Sunday, September 13, 2015

चाय पे चर्चा- आवळ्याचे तेल (देशी / विदेशी)


ऐन जवानीच्या दिवसांत  'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण  अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या  हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.

चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच.  चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ  उघडे करतोच. चहा पिता पिता  पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो.  पंतप्रधान मोदी साहेबांनी तर  चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.

नुकताच  अशोक नगर, मध्यप्रदेशला, एक नातलगाला भेटायला गेलो होतो.  एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली.  आपको कोई  एतराज ना हो तो  "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे  निमंत्रण दिले.  आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.

दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर  समोर भिंती वर लक्ष गेल.  भारत मातेचे मोठे चित्र आणि  चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे.  मै भी बचपन में जाता था. 

थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम  घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली  अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादीगप्पांसोबत  पोहे आणि शिरा पोटात  रिचविला, नंतर  गरमागरम आले कडक चहा  आला.  आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली. 

अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५८ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हयाकडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो.  त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप  कौनसा तेल लगाते होआता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारलेआवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत.  शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतातत्याचे बोलणे  ऐकून मी अक्षरश: हादरलोच.  पुन्हा समोर भिंती वर  भारतमातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....

आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे  कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली.  एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचेवनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात.  कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते.(त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे)  एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात).  लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.

थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेहे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के).  १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.    

हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पूशेविंग क्रीम, साबण  इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात.  एमवे आंवला  तेलाची  बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल.  याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये.   मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल  ऑइल ( तीळ, खोबर्याचे, ओलिव  ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता  थबकलात्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि  परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर  त्याचे मानसिक समाधान झाले असते.  दुकानात येऊन त्याने आंवला  ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते).  निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता.  मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला  चर्चेचा योग्य परिणाम  साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.   

मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात  सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू   विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य  मानू लागले आहे.  दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो.

Tuesday, September 1, 2015

क्षणिका - वसंत आला रे सखी आणि बरसात



आग टेसु फुलांची
रोम रोमात भिनली.
कानात कोकिळा कुहकली
वसंत आला रे सखी.

पी कहाँ पी कहाँ
आर्त पुकार पपीहेची.
घनगर्जत वीज चमकली
बरसात  विरही  अश्रुंची.

Thursday, August 27, 2015

सयाना (मांत्रिक इ.) आणि फेसबुक (मिडिया इ.)


(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे)

मागासलेली गरीब अनाडी जनता आपल्या समस्या सोडविण्यासाठी  गावातल्या सयाना (मांत्रिक म्हणा, ओझा म्हणा ) कडे जाते.  या सयानाचे  सरळ देवा सोबत कॅनेक्शन असते. भूत, प्रेत, हडळ, चुड़ैल या सर्वाना  काबूत ठेवण्यात तो समर्थ असतो.  गावात किंवा पंचक्रोशीत काहीही वाईट घडले असेल, कुणाचा अकाल मृत्यू झाला असेल किंवा कुणाचे नवजात मुल दगावले असेल. तर कुणाच्या करणी मुळे असे झाले हे सयाना बरोबर हुडकून काढतो.  एकदा जादू टोना, करणी करणार्या हडळ / चुड़ैल  कोण  आहे  हे कळले कि मग काय विचारावे.   लोक त्या  हडळीला  पकडून आणतात, तिची गावातून धिंड काढली जाते, त्या स्त्रीला हाल हाल करून मारले जाते.  कुणी हि त्या  स्त्रीची   बाजू ऐकून घेण्याच्या भानगडीत पडत नाही.  

आता फेसबुक वर येऊ या.   फेसबुक हा जागतिक महासागर आहे, त्याच्या पुढे सयानाला  'कुएं का मेंढकच' म्हणावे लागेल. फेसबुक वर येणारे लोक सुशिक्षित  अतिविद्वान आणि विचारवंत असतात, असे समजले  जाते.  पण या फेसबुक वर  कुणाला ही जगातून उठविण्यासाठी फ़क्त एक पोस्ट प्रकाशित करायची गरज आहे. एक फोटो टाकला की त्या व्यक्तीच्या अब्रूचे  धिंडवडे सुशिक्षित लोक उडवू लागतील.  सत्य शोधण्याचा किंवा दूसरी बाजू पहाण्याचा प्रयत्न कुणी ही करणार  नाही.  

