Friday, September 7, 2018

मातीचे प्रेम मातीशीच -समलिंगी संबंध


"ऋतू पावसाळी, ऋतू माती आणि बियाण्याच्या प्रेमाची" गुणगुणत एक बियाणे मातीपाशी पोहचले. "चल, दूरहट, पावसाळी किडा."  काय झाले तुला, ओळखले नाही, मी तुझा अनादी काळापासूनचा प्रेमी.  "कधी होता, आता नाही, आता मी शेजारच्या शेतातील मातीशी प्रेम करते". हे चुकीचे आहे, मातीने बियाण्यावर प्रेम केले पाहिजे, अन्यथा सृष्टीचक्र भंगेल. वसंत येणार नाही. फुलांविना फुलपाखरू मरेल. गवत विना चरणारे जीव मरतील. जंगलाचा राजा शेरखानचा जीव हि जाईल. दाण्या-दाण्यासाठी भांडत मनुष्य हि कालवश होईल. "मी ठेका घेतला आहे, का या सर्वांचा, एवढेच प्रेम उतू जात असेल तर दुसर्या बियाण्यावर प्रेम कर".  बियाणे मातीत रुजले नाही आणि धरती ओसाड पडली. असे आपण पाहिले आहे का? मातीने-मातीशी प्रेम करण्याचा अधिकार आपण मान्य करतो का? नाही.  कारण हे सृष्टीचक्राच्या विरुद्ध आहे.

मातीत बियाणे रुजत नसेल तर मातीचा डॉक्टर मातीला तपासतो. रोग निदान करतो. मातीची उर्वरा शक्ती वाढविण्याचे  औषध देतो.  युरिया, नत्र, जिंक,  रासायनिक खत, शेण व सेंद्रिय खते इत्यादींचा वापर करून मातीची पोत सुधारल्या जाते. सारांश मातीत बियाणे रुजले पाहिजे याची आपण काळजी घेतो.

मनष्य तर सर्वात बुद्धिमान आणि जीवित प्राणी आहे. पुरुषाने-पुरुषाची शारीरिक संबंध स्थापित करणे असो वा  एका स्त्रीने दुसर्या स्त्रीशी विवाह करणे, हे सर्व सृष्टी नियमांच्या विरुद्ध आहे. यामुळे सृष्टीचक्र भंगते. समलिंगी आकर्षण, एक मानसिक आजार आहे, विकृती आहे. विकृती नेहमीच समाजात वेगाने पसरते.  याचेच उदाहरण, उपचार करण्याची गोष्टच सोडा, अनेक तथाकथित बुद्धिमान लोक या  रोगाला, रोग मानायला तैयार नाही. उलट अश्या संबंधाना प्रोत्साहन देतात. समलिंगी लोकांना वार्यावर सोडून देतात. पण काही वर्षांनी विकृत प्रेमाचे भूत उतरल्यावर त्यांच्या हाती फक्त निराशा येते. त्यांचे जगणे दूभर होते. 

या संबंधांना, मानसिक आजार मानून, योग-ध्यान, उचित औषध-उपचार, इत्यादी करून हा आजार  वेळीच दूर केला पाहिजे. हेच समाजाच्या हिताचे आहे.


Wednesday, September 5, 2018

काही हायकू : साक्ष

 
न्यायाच्या दारी 
साक्ष खात्रीची 
*खानदानी.
  
साक्ष फिरली 
न्याय मिळाला 
अपराध्याला.

साक्ष ऐकते 
सजा सुनाविते  
देवता आंधळी.

* साक्ष देण्याचा  धंदा करणारे.

Tuesday, September 4, 2018

कुचर्चा: युरेशियन ब्राह्मण-आणि इतिहासकार


आमचे सौभाग्य, एका  महान इतिहासकारासोबत चर्चा करायला मिळाली. काय ते  मानवी आनुवांशिकतेचा इतिहास ......

इतिहासकार: पटाईत, इतिहास म्हणजे  पुराणातील वांगी नव्हे,  मानवी आनुवांशिकतेचे अध्ययन असते. काही डोक्यात घुसले का? युरेशिअन भटुर्क्या?

मी: म्हंजे मी युरेशिअन, तुमि कोण?

