दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे.
वीज गेली. पंखा हि बंद झाला. इमरजेन्सी लाईट लाऊन वीज येण्याची वाट पाहू लागलो. एक तर पावसाळी महिना आणि त्यात भरपूर उमस. सौ. ने दरवाजे खिडक्या उघडल्या वारा आत येण्यासाठी. अचानक उजव्या हातावर खाज सुटल्या वाटले. बघितले एक डास हातावर बसून माझे रक्त पिण्यात मग्न होता. मनात विचार आला, नर डास मानवाचे रक्त पीत नाही. बहुतेक हि मादी असावी. आता रक्त पितेच आहे, तर पोटभरून पिऊ द्या. एक दोन रक्त्याच्या थेंबानीं आपले काय बिघडणार. अचानक थांक्यु आवाज ऐकू आला, कोण थांक्यु म्हणाले म्हणून इकडे तिकडे पाहू लागलो. अरे इकडे तिकडे का पाहतो आहे, मी डासांची राणी तुला थांक्यु म्हणते आहे. मी विचारले, थांक्यु कशाला राणी साहिबा? डासांची राणी म्हणाली तू पहिलाच मानव आहे, ज्याने मला पोटभरून रक्त पिऊ दिले, हाकलण्याचा प्रयत्न केला नाही. मी तिला विचारले, मी तुला रक्त पिऊ दिले, बदल्यास तू काय देणार मला, डेंगू कि मलेरिया. हा!हा! हा! चक्क हासली ती आणि म्हणाली, आम्ही डास काही डेंगू, मलेरिया पसरवित नाही, ते कार्य परजीवी/ विषाणूंचे आहे. मी म्हणालो तेच ते, तुम्ही डास त्यांना आपल्या शरीरात आश्रय देतात आणि आमच्या शरीरात सोडतात. आम्ही आजारी पडतो. लाखोंच्या संख्येने दरवर्षी लोक मरतात. डासराणी हि चिडून म्हणाली, तुम्ही माणसे हि काही कमी क्रूर नाही. रासायनिक पदार्थांचा वापर करून अब्जावधी डासांची कत्तल करतात. त्याचा सूड म्हणून आम्ही डासांनी काही लक्ष मानवांना परजीवींचा उपयोग करून मारले तर त्यात गैर काय.
डासराणीला चिडलेले पाहून मी विषय बदलत म्हणालो, तू माझे रक्त प्याली त्याचे मला काही वाटत नाही. पण मी आजारी पडलो, मला ताप आला तर उद्या सकाळचा रियो ऑलम्पिकचा भव्यदिव्य कार्यक्रम बघता येणार नाही. डास राणी कानाजवळ येऊन हळूच पुटपुटली, भव्यदिव्य, अSSच्छा, अर्धनग्न सांबा नर्तकी पाहता येणार नाही, याचे दुख होते आहे का? थेरड्या कुठला काही वयाचा विचार कर? च्यायला हिला माझ्या मनातले कसे कळले, मी निरुतरच राहिलो. डासराणी सांत्वना देत म्हणाली, अरे शंभर एक माणसांचे रक्त पिल्यावर एखाद-दुसरा आजारी पडतो. काही एक होणार नाही तुला उद्या सकाळी उठून खुशाल बघ त्या नागड्या नर्तिका. मी चिडून म्हणालो काही हाड आहे का तुझ्या जिभेला. डास राणी मिस्कीलपणे म्हणाली, माणसांच्या जिभेला नसते, तर आमच्या जिभेला कुठून येणार. एवढीच सुंदर स्त्रियांना पाहण्याची इच्छा असेल तर आज संध्याकाळीच मी गल्लीतल्या डबक्यात अंडी दिली आहे. तुला माहित असेलच जास्तीस्जास्त एका आठवड्याचे आमचे आयुष्य. उद्या संध्याकाळी पर्यंत अंड्यातून निघालेल्या माझ्या कन्या काय म्हणतात ते, तुमच्या मानवांच्या भाषेत षोडशी रूपवती होतील. पाठवून देईन त्यांना उद्या रात्री तुझ्या गालाचे मुके घ्यायला. क्षणभरातच माझ्या डोळ्यांसमोर गालावर जागोजागी डासांनी चावल्याचे व्रण दिसू लागले. जोरात ओरडलो, दुष्टा चूक झाली माझी, तुला हातानी चिरडून टाकायला पाहिजे होते. तुला काय माहित आम्ही माणसे काय चीज आहोत ते, आमच्याशी पंगा महागात पडेल, पहाच एक दिवस जगातले सर्व डास नाहीसे होतील. तिने रावणा सारखा अट्टाहास केला व म्हणाली, तुम्ही मूर्ख मानवानी आम्हा डासांना मारण्यासाठी काय काय उपाय केले आहे, सर्व माहित आहे मला. पहिले कासव छाप आणली. आमचे काही बिघडले नाही.तुम्हीच खोकलू लागला. मग goodnight आणली आम्हाला दूर ठेवण्यासाठी. काही उपयोग झाला का? धूरवाली गाडी आणली. धूर पाहताच आम्ही धूम ठोकून देतो. त्या रासायनिक धुर्याचा त्रास तुम्हालाच होतो. बाकी एक मला कळत नाही?
