Saturday, August 13, 2016

भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला




(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि  तिच्या चाह्त्यांनीच  तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली )

ज्ञान प्राप्तीसाठी भगवान बुद्ध कठोर तपस्या करत होते. उग्र तपस्येमुळे त्यांचे शरीर हाडांचे पिंजर झाले.  पण त्यांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. वीणेची झंकार ऐकून त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. सुजाताच्या हातची खीर प्रश्न करून ते ध्यानमग्न झाले. त्यांना ज्ञान प्राप्त झाले.  ज्ञानप्राप्ती साठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शरीर हे गरजेचेच. म्हणूनच म्हंटले आहे, 'शरीर माध्यम खलु धर्म साधनं'. भगवान बुद्धाचे शिष्य प्रज्ञावान होते, तपस्या अर्धवट सोडली म्हणून त्यांनी आपल्या गुरुचा बहिष्कार नाही केला,अपितु गुरु कडून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रकाश  जगभर पसरविला. असो. 

राजू गाईडच्या अंगावर भगवे वस्त्र पाहून, भोळ्या-भाबड्या ग्रामस्थांनी त्याला महात्मा समजून त्याचे स्वागत केले. शहरी जीवनातले छक्के-पंजे जाणणारा राजू , ग्रामस्थांच्या नजरेत एक ज्ञानी महात्मा ठरला.  दूर पर्यंत त्याची प्रसिद्धी पोहचली. राजू मुफ्तचा  माल उडवीत मजेत जगत होता. पण 'जगात काहीच मुफ्तमध्ये मिळत नाही, एक दिवस त्याची किंमत मोजावीच लागते'. गावात दुष्काळ पडला, भयंकर दुष्काळ. गावात पूर्वी हि एकदा असा असा भयंकर दुष्काळ पडला होता, तेंव्हा एका महात्म्याने इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी उग्र तपस्या केली होती.  आपले महात्मापण टिकविण्यासाठी राजूला हि तपस्येला बसावे लागले. भुकेने त्याचा जीव कासावीस झाला, पळून जाण्याची इच्छा झाली. पण ज्या प्रमाणे कोळीच्या जाळ्यात अटकलेला कीटक तडफडून मरतो, तसेच आपल्याच महात्म्या रुपी प्रभामंडळात अटकलेला राजू हि उपासमार होऊन मरतो. सिनेमाच्या शेवटी पाऊस पडतो. पण  प्रत्यक्षात असे होत नाही. कित्येक बळीराजांनी आत्महत्या केली तरी इंद्र्देवाचे  हृदय पाझरताना कधी बघितले नाही. कुणी तपस्या केली कि इंद्रदेव प्रसन्न होत नाही, त्या साठी गोवर्धन पर्वतच उचलावे लागते. 

आपले निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ईरोम शर्मिला हि १६ वर्ष आधी उपोषणाला बसली. तिला उपोषणाची प्रेरणा महात्मा गांधींपासून मिळाली होती. पण तिला एक माहित नव्हते. महात्मा गांधी एक चतुर राजनेता होते. उपोषण त्यांचे एक शस्त्र होते.  या उपोषण रुपी शस्त्राचा किती आणि कसा वापर करायचा याची त्यांना चांगली कल्पना होती. त्यांनी या शस्राचा वापर नेहमीच योग्य रीतीने केला आणि आपले हेतू साध्य केले. पण ईरोम ठरली भोळी-भाबडी. तिचा वापर करणार्यांनी तिच्या भोवती एक प्रभामंडळ तैयार केले.  ती त्या प्रभामंडळात अटकली. 

आता एकच प्रश्न डोळ्यांसमोर येतो. कुणी १६ वर्ष उपाशी राहू शकतो का? उत्तर नाही. सरकारने तिला इस्पितळात बंदिस्त ठेवले होते.  तोंडाच्या जागी नाकातून तिला अन्नद्रव्य दिले जात होते.(तांदूळ, भाज्या, डाळ इत्यादी). रुग्णांसाठी असलेली सुविधा तिच्यावर वापरल्या जात होत्या. अर्थात ती उपाशी नव्हती. तिला जिवंत ठेवण्यासाठी सरकारचा भरपूर पैसा हि बरबाद झाला.  तिच्या उपोषणातला फोलपणा निश्चित ईरोमला  हि कळत असेलच.  पण ती हि राजू गाईडप्रमाणे स्वत:निर्मित प्रभामंडळ रुपी जाळ्यात अटकलेली होती आणि तिला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नव्हता. इस्पितळात राहून नाकाने अन्नद्रव्य ग्रहण करण्या अतिरिक्त ती काहीही करू शकत नव्हती. शेवटी हिम्मत करून तिने आपल्या भोवती असलेले प्रभामंडळ तोडले. नाकाच्या जागी तोंडातून जेवण घेण्याचा निश्चय केला. पण घरी आणि गावात तिचे कुणीच स्वागत  केले नाही. कारण तिचा वापर करणारे तिच्या विरुद्ध झाले होते .  तरीही मी तिची हिम्मतीची प्रशंसा करेल. अन्यथा असेच तडफडत तिचे जीवन व्यर्थ गेले असते. 

भगवान बुद्धाने देशभर भ्रमण करून, आपल्या शिष्यांना दूरदेशी पाठवून, धर्माचा प्रसार केला होता.   ईरोम शर्मिला हि या  १६ वर्षांत देशभर फिरून ASFPA (अफ्सपा) विरुद्ध जनजागृती करू शकत होती.   कदाचित  तिच्या प्रयत्नांना यश हि आले असते.   १६ वर्ष तिने व्यर्थ घालविले.   पण म्हणतात ना 'देर आये दुरुस्त आये'.  भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला  आहे.  तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे. 















Thursday, August 11, 2016

अंधविश्वास भाग (४) सुखाचा शोध




अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


समर्थांनी  म्हंटले  आहे  'जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे'. तरी हि प्रत्येक व्यक्ती सुखाचा शोधात असतो. कधी कधी सुख मिळविण्यासाठी तो शार्टकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि 'अंधविश्वासाच्या' जाळ्यात अटकतो.

सामान्य माणसाची सुखाची कल्पना - इच्छित वस्तू मिळाली पाहिजे, घरात लक्ष्मी आली पाहिजे इत्यादी इत्यादी. अगदी छोट्या छोट्या. सदाशिव अर्थात सदूला हि आर्ची आवडायची आणि आर्चीला परश्या. आता आर्चीला परश्यापासून दूर करून तिला कसे पटवायचे याच विचारात सदू सदैव मग्न राहायचा.  सदूला पोहता येत नव्हते, परश्या सारखी विहरीत उडी मारून आर्चीला इम्प्रेस करणे त्याला शक्य नव्हते. झिंगाट डान्स हि त्याला येत नव्हता.  घरात कार असती तर सदूने आर्चीला म्हंटले असते 'आजा मेरी गाडी में बैठ जा'. पण काय करणार घरात गाडी तर सोडा दुचाकी हि नव्हती. एक दिवस त्याने वर्तमान पत्रात जाहिरात पाहिली 'वशीकरण मंत्र देणारे बंगाली बाबा'. कशीबशी ५०० रुपयांची व्यवस्था करून  बंगाली बाबाला पाठविले. एक पुडा त्याचा घरी पोस्टाने पोहचला. सदूने उघडून बघितले त्यात एक पुडी होती. सोबत एका कागदावर लिहिले होते, यातला अंगारा इच्छित मुलीच्या डोक्यावर घालून मंत्र म्हणा, ती मुलगी तुमच्या मागे धावत येईल. मैत्रिणींच्या घोळक्यात आर्ची उभी होती, सदू जवळ गेला हिम्मत करून अंगारा तिच्या डोक्यावर फेकला आणि ओम फट स्व:हा म्हंटले. हा विचित्र प्रकार पाहून, आर्चीचा पारा चढला. सदू सटकण्या आधीच तिने सदूला धरले आणि एक जोरदार थापड त्याच्या मुस्कटात हांडली. दुरून परश्या आणि त्याच्या मित्रांनी हा प्रकार पहिला. आर्चीला इम्प्रेस करण्याचा हाच  मौका. परश्याने हि सदूला यथेच्छ धुतला. बिस्तारावर पडल्या-पडल्या सदू बंगाली बाबाला शिव्या मोजतो आहे, पण आता त्याचा काय फायदा. सदूची  कालेजमध्ये  "नाक तर कापल्या गेलीच शिवाय तो करमणुकीचा विषय हि झाला".  वशीकरण मंत्र असो किंवा जारण-मारण मंत्र शेवटी याचा खरा फायदा बंगाली बाबांनाच होतो. याचा वापर करणाऱ्यांची दशा एक तर सदू सारखी होते किंवा प्रकरण जास्त बिघडले तर गजाआड हि जावे लागते. असो. 

