Wednesday, July 22, 2026

खारुताईचा पूल आणि ज्ञानाचा मार्ग



प्राचीन काळी गंगेच्या तीरावर वसलेल्या एका सुंदर ग्रामात अजय नावाचा एक तरुण राहत असे. तो स्वभावाने वाईट नव्हता; पण आळशी, निरक्षर आणि श्रमाला कंटाळणारा होता. दुसऱ्यांचे यश पाहून त्याला आनंदापेक्षा मत्सर अधिक वाटे.

त्याच गावात श्याम नावाचा दुसरा तरुण होता. लहानपणापासून त्याने गुरुकुलात राहून बारा वर्षे वेद, वेदांग, गणित, न्याय, विज्ञान आणि राजनीती यांचे शिक्षण घेतले होते. गुरुसेवा, संयम आणि अखंड अभ्यास यांच्या बळावर तो महान विद्वान झाला. त्याच्या गुणवत्तेमुळे राजाने त्याला आपल्या दरबारात उच्च पद दिले. गावात त्याचा मोठा मान होता.
 
श्यामचा सन्मान पाहून अजयच्या मनात विचारांचे वादळ उठले. तो मनाशी म्हणाला, "ज्यामुळे श्यामाला हा मान मिळाला, ती विद्या मलाही हवी आहे. परंतु तिच्यासाठी बारा वर्षे गुरुकुलात कष्ट करण्याची माझी तयारी नाही. देव प्रसन्न झाले तर एका क्षणात सर्व विद्या मिळेल."
 
असा विचार करून तो गंगेच्या पवित्र तीरावर गेला. त्याने अन्न-पाण्याचा त्याग केला आणि कठोर तपश्चर्या सुरू केली. काही दिवसांनी त्याच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान त्याच्यासमोर प्रकट झाले. भगवान म्हणाले, "वत्सा, तुझ्या तपश्चर्येने आम्ही प्रसन्न झालो आहोत. वर माग." अजयन  म्हणाला, , "प्रभो! मला वेद, शास्त्र, गणित, विज्ञान आणि सर्व विद्यांचे ज्ञान वरदानात द्या." भगवान स्मित करून म्हणाले, "वत्सा, ज्ञान हे वरदान नसते; ते साधना असते. विद्या गुरुमुखातूनच प्राप्त होते. उत्तम गुरुचा आश्रय घे. अभ्यास कर. परिश्रम कर. तेव्हाच विद्या तुझी होईल."
 
परंतु अजय हट्टी होता. तो म्हणाला, "प्रभो! मला गुरुकुलात जायचे नाही. तुम्हीच मला सर्व विद्या द्या. अन्यथा मी प्राण जाईपर्यंत तपश्चर्या सोडणार नाही." भगवान काही न बोलता अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी अजय ध्यानस्थ बसला असताना त्याचे लक्ष एका लहानशा खारुताईकडे गेले.
 
ती प्रथम वाळूत लोळत असे. मग अंगाला लागलेली वाळू घेऊन नदीत जाई आणि पुन्हा किनाऱ्यावर येई. हा क्रम पुन्हा पुन्हा सुरू होता. बराच वेळ पाहिल्यानंतर अजयने तिला विचारले, "हे खारुताई! तू असा व्यर्थ परिश्रम का करते आहेस?"
खारुताई शांतपणे म्हणाली, "मी या गंगेवर पूल बांधत आहे."
 
अजय मोठ्याने हसला. "अगं मूर्खे! अशा रीतीने कधी पूल बांधला जातो का? वाळू वाहून जाईल. पूल बांधण्यासाठी शिल्पविद्या लागते, अभियंते लागतात, शेकडो कामगार लागतात. योग्य ज्ञानाशिवाय पूल उभा राहत नाही."
 
खारुताईने क्षणभर अजयकडे पाहिले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाली, "मग, हे तपस्वी! जर गुरुशिवाय, अभ्यासाशिवाय आणि परिश्रमाशिवाय तुला तपाने सर्व विद्या मिळू शकते, तर माझा हा पूल का उभा राहू शकत नाही?" हे शब्द ऐकताच अजयच्या अंतःकरणात जणू वज्राघात झाला.
 
त्याला भगवानांचे शब्द आठवले. त्याला उमगले की ज्ञानाला पर्याय नाही, गुरुला पर्याय नाही आणि परिश्रमाला पर्याय नाही. त्याने त्याच क्षणी तपश्चर्या सोडली आणि एका श्रेष्ठ ऋषींच्या गुरुकुलात प्रवेश घेतला. गुरुचरणी बसून  दिवस-रात्र अभ्यास केला. काळ लोटला. तो वेद, शास्त्र, गणित, विज्ञान आणि राजनीती शास्त्रात पारंगत झाला. तेव्हा त्याला समजले, “भगवंताने त्याला खरुताईच्या माध्यमाने विद्येकडे जाणारा खरा मार्ग दाखविला होता.  
 
या कथेतला अजय हा केवळ एक व्यक्ती नाही; तो प्रत्येक त्या मनुष्याचे प्रतीक आहे, ज्याला परिश्रमाशिवाय यश हवे असते. काहींना असे वाटते की फक्त अजयप्रमाणे उपोषण करून सरकारला आपल्या तलवारीसमोर नाचवता येईल. पण लोकशाहीमध्ये असे कधीच घडत नाही. लोकशाहीत जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो, विचार स्पष्टपणे मांडावे लागतात, संघटना उभी करावी लागते, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा लागतो आणि जनादेश मिळवावा लागतो. हा मार्ग कठीण असला तरी टिकाऊ परिवर्तन याच मार्गाने साध्य होते.
 
जसा पूल बांधण्यासाठी स्थापत्यविद्येचे ज्ञान आवश्यक असते, तसाच समाजव्यवस्थेत बदल घडवण्यासाठी लोकशाहीचे ज्ञान, संघटनशक्ती, संयम आणि सातत्यपूर्ण पुरुषार्थ आवश्यक असतो.

No comments:

Post a Comment