Friday, April 25, 2014

सोन्याचे नाणे आणि धर्मराजाचा न्याय


भल्या पहाटे  उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला कि मन कसं प्रसन्न होत. सकाळचे सोनेरी कोवळे ऊन हवे-हवे से वाटते. तसेंच सोनेरी रंगाचे सुवर्ण ही माणसाला प्रिय आहे. सुवर्णाच्या कृपेने  माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. कपडे-लत्ते, टीवी, गाडी, बंगला आणि जास्त सुवर्ण असेल तर बंगल्यात राहायला पत्नी रुपात जागतिक सुंदरी ही मिळू शकते.  

फार पूर्वीची गोष्ट आहे, एक अडाणी व अज्ञानी माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले. काही विचार न करता त्याने ते नाणे उचलले आणि आपल्या खिश्यात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसाला ही रस्त्यात सोन्याचे नाणे दिसले. त्याने आजू-बाजूला बघितले. जवळपास कोणी माणूस दिसत नाही याची खात्री केली आणि नाणे उचलून स्वत:च्या खिश्यात टाकले. आणखीन काही वेळ गेला, एक शिक्षित आणि विचारवंत माणूस तिथे आलात्याला ही सोन्याचे नाणे दिसले. नाणे दिसतात, त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु झाले, कुणाच्या खिश्यातून हे सोन्याचे नाणे पडले असावे? त्याने चौफेर नजर टाकली, कुणीच दिसत नाही. आतां काय करावे, नाणे उचलून खिश्यात टाकावे का? लगेच मनात दुसरा विचार आला, हे करणे बरोबर नाही, दुसऱ्याची वस्तू उचलणे म्हणजे चोरी. छे-छे दुसर्यांच्या वस्तूंकडे ढुंकून ही बघितले नाही पाहिजे. पुन्हा विचार आला, आलेल्या लक्ष्मीचा तिरस्कार करणे योग्य नाही. अश्याने लक्ष्मीचा अनादर होतो. लक्ष्मी कुपीत झाली तर  दारिद्र्यात खितपत पडावे लागेल. त्याला पूर्वी ऐकलेली कथा आठवली. “एकदा शंकर- पार्वती विमानातून जात असताना, शंकराने पार्वतीस म्हंटले, तो पहा खाली पृथ्वीवर जो माणूस दिसतो आहे, तो माझा प्रिय भक्त आहे. वादळ असो वा पाऊस, थंडी असो व शरीरला भाजणार भयंकर उन्हाळा, हा न चुकता रोज सकाळी गावाच्या मंदिरात माझी पूजा अर्चना करतो आणि मंदिराच्या शंभर प्रदिक्षणा ही घालतो. याने आज पर्यंत मजपाशी स्वत: साठी काहीही मागितले नाही, म्हणूनच मला हा प्रिय आहे.  पार्वतीने खाली बघितले, फाटके कपडे घातलेल्या त्या दरिद्री माणसाला पाहून पार्वती म्हणाली, देवाधिदेव, त्याने आपणास काहीच  मागितले नाही, हे खरे असले तरी  भक्ताची काळजी घेणे आपले कर्तव्य नाही का? विष्णू भगवान तर सतत आपल्या भक्तांचे कल्याण करण्यात मग्न राहतात. त्या वर शंकर म्हणाले, हा भाग दुष्काळी आहे, इथे सर्वच लोक दरिद्री आहे. आपले दारिद्र्य दूर करण्यासाठी हा मला सोडून परदेसी जाणार नाही आणि जो पर्यंत हा या गावात राहील ह्याचे दारिद्र्य दूर होऊ शकत नाही. तरी ही तुझ्या आग्रहास्त मी प्रयत्न करतो. भगवान शंकरांनी प्रदिक्षणेच्या मार्गात काही सोन्याचे नाणे ठेवले,  दरिद्री असून ही त्या ब्राह्मणाला सोन्याच्या नाण्यांना उचलण्याचा मोह झाला नाही. असो, शंकर भगवान त्याचे दारिद्र्य दूर करू शकले नाही.” विचारवंत माणसाने निर्णय घेतला. देवाने आपल्या वर कृपा केली आहे, भगवंताचा कृपा प्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण करायला काहीच हरकत नाही. असा विचार करून त्याने सोन्याचे नाणे उचलून खिश्यात टाकले.

योगायोगाने तिन्ही माणसे एकाच दिवशी मरण पावली. यमदूतांनी त्यांना न्याय निवाड्यासाठी धर्मराजा समोर उभे केले. धर्मराजाने पहिल्या माणसाच्या पाप-पुण्याचा हिशोब केला आणि त्यास म्हंटले, तू एकदा सोन्याचे नाणे चोरले होते, तुला १ वर्ष नरकवासाची शिक्षा. तो म्हणाला, मी नाणे चोरले नव्हते, रस्त्यावर सापडले होते, मी ते उचलले आणि नाणे विकून काही दिवस मौज केली. त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते.  तुझ्या मेहनतीचे नव्हते  म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.

