Wednesday, March 30, 2016

मार्ग मुक्तिचा



तहानलेली नदी
पाण्याच्या शोधात 
भटकत होती
भयाण वाळवंटात.

उडणार्या गिधाडास
विचारले तिने
भाऊ मिळेल का कुठे
जीवनदायी पाणी.

पाण्याचे विचारू नको
सापडेल तुला पुढे
ताई मार्ग मुक्तिचा.

एका वळणावर
नदीने पहिले
शुष्क वडाच्या फांदीवर
लटकलेले होते एक प्रेत.

झाडाखाली साचलेला होता
एक ढीग मोठा कवट्यांचा
खेळत होती त्यांच्या सवे
गिधाडांची गोंडस पोरे
फुटबॉल फुटबॉल.

टीप: कवितेचा अर्थ शोधण्यास वाचक स्वतंत्र आहे.

Saturday, March 26, 2016

बडबड गीत - पंखा मेरा दोस्त



आमची छकुली आता ४० दिवसाची झाली. आजकाल तिला नवीन छंद लागला आहे. पंखा सुरु झाला कि ति पंख्याकडे पहात राहते, उगाचच आपल्या मनात हसते. कडे वर घेतले तरी तिच्या नजरा पंख्यावारच टिकलेल्या असतात. पंख बंद करताच तिचा सायरन सुरु होतो. झक मारून पुन्हा पंखा सुरु करावा लागतो. कधी कधी विचार येतो पंख्याला पाहून तिच्या मनात काय विचार येत असतील.

पंखा मेरा दोस्त
पण  बोलतच नाही.

फिरू फिरू करतो
घुमू घुमू करतो
घूं घूं करूत तो
नुसताच फिरतो.

हातवारे करते किती
स्माईली-स्माईली देते
गाढव लेकाला पण
काही कळतच नाही.
मला पाहून तो
हसतच नाही.

पंखा मेरा दोस्त
पण बोलतच नाही.

Thursday, March 24, 2016

मेट्रो प्रवासात : मनुस्मृति वर चर्चा - ब्राह्मण आणि शुद्र


आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक  बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची  काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल.
 
जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही.  बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात.  तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही.  

मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक  सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट)  मनुस्मृतित स्थान मिळाले असेल.  तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील  ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल. 

हा लेख लिहिण्याचे कारण असे,  कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण  विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा.  मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का? अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले.  पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती.  माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता.  एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही  मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च।
(10/65

महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस  म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला.

ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः.
ऊरु  तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत.

(यजुर्वेद: ३१/११)

या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे. 
 
ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे. 

अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्.
विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्.

(तैत्तिरीय उपनिषद ३/४)

त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न  व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा.  आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच. 

क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात.
 
वैश्यचा  जन्म जंघेतून झाला.  ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा  उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे.
 
शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला.  ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान  किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे. 

आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच  चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही  जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते.

हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु  खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता.  शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल  अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति  पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या  पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच. 

Saturday, March 19, 2016

यमुनाकाठी दैवीय शांती यज्ञ आणि आसुरी अहिष्णुता



द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर  दैवीय प्रेरणेने  सर्व पंथीय धार्मिक  नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे  देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते.  या  सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्य अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति. विद्वान धार्मिक लोक ज्याला वेग वेगळ्या स्वरूपात ओळखत असले तरी  तो एकच आहे. प्रेम आणि शांती हीच परमेश्वराची खरी आराधना. कदाचित कलयुगात असा दैवीय अनुभव लोकांना प्रथमच अनुभवला असेल. १५५ देशातल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेनी शांती आणि प्रेमाचा ह्या  यज्ञात आपली आहुती टाकली. जगभर श्रीश्रींचा प्रेम आणि शांतीचा संदेश पसरविण्याचा प्रण केला.

केवळ धार्मिक नेत्यांनीच प्रेम आणि शांतीचा उद्घोषणा नाही केली तर मंगोलिया ते मेक्सिको, लात्विया ते अर्जेन्टिना, जगभरातल्या देशातील राजप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वानीच ईश्वर एकच आहे, जगाला पुढे नेण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे प्रेम आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचा मार्ग.  काही राजप्रतिनिधीनीं प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा संमेलन श्रीश्रीनी  त्यांच्या देशात भरवावे अशी इच्छा हि व्यक्त केली. जगभरातल्या विभिन्न संस्कृतींचे दर्शन या विशाल मंचावरून सर्वांनाच घडले. भिन्न असलो तरी आपण एकच आहोत हि भावना लोकांच्या मनात रुजुविण्यात या संमेलनाला यश आलेतच.  सर्व विश्व एक मोठे घरच आहे, या वेद्वाक्याची प्रचीती हि आलीच. इथे नमूद करणे जरुरी आहे, पाकिस्तान मधून आलेल्या एका सांस्कृतिक प्रतिनिधीच्या म्हणण्याचा आशय होता, दोन्ही देश्यांचा मध्ये ‘अंबुजा सिमेंटने’ बांधलेली मजबूत भिंत असली तरी, आपण भाऊच आहोत, हेच सत्य.

शांती आणि प्रेमाचा प्रसार करणारा हा यज्ञ रक्तपिपासू आसुरी शक्तींना कसा आवडणार. आमचाच मार्ग सत्य आणि सर्वानींच तोच मार्ग स्वीकारावा असे म्हणविणार्या IS, अलकायदाचे प्रतिनिधी तिथे आले नव्हते. सतत क्रांतीचा जयघोष करणारे, दुसर्यांचा विनाश चिंतणारे, आमच्या शिवाय सर्वच मूर्ख असे म्हणविणारे,  रावणा समान बुद्धिमान, आधुनिक वेदज्ञाता, पुरोगामी, बुद्धिमंद लोकानां अहिष्णूतेची खाज होणारच होती. त्यांना ह्यातही हिंदू धर्माचे षड्यंत्र दिसले. शिवाय जगातील  लोक जर शांतीने राहू लागले तर क्रांती कुणाच्या  विरोधात करणार, कुणाचा विनाश चिंतणार. चांगल्या गोष्टींचा विरोध आणि दैवीय यज्ञ उध्वस्त करणे हि आसुरी बुद्धिमंदांची  परंपराच आहे. त्यात नवल काहीच नाही.