उदाः आत्ताच दिल्लीत घडलेली एक घटना. इथे फेसबुक वर पोस्ट टाकणारी आणि पोलिसात शिकायत करणारी एक तरुण, सुंदर स्त्री होती. आता शिकायत करणारी जर स्त्री  त्यात हि तरुण स्त्री असेल तर तपास करायची काय गरज.  पहिल्या २४ तासांत फेसबुक आणि  मिडिया  वर सर्वांनी त्या मुलाच्या अब्रूची लक्तरे उडविली. पोलीसने हि एकीकडे शिकायत दर्ज केली आणि दुसरीकडे  पुरस्कार  घोषित केला.  पोलिसांना ही पुरस्कार देण्याच्या आधी घटनास्थली असलेल्या लोकांची विचारपूस करून  सत्यता तपासायची  गरज वाटली नाही. मग  मुख्यमंत्री ही  मागे का राहणार त्यानी पोलिसपेक्षा जास्त पुरस्कार घोषित करून टाकला.  थोडक्यात  फेसबुक, मिडिया, पोलीस आणि नेता सर्वांनीच वाहत्या  गंगेत हात धुऊन घेतले.

हे सर्व पाहताना एकच विचार मनात आला एकीकडे सयाना आणि दुसरीकडे फेसबुक व मिडिया. माणसाला जगातून उठविण्याचे कार्य दोघेही व्यवस्थित बजावतात.  एका पक्षाला दोषी ठरवून त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करतात.  फरक एकच आहे सयाना वर विश्वास ठेवणाऱ्या  लोकांना आपण  अडाणी, अंधविश्वासी इत्यादी म्हणतो. फेसबुक व मिडीयावर होणार्या चर्चांवर विश्वास करणार्याना काय म्हणावे .....


Friday, August 21, 2015

विरोध शिवाजी राजांना होता, पुरंदरेना नव्हे


(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो.  हे हि लोकांना कळले पाहिजे.  म्हणून हा लेख).
 
दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून  मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून  जागा दिली.  मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता.  थोडी बहुत मराठी हि त्याला कळते. त्याने मला विचारले बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, माहित आहे का? त्या बाबत काय म्हणायचे आहे. त्याने  जाणता राजा पाहिल्याचे हि सांगितले.  मी म्हणालो, पुरंदरे यांचे शिवचरित्र फार ३०-३५ वर्षांपूर्वी वाचले होते. आता काही विशेष आठवत नाही. राजनैतिक कारणांमुळे त्यांना पुरस्कार देण्याचा विरोध होतो आहे. एवढेच टीवी पाहून कळते. 

तो खळखळून हसला. मला म्हणाला विरोध पुरंदरे यांना नाही, अपितु  हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांचे गुणगान करणाऱ्या शाहिराला देण्याचा होतो आहे.  विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही.  शिवाजी राजांचे गुणगान धर्मनिरपेक्ष लोकांना आवडत नाही.

च्यायला त्याच्या या जावई शोधामुळे माझी विकेटच उडाली. मी त्याला विचारले, या विधानाला काही पुरावा आहे का?  तो म्हणाला शाहिरांचे नाव घेतल्या बरोबर लोकांना शिवाजी राजा आठवणार, मुघलांचे अत्याचार आठवणार, अफजलखान आणि शाहिस्तेखान आठवणार. भूषण हि आठवणार, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे हि आठवणार.  औरंगजेबाचे संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न महाराष्ट्रात भंगले. हिंदवी साम्राज्याची घुड दौड उत्तरे पर्यंत पोहचली.  अहल्याबाई होळकर समेत अनेक मराठा सरदारांनी उत्तरेतल्या हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला.....इत्यादी.  एका रीतीने हिंदवी साम्राज्याचे स्वप्न साकारल्या गेले.  सारांश शिवाजी राजेंमुळे देशाचे इस्लामीकरण करण्याचे  औरंगजेबाचे स्वप्न भंग झाले. सत्य हेच आहे, आजच्या अल्पसंख्यक नेत्यांना  शिवाजी आवडत नाही.  त्यांना प्रसन्न करण्यासाठी  शाहिरांना पुरस्कार देण्याचा  विरोध करणे आवश्यक होते. 