यमदूतांनी दुसऱ्या माणसाला, धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराज म्हणाले, तुला ५ वर्षाचा नरकवासाची शिक्षा. दुसरा माणूस म्हणाला,  पहिल्या माणसा सारखे मी ही नाणे उचलले होते, दोघांना सारखी शिक्षा मिळाली पाहिजे.  त्याला १ वर्ष आणि मला ५ वर्ष हा तर अन्याय आहे. धर्मराज हसत म्हणाले, मूर्खा, त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पहात तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.

यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण  मला वाटते  ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहेइथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार,. तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही.  त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.

अश्यारीतीने धर्मराजाने तिघांचाही न्याय-निवडा केला. तुम्हाला धर्मराजाने दिलेला न्याय पटतो आहे का?

Tuesday, April 22, 2014

आजोबा तुम्ही पुअर आहात का?

(माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना, त्याचाच शब्दात).

माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात, तिला, पण सावधान राहा,  वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते. पण मी लक्ष दिले नाही, मला वाटले पोरीच्या मनात असूया निर्माण झाली असेल, अखेर तिच्या हक्काच्या वडलांचा ताबा आता तिच्या पोरीने जो घेतला आहे. पण एकमात्र  खरं, तिचे निरीक्षण कमालीचे होते, तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता देता नाकी नऊ यायचे.

रविवारचा दिवस होता, सौ. म्हणाली लेकीला ‘गुलाब जाम’ आवडतात. हिमालय सागर (हलवाईचे दुकान) जाऊन गुलाब जाम घेऊन या. कुर्ता-पाजामा घालून, ‘टाकिंग बर्डला’ सोबत घेऊन गुलाब जाम आणावयास निघालो. पहिल्या माल्या वर घर असल्या मुळे, जिने उतरणे भाग होते. टाकिंग बर्ड हात पकडून जिने उतरू लागलो. अचानक एखाद्या वेगवान गोलंदाज प्रमाणे, तिने पहिला चेंडू फेकला, आजोबा, तुम्ही जीन्स का नाही घालत?  जीन्स नाही का तुमच्या कडे? मॅाम-डैड बाहेर जाताना नेहमीच जीन्स घालतात. मी म्हणालो, जीन्स नाही आपल्या कडे बुआ. तिने लगेच दुसरा चेंडू फेकला, तुमच्या बिल्डिंगला लिफ्ट का नाही?  आता काय म्हणणार, तरी ही उत्तर दिले, बिल्डिंग छोटी आहे म्हणून लिफ्ट नाही. ‘म्हणजे तुम्ही छोट्या बिल्डिंग मध्ये राहतात’ आमचा न 17th फ्लोरवर फ्लेट आहे.  आजपर्यंत कधी जिना चढला नाही. मनात म्हंटले, च्यायला, या बायका बालपणा पासून दुसर्याला तुच्छ लेखण्याचा मौका सोडत नाही. खाली उतरल्या वर स्कूटर काढली. लगेच तिने लगेच गुगली टाकली, आजोबा, तुमच्या कडे कार नाही का?  मी म्हणालो,  स्कूटर आहे ना! कारपेक्षा जास्त मजा येते चालवायला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटले ‘तिला काही माझे उत्तर पटलेले दिसत नाही’. खैर, हलवाईच्या दुकाना  जवळ  पोहचलो. स्कूटर थांबतच, तिने मलिंगा सारखा यार्कर आपटला, आजोबा इथे मॅाल नाही आहे का? आम्ही तर भाजी सुद्धा मॅाल मधून आणतो, आजोबा, मॅाल म्हणजे मोठ्ठे दुकान असते, आपले चिमुकले हात मोठ्ठे करत तिने म्हंटले. (जसे काही आजोबाना मॅाल म्हणजे काय, माहित नसावे).   मी म्हणालो, या दुकानात, मॅाल पेक्षा मस्त ‘गुलाब जाम’ मिळतात, तुला आवडतात न. तिने मान हलवत होय म्हंटले. मला ही हायसं वाटले. ‘गुलाब जाम’ घेतले, आणि हलवाईला देण्यासाठी खिशातून पर्स काढताना तिने विचित्र नजरेने माझ्या कडे बघितले होते.



अखेर दुकानातून बाहेर पडलो, स्कूटर जवळ येताच तिने  शोएब अख्तर पेक्षा ही वेगवान बाउन्सर टाकला, आजोबा, तुमच्याकडे  क्रेडीट कार्ड नाही आहे का? आता काय म्हणणार, आज पर्यंत कधी क्रेडीट कार्डची गरज भासली नव्हती. मुकाट्याने म्हणालो, नाही. या वेळी तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव उमटलेले दिसत नव्हते. पण तिची बडबड थांबली. घरी येत पर्यंत ती एकदम शांत होती. घरी आल्या-आल्या, ती हळूच पुटपुटली,  जिव्हारी लागणारा बीमर त्रिफळा उडवून गेला, आजोबा तुम्ही पुअर आहात का? 

Saturday, April 19, 2014

एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)


आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी,  वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही.