पैश्या सोबत समाजात प्रतिष्ठा हि मिळते. आता पैसा कमविण्याचे दोन मार्ग आहेत. एक वाममार्ग- अर्थात चोरी-चकारी, दरोडा, लोकाना लुबाडणे इत्यादी. पण या मार्गात जान जोखीम मध्ये टाकावी लागते. पकडल्या गेल्यावर जेलची हवा हि खावी लागते. दुसरा मार्ग नौकरी-धंधा जे काही करायचे आहे त्याचे ज्ञान प्राप्त करणे आणि लक्ष्य प्राप्तीसाठी  अविरत मेहनत करणे. सदू सारख्या लोकांना यातले काहीच जमत नाही. मग तो पैश्यांचा पाउस पाडणाऱ्या बाबांच्या चक्कर मध्ये पडणारच आणि स्वत:चे नुकसान करून घेणार.    

समाजात चांगले सुशिक्षित लोक हि अंधविश्वासी असतात. फरक एवढाच हे लोक बंगाली  बाबांच्या एवजी  'जोतिष शास्त्रावर' विश्वास ठेवतात. असाच एक किस्सा आठवला. सरकार-दरबारात नौकरी करणार्या एका अत्यंत सज्जन शाकाहारी दाक्षिणात्य ब्राह्मणला आपल्या लग्नायोग्य मुलासाठी सुंदर, सुशिक्षित, नौकरी करणारी मुलगी पाहिजे होती. या माणसाचा जोतिष शास्त्रावर प्रचंड विश्वास. राहू कालात सरकारी फाईल हि बघायचा नाही. आता जी मुलगी मुलाला पसंद येत होती, तिच्या मार्गात राहू-केतू, शनी-मंगळ यायचे. असेच काही वर्ष निघून गेले. कंटाळून  मुलाने स्वत: मुलगी पटवली आणि कुणालाही न सांगता कोर्टात लग्न केले, ते हि परप्रांतीय आणि दुसर्या जातीच्या अखाद्य पदार्थ भक्षण करणार्या मुलीशी. आता तो मुलगा बापापासून वेगळा राहतो. ग्रह नक्षत्रांच्या चक्कर मध्ये मुलगा बापापासून नेहमीकरता  तुटला. 

सुखाचा शोध माणसाने घेतला पाहिजे. पण योग्य मार्गाने. अन्यथा  सदू सारखी गत होणारच. लक्ष्मी हि उद्यम प्रिय आहे. जो उद्यमी आहे त्यालाच ती प्राप्त होते. अन्य मार्गाने तिची प्राप्ती अशक्य आहे. वाममार्गाने हि तिची प्राप्ती होते, पण त्यासाठी कधी कधी मोठी किंमत हि मोजावी लागते. आर्चीचे परश्यावर प्रेम आहे. हे माहित असूनही सदूला  आर्ची हवी होती. हा सदूचा मूर्ख पणाच. सदूला जर माहित असते, जगात कुणाच्याच सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नाही. हेच जगाचे सत्य आहे. सदूने आर्चीचा नाद सोडला असता.  

 

Monday, August 8, 2016

आवारा कृष्णमेघ आणि दिल्लीचे रस्ते


(मराठी सृष्टीत पूर्वप्रकाशित हि कथा अजून ब्लॉगवर अजून टाकली नव्हती. या पावसाळ्यात दिल्लीच्या रस्त्यांची दशा आणि देश्यात इतरत्र घडलेल्या घटना पाहून या लेखाची आठवण झाली. कथा काल्पनिक आहे, वास्तवाची काही एक संबंध नाही). 


दरवर्षी श्रावणात कृष्णमेघ  येतो व आपल्या प्रेमजलधारानी धरतीला गाढ़ आलिंगन देऊन चिम्ब भिजवितो. कृष्ण मेघाने धरतीला तसे वचनच दिले आहे. सुन्दर युवतीही या कृष्ण मेघाच्या प्रेमात पडतात आणि श्रावणी जलधारांचा मनसोक्त आनंद घेतात. जलधारांत भिजलेल त्यांच सौन्दर्य आणि गालात पडलेली खळी पाहून तरुणांचे ह्रदय घायाळ होणारच मग ते साठीचे असो वा सोळाचे.  असा हा मायावी कृष्णमेघ. 



हे नेहमीचेच आहे, दिल्लीत पोहचल्यावर कृष्णमेघ, जसे निवडणूक जिंकल्यावर दिल्लीचे नेता आपले 'वादे'  विसरतात, तसेच हा आवारा कृष्णमेघ दिलेले वचन सहजपणे विसरून जातो. 

"दिल्ली की बरसात
नेताओं के वादों की तरह
गरजते हैं मेघ
लेकिन बरसते नही हैं".

पण या वर्षी नवल घडल. श्रावणात दिल्लीत क्वचितच बरसणारा असा हा दगाबाज आवरा कृष्णमेघ या वर्षी भरभरून बरसला. कारण हि तसेच होते. रस्ते हि  महागडे सोंदर्य प्रसाधने वापरणाऱ्या षोडशी अप्सरे समान सुन्दर दिसत होते. अश्या सुंदर रस्त्यांना पाहून श्रावणातला आवारा कृष्णमेघ सुन्दर व नाजुक रस्त्यांच्या  प्रेमात पडला तर यात  आश्चर्य काय!  नावातच कृष्ण, सुंदर गोपिकांना आपल्या जाळ्यात ओढणारच. कृष्णमेघाने आपल्या प्रेमाचा वर्षाव रस्त्यांवर सुरु केला.या प्रेम वर्षावात भिजून  रस्तेही आनंदित झाले. ते लज्जेने चूर-चूर झाले. लज्जेमुळे  त्यांच्या सुन्दर मुलायम गालांवर खळ्या पडल्या (जागो-जागी खड्डे पडले). मग अश्या सुंदर खळ्या पडलेल्या खड्ड्यांना पाहून  रस्त्यांवरून जाणारी वाहने ही या खड़यांच्या प्रेमात पड़ले तर नवल काय! कित्येक वाहने घायाळ झाली आणि हॉस्पिटल (वर्कशॉप') मधे पोहचली. कित्येक नेहमी करता कामातूनच गेली. वाहनांना घायाळ करणार असं हे रस्त्यांच आणि कृष्णमेघाच प्रेम!