या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदीजी करणार होते आणि समापन अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. एका मुळे, राजकुमाराला देशाची गादी मिळाली नाही आणि दुसर्याने दिल्लीत कांग्रेसला धुळीस मिळविले. साहजिकच आहे जिथे मोदी तिथे अहिष्णुता हि आलीच, संमेलनात मोदीजीना महत्व दिल्या जात आहे, हे पाहून राणी साहेबांच्या अंगाची लाही-लाही होणारच होती.  प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा हा दैवीय यज्ञ उध्वस्त झालाच पाहिजे असे तिला वाटणे साहजिकच होते. ज्या कार्यक्रमाला दिल्ली प्रदूषण नियमायक मंडळाने अनुमती दिलेली होती.  श्रीश्रींचे भक्त असलेले अनेक कांग्रेसी नेते हि कार्यक्रमाला सहयोग देत होते. गेल्या सहा महिन्यापासून तिथे काम सुरु होते.  कचर्याने भरलेली जागा स्वच्छ करण्यात आली होती, विशाल मंच बांधण्याचे काम हि ४-५ महिने आधी सुरु झाले होते. कुणाचाच विरोध नव्हता. पण राणी साहेबांच्या कपाळावर आठ्या पाहून सर्व नमकहलाल पत्रकार, नेता, RTI कार्यकर्ता मैदानात उतरले. कार्यक्रमाचा जोरदार विरोध सुरु झाला. ज्या NGTला दिल्लीतल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या कारखान्यातून निघणार्या रासायनिक कचरा कधीच दिसला नाही. किंवा यमुनाच्या काठावर घरकुल उभारणारे बांग्ला देशीय हि दिसले नाही. ती NGT कुंभकर्णा प्रमाणे झोपेतून जागी झाली.  पण प्रत्यक्ष  राजाचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कार्यक्रमाला उध्वस्त करणे NGTला शक्य नव्हते. ५ कोटींचा रुपयांचा जजीया लाऊन कार्यक्रमाला अनुमती दिली (असे अनेकांचे म्हणणे आहे).

शेवटी आसुरी शक्तींचा पराभव झाला आणि जगात शांती आणी प्रेमाचा  संदेश देणाऱ्या यज्ञ यथासांग पार पडला.  बाकी बाबू मोशाय यांना सर्व जगातील लोकांना ‘आम्ही तुमाके भाले-भाषी म्हणायचे असेल, पण  त्यांची ती इच्छा मनातच राहिली असेल.   असो.



Sunday, March 6, 2016

दंगा कथा - छोटे शैतान - एक अनुभव


मला आठवते तो ऑगस्टचा महिना होता. त्या दिवशी रविवार होता. रविवारी चांदनी चौक बंद राहत असले तरी लालकुआँ या परिसरातील सर्व दुकाने उघडी होती. चांदनी चांदनी चौक बाजाराच्या मागच्या बाजूला एक रस्ता हौजकाजी पर्यंत जातो. त्या भागाला लालकुआँ असे म्हणतात. ऑगस्टचा महिना हा दिल्लीत पतंगबाजीचा मौसम.  लालकुआँ हा बाजार पतंग आणि मांजा साठी  संपूर्ण  दिल्लीत प्रसिद्ध होता. गोटूला मांजाच्या  काही चरख्या  विकत घ्यायच्या  होता. मांज्याच्या १०० गजाच्या एका चरखीत १२५  गज मांजा असतो. १५-२०  गज सुट्टा मांजा  विकून त्याला काही पैसा कमवायचा होता. गोटू चा उल्लेख मागे हि एका गोष्टीत केला होता. (एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू)

सकाळची ११ एक वाजले असतील, आम्ही दोघेही लालकुआँच्या बाजारात पोहचलो. भरपूर भीड होती. का आणि कुणास ठाऊक अचानक दगडफेक सुरु झाली. दंगा हो गया एकच ओरड सुरु झाली. होणारी दगडफेक पाहून आम्ही जाम घाबरलो.  तेथून पळ काढला. मुख्य रस्ता सोडून आम्ही एका नागमोड्या अरुंद गल्लीत शिरलो. हि गल्ली थेट चांदनी चौकला निघत होती.  गल्ली अरुंद अर्थात ७-8 फूट रुंद असली तरी सर्व घरे ५०-६० फूट एक सारखे उंच.  गल्लीत काही पाऊले पुढे गेलो असूच कि अचानक दोन-चार दगड आमच्या पुढ्यात येऊन पडली, थोडक्यात बचावलो. हळूच मान वरून बघितले, ११-१२ वर्षांची २ मुले  दगडांचा वर्षाव करीत होती. आम्ही बघतो आहे, हे पाहताच ती मुले गच्चीच्या कठड्या पासून दूर पळाली. हरामखोर, शैतान म्हणून गोटूने जोरदार शिवी दिली. पण  तिथे थांबून, त्या घरात शिरून, जाब विचारण्याची हिम्मत नव्हतीच. जीव मुठीत घेऊन पळत- पळत ४-५ मिनिटांत आम्ही दोघे चांदनी चौकला पोहचलो. इथे सर्व काही शांत होते. मागे लाल कुआँच्या भागात काय सुरु आहे,  कुणालाही  माहित हि नसेल. १२-१३ वर्षांचे  असलो तरी थोडी अक्कल  होतीच. दोघांनी आज काय घडले कुणाला सांगायचे नाही हे ठरवले. (घरी सांगितले असते तर वडिलांनी आधी जाब विचारला असता, एवढ्या दूर उनाडकी करायला  कुणी सांगितले होते. शिवाय चांगली धुलाई पण झालीच  असती).  गोटूला त्या छोट्या शैतानांचा भयंकर राग आलेला होता. त्या शैतानांची माहिती काढून त्यांना अद्दल घडविण्याचा त्यांनी निश्चय केला होता.

