Wednesday, July 15, 2026

पंचमहायज्ञ: गृहस्थाश्रमाची पाच शाश्वत कर्तव्ये



ईजे यज्ञेभिः शशमे शमीभिर्ऋधद्वारायाग्नये ददाश।

एवा चन तं यशसामजुष्टिर्नांहो मर्तं नशते न प्रदृप्तिः 
ऋग्वेद (मण्डल ६, सूक्त ३, मंत्र २)

 
अर्थ: जो मनुष्य यज्ञांद्वारे ईश्वराची (अग्नीची) उपासना करतो, आपल्या पवित्र कर्मानी (शमीभिः) शांत आणि संयमी राहतो, तो आपल्या मानवी जीवनाचा, घराचा आणि कुळाचा उत्कर्ष करतो. सूर्य ज्याप्रमाणे सर्वांना प्रकाश देतो, त्याप्रमाणे यज्ञीय भावनेने जगणारा मनुष्य सर्वांचे कल्याण करतो आणि तो अद्भुत अग्नी आपल्या बुद्धीला उन्नत करतो.
 
ऋग्वेदातील या यज्ञीय भावनेला आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनात आणण्यासाठी मनुस्मृतीमध्ये 'पंचमहायज्ञ' सांगितले आहेत.  
 
अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम्।
होमो दैवो बलिर्भौतो नृयज्ञोऽतिथिपूजनम्।।
(मनुस्मृती ३.७०):
 
अर्थ: . ब्रह्मयज्ञ म्हणजे  अध्यापन (शिकवणे आणि शिकणे) म्हणजे ब्रह्मयज्ञ होय. पितृयज्ञ: म्हणजे पूर्वजांचे तर्पण (स्मरण आणि आदर) करणे म्हणजे पितृयज्ञ होय. देवयज्ञ: म्हणजे होम-हवन (अग्नीमध्ये आहुती देणे) म्हणजे देवयज्ञ होय. भूतयज्ञ (बलिवैश्वदेव यज्ञ): म्हणजे भूतमात्रांना (प्राणी, पक्षी, निसर्ग) बली किंवा अन्न देणे म्हणजे भूतयज्ञ होय. मनुष्ययज्ञ (नृयज्ञ): अतिथींचे पूजन आणि सेवा करणे म्हणजे नृयज्ञ होय.

या शिवाय परोपकार इत्यादि  उत्तम कर्म, सत्य भाषण  ही यज्ञ आहेत.   असे शुभ कर्म केल्याने चित्त शांत होतो आणि पाप नष्ट होतात आणि ग्राहस्थ कर्म बंधनातून मुक्त होतो. 
  
या पाच ही यज्ञाचे अर्थ आणि आज हे यज्ञ कसे करायचे

ऋषीमुनींच्या मते, आपण या समाजात जगताना नकळत अनेक जीवांना इजा पोहोचवतो (जसे की पाणी भरताना, झाडू मारताना किंवा चूल पेटवताना). या दोषांचे निवारण करण्यासाठी आणि सृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पाच यज्ञ रोज करायचे असतात:

१. ब्रह्मयज्ञ (ऋषियज्ञ)

दररोज बुद्धी, ज्ञान आणि संस्कृतीचा परिचय देणाऱ्या ग्रंथांचे अध्ययन करणे आणि त्याचे ज्ञान निःस्वार्थपणे इतरांना देणे म्हणजे ब्रह्मयज्ञ; जेणेकरून सर्वांना सत्य आणि समाजाच्या कल्याणकारी मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळेल.
 
आजचे उदाहरण: आजच्या डिजिटल युगात इंटरनेटवरून किंवा पुस्तकांतून विधायक व नैतिक गोष्टी शिकणे, चांगल्या विचारांचा आणि साहित्याचा प्रसार करणे तसेच एखाद्या गरजू किंवा गरीब मुलाला मोफत शिक्षण देणे, हाच खरा ब्रह्मयज्ञ आहे.
 
