Friday, July 6, 2018

कविता - मेघ बरसला





मेघ बरसला 
विरही अश्रूंचा 
खारा खारा.

मेघ बरसला 
प्रथम आषाढी
प्रिय वार्तेचा. 

मेघ बरसला 
 माळात रानात
काळा काळा.

मेघ बरसला 
भिजली धरणी
हिरवी हिरवी.






Thursday, July 5, 2018

वेद हे अपौरुषेय- कारण



वेदांना अपौरुषेय म्हंटले आहे. अपौरुषेय शब्दाचा अर्थ काय हा प्रश्न मनात येणारच. सामान्य अर्थ मनुष्य निर्मित नाही. मग त्या ऋचांची रचना कुणी केली.  देवांनी? पण ऋग्वेदातच म्हंटले आहे, देवांची निर्मिती हि सृष्टीच्या निर्मिती नंतर झाली आहे. निर्मित झालेली वस्तू जे निर्माण करेल ते अपौरुषेय निश्चितच नाही. त्यामुळे देवतांनी दिलेले ज्ञान हि अपौरुषेय नाही. 

वैदिक ऋषींनी वेदांच्या ऋचांची रचना केली नाही अपितु सनातन काळापासून विद्यमान सत्य जाणले, अनुभव केले आणि शब्दांत बांधले. हे शब्द म्हणजेच वैदिक ऋचा. ऋषींनी या वैदिक ऋचांचे ज्ञान समाज कल्याणासाठी आपल्या शिष्यांना दिले. या कारणामुळेच वैदिक ऋषींना मंत्रदृष्टा म्हंटले आहे. वेदांची भाषा संस्कृत असली तरी हि अगम्य आहे. एकाच शब्दाचे अनेक अर्थ तिथे सापडतात. त्यामुळे वैदिक ऋचांचा अर्थ विद्वान आपापल्या परीने वेग-वेगळे काढतात. बहुतेक जाणलेले ज्ञान चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून अशी भाषा ऋषींनी  वापरली असेल. 

अपौरुषेय म्हणजे सत्य आणि सनातन जे सृष्टीच्या प्रारंभापासून विद्यमान आहे. ऋषींनी ते सत्य जाणले आणि वेदांच्या माध्यमातून समोर आणले. आता सनातन सत्य म्हणजे काय? एक उदाहरण, झाडावरून फळ खाली पडते. सत्ययुगापासून ते आजगायत फळे झाडावरून खालीच पडतात. वर उडून जात नाही. पण फळे खालीच का पडतात, या मागचे कारण काय?  पृथ्वीच्या गृत्वशक्तीमुळे फळे खाली पडतात. गृत्वाकर्षण मानवाने निर्मित केलेले नाही. त्यामुळे गृत्वाकर्षण काय आहे हे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याची लांबी रुंदी हि मोजू शकत नाही. पण न्यूटनने पृथ्वीवर विद्यमान गृत्वाघर्षण  जाणले आणि गृत्वाघर्षणचा सिद्धांत समोर आला.  अशाच प्रकारे वेदांची निर्मिती झाली.

सारांश वैदिक ऋषींनी अनादीकाळापासून असलेले विद्यमान सत्य ओळखून, त्या सत्याला शब्दांत बांधले आणि वेदांची रचना केली म्हणून वेदांना अपौरुषेय म्हंटले आहे.
  

Wednesday, July 4, 2018

दोन क्षणिका - कविता आणि सिंहासन




भावनांच्या पाकात
शब्दांचे मीटर
प्रसवली कविता.

भाषणाच्या गर्जनेत 
शब्दांचे आश्वासन 
मिळाले सिंहासन.



Tuesday, July 3, 2018

आठवणीतून - पहाटे येणारी नर्स


हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या म्हणीनुसार माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच.

बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्यामुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्यावर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नव्हते.  सकाळची वाट  पाहण्या शिवाय गत्यंतर काय?