मी त्याला विचारले विरोध करण्याने शरद पवारांना काय फायदा होणार? तो म्हणाला  कांग्रेसने ब्राह्मण+ दलित + मुस्लीम गठ्जोडची राजनीती करून देशावर शासन केले. वीपी  सिंग यांनी कांग्रेसच्या  राजनीतीला सुरंग लावला.  ओबीसी + मुस्लीम गठ्बंन पुढे आणले.  मायावतीने दलित+ मुस्लीम आणि ब्राह्मण कार्ड खेळले.  तसेच बिहार मध्ये लालूने हि मुस्लीम + यादव कार्ड खेळले.  या सर्वांना सत्ता मिळाली. दोन्ही राज्यात अल्पसंख्यक आणि दलित कॉंग्रेस पासून दूर गेले. बाकी उरलेले भाजपात गेले. दिल्लीत  ही लोकसभेच्या निवडणूकीत हिंदुवादी  भाजप जिंकली कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. केजरीवाल यांनी या मौक्याचा फायदा घेतला.  दिल्लीतलली ८०% अल्पसंख्यक मते आपकडे वळवली. भारी बहुमताने विधान सभा निवडणूक जिंकली.  मुख्यमंत्री केरीवाल यांनी नौटंकी सोडून व्यवस्थित राज्य केले तर  कॉंग्रेस दिल्लीत  हि  संपुष्टात येईल.

महाराष्ट्रात हि जर अल्पसंख्यक मते राष्ट्रवादीकडे वळली, तर शरद पवारांची बल्लेबल्ले होईल. ज्या शरद पवारांनी कित्येकदा शाहिरांचा सम्मान केला, त्यांचे अनुयायी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या  आदेशनुसार हे सर्व घडले.  बाकी कांग्रेसचे म्हणाल तर वरून काही हुकुम  आला नाही.  विरोध कि समर्थन काय करायचे त्यांना कळले नाही.  

त्याचे इतिहास ज्ञान पाहून मी विचारले आपने इतिहास पढ़ा है क्या? और एक बात क्या आप पूर्वांचली हो क्या?  किसी भी बात में राजनीती ढूंढकर उसका  गहरा विश्लेषण कोई पूर्वांचली हि  कर सकता है. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. संभाजी ब्रिगेडवाले तर शिवाजी राजेंना आपला आदर्श मानतात. त्यानी का विरोध केला. तो म्हणाला, मी पूर्वांचली आहे, मला  बीए मध्ये इतिहास हा एक विषय होता. आयुष्यात त्याचा कही उपयोग झाला नहीं हे वेगळे. बाकी संभाजी ब्रिगेडचे  म्हणाल तर,  रस्त्यावर दंगामस्ती, तोडफोड करणार्या छुटभैये नेत्यांना आपल्या राजनीतिक आकाना प्रसन्न करून  राजनीतिक जीवनाची सुरुवात करायची असते. वरिष्ठ नेता प्रसन्न झाले तर निदान 'वार्ड' ची तरी निवडणूक  लढायला मिळू शकेल, हि अपेक्षा.  बाकि इतिहास वैगरेह किंवा पुरंदरे यांच्या लेखानाबाबत त्यांच्या पैकी अधिकांश लोकांना  काही माहिती ही असेल मला नाही वाटत. असली तरी हि, राजनीतिक उद्देश्य साधण्यासाठी त्याच्या कडे दुर्लक्षच करतील.   

तेवढ्यात माझे स्टेशन आले, मी मेट्रोतून उतरलो. घरी येता येता विचार करू लागलो. त्याच्या बोलण्यात हि तथ्य होते. महाराष्ट्रात विशेषकरून मुंबईत पूर्वांचली (भैयांची) लोकांची  संख्या भरपूर आहे. ते हि निवडणूकीत मते देतात. एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे.  म्हणून हा लेख.

Monday, August 17, 2015

नामाची महिमा न्यारी


नाम संकीर्तन साधन पैं सोपे
जळतील पापें जन्मांतरीची.
(संत. तुकोबाराय)

 
शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला  कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते.  समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते. भगवंतापेक्षा, त्यांचे नाव जास्त परिणामकारक होते.

