Thursday, August 11, 2016

अंधविश्वास भाग (४) सुखाचा शोध




अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


समर्थांनी  म्हंटले  आहे  'जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे'. तरी हि प्रत्येक व्यक्ती सुखाचा शोधात असतो. कधी कधी सुख मिळविण्यासाठी तो शार्टकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि 'अंधविश्वासाच्या' जाळ्यात अटकतो.

सामान्य माणसाची सुखाची कल्पना - इच्छित वस्तू मिळाली पाहिजे, घरात लक्ष्मी आली पाहिजे इत्यादी इत्यादी. अगदी छोट्या छोट्या. सदाशिव अर्थात सदूला हि आर्ची आवडायची आणि आर्चीला परश्या. आता आर्चीला परश्यापासून दूर करून तिला कसे पटवायचे याच विचारात सदू सदैव मग्न राहायचा.  सदूला पोहता येत नव्हते, परश्या सारखी विहरीत उडी मारून आर्चीला इम्प्रेस करणे त्याला शक्य नव्हते. झिंगाट डान्स हि त्याला येत नव्हता.  घरात कार असती तर सदूने आर्चीला म्हंटले असते 'आजा मेरी गाडी में बैठ जा'. पण काय करणार घरात गाडी तर सोडा दुचाकी हि नव्हती. एक दिवस त्याने वर्तमान पत्रात जाहिरात पाहिली 'वशीकरण मंत्र देणारे बंगाली बाबा'. कशीबशी ५०० रुपयांची व्यवस्था करून  बंगाली बाबाला पाठविले. एक पुडा त्याचा घरी पोस्टाने पोहचला. सदूने उघडून बघितले त्यात एक पुडी होती. सोबत एका कागदावर लिहिले होते, यातला अंगारा इच्छित मुलीच्या डोक्यावर घालून मंत्र म्हणा, ती मुलगी तुमच्या मागे धावत येईल. मैत्रिणींच्या घोळक्यात आर्ची उभी होती, सदू जवळ गेला हिम्मत करून अंगारा तिच्या डोक्यावर फेकला आणि ओम फट स्व:हा म्हंटले. हा विचित्र प्रकार पाहून, आर्चीचा पारा चढला. सदू सटकण्या आधीच तिने सदूला धरले आणि एक जोरदार थापड त्याच्या मुस्कटात हांडली. दुरून परश्या आणि त्याच्या मित्रांनी हा प्रकार पहिला. आर्चीला इम्प्रेस करण्याचा हाच  मौका. परश्याने हि सदूला यथेच्छ धुतला. बिस्तारावर पडल्या-पडल्या सदू बंगाली बाबाला शिव्या मोजतो आहे, पण आता त्याचा काय फायदा. सदूची  कालेजमध्ये  "नाक तर कापल्या गेलीच शिवाय तो करमणुकीचा विषय हि झाला".  वशीकरण मंत्र असो किंवा जारण-मारण मंत्र शेवटी याचा खरा फायदा बंगाली बाबांनाच होतो. याचा वापर करणाऱ्यांची दशा एक तर सदू सारखी होते किंवा प्रकरण जास्त बिघडले तर गजाआड हि जावे लागते. असो. 

पैश्या सोबत समाजात प्रतिष्ठा हि मिळते. आता पैसा कमविण्याचे दोन मार्ग आहेत. एक वाममार्ग- अर्थात चोरी-चकारी, दरोडा, लोकाना लुबाडणे इत्यादी. पण या मार्गात जान जोखीम मध्ये टाकावी लागते. पकडल्या गेल्यावर जेलची हवा हि खावी लागते. दुसरा मार्ग नौकरी-धंधा जे काही करायचे आहे त्याचे ज्ञान प्राप्त करणे आणि लक्ष्य प्राप्तीसाठी  अविरत मेहनत करणे. सदू सारख्या लोकांना यातले काहीच जमत नाही. मग तो पैश्यांचा पाउस पाडणाऱ्या बाबांच्या चक्कर मध्ये पडणारच आणि स्वत:चे नुकसान करून घेणार.    

समाजात चांगले सुशिक्षित लोक हि अंधविश्वासी असतात. फरक एवढाच हे लोक बंगाली  बाबांच्या एवजी  'जोतिष शास्त्रावर' विश्वास ठेवतात. असाच एक किस्सा आठवला. सरकार-दरबारात नौकरी करणार्या एका अत्यंत सज्जन शाकाहारी दाक्षिणात्य ब्राह्मणला आपल्या लग्नायोग्य मुलासाठी सुंदर, सुशिक्षित, नौकरी करणारी मुलगी पाहिजे होती. या माणसाचा जोतिष शास्त्रावर प्रचंड विश्वास. राहू कालात सरकारी फाईल हि बघायचा नाही. आता जी मुलगी मुलाला पसंद येत होती, तिच्या मार्गात राहू-केतू, शनी-मंगळ यायचे. असेच काही वर्ष निघून गेले. कंटाळून  मुलाने स्वत: मुलगी पटवली आणि कुणालाही न सांगता कोर्टात लग्न केले, ते हि परप्रांतीय आणि दुसर्या जातीच्या अखाद्य पदार्थ भक्षण करणार्या मुलीशी. आता तो मुलगा बापापासून वेगळा राहतो. ग्रह नक्षत्रांच्या चक्कर मध्ये मुलगा बापापासून नेहमीकरता  तुटला. 

सुखाचा शोध माणसाने घेतला पाहिजे. पण योग्य मार्गाने. अन्यथा  सदू सारखी गत होणारच. लक्ष्मी हि उद्यम प्रिय आहे. जो उद्यमी आहे त्यालाच ती प्राप्त होते. अन्य मार्गाने तिची प्राप्ती अशक्य आहे. वाममार्गाने हि तिची प्राप्ती होते, पण त्यासाठी कधी कधी मोठी किंमत हि मोजावी लागते. आर्चीचे परश्यावर प्रेम आहे. हे माहित असूनही सदूला  आर्ची हवी होती. हा सदूचा मूर्ख पणाच. सदूला जर माहित असते, जगात कुणाच्याच सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नाही. हेच जगाचे सत्य आहे. सदूने आर्चीचा नाद सोडला असता.  

 

No comments:

Post a Comment