Monday, September 24, 2012

आपण गणपतीला दुर्वा का वाहतो?


आपण गणपतीला दुर्वा का वाहतो? हा विचार मनात आला. माहित असेलेल एक उत्तर– गणपतीला प्रिय म्हणून दुर्वा गणपतीला वाहिली जाते. पण माणूस स्वार्थी आहे स्वार्थ असल्या शिवाय तो कुणालाही काही ही वाहणार नाही. इंटरनेट वर बसून दुर्वाचे महत्व शोधू लागलो. सहजच यजुर्वेदातील दुर्वेचे महत्व सांगणार एक श्लोक वाचण्यात आला.

काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि.
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन च.
(यजुर्वेद १३.२०)
[ऋषी: अग्रणी, देवता-पत्नी,छंद: अनुष्टुप]

हे दुर्वा एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध कर. दुर्वा प्रजाजनांना समृद्ध करते. कश्यारीतीने करते याचा विचार केला. दुर्वेचे अनेक उपयोग आहेत:

औषधीय उपयोग: 

‘दुर्व’ धातूचा अर्थच नष्ट करणे आहे. दुर्वा त्रिदोष नाशक आहे. वात कफ पित्त आणि कफ दोषांना संतुलित करते म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वेचा वापर होतो. आजचे प्राकृतिक चिकित्सक ही दुर्वेचा वापर औषधी म्हणून करतात. वैदिक ऋषींना दुर्वेचे औषधीय गुण माहिती होते.

दुर्वेचे पर्यावरणातील महत्व:
 
दुर्वा मातीला घट्ट पकडून ठेवते, पर्वतांना आणि नद्यांच्या किनार्याना ढासळू देत नाही. पाण्याला स्वछ आणि निर्मळ करते. हिरवी गार कुरणे डोळ्यांना शीतलता प्रदान करतातच शिवाय सूर्यप्रकाशात प्राणवायू ही उत्सर्जित करतात. अर्थातच पर्यावरण दृष्टीने दुर्वेचे महत्व आहे.

आर्थिक कारण:

गणपती अर्थात गणाचा अध्यक्ष अर्थात राजा. वैदिक काळात गायी, घोडे, शेळ्या हे मानवाच्या उपयोगी येणारे पशु. बैल-शेतीला, गाय-दुध, दही आणि तुपाला, घोडे प्रवासाला, युद्धाला इत्यादी.  शेळी, मेंढ्या इत्यादी जनावरांचे पालन मांस आणि वस्त्रांसाठी (त्या काळी अधिकांश लोक पशुंचे चर्मचा वापर वस्त्र म्हणून करायचे). या सर्वांसाठी लागणार हिरवीगार दुर्वा. अर्थात राज्यात दुर्वेनी भरपूर कुरण असतील तर पशु पुष्ट होतील आणी प्रजाजन समृद्ध होतील. शिवाय वाळलेल्या दुर्वेचे अन्य उपयोग- बसण्यासाठी आसन, इत्यादी.

मानवाची अमर होण्याची इच्छा:

मृत्युची भीती सर्वांनाच वाटते. अमर होण्याची इच्छा मनुष्य प्राणीत सुरवाती पासूनच आहे. आपल्या पुत्र आणि पौत्रांच्या माध्यमातून तो अमर राहण्याच्या प्रयत्न करतो. उन्हाळ्यात वाळलेले माळ- रान पाऊस पडताच क्षणात हिरवगार होते. शेंकडो वर्ष सुप्तावस्थेत राहूनही दुर्वांकुर पाऊस पडताच जमिनीतून बाहेर निघतात. जीवनाचा आनंद चाहुबाजूना पसरवतात. माणसाच्या मनात ही आपल्या संततीच्या माध्यमातून अमर राहण्याची इच्छा आहे. दुर्वा गणपतीला अर्पित करून आपण दुर्वेप्रमाणेच अमरतेच वरदान मागतो.

प्रश्न येतो दुर्वा गणपतीलाच का वाहतो?