 
२. पितृयज्ञ

ज्या माता-पिता आणि पूर्वजांमुळे आपल्याला हे जीवन व संस्कृती मिळाली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे पितृयज्ञ.

आजचे उदाहरण: आजच्या काळात आपल्या वृद्ध आई-वडिलांची मनापासून सेवा करणे, त्यांचा आदर राखणे आणि आपल्या दिवंगत पूर्वजांच्या स्मृत्यर्थ एखाद्या अनाथालयाला किंवा वृद्धाश्रमाला मदत करणे, हा आजचा पितृयज्ञ आहे. आज पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे साजरे केले जाणारे 'मातृदिन' आणि 'पितृदिन' हे केवळ वर्षातील दोन दिवस नसून, ही कृतज्ञतेची भावना ऋग्वेदकाळापासून 'पितृयज्ञा'च्या माध्यमातून आपल्या संस्कृतीत अखंड रुजलेली आहे. पालकांप्रती असलेल्या याच शाश्वत आदरामुळे आणि कर्तव्याच्या भावनेमुळे आजच्या आधुनिक युगातही भारतात 'संयुक्त परिवार' (एकत्र कुटुंब पद्धती) आणि कौटुंबिक मूल्यांची वीण घट्ट टिकून आहे."

३. देवयज्ञ

वैदिक काळापासून  निसर्गातील ज्या शक्तींमुळे (सूर्य, हवा, पाणी, वनस्पती) आपण जगू शकतो, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  अग्नीमध्ये आहुती देऊन हा यज्ञ केला जायचा. अग्नी, वायू, जल व माती या मूलभूत तत्त्वांद्वारे निर्माण झालेल्या वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी गायीच्या शुद्ध घी व औषधी वनस्पतींच्या आहुतीने केलेला यज्ञ हवेची शुद्धता करतो, रोगजंतू नष्ट करतो आणि सर्व प्राणिमात्रांसाठी अनुकूल पर्यावरण टिकवतो.
 
आजचे उदाहरण: आजच्या काळात पर्यावरणाचे रक्षण करणे, झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्रदूषण न करणे आणि घरात सात्विक वातावरण ठेवणे हाच देवयज्ञ आहे.
 
४. भूतयज्ञ (बलिवैश्वदेव यज्ञ)
 
ईशान उपनिषद सांगते की, आपल्या वाट्याला आलेल्या वस्तूंचा कृतज्ञतेने उपभोग घेत, प्रत्येक जीवाला इथे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. निसर्गाचा आदर करत कर्म केल्यास शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरली तरी कर्मबंधने मानवाला बांधू शकत नाहीत. भूत यज्ञ हा या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव आहे.समर्थ रामदासस्वामी ही म्हणतात  "जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत" परोपकारी वेचि जीव । तो सत्त्वगुण जाणावा ॥ "या जगात भेटणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्रात आणि मानवात परमेश्वराचेच रूप पाहावे. सर्वांशी प्रेम, दया आणि आदराने वागणे श्रम आणि आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी खर्च करतो हीच खरी ईश्वरसेवा आहे.   
 
आजचे उदाहरण: उन्हाळ्यात गच्चीवर किंवा गॅलरीत पक्षांसाठी पाणी व दाणे ठेवणे, रस्त्यावरील मुक्या प्राण्यांन अन्न देणे आणि निसर्गातील जैवविविधतेचा आदर करणे हे आजचे भूतयज्ञ आहे.
 
५. मनुष्ययज्ञ (नृयज्ञ)

गरजू, वृद्ध, आजारी व निराधार व्यक्तींना मदतीचा हात देणे, अतिथींचा आदर करणे, भुकेल्यांना अन्नदान करणे आणि समाजोपयोगी कार्यात सहभागी होणे हा आधुनिक मनुष्ययज्ञ आहे. सर्व प्राणीमात्र आणि मानवजातीबद्दल करुणा, सेवा व कृतज्ञतेची भावना ठेवणे हेच पंचमहायज्ञांचे खरे सार आहे.