दिल्लीत कॉमनवेल्थ होणार आणि रस्त्यांवर खड्डे!  शासनाची झोप उडाली. एक चौकशी समिति नेमल्या गेली. चौकशी समितीने निष्कर्ष काढला - श्रावणातल्या  आवरा कृष्णमेघाच्या प्रेमात पडल्यामुळे रस्ते निकामी झाले. त्यात बांधकाम विभागाचा काही एक दोष नाही. रस्त्यांना  श्रावणातल्या या आवारा कृष्णमेघापासून दूर ठेवण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात नदीवरचा पूल वाहून गेला- कृष्णमेघाचे कारस्थान.....

Saturday, August 6, 2016

एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत


दिनांक ५.८.२०१६  रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे.  पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते.  अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही.  पण  जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले  अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे. 

वीज गेली. पंखा हि बंद झाला.  इमरजेन्सी लाईट लाऊन वीज येण्याची वाट पाहू लागलो.  एक तर पावसाळी महिना आणि त्यात भरपूर उमस. सौ. ने दरवाजे खिडक्या उघडल्या वारा आत येण्यासाठी. अचानक उजव्या हातावर खाज सुटल्या वाटले. बघितले एक डास हातावर बसून माझे रक्त पिण्यात मग्न होता.  मनात विचार आला, नर डास मानवाचे रक्त पीत नाही. बहुतेक हि मादी असावी. आता रक्त पितेच आहे, तर पोटभरून पिऊ द्या. एक दोन रक्त्याच्या थेंबानीं आपले काय बिघडणार. अचानक थांक्यु आवाज ऐकू आला, कोण थांक्यु म्हणाले म्हणून इकडे तिकडे पाहू लागलो. अरे इकडे तिकडे का पाहतो आहे, मी डासांची राणी तुला थांक्यु म्हणते आहे. मी विचारले, थांक्यु कशाला राणी साहिबा? डासांची राणी म्हणाली तू पहिलाच मानव आहे, ज्याने मला पोटभरून रक्त पिऊ दिले, हाकलण्याचा प्रयत्न केला नाही.  मी तिला विचारले, मी तुला रक्त पिऊ दिले, बदल्यास तू काय देणार मला, डेंगू कि मलेरिया. हा!हा! हा!  चक्क हासली ती आणि म्हणाली, आम्ही डास काही डेंगू, मलेरिया पसरवित नाही, ते कार्य परजीवी/ विषाणूंचे आहे. मी म्हणालो तेच ते, तुम्ही डास त्यांना आपल्या शरीरात आश्रय देतात आणि आमच्या शरीरात सोडतात. आम्ही आजारी पडतो. लाखोंच्या संख्येने दरवर्षी लोक मरतात. डासराणी हि चिडून म्हणाली, तुम्ही माणसे हि काही कमी क्रूर नाही.  रासायनिक पदार्थांचा वापर करून अब्जावधी डासांची कत्तल करतात. त्याचा सूड म्हणून आम्ही डासांनी काही लक्ष मानवांना परजीवींचा उपयोग करून मारले तर त्यात गैर काय. 

डासराणीला चिडलेले पाहून मी विषय बदलत म्हणालो, तू माझे रक्त प्याली त्याचे मला काही वाटत नाही. पण मी आजारी पडलो, मला ताप आला तर उद्या सकाळचा रियो ऑलम्पिकचा भव्यदिव्य कार्यक्रम बघता येणार नाही. डास राणी कानाजवळ येऊन हळूच पुटपुटली, भव्यदिव्य, अSSच्छा, अर्धनग्न सांबा नर्तकी पाहता येणार नाही, याचे दुख होते आहे का? थेरड्या कुठला काही वयाचा विचार कर? च्यायला हिला माझ्या मनातले कसे कळले, मी निरुतरच राहिलो. डासराणी सांत्वना देत म्हणाली, अरे शंभर एक माणसांचे रक्त पिल्यावर एखाद-दुसरा आजारी पडतो. काही एक होणार नाही तुला  उद्या सकाळी उठून खुशाल बघ त्या नागड्या नर्तिका. मी चिडून  म्हणालो काही हाड आहे का तुझ्या जिभेला. डास राणी मिस्कीलपणे म्हणाली, माणसांच्या जिभेला नसते, तर आमच्या जिभेला कुठून येणार. एवढीच सुंदर स्त्रियांना पाहण्याची इच्छा असेल तर आज संध्याकाळीच मी गल्लीतल्या डबक्यात अंडी दिली आहे. तुला माहित असेलच जास्तीस्जास्त एका आठवड्याचे आमचे आयुष्य. उद्या संध्याकाळी पर्यंत अंड्यातून निघालेल्या माझ्या कन्या काय म्हणतात ते, तुमच्या मानवांच्या भाषेत षोडशी रूपवती होतील. पाठवून देईन त्यांना उद्या रात्री तुझ्या गालाचे मुके घ्यायला. क्षणभरातच माझ्या डोळ्यांसमोर गालावर जागोजागी डासांनी चावल्याचे व्रण दिसू लागले. जोरात ओरडलो, दुष्टा चूक झाली माझी, तुला हातानी चिरडून टाकायला पाहिजे होते. तुला काय माहित आम्ही माणसे काय चीज आहोत ते, आमच्याशी पंगा महागात पडेल, पहाच एक दिवस जगातले सर्व डास नाहीसे होतील. तिने रावणा सारखा अट्टाहास केला व म्हणाली, तुम्ही मूर्ख मानवानी आम्हा डासांना मारण्यासाठी काय काय उपाय केले आहे, सर्व माहित आहे मला. पहिले कासव छाप आणली. आमचे काही बिघडले नाही.तुम्हीच खोकलू लागला. मग goodnight आणली आम्हाला दूर ठेवण्यासाठी. काही उपयोग झाला का?  धूरवाली गाडी आणली.  धूर पाहताच आम्ही धूम ठोकून देतो. त्या रासायनिक धुर्याचा त्रास तुम्हालाच होतो. बाकी एक मला कळत नाही?  

मी स्वत:ला वाद विवादात प्रवीण समजत होतो,पण या घटकेला डासराणी समोर पूर्णपणे निशस्त्र झालेलो होतो, मरगळलेल्या आवाजात म्हणालो, काय कळत नाही.  डासराणी म्हणाली,  हेच ते जागो जागी पाणी साचवून, डबके निर्माण करून तुम्ही माणसे आमच्या साठी घरे बांधतात. आमची पैदास वाढली कि आम्हाला मारण्याचे प्रयत्न करतात, या मूर्खपणाला काय म्हणावे. आत्ताच रियोचे घ्या मी ऐकले आहे, तिथे अब्जावधी डासांना यमसदनी पाठविले आहे. पण आमचे बंधू हि काही कमी नाही. त्यांनी हि निश्चय केला आहे याच मौक्याचा फायदा घेऊन जिका नावाच्या दुष्ट परजीवीला जगभर पोहचविण्याचा. किती मजा येईल ना, तुला जिका झाला तर. आता मात्र हद झाली, पाणी डोक्यावरून गेले होते, त्या दुष्ट राणीला  सबक शिकविण्यासाठी मी ताडकन बिस्तारावरून उठलो, बघतो काय समोर टीवी सुरु होता, एक-एक करून विभिन्न देशांचे खेळाडू मैदानात प्रवेश करत होते. सौ. शांतपणे बसून टीवी पाहत होती. माझे डोके सटकले, तिच्यावर डाफरलो. मला का उठविले नाही.  सौ. मिस्कीलपणे म्हणाली, अहो, किती प्रयत्न केला तुम्हाला उठविण्याचा. ज्या वेळी सांबा नर्तकी येत होत्या, तुम्हाला चिमटा हि काढला होता उठविण्यासाठी. मी आश्चर्याने विचारले, तर तू चिमटा काढला होता तर, मला वाटले....  सौ: काय वाटले.... अहो पण तुमच्या गालावर हे काय. डास चावला वाटतो. मी नकळत म्हंटले, डास नाही डासराणी चावली. सौ.: काय काय स्वप्न बघता तुम्ही, काहीच कळत नाही. मी समोर टीवी कडे बघितले, स्क्रीनवर एक डास दिसत होतो, जवळ गेलो निरखून बघितले, मानवी रक्ताने त्या डासाचे शरीर फुगलेले होते. मनात विचार आला, चिरडून टाकले पाहिजे याला, पण थांबलो, कदाचित हीच डासांची राणी असेल. स्त्रियांवर हात उगारणे पुरुषांना शोभत नाही. शिवाय एका राणीने डासांची का होईना माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या गालाचा मुका हि घेतला होतता..... 