स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले. गुणाचा माझा पोर म्हणत आईने प्रेमाने हात त्याचा पाठीवर फिरविला आणि  नमो-नमो म्हणत ते गुलाबाचे फुल देवाच्या चरणी अर्पित केले. दुसऱ्या दिवशी पहाटे  निर्माल्य झालेले फुल तिने रस्त्यावर फेकून दिले. अनेक वर्ष रस्त्यावर झाडू लावल्या मुळे अस्थमासम आजाराने ग्रस्त झाडूवाला खोकलत-खोकलत झाडू लावत होता. त्याने कचऱ्या सोबत गुलाबाच्या फुलाला ही उचलून कचरा गाडीत टाकले. स्वामीजी थांबले आणि प्रश्नार्थक नजरेने मजकडे बघितले. मी म्हणालो, स्वामीजी माझ्या सारख्या अल्प ज्ञानी जीवाला, काहीच उमगले नाही.

स्वामीजी ने स्मित केले आणि म्हणाले ‘नादान है, बच्चा’ आणि डोळे मिटून पुन: समाधिस्थ झाले. 

Sunday, April 6, 2014

कचरा


कचरा आम्हाला  आवडतो
आमच्या  घरात कचरा
गल्लीत कचरा
रस्त्यावर कचरा
नाक्यावर कचरा
अड्यावर  कचरा
स्टेशन वर कचरा

जिथे पहा तिथे
कचराच कचरा.

विदेशी कचरा
जास्तस आवडतो
कचऱ्याची दलाली
आम्ही आनंदी घेतो.


पडणारी विमाने असो
कि जंग लागलेली  जहाजे
किंवा बुडणाऱ्या डुब्या
देशाची सुरक्षा सुद्धा
करतो विदेशी कचरा .

सडलेल्या द्राक्षांचा
सुवास दरवळला
झिंगून डुक्कर
कचऱ्यात   पहुडला
परमानंदी टाळी
त्यास लागली.
कचऱ्याचा जयघोष
आकाशी दुमदुमला.
















Sunday, March 30, 2014

महाभारत कथा: युद्धाची तैयारी

  

(उपस्थित सदस्य: सम्राट दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, दु:शासन, शकुनी, कर्ण आणि सभेत कधी कधी येणारा विकर्ण या शिवाय मुख्य शस्त्राधिकारी व गुप्तचर अधिकारी )

विकर्ण: महाराज, युद्धाचा निर्णय झाला आहे, पण आपण युद्धासाठी खरोखरच तैयार आहोत का? युद्धासाठी शस्त्रास्त्रे, दिव्यास्त्रे (प्रेक्षेपास्त्र) इत्यादींचा पर्याप्त साठा आहे का?

दुर्योधन: विकर्ण, काय म्हणायचं ते स्पष्ट बोल, कोड्यात  बोलण्याची ही वेळ नाही.

विकर्ण: कर्णासारखे योद्धे असतानाही विराट युद्धात आपल्याला पळ काढावा लागला होता, त्या बाबत काय म्हणणे आहे महाराज?

दुर्योधन: विकर्ण आम्ही युद्धाला गेलो नव्हतो. विराट नरेश,  त्रिगर्तराज सुशर्मा बरोबर युद्धात गुंतला होता. या संधीचा फायदा उचलून विराटचा हजारों गायींना पळवून आणण्याच्या विचार होता.  काही निवडक सैनिकांसह लवकरात लवकर पोहोचण्या साठी जास्त शस्त्र बरोबर घेतले नव्हते, शिवाय रथांवर जास्त सैनिक आणि शस्त्र घेतले असते तर पोहचायला उशीर झाला असता आणि मग संधी निघून गेली असती.  आम्हाला विश्वास होता गायींचे रक्षक एक तर आम्हाला पाहताच पळून जातील किंवा थोडाफार प्रतिकार करतील. पण झाले भलतेच, अर्जुनाने बाणांचा वर्षावच सुरु केला. गायींसाठी प्राण धोक्यात घालणे, म्हणजे मूर्ख पणा, म्हणून मैदान सोडावे लागले.

मुख्य शस्त्राधिकारी: महाराज, मला काही बोलायचे आहे, आपल्या शस्त्रागारात धनुष्य-बाण, भाले व गदा यांची भारी करमरता आहे. गेल्या तेरा वर्षांपासून, आपण शस्त्र किंवा विकत घेतली नाही किंवा निर्माण ही केली नाही. म्हणून त्या वेळी गरजेनुसार अस्त्र-शस्त्र पुरविली होती.

दुर्योधन: आश्चर्य आहे, गेल्या तेरा वर्षांत झालेल्या कुठल्या ही बैठकीत कुणी ही मला या बाबतीत  काहीच का सांगितले नाही?

विकर्ण: कोण सांगणार? गुरुदेव द्रोण, भीष्म पितामह,  कृपाचार्य, विदुर सर्वच पांडवांचे हितचिंतक आणि महाराज, कर्ण, दु:शासन आणि शकुनी, देशोदेशीच्या राजे-महाराज्याना बोलवून पासें खेळण्यात मग्न. महाराज, आपण राज्याची दौलत स्वखुशीने दुसर्यांवर लुटवीत होता.