राज्यात दुर्वेची भरपूर कुरण राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळच संपूर्ण जीवन चक्रच हिरव्या गवतावर निर्भर होते. आता ही आहेच. भाद्रपदात राना-वनात सर्वत्र हिरवीगार दुर्वा आपल्याला दिसून येते. पण पुढच्या पावसाळ्या पर्यंत ही दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे. गणाध्यक्ष अर्थात गण प्रमुखाने शत्रुं पासून या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा. जसे आपण सव्वा रुपया देवावर वाहून लाखांची कामना करतोच. तसेच प्रजाजनां आरोग्य व पौष्टिक अन्न प्रदान करणारी दुर्वा सुरक्षित राहावी म्हणून उत्पन्नाचा सहावा हिस्सा गोपालक आणि शेतकरी गणाध्यक्ष अर्थात राजाला अर्पित करायचे. त्याच परंपरेचे जतन आज आपण गणपतीला दुर्वा वाहून करतो.

दुर्वेचे रक्षण करणे का आवश्यक आहे?

आज ही आपल्या देशात अधिकांश शेतकरी शेती साठी बैलांचा वापर करतात. शंभर कोटींच्या वर असलेल्या देशाला दुध, दही आणि तूप गायी म्हशीं पासूनच मिळते. शेळ्या- मेंढ्या मांस साठी पाळल्या जातात. हे सर्व पशु गवत अर्थात “दुर्वा” खाऊनच पुष्ट होतात. सरकार ही शेळ्या-मेंढ्यांच्या पालानाला प्रोत्साहन देत आहे. कुरणांच्या अनियंत्रित वापरा मुळे आज ही कुरणे नष्ट होतात आहे. आणि आज सर्वत्र उजाड रान-माळ दिसतात. याच सरकारी धोरणामुळे गावातील सार्वजनिक “कुरणे” नष्ट होण्याच्या मार्गावर आहेतच. शहरात ही बघतो दरवर्षी नगर निगम पावसाळ्यात बागांमध्ये गवत लावते आणि पोर दिवाळीच्या सुट्ट्यात क्रिकेट खेळून ते नष्ट करतात. परिणाम, पर्वत पावसाळ्यात ढासळतात,  नद्या किनार्याना तोडतात, सुपीक जमीन पावसाळ्यात वाहून जाते, पृथ्वीवर उष्णता वाढण्याच्या मागचे ‘हिरवी दुर्वा युक्त कुरणाचा ह्रास’ हे ही मुख्य कारण आहे.

आज गणपती सारखा राजा नाही आहे. देशात लोकशाही आहे. त्या मुळे दुर्वा युक्त कुरणांची रक्षा करण्याची जवाबदारी ही आपलीच आहे. या वर्षी गणपतीवर दुर्वा वाहताना या कुरणांची रक्षा करण्याची जवाबदारी आपलीच आहे हे आपण ओळखलत तर हीच खरी गणपतीची पूजा होईल.


Saturday, September 15, 2012

एफ डी आई सुंदरी


निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची 
३६-२४-३६ फिगर वाली, 
स्वर्गातली अप्सरा  
एफ डी आई. 

घेउनी कवेत त्याला 

म्हणाली ती कशी.
स्वर्गातील अमुल्य डालर, 
वाहिन तुझ्या चरणी.
पित्जा-बर्गर डॉमिनो, 
अमृताहुनी गोड 
कोक पेप्सी स्वर्गातली
 आणिली मी तुझ्यासाठीच.
सुंदर शोभेल माझा राजा 
घालुनी परिधान वालमार्टी.

फक्त सोपव कि मला 
तुझे मेहनती हात-पाय  
तत्क्षणी   सोपविले त्याने 
आपले हातपाय मेहनती.
डोळे बंद करुनी बघू लागला 
स्वप्ने स्वर्ग सुखांची.

अचानक राक्षसी अट्टाहास 
आसमंतात गुंजला
नव्हती समोर अप्सरा, 
विळखा होता  राक्षसी.