मनात गुणगुणत हात तोंड धुवण्यासाठी  वाशबेसिन जवळ गेलो.

जगू द्या सर्वांना
डास असो वा माशी 
मच्छरदाणी पांघरून 
शांत झोपतो आम्ही. 



दोन क्षणिका -साजण/ सजणी (१) डास/ (२) वीज
















Tuesday, August 2, 2016

मॅडम आणि गाय



(भारताच्या एका राज्यातल्या एका  छोट्या नगरात घडलेली काल्पनिक घटना) 

पावसाळा नुकताच संपलेला होता. एक गाय रस्त्याच्या किनार्यावर उगवलेले गवत खात होती. अचानक तिचे लक्ष्य एका बंगल्याच्या उघड्या गेट कडे गेले.  तिला बंगल्याच्या आवारात सुंदर हिरवेगार गवत दिसले. ती बंगल्यात घुसली आणि हिरवे गवत चरू लागली. बिचार्या गायीला काय माहित होते डेप्युटी कलेक्टरच्या बंगल्यात घुसण्याचा परिणाम काय होतो. डेप्युटी कलेक्टर मॅडमचे लक्ष गायीकडे गेले, ती शिपायावर जोरात डाफरली, नालायक कहाँ घोड़े बेच के सो रहा है, देख गाय ने बगीचे का  सत्यानास कर दिया. एवढ्यावरच ती थांबली नाही, एक दगड उचलून गायीवर भिरकावला. गाय घाबरून गेटकडे पळाली. मॅडमची ओरड  ऐकून शिपाई घाबरून उठला. त्याने जवळ ठेवलेला डंडा उचलला आणि गायीच्या पायावर जोरात डंडा  हांडला. 

गायीच्या मालकिणीचे घर मॅडमच्या घराजवळच होते. तिने गायीला मॅडमच्या बंगल्यात घुसताना पहिले. ती धावत-धावत बंगल्याजवळ पोहचली. तिने शिपायाला गायीला डंडा मारताना पाहिले. ती त्याच्यावर ओरडली, गायीला डंडा का मारला. बघ कशी लंगडून चालते आहे. तिची आवाज मॅडमने ऐकली. मॅडमचा पारा चढला ती गायीच्या मालकिणीपेक्षा दुप्पट आवाजात ओरडली. एवढे ओरडायला काय झाले 'गायीला डंडाच मारला आहे, काही गाडी खाली नाही घातले'. मॅडमचे उद्गार ऐकून, गायीच्या मालकिण हि चिडली आणि त्वेषाने ओरडली, हिम्मत असेल तर आत्ताच गौमातेला गाडी खाली चिरडून दाखव, डायन कहीं की.  मॅडम: हो, मी डायन आहे, गायी सोबत तुलाही गाडी खाली चिरडून टाकली तरी कुणी वाकडे करू शकत नाही माझे. गायीची मालकीण: इथेच उभी आहे, हिम्मत असेल घाल गाडी अंगावर. आता मॅडम थोडी गांगरली, पवित्रा बदलत म्हणाली, सिपाही भगा इस बत्तमीज औरत को. गायीच्या मालकिणीकडे पाहत म्हणाली, खूप माज चढला आहेना तुला. आता पहाच. तू स्वत:हून आज रात्रीच थुक चाटायला येईल माSSझी. 

गायीच्या मालकिणीचा नवर्याची छोटीसी कपड्यांची दुकान होती.  दुपारी तो घरी जेवायला आला. तेंव्हा त्याच्या बायकोने सकाळी घडलेला प्रकार सांगितला. तिचा नवरा म्हणाला जे घडले ते ठीक झाले नाही. मोठ्या लोकांशी जबान लढवली नाही पाहिजे.   

तिच्या नवर्याची आशंका खरी ठरली. संध्याकाळी  त्याच्या दुकानात  एक शिपाई निरोप घेऊन आला. आपको दरोगाजीने थाने बुलाया है.  एक दोन शेजारच्या दुकानदारांना  घेऊन तो   पोलीस ठाण्यात पोहचला.  दरोगाजी त्याची वाटच पाहत होते. त्याला पाहून म्हणाले, तुझ्या विरुद्ध शिकायत आहे, आज सकाळी सरकारी कर्मचार्यावर हल्ला आणि मारपीट करण्याची.  मी तर सकाळी दुकानात होतो. दरोगाजी म्हणाले, ते मला माहित आहे, पण डेप्युटी कलेक्टर मॅडमच्या शिपायानी तुमच्या विरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. आता एकच उपाय आहे, आपल्या बायकोला घेऊन मॅडमच्या घरीजा जा, तिच्या समोर नाक घासा किंवा  तिची थुक चाटा, काहीही करा, पण मॅडमला प्रसन्न करा, त्या शिवाय तिचा शिपाई तक्रार मागे घेणार नाही. अन्यथा मला सरकारी नौकाराला मारहाण करण्याच्या आरोपात तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखील करावाच लागेल. मालकिणीचा नवरा म्हणाला फक्त माझा प्रश्न असता तर मी बंगल्यावर जाऊन मॅडमची थुक हि चाटली असती. पण माफ करा, माझी बायको हे करणे शक्य नाही. तिने काही गुन्हा केलेला नाही. मी तिला असे करायला सांगू शकत नाही. या शिवाय  आमच्या गायीच्या पायाला जबर मार लागला आहे. ती लंगडून चालते आहे.  सत्य काय तुम्हाला माहित आहेच. त्यावर दरोगा म्हणाला मॅडमचा हुकुम आहे.  लिखित तक्रार आहे. एफ आई आर दाखील करावीच लागेल आणि तुला बंद हि करावेच लागेल. माझा नाईलाज आहे. 

दोन-चार दिवसांनी त्या दुकानदाराला जमानत मिळाली. जमानत वर बाहेर आल्याक्षणी त्याने गायीला विकून टाकले.  सुमार १०-१२ वर्ष हा खटला चालला आणि दुकानदाराची निर्दोष मुक्तता झाली. 

बिचार्या गायीने एका सरकारी अधिकार्याच्या बंगल्यात घुसण्याची घोडचूक केली. गायीने थोडे बहुत गवत हि खाल्ले असेल.  त्याची शिक्षा म्हणून गायीला मार हि खावा लागला आणि तिच्या मालकाला १०-१२ वर्षे मनस्ताप भोगावा लागला. 

ब्रिटिशांकडून विरासतमध्ये मिळालेली नौकरशाही (IAS) नावाची संस्था , सेवक कमी, क्षत्रपच जास्त  निर्माण करते.  हेच आजचे सत्य आहे. 



