इतिहासकार: आम्ही मूळ निवासी, तुम्ही गायी मेंढ्या हाकत साडे तीन हजार वर्षांपूर्वी इथे आलात.

मी: म्हंजे, दुग्धक्रांती साडेतीन हजार वर्षांपूर्वी  झाली, मी उगाच कुरियन साहेबांना श्रेय देत होतो. 

इतिहासकार: दुध क्रांतीचा आणि इतिहासाचा काय संबंध? विषयांतर करू नको भटुर्क्याSSS

मी:  तेच तर मी म्हणतो, ते भटुकडे आय मीन माझे पूर्वज, युरोपियन गायींना हाकत इथे आले असतील ना. हे खरे असते तर तेंव्हाच दुग्ध क्रांती घडली असती. आता बघा न पुराण कथेत काय लिवले आहे, "गायीला नव्हता पान्हा, गोकुळात उपाशी कान्हा आणि  दुधावरून बेचार्या  कंसाला नाहक जीव गमवावा लागला रे S S S".

इतिहासकार: अरे, गाढवा, इतिहास म्हणजे गायी म्हशी नव्हे. तुझ्या फालतू किस्से-कहाण्या नव्हे. इतिहास म्हणजे, मानवी आनुवांशिकतेचे अध्ययन. तुमची ती भटुकडी संस्कृत भाषा युरोपिंन परिवारातील आहे या देशातील नाही. 

मी: च्यायला, आमच्या संस्कृतच्या शास्त्री सरांना खोटारडा म्हंटलेले, अस्मादिकांना मुळीच खपणार नाही.  शास्त्री सर कधीच खोटे बोलत नाही.

इतिहासकार: मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नको, मानवी इतिहासाच्या चर्चेत, हे शास्त्री सर, कुठून उपटून काढले.

मी: तेच म्हणतो, आमच्या पहाडगंजच्या शाळेत संस्कृत शिकवायचे,  शास्त्री सर. मला आठवीत संस्कृत मध्ये ९० टक्के मार्क असतानाही मी ९वीत हिंदी विषय घेतला. जाम रागावले शास्त्री सर. मला म्हणाले, हिंदीत तर टाॅपरला हि ७५ टक्के मिळत नाही. संस्कृत मध्ये  मराठी / मद्रासी ढ  मुलांना सुद्धा ७५ टक्के सहज मिळतात (अस्मादिकांची लायकी). हिंदी भाषा तर ज्यांना संस्कृत बोलणे आणि शिकणे जमत नाही त्यांच्यासाठी.  (पहाडगंजच्या मराठी शाळेत ९० टक्के विध्यार्थी पाकिस्तान मधून आलेले शरणार्थी - मुलतानी, पंजाबी आणि सिंधी इत्यादी, उरलेले १० टक्के मराठी आणि मद्रासी इत्यादी).  प्रथम श्रेणीत पास व्हायचे असेल तर संस्कृत घे. मी शास्त्री सरांचे ऐकले नाही आणि हिंदी फक्त ५५ टक्के मार्क्स मिळाले. शास्त्री सरांची भविष्यवाणी खरी ठरली. 

इतिहासकार: तुझ्या या टुकार कहाणीचा इतिहासाची काय संबंध, 

मी: कसा नाही, बघा मद्रासी माणूस कसा खणखणीत संस्कृत म्हणतो आणि पंजाबी माणसाला संस्कृत बोलणे कठीण जाते. मग युरेशिअन लोकांना संस्कृत कशी जमनार, काही विचार केला का यावर. मानवी  आनुवांशिकतेचा इतिहास...

इतिहासकार: तुला म्हणायचे तरी काय आहे,

मी:  हेच, बामन असो किंवा द्रविड सर्वच इथले मूळ निवासी.  संस्कृत हि मूळ निवासी लोकांची आदी भाषा. बाकी आर्य जाती, युरेशिअन सर्व थोतांड आहे. फूट डालो राज करो नीती राबविण्यासाठी. 

इतिहासकार: मी मूर्ख आहे. गाढव आहे. तुझ्या सारख्या बिनडोक माणसासोबत चर्चा करतो आहे. 

मी:  ओळख पटली ना. 

पुढे चर्चा होणे शक्य नव्हते.