शकुनी: विकर्ण, याला राजनीती म्हणतात, आज अधिकांश राजे महाराजे आपल्या सोबत आहे, ११ लाख सैन्य या घटकेला आपल्या पाठीशी आहे. आपण सहज युद्धात जिंकू. अजूनही महिना-दोन महिन्यांचा अवधी आहे. लोहारांसोबत, सैनिक आणि जनतेची मदत घेतली तर लक्षाविध शस्त्र तैयार करता येतील.  आम्ही जरी द्यूत क्रीडेत मग्न होतो, आपण काय करत होता?

विकर्ण: हा! हा! हा!, शकुनी मामा, तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर,  बाण आणि भाल्यांसाठी लोखंड कुठून आणणार. महाराज जरासंधाच्या मृत्यू नंतर मगध (बिहार) नरेश सहदेवाने पांडवांची संबंध जोडले. तांब्याच्या खाणी विराट नरेशच्या राज्यात (राजस्थान) आहे, राजकन्या उत्तर हिचे लग्न अर्जुनपुत्र अभिमन्यूशी करून, त्यांनी ही पांडवांशी सोख्याचे संबंध जोडले आहे. शिवाय कामाअभावी अधिकांश लोहार कुरु राज्य सोडून केंव्हाच निघून गेले आहे. माझ्या विषयी म्हणाल तर, ज्या दिवशी भर दरबारात कुलवधू द्रोपदीचा अपमान झाला होता, त्या दिवसापासून मी राज सभेत आणि मंत्रिमंडळाचा बैठकीत येणे बंद केले होते. आज बोलविले म्हणून आलो. ती ही खरी परिस्थितीची जाणीव करून देण्या साठी.  बाकी मी कर्णासारखा, पळपुटा नाही, महाराजांना माहित असेल महारथी कर्णानी अनेक वेळा युद्धातपाठ दाखविली आहे.   

दुर्योधन: विकर्ण शांत ही आरोप- प्रत्यारोपाची वेळ नाही,   

विदुर: महाराज, मला ही काही म्हणायचे आहे, विकर्णाने भीष्म पितामह समेत, आमच्या वर लावलेला आरोप चुकीचा आहे. त्यानी माफी मागितली पाहिजे. महाराजांनी  आमच्या सारख्या म्हाताऱ्यानी दिलेले कित्येक मोलाचे सल्ले, पायदळी तुटविले आहे.  सभेत चूप बसण्याशिवाय आम्ही काय करणार. पण या विषयावर चर्चे आधी  पांडवांची तैयारी कशी आहे, हे जाणून घेतले पाहिजे. मगच या विषयावर सार्थक चर्चा करता येईल.

दुर्योधन: गुप्तचर प्रमुख, या बाबत आपला अहवाल सादर करावा.

गुप्तचर प्रमुख: महाराज, आपले चिरशत्रू पांचाल नरेश द्रुपद युद्धाची तैयारी गेल्या १३-१४ वर्षांपासून करीत आहे,  त्यांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्र निर्मितीचा ठेका मगध नरेशांना दिला होता. अस्त्र- शस्त्रांचा मोठा  साठा  घेऊन मगध नरेश आणि पांचाल नरेश पांडवाना येऊन मिळाले सुद्धा आहे. गेल्या वर्षांत मी कित्येक वेळा, आपले सुरक्षा मंत्री आणि सेनानी पितामह भीष्म यांना या बाबत सूचना दिली होती.

भीष्म: कुरु राज्याला कुठल्या ही शत्रू पासून धोका नव्हता आणि आज ही नाही आहे. अस्त्र-शस्त्रांवर उगाच राज्याचा खजिना खर्चिक करणे व्यर्थ, असे मी मानतो. तरी ही सुरक्षेसाठी आवश्यक अस्त्र-शस्त्र खरेदी साठी कित्येकदा अर्थमंत्री दुशासनपाशी विनंती केली होती. पण अर्थमंत्र्यांनी त्या साठी कधीच पर्याप्त धन उपलब्ध केले नाही, या वर आम्ही काय करणार. त्यांनाच जाब विचारा.

विदुर: मला ही काही म्हणायचे आहे, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी, पांडव युद्धाची तैयारी फार पूर्वी पासून केली आहे. दूरदर्शीपणा दाखवून पांडवानी युद्धात पराजित राजांशी ही सोख्याचे संबंध  जोडले आहे. आर्य, अनार्य, नाग, राक्षस कुणाला ही हीन आणि परके मानले नाही.  अर्जुनाने गंधर्व राज चित्रसेन, देवराज इंद्र आणि हिमालयात राहणाऱ्या भगवान शंकर यांना प्रसन्न करून ब्रम्हास्त्र सहित अनेक दिव्यास्त्रे (आकाशगामी) मिळविली आहे. अर्जुनाने नागराणी उलूपीशी लग्न करून पूर्व देशातील नागांशी सोख्याचे संबंध जोडले. नागांनी ही बाणाच्या पात्यांना लावण्यासाठी जहाल विष  पाठविले आहे.  शिवाय भीमसेन यांनी हिडम्बेशी लग्न करून राक्षसांची संबंध जोडले, धर्मयुद्धाचे कुठले ही नियम न मानणारे रात्री युद्ध  करणारे  हे राक्षस ही पांडवाना मिळाले आहे. महाराज आपण काय केले, कुठ्ल्याशी शक्तिशाली  देवतांना प्रसन्न करून, दिव्यास्त्रे मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त कर्णा जवळ एक दिव्यास्त्र आहे, ते ही तो अर्जुना विरुद्ध वापरेल. अश्वथाम्या जवळ एक विनाशकारी ब्रम्हास्त्र ज्याचा नियमानुसार युद्धात उपयोग करता येत नाही. .. माझे आज ही म्हणणे आहे, पांडवांशी तह करणेच सद्य परिस्थितीत योग्य.