Saturday, July 30, 2016

अंधविश्वास भाग (3) - सार्थक लढा



एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी  राहतात, तिथे लोकांचा विश्वास  डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर  विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला.  

निरोगी व्यक्ती कष्ट करू शकतो, संसाराची गाडी चालवू शकतो. रोगी माणसाला हे शक्य नाही. रोगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस हा करणारच.  आता आपण आपल्या देशातील चिकित्सा सुविधांकडे  बघू. दिल्ली देशाची राजधानी. इथे देशातील सर्वात चांगली चिकित्सा सुविधा जनतेला उपलब्ध आहे, असा भ्रम देशातील अन्य राज्यांच्या लोकांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. पण इथली परिस्थिती हि देशातील इतर शहरांसारखीच आहे.

मी उत्तम नगर इथे राहतो.  या भागात राहणारे अधिकांश लोक छोटा-मोटा रोजगार करतात किंवा फेक्ट्रीत काम करून  महिन्याचे ८-१० हजार रुपये किंवा दिवसाचे २००-३०० रुपये कमवितात. आता कल्पना करा हा सामान्य माणूस आजारी पडला. जवळपास असलेल्या सरकारी स्वास्थ्य केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये गेला. काय होईल. हॉस्पिटलमध्ये लोकांची भारी भीड. ३-४ तासांनी डॉक्टर त्याला पाहणार. नंतर औषधांच्या लाईनीत १-२ तास त्याला उभे राहावे लागणार. काही औषधी मिळतील. काही मिळणार नाही. औषधींचा दर्ज्याबाबत काही सांगण्यात अर्थ  नाही.  आजार बरा हो न  हो, पण त्याचे त्या दिवसाच्या दिहाडीचे नुकसान होणार हे निश्चित.

उत्तम नगरमध्ये प्रशिक्षित MBBS डॉक्टर हि आहेत. त्यांची किमान फी ३०० रुपये आहे. (माझा फेमिली डॉक्टर हि ३०० रुपये घेतो. चांगल्या कॉलोनीत अर्थात जनकपुरी येथे डॉक्टर ५००-७०० रुपये फी घेतात). एवढी फी घेतल्यावर डॉक्टर किमान ३०० रुपयांची औषधी  लिहिणारच. सामान्य जनतेला MBBS डॉक्टरकडे जाणे परवडणे शक्य नाही. आता उरले, स्वयंभू झोला छाप डॉक्टर. दिल्लीत किमान पन्नास हजाराहून जास्त झोला छाप डॉक्टर असावेत, असा अंदाज आहे.  हे डॉक्टर ५० रुपयांत   औषधी देतात. स्वस्त असल्यामुळे सामान्य गरीब जनता अश्याच डॉक्टरांकडे जाते. आता ८-१० दिवस औषध घेऊन आजार बरा नाही झाला तर हा गरीब माणूस काय करणार. शेवटचा उपाय म्हणून तो ‘नीमवाल्या बाबाकडे जाऊन झाडा लाऊन घेणार’. नीमवाला बाबा काही मागत नाही. तुमची श्रद्धा हीच त्याची बरकत (कमाई).

आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळे अधिकांश आजारातून आपण बरे होतोच. पीलिया, डेंगू इत्यादी आजारांपासून हि लोक बरे होतात. अर्थात शरीराला त्याची किंमत हि मोजावी लागतेच. सतत आजारांमुळे माणसाची रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते. पण झाडा लावल्यामुळे आजारी व्यक्ती रोगमुक्त झाला, याचे श्रेय नीमवाल्या बाबाला मिळणारच. हळू हळू त्याची लोकप्रियता वाढत जाणार. चांगले श्रीमंत लोक पण हि त्याचा कडे जाऊन ‘झाडा’ लाऊन घेणार.  नीमवाला बाबा किंवा बंगाली बाबा कुणाचे रोग दूर करीत नाही, तरी हि लोक रोगांपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या कडे जातात.   

बाबालोकांचा विरोध करून अंधविश्वासाविरुद्ध लढा जिंकणे शक्य नाही. नीमवाल्या बाबा/ बंगाली बाबांकडे जाण्यापासून लोकांना थांबवायचे असेल तर चांगली, विश्वसनीय आणि सामान्य गरीब जनतेच्या खिशाला परवडणारी चिकित्सा सुविधा लोकांपर्यंत पोहचवावी लागेल. 

काही महिन्यांपूर्वी डॉक्टर प्रकाश आमटे यांचा जीवनावर आधारित सिनेमा बघितला होता. भामरागडसारख्या दुर्गम भागात, जादूटोणा करणारऱ्या तांत्रिकांकडे जाणे लोकांची मजबुरी होती. उत्तम डॉक्टर, उत्तम चिकित्सा सुविधा लोकांपर्यंत पोहचली. लोकांचे तांत्रिकांकडे जाणे आपसूक बंद झाले.  

जनतेला रोगमुक्त करणे, अंधविश्वासाविरुद्ध लढ्याची पहिली पायरी आहे. 

क्रमश: 

Thursday, July 28, 2016

काहीच्या काही वात्रटिका - पैलवान झाला चित


 पुन्हा एकदा पानिपत घडले (नरसिंह यादव महाराष्ट्राचा पैलवान होता) 


रिंगणात उतर्ण्यापूर्वीच 
पैलवान झाला चित.

सोनीपतच्या मैदानात 
नरसिंह झाला शहीद. 


सकाळ दुपार संध्याकाळ ओठांवर एकच नाव 

मरा मरा म्हणत 
वाल्या झाला वाल्मिकी. 

नमो नमो म्हणत 
सीएम होईल  का 
प्रधान मंत्री.

Wednesday, July 20, 2016

पाहुण तुमी कोण गावचं?



या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी  कोण गावचं?

लाल गावचं कि हिरव्या गावचं
पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं.
निळ्या गावचं कि टोपी गावचं.

पाहुणं म्हणे, ऐका  राव 
मान मोठा मिळे ज्या गावात  
चरायला मिळते सारे रान 
तोची आहे आमुचा गाव. 

 सरडा आमचा गुरु भाई 
त्याच्या  सवे रंग बदलतो. 
शिकारीच्या गावी 
मुक्काम ठोकतो. 

या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी  कोण गावचं?


टीप:  या कवितेचा  राजनेत्यांशी काही एक संबंध नाही. 

Saturday, July 16, 2016

तीन क्षणिका - स्त्री



(१)

 वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी  गुंडाळला. 
भोगदासी झाली स्त्री 
त्या क्षणापासूनच.


(२)

पद्मिनीने म्हणे 
चितेत उडी घेतली. 
आगीत वासनेच्या 
नाही ती जळाली. 


(३)

देह वासनेचा 
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता 
अमर प्रेम तराणे.