२-३ आठवड्यानंतर गोटू पुन्हा भेटला. त्याला विचारले, काही पत्ता लागला का? कोण होते ते छोटे शैतान. गोटू म्हणाला गेल्या रविवारी त्या गल्लीत गेलो होतो. पण घर ओळखता आले नाही. कदाचित मी त्या वेळी जाम घाबरलो होतो. अश्या परिस्थितीत कुठे लक्ष्यात राहणार, कुठल्या घराच्या गच्ची वरून दगडफेक झाली होती.  पण एक गोष्ट कळली. त्या गल्लीत कुणाचे तरी डोके फुटले होते. पोलीस त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. थोडक्यात बचावला म्हणे. बाद में पुलिस गली के कुछ बदमाश लौंडों को पकड़ कर थाने ले गयी.  मी अडन्यासारखे विचारले, आपल्याला खर काय ते माहित आहे, पोलिसांना सांगितले पाहिजे. तो हसत म्हणाला, मूरख पोलीस आधी विचारतील तुम वहां क्या कर रहे थे, चक्की  पीसनी पडेगी, समझे क्या? पण ज्यांना पकडले त्यांचे काय झाले. होना क्या था, पुरा मोहल्ला पहुँच गया था, थाने में. पुलिसने अच्छी-खासी धुलाई की उन बदमाशों लौंडों की. मग मिस्किलपणे माझ्या कड़े बघत म्हणाला, बाद में दक्सिना लेके छोड़ दिया, पंडितजी. वैसे भी पंडतो और पुलिस में ज्यादा फर्क नहीं है. (मी ब्राह्मण आहे, त्याला चांगलेच माहित होते, फिरकी घेण्याचा मौका का सोडणार).

दंगे धोप्यांच्या अधिकांश घटनांमध्ये सुक्या बरोबर ओल आज हि जळते. पण त्या वेळी पोलीस ठाण्यातच अधिकांश मामल्यांचा निपटारा होत असे. क्वचितच मुकदमेंबाजीची नौबत यायची.  कारण त्या वेळी आज सारखा मिडीया नव्हता किंवा तिळाचे ताड करायची पद्धत हि नव्हती. छोट्या-छोट्या घटनांचा  राजनीतिक फायदा घेण्याची प्रवृत्ती हि नव्हती. 

बाकी गच्चीवरून खाली दगड फेकण्याचा परिणाम काय असतो, त्या छोट्या शैतानांना माहित हि नसेल. लोक दगडफेक करतात आहे, म्हणून त्यांनी हि दगडफेक केली असेल. पण एवढ्या वर्षांनतर आज हि त्या दिवसाची आठवण आली कि अंगावर काटे उभे राहतातच. 

Monday, February 29, 2016

दंगा कथा - छोटू


बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू. नया  बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतियाखान असा शाळेत जाण्याचा मार्ग. शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा. रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३  किलोमीटर पायी चालण्यामुळे  चप्पल आणि  जोड्यांचे बारा वाजयचेच.  

मोतियाखानच्या भागात पटरीवर एक चांभार बसायचा. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याच्या मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी अर्थात ७-८ च्या दरम्यान तो आपल्या वडिलांची कामात मदत करायचा. चप्पला आणि जोड्यांची छोटी-मोठी मरम्मत तोच करायचा.  

त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे हे व्हायचेच. आमच्या दृष्टीने दंगा म्हणजे बनियांच्या दुकानांची जाळपोळ आणि लूट-पाट.  असाच एक दंगा सदर बाजार येथे  झाला. त्या दंग्यात कपड्यांची बरीच दुकाने लुटल्या गेली. बहती गंगेत, अनेक गरिबांनी हि आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी अनेक मुले नवीन कपड्यात दिसू लागली. त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यात साजरी झाली. पण प्रत्येक नाण्याचे दोन पहलू असतातच.

दंग्याचा १५-२० दिवसानंतरची गोष्ट. शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला. त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला, या वेळी  हा शाळा  सोडून इथे का बसला आहे? कदाचित याचा वडिलांची तब्येत खराब असेल. जोड़ा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होताच. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारले, अब्बू की तबियत ख़राब है क्या?  छोटू म्हणाला, स्कूल छोड़ दिया है. अब दुकान में हि बैठूंगा. मी विचारले, का? तो निर्विकारपणे म्हणाला, अब्बू जेल में है. क्यों???

तो म्हणाला, उस दिन तडके,अम्मीने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही है. पड़ोस का नानके दो-चार  कपडे के थान उठा के लाया है. मोहल्ले के बाकि मर्द भी वहीं गयें है और तुम हो की सो रहे हो. अब्बू उठला, मनात विचार केला हे ठीक नाही. पण त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण मोह्ल्लाच हिंदू असो वा मुसलमान दुकाने लुटायला निघाला होता. अब्बू पण त्या भीड़चा हिस्सा बनला. सदर मध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बू हि त्या दुकानात घुसला. लालच बुरी बला होती है हि म्हण उगाचच नहीं. शरीराला पेलवत नव्हते तरी हि ३-४ कपड्यांचे थान डोक्स्यावर लादून अब्बू दुकानातून बाहेर पडला. अचानक आवाजे आली, पुलिस पुलिस. अब्बू घाबरला. त्याचा  तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच पण  पोलिसांनी हि त्याला रंगे हाथ पकडले. अश्यावेळी काय म्हणावे हे कळण्या सारखे वय नव्हते तरी हि मी हिम्मत करून विचारले, कोई वकील किया है क्या? हां, एक वकील केला आहे, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत है, काही वर्ष  तरी अब्बूला जेल मध्ये काढावी लागतीलच. छोटू पुढे म्हणाला उस दिन अब्बू से गलती हो गयी. किस्मत खराब थी, और क्या.  खरोखरच!  किस्मतची मार छोटू वर पडली होती. त्याचे शिक्षण सुटले. लहान वयातच  घराचा संपूर्ण  गाडा त्याच्या खांद्यावर आला होता.
   
त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार ही घेऊन आली होती.  

Saturday, February 27, 2016

माझी बोली भाषा



एका संकेत स्थळाने बोली भाषेत साहित्य पाठवण्याची सभासदांना विनंती केली. संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते.  एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो.  शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही.  

आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण. जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात आम्ही भाड्यावर राहायचो तिथे पंजाबी, गुजराती, बंगाली, हिंदी भाषी आणि मराठी भाषी असे ८-९ भाडेकरू होते. शेजार बनिया आणि मुसलमान. आमचे घरमालक कडक शिस्तीचे होते. वाड्यात राहणाऱ्या कुणा मुलाच्या तोंडून ‘साला’ शब्द जरी बाहेर पडला तर श्रीमुखात फडकावयाला कमी करत नसे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर तोंड-हात धुवायचे आणि नंतर आई देवासमोर दिवा लावायची. रामरक्षा आणि शुभंकरोती म्हणायचो. (आंम्हाला तीच मराठी वाटायची, नंतर कळले रामरक्षा,  स्त्रोते इत्यादी  संस्कृत भाषेत असतात).   
  
जुन्या दिल्लीत मराठी परिवार हि होते. रविवारच्या दिवशी सर्व मराठी मुले, महाराष्ट्र समाजात खेळायला जमत असू. आपसांत बोलताना सुरुवात मराठीतून  व्हायची आणि नंतर केंव्हा हिंदीत बोलू लागू कळत नसे. कुणी मोठ्यानी टोकले ‘जरा मराठीच बोला’ तेंव्हा लक्ष्यात यायचे. अश्यारितीने अधकचरी मराठी बोलायला शिकलो.  माझ्या बोली भाषेवर- उर्दूची अदब आणि तहजीब, शुद्ध हिंदी (शालेय शिक्षक) आणि घरची मराठी या सर्वांचा परिणाम झाला. वर्ष-दोन वर्षांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नागपूरला जायचो. तिथे गेल्यावर वाटायचे इथली मुले किती असभ्य. यानां बोलण्याची तमीज सुद्धा नाही. मोठ्याशी हि अरे-तुरे करतात. तिथे आमची, “काका आपल्या साठी पाणी आणू का?(चाचाजी आपके लिये पानी लाऊं क्या).” काका वैतागून म्हणायचा हे काय आप, आपण लावून ठेवले आहे, अरे मला तू म्हणत जा. पण मला, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर सोडा, लहान मुलांना  हि, ‘तू’ म्हणणे आजगयात जमले नाही.  

आई भंडार्याची होती. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एक दोन वेळा आजोळी गेलो होतो. तेही ८-१०  वर्षाचा होतो तेंव्हा. एवढे आठवते, आम्हा भावंडांचे बोलणे ऐकून, तुम्ही मुसलमान आहात का? अशी विचारणा केल्या गेली. नंतर एकदा लहान मामाच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो.  नुसती मुंडी हलविण्याचे काम केले, कारण लोक काय बोलत आहे काहीच कळत नव्हते.  असो.

पुन्हा प्रश्न आलाच माझी बोली भाषा कुठली. मला आठवले, एकदा माझ्या भावाला एक शेजारच्या मुलाने शिवी दिली, दगड हातात उचलीत तो म्हणाला, “मनोजजी, इज्जत से बात कीजिएगा, आइन्दा बत्तमीजी की तो हमसे बुरा कोई नहीं होगा, हमारा निशाना सटीक है, तुम्हारा डोक फोड़ दूंगा. समझे.”  बहुधा हीच माझी बोली भाषा. कारण भांडताना आपण आपली खरी भाषा लोकांसमोर उघडी करतो.

Wednesday, February 24, 2016

बिलिंदर राणी


 लेक  लेकीची
बिलिंदर राणी
पंधरा दिवसाची छकुली
शोभते सर्वांची  नानी.

मोठे-मोठे डोळे तिचे
पोपटासारखे नाक
हिमाचली चेहरा तिचा
गोरे गोरे गाल.

सकाळी सकाळी
गोड -गोड झोपते
आपल्या नानाला
किसी किसी देते.

आत्या म्हणते
गुडीया प्यारी
मावशी म्हणते  
बाळ गुणी.

शेजारी म्हणती
किती -किती शांत
लोभस गोंडस
पटाईतांची नात.

डिप्लोमेट
राणी गालात हसते
सर्वांना अशी
मूर्ख बनविते.


रात्र झाली कि
खरे दात दाखविते
आईला आपल्या
रातभर जागविते .

कुशीत नानीच्या 
घरभर फिरते
जरा थांबता
टाहो फोडते.

मला पाहून ती
डोळा मारते
माय लेकींची
कशी जिरवली.

लबाड आमची 
बिलिंदर राणी  
नानांची तिची 
गट्टी जमली.



Wednesday, February 17, 2016

बोध कथा - उंदीर आणि बिल्ली मौसी


स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो  स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय?   माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे  बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे. बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या  समोर येऊन  कितीही गोड बोलली तरी उन्दिरांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. एवढेच नव्हे तर बाहेर जमिनीवर तिच्या विष्ठे जवळ हि उन्दिरांनी फिरकू नये. तिच्या विष्ठेत अशी काही जादू आहे कि एकदा उंदराने तिचा वास घेतला कि तो पुन्हा बिळात परत येत नसे. 

असेच एकदा बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर आली. गोड स्वरात गाणे म्हणू लागली. 

नंदन वन के सब जानवर
शेर-बकरी, चूहा बिल्ली 
एक घाटपर पिए पानी.

 चूहों का म्होरक्या मुर्दाबाद

बिल्ली मौसी जिंदाबाद.

माझ्या प्रिय उन्दिरांनो, तुम्हाला माहित नाही, तुमच्या म्होरक्यांनी तुम्हाला जमिनीखाली अंधार्या जगात डांबून ठेवले आहे. इथे बाहेर बघा, सूर्य प्रकाश आहे, प्रसन्न वातावरण आहे. माझ्याशी मैत्री करा, तुम्हाला कुणाचेच भय राहणार नाही. मधुर फळांच्या रस आणि गोड फळे तुम्हाला खायला मिळतील.  म्होरक्याची पर्वा करू नका, चला बाहेर या, माझ्या सोबत मौज करा, अंधाराच्या राज्याचा नाश करा.  उन्दिरांनो  बोला बुर्ज्वा म्होरक्या मुर्दाबाद, बिल्ली मौसी जिंदाबाद.  