भीष्म: दुर्योधन, या घटकेला आपल्या भंडारग्रहात केवळ अस्त्र- शास्त्रांच्या नावाने केवळ भंगार आहे, जुनी जंग लागलेली धनुष्य, बाण गदा आणि तलवारी आणि त्यांची अवस्था, गदा कुणाच्या डोक्यावर मारली तर गदाच फुटून जाईल, तलवार तुटून जाईल आणि बाण तर शत्रू पर्यंत पोहचणार ही नाही. कश्याचा जोरावर आपण युद्ध जिंकणार? पराभव निश्चित आहे.

दुर्योधन: पितामह म्हणून तुमचा आदर करतो, पुन्हा पराजयाची भाषा बोलू नका. हे युद्ध आपल्यावर लादल्या गेलं आहे, आपण कुणावर आक्रमण केलेले  नाही. शिवाय आज पाच गावे पांडवाना दिली तरी ही ते पूर्ण राज्य गिळंकृत केल्या शिवाय राहणार नाही. हस्तिनापूरच्या रक्षणासाठी युद्ध हे लढावेच  लागणार. आपल्याला लढायचे नसेल तर तसे सांगा, मी कुणा दुसऱ्याला सेनापती नियुक्त करतो.

भीष्म: दुर्योधन, हस्तिनापूरच्या सुरक्षेसाठी मी वचनबद्ध, आहे. सद्य परिस्थितीत  युद्ध जिंकायचे असेल  तर  शस्त्रांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. सर्व सेनानी आणि सैनिकांना काही सूचना पाळाव्याच लागतील. एक,  शत्रू जवळ आल्या शिवाय अस्त्र- शस्त्रांचा वापर करू नये. उदा: शत्रू टप्यात आल्या शिवाय भाले आणि बाण वापरू नये. गदा उगाच हवेत फेकू नव्हे, हा भित्रा कर्ण शत्रूला दूर ठेवण्यासाठी हवेत हजारो बाण व्यर्थ करतो, कर्णासमान योद्धे युद्धापासून दूर ठेवलेले बरे.

कर्ण: बाणाचा वर्षाव करून, शत्रूच्या मनात भीती उत्पन्न करून युद्ध जिंकता येते. व्यर्थ प्राण हानी करण्यात अर्थ नसतो. शिवाय शत्रू जवळ आल्यास, त्याचा ही नेम वर्मी लागू शकतो. आपल्या सैनिकांचे प्राण धोक्यात टाकणे ही काही युद्ध नीती नाही.

भीष्म: सद्य परिस्थितीत हीच  युद्ध नीती योग्य आहे, लक्षात ठेवा, हे युद्ध जिंकण्यासाठी नव्हे एका दुसऱ्याला मारण्यासाठी आहे. कुठल्याही एका पक्षाच्या सर्व योद्धांचा  प्राणांत झाल्या शिवाय हे युद्ध संपणार नाही. मी जिवंत असे पर्यंत युद्धाची हीच नीती पाळावी लागेल. दुर्योधन तुला कर्णा सारख्या सैनिकांना  युद्धापासून दूर ठेवावे लागेल.

आपला सैनिक म्हणून उल्लेख केल्याने कर्ण चिडला आणि रागाने म्हणाला,  मला ही तुमच्या नेतृत्व खाली युद्ध  लढण्याची इच्छा नाही.  आपल्या जवळ भरपूर सैन्य आहे, मरण्यासाठी. माझी ही एक सूचना आहे. एका सैनिकापाशी ढाल आणि एका पाशी तलवार असे द्यावे, दोन सैनिक एकत्र लढतील. एक ढालीने बचाव करेल आणि दुसरा तलवारीने आक्रमण. अश्यारीतीने अस्त्र-शस्त्रांचा योग्य वापर करता येईल.

दुर्योधन: कर्णा शांत हो. पितामह, मला आपल्या सर्व सूचना मान्य आहे आणि कर्णाची दिलेली सूचना ही आवडली  या शिवाय आपल्या समोर दुसरा पर्यायच नाही. पितामह, सर्व सेनानी आणि सैनिकापाशी हे निर्देश पोहचविण्याची व्यवस्था करा. गुरुदेव, शुभ मुहूर्तावर काढा, त्यानुसार कुरुक्षेत्राकडे प्रस्थान करण्याची व्यवस्था करता येईल. बैठक समाप्तीची घोषणा झाली.