Saturday, July 9, 2016

अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा


http://vivekpatait.blogspot.in/2016/07/blog-post_7.html

अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


नकारात्मक लढा 

एकदा नागपूरला एका लग्नात गेलो असताना, एक पुणेरी ग्रहस्थ मला भेटले होते. सहज अंधविश्वासावर चर्चा सुरु झाली. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पुण्यात एका संस्थेने, अंधविश्वास विरोधात कार्य करणार्या एका संस्थेच्या महानुभावला बोलविले होते. सुरवातीला त्या महानुभावांनी आपल्या संस्थेचा परिचय दिला. भोंदू बाबांच्या विरोधात चाललेल्या त्यांच्या संस्थेच्या कामांची तपशील दिली. त्यांच्या संस्थेच्या कार्यात येणार्या अनेक संकटांचे विवरण हि दिले. समाजात पसरलेल्या अंधविश्वासांवर बोलताना मात्र ते रस्ता भटकले. थोडक्यात म्हणावे तर त्यांनी सत्यनारायण कथेचा माखौल तर उडविलाच पण अनेक पौराणिक कथांची खिल्ली हि उडविली. तिथे बसलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. ह्या सदग्रहस्थांचा उद्देश्य अंधविश्वासांबाबत लोकांना जागरूक करणे आहे कि सनातन  धर्माच्या विरुद्ध प्रचार करणे. सारांश एवढेच, त्यांची मेहनत फुकट गेली. काय चुकल त्या विद्वान माणसाचे. लोक अंधविश्वासी का बनतात हे  त्यांना माहित नव्हते. जर मूळ समस्याच माहित नसेल तर तिचे समाधान कसे  सांगणार.  


समस्येचे मूळ कारण माहित नसल्यामुळे पौराणिक कथा आणि सत्यनारायण कथेचा माखौल उडवून आपण लोकांना जागृत करत आहोत असे त्यांना वाटले. जुन्या काळातल्या पौराणिक कथा, मग त्या देवी देवतांच्या, राक्षस, अप्सरांच्या असो  किंवा चान्दोबातल्या, या कथांमध्ये चमत्कार असतात.  या चमत्कारांचा उद्देश्य लोकांना सत्य आणि धर्माच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणे असतो. ह्या कथा वाचून कोणी हि अंधविश्वासी बनत नाही किंवा भोंदू बाबांच्या जाळ्यात हि अटकत नाही. 

एक आणखीन मोठी  घोडचूक हि ह्या संस्था नेहमीच करतात. प्रत्येक समाजात जन्म ते मृत्य अनेक प्रकारचे संस्कार असतात. धार्मिक संस्कारांचा अंधविश्वास याशी काही एक संबंध नाही.  धार्मिक संस्कार आणि अंधविश्वास हे दोन्ही वेगळे विषय आहेत.  आपण समाजाचा हिस्सा आहोत, दर्शवण्यासाठी लोक समजासोबत आपले सुख आणि दुख वाटतात. इथे लोक खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा समाज काय म्हणेल यासाठी आपल्या चादरीपेक्षा (क्षमतेपेक्षा) जास्त खर्च करतात.  हि मूळ समस्या आहे. मुलाचे नाव ठेवणे असो किंवा श्राद्ध, आपण गाव जेवण हि घालू शकतो किंवा कमीत-कमी खर्चात घरातल्या घरात हि करू शकतो. काही नसेल तर पत्र-पुष्प देवाला वाहून हि आपण सर्व संस्कार करू शकतो.  शिवाय सर्व धार्मिक परंपरांचे पालन केलेच पाहिजे असे बंधन आपल्या सनातन धर्माने कुठेच घातलेले नाही. समाजाला  या दृष्टीकोनातून जागृत करण्याची गरज आहे. संस्कारांचा विरोध करण्यात काहीच अर्थ नाही.  आज आपण केक कापून वाढदिवस साजरा करतो. कारण समाजात काळानुसार संस्कार आणि परंपरा बदलत राहतातच. (इथे केक घरी कापायचा कि हॉटेलमध्ये जाऊन, हाही खर्चाचा विषय आहे, अंधविश्वासाचा नाही). 

धार्मिक अथवा पारंपारिक संस्कार यांना अंधविश्वासांशी जोडणे मुळातच चुकीचे आहे.  ह्या मुळेच लोक या संस्थांना धर्मविरोधी समजतात.  

या संस्थांचा दुसरा उद्देश्य भोंदू बाबांविरोधात कार्रवाई करणे.  यात संघर्ष हा आलाच. संघर्ष म्हंटला कि संघर्षरत दोन्ही बाजूंचे नुकसान होणारच. पण कधी-कधी निर्दोष लोकांचा बळी  हि यात जातोच.   जो पर्यंत  लोक उपाय सांगणार्या बाबांना  स्वखुशीने दक्षिणा  द्यायला तैयार आहे, तो पर्यंत भोंदू बाबांचे प्रस्थ कमी होणार नाही. एक आत गेला कि दुसरा त्याची जागा घेईलच.  समस्येचे समाधान लोकांना या बाबांकडे जाण्यापासून थांबविणे यात आहे. पण त्या साठी मूळ समस्या माहित असायला पाहिजे ना. 

सारांश, अधिकांश अंधविश्वास विरोधी संस्थांचे धोरण नकारात्मक आणि दुसर्यांच्या विरोधावर आधारित असल्यामुळे अपेक्षित परिणाम हि मिळत नाही परंतु  शत्रू मात्र भरपूर पैदा होतात. 


क्रमश: 


















Thursday, July 7, 2016

अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


सामान्य माणूस काही आंधळा नाही आहे, कि डोळे बंद करून कुणावर विश्वास ठेवेल. सामान्य माणसाचा जगण्याचा  उद्देश्य असतो -  सुखी संसार, स्वस्थ्य शरीर आणि भरपूर पैसा. दुसर्या शब्दात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी या तीन बाबी भौतिक जगात महत्वाच्या. 

खान-पान, जीवनमान, व्यायाम इत्यादी बाबींचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतोच. स्वस्थ्य राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे कामे करावी लागतात.  खाण्यापिण्या वर हि नियंत्रण ठेवावे लागते. हे जर जमले नाही तर मनुष्य आजारी पडतोच. एकदा आजार झाला कि दीर्घकाळ औषध-उपचार हि करावा लागतो, पथ्य हि पाळावे लागतात. भरपूर पैसा हि खर्च होतोच. योगाचे म्हणाल तर तो ही नियमितपणे दीर्घकाळ करावा लागतोच.   बहुतेक  लोकांना हे जमत नाही. त्यांना सौपा उपाय पाहिजे. मग जर कुणी झाड-फूंक, गंडा, ताबीज बांधून किंवा उपाय सांगून आजार बरा करत असेल तर साहजिकच आहे, लोक त्याच्या मागे धावणारच. 

सुख प्रत्येकालाच हवे असते. चांगली बायको/नवरा, आज्ञाकारक मुले,  घरा बाहेर हि नौकरी- धंद्यात सर्वकाही आपल्या मनासारखे घडावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. पण संसार म्हंटले कि समस्या या येतातच. मुलीचे लग्न ठरत नाही, मुलगा घर सोडून चालला जातो, बायकोचे प्रेम मिळत नाही. नौकरी धंद्यातल्या समस्या, राजनेता असेल तर विरोधकांचे षडयंत्र इत्यादी.  कधी-कधी दुसर्याचे सुख पाहून हि माणूस दुखी होतो. आयुष्यातल्या समस्या स्वत: सोडवाव्या लागतात. त्या साठी कधी-कधी स्वत:ला बदलावे लागते. दुसर्यांना समजून घ्यावे लागते. योग्य मार्ग आणि योग्य दिशेने प्रयत्न करावे लागते. पण जर कुणी उपाय सांगणारा, ज्योतिषी किंवा तंत्र-मंत्र करणारा बंगाली तांत्रिक तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडविणार असेल तर साहजिकच आहे, तुम्ही त्याच्या मागे धावणारच.   

पैसा हि सर्वांना पाहिजेच. पैसा कमविण्यासाठी कुठला तरी रोजगार, शेती इत्यादी करावीच लागते. त्या साठी ज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि अविरत परिश्रम हे करावेच लागते.  आता जर कुणी पैश्यांचा पाऊस पाडणारा, लॉटरीचा आणि सट्ट्याचा अंक सांगणारा, गुप्त धनाचा ठाव ठिकण्याची माहिती देणारा इत्यादी भेटला तर मेहनत करायची काय गरज. घर बसल्या पैसा भेटेल. ज्योतिषी, तांत्रिक, बाबा लोक अश्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढ्तातच. 