आजाद नावाच्या उन्दिर, म्होरक्यांच्या जाचक नियमांना त्रासून गेलेला होता. त्याला बिल्ली मौसीचे म्हणणे खरे वाटू लागले. पण बिल्ली मौसीची भीतीही वाटत होती. स्वभावाप्रमाणे बिल्ली मौसी, बिळाबाहेर विष्ठा करून गेली. बिल्ली मौसी दूर जाताच आजाद नावाचा उंदीर बिळाबाहेर आला. बिल्ली मौसीच्या  विष्ठे जवळ जाऊ लागला, दुसर्या उन्दिरांनी त्याला मना केले, पण त्याने ऐकले नाही. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ येऊन, त्याने त्या विष्ठेचा वास घेतला. विष्ठेत असलेल्या  परजीवींनी लगेच आजादच्या शरीरात प्रवेश केला. त्या परजीवींनी आजादच्या डोक्याचा ताबा घेतला. आजादची विचार शक्ती नष्ट झाली. आता आजाद परजीवींच्या इशार्या वर नाचू लागला. आजादला वाटले, बिल्ली मौसी खरेच म्हणते, नंदनवनातल्या सर्व प्राण्यांनी एकत्र राहिले पाहिजे. अर्धवट आणि अतिशहाणे  उन्दिरांचे म्होरके आपल्या स्वार्था साठी बिल्ली मौसी  विरुद्ध आमच्या डोक्यात विष कालवितात जेणेकरून त्यांचे राज्य अबाधित  राहो. त्याने जोरात नारा लावला, उन्दिरांच्या राज्याचा नाश होवो, बिल्ली मौसी जिंदाबाद म्हणत आजाद बिल्ली मौसीच्या शोधात निघाला. बिल्ली मौसी एका झाडाखाली बसलेली होती, ती आजाद सारख्या मूर्ख उन्दिराचीच वाट पाहत होती. बिल्ली  मौसीच्या जवळ येऊन  आजाद म्हणाला मौसी मी त्या मूर्खांचे राज्य सोडून आलो आहेत, उन्दिरांचा म्होरक्या म्हणतो बिल्ली मौसी उन्दिरांना  खाते, खोटे बोलतो ना तो. बिल्ली मौसी गालात हसली, तिने अलगद आजादला  आपल्या पंज्यात पकडले आणि त्याला म्हणाली, मूर्खा तुमचा म्होरक्या खरेच म्हणतो, मी तुझ्या सारख्या कोवळ्या उन्दिराना आनंदाने खाते, असे म्हणत तिने आजादला गटकले.

स्वामीजी बोलता बोलता थांबले, पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, बच्चा, ज्याला उंदीर, परजीवी आणि बिल्ली मौसीचा अर्थ कळेल, त्याला आज काय चालले आहे, हे हि कळेल. स्वामीजी पुन्हा समाधीत गेले.  मला काही गोष्ट कळली नाही, तुम्हाला कळली का.

टीप:  उंदीर म्हणजे  कन्हैया  सारखे  मूर्ख मुले.  

Thursday, February 4, 2016

स्त्री - काल आणि आज


पूर्वी चार भिंतींमध्ये
जखडलेली स्त्री होती.
रांधा वाढा, उष्टे काढा,
आयुष्य ती जगत होती.
 
कावळा तिला शिवत होता,
चार दिवसांची हक्काची
सुट्टी तिला मिळत होती.
 
स्त्री आज स्वतंत्र आहे,
घराबाहेर पडली आहे.
ऑफिसात जात आहे,
धंदाही पाहत आहे.
 
मुलांना शिकवत आहे,
स्वयंपाकही करीत आहे.
थकलेल्या शरीराने
अहोरात्र खटत आहे.
 
कावळा आज शिवत नाही,
हक्काची चार दिवसांची
सुट्टीही मिळत नाही.


Sunday, January 17, 2016

गाजराचा शिरा




पूर्वभाग: कीस बाप्या कीस गाजर कीस

साहित्य: गाजर ४  किलो, साखर ३-४ वाटी,   दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, छोटी इलायची (वेलची)  १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०.

प्रारंभिक तैयारी. सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि छोटी इलायची सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले. 

संध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री  ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले. (जाड बुडाचे   भांडे  असेल तर शिरा खाली लागणार नाही, जळण्याची संभावना कमी). रात्री ९.३० ला सौ. गाजराचे दूध (गाजरात जेंव्हा थोडे बहुत दूध राहते, ते पळीने काढून त्यात साखर, छोटी इलायची आणि जायफळ यांच्या मिश्रणाची पूड टाकून) गरमागरम एक कप दूध माझ्या पुढ्यात ठेवले. नंतर सौ. ने ४ वाटी साखर भांड्यात घातली.

जेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा  बनविते, असे दूध माझ्या साठी काढून ठेवते. अत्यंत स्वादिष्ट लाल रंगाचे दूध पिताना अमृत पिण्याचा आनंद मिळतोच. माझे दूध पिणे संपल्यावर सौ. ने प्रेमाने हाक मारली. इकडे थोडे गाजराच्या शिर्या कडे पाहता का? ताजातवाना बंदा कामावर हजर झाला. मी शिरा परतू लागलो. 



सौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो. नंतर एक वाटी तूप हि त्यात टाकले. या तुपाची विशेषता अशी कि मध्यप्रदेशवाल्या आमच्या मेहुणीने पाठविले होते. जंगलात चरणार्या म्हशींचे (शुद्ध ओर्गानिक तूप). तूप टाकल्यावर मस्त वास येऊ लागला. रात्रीचे १० वाजले होते. गॅस मध्यम करून जवळपास पाऊण तास शिरा परतला. तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून बदाम काप त्यात टाकले. 

दुसर्या दिवशी सकाळी, सौ. ने पुन्हा अर्धा तास मंद आचेवर शिरा पुन्हा भाजला. जेंव्हा शिरा परतताना झारी चालवायला जड वाटू लागेल तेंव्हा समजा शिरा तैयार झाला.    

 

Thursday, January 14, 2016

संक्रांत आणि पतंगबाज



निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रात हि संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात.

आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते.  इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात.  तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अश्या वेळी उस्ताद  पतंगबाज्यांच्या मोठ्या-मोठ्या पतांगाही आकाशात तग धरू शकत नाही, जमिनीवर निष्प्राण होऊन पाडतात.  कधी-कधी एकदम घुम्म मौसम.  नाममात्र वारही  नाही.  अश्या  घुम्म वेळी  छोट्या-मोठ्या पतंगांना  आकाशात उड्डाण भरणे अशक्यच. अश्या पावसाळी मौसमात उस्ताद पतंगबाजाच तग धरू शकतात.इथे पतंग पेच लढविण्यासाठीच उडवितात. पतंगबाजाचा D-Day अर्थात १५ ऑगस्टला तर सतत ‘आई बो काटा’ हि विजयी आरोळी सकाळपासूनच वातावरणात दुमदुमू लागते.

माझे बालपण जुन्या दिल्लीतच गेले. १९८०च्या पूर्वी आम्ही ज्या वाड्यात  भाड्यावर राहायचो तो पूर्वाभिमुख होता. मध्ये बेडा (आंगण) आणि तिन्ही बाजूला बांधकाम. भलीमोठी गच्ची होती. पावसाळ्यात वारे हि पूर्वेचे असतात. त्यामुळे भरपूर पतंगा लुटायला मिळायच्या. पतंगा विकत घेण्याची गरज पडत नसे. या शिवाय गच्चीच्या मागे काबुली गेटची सरकारी शाळा होती. शाळेच्या गच्चीवरच्या पतंगा हि आमच्या नशिबी.  

काबुली गेट वरून आठवले. पूर्वी शाळेच्या जागी मैदान होते व पुढे काबुली दरवाजा. पण १८५७च्या क्रांतीत, अंग्रेजांच्या तोफांच्या मार्याने हा दरवाजा नष्ट झाला. इथे भयंकर युद्ध झाले होते. हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षांचे सैनिक आणि अधिकारी शहीद झाले होते. काहींच्या मते आज हि अमावस्येच्या घुप्प रात्रीत घोड्यांच्या टापांचे आवाज आणि सैनिकांचे विव्हळणे ऐकू येतात. आमच्या राहत्या खोलीची खिडकी शाळेच्या बाजूला होती. कधी हि काही ऐकू आले नाही. फक्त हिवाळी रात्रीत शाळेची इमारत माकडांची झोपण्याची जागा होत असेल. त्यांच्या माकड चेष्टांमुळे (अर्थात तोडफोड, दंगा-मस्ती) लोकांना असे भास होत असावे. असो.

मोठे पतंगबाज शर्त(पण) लाऊनच  पेच लढवितात. किमान ७०-८० गज पतंग उंच उडल्यावरच पेच लागत असे. अशी कटून आलेली पतंग लुटायला मिळाली कि किमान १०० गज मांजा मुफ्त मिळत असे. आमच्या सारख्यांच्या पूर्ण सीजन साठी पुरेसा असे. हा मांजा अत्यंत मजबूत हि असायचा. नेहमीच बोटे कापल्या जायची. तरीही त्या साठी दररोज संध्याकाळी आकाशात टक लाऊन पाहत असू, कुठे उंच आकाशात तरंगत जाणारी कटलेली पतंग दिसते आहे का?

दिल्लीत पतंग उडविणे हि जिगरीचे काम. पतंग उडविण्यासाठी पहिले पतंगाचे कन्ने बांधावे लागतात. नंतर कन्न्याला मांजा बांधताना एक गाढ मारावी लागते. हीच ती कमजोर कडी. जवळ-जवळ घरे असल्यामुळे एकाच वेळी आकाश्यात भरपूर पतंगा उडताना दिसतात. पतंग उडविणार्या पतंगबाज्यांची नजर बाज पक्षी सारखीच असते.  पतंगबाजांची  आकाशात उडत असलेली पतंग, बाज पक्षी प्रमाणे खाली झेप घेणार आणि नुकत्याच आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करणार्या पतंगाचे कन्ने कापणार हे ठरलेलेच. अश्यावेळी संधी साधून, चौफेर पाहून, ५-१० सेकंदात पतंग आकाशात ४०-५०  गज उंच उडवावी लागत असे. एकदा कि पतंग ५०-६० गज उंच उडाली कि मग चिंता नसे.

मी पेच लढविण्याचा एकच नियम पाळीत असे.  दुसर्याला पेच साठी लालच देणे. पण स्वत: त्याच्या जाळ्यात अडकायचे नाही. पेच लागताना ज्या दिशेला वारा वाहतो आहे, ठीक मध्य भागी पतंग ठेवायची, मग मांजा थोडा कमजोर असेल तरी हि ९०% दुसर्यांची पतंग कापण्यात यश मिळणारच. पेच लागताना जर पतंग वार्याच्या दिशेला नसेल तर ९०% टक्के पतंग कापल्या जाईलच.  अर्थातच नेहमीच हे जमत असे नाही. शिवाय दुसर्याचा मांजा जास्त मजबूत आणि पतंग मोठी असेल तर त्याचा फायदा त्याला मिळणारच.

दिल्लीचे पतंगबाज देशात मशहूर आहेतच. पण गुजरातचे पतंगबाज हि काही कमी नाही. दिल्लीकर पतंगबाज्यांशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे.  संक्रांतीच्या दिवशी तिथे हि दिल्ली सारखेच पेच लढविल्या जातात. पण आपले मुंबईकर मात्र पतंगबाजीत फिसड्डीच. गज्जू भाई सहज त्यांच्या पतंगा कापतात.  एक नवखा पतंगबाज गुजराती उस्तादकडून पतंगबाजीचे धडे घेऊन मुंबईत आला आणि  इथल्या भल्या-भल्या पतंगबाज्यांच्या पतंगा त्यांनी सहजच कापल्या. आता मुंबईच्या आकाशात त्याच्याच पतंगाचे  एकछत्र राज्य आहे. असो.

 सर्व पतंगबाज्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा.