(टीप: कल्पनेत झालेल्या हस्तिनापुरातल्या उत्खननात या बैठकीची ध्वनीभित स्वामी त्रिकालदर्शी यांना सापडली होती. घटनेच्या सत्यते बाबत कुणी आक्षेप घेऊ नये. या बैठीकीची तुलना  आपल्या आजच्या सैन्य तैयारी बाबत न करणे उचित

Saturday, March 29, 2014

कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची


मार्च महिना सुरु झाल्या बरोबरच  सौ.चे उपद्व्याप सुरु होतात. आलू चिप्स, बटाटे-साबूदाण्याचे पापड आणि मुगोड्या इत्यादी प्रकार करण्याची तैयारी आणि त्या साठी आमच्या सारख्या हक्काच्या गुलामांचा वापर ही होणारच. तसे म्हणाल तर  या वर्षी हिवाळा थोडा जास्त वेळ राहिला. तरी ही होळी नंतर आकाशमधून मधून  स्वच्छ राहते.  होळी नंतर ४ दिवसांची सुट्टी घेतली, थोड आराम करावा म्हणून. पण  घरी नवरा सुट्टीवर असेल तर त्याला कसे कामात गुंतवून ठेवावे जेणेकरून सुट्टी घेण्याच्या फंदात  पडणार नाही. झाले ही तसेच. या सुट्टीत सर्वात आधी केलेला पदार्थ म्हणजे मुगोड्या.  बाजारात जाऊन मुगाची डाळ विकत आणली सौ.ने निवडून भिजत घातली. सकाळी सकाळी चहा पिऊन डाळीला धुऊन साल वेगळी केली. पाणी काढून,  मिक्सर मध्ये पाण्याचा वापर न करता पिसून काढली व एका परातीत मिश्रण पसरवले.(अर्थातच हे कार्य अस्मादिकांना संपन्न करावे लागले).  शिवाय हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक बारीक  कार्य ही कार्य अस्मादिकांनी संपन्न केले. सौ. फक्त मेथी बारीक चिरली. सर्व साहित्य पिसलेल्या डाळीत मिसळले. चवी साठी जिरे-मिरी पावडर व मीठ मिसळले. वरतून आले किसून  टाकले. मिश्रण थोड गाढे असेल तर मुगोड्या टाकायला त्रास होत नाही आणि मुगोड्या वाळतात ही लवकर. आता कृती ही खाली देत आहे:

बटाटे चिप्स, साबूदाणा-बटाट्यांचे पापड इत्यादी)  विकत घेतलेले आहे.  त्या वर छोट्या आकाराच्या मुगोड्या घातल्या. (सौ. ला मदत करावीच  लागली) थोड्या वेळ उभे राहून माश्यांना दूर ठेवण्याची कामगिरी सौ. ने अस्मादिकांवर सौपवली. (मनात मनात शिव्या देत ती जवाबदारी ही पार पडली  जवळपास पाउण तासानंतर एक  मलमलची चुन्नी  त्या वर घातली आणि क्लिपा लाऊन ती उडणार नाही याची दक्षता घेतली.   कामाच्या मोबदल्यात एक कप चहा एक्स्ट्रा प्यायला मिळाला.   दिल्लीच्या उन्हात दोन दिवस वाळायला लागले. वाळल्या वर मुगोड्या अलगद निघून येतात. त्यांना एका परातीत काढून पुन्हा दोन-तीन  दिवस ऊन दाखविले.  चांगल्या वाळल्यावर एका डब्यात बंद करून ठेवता येतात.  

[साहित्य: १ किलो धुतलेली किंवा साल असलेली मुगाची डाळ, मेथी २५० ग्रम, १ जुडी कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, जीर काळी मिरी पावडर (३ चमचे) किंवा तिखट चवी पुरती मीठ व आलं.]



मुगोड्यांचा उपयोग: मुगोड्या टाकलेल्या वांग्याची भाजी भलतीच चविष्ट लागते. शिवाय बटाट्याच्या भाजीत ही मुगोड्या टाकता येतात. पण मला नुसती मुगोड्याची भाजी जास्त आवडते आणि ती ही लोखंडी कढईत (काही भाज्या लोखंडी कढईत बनविल्या तर त्यांचा स्वाद द्विगुणित होतो उदा: वांग्याची भाजी, बारीक चिरलेल्या बटाट्याची भाजी इत्यादी ).  ही भाजी सौ. जशी बनविते, कृती देत आहे.

साहित्य: एक वाटी मुगोड्या, तेल, लसूण, किसलेलं खोबर किंवा लसूण खोबरऱ्याची चटणी (लसूण आणि खोबर किसून थोड तेल घालून  सौ.  चटणी तैयार करून ठेवते) , हिरवी मिरची १-२, हिंग,मोहरी तिखट, हळद, चिंच आणि गुळ (चिंच गुळाचे कोळ  ही करून ठेवली कि फ्रीज मध्ये १०-१५ दिवस टिकते) व मीठ.