आजचे उदाहरण: घरी आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करणे, तसेच समाजातील गरीब, आजारी किंवा उपेक्षित व्यक्तीला वैद्यकीय, मानसिक किंवा आर्थिक मदत करणे हा आजचा सर्वोत्तम मनुष्ययज्ञ आहे. या पंचमहायज्ञांचे महत्त्व वेद आणि उपनिषद काळापासून चालत आले आहे, याचे पुरावे खालील ग्रंथांमध्ये मिळतात: शतपथ ब्राह्मणात या पाच यज्ञांना थेट 'महायज्ञ' अशी संज्ञा देऊन त्यांचे नित्य आचरण अनिवार्य मानले आहे:

 
पञ्चैव महायज्ञाः। तान्येव महासत्राणि-देवयज्ञः
पितृयज्ञो भूतयज्ञो मनुष्ययज्ञो ब्रह्मयज्ञ इति। 
शतपथ ब्राह्मण (शुक्ल यजुर्वेद - ११.५.६.१)
 
ऋषींनी या पाच महायज्ञांना 'महासत्र' (महान अनुष्ठान) म्हटले आहे. ते म्हणजे - देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. हे मानवाने रोज केलेच पाहिजेत. भगवान श्रीकृष्णही म्हणतात,    
 
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम।।
(भगवद्गीता ४.३१)
 
हे कुरुश्रेष्ठा (अर्जुना), यज्ञापासून उरलेले 'यज्ञशिष्ट' (यज्ञाचे अन्न किंवा फळ) जे अमृतातुल्य आहे, त्याचे सेवन करणारे श्रेष्ठ पुरुष सनातन परब्रह्माला प्राप्त होतात. परंतु, जो मनुष्य या जीवन-यज्ञाचे आचरण करत नाही (म्हणजे स्वार्थी जीवन जगतो), त्याला हा भौतिक लोक (हा संसार) देखील सुखकर ठरत नाही; मग परलोक कसा बरे मिळेल? 'यज्ञशिष्टामृतभुजो' (यज्ञाचे अन्न ग्रहण करणारे): याचा अर्थ असा की गृहस्थाने प्रथम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ याद्वारे समाज, निसर्ग आणि प्राण्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत. त्यानंतर जे उरते, ते अन्न नसून 'अमृत' आहे. २. 'नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य' (यज्ञ न करणाऱ्याला हा लोकही नाही): भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की, जो माणूस कोणताही त्याग किंवा यज्ञ न करता फक्त स्वतःपुरता विचार करतो, त्याला या समाजातही आदर किंवा सुख मिळत नाही. मानवी जीवन हे परस्परांच्या सहकार्यावर (Interdependence) टिकून आहे, हेच यातून सिद्ध होते. आज ही भारतात घरात शुभ कार्य असेल तर भंडारा इत्यादि करतात. सर्वच धार्मिक क्षेत्रांत भक्तांनी उपाशी राहू नये या  भावनेने  अन्नछत्र चालविले जातात.  
 
निष्कर्ष: ऋग्वेदातील मंत्रापासून ते भगवद्गीतेपर्यंत आपल्या सर्व ग्रंथांनी एकच संदेश दिला आहे की, मनुष्य हा एकटा जगू शकत नाही. तो समाज आणि निसर्गाचा ऋणी आहे. पंचमहायज्ञ म्हणजे कोणतीही कठीण कर्मकांडे नसून, निसर्ग, समाज, कुटुंब आणि स्वतःच्या बुद्धीप्रती 'कृतज्ञता' (Gratitude) व्यक्त करण्याची एक सुंदर व शाश्वत जीवनपद्धती आहे.
 

No comments:

Post a Comment