ओरडला, चीत्कारला, 

पण उपयोग नव्हता.
त्याचे रक्त प्राशन करूनी, 
शोधात नव्या  सावजाच्या 
पुढे निघून  गेली 
एफ डी आई राक्षसी 

मित्रानो,  दिसली कधी तुम्हास्नी 
निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची
३६-२४-३६ फिगर वाली, 
एफ डी आई  अप्सरा.
फसू नका तिच्या जाळ्यात,
  गमवू नका हात पायांना
सदा सावधान राहा, सावधान राहा.

Sunday, September 9, 2012

आरोग्य दलिया


दलिया नाव घेतल्या बरोबर गव्हाचा दलिया आपल्या डोळ्यांसमोर येतो. सहा-सात महिन्यांपूर्वी सहज कतुहल म्हणून पतंजलीतून आरोग्य दलिया आणला होता. या दलिया मध्ये गहू, मुगाची डाळ (साली सकट), सम प्रमाणात बाजरी आणि तांदूळ.

साहित्यआरोग्य दलिया २ वाटी, जिरे १/२ चमचे, काळी मिरी १/२ चमचे किंवा १ हिरवी मिरची,तूप (शुद्ध) किंवा तेल १ किंवा २ चमचे, मीठ आवडीनुसार, टमाटर दोन (१०० ग्राम), पाणी ८ वाटी

वैकल्पित साहित्य: कोथिंबीर आणि *भाज्या

कृती : गॅस वर कुकर ठेवावे. १ चमचा तूप घालावे, तूप गरम झाल्यावर त्यात जिरे व काळी मिरी घालावी. नंतर दलिया घालून एक ते दोन मिनिटे तुपावर परतवावा. नंतर पाणी, टमाटर व आवडीनुसार मीठ त्यात घालावे. दोन सीट्या झाल्यावर गॅस बंद करावा. दलिया जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात पाणी घालून पुन्हा एक ते दोन मिनिटे उकळी द्यावी.

टीप: आवडत असेल तर दुधी भोपळा, लाल भोपळा, खीरा, गाजर , तोरी, शिमला मिरची, बंद गोबी, सर्व प्रकारच्या शेंगा यात घालता येतात (दलिया चमच्यांनी खातात म्हणून या भाज्या बारीक चिरून घातल्या पाहिजे). (अर्धा किलो दलियाची किमत ३० रू आहे अर्थात स्वस्त आणि पोष्टिक ही)हा दलिया सर्वाना निश्चितच आवडेल ही अपेक्षा.

Wednesday, August 22, 2012

ईशान्य उपनिषद – जगण्याचा मार्ग.

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.

(शांतीपाठ)

ईशा वास्यमिद्ँसर्व यत् किंच जागत्यां जगत.
तेन त्यक्तेन भुन्चीथा मा गृध: कस्य स्विद् धनम्.

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत्ँसमाः.
एवं त्वयि नान्यथेतोऽस्तिण कर्म लिप्यते नरे.

[ईशोपानिषद (मंत्र १ & २)]

ईशान उपनिषद शांतीपाठा पासून सुरु होतो. ऋषी म्हणतात पूर्णातून पूर्ण निघत गेले तरी ही पूर्णच शेष राहिले. ईशान उपनिषदात पहिल्या मंत्रात ऋषी म्हणतात ‘त्याग सहित उपभोग’ करा. दुसऱ्याचा वाट्यावर हक्क सांगू नका. परमेश्वराने, प्रत्येकासाठी वेगळा वाट ठेवला आहे, आपल्या वाट्याचा उपभोग करीत प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे. दुसऱ्या मंत्रात ऋषी म्हणतात अशा रीतीने शंभर वर्ष जगण्याची इच्छा केली तरी ही कर्म बंधन मानवाला बांधू शकत नाही.

उपनिषदकार ऋषींना “मंत्रदृष्टा” का म्हणतात हे ईशान उपनिषद वाचल्या वर कळते. भूत, वर्तमान आणि भविष्य पाहण्याची क्षमता त्यांचात होती. ब्रह्मा द्वारा निर्मित पृथ्वी समस्त जीव व जाती ही कधी तरी नष्ट होणारच हे सत्य असले, तरी भगवंताने मानवाला दिलेले आयुष्य त्याने जगले पाहिजे आणि त्या साठी मंत्रदृष्टा ऋषीने या मंत्रांद्वारे आपल्याला मार्ग दाखविला आहे.