कृती. आधी मुगोड्या लाटण्याने थोड्या फोडून घ्याव्या किंवा खलबत्यात हलक्या हाताने कुटाव्या. मग लोखंडाच्या कढईत. दोन चमचे तेल घालून त्यात मुगोड्या लाल होत पर्यंत परताव्या. मुगोड्या एका ताटात काढून कढईत पुन्हा तेल टाकावे. त्यात मोहरी टाकावी, मोहरी फुटल्यावर हिंग, हिरवी मिरची घालावी नंतर लसूण आणि खोबऱ्याची चटणी (किंवा लसूण आणि खोबर घालावे), नंतर हळद आणि तिखट टाकून तीन-चार वाट्या पाणी घालावे व एक उकळी आल्यावर मुगोड्या त्यात टाकाव्या. झाकण ठेवावे. १० एक मिनिटात मुगोड्या शिजतात. त्यात मीठ चिंच गुळाचे कोळ (एक किंवा दोन चमचे (कोळ किती गाढे बनविले आहे त्यावर अवलंबून आहे)  घालावे. पुन्हा एक उकळी द्यावी. मस्त भाजी तैयार होते. 

टीप १: काही लोक फक्त थोड मीठ घालून मुगोड्या टाकतात.

टीप २: नौकरी पेशा आणि फ्लेट मध्ये राहणार्यांसाठी: घर कामासाठीच वेळ नाही, शिवाय गच्ची ही नाही. मग मुगोड्या कश्या घालाव्या. प्रश्न आहे. पण एखाद वाटी मुगाची डाळ भिजवून, एका परातीत मुगोड्या टाकून वर पातळ कापड टाकून २-३ तास ऊन येणाऱ्या बाल्कनीत वाळवतात येतात. जास्तीस जास्त ५-६ दिवस लागतील. शिवाय रात्री पंख्याखाली ही वाळविता  येतात. 

Thursday, March 20, 2014

अथ: वांगे पुराण


७-८ वर्षांपूर्वी मामे बहिणीच्या लग्नात भंडाऱ्याला गेलो होतो. सीमांतपूजेच्या दिवशी रात्री भरपूर तेल असलेलीजहाल वांग्याची भाजी ताटात होती. एवढा जबरदस्त झणका होता कि जीभे  बरोबर मेंदू ही सी सी करू लागला. नंतर कळले पाहुणे मंडळी पुणे, मुंबई, दिल्लीची असल्यामुळे तिखट थोड कमीच टाकल होत. वांग्यांना हिंदीत 'थालीचे बैंगन' ही म्हणतात वांग्याच्या भाजी शिवाय कुठलीही थाली पूर्ण होत नाही. वांगे ही एकाच भाजी आहे जिच्या डोक्यावर छत्र अर्थात मुकुट असते म्हणून वांग्यांना  वांग्यांना भाजीचा राजा ही म्हणतात.

वांगे विकत घेताना: वांगे काळसर, जांभळे, हिरवे आणि विदर्भात पांढऱ्या रंगाचे ही मिळतात. वांगे मोटे-ताजे गोल-मटोल, लहान-लहान किंवा लांब आणि पातळ स्वरूपात मिळतात. वांग्यात  बिया जास्त असेल तर वांगे स्वादिष्ट लागणार नाही. शिवाय ढाब्यात  वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच त्या मुळे मी  ढाब्यात वांग्याची भाजी खायचो टाळतोच. वांगे विकत घेणे ही एक कला असते. आमची सौ. या बाबतीत तरबेज आहे. तिने सर्वांनाच भाज्या कश्या निवडाव्या ह्याचे उत्तम प्रशिक्षण अर्थात मलाच दिले आहे.  प्रथम वांगे ताजे दिसत आहे कि नाही पाहावे. वांग्यांना चमक देण्यासाठी तेल तर नाही लावले हे ही पाहावे लागते. मग छिद्र तर नाहीना हे बघावे. जास्ती वजन म्हणजे जास्त बिया. त्या साठी दोन वांग्यांना वेगवेळ्या हातात घ्यावे. हलके वांगे निवडावे. बाजारात जर वांग्यांना  २० रु  आणि  २५ रु. भाव असेल पण एका किलोत चार एवजी सहा वांगे मिळत असेल तर २५ रु. मोजणे फायद्याचाच सौदा ठरेल. सर्व प्रकारचे वांगे याच पद्धतीने निवडावे.  तशी ही पद्धत बिया असलेल्या सर्व भाज्या  विकत घेताना सोयीची ठरते. ढोबळी मिरची तशीच महाग असते. ह्या पद्धतीने निवडल्यास जास्त मिरच्या हाती येतील. अर्थात दुकानदार तुमच्या कडे वाकड्या नजरेने पाहिल हे ठरलेलेच.

सौ. वांग्याची भाजी चिरत असतात, आमची स्वारी जर घरी असेल अर्थात या ना त्या (?) कारणाने स्वैपाकघरात डोकवणारच. एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून त्यात चाट-मसाला नाजूक हाताने भरविल्यास  हा! हा! हा! काय स्वादिष्ट लागतात, सांगणे न वेगळे.  