दिल्लीत प्रतिनियुक्तीवर आलेला एक सरकारी अधिकारी आपले विजेचे बिल ठीक करण्यासाठी DESUच्या कार्यालयात गेला.  तिथल्या बाबूला आपले नाव आणि पद सांगून बिल ठीक करण्यास विनंती केली.  च्यायला आपल्या पदाचा रौब दाखवितो, बाबू भडकला, इथे सर्वच मोठे अधिकारी येतात, आधी बिल भरा, अप्लिकेशन द्या, मग काय करायचे ते बघू. अधिकारी हात हलवीत कार्यालयात परतला. त्याने आपल्या पीएला, घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या पीए म्हणाला ‘साब इतनी सी बात के लिये आपने क्यों तकलीफ ली’.  त्याने साहेबांकडून बिल घेतले, लगेच DESUतल्या मोठ्या अधिकाऱ्याला फोन लावला, मी अमुक अधिकार्याच्या पीए बोलतो आहे, साहेबांच्या बिलात समस्या आहे, सिपाहीला पाठवीत आहे. अर्थातच दोन तासांत बिल ठीक झाले.  आता हे ही समजले असेल, अधिकांश अधिकारी आपल्या घरची सर्व कामे अर्थात वीज, पाण्याची बिले, प्रापर्टी टेक्स, इन्कमटॅक्स,  बेंकेच कामे इत्यादी आपल्या व्यक्तिगत स्टाफ कडून का करवून घेतात.

देवळात हि सतत प्रभूचे नाव घेणाऱ्या सेवकांचीच चलती असते.  दिल्लीत दर मंगळवारी श्री रामाच्या मंदिरा एवजी हनुमान मंदिरातच भक्तांची भीड जास्त असते.  भक्त रामनाम जपणार्या हनुमन्ताला त्यांच्यावर आलेले संकट दूर करण्याची विनंती करतात. हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी त्याला नेवेद्य हि अर्पित करतात.   श्रीरामाला कुणी विचारात सुद्धा नाही. तसेच शिवाच्या मंदिरात नंदीला आणि गणपतीच्या मंदिरात उन्दिराला हि अनन्य महत्व आहे.  प्रभूचे हे सेवक हि भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांचे संकट दूर करतात.  म्हणूनच तुलसीदासांनी म्हंटले आहे,  
 


संकट कटै मिटै सब पीरा,जो सुमिरै हनुमत बलबीरा.

अर्थात जे भगवंताला शक्य नाही ते कार्य हि भगवंताचे नामस्मरण करणारे भक्त सहज करू शकतात.  आपण आज पाहतोच भगवंताचे नाव घेणारे लोक किती हि पाप करत असतील तरी ते  भगवंताच्या कृपेने सुखी आणि समृद्ध होतात. साक्षात लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते. महापापी सुद्धा पवित्र होतात. म्हणूनच समर्थांनी म्हंटले आहे. 

नामें पाषाण तरले.
असंख्यात भक्त उद्धरिले.

महापापी तेची जाले.
परम पवित्र
.



Wednesday, August 12, 2015

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण ?

 
दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात....

हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच  निर्णय अंतिम असतो)  हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों.

ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान. परंपरेचे मला ज्ञान, संगीताची मीच आहे राणी, पंचम सूर हा ऐका माझा, कुह कुह कुह कुह.

ह: ह: ह: ह:, जुनाट बूर्ज्वा सूर तुझा, आज जमाना रेपचा, पुरोगामी या कावळ्याचा, रेप रेप रेप रेप, कांव कांव कांव कांव.

कोण बूर्ज्वा, तू हलकट, नालायक, चुडेल-डाकिन तू,  कुह कुह, कांव कांव. म्याऊ म्याऊ, भों भों भों, हातवारेचा हा! हा! हा!.

ज्वलंत चर्चा रंगली अशी, कान लाउनी ऐकती सारी, ज्ञानी अज्ञानी प्रतीगामी, ऐकू आले केवळ, ढेन्चू, ढेन्चू, ढेन्चू गर्दभ गान.

आजची चर्चा इथेच संपली, आपण उद्या पुन्हा भेटू, नवीन विषय पण ओरड तीच,  ढेन्चू, ढेन्चू ढेन्चू.

