच हुशार आहे ही अतृप्त आत्मा. भोलू  म्हणाला,  आपण काय म्हणताय महाराज, मला काहीच समजले नाही. साधू म्हणाला, भोलू, तुझ्या दुकानासमोर अपघात झाला होता का? भोलू म्हणाला, महाराज, जवळपास वर्षापूर्वी, रस्ता ओलांडून या बाजूला येणारा एक माणूस गाडी खाली आला होता. साधू म्हणाला, टिक्की खाण्याच्या हेतूने रस्ता ओलांडताना जो माणूस गाडी खाली आला, त्याचीच अतृप्त आत्मा कावळ्याचे रूप धरून आपली अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्थात टिक्की खाण्याच्या उद्देश्याने तुझ्या दुकानात येते. भोलू  म्हणाला, महाराज, कदाचित! आपले म्हणणे खरे असेल, पण या वर उपाय काय? साधू म्हणाला, उपाय एकच, रोज पहिली टिक्की कावळ्याच्या नावाने अलग काढून ठेव. श्राद्धपक्षात आलू टिक्कीचा नवैद्य दाखवून कावळ्याचे श्राद्ध कर. त्याला ही मुक्ती मिळेल आणि तुला ही कावळा छळणार नाही. भोलूने साधू म्हणण्यानुसार रोज कावळ्या साठी टिक्की काढून प्लेट मध्ये ठेऊ लागला.  कावळा येऊन ती टिक्की खात असे. हे दृश्य बघायला, शेकडोंनी लोक जमा होऊ लागली. साहजिकच आहे, त्यामुळे भोलू चाटवाल्याला भरपूर  प्रसिद्ध मिळाली. श्राद्ध पक्षात त्याने आलू टिक्कीचा नवैद्य दाखवून  कावळ्याचे श्राद्ध केले. अखेर त्या अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळाली. भोलूचे दुकान हि प्रसिद्ध झाले. 

 

 

टीप: उत्तम नगर येथे एका दुकानात अप्रतिम आलू टिक्की मिळते. जूनच्या शेवटच्या शनिवारी सौ. बरोबर टिक्की खाण्याचा बेत केला होता. पण दैव आडव आलं. हृदयाने  दगा दिला. सर्जरी नंतर घरी आल्यावर आपल्या मनातील बेत सौ.ला सांगितला. ती म्हणाली, आता वर्षभर टिक्की वैगरे विसरा. पुन्हा खाटल्यावर पडल्यास मी काही सेवा करणार नाही. त्याच दिवशी रात्री स्वप्न पडलं.....  


(माफ करा, अंधविश्वास पसरविण्यासाठी नाही केवळ गमंत म्हणून ही कहाणी लिहली आहे)             

Saturday, August 2, 2014

वात्रटिका : भाजी आणि पुस्तक



 पुस्तकात विवादास्पद विधाने का केली जातात?



मसाल्याच्या तड़क्या शिवाय
भाजीला स्वाद येतच नाही.
विवादाच्या तड़क्या शिवाय
पुस्तक खपतच नाही.



तड़का = फोडणी 


Thursday, July 31, 2014

सोनेरी फुलं आणि म्हातारा

हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच क्यारीत सोनेरी फुलं वार्या सोबत डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान !. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न! म्हणत मोबाइलचा आवाज वाढवायचा. कधी फुलांना बांसुरी तर कधी गाणे ऐकवायचा. कधी-कधी किस्से-कहाण्या हि सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.

एक दिवस नेहमी प्रमाणे म्हातारा, पहाटे बगीच्यात आला. पाहतो काय, क्यारीतली फुलं कुणी उपटलेली होती. म्हाताऱ्याच्या काळजात धस्स झाल. तो मटकन खाली बसला. बहुतेक क्रिकेट खेळणाऱ्या द्वाड मुलांचे काम असेल. त्यांना मनातल्या मनात असंख्य शिव्या मोजल्या. एक कोमजलेले निर्जीव सोनेरी फुल उचलून आपल्या काळजापाशी घट्ट धरले, अचानक म्हातार्याला छातीत कळ जाणवली.

आजोबा, कसं वाटतंय आता, एका सोनेरी फुलाच्या आवाजाने म्हात्याराने डोळे उघडले, समोर क्यारीत सोनेरी फुलं मस्त वाऱ्यावर डोलत होती. आपण स्वप्न तर नाही पाहत आहोत, म्हातार्याच्या मनात विचार आला. म्हाताऱ्याने, आपल्या प्रेमळ हाताने फुलांना गोंजारले आणि खात्री केली. नेहमीप्रमाणे फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो? एका फुलाने उत्तर दिले, आम्ही, मस्त आहोत आजोबा, आता कसलीच काळजी नाही, इथे कुणी आम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही थकले असाल आजोबा, फार लांबचा प्रवास झाला ! जरा निवांत पडा, तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो. नंतर आपण निवांत बोलू, भरपूर वेळ आहे, आपल्याकडे. म्हाताऱ्याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते.