सकाळचे पाच वाजले, सुहास्य करत ती रूम मध्ये आली, गुड मार्निंग, कैसे हो अंकल (आधीच छातीत चीर पडलेली आणि त्यात “अंकल”, मनात म्हणायचो किती  तुकडे करणार या नाजुक हृदयाचे), तरीही तिला पाहून मी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करायचो. जवळ येऊन ती सरळ हाताचे मनगट आपल्या हातात घ्यायची. तिचा नाजुक, कोमल, रेशमी, मुलायम स्पर्श हाताला जाणवताच वेदना कुठच्या कुठे गायब व्हायचा, सर्व शरीर शांत झाल्या सारख वाटायचं. पण दुसर्याच क्षणी, आपल्या खिश्यातून भली मोठी सुई असलेली सिरींज बाहेर काढायची. एका हाताने सिरींज डोळ्यांसमोर नाचवत, दुसर्या हाताने टक-टक करून सिरींज वाजवायची. मग चेहऱ्यावर हास्य आणत, अंकलजी, थोडा दर्द होगा, म्हणत सुई हातात खुपसायची, त्या वेळी तिचा चेहरा अमेजोनच्या जंगलातल्या रक्त पिणाऱ्या वटवाघुळणी सारखा दिसायचा. असे वाटायचे, ती जिभेने लप-लप करून रक्त पीत आहे, आणि रक्त पिऊन तिचे ओठ लाल सुर्ख झालेले आहे. मी डोळे बंद करून घ्यायचो. काही क्षणांनी डोळे पुन्हा उघडायचो, सिरींज मधून रक्त एका ट्यूब ती भरायची. मग पुन्हा चेहर्या वर हास्य आणत, गुड डे, अंकल म्हणत बाहेर जायची, त्या वेळी ही हाताना तिचा ओझरता स्पर्श व्हायचा. ती गेल्या नंतर काही काळ तरी शरीराला वेदना जाणवायच्या नाही. मग पुन्हा त्याच असह्य वेदना सुरु व्हायच्या. कधी-कधी मनात विचार यायच्या, वटवाघुळणी, परत ये, तुझा वेदना दूर करणारा, नाजुक, कोमल, रेशमी स्पर्श मला दे, वाटलं तर पाहिजे जेवढे रक्त पी.

टीप: सकाळी-सकाळी, टेस्टिंग साठी रक्त घेणे ही नर्सची ड्युटी होती. बाकी सर्व मनातले विचार आहेत. नर्सेसचा सेवा भाव पाहून मला काय वाटते ते:

नर्स

पृथ्वीवर अवतरली
अमृतघट  घेउनी
अप्सरा शापित कुणी.

रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला.



Monday, July 2, 2018

क्षणिका - एक माणूस


शहरात आला 
गर्दीत हरवला 
एक माणूस.


टाळे घरांवर
उजाड माळ
पहाडी गाव.













Friday, June 29, 2018

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...


सोना, सोSSना, सोनुSSटली, काहीच उत्तर नाही. शेवटी आबा जोरात ओरडले गधडी  बहरी आहेस का, ऐकू येते कि नाही. जोर-जोरात पाय आपटत ११ वर्षाशी सोनुटली दोन्ही हात कमरे वर ठेऊन आबासमोर उभी ठाकली. मोठे-मोठे डोळे वटारून बेंबीच्या देठाने ओरडली आSSबाSS, ओ द्यायला थोडा उशीर का झाला, मी बहरी, मी गधडी. आता कुकल बाळ नाही मी. मोठी झाली आहे. ६वीत शिकते. गधडी म्हंटलेले मला मुळीच खपणार नाही. एवढी वर्ष सहन केले, आता मुळीच सहन करणार नाही. येउ ध्या ममाला ऑफिसातून, कशी वाट लावते तुमची, बघाच.  

आबाही तेवढ्याच त्वेषाने म्हणाले, "एवढ्या आवाज देतो, तू ऐकूनहि न ऐकल्यासारखे करते, आणि वर मला धमकी देते. माझी बिल्ली आणि मलाच म्याऊ". येउ दे तुझ्या पपाला, आईची धमकी देते, बघून घेईल तुझा बा तुम्हा माय लेकीना.  हा!, हा!,हा! 'व्हाट अ जोक,व्हाट अ जोक' आबा तुमचा जावई, सॅारी माझे पपा, आईने थोडे डोळे वटारले कि शेळी होते त्याची. एक विचारू आबा, तू पण आजीला घाबरत होता का? म्हणत सोनुटलीने तेथून धूम ठोकली. 

आबाचे लक्ष समोर हार घातलेल्या त्यांच्या बायकोच्या फोटो कडे गेले. च्यायला फोटोत हि मोठे-मोठे डोळे करून टक लावून पहात आहे. आबा दचकले, सॅारी,नाही बोलणार पुन्हा सोनाला म्हणत आबानी कानाला हात लावले आणि  मनातच पुटपुटले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा....




Wednesday, June 27, 2018

सोनेरी स्वप्नांची नवी कोरी वही


मायेच्या संसारासाठी
पोटाच्या खळगीसाठी
निरर्थक मी भटकत होतो
जगणे त्याला समजत होतो.

कोऱ्या-कोऱ्या कागदांवर
खोटा हिशोब लिहित होतो
सृजनतेचा आव खोटा
 स्वत:ला ब्रम्हा समजत होतो.

खोटे होते शब्द, खोटी होती माया 
रिक्त होते हात, कोरी होती वही
अंधाऱ्या रस्त्यात हरवून मी गेलो.

शोधेल का माय मला?
घेईल का कुशीत पुन्हा?

 ऐकता-ऐकता अंगाई नवी
पाहणार का पुन्हा,
 सोनेरी स्वप्नांची 
 नवी कोरी वही.
 

Monday, June 25, 2018

कविता - सतरंगी फुल




दवांत न्हाली 
पहाटे कळी. 
उजेडात फुलले
सतरंगी फुल.


आवाऱ्या भंवऱ्याने
कळीला चुंबिले 
गालात हसले 
सतरंगी फुल.