आमची आई ही वांग्याच्या रायता मस्त बनवायची. शेगडीवर वांग्याला तेल लाऊन मस्त भाजायची. गोड दही (दिल्लीत दही गोडच मिळते) किंवा  गोड न मिळाल्यास थोडी साखर टाकून, फेटून घायचे. मग आई भाजलेले वांगे सोलून चार भाग करायची. मध्ये असलेल्या बिया मोठ्या सफाईने चमच्याने अलगद काढायची. असे बिया नसलेले वांग कुस्करून आधीच फेटून ठेवलेल्या दह्यात घालायची. त्यात कांदे- टामोटो बारीक चिरून भरपूर कोथिंबीर सहित टाकायची. मग मोहरी, हिंग व हिर्व्यामिर्चीची फोडणी त्यात घालायची. मस्त आणि स्वादिष्ट असा रायता आम्ही मिटक्या मारून खायचो.

वांग्या वरून आठवले, लहान असतात आम्ही सुट्टीत नागपूरला जात असो, तेंव्हा आजी एक गोष्ट नेहमीच सांगायची, आता पूर्ण आठवत नाही तरीही एका राजाला चार बोबड्या राजकन्या होत्या. एकदा त्याने प्रधानाला घरी जेवायला बोलविले.राजकन्यांना सक्त ताकीद दिली. कुणीही तोंड उघडायचे नाही. जेवताना प्रधानाच्या लक्षात आले, सगळ्या  राजकन्या चिडीचूप आहे. त्याला वाटले या मागे  काहीतरी काळबेर नक्की असावं. बायकांना त्यांची स्तुती आवडते. प्रधानाने वांग्याच्या भाजीची स्तुती करत म्हंटले आमच्या हिला तर वांग्याची भाजी करताच येत नाही  अहाहा एवढी स्वादिष्ट भाजी कशी केली. एका राजकन्येला राहवले नाही तिने म्हंटले ‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’  राजकन्यांचे  बिंग फुटले.  (पूर्ण गोष्ट लक्षात नाही आहे. कुणाला माहित असेल तर पूर्ण गोष्ट पुन्हा वाचायला मजाच येईल. [कदाचित! ही लोककथा विदर्भातील असावी]). पण एक मात्र खरं, वांग्याच्या भाजीला काही ही लागत नाही. भरपूर तेल, हिंग, गुळ, हिरवी मिरची आणि गोडामसाला किंवा गरम मसाला टाकले तरी स्वादिष्ट भाजी तैयार होते.  बाकी भरलेले वांगे बहुतेक सर्वांनाच आवडतात.

कुठल्या ही पदार्थाची शोभा वांग्या मुळे वाढतेच. तसं सर्वांनाच अनुभव असेल नेहमी बनविताना वांग्याच्या भाजीत बटाटे बायका टाकतातच. अर्थात बटाटे पोर खातात आणि वांगे मोठ्यांच्या नशिबी येतात. विदर्भात वांगे भात हा प्रकार ही प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसात,संभार मध्ये केवळ वान्गेच आढळण्याची शक्यता जास्त. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच.

काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. यात जास्त करून मुंबई- पुण्यातले नखरेल पोर असतात. अशीच एक मुंबईकर चिमुकली उन्हाळ्यात घरी आली होती.  वांगे पाहतात म्हणाली, मावशी मला वांगे आवडत नाही. आमची सौ. काही कमी नाही. सकाळी पाहटे नाश्त्यात वांग्याचे धिरडे बनविले. वांग्याचे साल काढून वांग किसून बेसन व कणकीच्या पिठात (२:१) मिसळले त्यात बारीक कापलेले, - कांदे- टामाटो, हिरवी मिरची व नेहमी प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकली. पतंजलीच्या टमाटो सॅास बरोबर तिने मिटक्या मारत धिरडे खाल्ले. (वांग्याला भाजून ही धीरड्याच्या  पिठात मिसळता येत) अर्थातच पुढे वांग्याची भाजी खायला ही ती शिकली.

शेवटी आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच.  ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात. 

Monday, March 17, 2014

ओळखा पाहू - होळीमय चारोळ्या




 (१)
गुरूलाच दाखविला
धोबीपछाड तयाने
घालूनी टोपी गुरुची
युद्धात उतरला सत्यवीर(?)

(२)
जनसमुद्र दिसत होता
डोळ्यांसमोर तयाचा
की नजर अधू जाहली
की कबूतरे उडुनी गेली?

(३)
भीष्मासम वृद्ध
हा सेनानी महान
एक पदाती सम आज
का उतरला रणांगणात?

 (४)
आधी लगीन गादीशी
मग राजकन्येशी
विच्छा त्याची आज
पूर्ण होणार का?

(५)
द्वारकेचा राजा
होणार का दिल्लीश्वर.
कि कुणा अर्जुनाचा
सारथीच ठरणार?
शेवटी द्वारकेचा राजा दिल्लीश्वर झाला.