Tuesday, July 29, 2014

विडंबन: देखो देखो पंछी उड़ रहा है.

बहुतांश विज्ञापन भ्रमित करणारे असतात. काही विज्ञापनात सत्य दडलेले असतात. फक्त आपल्याला समजायला हवे.  दिल्लीत बहुतेक तरुण मंडली वेडी-वाकडी आणि तुफान बाइक चालवितात एखाद्या पक्ष्या प्रमाणे. परिणाम काय होतो:

किक मारुनी बाईक
तुफान त्याने फेकली .

शरीर सोडूनी तत्क्षणी
पंछी उडाला आकाशी.

लोक ही म्हणतात कसे
देखो देखो 
पंछी उड़ रहा है

Saturday, July 26, 2014

व्यंग - धोबीचा कुत्रा



बिभीषणाने दिला होता
रावणाला हो दगा.
बदल्यात त्याला  मिळाली
सुवर्ण लंकेची हो गादी.

गादी साठी त्याने
पक्ष आपला सोडला.
विसरला होता तो
त्रेता नाही कलयुग आहे हो.

घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.

घर का ना घाट का
धोबिच्या  कुत्र्या सारखा
भुंकत- भुंकत आता
भटकतो गल्ली बोळ्यात.






Thursday, July 24, 2014

डॉक्टर आणि समीक्षक



एकाच्या हातात कात्री 
दुसऱ्याच्या हातात लेखणी 
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड.

डॉक्टरची कात्री 
चालते शरीरावर
बहुतेक रोग्यांचे 
वाचविते प्राण.

समीक्षकाची लेखणी 
चालते कवितेवर 
बहुतांश कवींचे 
*हरते ती प्राण. 


*टीप:  समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात.

Saturday, July 19, 2014

पहाटे येणारी नर्स


हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या म्हणीनुसार माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच.

बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्यावर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नव्हते.  सकाळची वाट  पाहण्या शिवाय गत्यंतर काय?

सकाळचे पाच वाजले, सुहास्य करत ती रूम मध्ये आली, गुड मार्निंग, कैसे हो अंकल (आधीच छातीत चीर पडलेली आणि त्यात “अंकल” मनात म्हणायचो किती  तुकडे होणार या नाजुक हृदयाचे), तरीही तिला पाहून मी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करायचो. जवळ येऊन ती सरळ हाताचे मनगट आपल्या हातात घ्यायची. तिचा नाजुक, कोमल, रेशमी, मुलायम स्पर्श हाताला जाणवताच वेदना कुठच्या कुठे गायब व्हायचा, सर्व शरीर शांत झाल्या सारख वाटायचं. पण दुसर्याच क्षणी, आपल्या खिश्यातून भली मोठी सुई असलेली सिरींज बाहेर काढायची. एका हाताने सिरींज डोळ्यांसमोर नाचवत, दुसर्या हाताने टक-टक करून सिरींज वाजवायची. मग चेहऱ्यावर हास्य आणत, अंकलजी, थोडा दर्द होगा, म्हणत सुई हातात खुपसायची, त्या वेळी तिचा चेहरा अमेजोनच्या जंगलातल्या रक्त पिणाऱ्या वटवाघुळणी सारखा दिसायचा. असे वाटायचे, ती जिभेने लप-लप करून रक्त पीत आहे, आणि रक्त पिऊन तिचे ओठ लाल सुर्ख झालेले आहे. मी डोळे बंद करून घ्यायचो. काही क्षणांनी डोळे पुन्हा उघडायचो, सिरींज मधून रक्त एका ट्यूब ती भरायची. मग पुन्हा चेहर्या वर हास्य आणत, गुड डे, अंकल म्हणत बाहेर जायची, त्या वेळी ही हाताना तिचा ओझरता स्पर्श व्हायचा. ती गेल्या नंतर काही काळ तरी शरीराला वेदना जाणवायच्या नाही. मग पुन्हा त्याच असह्य वेदना सुरु व्हायच्या. कधी-कधी मनात विचार यायच्या, वटवाघुळणी, परत ये, तुझा वेदना दूर करणारा, नाजुक, कोमल, रेशमी स्पर्श मला दे, वाटलं तर पाहिजे जेवढे रक्त पी.

टीप: सकाळी सकाळी, टेस्टिंग साठी रक्त घेणे ही नर्सची ड्युटी होती. बाकी सर्व मनातले विचार आहेत. नर्सेसचा सेवा भाव पाहून मला काय वाटते ते:

नर्स

पृथ्वीवर अवतरली
अमृतघट  घेउनी
अप्सरा शापित कुणी.

रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला 


Wednesday, July 2, 2014

ट्रफिक जाम

गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.