कुणाला काही कळले का?  नसेल तर उद्या पहा ‘आजची ज्वलंत चर्चा’

Saturday, August 8, 2015

सत्य कथा - रुपयाचे कांदे वीस पैश्यात


सीपी ते उत्तम नगर, ३५ मिनिटांचा मेट्रो प्रवास.  माझ्या जवळ बसलेला  एक मेट्रो प्रवासी सहज म्हणाला 'प्याज फिर महंगा हो गया है, सरकार को नतीजा  भुगतना पड़ेगा.' 'कोण म्हणतो कांदा महाग झाला' एक पांढरे केस वाला वयस्कर ग्रामीण (चौधरी) उतरला. त्यावर तो प्रवासी म्हणाला, चौधरीजी मालूम है, आज प्याज का भाव ५० रुपया किलो है.  कांद्यामुळे सरकार पडते, १९९८ मध्ये दिल्लीत काय घडले होते माहित आहे का?

चौधरी उतरला,  चांगले माहित आहे, त्या वेळी हि कांद्याचा  भाव ५० रुपये किलो झाला होता.  पण त्याला १७ वर्षे झाली. त्या वेळी बसचे भाडे ३ रुपये होते, आज १५ रुपये आहे. मेट्रोत तर आणखीन जास्त लागतात.  माझ्या गळ्यात लटकलेले आय कार्ड पाहून, मला उद्देश्यून म्हणाला, या कालावधीत सरकारी  बाबूंचे पगार तर ५-७ पट नक्कीच वाढले असतील.  मी काय चूक बोलतो आहे. मी म्हणालो चौधरीजी आपले म्हणणे खरे आहे. आपण शेतकरी आहात का? 

चौधरी पुढे म्हणाला, माझी राजस्थान मध्ये शेती आहे, कांद्याच्या शेतीत कितीतरी वेळा नुकसान झाले आहे. मी तर शेतात कांदे लावणे सोडून दिले आहे.  सरकार कुठली हि आली तरी तिला शेतकर्यांची पर्वा नाही. तुम्हीच सांगा, महागाई शेतकर्याला हि आहे कि नाही, १९९८ च्या हिशोबाने आज सीजनमध्ये कांद्याला एका किलोचा ५०-७० रुपये आणि अगस्त-सेप्टेम्बरमध्ये किमान १००-१५० रुपयांचा भाव मिळाला  पाहिजे.   पण आज ऑगस्टच्या महिन्यात हि किलोला भाव फक्त ५० रुपये आहे.  सीजनमध्ये तर कांद्याचा भाव केवळ १० रुपये होता.  आज  जर किलोचा  भाव २५० रुपये असता तर कांदा महाग झाला म्हणता आले असते. सच तो यही है, गेल्या १७ वर्षांत कांद्याचा भाव १ रुपया वरून २० पैश्यावर आलेला आहे. त्याचा ह्या बोलण्यावरून मेट्रोत जोरदार हशा उमटला. एक प्रवासी उद्गरला,  लगता है, बुढापे में चौधरीजी  का दिमाग चल गया है.   

तेवढ्यात उत्तम नगरचे स्टेशन आले. घरी जाताजाता चौधरीजी जे म्हणाले त्यात किती सत्य आहे याचा विचार करू लागलो. चौधारीजींचे म्हणणे खरेच होते. खरोखरच गेल्या वर्षांत कांद्याची किंमत घसरत घसरत  रुपयावरून वीस पैश्यांवर आली आहे.


Wednesday, August 5, 2015

शतशब्द कथा - स्वाभिमानी मुलगा



गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा?

फारेनला आहे आजकल.

कुठे दुबई ला

आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब, कनाडात सेटल झाला  आहे.

काय करतो तिथे?

"मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम-टू-टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पुण्या-मुंबईपेक्षा ही बेस्ट आहे".

अस होय, मग लग्न वैगरेह झाल असेल त्याच?

"छे हो, स्वाभिमानी मुलगा आहे, म्हणतो करेल तर मराठी मुलीशीच, आता साहेब तुम्हीच सांग, तिथे जेल मध्ये मराठी मुलगी कुठे मिळणार?"

आ!!!