स्पष्टच आहे, बिना ज्ञान, परिश्रम करता, माणसाला सुख समृद्धी आणि स्वास्थ्य पाहिजे असेल तर तो सौपा शोधतो. ज्योतिषी,  तांत्रिक, बंगाली बाबा इत्यादींचा नादी लागतो. शेवटी आपले सर्वस्व हरवून बसतो. 
  
सौप्या भाषेत सांगायचे तर भौतिक संसारिक समस्यांचे समाधान अभौतिक रीतीने शोधणे म्हणजेच  अंध विश्वास.  

क्रमश: 


Tuesday, July 5, 2016

अकुंच्या - पकुंच्या ....



आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची  होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे,  तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना.  काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला. 

च् च् च् करत तिला दोन्ही हातानी वर उचलले, तिच्या नाकाला आपले नाक रगडले. हा तिचा आवडता खेळ. आज मात्र  तिने पटकन माझे नाक आपल्या तोंडात टाकले, सळसळत्या हिरड्यानींं जोरात चावा घेण्याचा प्रयत्न केले. छी! छी!छी! नाकुचा चावा घेते, गंदी बच्ची, तुझी आई सुद्धा अशीच करायची. बहुधा आमच्या लेकीने ऐकले, हसत हसत तिने विचारले, बाबा, खरोखरच! मी नाकु खायची? 

लेकी कडे बघितले, क्षणात काळात मागे पोहचलो. दीड-एक वर्षाची असेल माझी मनी,... अकुंच्या- पकुंच्या पिकले पान कोण खातो?  आSई. अकुंच्या- पकुंच्या सडके पान कोण खातो?  बाबा.  हट्ट, बाबा तर पान खातच नाही. तुला माहित आहे, मनी, गंदे बच्चे पान खातात, बाबा तर अच्छे बच्चे आहेत. तिच्या चेहर्यावर प्रश्न चिन्ह. मग मी हळूच म्हणायचो, माहित आहे मनी, सडके पान न तुझी नानी खाते. आईला सांगू नको, नाही तर तुझी आई माझी पिट्टी-पिट्टी करेल. तिला काही समजो न समजो, पिट्टी -पिट्टी शब्द मात्र चांगला समजायचा.  ती जोरात हसायची.  

मला अस शून्यात हरवलेले पाहून लेकीने दोन्ही हातानी माझे डोके आपल्या कुशीत घेतले. डोक्यावरून हात फिरविला. त्या स्पर्शात आईची माया जाणवली. लेकी किती लवकर मोठ्या होतात... आई बनतात... वाटले क्षणात लहान बाळ होऊन आईच्या कुशीत दडून जावे... पण या शरीराचे काय, लहानाचा मोठा झालो, आता केस हि पांढरे झालेले आहेत... पण अजूनही स्वत:ला छोटेसे बाळ समजणाऱ्या आतल्या जीवाला हे सत्य कोण सांगणार?  काही क्षण असेच गेले. 

आपल्या कडे कुणाचे लक्ष नाही पाहून, अं Sअूं SS अूं  करून छकुलीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. अ लेSS ले छकुली.  सॉरी. चला आपण पुन्हा आजोबांचे नाकु खाऊ. तिला दोन्ही हातानी उचलले, नाकाला नाक घासले.... नाकु खाणार छकुली! चिमुकल्या छकुलीच्या चेहर्यावर हास्य पसरले, अगदी तिच्या आई सारखे.... 

Thursday, June 30, 2016

पे कमिशन

गेल्या पे कमिशनच्या वेळी किमान आठवड्याभर सरकारी केंटीन मध्ये पार्ट्या चालल्या होत्या. पण या वेळी २९.६.२०१६ला दुपारनंतर दिल्लीतल्या अधिकांश सरकारी केंटीन मध्ये शुकशुकाट होता. एवढेच नव्हे सरकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या दुकानांवर संध्याकाळी चहा-नमकीन, बिडी -सिगारेट, तंबाकू इत्यादी  खाण्यासाठी बाबू थांबलेच नाही. मेट्रो मध्ये हि कुठलीच चर्चा घडली नाही.  बहुतेक कर्मचार्यांना शॉकच लागला. ऐसी तो उम्मीद नहीं थी.  बहुतेक ८० टक्के कर्मचार्यांसाठी बुरे  दिनोंं कि सुरुवात झाली. 


कढईतल्या तेलात आज 
पकौडे नाही नाचले.

चहाच्या कपबश्या आज 
टेबलावर नाही खिदळल्या .

रंगीत बर्फी हि आज 
स्वाद हरवून  बसली. 

बाबूंच्या  नशिबी आज 
झाली बुरे दिनों कि शुरुवात. 









Thursday, June 23, 2016

६३ गुणांचा योगा + योग



याला योगायोगच म्हणातात ना!  नमोजी प्रधान सेवक झाले आणि संपूर्ण जगाने २१ जून रोजी  योग दिवस साजरा केला. नमोजींची  छाती  ५६ इंचां पासून ७२  इंचाची झाली असेल. कदाचित्  या पेक्षा जास्ती हि. पण गेल्या ३० वर्षात अस्मादिकांचा छातीचा घेर कमी होत गेला आणि पोटाचा वाढत गेला.  नमो सारखे योग करणे अस्मादिकांना  तरी  शक्य होणार नाही.  

योग म्हणजे जमा, जोड किंवा अंकांचा खेळ, काही हि म्हणा. असाच एक योगा + योग माझ्या आयष्यात ३० वर्षांपूर्वी आला. ३६ गुणांच्या जाळयात न कळत अडकलो.  काय  करणार, जूनचा महिना होता बाहेर चक्क ४५% तापलेले होते. अंगाची भयंकर लाही लाही होत होती. आमच्या नावाचे कुंकू कपाळावर लाऊन सौभाग्यवती शीतल पावसाळी वार्या सारखी अस्मादिकांच्या आयुष्यात आली.   गृहप्रवेश करताना सौ. एखाद्या महाराणी सारखी शोभत होती. अस्मादिकांना हि आपण कुणी तरी महाराजा आहोत असा भास झाला.  त्या वेळी जाणती  पुरुष मंडळी गालातल्या गालात का हसत होती, याचे रहस्य त्या घटकेला कळले नाही. कळणार तरी कसे, लग्न जुळविणार्या ब्राम्हणाने चक्क ३६ गुण जुळविले होते. आता अस्मादिकांना काय माहित होते, राणीला राजापेक्षा आज्ञाधारक गुलामच अधिक प्रिय असतात. जिथे सीजर सारख्या जगत्जेत्याला महाराणी क्लिओपात्रा समोर गुलाम बनावे लागले, तिथे आमच्या सारख्या अकिंचन माणसाचा किती वेळ निभाव लागणार होता. बुद्ध आणि नमो प्रमाणे घर त्याग करण्याची हिम्मत हि अस्मादिकात नव्हती.  शिवाय आमचे आदर्श मनु महाराजांनी म्हंटलेच आहे,"यस्य पूज्यन्ते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:".  बहुतेक स्वत:च्या प्रिय पत्नीला प्रसन्न करण्यासाठीच त्यांनी असे म्हंटले असावे. (पहिला जोरू का गुलाम बहुधा मनु महाराज असावे) त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला.   