(राखीगढ येथे सापडलेल्या रथस्वाराचे डीएनए दक्षिण भारतीय वनवासी जमातीशी मिळतात. कुमारी कंदम १५००० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेले. गेल्या २० हजार वर्षांत समुद्र किमान २० मीटर वर आला आहे, मानवाला स्थानांतरीत व्हावे लागले.  

आपल्या साहित्याच्या आधारावर आपण आपला इतिहास शोधला पाहिजे न कि विदेशी गुलामीचा चष्मा लावलेल्या तथाकथित इतिहासकारांच्या नजरेतून.)

Thursday, August 30, 2018

शेवटची भेट - भारतीय युद्ध


(मध्यरात्रीची वेळ, शकुनि आपल्या शिविरात एका कोपऱ्यात मंचकावर ठेवेल्या चतुरंगच्या पटाकडे पाहत विचारात मग्न होता. शकुनि, या आवाजाने विचार शृंखला भग्न झाली).

शकुनि: ताई, अशी मध्यरात्री तू इथे कशी? तुझ्या डोळ्यांत अश्रू का? त्या आंधळ्याच्या पुत्रांसाठी तर नाही ना?

गांधारी: शकुनि, गांधार सोडताना आपण घेतलेला प्रण अजूनही माझ्या लक्षात आहे. कौरव जरी माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पाची (शत्रूची) पिल्ले आहेत, हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्यासाठी मी अश्रू नाही ढाळनार. आज रणांगणात शल्याचा वध झालेला आहे. युद्धाचा अंत जवळ आलेला आहे आता... (हुंदका देत) शेवटची भेटायला आली आहे रे तुला. उद्या रणभूमी वर कदाचित...

शकुनि: (तिचे वाक्य मध्ये तोडत म्हणाला), हा! हा! हा!, मी जिवंत राहणार नाही, एवढेच ना. युद्धाचा सुरुवातीपासूनच हे सत्य तुला आणि मला चांगलेच ठाऊक होते, त्यात रडण्या सारखे काय? भारतीय युद्धात अठरा अक्षोहणी सैन्य नष्ट झाले आहे. भारतीय सैनिकांच्या तीन पिढ्या नष्ट झाल्या आहेत. आपल्या गांधारचे काय नुकसान झाले, तुझ्या-माझ्या सहित केवळ बोटावर मोजण्या इतकेच सैनिक. पूर्वी इतिहासात कधी असे घडले होते का? आता कुणा भीष्माचे सैन्य गांधारात प्रवेश करणार नाही किंवा कुणा गांधारीला आपल्या आयुष्याचे बलिदान द्यावे लागणार नाही. गांधारला आता भारताची भीती नाही. मूर्ख भारतीय राजा सत्तेसाठी विदेशी तालावर सहज नाचतात, हे जगाला कळले आहे. हस्तिनापुरात मूर्ख बुद्धीजीवींचा भरणा होता म्हणून आपले कार्य सिद्ध झाले. गांधारी डोळ्यांतील अश्रू पुसुन टाक आणि बघ भविष्य, सप्तसिंधु प्रदेशातील मूर्ख हिंदू आणि बौद्ध राजे स्वार्थापोटी सिंधु नरेश दाहीरची मदत करणार नाही. बघ गांधारची अश्वसेना सप्तसिंधु प्रदेशाला उध्वस्त करण्यासााठी सज्ज झाली आहे..... 
दोघेही जोरात विजय गर्जना करतात, गांधारचा विजय असो.  


Tuesday, August 28, 2018

तीन हायकू: अबला



प्रेमाच्या जाळ्यात 
कळी अडकली 
खुडली गेली. 

वासनेच्या डोही
प्रीत  बुडाली
प्रेत सापडले.


उध्वस्त  झाला 
संसार स्वप्नांचा 
तीन शब्दांनी. 












Monday, August 27, 2018

क्षणिका - प्रकृति



प्रेमिका वासंती
कृष्ण विहरणी
प्रेमात भिजलेली

शरदाची चांदणी 
 शेवटच्या क्षणाची
संगनी,प्रकृति.

 

Saturday, August 25, 2018

कविता: यात्री


धुक्यात उमटली 
चित्रे काही 
त्यास समजलो 
 नाती-गोती.

धुक्यातली नाती
धुक्यात विरली
जीवन यात्रा
एकट्याची.