आकाशात कडकडाट झाला. वीज कुठेतरी जवळच आदळली.
"आई ग!" — किंचाळत ती आईच्या कुशीत शिरली.
आईने तिला घट्ट धरले. पण यावेळी आईच्या डोळ्यांतून वर्षानुवर्षे आतल्या आत
कोंडलेल्या अश्रूंच्या धारा बाहेर आल्या. तिने आईचे ते अश्रू पाहिले. तिने हळुवारपणे
आईचे गाल पुसले आणि डोळ्यांत डोळे घालून विचारले,
"आई, आज का रडतेस?".आईने लेकीकडे पाहिले तिच्याच
डोळ्यांचे तेज, त्याच्याच काळ्या रंगाची सावली. छातीत एक
जुनी कळ उठली. ती म्हणाली, वरुणा! जाणायचे होते तुला, तुझा बा कोण?
त्या दिवशी असेच अचानक सुसाट वारे सुटले होते. ढगांनी आकाश काळेकुट्ट
केले. कडाडणाऱ्या विजांनी धरती थरथरू लागली. अशीच एक वीज जोराची गर्जना करत जवाळपास
पडली. घाबरून किंचाळत तिने इकडेतिकडे पाहिले. काळ्या धिप्पाड पहाडासारखा तो
माळरानाच्या कडेला उभा होता. कधीपासून तो तिचे भिजलेले आरस्पानी सौंदर्य डोळ्यांनी
पीत होता, देव जाणे.घाबरून, विचार न
करता, ती त्याला जाऊन बिलगली. त्याने तिला सावरले. त्याच्या
उबदार बाहूंत ती विसावली.पाऊस थांबला. तो परका माणूस मात्र थांबला नाही. तिच्या
कुशीत चैतन्याचे दान टाकून तो परदेसी निघून गेला, मागे वळूनही न पाहता…
याच माळरानावर, एका कुंवार
मातेने एका लेकीला जन्म दिला होता. तेव्हाही असाच पाऊस होता. आकाशाच्या डोळ्यांनी
आणि आईच्या डोळ्यांनी एकाच वेळी त्या नवजात जीवाचे स्वागत केले होते. आई मौन झाली. वरुणाने मान वर केली. आकाशाकडे पाहिले —
काळेकुट्ट ढग, कडाडणाऱ्या विजा, कोसळणारा
पाऊस.
"आई," ती शांतपणे म्हणाली,
"जाणले मी माझ्या जन्माचे रहस्य." वरुणा ताठ उभी राहिली. आई
धारातीवर मनुजपुत्र जन्माला येतात. पण तू एका देवपुत्रीला जन्म दिला. काळ्याकुट्ट
ढगांकडे निर्भयपणे पाहत ती उद्गारली, आज पासून माझे नाव आहे वारूणा, वरुण देवाची लेक.
आकाशातील वरुण देवाने त्यांच्या वर जलधारांचा अभिषेक करत स्वीकृती
दिली. त्या दिवशी वरुणाच्या आईने आपल्या कपाळावर सौभाग्याचे स्वाभिमानाचे कुंकू लावले.
No comments:
Post a Comment