पृथ्वीवरील आजचे वातावरण मानव आणि आज अस्तित्वात असेलेल्या समस्त प्राणीमात्रांसाठी अनुकूल असे आहे. अर्थात वातावरणातील हवा (गॅस),पाणी आणि माती यांचे संतुलन. जो पर्यंत हे वातावरण अनुकूल राहील मानवाचे अस्तित्व पृथ्वीवर टिकून राहील. पण माणूस बुद्धिमान आणि स्वत:ला भगवंताहून अधिक श्रेष्ठ समजतो. आपल्या स्वार्थासाठी वातावरणात बदल करण्याची क्षमता मानवाने आज मिळवली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या स्वार्थासाठी इतर प्राण्यांना नामशेष करण्याचा हट्टच जणू माणसाने धरला आहे. स्वर्थापायी आंधळ्या झालेल्या मानवाला हे कस समजत नाही पृथ्वीवरील इतर जीवन नष्ट झाले तर मानवजाती ही नष्ट होईल. आपल्याच कर्माचे परिणाम मानवाला भोगावे लागेल. मग या जगात माणसाने आपले आयुष्य कसे जगावे जेणे करून मानवजाती आपले अस्तित्व पृथ्वी वर टिकवू शकेल अर्थात आपली शंभर वर्ष जगण्याची इच्छा पूर्ण करू शकेल याचे मार्ग दर्शन ऋषीने केले आहे.

‘रोटी कपडा आणि मकान’ आपल्या तीन मूलभूत गरजा आहे. या साठी आपण काही वस्तूंची ‘निर्मिती’ करतो आणि काहींचा ‘उपभोग’ करतो.

ऋषी “उत्पादन” या शब्दाचा अर्थ सांगतात, “पृथ्वीवरील वातावरणातल्या संतुलनात कुठलाही बदल न करता जी निर्मिती होते तिलाच आपण “उत्पादन’ हे म्हणू शकतो”. याच उत्पादित पदार्थांचा आपण उपभोग करतो. पण इथे प्रश्न उठतो कुठलीही वस्तूची निर्मिती वातावरण संतुलनात बदल केल्या शिवाय कसे शक्य आहे. ऋषी याच प्रश्नाचे उत्तर देतात जे काही आपण उपभोग करतो “त्याचा त्याग करा”.

उदाहरणार्थ: झाड-झुडपी ही जमिनीतून भोज्य पदार्थ व पाणी इत्यादी घेतात बदल्यात पिकलेली पाने परत जमिनीला परत करतात. वातावरणात प्राणवायू निर्माण करतात. पाणी जमिनीत साठवण्यास मदत करतात. जनावरे चारा खातात आणि विष्टा परत करतात. अशारीतीने वातावरणातले संतुलन कायम राहते. पण माणसाच्या गरजा मोठ्या आहे. उदाहरणार्थ जाळण्यासाठी, फर्निचर व घरांसाठी आपण लाकूड वापरतो पण तेवढेच झाडे लावून त्यांची पूर्ती करतो का? पृथ्वीच्या गर्भातून कोळसा व पेट्रोलियम पदार्थ काढून ‘दूषित वायू’ वातावरणात उधळतो या मुळे हवेतील प्राणवायू कमी होत चालली आहे. या मुळे वातावरणातले संतुलन बिघडत चालले आहे. ही ‘दूषित वायू’ परत पृथ्वीच्या गर्भात टाकण्यासाठी आपण काय करीत आहोत.  जर आपल्याला हे करणे शक्य नाही तर या पदार्थांचा वापर कशाला?

आपल्या स्वार्था साठी आपण दुसऱ्यांचा जगण्याचा हक्क आपण काढून घेत आहोत. कळत, असूनही पृथ्वीवरचे वातावरण दूषित करीत आहोत. अधिक काळ जर माणसाची अशीच प्रवृत्ती राहील तर मानवाला आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागतील व मानवजाती ही नष्ट होईल.