Saturday, January 9, 2016

कीस बाप्या कीस गाजर कीस


ताजे ताजे गाजर हि  आवाज ऐकली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. लाल सुर्ख कोवळे गाजरे पाहून तोंडाला  पाणी आले. तेवढ्यात सौ. हि बाहेर आली.  मी म्हणालो गाजरचा हलवा खाण्याची इच्छा होते आहे.  गाजर घेते का? (आ बैल मुझे मार, यालाच म्हणतात).  आमची सौ. तशी सौदेबाजीत खरोखरच पटाईत आहे. ३० रुपये किलो वाले गाजरे, १०० रुपयात ५ किलो घेतले. गाजरे धुऊन माझ्या पुढ्यात ठेवली. हलवा खायचा असेल तर गाजरे किसावी लागतील.  जिभेचा स्वाद माणसा करून काय काय करवून घेतो, निमूटपणे गाजर किसायला घेतली......


कीस बाप्या कीस
गाजर कीस.
किसता किसता
कविता हि कीस.

जिभेच्या स्वदापायी
गाजर कीस.
किसता किसता
बोट हि कीस.





लाल लाल गाजर
लाल लाल रक्त
हलव्याचा  स्वाद
लागणार मस्त.


गाजर किसताना
शेजार्याने पहिले.
गल्लीत आमचे
नाकच कापले. 

कीस बाप्या कीस
गाजर कीस
जोरु का गुलाम
गाजर कीस.






Sunday, January 3, 2016

सातवा वेतन आयोग – मरा बाबू सव्वा लाख का

(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत).

सातव्या वेतन आयोगाची रिपोर्ट आली वेतन आयोगानेसरकारी कर्मचार्यांना निराशच  केले. घरभाडे न घेणाऱ्या लाला दुखी चंद (LDC)च्या पगारात तर चक्क बामुश्कील १ टक्का वाढ झाली आहे.  विम्याची रकम वजा केल्यास फक्त ५ रुपये. इतरांच्या बाबतीत जास्तीस्जास्त ४ टक्का. [(http://www. govtempdiary.com/2015/12/7cpc-pay-net-increase from-1-to-4/ 17400) The 7th CPC has cheated the 35 lakhs Central Government Employees and 50 lakhs pensioners, by announcing meagre 14.29% wage hike, in actual term of increase for serving employees after deduction of Income tax, enhanced subscription of CGEIS, licence fee, CGHS etc the net increase is actually varies from 1% to 4 % increase]  असो.

हत्ती पाळणे भारी खर्चाचे काम. पण एकदा हत्ती मेला कि त्या मेलेल्या हत्तीच्या दाताला बाजारात भारी किमंत मिळते. म्हणूनच म्हणतात  ‘मरा हाथी सव्वा लाख का’.  सातव्या आयोगाच्या अनुसार  कार्यरत कर्मचारी मेला तर त्याच्या आश्रितांना विम्याचे १५-५० लाखापर्यंत रकम मिळेल.
 
कालचीच गोष्ट ऊन खाण्यासाठी दुपारी लंच मध्ये खाली उतरलो. रस्त्यावर एका झाडाखाली खाली सुनील आणि मेथ्यु उभे होते, त्यांना पाहून कपाळावर आठ्या आल्या. शिकारीसाठी दबा धरून बसलेले हिंस्त्र जनावर आणि या दोघांमध्ये काहीही फरक नाही. त्यांची नजर चुकवून जाऊ लागलो. पण कसले-काय. डोळ्यांवर चष्मा असला तरी सुनीलची नजर उल्लू प्रमाणे दूरचा भक्ष्य ओळखण्यास समर्थ. त्याने दुरूनच आवाज दिली, पटाईत, नजर चुकवून कुठे पळतोस, आम्ही इथे तुझीस वाट पाहतो आहे. कपाळावर आलेल्या आठ्या दिसू न देण्याचा प्रयत्न करीत मी विचारले ‘माझ्यावर एवढी कृपा का?"    

काहीही झाले तरी आम्ही तुझे सहकर्मी, तुझी काळजी आम्हाला राहणारच. कशी प्रकृती आहे तुझी.
‘मस्त’. 
छाती वैगरेह तर दुखत नाही न? 
‘नाही’. 
दवा-दारू वेळच्या-वेळी घेतोस न. 
‘हो’.  
सुनील अत्यंत केविलवाणा चेहरा करून म्हणाला दारू घेणे तुझ्या प्रकृतीस योग्य नाही. तुला तर वास हि घेतला नाही पाहिजे.  

मी रागानेच म्हणालो, तुला माहित आहे, मी दारूला स्पर्श हि करीत नाही. सुनील: स्ट्राने दारू पिणार्यांना, दारूला स्पर्श करण्याची गरज नसते. आता मात्र तळपायाची आग मस्तकात पोहचली, मी त्याला खडसावले, तुला म्हणायचे तरी काय आहे? परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे पाहून,  मेथ्यु मध्ये टपकला, अरे पटाईत आम्ही तुझे सच्चे दोस्त, आम्हाला तुझी काळजी आहे, कालच चर्चमध्ये तुझ्यासाठी दुआ मागितली. गाॅड, पटाईतला निदान सातवे वेतन आयोग लागू होयेस्तो जिवंत ठेव, नंतर बेशक त्याला जहनुमला  डीस्पेच केले तरी चालेल.   

या पेक्षा अधिक काय अपेक्षा तुमच्या सारख्या मित्रांकडून ..

सुनील माझे वाक्य तोडत म्हणाला, पटाईत तुला कळत कसे नाही, तुझ्या सारखा टूटा-फूटा जिगरवाला जवळपास निकामी पुरुष  आज गेला कि उद्या गेला कुणाला  काहीही फरक पडणार नाही.  आम्हाला तर वहिनीची काळजी आहे, जर तू आत्ता वर गेला तर वहिनीला  विम्याचे जास्तीस्जास्त लाख रुपया  मिळेल. पण पे कमिशन नंतर गेला तर, विचार कर, मोटी पेंशन, gratuty दहा लाखांपेक्षा जास्त आणि विम्याचे पन्नाssस लाख. पाहिले आहे का कधी?  एवढे पैशे असले तर वहिनींना या वयात हि निदान तुझ्या पेक्षा चांगला नवरा भेटेल.  शिवाय आमच्या सारखे देवर....