यथाशीघ्र ३६ गुणांना ६३ गुणात बदलण्याचा प्रयत्न सुरु केला. सासू-सासरा, साळी-साला सौच्या सर्व माहेरच्या मंडळीना प्रसन्न केले. स्वाभाविकच होते,  घरात आनंदाचे वातावरण पसरले. सौ.ची गुलामगिरी करण्यातच संसाराचे खरे सुख दडलेले आहे, हे लवकरच कळले. यथाशीघ्र घरातले सर्व अधिकार राणीसाहेबांच्या हाती सुपूर्द केले आणि चिंतामुक्त झालो. अद्याप हि राणीसाहेब विदेश मंत्रालयापासून ते गृह मंत्रालय, व्यवहार मंत्रालयापासून ते खर्चिक मंत्रालय.  सर्व भूमिका आनंदाने पार पाडत आहे. आमचे कार्य फक्त रेवेन्यु मंत्रालय अर्थात पगार सौच्या हातात देणे एवढेच आहे. एक मात्र  खरं, एवढ्या वर्षात अस्मादिकांचा मासिक भत्ता अर्थात जेबखर्चीचे काय करतो, कधी विचारले नाही. (तशी ती हिशोबात पक्की आहे, रिक्ष्याचे, मेट्रोचे या शिवाय दोन वेळच्या चहाचे १० रुपये जोडून महिन्याचा खर्च निर्धारित करते). शिवाय अस्मादिकांचे स्वास्थ्य चांगले राहावे याची हि विशेष काळजी घेते. या बाबतीत तरी ती सावित्रीपेक्षा हि दोन पाउले पुढे आहेच. अनेकदा यमराजाच्या पाशापासून आमची सुटका केली आहे.  ६३ गुणांचीच कृपा म्हणा.  

नमोच्या योगाचा देशाला काय फायदा होईल, सांगता येत नाही. पण ६३ गुणांचा योग जुळवून अस्मादिकांनी मात्र आपले आयुष्य सुखी केले आहे. असो. 


टीप:  लेख  काल्पनिक आहे.  शिवाय आमची सौ. अस्मादिकांचे लेख कधीच वाचत नाही. 

Sunday, June 19, 2016

पाव भाजीची गोष्ट



गेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी  तिची दिल्लीची  पाव भाजी खाण्याची इच्छा  राहून  गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला  न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे. वयाने मोठा झालो असलो तरी  एखाद्या शैतान मुलासारखे दुसर्यांची विशेष करून बालगोपाळांची फिरकी घ्यायला अजूनही आनंद मिळतो. सौ.ला आमची कल्पना काही विशेष आवडली नाही. पण तिने विरोध हि केला नाही फक्त एवढेच म्हंटले, मी काही यात मदत करणार नाही. तुम्हाला वाटेल ते करा. 

रविवारी सकाळी चहा पिऊन, जवळपास ६ वाजता भाज्या चिरायला घेतल्या.  घरी बाजी चिरण्यासाठी लाकडाचा ट्रे आहे. चाकूने बारीक बारीक भाज्या चिरायचे ठरविले. सर्व प्रथम ३-४ बटाटे (२५०ग्राम) बारीक चिरले, नंतर लाल भोपळा आणि दुधी भोपळा (प्रत्येकी २५० ग्राम) वरचे जाड साल काढून बारीक चिरला.  एक वांगे (वरचे साल काढून टाकले) बारीक चिरले. वांग्यामुळे भाजीला एक वेगळा तेज स्वाद येतो. एक फुलगोबी (फ्लावर-  ३०० ग्रामचे असेल) बारीक चिरले.  मटार २५०ग्राम (एक वाटी) घेतला. दोन ढोबळी मिरच्या बारीक चिरून टाकल्या. या शिवाय लोबियाच्या हिरव्या शेंगा (मराठीत काय म्हणतात माहित नाही- तश्या कुठल्याही शेंगा चालतील) बारीक चिरून टाकल्या. ५ लिटरचे कुकर भाज्यांनी भरून गेल्यावर भाज्या कापणे बंद केले.  भाज्या चिरायला १ तास लागला. 

 




आता दीड गिलास पाणी टाकून कुकर गॅस वर ठेवले.   एक पूर्ण लसूण,८-१० हिरव्या मिरच्या आणि १ इंच अदरक यांची पेस्ट  तैयार करून घेतली. अर्धा किलो टमाटर (आंबट वाले नको) आणि अर्धा किलो कांदे बारीक चिरले. या पैकी काही फोडणी साठी आणि काही नंतर सर्व करण्यासाठी. एक जुडी कोथिंबीरआणि तीन लिम्बांचे चार-चार तुकडे करून ठेवले.  दोन शिट्या   झाल्यावर कुकर गॅस वरून उतरवून घेतले. तो पर्यंत चिंकीचे  हि घरात पदार्पण झाले होते. काका कशी भाजी बनवितात आहे,हे पाहण्यासाठी स्वैपाकघरात आली. त्या वेळी मी पनीर (२५० ग्राम) बारीक चिरीत होतो. तिला पाहताच मी गुगली फेकली, म्हणालो चिंता करून नको तुझ्या आवडीच्याच भाज्या आहेत, यात फ्लावर, बटाटे, बिन्स आणि पनीर  आहे.  शिवाय माझ्या सारखा अडाणी तुझ्या सारख्या डॉक्टरीण बाईला मूर्ख बनवू शकतो का? काका तू किनई,.... म्हणत ती बाहेर पडली. तिने कुकर उघडून  पाहण्याची जुर्रत केली नाही. हायसे वाटले.  आता वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. घरात एक मोठी कढई आहे. ती गॅस वर ठेवली. २-३ डाव तेल टाकले. एक चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडलल्या वर अदरक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. नंतर कांदे घातले. कांदे थोडे ब्राऊन झाल्यावर, टमाटर टाकले. टमाटरला तेल सुटे पर्यंत ४-५ मिनिटे लागतातच. तो पर्यंत वाट पहावीच लागते. घाई केल्यास टमाटर व्यवस्थित तळल्या जात नाही. अपेक्षित स्वाद हि मिळत नाही.  कुकर उघडून, एका पळीने भाजी ढळवून काढली.  टमाटरला तेल सुटू लागल्यावर, १ मोठा चमचा, हळद, तिखट आणि गरम मसाला आणि २ चमचे धने पूड त्यात घातली. नंतर  भाजी घातली.  आपल्याला भाजी जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकू शकतात. मला थोडी घट्ट भाजी आवडते म्हणून जास्त पाणी घातले नाही. नंतर बारीक चिरलेले पनीर त्यात घातले. एक उकळी आल्यावर तीन चमचे MDH पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ त्यात घातले. २-३ मिनिटानंतर गॅस बंद केला. कुठलाही पदार्थ झाल्यावर चिरंजीवाला स्वाद पाहण्यासाठी  बोलवतोच. त्याची पावती मिळाली म्हणजे पदार्थ चांगला झाला आहे, हे समजावे. त्यांनी टेस्ट करून पावती दिली.  मी  स्वैपाक घरातून बाहेर आलो. घामाघूम झाल्यामुळे सरळ स्नान घरात जाऊन आंघोळ केली.  तो पर्यंत सौ. ने स्वैपाकघराचा ताबा घेतला होता.  घरात काढलेल्या लोण्यात पाव परतून पावभाजी सर्व केली. 



चिंकीला  पाव भाजी भारी आवडली.  तरी हि तिने म्हंटले, मला माहित आहे काका, तुम्ही निश्चित मला न आवडणार्या भाज्या यात घातल्या असतील. आम्ही सर्व जोरात हसलो...