सारांश: जे काही आपण वातावरणातून घेतो ते आपल्याला परत करता आल पाहिजे. अन्यथा त्या पदार्थांचा उपभोग करण्याचा मोह टाळावा. ज्या पदार्थांना मानवाला परत करणे शक्य आहे त्यांचाच उपभोग घ्यावा अर्थात त्याग सहित भोग म्हणजे “सर्वोत्तम उपभोग”. अशा रीतीने जगल्यास आपण निश्चित शंभरी गाठू शकू.

Sunday, August 19, 2012

 


सूतजी म्हणाले, मुनिनों पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप या विषयावर एक कथा आज तुम्हाला सांगतो.

अवंती नगरीच्या राजकुमारी लक्ष्मीदेवीचे एका राक्षसाने अपहरण केले. राजाने जो कुणी राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून सोडवेल त्याला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याचा विवाह राजकुमारी लक्ष्मीदेवी बरोबर लावण्यात येईल.  

विदिशाचा राजकुमार विष्णुवर्धन घोड्यावर स्वार होऊन राजकुमारीला शोधण्यास निघाला. पुष्कळ दिवस निघून गेले त्याला राजकुमारीचा पत्ता लागला नाही. निराशा त्याचा मनात घर करू लागली. परत आपल्या राज्यात परतावे कि आणखीन शोध घ्यावा, त्याला काही सुचेनासे झाले होते.  अशा निराशेच्या क्षणी त्याला एक बुटका भेटला. राजकुमाराने त्याला राजकुमारी बद्धल विचारले. बुटका म्हणाला राक्षसाने राजकुमारीला एका किल्यात बंदिस्त करून ठेवले आहे. मला ती जागा माहित आहे. राजकुमार म्हणाला, बुटक्या मला ती जागा दाखव, आपण  दोघ मिळून   राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू. 

राजकुमाराने बुटक्याला आपल्या सोबत घेतले. दोघांचे राक्षसा बरोबर युद्ध झाले. दोघांनी मिळून राक्षसास ठार मारले. राजकुमारी लक्ष्मीदेवी मुक्त झाली. राजकुमाराने तिला आपल्या सोबत घोड्यावर बसविले आणि तो अवंती नगरीच्या दिशेने निघाला. राजकुमारी घरी परतली. राजाला अत्यंत आनंद झाला. दिलेल्या वचनाचे पालन करीत, राजाने राजकुमार विष्णुवर्धन बरोबर राजकुमारीचे लगीन लावले व त्याला आपले अर्धे राज्य ही दिले. सर्वत्र आनंदी-आनंद पसरला.  

तुमच्या मनात एक प्रश्न असेलच, त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला. कसा-बसा तो अवंती नगरीत येऊन पोहचला. त्याला कुणीही ओळखले नाही.  बुटका तिथल्या चौरस्त्यावर भीक मागून कसाबसा आपल आयुष्य कंठू लागला. त्याला राजकुमारी तर मिळाली नाही पण राजा कडून काही बक्षीस ही मिळाले नाही.  आपण मूर्ख बनलो,  हा एकच विचार त्याचा मनात सदैव यायचा.

सूतजी म्हणाले, मुनिनों, कलयुगात जम्बूद्विपे ज्याला राजकुमार, बुटका, कोण हे कळेल पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल.


साठाउत्तराची कहाणी सकाळ संपूर्ण. इति. 

 

आजचा कवी



कोळया सारखे जाळे विणुनी
करितो शब्दांची फेकाफेकी.

गाफिल श्रोत्यांना त्यात बुडवुनी
घेतो दाद मनाजोगति.

कधी सांगतो सिने नट्यांच्या
लफड्यांची स्टोरी.

कधी रंगवितो वासनामयी.
रंगील्या राती.

कधी चालवितो व्यंगास्त्रांचे बाण
राजनेत्यांवर्ती.

कधी उडवितो रक्तांकित
वीरश्रीची गाणी.

उजवी डावी वेडी वाकडी
नुसती शब्दांची खेळी.

लक्ष्य त्याचे सदैव असते
कोठी, गाडी आणि बिदागी.