आता माझी सटकलीच. उगारायला हात वर केला. पण काय करणार दोघेही पसार झाले आणि दूर उभे राहून दात दाखवत माकडांसारखे खी-खी हसू लागले.  माझे सहकर्मी मित्र  म्हणजे  एकापेक्षा एक नमुने.  यांचे काय करावे कधी-कधी मलाच समजत नाही.  

पण एकमात्र खरे, सातव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराश केले असले तरी हि वाढलेल्या विम्याच्या रकमे मुळे  ‘मरा बाबू पन्नास  लाखाचा’ होणार हे निश्चित'.   

Saturday, January 2, 2016

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ



काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्या साठी दोन सूत्र सांगितले-पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.

विकल्परहित संकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला  माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेल तर आपण कुठेच पोहचू शकत नाही.  डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो.  योगी बनण्यासाठी योग साधना करावी लागेल तर गाणे शिकण्यासाठी योग्य गुरूच्या मार्गदर्शनात रियाज करावा लागेल. अर्थात जीवनात लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे. पोहणे न शिकतातच नदीत उडी मारणार्यांपैकी काहीच भाग्यशाली लोक असतात जे नदीत वाहणाऱ्या ओंडक्याच्या मदतीने दुसर्या किनार्यावर पोहचतात बाकींच्या नशिबी नदीत बुडणेच.

अखंड पुरुषार्थ: एकदा लक्ष्य निश्चित केल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयास कारणे गरजेचे. एक दिवस १० तास अभ्यास करणारा  आणि ५ दिवस झोपणार्या विद्यार्थीला चांगले मार्क्स मिळणे अशक्यच. त्या पेक्षा दररोज नियमित २ तास अभ्यास करणार्याला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त. तसेच दुकानदार असो वा चाकर, दररोज नियमितपणे कार्य करणे गरजेचे असतेच. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी निरंतर कार्य करणे म्हणजेच तपस्या होय. या साठी आपल्याला ३ गोष्टींची गरज आहे - स्वस्थ शरीर, ज्ञान आणि अनासक्त कर्म.

स्वस्थ शरीर: निरंतर कर्म करण्यासाठी स्वस्थ निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर जर रोगग्रस्त किंवा दुर्बल असेल तर इच्छा असूनही आपण निरंतर कार्य करू शकत नाही. आता माझेच उदाहरण या घटकेला दिल्लीत थंडी आहे, कमरेचे जुने दुखणे पुन्हा वर आल्यामुळे इच्छा असूनही काम्पुटर वर टंकन करणे शक्य होत नव्हते. साहजिकच आहे शरीर दुर्बल आणि रोगी असेल तर आपण निरंतर कार्य करू शकणार नाही आणि आपले उद्दिष्ट हि साध्य करू शकणार नाही. मनात निराशा घर करेल. मन हि रोगी रोगी बनेल. म्हणूनच म्हंटलेले आहे.  'शरीर माध्यम धर्मं खलु साधनम'. कुठलेही कार्य, मग जप-तप, योग, अभ्यास, नौकरी-धंधा आणि शेती. शरीर निरोगी असणे गरजेचे. त्या साठी निरंतर योग आणि व्यायाम आवश्यक आहे. 

ज्ञान: लक्ष्य प्राप्ती साठी लक्ष्यावर पोहचण्यासाठी लागणारे ज्ञान हि आवश्यक असते. डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या शिवाय आपण डॉक्टर बनू शकणार नाही. तसेच एखाद्या उंच पर्वतावर चढायचे असेल तर पर्वतावर चढण्याचे प्रशिक्षण व त्या साठी लागणारे सर्व उपकरण, या सर्वांची गरज असते. त्या शिवाय आपण पर्वतावर चढू शकत नाही. व्यापार करायचा असेल तर त्या धंद्याची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे, अन्यथा व्यापारात नुकसान हे होणारच.

अनासक्त कर्म:  आपल्या उद्दिष्ट प्राप्ती साठी आपण अखंड पुरुषार्थ केला तरी हि कित्येकदा आपल्या हातात नसणाऱ्या घटनांमुळे कार्य सिद्ध होत नाही. आपले केलेले कर्म वाया जाते, त्यातून निराशेची भावना मनात घर करते. उदा: एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या परीक्षेसाठी उत्तम अभ्यास केला, परीक्षेत हि सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने दिली. पण कुठल्या तरी परीक्षा केंद्रात पेपर फुटला. परीक्षा रद्द झाली. कुठलीही चुकी नसतानाही त्या विद्यार्थाची मेहनत फुकट केली. प्राकृतिक प्रकोप- पूर, वादळ, भूकंप, अग्नी या शिवाय चोरी, डकैती, अस्थिर राजकीय परिस्थिती इत्यादींचा परिणाम हि आपल्या कर्मांवर होतोच. कर्मावर आसक्ती असेल तर निराशा मनात घर करणे साहजिकच. या शिवाय कधी-कधी असे हि होते, थोडीबहुत सफलता मिळताच, आपल्या कर्माचे आणि पुरुषार्थाचे फळ मिळाले, असे समजून आपण पुरुषार्थ करणे सोडून देतो. आपल्या कर्माच्या आसक्तीत गाफील राहिल्यामुळे काही काळानंतर बदलत्या परिस्थितीचा फटका त्यांना बसतो. स्वर्गीय धीरूभाई अंबानी जर एक कारखाना लाऊन चैनीत बसले असते तर आज एवढा मोठा रिलायन्स समूह दिसला नसता. बाबा रामदेव हि एक योगपीठ टाकून स्वस्थ बसले नाही. त्यांनी फूडपार्क, ग्रामोद्योग, आयुर्वेद अनुसंधान आणि प्राकृतिक शेतीच्या संवर्धनाचे कार्य हि हातात घेतले. या शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणावर आचार्यकुलम उघडण्याची हि योजना आहे. अर्थातच एक लक्ष्य पूर्ण होताच, दुसरे लक्ष्य निर्धारित करणे व त्या साठी अखंड पुरुषार्थ करणाराच आपले उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. काळ आणि परिस्थिती निरंतर बदलत असते त्यामुळे पुरुषार्थ हि निरंतर करावाच लागतो. लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता जो माणूस अखंड  पुरुषार्थ करत राहतो, तो आपल्या उद्दिष्टात निश्चित सफल होतो.  

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.