मी स्वत:ला वाद विवादात प्रवीण समजत होतो,पण या घटकेला डासराणी समोर पूर्णपणे निशस्त्र झालेलो होतो, मरगळलेल्या आवाजात म्हणालो, काय कळत नाही. डासराणी म्हणाली, हेच ते जागो जागी पाणी साचवून, डबके निर्माण करून तुम्ही माणसे आमच्या साठी घरे बांधतात. आमची पैदास वाढली कि आम्हाला मारण्याचे प्रयत्न करतात, या मूर्खपणाला काय म्हणावे. आत्ताच रियोचे घ्या मी ऐकले आहे, तिथे अब्जावधी डासांना यमसदनी पाठविले आहे. पण आमचे बंधू हि काही कमी नाही. त्यांनी हि निश्चय केला आहे याच मौक्याचा फायदा घेऊन जिका नावाच्या दुष्ट परजीवीला जगभर पोहचविण्याचा. किती मजा येईल ना, तुला जिका झाला तर. आता मात्र हद झाली, पाणी डोक्यावरून गेले होते, त्या दुष्ट राणीला सबक शिकविण्यासाठी मी ताडकन बिस्तारावरून उठलो, बघतो काय समोर टीवी सुरु होता, एक-एक करून विभिन्न देशांचे खेळाडू मैदानात प्रवेश करत होते. सौ. शांतपणे बसून टीवी पाहत होती. माझे डोके सटकले, तिच्यावर डाफरलो. मला का उठविले नाही. सौ. मिस्कीलपणे म्हणाली, अहो, किती प्रयत्न केला तुम्हाला उठविण्याचा. ज्या वेळी सांबा नर्तकी येत होत्या, तुम्हाला चिमटा हि काढला होता उठविण्यासाठी. मी आश्चर्याने विचारले, तर तू चिमटा काढला होता तर, मला वाटले.... सौ: काय वाटले.... अहो पण तुमच्या गालावर हे काय. डास चावला वाटतो. मी नकळत म्हंटले, डास नाही डासराणी चावली. सौ.: काय काय स्वप्न बघता तुम्ही, काहीच कळत नाही. मी समोर टीवी कडे बघितले, स्क्रीनवर एक डास दिसत होतो, जवळ गेलो निरखून बघितले, मानवी रक्ताने त्या डासाचे शरीर फुगलेले होते. मनात विचार आला, चिरडून टाकले पाहिजे याला, पण थांबलो, कदाचित हीच डासांची राणी असेल. स्त्रियांवर हात उगारणे पुरुषांना शोभत नाही. शिवाय एका राणीने डासांची का होईना माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या गालाचा मुका हि घेतला होतता.....
मनात गुणगुणत हात तोंड धुवण्यासाठी वाशबेसिन जवळ गेलो.
मनात गुणगुणत हात तोंड धुवण्यासाठी वाशबेसिन जवळ गेलो.
जगू द्या सर्वांना
डास असो वा माशी
मच्छरदाणी पांघरून
शांत झोपतो आम्ही.
No comments:
Post a Comment